रोमांस ( नवी कथा )

                                 

तिचा नवरा तिला वेगवेगळ्या प्रकारे घाबरवायचा . ती घरामध्ये एकटी बसून टीव्ही पाहात भाजी निवडत असताना  तो हळूच आवाज न करता दार उघडून घरात यायचा आणि तिच्यापुढे धसकन उभा राहायचा. ती घाबरून दचकायची . किंचाळायची. ती काचेचे पेले हातामध्ये घेऊन उभी असली कि तो अचानक मेन स्वीच बंद करून घरामध्ये अंधार करायचा . पुन्हा चालू. पुन्हा बंद. त्या वेळी खरतर तिने त्याला ब्रेड आणायला खाली पाठवलेलं असायचं . अंधार उजेड अंधार उजेड अंधार . ती घाबरायची आणि तिच्या हातातले सगळे काचेचे ग्लास खाली पडून फुटायचे. त्या दोघांना मूल नव्हते.त्यांनी ठरवून होवू दिले नव्हते. सहा सात काचेचे ग्लास एकत्र खाली पडून फुटतात तो आवाज त्याला अतिशय आवडायचा. तो खूश व्हायचा . ती घाबरून किंचाळली कि तो धावत घरात यायचा आणि तिला कुशीत घेऊन तिच्या पटापट पाप्या घ्यायचा . ती त्याची लहान गोबरी लाडकी मुलगी बनायची आणि तो तिचा वडील. एकमेकांना घट्ट मिठी मारून ते शरीराच्या उबेत उभे राहायचे . शांत व्हायचे. मग हळुवारपणे दोघे मिळून खालच्या बोचरया काचा गोळा करायचे.

त्याने एकदा अतिशय उग्र मांजर घरामध्ये पाळली होती.तो बाहेर गेला आणि ती घरात एकटी असली कि ती मांजर तिच्याकडे मग्रुरीने एकटक दिवसभर पाहत बसायची. तो संध्याकाळी टीव्हीसमोर मांडी घालून बसला कि त्याच्या दोन पायांमधील उष्णतेमध्ये ती जाऊन बसायची. त्याच्यावर हक्क सांगत राहायची. तो पलंगाकडे जायला लागला कि विस्फारून ओरडायची. ती त्या मांजरीला पुरून उरली. तिने तक्रार केली नाही. जे होतंय ते होवू दिले . मांजराला आपल्यातले जे  होते ते खाऊ  घातलं. तिला असूया येत नाही अस कळल्यावर  मग ती मांजर निघून गेली.

मांजर गेल्यावर त्याने पाण्याचे नळ ठिबकावायला सुरुवात केली. रात्री बेडरुममध्ये तिला दूर स्वयपाकघरातील पाण्याचा नळ एका संथ भीतीदायक तालात हुंकार सोडत असल्यासारखा ऐकू यायचा . ती त्याचा हात गच्च धरायची. त्याला घट्ट बिलगायची. तो गाढ झोपेचे सोंग घेऊन हाताच्या मुठी घट्ट बंद करून बसायचा कि ज्यामुळे तिला आपला हात पकडताच  येऊ नये.  ती मग  उठायची आणि सावकाश स्वयपाकघराकडे चालायला लागायची. कशीबशी अंधारात चालत जाऊन तो ठिबकणारा नळ बंद करायची. ती घाबरून परत पलंगाकडे आली कि तिला जो वास येत असे त्याने तो उत्तेजित व्हायचा. तिच्यावर अतोनात प्रेम करायचा. ती सगळं विसरून  त्याच्या पकडीत सुखावून जायची.

लहानपणी तिचे वडील प्रवासात रेल्वे मधल्या कुठल्यातरी स्टेशनावर थांबली कि तिला एकटीला डब्यात बसवून चहा आणायला खाली उतरायचे. गाडी कधीही सुटेल ह्या भीतीने ती घाबरायची. कावरीबावरी होवून इकडेतिकडे पहात बसायची. तिची मजा पाहायला वडील गाडी सुटेपर्यंत डब्यात यायचे नाहीत. मागच्या एखाद्या डब्यात चढायचे. गाडी सावकाश सुरु झाली कि तिचे डोळे भरून यायचे. ती ओठ काढायची. एकट्या लहान मुलांना ट्रेनमधून पळवून नेतात आणि त्यांचे हातपाय तोडून त्यांना भिक मागायला लावतात असे तिला वडिलांनी अनेक वेळा सांगितले असे. ती पुरेशी जोरात रडायला लागली कि मग तिचे वडील त्यांचा चहा आणि तिचा आवडता खाऊ घेऊन शांतपणे तिच्या शेजारी येऊन बसायचे.

एकदा ती सकाळी उठली तेव्हा तो घरातून गायब झाला होता.घरातले सगळे फोन घेऊन तो निघून गेला होता.बाहेर मुसळधार पाऊस. तिची घालमेल होवू लागली. तिला रडू फुटले. तो नेहमीच असं  काहीतरी करतो हे समजून ती काही वेळ शांत व्हायची पण काही वेळाने पुन्हा ती चिंतेने आणि भीतीने कासावीस होवून जायची. असे दिवसभर चालू राहिले. भीतीची आणि शांततेची आवर्तने . ती भरपूर रडली. भिजत गावभर जाऊन त्याला शोधून आली. तिच्या मनात त्याच्या आत्महत्येची कल्पना गडद होयीपर्यंत तो बाहेर भटकत राहिला. मग अचानक घरात येऊन त्याने तिला कुशीत घेतली.

तो देखणा आणि हुशार होता. हसरा होता. लग्नाच्या वेबसाईटवरून दोघे भेटले होते. ती आळशी आणि संथ आहे. तिला बाहेरच्या जगातील स्पर्धा झेपत नाही हे तिने त्याला मोकळेपणाने सांगतिले होते. तिला पैसे कमवायचेच नव्हते. तिचे ते कामच नव्हते. खूप सुदैव लागते अशी सुंदर आणि घरबैठी  मुलगी इंटरनेटवर भेटायला. तो सुदैवी ठरला. ते दोघे लग्नाच्या वेबसाईटवर एकमेकांना फोन नंबर देऊन एकदा एका कॉफी शॉप मध्ये भेटले मग रविवारी फिरायला टेकडीवर गेले. पुढील आठवड्यात पावसात त्यांनी एकमेकांना शांत आणि खोलवर किस केलं आणि मगच घरच्या लोकांना सांगितलं.

त्याला आई नव्हती.आपण काम करून किंवा शिकून किंवा खेळून घरी आलोय आणि आपले कुणी लाड करतय ह्या अनुभवाला तो आसुसलेला होता.कुणीतरी आपली सतत वाट पहावी असे त्याला वाटे.त्याची सुखाची कल्पना ही ताटातल्या  गरम गरम पोळीची आहे हे ऐकून तिला मायेने भरून आले होते.

त्याचातले एक मूल लग्न झाल्यावरच्या नव्या काळात ऑफिसातून धावत धावत घरी येत असे. त्याला भूक लागली कि अकांडतांडव करून घर डोक्यावर घ्यायला आवडत असे. ते मूल आता खूप पैसे कमावत असले तरी रोज तिच्याकडून खर्चाला ठराविक पैसे घेत असे. ती त्याला मउसूत पोळ्या करून वाढायची. त्याला जेवण आवडले का विचारायची. ती त्याच्या कपड्यांना बाजारात आलेला नवा फाब्रिक सोफ्टनर लावायची. दुपारी त्याच्या कपड्यांना लिलीच्या फुलांचा मंद सुवास येत असे. सिनेमा बघताना तो थेटरमध्ये रडायचा तेव्हा ती त्याला रुमाल द्यायची. बसमध्ये चढताना तो तिचा हात नकळत घट्ट धरायचा. त्याला खायला काही विकत हवे असेल तर घेऊ का मी ते विकत ? असे तिला विचारायचा. हे सगळे पृष्ठभागावर कधी आले नाही. जगाला दिसले नाही . तरंग नव्हते. त्या दोघांची आपापली समजूत होती.

तिने फेसबुकवर तिच्यासारख्याच घरबैठ्या बायका जमवल्या होत्या.  तो कामाला गेला कि त्यांच्याशी ती  गप्पा मारत असे. त्यांना आपल्या केकचे फोटो पाठवत असे. तिच्यासारखा मनुका आणि क्रीम घालून केलेला केक कुणालाच जमत नसे. ती त्यातल्या एकीलाही कधीही प्रत्यक्ष भेटली नव्हती. त्या सगळ्या जमून जेवायला जात तेव्हा ती दिवसभर ऑफलाईन राहायची. घरातले खाजगी फोटो तिने कधीही अपलोड केले नाहीत. ती सुंदर होती . काही केल्या तिच्या अंगावर चरबी चढत नसे. मजेत खायची प्यायची . बिल्डींगचे चार जिने चढण्यापलीकडे व्यायामही करत नसे. तरी त्याच्या हातात , त्याच्या कुशीत ती अलगद मावायची. संध्याकाळी चार साडेचार झाले कि ती इतक्या लगबगीने आवरायला आणि खायचे करायला घेत असे कि आपला नवरा घरी येणारे कि शाळेतला मुलगा हेच तिला कळेनासे होत असे.

अंघोळ केल्यावर कपडे घालण्याआधी आपले लांब केस मोकळे सोडून त्याच्या कमरेभोवती दोन्ही पाय अडकवून , आपले हात त्याच्या गळ्यात टाकून ती त्याला घरभर फिरवायला लावायची आणि अगदी ऑफिसला जायची वेळ झालेली असताना त्याला उत्तेजित करायची. त्याच्या कानात हलक्या आवाजात तिला पडलेली त्यांची  नग्न स्वप्ने लाजून सांगायची . चालताना त्याला तिचा भार व्हायचा नाही .नाजूक आणि हसरी होती ती.  अश्यावेळी प्रमाणाबाहेर उत्तेजित झाला कि तो उभ्याउभ्याच तिच्यात शिरून स्वतःला शांत करत असे आणि बस पकडण्यासाठी धावपळ करत जात असे.

ती घाबरली कि लालेलाल व्हायची आणि लगेच रडायला लागायची. तिचे रडणे सावकाश फुलून यायचे. गरम अश्रू काही वेळाने वाहायला लागत आणि भीती ओसरली तरी ते वाहतच राहत. तिच्या पलंगात त्याने थायलंडहून आणलेला रबरी बुळबुळीत साप ठेवला होता. एकदा बाथरूममध्ये प्लास्टिकचा बेडूक तिच्या अंघोळीच्या बादलीत तळाला ठेवला होता. तो नवीन लग्न झाले तेव्हा मुद्दाम घरामध्ये भीतीदायक सिनेमे लावून पाहत बसायचा. तिला ते जराही पाहवत नसत. कारण ते तळमजल्यावर राहत आणि असे सिनेमे पहिले कि रात्री तिला खिडकीपाशी कुणीतरी येऊन उभे आहे असे वाटत राही. त्यांच्या खिडकीच्या पडद्यावर सावल्या हलत.ती त्याच्याशेजारी उशीमध्ये तोंड खुपसून बसायची. घाबरत असली तरी त्याने निर्माण केलेल्या भीतीचं तिला आकर्षण होतं .हळूच दुलई वर करून ती एका डोळ्याने समोरचे बीभत्स दृश्य पाहत असे. आणि पुन्हा दुलईमध्ये शिरत असे. असे ती दोनतीनदा कारे तेव्हा त्याचा हात तिला मायेने थोपटत असे.

त्याचं घर स्वच्छ होतं .गारवा होता.घराबाहेर भरपूर हिरवाई आणि शांतता होती. बिल्डींगमधील  इतर बायका तिच्यापेक्षा कमी सुंदर होत्या आणि बाहेरपेक्षा स्वस्त आणि ताजी भाजी विकणारे भाजीवाले त्यांच्या अंगणात आपसूक येत.

बिल्डींगच्या गच्चीच्या वरती उंचावर एक पाण्याची टाकी होती. रात्री जेवणानंतर तो वर टाकीवर जाऊन उभा राही आणि तिला कॉफीचा कप घेऊन डगमगत्या शिडीने वरती बोलावून घेत असे . एका हाताने कप सांभाळत शिडीच्या पायऱ्या चढताना तिचे दात भीतीने एकमेकांवर आपटत. उंचावरून खाली पाहून तिला गरगरत असे. पण एकदा वर पोचली कि मग त्याच्या कुशीत मोकळ्या हवेत ती आनंदाने झोपत असे. तो आकाशातले तारे पाहत बसायचा आणि तिच्या स्वप्नात तिचे वडील यायचे.

मूल न झालेली जोडपी कुत्री किंवा तत्सम आज्ञाधारक प्राणी पाळतात. त्यांना माणसांची नावे ठेवून त्यांना डिसेंम्बरात स्वेटर शिवतात तसे काही त्या दोघांनी केले नव्हते. त्यांनी स्वतःचे ओझे जगावर टाकले नव्हते.

कधी रविवारी ती सुरेख स्वयपाक करून त्याच्या चार मित्रांना आणि त्यांच्या बायकांना जेवायला बोलावी. त्यांना कुणी बोलावले तर फार नीटनेटके कपडे करून मंद वासाचा एकच परफ्युम दोघे लावून आठवणीने सुंदर फुले घेऊन ते मित्रांकडे जेवायला जात. लग्नात त्यांना ते दोघे मावतील आणि जरासुद्धा भिजणार नाहीत अशी नाजूक कलाकुसरीची आणि भक्कम मुठीची जपानी छत्री भेट मिळाली होती.

ते इतर कुणाला फारसे त्यांच्यात येऊ देत नसत. एकमेकांची तक्रार बाहेर कुणाकडेही करत नसत. दोघेही फार साधे होते. उतारवयात इंग्लंड अमेरिकेला फिरायला जाता यावं म्हणून ते नेमाने सेव्हिंग करत होते. ती जुना मोबाईल वापरायची . तो घरून डबा न्यायचा . त्याची आई केळफुलाच्या भाजीत सोडे घालायची तसे करायला ती शिकली होती.रविवारी बाजारातून येताना तो नेमाने दोन खेकडे जिवंत आणत असे. पहिल्या रविवारी तिने पिशवीत हात घातला आणि ती छतापर्यंत किंचाळली. एका खेकड्याने तिचे बोट पकडले होते.

पण काही दिवसातच तिला त्याचा खेळ समजला . आता ती पिशवी हातात घेऊन सरळ उकळत्या पाण्यात उपडी करू लागली. खेकड्यांशी गप्पा मारत ती त्यांच्या नांग्या कटाकट मोडू लागली. माशाचे खवले काढू लागली. नाजूक हातांनी शिंपले साफ करू लागली. गाबोळी, भेजा बनवू लागली. नारळाचे ताजे दूध काढू लागली. कलेजीचे फ्राय तर अश्या सफाईने कि जणू ते तिला लहानपणीपासून येत होते.त्याला कधी कळलेच नाही कि ती लग्नाआधी शाकाहारी होती.

एकदा त्याने दाराची कुलुपे बदलून ठेवली आणि तीला किल्ल्या दिल्या नाहीत. ती दूध तापवायला ठेवून दार ओढून खाली टोमाटो आणायला भाजीवाल्याकडे अंगणात गेली . परत दारापाशी येऊन कुलुपाशी घाबरून जुन्या किल्ल्यांनी धडपड करत बसली. आत दूध करपू लागले. रात्री पाहुणे जेवायला येणार होते.

लहानपणी तो सगळ्यांमध्ये एकटाच असा होता ज्याला आई नव्हती. बाकी सर्व घरातील सर्व मुलांना आई असायची आपले मित्र त्यांच्या आयांशी बोलताना पाहून तो मान खाली घालून बसायचा. आपला नवरा आपल्याला घाबरवतो ह्याचा उल्लेख तो कधीही त्याच्या मित्रांसमोर करत नसे त्यामुळे त्याला ती जास्तच आवडायची.

लहानपणी तिचे वडील तिला दारू पिऊन मार मार मारत आणि मग स्वतः रडत बसत.मग दुसर्या दिवशी तिचे लाड करत.

अनेकदा रात्री तो तिच्यासोबत कन्सोलवर विडीओ गेम्स खेळत बसे. दोघेही जोर जोरात आरडा ओरडा करत अनेक माणसे बंदुकीने मारून टाकत आणि मग हसून हसून दमून तिथेच एकमेकांच्या कुशीत आडवे होत.

लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने एक भेसूर हसरी बाहुली त्यांच्या पलंगात पांघरुणाखाली ठेवली होती.हॉटेलच्या पलंगाचे मऊ पांढरे पांघरूण बाजूला करताच ती इतका वेळ भीतीने किंचाळत ओरडत राहिली कि त्या रात्री त्यांच्या शारीरिक संयोग होवू शकला नाही . त्या भीतीने तिला ताप आला आणि ती त्याच्या कुशीत थरथरत झोपी गेली .पण दुसर्या दिवशी सकाळी उठताच त्याच्या अधीन झाल्यानंतर तिला इतर कोणत्याही पुरुषाचे शरीर नजरेलाही आवडेनासे झाले . त्याला तर आता तिच्या थरथरत्या घाबरलेल्या शरीराचे व्यसन लागले होते.

त्यांच्या लग्नाला आता सहा वर्षे झाली होती .त्यांनी नव्याने घर रंगवून काढले होते. सवयीची आणि कंटाळ्याची साय जरासुद्धा त्यांच्यावर साचली नव्हती. ते एकमेकांना सतत अनोळखी वाटत रहात .घाबरवून टाकणाऱ्या प्रत्येक क्षणाला त्यांची एकमेकांशी असलेली ओळख पुसली जात असे आणि ते नव्याने एकमेकांजवळ  येत. एकदा त्याने ती घरात येण्याआधी  घराच्या दारापासून बाथरुमपर्यंत रक्तासारखा दिसणारा लाल रंग सांडून ठेवला होता आणि तो बाथरूमचे दार आतून लावून तिची मजा ऐकत खो खो हसत बसला होता.

असे घडत असे कारण तो दोन घटनांच्यामध्ये पुरेसा वेळ जाऊ देत असे. त्याच्या अश्या वागण्याची त्याने तिला सवय होवू दिली नव्हती. त्यामुळे अचानक घडणाऱ्या प्रसंगांनी तिला धक्के बसायचे थांबत नसत. शिवाय तो एकसारख्या गोष्टी पुन्हा दुसर्यांदा करत नसे.

संध्याकाळी बेल वाजली आणि दर उघडलं कि दारात कुणीच उभं नसायचं . बाहेर गडद अंधार. ती दरवाजा लावायची . पुन्हा बेल वाजायची. पुन्हा दरवाजा उघडावा तर कुणीच उभं नसायचं.

तिच्याकडे तीचा लहानपणीचा एक फोटो होता. ज्यात तिच्या वडिलांनी तिला खांद्यावर बसवले होते आणि ती कॅमेर्यात पाहून हसत होती . तिच्या नवर्याचे हात तिच्या वडिलांसारखेच दणकट होते. ते पाहूनच ती लग्नाला हो म्हणाली होती.

तो अनेकदा रात्री निशिगंधाची फुले घेऊन येई . त्याचा घमघमाट घरामध्ये पसरे. तिच्या कुशीत शिरून तो तिला थोपटायला सांगे . एखादे गाणे गुणगुणायला सांगे आणि अंगाचे प्रेमळ मुटकुळे करून तो तिच्या पोटाशी शांत झोपी जाई. काही वेळा तो तिच्या शरीरात तिथून प्रवेश करू पहायचा. त्याला पुन्हा पोटाच्या आत जायचे असल्यासारखा. अंधाऱ्या शांत गर्भाशयात. इतका जवळ बिलगायचा कि असे वाटायचे कि इथूनच पोटाच्या त्वचेच्या आत तो निघून जायील. तो अत्यानंदाने रिकामा झाला कि डोळे मिटून झोपी जायचा आणि झोपेत तिला म्हणायचा ,मला तुझ्या आत आत जाऊदे. पुन्हा सगळं पहिल्यापासून सुरु करुदे. जन्मापासून सुरु करुदे.

एकदा ती दुपारी घरात काम करत होती . घराकडे पाहत होती. हात स्वयपाकात होते. आटोपशीर टापटीप घर. इथली उब नव्याने होती तशीच आहे. हे सगळं असच चालू रहाणार का ? थरारक . मग पुन्हा शांत ? पुन्हा अचानक नवा थरार.

बराच वेळ झाला त्याचा आवाज येईना.कारण तो घरात असेल तर खूप मोठ्यांदा बोले आणि वस्तुंची पाडापाडी करत खोल्यांमधून फिरे. गेला अर्धा तास तो दाराबाहेरचा मेनस्वीचचा बॉक्स उघडून फ्यूज ची वायर बदलणार बदलणार असे तिला आश्वासन देत होता. अचानक पुन्हा गायब झाला. काही वेळाने अंधार होयील.

ती बाहेरच्या खोलीत आली तर तो काळानिळा होवून दारात पडलेला .शिवाय तोंडातून फेस. हातात विजेची वायर. ती घाबरली नाही .स्थिर उभी राहिली.

तिचं लहानपण निघून गेलं. ती मोठी झाली. तो गेल्यावर काही महिन्यात तिच्या वयाच्या बायकांची होते तशी तिची त्वचा थोडी निबर होवू लागली. आपलं लहानपण निघून गेलं तसच त्याक्षणी त्याचेही निघून गेले असणार हे तिच्या लक्षात आलं.

सचिन कुंडलकर .

पूर्वप्रसिद्धी ( माहेर दिवाळी अंक. २०१६ )

 

 

 

 

 

 

 

 

Advertisements

करंट ( लोकसत्ता मधील लेखमाला २०१७ ) भाग ६ ते १० .

 

करंट  ६

प्रत्येक माणसाच्या व्यक्तीमत्वात इतर अनेक गुणांप्रमाणे एक महत्वाचा गुण असतो तो म्हणजे त्याचा अहंभाव . माणसाने ह्या अहंभावाचा वापर करून आजपर्यंत प्रचंड  उर्जेने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. कलाकार, शास्त्रज्ञ , संशोधक , विचारवंत , सामाजिक आणि राजकीय नेते , उद्योजक ह्यांच्यात असलेले अनेक गुण आपण तपासतो पण त्या सर्वांमध्ये असलेला एक महत्वाचा घटक आपण ओळखायला आणि मान्य करायला लाजतो किंवा संकोचतो तो म्हणजे त्या माणसाला असलेला अहंभाव (ego) आणि त्या व्यक्तीने आपल्या इगोचे आपल्या कामामध्ये केलेले रुपांतर. प्रत्येक माणसाकडे हा अहंभाव असला तरी सर्व माणसांना त्याचा चांगला वापर करण्याची बौद्धिक आणि नैसर्गिक कुवत नसते. बुद्धिमान माणसे आपली ताकद बुद्धी , त्यामुळे कमावलेले ज्ञान , त्यावर कमावलेली संपत्ती , त्या ओघाने येणारी सत्ता ह्या सगळ्याचा वापर काहीतरी नवे निर्माण करण्यासाठी वापरत राहतात ते करताना त्यांच्या मदतीला येतो तो त्यांच्या मनातील पोसलेला आणि सतत घासून पुसून ताजा केलेला अहंभाव. संकुचित वृत्तीच्या , परंपरांना शरण जाणाऱ्या आणि अर्धवट संतवांग्मय वाचून पोसलेल्या आपल्या मध्यमवर्गीय मूल्यव्यवस्थेत आपण सामान्य माणसे मानतो त्याप्रमाणे अहंभाव ही काही चुकीची भावना नाही. तिला बरोबर चूक किंवा चांगली वाईट असे ठरवता येणार नाही कारण ती  फक्त एक भावना आहे. भावनेला गुण देता येत नाही . भावनेच्या वापर करून केलेल्या क्रियेला गुणदोष देता येतात. अहंभाव हि फार आवश्यक आणि उपयोगी भावना आहे. दुर्दैवाने आपल्या सामाजिक विचारपद्धतीत आणि शिक्षणात इगोला योग्य पद्दतीने आणि योग्य प्रमाणात जपून पोसून मोठे करत कामाची ताकद वाढवायचे शिक्षण कुणीच कुणाला देत नाही. कुटुंबातहि नाही आणि बाहेरही नाही. त्यामुळे हट्टीपणा, हिंसक परंपराप्रियता आणि नाठाळपणा करणे ह्यापलीकडे ह्या भावनेचे काही काम असू शकते ह्याची जाणीव अनेकांना नसते.

मी इगोने फुललेली अनेक माणसे उत्तम कलाकृती तयार करताना , लिहिताना , भूमिका करताना , वेगवेगळे शोध लावताना पहिली आहेत. मला हे जे वाटते आहे ते आत्ता सर्वात महत्वाचे आहे , मी महत्वाचा आहे , माझा विचार हा नवा ताजा आणि आवश्यक आहे हि जाणीव जर नसेल तर कुणीही कोणतीही चांगली नवनिर्मिती करू शकत नाही.  इगो चा वापर करताना दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखणे महत्वाचे नसते तर स्वतःला महत्वाचे वाटणे हे फार आवश्यक असते. नवनिर्मितीसाठी ती एक फार अत्यावश्यक गोष्ट असते. अनेकदा कलाकार निर्मिती करताना शब्द , रंग , आकार , चाल ह्यापैकी कशाचेही प्राथमिक रूप सुचले कि आनंदाच्या भरात जातो आणि त्या उत्साहाच्या इंधनावर तो त्या प्राथमिक सुचलेल्या घटकाला आकार देत बसतो . ज्यातून काहीवेळा नवनिर्मिती होण्याची शक्यता तयार होते. एखाद्या उद्योजकाला , एखाद्या इंजिनीअर ला , एखाद्या वास्तुरचनाकाराला , एखाद्या मुरलेल्या राजकारणी माणसला , कुशल संघटकाला ह्याच पद्धतीच्या विचारप्रक्रियेतून जावे लागते. त्याचा अहंभाव  नीट वापरून नव्या कल्पनेची रचना आणि कामाची आखणी करावी लागते.आपण आपल्याला महत्वाचे मानले नाही तर आपल्या विचारांना व इतर कुणीही महत्वाचे मानणार नसते. नवा विचार सुचताना , नवे आडाखे मांडले जाताना , नवीन भूमिका लक्षात येताना आपण संपूर्ण एकटे असतो. आपल्याला काम करण्यासाठी स्वतःला फुलवून घ्यावे लागते. समोरच्या माणसाला आपल्याला सुचेलेले दिसत नसल्याने किंवा तसे दिसण्याची त्याची प्रज्ञा नसल्याने आपल्याला अहंभाव वापरून आपले नवे म्हणणे आत्मविश्वासाने साकारावे लागते. लोकांसमोर मांडावे लागते. त्यांना ते पचले नाही आणि जरी आपल्या कामाला जर अपयश आले तरी त्यावर मात करून पुन्हा नवीन कामाला सज्ज व्हावे लागते. त्यासाठी खूप मोठा इगो आपल्यात असावा लागतो. समानतेची भावना कोणत्याही निर्मितीच्या प्रक्रियेला पोषक नसते. समानता हा खूप मोठा रोमान्स आहे हे आता काळाने आपल्याला शिकवलेच आहे. ज्यांना अहंभाव फुलवून कष्टाने एकट्याने काम करता येत नाही ती अनेक माणसे समानतेचे भिरभिरे हातात घेऊन एकत्र येतात आणि सामूहिक वगैरे पद्धतीने नवनिर्मिती केल्यासारखी करून मग पुन्हा घरी परत जातात.

ज्या इगो मुळे घरातले जुने म्हातारे कालबाह्य परंपरा आणि रूढी पाळत घरातल्या सर्व माणसांची आयुष्ये नासवत बसतात , ज्या इगोमुळे दुय्यम दर्जाचे सेलिब्रिटी लोक बोलावलेल्या कार्यक्रमांना उशिरा जातात , घरी आपल्या बायकांना मारहाण करतात त्याच इगोमुळे कॅमेरासमोर उभा असलेला किंवा उघडणाऱ्या पडद्यासमोर रंगमंचावर उभा असलेला नट अप्रतिम अदाकारी दाखवून जातो. त्या इगो मध्ये फरक नसतो तर तो वापरायला शिकण्याचे ज्ञान सामान्य माणसला नसते . ते ज्ञान आणि ती ती जाणीव फक्त समाजातील काही ठराविक बुद्धिमान माणसांना आणि प्रज्ञावंत कलाकारांनाच असते. कारण अहंभाव हि दुधारी तलवार असल्याने सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोक काम झाले कि ती म्यान करून ठेवतात आणि असंस्कृत, अशिक्षित किंवा सामान्य बुद्धीचे लोक ती उघडी तलवार घेऊन बाजारात कोथिंबिरही आणायलासुद्धा जाऊ शकतात.

फेसबुकवर जाऊन अनेक माणसे काय बोलतात , समीक्षा किंवा मतप्रदर्शन करतात , तात्त्विक वादावादी करतात हे पहिले कि तलवारीचा आणि कोथिंबीरीचा मुद्द्दा आपल्याला लक्षात येऊ शकतो.

आपण सध्या आपला आब टिकवून ठेवणे विसरत चाललो आहोत. इंटरनेटवरील  सामाजमाध्यमांवर आपल्या सुरु असलेल्या अनिर्बंध आणि मोकाट शाब्दिक संचारामुळे आपल्या जगण्याचा आब हरवला आणि आपल्या मतांची किंमत रसातळाला गेली आहे. दूरदृष्टी असणारी चाणाक्ष माणसे ह्या समाजमाध्यमांवर फार विचारपूर्वक आखून मोजून मापून व्यक्त होतात. आणि उरलेले सर्व लोक सकाळी मोकाट कुत्र्यांसमोर ब्रेड टाकला कि ती कशी वसवस करतात तशी वागू लागतात. ह्याचे कारण आपल्याला समाजाने गांभीर्याने घेतले जावे ह्यासाठी आपल्यापैकी अनेकजण जीवाच्या आकांताने धडपड करत आहोत. समाजमाध्यमावरील आपला अनियंत्रित शाब्दिक संचार हा काही वेळाने व्यसनाचे स्वरूप घेतो आणि मग व्यसनी माणूस जसा व्यसनासाठी  इस्टेट  विकायला मागेपुढे पाहत नाही तसे आपण नकळत ह्या ठिकाणी स्वतःचा अहंभाव पणाला लावून खेळ खेळू लागतो.  सतत बदलत्या काळामुळे जुन्या  होत जाणाऱ्या अनेक जाणत्या व्यक्ती मला रोज सकाळी ह्या भिंतीवर आपली भरपूर धुलाई करून घेताना दिसतात. त्यांना काहीही करून आपला स्व ह्या क्रूर वेगाने बदलत्या काळात जपायचा असतो. पण त्यांना हे कळत नसते कि कुणीही अनिर्बंधपणे आणि काळवेळ न ओळखता आपले विचार रोजच मांडू लागले कि तुम्ही पुढील पिढीचे करमणुकीचे साधन बनता. अश्या अनेक म्हाताऱ्या विचारवंतांना , कालबाह्य समीक्षकांना , जुन्या कार्यकर्त्यांना , काळाचे भान सुटलेल्या नटांना , दमलेल्या लेखकांना , स्वप्निल कवींना  उसकवून , रोज सकाळी बोलायला भाग पाडून त्यांची करमणूक पाहत फिदीफिदी हसत बसणारी तरुण पिढी जन्माला आली आहे. ती पिढी तुमचा अहंभाव दुखावते. मग तुम्ही तुमचा उरलेला सगळा अहंभाव पणाला लावून आपले शहाणपण त्यांना शिकवत बसता. दुखावले जाता. आणि हाच खेळ खेळणे हे त्या बसमधून ऑफिसला निघालेल्या तरुण मुलांचे उद्दिष्ट असते.

शब्दाला महत्वाचे मानणाऱ्या , कामाची मूल्ये जपणाऱ्या पण कालबाह्य झालेल्या माणसाला स्वतःचा अहंभाव सांभाळणे सध्या ह्या काळात खूप अवघड होवून बसले आहे. तो अहंभाव जपण्याची तारेवरची कसरत करत , तरुण पिढीशी संवाद साधण्याचे प्रयत्न करत , आपण जुने झालेलो नाही आणि  आपण कधीही जुने होणार नाही हे नव्या पिढीला पटवत रोज जगणे सोपे नसते. कारण आपण जुने झालो आहोत हे आपल्याला माहिती असते. अश्या वेळी रंगीत टी शर्ट घालून लहान मुलांच्यात जाऊन नाचले तर आपण वेडेबिद्रे आणि भेसूर दिसतो हे सध्या अनेक लोकांना कळेनासे झाले आहे. घरात बसून एकटे वाटते आणि बाहेर गेले कि भांबावून जायला होते त्यामुळे समाजमाध्यमांवर नवेपपणाची लिपस्टिक लावून अनेक लोक ‘मला तुमच्यात सामील करून घ्या’ असे म्हणण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात त्या लोकांनी स्वताचा आब राखून आपल्या अहंभावाला नीट जपणे फार आवश्यक आहे.

 

करंट 7

 

दृश्यकलेचे साक्षात्कार . भाग १ .

भारतातील आणि जगातील समकालीन दृष्य्कलेचे खरे प्रदर्शन जर पहायचे असेल तर दृष्य्कलेवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने केरळमध्ये दर एका वर्षाआड होणाऱ्या ‘कोची मुझीरीस बिएनाले’ ह्या कोचीन  शहरभर पसरलेल्या आंतरराष्ट्रीय  प्रदर्शन सोहळ्याला आवर्जून जायला हवे.

दृश्यकलेचे भान, त्यात देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सद्यपरिस्थितीत चालू असणारे प्रयोग आणि उमटणारे आवाज समजून घेणे माझ्यासारख्या चित्रपट बनवणाऱ्या आणि मातृभाषेत लिहिणाऱ्या माणसाला फार आवश्यक ठरते. याचे कारण वृत्तपत्रे ,समाजमाध्यमे , संगीत, चित्रपट आणि पुस्तके ह्यांच्या पलीकडे जाऊन माहितीच्यापल्याडचे अनुभव घेण्याची सवय आणि क्षमता वाढवण्याचे काम ह्या प्रवासात बघायला मिळालेली अनेक प्रदर्शने करतात. मी ह्या अनुभवाचा फार लहानपणीपासून भुकेला आहे. माझे मन अश्या ठिकाणी आपोआप धाव घेते.

अश्या ठिकाणी जाऊन तिथे मांडलेले काम समजून घेण्यासाठी कपाळावर कमी आठ्या असायला हव्यात. किंबहुना जर इच्छा असेल तर त्या पुसण्याचे काम अशी प्रदर्शने करतात. मला हे समजत नाही म्हणजे हे टाकावू आहे हा बेगुमानपणा माझ्यातून घालवला तो मी अनेक जगातील शहरात प्रवास करून आवर्जून पाहिलेल्या अमूर्त दृष्य्कलेच्या प्रदर्शनांनी.

कोचीनला होणारे हे भारतातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन दर दोन वर्षातून एकदा होते. जगातील अनेक शहरांमध्ये अश्या प्रकारे दर दोन वर्षांनी दृष्य्कलेचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरावून जगभरातील उत्तम कलाकारांना तिथे काम दाखवण्यासाठी  आमंत्रित करायची परंपरा आहे. इटलीमधील वेनिस शहरात होणारे बिएनाले (दर दोन वर्षांनी होणारे) प्रदर्शन जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शांनापैकी एक असे आहे. बिएनाले प्रदर्शन हा शहरभर सुरु असलेला दृश्यकलेचा सुंदर सोहळा असतो.

कोचीन शहराची दोन रूपे आहेत. भारतातील महत्वाच्या बंदरांपैकी ते दक्षिणेतील एक प्रमुख बंदर आहे. तेल आणि वायू उत्पादन , मसाल्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार , केरळच्या उद्योगजगताची राजधानी आणि मल्याळी चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र असा ह्या शहराचा एक चेहरा आहे. स्थलांतरप्रिय आणि अतिशय कष्टाळू असणाऱ्या मल्याळी नागरिकांनी जगभरात कमावलेला पैसा घरी पाठवून ह्या शहराचे आधुनिक रूप साकारले आहे. ह्या नव्या गजबजलेल्या , ज्याला  आपण रेल्वेच्या मार्गावरील एर्नाकुलम म्हणून ओळखतो त्या शहरापासून बेटांना जोडणारा खाडीचा पूल ओलांडून पश्चिमेला गेले कि फोर्ट कोची हे सुंदर शांत बेट आपल्याला गवसते. हा जुना पोर्तुगीज भाग अजूनही युरोपातील एखाद्या सुंदर जुन्या गावासारखा होता तसा जपून ठेवलेला आहे. कोचीनचे बिएनाले ह्या भागात होते. ह्याचे कारण ह्या भागाला लाभलेला जुना शांत समुद्रकिनारा , हेरीटेज प्रभाग म्हणून इथे जपलेल्या शेकडो वर्षे जुन्या पोर्तुगीज वास्तू , त्या हजारो जुने वृक्ष आणि मुख्य म्हणजे सर्व बेटावर विखुरलेली पोर्तुगीजांनी मसाल्याच्या व्यापारासाठी बांधलेली अतिप्रचंड जुनी लाकडी गोदामे. ह्या गोदामांची लांबी रुंदी त्यांच्या इतिहासाइतकीच मोठी आहे. ह्या अनेक महाप्रचंड गोदामांचा कल्पक वापर ह्या शहरातील प्रशासनाने बिएनाले ह्या द्वैवार्षिक  प्रदर्शनासाठी करून घेतला आहे. ह्या सर्व प्रदर्शनावर जायफळ , दालचिनी तसेच मिरीचा जुना गंध पसरला आहे.

फोर्ट कोची ला गेले कि नेहमी मला माझ्यातून आपोआप गायब झालेला जुना निष्पापपणाचा परफ्युम आठवतो. काळाने तो ओढून नेला. उत्सुकता नेली , ओढ नेली , एखाद्या व्यक्तीसाठी , अनुभवासाठी झुरण्याची शक्यता नेली , निवांतपणा गेला . काही गोष्टी हव्या असतील तर काही सोडाव्या लागतील हे लहानपणी असणारे धाक गेले. आपल्यापाशी कमी गोष्टी असल्याने निवड करायची श्रीमंती आपल्याला नाही हि पूर्वीची जाणीव गेली. फोर्ट कोची ह्या बेटावर संध्याकाळी सात वाजता सामसूम झाली कि शांतपणे पायी फिरताना मला निघून गेलेले सोपेपण आठवते. जुना काळ परत आणण्याची मला कधीच इच्छा नसते पण हरवून गेलेले सोपेपण परत यावे असे मनाला वाटत राहते. इथली मैदाने , जुने वृक्ष , जुनी वास्तुरचना , इथल्या स्थानिक बेकरीमध्ये म्हाताऱ्या बायकांनी भाजेलेले पाव आणि रंगीत मायाळू केक खाताना , जेवणाच्या टेबलावर केळीच्या पानावर हलकी मिठ्मिरी लावून पहुडलेले मासे पाहताना मला आपले काहीतरी चुकून निसटून गेले आहे हि भावना दर वेळी येते. मी फोर्ट कोचीला ह्या अनुभवासाठी जातो. सूर्य मावळताना येणारा तो खाजगी अनुभव मी वर्षानुवर्षे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो पण मला तो मांडता येत नाही. नेमका ह्या वेळी बिएनाले बघताना एव्हा माग्यारोजी ह्या अतिशय तरुण हंगेरियन कावयीत्रीच्या कविता माझ्यासमोर आल्या आणि मला जे अस्वस्थ वाटते ते नक्की काय वाटते आहे ह्याची पुसटशी जाणीव मला होवू शकली. अश्या काही क्षणी आपण रोजची कामेधामे टाकून लांबवर प्रवास करून काहीतरी पाहायला आलो ह्याने फार बरे वाटत राहते.

२०१२ आणि २०१४ साली ह्या प्रदर्शनाच्या दोन आवृत्त्या होवून गेल्या आणि ह्या काळात कोचीनमधील ह्या प्रदर्शनाने मोठे आणि महत्वाचे स्वरूप धारण केले . शिवाय त्याला आंतरराष्ट्रीय स्वरुपासोबत एक राष्ट्रीय स्वरूप आले. भारतात अनेक आंतरराष्ट्रीय गोष्टी आहेत पण दुर्दैवाने त्या देशातील लोकांना आवडतील अश्या स्वरूपाच्या नसतात. किंवा कुणाला त्याची माहितीच नसते. तसे ह्या प्रदर्शनाचे झालेले नाही. भारतातील दृष्यकलेचे ते निर्विवादपणे महत्वाचे प्रदर्शन केंद्र बनले. गेले तीन दिवस मी ह्या शहरात अनेक उत्तम कामे पाहत पायी फिरताना मला देशभरातले अनेक विद्यार्थी, प्रवासी , मित्र रस्त्यात अचानक भेटले . आम्ही गप्पा मारल्या , एकत्र फिरून प्रदर्शने पहिली . त्यात दृष्य्कलेच्या क्षेत्रात काम करणारी माणसे होतीच पण त्यासोबत अनेक वास्तुरचनाकार होते , चित्रपट दिग्दर्शक होते , कवी होते , केरळ मध्ये फिरत फिरत असताना ‘’हे बिएनाले म्हणजे काय रे भाऊ? जरा बघून येऊ’’ असे म्हणून आलेले तरुण प्रवासी होते  ह्यावरून हे लक्षात येते कि ह्या प्रदर्शनाची व्याप्ती आणि महती आता मोठी होत जाते आहे. सर्वात आश्वासक गोष्ट जर कोणती असेल तर कोचीनमधील अनेक शाळांनी आपल्या विद्यार्थांसाठी ह्या प्रदर्शनाच्या सहली आखल्या आहेत.

२०१२ साली बोस कृष्णम्माचारी आणि रियाज कोमू हे ह्या प्रदर्शनाचे निवडप्रमुख ( curator ) होते. २०१४ साली जितिश काल्लात ह्यांनी निवडप्रमुख म्हणून काम पाहिले. २०१६ सालच्या डिसेंबर पासून २०१७ सालच्या मार्चच्या शेवटापर्यंत चालणाऱ्या ह्या तिसऱ्या आवृत्तीचे निवडप्रमुख सुदर्शन शेट्टी हे आहेत. अतिशय बारकाईने आणि सजगतेने वर्तमानाचा नेमका आढावा घेणे ह्या सर्व व्यक्तींना फार चांगले जमले आहे कारण हे चारहीजण आज भारतातील प्रमुख दृश्यकलाकार आहेत.

दृश्यकला हि संज्ञा चित्रकलेपेक्षा विस्तृत आहे. फोटोग्राफी , शिल्पकला , चित्रकला , व्हिडीओ कला , हस्तकला , लाकूडकाम , भौतिक शास्त्राशी जवळचे नाते सांगणारी कायनेटिक आर्ट , भित्तीचित्रे , आणि एकल कलाकाराने केलेलं साभिनय सादरीकरण ह्या सगळ्या माध्यमांचा अंतर्भाव दृश्यकला ह्या संज्ञेत होतो. इजलवर कागद लावून त्यावर रंगाने काम करणे ह्या आपल्याला ज्ञात असलेलेया कलासादरीकरणाच्या पारंपारिक स्वरूपाच्या लाखो मैल पुढे जाऊन आज कलेचा साक्षात्कार जगातले अनेक लोक वेगवेगळी माध्यमे वापरून करतात . त्या सर्व कलांचा अंतर्भाव ह्या दृष्य्कालेच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात केला जातो.

उमेश कुलकर्णी हा माझा मित्र ह्या प्रदर्शनात असलेल्या लघुपटांच्या विभागाचा निवडप्रमुख आहे. भारतातील अनेक महत्वाच्या फिल्म स्कूल मधील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांत बनवलेल्या short फिल्म्स पाहून , उत्तम फिल्म्स निवडून उमेशने इथे एक तीन दिवसांचा कार्यक्रम आखून दिला आहे. तो इथे असणार होता आणि आम्हा दोघांची दर वर्षी घडणारी केरळवारी ह्या वर्षी राहिली होती म्हणून मी अचानक उठून इथे निघून यायचा बेत ठरवला. प्रिया बापट हि माझी मैत्रीण ह्या हिवाळ्यात कोणताही नवीन सिनेमा साईन न करता एकटी भारतभर प्रवासाला निघाली होती. तामिळनाडू, मेघालय असे वेडेवाकडे प्रवास ती एकट्याने करत होती. तिने माज्यासोबत अचानक केरळला यायचे ठरवले. मेघालयहून ती परत येताच आम्ही केरळला निघालो .

क्रमश :

 

करंट ८

दृश्यकलेचे साक्षात्कार : भाग दुसरा.

अमूर्त कलेला घाबरून त्याची चेष्टा आणि थट्टा करण्याचे वातावरण लहानपणी माझ्या आजूबाजूला पुष्कळ होते. हे मी सांगतो आहे ते नौव्वदच्या दशकात स्वतःला महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र म्हणवून घेणाऱ्या पुण्यामध्ये. मग इतर ठिकाणच्या परिस्थितीचा विचारच न केलेला बरा. त्याच त्याच जुन्या नाटककारांच्या प्रसिद्ध संहिता उगाळून त्या झिजवत त्यांच्या उष्णतेवर आपल्या जुन्या आठवणी कुरवाळत रंगभूमीवर फार मोठे काहीतरी केल्याचा आव आणत महाराष्ट्र जगत असला तरी आधुनिक दृश्यकला , चित्रपट आणि आधुनिक संगीतातील जिवंत प्रयोग ह्या बाबतीत महाराष्ट्र भारतातील अनेक राज्यांपेक्षा ऐंशीच्या दशकातच खूप मागे पडलेला होता. M F हुसेनच्या चित्रांची चेष्टा करत बसणे , सध्याच्या काळात काम करणाऱ्या नव्या चित्रकारांची नावेही कुणाला माहिती नसणे , अमूर्त कलाप्रयोगांना फिदीफिदी हसणे हे मी दहा वर्षाचा मुलगा असताना माझ्या आजूबाजूला घरात आणि शाळेत वातावरण होते.

मुंबईत चालू असलेल्या दृष्य्कलेतील मोठ्या आणि महत्वाच्या उलाढाली आपल्या गावीही नव्हत्या. आमच्या शहरातील उद्दाम, उद्धट आणि परंपराप्रिय कलात्मक वातावरणाने उर्वरित जगाचे कोणतेही नुकसान झाले नाही. जगात होणाऱ्या उलाढालींचा परिणाम आधुनिक भारतीय दृष्य्कलेवर ठाशीवपणे होत होता. भारतात इतर प्रांतामधील कलाकार दृश्यकला , चित्रपट तंत्र आणि संगीत ह्या क्षेत्रात खूप पुढचे काम करीत होते.

‘रोजा’ हा मणीरत्नम ह्यांचा चित्रपट जेव्हा पाहिला तेव्हा आमच्या पिढीला आपली महाराष्ट्रातील सांगीतिक आणि दृश्यात्मक तांत्रिक जाणिव किती जुनाट होवून राहिली आहे हे उमजले. मुंबईत झालेल्या दंगली , बॉम्बस्फोटांची मालिका आणि त्यानंतर बदलेलेले सामाजिक जीवन ह्याचा मोठा परिणाम महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत राहून काम करणाऱ्या अनेक भाषिक आणि अनेक प्रांतीय कलाकारांच्या कामावर झाला. माझ्या पिढीच्या कामाला आणि शहरात जगण्याच्या अनुभवाला मुंबईच्या दंगली आणि स्फोटांनी महत्वाचा आकार दिला. आमच्या पिढीच्या मनातील भीती अंधाराची नाही. बॉम्बची आहे. मी दंगलीनंतर कायमच्या अस्थिर आणि अविश्वासू झालेल्या मुंबईतला स्थलांतरित आहे.

माझ्या शालेय काळात माधुरी पुरंदरे ह्यांनी पिकासोचे चरित्र मराठीत आणले नसते ,श्री पु भागवतांनी ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक प्रभाकर बरवे ह्यांच्याकडून लिहून घेतले नसते , सुधीर पटवर्धन ह्या प्रयोगशील आणि आधुनिक चित्रकाराने भारतीय चित्रकलेविषयी व्याख्यानाची मालिका गुंफली नसती तर आमच्या पिढीचे फार मोठे नुकसान झाले असते असे आज मला वाटते. माधुरी पुरंदरे , अरुण खोपकर , सुधीर पटवर्धन , शांता गोखले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आजच्या काळात अभिजित ताम्हाणे ह्यांनी आधुनिक भारतीय चित्रकलेविषयी , दृश्यकलेविषयी सतत लिखाण करून , व्याख्याने देऊन , लेख लिहून आमच्यासारख्या अनेक मराठी वाचकांना आणि वर्तमान समजून घेण्याची आसक्ती असणाऱ्या विद्यार्थाना त्याविषयी जागरूक ठेवले. शांता गोखले आणि अभिजित ताम्हाणे ह्यांचे विशेष आभार मानायला हवेत ह्याचे कारण कलेच्या वर्तमानाचे  नेमके टिपण आपल्या सकस वृत्तपत्रीय लिखाणातून ते दोघे सातत्याने करीत राहिले. अरुण कोलटकर , दिलीप चित्रे आणि प्रामुख्याने विलास सारंग ह्या त्रयीच्या साहित्यातून आधुनिक दृश्यात्मकता आणि विस्तृत जगाचे पडसाद आमच्यापर्यंत पोचत राहिले. साहित्य , चित्रपट आणि दृश्यकला ह्यातील अमूर्ततेला घाबरायचे नाही. समजून घ्यायचा प्रयत्न करायचा ह्याची जाणीव ह्या माणसांच्या कामाने आम्हाला करून दिली. ह्याच काळात चंद्रकात काळे आणि आनंद मोडक ह्या दोघांनी मराठी कविता आणि  लोकसंगीतामधील गोडी वाढावी आणि त्यातील अंतर्गत दृश्यात्मकता समोर साकारली जावी ह्यासाठी एकामागून एक अप्रतिम सांगीतिक कार्यक्रम सादर केले. अमूर्ततेचे चांगले भान ह्या अनेक लोकांच्या प्रयत्नामुळे आम्हाला येत गेले.

ह्या सर्व उर्जेला आणि उपक्रमांना  समजून घ्यायला लहान वयात आम्हाला प्रयत्न करावे लागले. अनेक वेळा पुस्तके आणि चित्रे लोकांकडून मागून वाचावी पहावी लागली. आमच्या घरी , शाळेत अशी  पुस्तके , चित्रांचे संग्रह नव्हते. मी गेल्या आठवड्यात केरळमधील शाळांच्या सहली कोचीनमध्ये बिएनाले पाहायला आल्या होत्या तेव्हा मला बरे वाटले ते ह्या एका कारणाने . लहान वयात त्या मुलांची वर्तमानाशी ओळख होते आहे म्हणून.

मी प्रभाकर बरवे ह्यांची चित्रे मुंबईच्या आधुनिक राष्ट्रीय चित्र संग्रहालयात भारावल्यासारखी पहिली आणि ‘कोरा कॅनव्हास’ हे त्यांचे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून काढले होते. अंजली एला मेनन ह्या भारतीय कलाकाराचे काम मी त्यांचे एक छोटे चित्र एका पुस्तकात सापडले म्हणून उठून मुंबईला जाऊन पाहून आलो. घरबसल्या दारापाशी कुणीही काही आणून देत नाही, आपली भूक असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतात. वासुदेव गायतोंडे ह्यांच्या चित्राकडे कसे पहावे ह्याची जाणीव देणारे तेव्हा माझ्या आयुष्यात कुणीही नव्हते.

माझ्या आजूबाजूचे असलेले साचेलेले निवांत सांस्कृतिक वातावरण माझ्यासाठी घातक आहे हि जाणीव माधुरी पुरंदरे ह्यांच्या पिकासोच्या मराठीतील चरित्राने पहिल्यांदा मला झाली. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत हे पुस्तक मी बसून सलग वाचून काढले आणि मला लक्षात आले कि आपण फार साचेबद्ध डबक्याच्या वातावरणात जगत आहोत. आपल्याला त्वेषाने इथून बाहेर पडायला हवे. इंग्रजी भाषा शिकून, बोलायचा आणि लिहायचा सराव करुन जगात घडणाऱ्या अनेक नव्या गोष्टींशी संपर्क वाढवायला हवा. नाहीतर आपले काही खरे नाही. नौवद सालातील हे सगळे  मला ह्या महिन्यातील कोचीनच्या प्रवासात बिएनाले प्रदर्शन बघताना पुन्हा पुन्हा आठवत राहिले .

कोचीनच्या कलाप्रदर्शनात एका मोकळ्या जागी भलामोठा पिरॅमिड उभारला आहे. माती आणि शेणाने सारवलेला . आत जायला एक छोटे दार . आपण आत शिरलो कि संपूर्ण अंधार. काळामिट्ट. आपोआप आजूबाजूच्या मातीच्या भिंतीचा आधार आपले हात घेतात. आणि आपण वळणे घेत जाणाऱ्या अंधाऱ्या वाटेवरून पुढे पुढे चालत राहतो. आणि सावकाश कानावर अनेक आवाज यायला लागतात. कविता वाचल्या जात आहेत. अनेक भाषांमध्ये. मातीच्या भिंतीमागे स्पीकर दडवले आहेत. त्यातून अनेक कविता वाचले जाण्याचे आवाज येत आहेत. ज्या कवींना त्यांच्या देशामधून हद्दपार केले गेले त्या जगभरतील अनेक हद्दपार कवींच्या त्या कविता आहेत. संपूर्ण अंधारात अनेक कविता ऐकत ऐकत अरुंद वाटेने आपण पुढे पुढे सरकत राहतो आणि अचानक बाहेर पडतो. युगोस्लावियामधील अलेश ष्टेजेर ह्या कलाकाराने बनवलेले हे इंस्टॊलेशन. माझ्यासाठी ह्या प्रवासातील एक महत्वाची आठवण.

सुनील पडवळ ह्या मुंबईतील कलाकाराने अनेक जुन्या वस्तू , फोटो आणि यंत्रे ह्यांच्या मांडणीतून गतकाळातील मुंबई शहराचे सत्व दोन दालनामध्ये मांडले आहे. तिथे भिंतीवर टांगलेले जुने दोन टाईपरायटर बघताच माझी बोटे शिवशिवतात. चोरी करावीशी वाटते. ते घेऊन धावत सुटावे वाटते. आणि वातावरण असे आहे कि चोरीला मी माझी सादरीकरण कला असे म्हणून न्याय मिळवू शकतो.

राउल झुरिता ह्या चिले देशातील कलाकाराने एका महाप्रचंड गोदामात जमिनीवर समुद्राचे पाणी भरले आहे. त्या पाण्यातून चालत चालत आपण  खूप लांबवर समोरच्या भिंतीवर लिहिलेली एक कविता वाचायला जायचे आहे . Sea Of Pain हे त्याचे २०१६ साली बनवलेले installation. सिरीयन निर्वासितांना युरोपमध्ये शिरताना सोसायला लागलेल्या यातना त्या कवितेत उमटल्या आहेत. ती कविता वाचायला आपण तो समुद्र चालत ओलांडायला हवा. मग ती आपल्याला सापडेल.

भरत सिक्का हे आपल्या देशातील एक महत्वाचे फोटोग्राफर . त्यांचे काश्मीरमधील दाहक फोटोची मालिका ह्या प्रदर्शांचा भाग आहे . ते फोटो एका जुन्या मोडकळीला आलेल्या वाड्यात जीर्ण भिंतीवर लावले आहेत. बिएनालेच्या संचालकांचे हे वैशिष्ठ्य आहे  कि त्यांनी जुन्या कोचीनमधील वास्तूंचा कलाप्रदर्शनासाठी फार कल्पकतेने वापर करून घेतला आहे.

ह्या बिएनलेच्या आवृत्तीत चीनी कलाकारांनी भव्य आकारात सादर केलेली video आर्ट्स कलेविषयी असलेल्या  आपल्या प्रस्थापित दृष्टीला मोडून फेकून देतील अशी आहेत. त्या video मधील राक्षसी आकारमानाची दृश्ये आणि भयावह रंगसंगती आपल्याला मोबाईल फोन वर खेळल्या जाणाऱ्या गेम्सच्या जगात घेऊन जाते. पण फार मोठ्या आकारात , शेकडो फुट लांब अश्या पडद्यावर . त्या दृश्यमालिकांना कोणतीही कथा पटकथा नाही . तंद्रज्ञान आणि सतत येणाऱ्या नवीन उपकरणांच्या काळात उमललेली ती एक न संपणारी अस्वस्थ आणि अथकपणे काही न उलगडता पुढे जात जाणारी चित्रमालिका आहे. कंटाळा आल्यावर हल्ली माणसे वाकडा चेहरा करून मोबाईल बाहेर काढून त्याची रागाने बटने दाबत बसतात तश्या भावनेची.

अमूर्ततेच्या सवयीने तुमच्या मनातील परक्या अनुभवाविषयीचा राग कमी होतो . मिसळण आणि भेसळ ह्याविषयी तुम्ही सजग होता. शुद्धतेच्या फंदात पडणे हे वेळ वाया घालवणे आहे हे आपल्याला लक्षात येऊन फार महत्वाचे असे राजकीय आणि सामाजिक भान आपल्या मनात सावकाश उमलत जाते. त्यामुळे शांत अमूर्त अनुभवाची आपल्या समाजाला आणि जगण्याला पूर्वी नको होती तितकी आज गरज आहे ह्याची जाणीव कोचीनमध्ये होणाऱ्या बिएनालसारख्या प्रकल्पामुळे मनात तयार होते.

भारतातील हिवाळ्यात घरात बसून राहू नाही. उठावे आणि चालू लागावे. मार्च महिना संपेस्तोवर कोचीनला बिएनाले चालू राहणार आहे.

 

करंट ९

जुने होणे    

माणसाचे नैसर्गिक आयुर्मान वाढले असल्याने, ज्यांना आयुष्यभराच्या कष्टानंतर एक साधारण सांपत्तिक स्थैर्य लाभले आहे अशी आजूबाजूची वयाने ज्येष्ठ माणसे सध्याच्या काळात वृद्धत्वाला घाबरत नाहीत असे दिसून येते. वयाच्या साठीनंतरही अनेक क्षेत्रात तुम्ही चांगले काम करीत पुढची दहा पंधरा वर्षे सहजपणे कार्यरत राहू शकता. त्यासाठी इच्छा लागते आणि अंगात बौद्धिक मांद्य आणि आळस नसेल तर फार बरे आयुष्य जाऊ शकते.

प्रश्न उरतो तो जुने होण्याचा. म्हातारे नाही तर जुने. ज्याला इंग्रजीमध्ये OUTDATED म्हणतात ते. सध्या सर्व माणसे जर कोणत्या एका गोष्टीला घाबरत असतील तर ती जुने होण्याला घाबरतात. म्हातारे नाही. कारण सध्या काळ असा आहे कि कोणत्याही कार्यक्षेत्रात चाळीशीच्या वरची माणसे हि अडगळ ठरू लागलेली असते. त्यामुळे म्हातारपण वगरे शब्द आपल्याला घाबरवत नाहीत. चाळीस वर्षांच्या वरील माणसांना सतत वेगाने बदलणाऱ्या काळातील गणिते समजून नवे गीयर सतत टाकावे लागतात नाहीतर आपण फार नकळतपणे कोपऱ्यात सरकवले जातो. वार्धक्य , कुणी घर देता का घर?  मुले घरी विचारत नाहीत असले बावळट प्रश्न आमच्या पिढीला कधीही पडणार नाहीत. सर्वात मोठा प्रश्न उरेल तो म्हणजे आपल्याला काम करायची उर्जा असूनही , आपण सजगपणे स्वतःला नव्या जगाशी जुळवून घेत बसण्यात जर कमी पडलो तर कुणीहि आपला अपमान करीत नाही किंवा आपल्याला वाईट वागवत नाही पण फार चलाखीने पन्नाशीला आलेल्या माणसांना जग नकळत हळुवारपणे बाजूला सारून टाकते. त्यासाठी साठी वगरे येण्याची वाट पहावी लागत नाही. तुम्ही कार्यरत असता पण  तुम्ही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत नसता. तुमची सही लागते पण तुमचे मत नको असते. त्या वयाच्या माणसांना आदर सन्मान वगरे दिला , त्यांची जुनी तीच ती मते ऐकून घेतली , त्यांच्या लिखाणाची दोन पुस्तके प्रकाशित केली, त्यांच्या फेसबुक वरील post लायिक केल्या कि त्या माणसांना बरे वाटते. पण नवीन उर्जा आणि भूमिका तसेच कामाच्या धोरणाची आखणी ह्या बाबतीत आजची पन्नाशीला आलेली पिढी एकारलेली , तर्कट आणि हास्यास्पदरित्या जुनी होत चालली आहे. ह्याचे कारण त्या पिढीची analog विचारसरणी आणि अतीव जुना आदर्शवाद . जुनी पारंपारिक मूल्यांची चौकट न सोडण्याची इच्छा . ह्या माणसांचा चांगुलपणासुद्धा कंटाळवाणा असतो कारण त्यावर जुन्या आदर्शवादाची पिवळट साय जमून राहिलेली असते. त्यांचे  शरीर तंदुरुस्त असले तरी मन वाळू लागलेले असल्याची सोपी नैसर्गिक अवस्था आलेली असते . भारतात हे घडताना जास्त दिसते कारण भारतात वय ह्या गोष्टीला फार पूर्वीपासून गरजेपेक्षा जास्त महत्व दिले गेले आहे. जो वयाने ज्येष्ठ तो जाणता असतो , हि जुनी समजूत बाळगून , वयाचा लॉलीपॉप चघळत अनेक माणसे सध्या जीन्स  आणि T shirt घालून पन्नाशीला पोचतात. हि माणसे साधारपणे भारतीय स्वातंत्र्याच्या आसपास दहा पंधरा वर्षांत जन्मून वाढेलली पिढी आहे. अशी माणसे सध्या भारतात प्रमुख पाहुणे म्हणून जिथे तिथे बोलावली जातात. त्यांना कामात सहभागी करून घेण्यापेक्षा त्यांचा मुलाखती घेणे , त्यांचा सत्कार करणे , त्यांचे सामाजिक मुद्द्यांवर मत विचारणे , असे सगळे करून त्यांना गुंतवून ठेवता येते आणि नव्या पिढीला काम करायची मोकळीक मिळते हे त्यामागचे सोपे कारण आहे. वय आणि अनुभव. वय आणि शहाणपण ह्याचा संबंध गेल्या पंधरा वीस वर्षात मोडीत निघाला आहे.

हि पिढी हल्ली शरीराने अतिशय फीट असते. कुठूनही कुठेही फिरू शकते. भरपूर वेळ बोलू शकते. लोकांचे तासनतास ऐकू शकते आणि ह्या अनुभवातून त्यांना आपण व्यग्र आहोत असा भास निर्माण होतो. तेव्हढे त्या पिढीला पुरते. त्यांचा आदर केला कि ते आपल्याला फार त्रास देत नाहीत.आजच्या काळात जर सगळ्यात पाप कोणते असेल तर रिकामे असणे. माणसाला रिकामे असण्याची भीती वाटते कारण रिकाम्या वेळेत करायच्या काही पोषक आणि आवश्यक गोष्टी आपल्याला शिकवलेल्या नसतात. माणसांना छंद नसतात. नवीन गोष्टी शिकण्याची आस नसते. प्रवास करायची सवय नसते. नव्या माणसांशी जुळवून घेण्याची जाण नसते. अनेक माणसे मला माहिती आहेत ज्यांना आकर्षक लोकसंग्रह करण्याची कलाच माहित नसते. कारण पैसे कमावणे आणि व्यवहार  ह्यापलीकडे अनेक माणसांनी  आयुष्यभर काहि केलेले नसते. आठवडाभर पैसा कमवायचा आणि शनिवार रविवारी झोपायचे किंवा प्यायचे , किंवा वृत्तपत्रीय पुरवण्या वाचत चर्चा करायच्या असे आयुष्य अनेक माणसे सहजपणे जगत आलेली असतात. आदर्शवादाचा भास हा व्हिस्कीच्या ग्लासइतकाच मस्त असतो.  अशी माणसे भारतात प्रमुख पाहुणे किंवा सभेचे अध्यक्ष म्हणून बसवण्यास अतिशय मुबलक उपलब्ध असतात असे आपल्याला सध्या दिसते.

जुने होणे हि गोष्ट घडते त्या लोकांच्या बाबतीत ज्यांना आयुष्यभर इतर कुणाच्यातरी संदर्भाने जगण्याची सवय असते. कुटुंब, स्वतः उभारलेले आणि वेळच्यावेळी बंद न केलेले व्यवसाय , सामाजिक काम करणाऱ्या संस्था , मित्रमंडळ आणि त्याचे जुने अड्डे. हजारो माणसे हि अश्या सामूहिक संदर्भात जगत आलेली असतात. व्यक्ती म्हणून त्यांना सोलून बाजूला ठेवले तर ती वाऱ्यावर उडून जातील अशी त्यांची आयुष्य असतात. आपण ताजे , नवे किंवा जुने हे लोकांच्या संदर्भाने जगल्यावर होतो. जी माणसे एकल वृत्तीची व शांतपणे स्वतःचे मार्ग आणि काम शोधणारी असतात त्यांना ह्या बदलत्या काळात outdated होण्याची कोणतीही शंकासुद्धा येत नाही.

माझ्यासाठी माझ्या माहितीतील अशी दोन हुशार माणसे आहेत. दोन वेगळ्या पिढीतील आणि संपूर्ण वेगळ्या वातावरणात जगणारी. एक आहेत कवी लेखक आणि दिग्दर्शक  गुलजारसाहेब. आणि दुसरे आहेत परममित्र मिलिंद सोमण . हो दोन्ही माणसे त्यांचा अभ्यास करावा इतकी वेगळी आणि हुशार आहेत. बुद्धिमान आहेत , कार्यरत आहेत , शारीरिक पातळीवर अतिशय तंदुरुस्त आहेत . सतत नवीन गोष्टी शोधून एकट्याने त्या पार पाडणारी आहेत आणि मुख्य म्हणजे शांत शहाणी आहेत. कमी बडबड करतात. सल्ले आणि सामाजिक शिकवण्या घेत नाहीत. कुणाला काहीही शिकवत नाहीत. कारण त्यांनाच त्यांचा वेळ थोडा आणि स्वप्ने खूप असे झाले आहे. आणि मुख्य म्हणजे रिटायर होण्याचे नाव नाही. ह्याचे कारण स्वतःची व्यग्रता आणि काम स्वतः निर्माण केले आहे . इतर कुणावरही ते कामासाठी अवलंबून नाहीत. ह्या दोन्ही माणसांचा वर्तमानकाळ हा त्यांच्या भूतकाळाइतकाच आकर्षक आहे. ह्या दोन्ही माणसांना आपण गप्पांचे फड रंगवताना , मुलाखती देताना , TV वर बरळताना , फेसबुकवर तरुण पोरांशी वाह्यात गप्पा मारताना कधीही पाहणार नाही. अशी माणसे फार पटकन कुणाला आपल्या खांद्यावर हात ठेवू देत नाहीत. आणि आपले बूट उगाच कुठल्याही नव्या पिढीच्या माणसाला घालूच देत नाहीत. ताजी माणसे आहेत ती. (तो मिलिंद सोमण कोण ? तो मॉडेल ? त्याने ते कपडे काढून फोटो काढले होते तो ? असले सिनिकल प्रश्न मनात असणाऱ्या गोडगोजिऱ्या माणसांना तो सध्या काय काम करतो आहे ह्याची माहिती इंटरनेटवर सहजपणे घेता येयील. गुलजार काय करतात हे सांगण्याची गरज पडू नये. पण सर्वात आकर्षक असे काय असेल तर आजही ऐंशीच्या टप्पा ओलांडलेले गुलजारसाहेब रोज पहाटे उठून त्वेषाने टेनिस खेळतात आणि घरी येऊन मस्त लिखाण करतात)

हल्लीच्या काळात कुणी आपला आदर करू लागले कि ती सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे हे समजावे. म्हणजे आपण प्रमुख पाहुणे व्हायला महाराष्ट्रात लायक झालो आहोत. वर्तमानपत्रातील वेंधळ्या गोड पोरी दुपारच्या वेळी फोन करून “ सर काल अमुकराव असे असे म्हणाले तर त्यावर तुम्हाला काय वाटते ?”  अशी मते विचारू लागल्या कि काळाची घंटा वाजते आहे असे समजावे. तुमच्या हस्ते कुणाला पारितोषिक द्यायला बोलावले तर जवळजवळ अपमान करून फोन बंद करावा. मॅजेस्टिक गप्पा मारायला कोठावळे आपल्याला बोलावतात तेव्हा त्यांनाच आपण चहा फराळाला ला घरी बोलवावे व त्यांच्याशी मस्त गप्पा माराव्यात. तिथे विलेपार्ल्यात किंवा पुण्याच्या S M जोशी सभागृहात जाऊन दिग्गज होवू नये. कौतुक करून मारून टाकणे हि महाराष्ट्राची फार जुनी परंपरा आहे. त्यामुळे आदर सत्कार आणि नव्या पिढीकडून स्तुती ऐकू येऊ लागली कि पटकन पायात पळण्याचे बूट चढवावे आणि दहा किलोमीटर पळून यावे.

 

 

करंट १०

 

नाटक लिहिणे

महाराष्ट्रात नाटक लिहिणाऱ्या व्यक्तीला ‘नाटककार’ असे संबोधले जाते. ज्याला डोळ्यासमोर दिसलेले नाटक कागदावर मांडता येते. ज्या लिखाणाला अतिशय आकर्षक दृश्यात्मकता असल्याने त्या लिहित संहितेभोवती जाणत्या, अजाणत्या पण उत्सुक कलाकारांचा वेढा पडतो आणि त्या संहितेला आपल्या भावनेचे , पोताचे आणि रंगाचे स्वरूप बहाल करून त्या संहितेचा प्रयोग सादर होतो . तिथे नाटक जन्म घेते. नाटक हि संहिता नसते . चांगल्या दिग्दर्शकाच्या जाणीवेने संहितेला दिलेले ते गोळाबंद जिवंत स्वरूप असते.

मला लिखाणाची उपजत आवड असल्याने मी पूर्वी काही नाटके लिहिली. ती नाटके मी स्वयंप्रेरणेने लिहिली नाहीत. महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये परंपरेने चालत आलेली आणि जोपासलेली प्रायोगिक नाटकांची अतिशय जिवंत प्रणाली आहे. अनेक उत्साही संवेदनशील तरुण मुले मुली आपल्या उमेदवारीच्या काळात ह्या प्रायोगिक नाटकांच्या रंगीत गर्दीत सामील होतात. कोणत्याही हिशोबापलीकडे जगण्याचे आयुष्यातले काही बेभान दिवस असतात , त्यात तुम्हाला सोबत देऊन तुमच्या अंगातल्या कलागुणांचा वापर करून काही चांगले साकारणारे कुणी भेटले कि तुम्ही अश्या नाटकांच्या कामात सहभागी होता. महाराष्ट्रात हे फारच आपसूकपणे आणि नकळत घडते कारण नाटक आपल्या आजूबाजूला खेळते असते आणि वाहत असते.

माझे तसेच झाले. पुण्यात राहत असताना मोहित टाकळकर ह्या अतिशय हुशार आणि प्रगल्भ दृश्यात्मकतेची जाण असलेल्या उत्साही मुलाने Progressive Dramatic Association  ह्या पुण्यातील प्रख्यात नाट्यसंस्थेत उमेदवारी करून स्वतःचे  कालसुस्वरूप प्रयोग करायला अनेक तरुण मित्रांना हाताशी घेऊन नवी मांडणी करायला घेतली. नाटकाबाहेरच्या माणसांना नाटकाकडे आकर्षित होण्यासाठी एक नवीन ताजी उर्जा देणारी ,कालसुसंगत ,ताजी , बुद्धिमान माणसे कारणीभूत ठरतात. अशी अनेक माणसे बहुदा दिग्दर्शकीय भूमिकेत असतात . ते आपापल्या नाट्यसंस्थेचे प्रवर्तक  असतात. महाराष्ट्रात अश्या हुशार आणि इतरांना प्रेरणा देत आपल्याभोवती जमवून त्यांच्यातले उत्तम गुण हेरून नाटक बांधणाऱ्या दिग्दर्शकांच्या अनेक पिढ्या आहेत. जब्बार पटेल ह्यांच्यापासून म्हणजे अगदी कालपरवापासून सुरुवात केली तरी आजच्या काळात कितीतरी चांगल्या माणसांनी उत्तम नव्या  संस्था उभारून , सतत चांगली प्रयोगशील नाटके उभी केली आहेत. चंद्रकांत कुलकर्णी , अतुल पेठे , चेतन दातार , संदेश कुलकर्णी हि ह्यातल्या काही माणसांची महत्वाची उदाहरणे. ह्यातल्या प्रत्येक माणसाने नाटक बसवताना नुसते काम केलेलं नाही तर आपापल्या पिढीमध्ये महाराष्ट्रात चांगले नट , संगीतकार , लेखक तयार केले आहेत. मोहित टाकळकर आणि त्यापुढे अगदी आत्ताचा अलोक राजवाडे हि ह्या व्यवस्थेतील पुढील पिढीची क्रमानुसार महत्वाची नावे आहेत.

मी पुण्यात असताना बारा चौदा वर्षांपूर्वी मोहित टाकळकरच्या उर्जेने आणि त्याच्या बुद्धिमान प्रयोगशील विचारांनी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला लाभलेल्या वेगळ्या दृश्यात्मक जाणीवेने अतिशय भारावून गेलो होतो. मला कुणीतरी ओळखीचे आणि आपले म्हणणे समजून घेणारा सहकारी मिळाल्याचा फार आनंद झाला होता.

मी नाटके लिहायला लागलो ते त्याच्या शांत आश्वासक कबुलीमुळे. तो मला म्हणाला होता कि तू संकोच न करता तुला हवे ते मोकळेपणाने लिही . मी त्याचे नाटक बसवेन . संकोच ह्यासाठी कि मी त्यापूर्वी कधीही नाटक लिहिले नव्हते . आणि त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट हि होती कि मी त्याआधी कोणतीच नाटके पाहिलेली नव्हती. लहानपणी नाही कारण घरात असलेले हिंदी चित्रपटांचे अतोनात वेड आणि मराठी नाटकांचा कंटाळा. शाळा कॉलेजात नाही कारण बारावीची परीक्षा संपताच मी चित्रपटाच्या सेट वर उमेदवार म्हणून कामाला लागलो होतो त्यामुळे आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचा, एकांकिकांचा अजिबातच अनुभव नाही. नाटकाचे जग माझ्यासाठी नवे होते.

समूहाला सोबत घेऊन सर्जक  काम करणे हे अजिबात सोपे नसते. विशेषतः प्रायोगिक नाटक हि जी गडबडलेली आणि सांडून घरभर पसरलेली संज्ञा महाराष्ट्रात आहे त्या व्यवस्थेत नवी दृष्टी आणि नव्या नाटकाचा आकृतिबंध ज्यांना उभारायचा असतो अश्या प्रत्येक पिढीतील दिग्दर्शकाला माणसे निर्माण करणे आणि ती सांभाळणे हे काम एखाद्या नटीला चेहरा ताजा ठेवायला जितके  वेळा  आरसा  पहावा लागतो तितके वेळा करावे लागते. आणि ती माणसे न दमता ते करतात म्हणून नव्या जाणिवेची नाटके तयार होतात. मोहित मला नाटक लिही म्हणाला तेव्हा त्याला माझ्याकडून नाटकाच्या संहितेचा बांधीव जुना आणि चिरेबंदी घाट अपेक्षित नव्हता हे मला आज विचार करताना कळते. त्याला काय हवे होते त्याची नक्की दृष्टी त्याच्याकडे होती. त्याला दृश्यात्मक शक्यता असलेले आजच्या काळातले , जुन्याचा कोणताही प्रभाव नसलेले , न घाबरणारे लिखित साहित्य हवे होते. त्या साहित्याला संहितेचा  टप्पा गाळून चांगल्या नटांच्या मदतीने तो फार मोहक आणि अनेकपदरी दृश्यात्मक स्वरूप रंगमंचाचा वापर करून देणार होता. मला नाटक लिहिता येत नाही हा त्याच्यासाठी प्रश्नच नव्हता . कारण ज्याला परंपरेने नाटकाची संहिता म्हणतात त्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक दृश्यकलेत असतो तसा नाटकाचा अनुभव देण्याचे त्याचे प्रयत्न चालू होते. नाटक नाही . नाटकाचा अनुभव. आणि त्यापेक्षाही पुढील काही.

हे होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याकाळात लिहिणारा आणि वाचणारा समाज हा बघणाऱ्या समाजात परावर्तीत होत होता. आमची पिढी बघत होती. ऐकत होती . आणि त्यामुळे नाटक ह्या माध्यमात नाटककाराचा शंब्द हा जो आजपर्यंत प्रमाण मानला गेला  होता त्याला नाटकाची गुंतागुंतीची दृश्यात्मक रचना आव्हान  देणार होती .

नाटक लिहिणाऱ्या माणसाला त्यावेळीसुद्धा नवा शब्द नव्हता. आजही नाही . म्हणून मला नाटककार असे म्हणले गेले. पण मी नाटककार नव्हतो आणि कधीही होवू शकलो नाही . नाटककार हि जास्त  विस्तृत आणि बांधिलकी असलेली जागा  आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक लिहिता माणूस हा त्याला जरी वाटले तरी लेखक नसतो त्याप्रमाणे नाटके लिहून कुणीही नाटककार होवू शकत नाही. मी झालो नाही. माझ्या लिखाणाची प्रशंसा करायला , मला पुरस्कार द्यायला आणि माझ्या कामाची समीक्षा करायला नाटककार हि संज्ञा वापरली गेली. २००६ साली नाटके लिहायचा थांबूनही मी माझ्या कामाच्या छापील वर्णनात ती संज्ञा वापरत राहिलो आणि मला सावकाश काही वर्षांनी हे लक्षात आले कि आपण भूमिकेने आणि लिखाणाच्या रचनेने कधीही नाटककार नव्हतो. नाटक हे आपले मूळ माध्यम नाही. एका हुशार आणि ताज्या  बुद्धीच्या आकर्षणाने आपण नाटकासाठी साहित्य निर्माण केले . त्यापलीकडे काही नाही.

२००४ ते २००६ ह्या काळात अतिशय वेगाने मी चार नाटके लिहिली. हा काळ माझ्या आयुष्यातला फार छोटा पण खूप भारावलेला काळ होता. मला माझे काम आवडत होते. मोहित म्हणाला कि मी उत्साहाने लिहित होतो. ती सर्व नाटके बसवली गेली , मला ती पाहता आली . त्यातल्या दोन नाटकांच्या संहिता प्रसिद्ध झाल्या . फार मोठ्या मनाने आणि अतिशय आपुलकीने देशभर नाटक करणाऱ्या लोकांनी त्या काळात माझ्याशी मैत्री केली , मला त्यांच्यासोबत बोलण्याची , फिरण्याची संधी दिली. महाराष्ट्रात विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे आणि  चेतन दातार ह्या तीन माणसांनी मला नुसतेच मुख्य प्रायोगिक नाटकाच्या वातावरणात नेऊन फिरवले नाही तर मी पुढे सातत्याने नाटकासाठी लिखाण करीन ह्या विश्वासाने मला अनेक साधने , गोष्टी आणि काही उत्तम आठवणी दिल्या. मी जेव्हा  आज नाटक लिहित नाही तेव्हा मी ह्या तीन माणसांचा नक्कीच विश्वासघात करीत आहे ह्याची जाणीव मला होते.

आज हे आठवण्याचे कारण म्हणजे मी पुण्यातील एका नाट्यगृहात बसलो आहे. विनोद जोशी नाट्यमहोत्सवाचा आज पहिला दिवस आहे. दर वर्षी आमचे उत्साही आणि अतिशय कार्यरत मित्र अशोक कुलकर्णी ह्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे पुण्यात एका साध्या पण सुंदर कार्यक्रमात साहित्य आणि रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे रंगभूमीवर चांगले काम करणाऱ्या पाच मुलांना एक लाख रुपयांची एक फेलोशिप दिली जाते. नऊ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ह्या उपक्रमाचा मी सर्वात पहिला फेलो आहे. मला त्यावेळी एक लाख रुपये मिळाले आणि त्याचे काय काय घ्यायचे आणि कुठे प्रवास करायचे ह्याची स्वप्ने पाहत मी स्टेजवरून विजय तेंडुलकरांना thank you म्हणालो तेव्हा ते मला म्हणाले कि आभार मानलेस तर हे पैसे परत घेईन. आभार मानायचे नाहीत आणि खर्चाचा हिशोब द्यायचा नाही. तू ते पैसे हवे तसे उडव. त्यासाठीच ते तुला दिले आहेत.

IMG_1586

 

 

 

 

 

करंट ( लोकसत्ता मधील लेखमाला २०१७) . भाग १ ते ५

 

 

करंट   १

तो दिवस अतिशय क्रूर आणि थंड काळजाचा असणार , जसे मुंबईत एकटे राहणाऱ्या अनेक लोकांचे सुरुवातीचे दिवस असतात. नव्याने राहायला आलो तरी रोजचे जगणे नीट शिजून त्याला घट्टपण आलेले नसते. माणसे ह्या शहरात भांबावलेली असतात. सुरुवातीचे काही दिवस असे असू शकतात जेव्हा तुमच्या आजूबाजूला बोलायला अक्खा दिवस कुणीही नसते. वेटरला खाण्याची ऑर्डर देण्यापलीकडे तुम्ही दिवसभर जिवंत माणसाशी बोलत नाही. पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी तसाच ह्या शहरात शिजून घट्ट होण्याची धडपड करणारा मुलगा होतो. लोकलमधून उतरून platform वरती सिनेमाची मोठी होर्डिंग पहिली की असे वाटायचे कि आपण कधी आणि कसा बनवणार आपला पहिला  सिनेमा ? किती लांब आहे ते जग आपल्यापासून . आपली कुणाशी ओळख नाही , आपल्याला मदत करणारे इथे कोणी नाही. चांगले अभिनेते आपल्या कथेला हो म्हणाल्याशिवाय आपल्याला कोण दारात उभे करेल ? उमेदवारीच्या काळात अश्या सगळ्या भावना गोळा झाल्या कि भोवतीचे रिकामपण वाढत जाऊन अधिकच एकटे पडायला होते.

मी त्या काळात एका छोट्या प्रोडक्शन हाउस मध्ये डॉक्युमेंटरी बनवणारा दिग्दर्शक म्हणून काम करायचो. महिन्यातले पंधरा दिवस भारतात अनेक राज्यांमध्ये फिरून पर्यावरणविषयक फिल्म्स बनवायचो. आणि उरलेले पंधरा दिवस घरी बसून माझ्या ‘कोबाल्ट ब्लू’ ह्या कादंबरीवर काम करायचो. अनेकदा संध्याकाळी एडिटिंग संपवून एकटा घरी येऊन मी इंटरनेटवरच्या chat रूमवर जाऊन अनोळखी लोकांशी तासनतास गप्पा मारत बसायचो.

तसाच तो दिवस. मी संध्याकाळी इंटरनेटवर गेलो आणि दोन तीन अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारणे सुरु केले . तेव्हा ती व्यक्ती मला भेटली. नवी ओळख नव्हती. गेले पाच सहा दिवस आम्ही गप्पा मारत होतो. प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. आज आम्हाला दोघांना वेळ होता म्हणून भेटूया का अशी चर्चा सुरु झाली. मी नुकताच दिवसभर काम करून घरी आलो असल्याने मला बाहेर पडायचे नव्हते. म्हणून मी त्या व्यक्तीला घरी यायचे आमंत्रण दिले.

दोन तासांनी ती व्यक्ती माझ्या घरात होती. आम्ही कॉफी पीत गप्पा मारत होतो. मी स्वयपाकघरात काहीतरी  आणायला उठलो  तेव्हा  त्या व्यक्तीने माझ्यावर मागून पहिला वार केला आणि मी भेलकांडत जमिनीवर पडलो.

पुढचा अर्धा तास ती व्यक्ती मला लाथाबुक्क्यांनी मारत होती . मी प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मी खूप शॉकमध्ये गेलो होतो. माझा एक हात लुळा पडला , डोळ्यावर बुक्क्की मारल्याने तो काळानिळा झाला आणि माझे डोके सोफ्यावर आपटले. माझी कपाटे आणि शेल्फ ह्यांची उचकपाचक करून , घरातल्या अनेक वस्तू खाली फेकून त्या व्यक्तीला माझे सातशे रुपये असलेले पाकीट आणि माझा नोकियाचा नुकता घेतलेला फोन मिळाला . तो घेऊन ती व्यक्ती घरातून पळून गेली.

साध्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या मला शारीरिक हिंसेचा इतका मोठा अनुभव पहिल्यांदा आला होता. हिंसेबद्दल मदत मागण्याआधी मला लोक काय म्हणतील आणि मला कोणत्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील ह्याचा विचार करत बसावे लागले. डोळ्याची सूज वाढत होती. हात दुखत होता.मला त्यावेळी पोलिसांवर विश्वास वाटला नाही. तो मार्ग जास्त भयंकर आहे हे लक्षात आले. कारण पोलीस यंत्रणेपासून बचाव करायला किंवा तिथले तंत्र सांभाळायला तुमच्यासोबत खमक्या व्यक्ती लागतात तसे माझ्यापाशी कुणीही नव्हते. मला माझे सातशे रुपये आणि मोबायील फोन परत नको होता. मला जोरात रडावेसे वाटत होते. कुणाच्यातरी कुशीत शिरून. पण फार भयंकर भीतीने मनाचा ताबा घेतला होता. दोन तासांनी मी कसाबसा  उठलो आणि दार लाऊन घेतले. पाणी प्यायले. घराची परिस्थिती पहिली. माझ्या चुलत भावाला आणि एका मित्राला फोन केला आणि खूप रडलो. सगळेच अंतराने खूप लांबवर  होते. फोनवरच बोलावे लागणार होते.

दुसऱ्या दिवशी दुपारी मला दिल्लीला जावे लागणार होते. तिथून संध्याकाळी ट्रेन ने डेहराडूनला शूटींगसाठी पोचणे भाग होते.

मी दादर स्टेशनवर उतरताना तोंडावर आपटून पडलो अशी कथा तयार केली कारण डोळ्याभोवती सुजून खूप काळे झाले होते. platform वरती माझा फोन पडून फुटला होता आणि कुणीतरी पाकीट  मारून नेले होते. देहरादून मध्ये पुढचे पंधरा असल्याने पुण्यात कुणाला काही कळण्याचा धोका नव्हता. मी हिंसेचा अनुभव बुजवून टाकला कारण समाज नावाच्या अदृश्य राक्षसाच्या भीतीने मी अपराधीपण स्वतःकडे घेऊन गप्पा बसून राहिलो.

पण त्या रात्री माझ्या मनावर खूप खोलवर जखम झाली ज्यातून पुढची अनेक वर्षे काहीतरी वाहत राहिले. ती सुकायला मला फार मोठी किंमत मोजावी लागली. खूप वाट पहावी लागली. मी मनातून अपंग होवून राहिलो.

झालेल्या गोष्टीबद्दल काही दिवसांनी शांतपणे लिहून काढले कि आपल्या अनुभवाला न्याय मिळतो ह्यावर माझा विश्वास आहे. दुसऱ्या माणसाशी बोलण्यापेक्षा मला त्याआधी शांतपणे लिहून काढणे आवडते. गेली सोळा वर्षे मी ह्या गोष्टीविषयी लिहायला घाबरत राहिलो. संकोच करीत राहिलो . कारण मध्यमवर्गीय वाचक आणि मध्यमवर्गीय प्रेक्षक नावाच्या जाणिवेची एक फार मोठी सत्ता असते. पोलिसांप्रमाणेच मी त्या लोकांना घाबरतो. कक्षेबाहेरचे लिहिताना शांतपणे दोनदा विचार करावा लागतो. अश्या भितीपायी मी संकोच करत गप्प बसून राहिलो. खाजगीतही वहीमध्येसुद्धा त्या रात्रीविषयी काही लिहवेना. अश्यावेळी आपल्याला कविता करता येत नाही ह्या जाणीवेने फार हतबल व्हायला होते.

मी सावध झालो. त्या घरात पुढचे अनेक महिने रात्री दिवे चालू ठेवून झोपू लागलो. इन्टरनेटने माझे आयुष्यात पुढे कधी काहीही वाईट केले नाही. मी अनेक अनोळखी त्यामुळे माणसे जोडली , मित्र बनवली. प्रवास केले , अनोळखी माणसांना सोबत घेऊन काम केले. पण त्या रात्रीपासून माझ्या त्वचेच्या आतमध्ये एक स्वेटर आपोआप विणला गेला. त्या रात्री मी मुंबईशी दोन हात करायला सक्षम झालो. लोकांच्या डोळ्यात डोळे घालून स्पष्ट बोलायला शिकलो. नाही म्हणायचे आहे तेव्हा नाही म्हणायला शिकलो. होकारापेक्षा वेळच्यावेळी दिलेला नकार महत्वाचा असतो.

मला स्पर्शाबद्दल अतिशय चुकीची जाणीव त्या रात्री तयार झाली. ती दुरुस्त व्हायला किती वर्षे जावी लागली ह्याची गणतीच नाही. एका बाजूला कुणाचाही स्पर्श नको असलेला आणि दुसर्या बाजूला सतत सध्या प्रेमाच्या स्पर्शासाठी भुकेला असा दोन अर्थांचा प्राणी माझ्यातून तयार झाला. त्या प्राण्याने पुढील अनेक वर्षे लोकांना आपलेसे केले आणि स्पर्शाच्या पांगळ्या घाबरट जाणीवेने पटकन दूर लोटले. सतत खऱ्या प्रेमाच्या स्पर्शासाठी भुकेले ठेवले.

मी लिहायला बसलो कि टाळाटाळ करायचो. ह्याविषयी लिहिणे टाळायचो. अगदी सिनेमात कोणत्याही पात्राच्यासुद्धा  आयुष्यात मी ती रात्र अजून येऊ दिली नाही. गेली अनेक वर्षे मी अनेक गोष्टीबद्दल मोकळेपणाने आणि शांतपणे लिहित आलो. पण हि गोष्ट लिहायला घाबरत राहिलो. मी अनेक हिंसा घडल्यावर त्याविषयी वाचले, सिनेमे पाहत आलो. शारीरिक हिंसेचा मी घेतलेला एकमेव क्रूर आणि काळा अनुभव फिका पडेल अशी दृश्ये मी सिनेमात पहिली.

काही वेळा मला बोलताबोलता अनुरागला त्या रात्रीविषयी शांतपणे सांगावे असे वाटेल. तो नक्कीच  आपल्याला उलटे न भोसकता आपले म्हणणे समजून घेऊ शकेल. पण मी आवंढा  गिळून गप्प बसलो.

मराठीत अशी ठिकाणे आहेत जिथे लिहीता आले असते. माझ्या ओळखीचे लोक आणि नातेवायिक अजिबात वाचत नाहीत अशी मासिके आहेत. त्यात लिहिणे सोपे होते. तिथे सहानुभूतीने आणि समजुतीने ह्या अनुभवाकडे बघणारा तोच नेहमीचा ओळखीचा वाचक होता.

सगळ्यात भीती असते ती कधीही स्वतःचे घरदार न सोडणाऱ्या आणि हिंसेकडे नैतिकतेने बघणाऱ्या आणि आपल्याला जपून राहण्याचे सल्ले देणाऱ्या जन्मगावाचा समाजाची. प्रत्येक लेखकावर जन्मगावच्या हुशार समाजाचा अप्रत्यक्ष धाक असतो. इंटरनेट वर जपून वागा रे असे सांगणाऱ्या ओरिजीनल बुद्द्धीच्या माणसांचा धाक.

पण आज जुने वर्ष सरताना मी शांतपणे बसून हे कागदावर लिहून काढले. नवीन वर्ष सुरु होताना ह्यापेक्षा वेगळी शांताता आणि आनंद दुसरा तो काय असणार ?

 

   करंट २

फ्रेंच भाषा शिकायला गेलो तेव्हा त्या भाषेला अंगभूत असणारा खळाळता प्रवाही उत्साह माझ्या मनात होता. बहुदा ती भाषा म्हणजेच तो प्रवाही उत्साह असे मी मनात धरून चाललो होतो. ‘अपूर्वाई’ हे घरातील पुस्तक नऊशे वेळा वाचून फ्रेंच माणूस म्हणजे सतत शाम्पेन पिणारा , उसासे टाकत प्रेम करणारा , एका हाताने सतत चित्रे काढणारा आणि रोज संध्याकाळी निरनिराळ्या प्रेयस्या सोबत घेऊन नाचगाणी करणारा असे काहीसे मत माझे झाले असल्याने मला त्या भाषेचे फार आकर्षण तयार झाले होते. इंग्रजी भाषा आम्हाला शाळेत शिकायला होती. पण इंग्रज माणसांप्रमाणे ती ज्ञान रचना आणि शिस्तीची भाषा होती. प्रेम करायला शिकवणारी फ्रेंच भाषा कुठे आणि कशी शिकतात ह्याचा पत्ता नव्हता.

सतराव्या वर्षी मी चित्रपटाच्या सेटवर सहायक म्हणून काम करू लागलो आणि जगभरातील अनेक वेगळ्या सिनेमाशी माझा संपर्क आला. मी पुण्यातील एका चित्रपट महोत्सवात सलग ओळीने न्यू वेव्ह काळातील फ्रेंच सिनेमे पाहत होतो. जान्न मरो ह्या माझ्या आवडत्या नटीचा ‘जूल ए जिम’ ( Jules and jim ) हा अप्रतिम सिनेमा खाली चालू असलेल्या इंग्रजी सबटायटल्स सकट बघताना मला असे वाटले कि हे काही खरे नाही. मला हि भाषा यायलाच  हवी. हि पात्रं काय बोलतात ते मला इंग्रजीशिवाय कळायला हवे म्हणून मी ती शिकायला गेलो. ‘अलियान्स फ्रोन्सेज द पुणे’ ह्या संस्थेत मी पहिल्या वर्गाला प्रवेश घेतला तेव्हा मी सोडून वर्गात सिनेमात रस असलेले कुणीच नव्हते. बहुतेक मुलामुलींना कॅनडियन विसा हवा होता म्हणून ते फ्रेंच शिकत होते. एक मुलगी फेमिना मिस इंडियाची तयारी करीत होती. एक शेफ होता ज्याला जहाजावर नोकरी हवी होती. प्रत्येकाला एक उद्देश होता. नोकरीचा किंवा विसाचा. मला कोणताच नव्हता. तू का फ्रेंच शिकतोस ह्यावर मी ‘असाच शिकतो’ गुलजारांच्या भाषेत ‘’युं हि’’ असे म्हणायचो.

भाषेला स्वतःचे शरीर असते. आकार असतो आणि स्वभावसुद्धा. प्राथमिक अवस्थेत पुण्यातील अतिशय तळमळीने आणि आवडीने शिकवणाऱ्या शिक्षकांकडून ती भाषा शिकताना मला दडपण वेगळ्याच गोष्टीचे आले होते. आपण भारतात किती कुढत आणि घाबरून जगतो ह्या गोष्टीचे. मी पाहत असलेल्या आणि ऐकत असलेल्या फ्रेंच सामाजिक जीवनात एक मोकळेपणा आणि बहारदार उत्साह होता. माणसाला त्याची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेला उद्धटपणा होता. निवड करण्याची मुभा होती आणि ती वय , आर्थिक परिस्थिती ह्या मुद्द्यान्पलीकडे सर्वांनाच होती.

बारावीच्या सुट्टीत मी डेक्कनवरील एका पुस्तकच्या दुकानातून गुस्ताव फ्लोबेर ह्या प्रसिद्ध फ्रेंच लेखकाच्या ‘मादाम बोव्हारी’ ह्या कादंबरीचा अनुवाद आणला होता आणि तो वाचून मी भारावून गेलो होतो. भाषा आणि ती भाषा बोलणाऱ्या समाजाचे निर्णय हातात हात घालून चालतात हे मला जाणवू लागले. मग मी मराठी भाषा बोलतो म्हणजे नुसती बोलत नाही तर मी मराठी समाजाने आखून दिलेले निर्णय नकळतपणे घेतो हे मला लक्षात आले आणि हि निर्णयप्रक्रिया बदलायला परकीय भाषेचे ज्ञान आपल्याला मदत करेल हे मला कळले तेव्हा ती भाषा शिकायचा उद्देश माझ्या मनात तयार झाला असावा. मला कोणताही विसा किंवा नोकरी नको होती. मला माझी समाजात आणि कुटुंबात आखून दिलेली निर्णय घेण्याची पद्दत स्वतःपुरती बदलायची होती. मोकळे व्हायचे होते म्हणून मी फ्रेंच भाषेकडे , फ्रेंच सिनेमा आणि साहित्याकडे आकर्षित झालो असणार असे मला आज विचार करताना वाटते. पण वर्गात मला कुणी कारण विचारले असता मी ते सांगू शकलो नाही. शिक्षकांनाही नाही.

फ्रेंच कवी रॅम्बोची कविता माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला मी शिकत असलेल्या ह्या भाषेची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून घ्यायला हवी अशी जाणीव झाली. रॅम्बोने मला खडबडून जागे केले. ओळखीच्या वाटणाऱ्या त्या भाषेचा माझ्या मनातील नाद बदलला. आज दरवेळी रॅम्बोची कविता वाचताना , पुन्हा नव्याने समजून घेताना आणि त्यात हरवून जाताना मी फ्रेंच भाषेच्या लवचिकतेने आणि तिच्या उच्चारणातील शब्दध्वनीच्या सौंदर्याने पुन्हा पुन्हा मोहित होतो. मी हि भाषा शिकतो आहे ह्याविषयी मनाला फार बरे वाटते.  रॅम्बोची हि कविता माझ्या आयुष्यात न सांगता आली. पण आज माझ्या आयुष्यात एक फार महत्वाची जागा तिने निर्माण केली आहे. मराठी कवी आरती प्रभू आणि लेखक महेश एलकुंचवार ह्यांनी केली आहे तशीच.

जां निकोला ऑर्थर रॅम्बो हा फ्रान्समधील एकोणिसाव्या शतकातील अतिशय महत्वाचा कवी. वयाच्या तेराव्या वर्षापासून तो कविता करू लागला होता. सतरा ते एकोणीस ह्या वयात त्याने आपल्या आयुष्यातील सर्व साहित्यनिर्मिती केली. जवळच्या मित्राच्या , Paul Verlaine ह्या कवीच्या विरहाने एकोणिसाव्या वर्षी त्याने लिहिणे जवळजवळ पूर्णपणे थांबवले. Verlaine हा त्याचा मित्र सहचर आणि महत्वाची प्रेरणा होता. रॅम्बोची कविता मला आज सोबत करते. सावकाश कळू लागली तेव्हा आकर्षित करीत होती. मी त्याची समग्र कविता आधी इंग्रजीतून वाचली . मग सावकाश फ्रेंच मधून वाचली . घाबरत वाचली . त्रोटकपणे. अर्थ समजण्याची अपेक्षा न धरता वाचली. शब्दाच्या आवाजाच्या मोहाने. पण मग सावकाशपणे त्या कवितेचा आकार मनामध्ये घर करू लागला. दुखावलेला एकटा पडलेला , आतून पोखरलेला हा तरुण मुलगा माझ्याशी शांतपणे बोलू लागला. तो माझ्याच वयाचा होता. मी मोठा झालो तरी तो एकोणीस वर्षाचा राहिला पण माझ्यापेक्षा नेहमीच जास्त धीट, जास्त उघडा आणि बेधडक . मी कधीच करू शकलो नाही अश्या अनेक गोष्टी तो त्याच्या कवितेत करत होता.

आठ दहा वर्षापूर्वी माझ्याकडे राहायला आलेला माझा एक मल्याळी मित्र परत जाताना A season in Hell हे रॅम्बोने १९८३ साली रचलेल्या कवितेचे पुस्तक घरी विसरून गेला. ती माझी रॅम्बोची पहिली ओळख ठरली. माझ्याने ती कविता सुरुवातीला वाचवेना इतकी ती दाहक आणि कठीण होती. मला संपूर्ण लक्ष्य त्या वाचनावर केंद्रित करावे लागले.संयम आणि संपूर्ण उर्जा वापरून ती कविता आत घ्यावी लागली. श्वास रोखून मी ते छोटे कवितेचे पुस्तक हाती घेऊन बसलो होतो .ते पचेना पण खालीहि  ठेववेना. माझी तोपर्यंतची कवितेची कल्पना मोडीत काढणारा तो अनुभव ठरला. मला ओढ निर्माण झाली. सतरा ते एकोणीस ह्या वयात हे दाहक विचित्र आणि गडद काव्य निर्माण करून त्यानंतर पस्तिसाव्या वर्षी संपून मरून गेलेल्या माणसाची ओढ. फ्रान्समधील शार्लव्हील ह्या खेड्यात १८५४ साली जन्मलेला रॅम्बो माझ्याशी बोलू लागला होता . आश्वासक आणि खाजगी.

रॅम्बोच्या कवितेने मला एकट्याने बसून मोठ्याने कविता म्हणण्याचा आनंद दिला . आपण गाणी म्हणतो . कविता नाही. पण त्याची कविता मी वाचताना मोठ्यांदा म्हणतो. मला त्या कवितेत दडलेली कथा अनुभवताना ती ज्या भाषेत लिहिली आहे त्या भाषेचा आनंद घेत ती पचवावी असे वाटते. मी अनेक कवींच्या कविता अश्या वाचून पहिल्या पण रॅम्बोच्या कवितेने मला म्हणायचा आनंद दिला तसा सर्व कवितांनी दिला असे नाही.

अनेक वर्षांनी मला हे लक्षात आले आहे कि नवी भाषा शिकण्याचे साकल्य त्या भाषेतील कविता अनुभवण्यामध्ये असते. कविता आपल्याला मुळाशी घेऊन जाते. कविता आपले जगणे डागडुजी करून काही काळ पूर्ववत् करून देते. आपल्यापाशी समजून घेणारे कुणी नसेल तर कविता आपली असते. शांतपणे एखाद्या विषासारखी भिनणारी कविता.

मला कविता करण्याची देणगी नाही. मी गद्य माणूस आहे. पण मला जगताना कविता लागते. प्रेमाची आणि देशप्रेमाची नाही तर आतल्या पोकळीची कविता. जी लहान असताना आरती प्रभूंनी दिली. आणि त्यानंतर रॅम्बोने.

महेश एलकुंचवार ह्यांच्या सर्व लिखाणात मला रॅम्बो पुन्हा वावरताना दिसतो. एल्कुन्चावारांना रॅम्बो नीट कळला आहे. त्यामुळेच  मला त्यांचे सर्व साहित्य नेहमी सोबत करते. मला रॅम्बोची कविता समजून घेण्यासाठी एलकुंचवारांच्या साम्राज्यातील पोकळीचा कितीतरी मोठा आधार तयार झाला असावा.

रॅम्बोने मला नेहमी सोबत केली आणि माझा लिहिण्याचा संकोच दूर केला. न लिहिण्याचा निर्णय हा महत्वाचा आहे हे त्याने मला समजावले. म्हणून मला तो फार आवडतो.

 

         करंट ३

 

मी काल नेटफ्लिक्सवर ‘टॉप गन’ पाहत बसलो होतो. आणि मला आयुष्यात पहिल्यांदा त्या सिनेमातली पात्रे काय बोलतायत हे कळले . कारण नेटफ्लिक्सचा फायदा हा कि अमेरिकन इंग्रजी चित्रपटांनासुद्धा इंग्रजी सबटायटल्स असतात. सिनेमा पाहता पाहता वाचून हे लक्षात येते कि समोरचे बापे आणि बाया काय बोलत आहेत. १९८६ साली टॉप गन प्रदर्शित झाला आणि एका वर्षात तो भारतात आला तेव्हा मी सहावीत होतो. इंग्रजी सिनेमे हे नव्याने शिकायला आलेल्या इंग्रजी भाषेचा सराव व्हावा म्हणून नेमाने पाहू लागलो होतो.

टॉप गन ने आमच्या सर्व वर्गालाच काय पण सर्व पिढीला खूप खर्चात टाकले. म्हणजे सहावी सातवीत असताना खिशात चिंचेच्या आणि संत्र्याच्या गोळ्या घेण्याइतकेच पैसे असताना आम्ही पुढे आयुष्यात करायच्या गोष्टींची मोठी यादी सगळेच मनातल्या मनात करून बसलो. एकमेकांना सांगत सुटलो.

मी दर शुक्रवारी अलका चित्रपटगृहात जाऊन भाषा शिकायला मिळेल असा उदात्त अविर्भाव आणून इंग्रजी सिनेमे पाहत असे. अलकाचे मालक आणि मॅनेजर ह्या दोघांना उत्तम इंग्रजी चित्रपटांची जाण होती . ते बारकाईने निवडून उत्तम अमेरिकन चित्रपट तिथे लावत. माझे वडील मला तिकीट काढून आत बसवून देत आणि सिनेमा संपला कि कोपर्यावरच्या ट्राफिक पोलिसाचा हात धरून चार मोठे रस्ते ओलांडून मी घरी परत येत असे. मनात सिनेमाची चव घेऊन. घरात जे कधीच होवू शकत नाही असे सर्व लैंगिक सामाजिक आणि भावनिक शिक्षण माझे अलका चित्रपटगृहाच्या चालकांनी केले.

‘टॉप गन’ ने आमचे खालील खर्च वाढवले आणि अनेक आकांक्षा आमच्या सदाशिवपेठी शुद्ध देशी बालमनात उत्पन्न केल्या . ‘टॉप गन’ हि आमची खरी मुंज होती. घरी पाहुणे रावळे बोलावून मुंडण करून मुंजीसारख्या कालबाह्य संस्कारांवर जो पैसा आमच्या आईवडिलांनी वाया घालवला त्याचे मला फार वाईट वाटते. तो पैसा आम्हा मुलांना सहावीत सातवीत दिला असता तर आम्ही खालील खर्च आणि कृती लगेच केले असते. आमचे भले झाले असते .हल्ली सिनेमा बघताना जो खाण्यापिण्यावर खर्च होतो तसा हा फालतू खर्च नव्हे. पूर्वी सिनेमा बघताना आपण ह्या ह्या गोष्टी करायच्या आहेत , इथे इथे जायचे आहे ,ह्या ह्या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत असले कपडे घालायचे आहेत हे मनसुबे मनात रचले जाऊन आमची आजूबाजूच्या त्याचत्या जगातून सुटका व्हायची. असा तो खर्च.जो सध्या अनेक वर्षांनी माझ्या लाडक्या जोया अख्तर चे सिनेमे बघताना करावासा वाटतो.

‘’टॉप गन’’ ने मनात निर्माण केलेले खालील खर्च आणि आकांक्षा.काही करायची ऐपत नंतर आयुष्यात आली . काही केले नाहीत.उरलेले करायची इच्छा निघू गेली आहे .

१ ) रे बॅन कंपनीचे aviator गॉगल्स घेणे. (टॉम क्रूज हा नट त्या aviators मध्ये जो काय सेक्सी  दिसला आहे ! हे गॉगल्स सहा हजारापासून पुढे मिळतात हि बातमी वर्गातील एका मुलाने काढल्यावर आम्ही चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवायला आणि उद्योगधंदे करायला प्रेरित झालो. तोपर्यंत आम्हाला ‘’पैसा नाही तर कुटुंब आणि देश महत्वाचा’’ असे काहीतरी शाळेत शिकवत. ‘’साधेपणा , अंथरूण पाहून पाय पसरणे’’ , ‘’गरिबी चांगली श्रीमंती वाईट’’  असे सगळे होते ते संपले. ‘’आधी aviator मग बाकीचे सगळे’’ हे आमच्या मनावर कोरले गेले.जे गॉगल्स आमच्या पिढीच्या प्रत्येकाने पहिल्या दमदार कमायीतून घेतले. माझ्याकडे अजूनही माझ्या गॉगल्सच्या कप्प्यात एक तरी aviator असतोच.)

२ ) पायलट बनणे (वर्गातले सगळेजण हा सिनेमा पाहून पायलट बनणार होते. एकही कार्टा बनलेला नाही. सगळा वर्ग कॅलिफोर्नियात सोफ्टवेअरसाठी  गेला.आम्ही वर्गातील मोजून तीन मुले सिनेमासृष्टीत आलो. एक जण डॉक्टर झाला आहे. दोन मुले बिचारी इंजिनियर पण झाली. कुणीही पायलट बनले नाही. पण ‘टॉप गन’ पाहून प्रत्येकाने जवळजवळ हे  ठरवून टाकले होते कि माझे आता जमिनीवर काय काम ? मी तर आकाशातला राजपुत्र . अनेक मुले वर्ग चालू असताना खिडकीबाहेरच्या आकाशाकडे पाहत बसत. पुण्यावरून तर एकही विमानसुद्धा जात नसे , तरी बिचारी गॉगल्स लावून विमाने उडवायची स्वप्ने पाहत)

३ ) शर्ट काढून बीचवर व्हॉलीबॉल खेळणे. (न बोललेलेच बरे. आमच्या एकेकाचे रूप बघता कुणी हे केले नाही हेच बरे आहे. गोव्याला गेले कि बनियन आणि अर्धी चड्डी घालून पोट सांभाळत काही मुले हे जुने स्वप्न पूर्ण करताना अजुनी दिसतात. अश्या मुलांच्या बायका पंजाबी ड्रेस घालून समुद्रात पोहत असतात)

४ ) वर्गात शिकवायला आलेल्या शिक्षिकेसोबत अफेयर करणे.(सर्व सातवी आठवीतल्या मुलांची साधी सोपी फॅंटसी. प्रत्येकजण वयात येताना असे काहीतरी कारावसे वाटणारच. टॉप गन मध्ये  टॉम क्रूज ला शिकवायला केली मॅकगिलिस हि अप्रतिम दिसणारी शिक्षिका येते. आणि चारच सीन नंतर ते एकमेकांसोबत रात्र घालवतात. पुण्यात … भावेस्कूल . … सदाशिव पेठ … हातावर मारल्या जाणार्या पट्ट्या …. गृहपाठ … पालकांना बोलावेन अश्या धमक्या…. शिवाय शनिवारी मारुतीच्या मूर्तीला घालायचा पानांचा हार … त्यामुळे हे स्वप्न थुंकी गिळावे तसे प्रत्येकाने गिळून टाकले असणार. नाहीच जमले ह्या आयुष्यात , अरेरे !)

५ )रोज काम संपल्यावर संध्याकाळी मिर्त्रांसोबत जवळच्या पबमध्ये जाणे आणि स्वतःचे गांभीर्य आणि पांडित्य बाजूला ठेवून थोडी नाचगाणी आणि मजा करणे. ( हे नंतर भारतातही करता आले ,सध्या तर नेहमीच करता येते. .धन्य ते शहरीकरण , धन्य ती खुली अर्थव्यवस्था आणि धन्य ती स्थलांतर करायची सवय. नौवद साली ज्यांच्या शाळा संपल्या ते आम्ही सगळे अतिशय निरागसतेने आणि सहजपणे खुल्या अर्थव्यवस्थेत सामावून गेलो. मौजमजा करायची आम्हाला खंत वाटली नाही आणि अपराधी तर कधीही वाटले नाही .नाहीतर आम्ही पुण्यातील मुले पिंपरीच्या पेनिसिलीन कारखान्यात काम करून संध्याकाळी दूरदर्शन पाहायला घरीबिरी आलो असतो.)

अमेरिकन सिनेमा आपल्याला जी उर्जा देतो त्याची तुलना इतर कशाशीशी होवू शकत नाही. अमेरिकन सिनेमा ,अमेरिकन साहित्य आणि अमेरिकन संगीताशी योग्य वयात संपर्क आपल्याने आमची पिढी फार सुदैवी ठरली. आमच्यातील लाजरा, कुढत स्वप्ने बघणारा भारतीय तरुण ह्या सिनेमाने खतम केला. आणि स्थलांतरण ह्या अतिशय आवश्यक प्रक्रियेसाठी ह्या अमेरिकन सिनेमाने आम्हाला तयार केले. नौवद सालानंतर आमच्या आजूबाजूला जे महत्वाचे बदल झाले ते म्हणजे digitization  आणि मोकळी अर्थव्यवस्था. संपर्क क्षेत्रातील वेग. आम्ही जुने analog जाग अनुभवून ह्या नव्या जगासाठी शांतपणे तयार  झालो असे होण्यात अमेरिकन सिनेमाचा फार महत्वाचा वाटा आहे. आपली शहरे बदलणार आहेत. आपली भाषा मिश्र होणार आहे. आपल्या आजूबाजूला अनोळखी संस्कृतीतले लोक वावरणार आहेत ह्याची तयारी अमेरिकन चित्रपट आमच्यासाठी लहानपणीपासून करीत होता. त्यामुळे आम्ही बदलत्या काळाकडे नाराजीने आणि संशयाने पाहत बसलो नाही. जग बदलेल तसे बदलत गेलो.

महत्वाची गोष्ट हि कि तेव्हा जे बदल घडायला सुरुवात झाली ते बदल घडणे अजूनही थांबलेले नाही. पण मूलतः आपले जुने होते तेच कसे चांगले होते ह्यावरचा आमचा विश्वास पुसून गेला असल्याने आम्हाला शांतपणे रोज नव्या बदलानांना सामोरे जाता येते.

भाषा कळणे महत्वाचे नसते. भाषा जपणे हेसुद्धा महत्वाचे नसते. त्या भाषेमागून आपल्यावर काय सोडले जात आहे ती मूल्ये ओळखून आणि जोखून त्याची मजा घेता आली तर सिनेमा बनवण्याचे काम सफल झाले असे मी स्वतःला सांगत गेलो. मी सिनेमा शिकलो , बनवू लागलो तेव्हा युरोपातून आलेला क्रांतिकारी बुद्धिवादी सिनेमा शिकवणारे शिक्षक आम्हाला हे सांगू लागले  कि अमेरिकन सिनेमा छचोर आहे , वरवरचा आणि खोटा आहे. पण लहानपणीच ‘’टॉप गन’’ पाहिलेला असल्याने ( तो खरच सुमार सिनेमा आहे, मला संवाद कळल्यावर कालच लक्षात आले!) आणि त्याचा फार फायदा माझ्या स्वनांना झालेला असल्याने मी कधीही अमेरिकन सिनेमाची आणि संगीताची घाईने चेष्टा केली नाही.

 

 करंट ४

काळ पुढे सरकतो आहे. शांतपणे. एका लयीत. जग बदलते आहे. काळ नाही. काळ फक्त मूकपणे प्रवास करतो आहे. कष्टाने केलेली उपासना , कार्यातून निर्माण केलेल्या सुंदर स्मृती आणि जुन्या वास्तू ह्या तिन्हीच्या निमित्ताने काळ थांबून राहिला असे वाटत असेल तरी तसे नाही. काळ शांतपणे आणि हट्टाने पुढे सरकतो आहे.

इंदूरच्या विमानतळावर विमान उतरण्याआधी शेकडो एकरांची सुंदर हिरवीगार शेतजमीन दिसते. ती जमीन माळवा प्रांतात आपले स्वागत करते. नजर जाईल तिथपर्यंत हिरव्यागार जमिनीचे तुकडे. नावालाही मनुष्यवस्ती नाही.त्या शेतांमधून जाणारे नागमोडी वळणावळणाचे सुंदर रस्ते. फुलांचे मोठाले ताटवे. मला वरुन पाहताना पु ल देशपांडे , सुनिता देशपांडे आणि त्यांच्या मित्रांची अचानक ठरवलेली सहल आठवते. कुमारजींना भेटण्यासाठी सहज आठवण आली म्हणून पुण्यातून गाडी काढून निघालेले मित्र आणि त्या नागमोडी रस्त्यांवरून देवासच्या दिशेने निघालेली त्यांची मोटारगाडी.  प्रत्यक्ष भेटण्याआधी किंवा अनुभवण्याआधी मी अनेक कलाकारांना सुनिता देशपांडे ह्यांच्या लिखाणातून भेटलेलो असतो. कोमकली कुटुंबीय हे त्यापैकी एक. आपल्या सर्वांचे लाडके कुमारजीच नाहीत तर संपूर्ण कोमकली कुटुंबाची एक साजरी चौकट महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना पु ल आणि सुनिताबाईंनी लिखाणातून समोर ठेवली आहे .मला त्या उभयतांची ह्या प्रवासात तीव्रेतेने आठवण येते आणि पुढचे दोन्ही दिवस ती आठवण सोबत राहते.

कुमार गंधर्व हे असे व्यक्तिमत्व आहे जे मला देशात आजही जागोजागी सापडत, उमजत आणि कोड्यात टाकत जाते. मी अनेक वयाच्या आणि तीन ते चार पिढ्यांच्या कोणत्याही कलासक्त माणसाशी भारतात कुठेही बोलत असेन तरी कुमार गंधर्व हा विषय निघाला कि नुसते शास्त्रीय गायनाचे रसिकच नाही तर अनेक कला महाविद्यालयातील विद्यार्थी , चित्रपटकलेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी , नृत्यकलेचे विद्यार्थी , पाश्चात्य वाद्यरचना शिकणारे विद्यार्थी गप्पा मारू लागतात. ह्या सर्वांना कुमारजी अतिशय आपले वाटतात . त्यांच्याविषयी ममत्व वाटते. ह्यात अगदी विशीतली तरुण मुलेही आली जी बाकी कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय संगीत ऐकत नाहीत, ती कुमारजींचे गाणे त्यांच्या फोनवर बाळगून असतात. एखाद्या पॉप स्टार चे गाणे ऐकून उर्जा मिळावी , स्वतंत्र मोकळे झाल्याची अनुभूती व्हावी , आपल्या अनाथ पाठीवरून प्रेमळ हात फिरवा तसे कुमारजींच्या आवाजाने मनाचे होवून बसते. त्यामुळे ते भारतातल्या सर्वांचे आपले आहेत. जवळचे आहेत . त्यांच्याविषयी ममत्व नसेल असा माणूस मला आजपर्यंत भेटलेला नाही.

 

त्यांच्या पंचविसाव्या पुण्यतिथीनिमित्त देवासला ‘भानुकुल’ ह्या त्यांच्या प्रसिद्ध निवासस्थानी कलापिनीने तिच्या आप्तांच्या आणि अनेक गंधर्वप्रेमी सहकार्यांच्या मदतीने एक देखणा सोहळा आयोजित केला आहे.

माळव्यातील प्रेमळ हिंदी भाषा तुम्हाला फार पटकन कवेत घेते. त्या भाषेतील अगत्य , तिची चाल आणि त्यातला साधेपणा तुमचे परकेपण कमी करतात. ह्या हिंदी भाषेत उर्दूचे मिश्रण नाही. त्या भाषेला मराठीप्रमाणे स्वतःची लाज वाटत नाही. ती खेळती, गाती, भांडती मोकळी भाषा आहे. कोमकली कुटुंबातील माणसे एकाच वेळी सफाईदारपणे हि हिंदी , माळवी आणि मराठी बोलतात. कलापिनी एका लंब्याचौड्या वाक्यात अनेकवेळा सफाईने ह्या भाषांचे मिश्रण करून जाते. “अपने करतलध्वनी के साथ उनका स्वागत किजीये “ असे कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणतात.  टाळ्यांना असलेला ‘करतलध्वनी’ हा शब्द ऐकून मी पुढचे दोन दिवस आपले मुंबईचे हिंदी बोलून इथे शोभा करुन घ्यायची नाही हे मनातल्या मनात मराठीतच ठरवतो.

कवी अशोक वाजपेयी आपल्या मिश्कील हसऱ्या शैलीने कार्याक्रमाची सुरवात करतात . भानुकुलच्या प्रांगणात उभारलेला एक विशाल मंडप अनेक संगीतप्रेमी रसिकांनी भरून गेला आहे. अशोक वाजपेयी असे बोलत आहेत जणू समोर कुठेतरी कुमारजी बसून त्यांचे बोलणे ऐकत असावेत. ते काळ थांबवू बघतात. श्रोत्यांना भूतकाळात नेण्याऐवजी आपल्या प्रसन्न शैलीने आणि भाषाप्रभुत्वाने ते कुमारजींना वर्तमानात आणू पाहतात. आठवणी आणि किस्से ह्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मित्राला आठवण्याची एक गत त्यांना अवगत आहे. ते सिद्धहस्त कवी आहेत. त्यांच्या आठवणी साध्या आणि लोभस आहेत. कोणत्याही प्रकारे ते कुमारजींचा सुपरहिरो करत नाहीत. ना ते आपल्या मित्राच्या नसण्याचे शोकमय वातावरण तयार करतात. कारण आपला मित्र कुठेही गेला नाहीये त्यावर त्यांच्या नितांत विश्वास आहे. आणि  त्यामुळे आपल्या अतिशय साध्या पण विचारपूर्वक केलेल्या भाषणाने ते कुमारजींचे ह्या कार्यक्रमाकडे लक्ष्य वेधून घेतायत असे वाटते. आपण ज्याप्रमाणे प्रेमाने देवाला आमंत्रित करतो. तू आमच्याकडे पहा , आमच्यासोबत जेवायला ये असे म्हणतो त्याप्रमाणे.

आता याआधी कधीही न अनुभवलेला अनुभव येतो तो म्हणजे दिल्लीच्या गांधर्व वाद्य वृंदाचा समूह्गानाचा कार्यक्रम. भारतातल्या प्रत्येक संगीतप्रेमी माणसाने घ्यायला हवा असा हा अनुभव आहे. श्री मधुप मुद्गल ह्या समूह्गानाचे संचलन करतात. मराठी ,पंजाबी, कोकणी ,राजस्थानी, बंगाली काश्मिरी, उर्दू अश्या अनेकविध भारतीय भाषांमधील लोकगीते , समूहगीते , प्रार्थना हा गायकांचा संच पाश्चिमात्य समूह्गानाच्या शैलीत सादर करतो. त्यात माळव्यातील भजने गायली जातात. रवींद्रसंगीत सादर केले जाते. ह्या समूहातील गायक नंतर एकत्र जेवताना मला आणि सचिन खेडेकरला मराठी गाणे गाऊन दाखवतात.

पहिल्या रात्रीची सांगता कुमारजींच्या एका जुन्या मैफिलीचे video recording पाहून होते. ज्याच्यासाठी आपण भारतभरातून सगळे  चाहते , स्नेही इथे जमलो तो माणूस समोर पडद्यावर अवतरतो. मी अश्या काळात जगतो जिथे मला पडद्यावर दिसणारे काही भूतकाळातले असण्याची गरज नसते. वर्तमान काळातील अनेक माणसांना मी फक्त पडद्यावरच भेटत असतो,बोलत असतो . कुमारजी त्या मैफिलीत पडद्यावर अवतरतात तेव्हा हे पूर्वी कधी होवून गेले आहे हि भावना माझ्या मनाला स्पर्शही करत नाही. लांबवर कुठेतरी हे चालू आहे असे मन समजून घेते आणि समोर कुमारजी गात असलेल्या सुरांच्या जाळ्यात मन उडी मारून टाकते. १९८० च्या आसपास मुंबईत झालेली ती मैफल आम्ही  सगळे एकत्र बसून अनुभवू लागतो. लांबवर ती चालू असते. दूरच्या देशात. दूरच्या काळात नव्हे. जणू ते कुठेसे गातायत आणि पडद्यावर ती मैफल आम्हाला लाईव्ह दिसते आहे. माझ्या शेजारी बसलेली कलापिनी अलिप्तपणे आनंदाने ती मैफल पहात आहे.त्याचवेळी समोर कुमारजींच्या मागे तानपुऱ्यावर ती बसलेली दिसते आहे. मला जाणवतात ते त्या मैफिलीतील माणसांचे कॅमेर्याला घाबरणारे जुन्या ८० च्या दशकातील मराठी माणसांचे चेहरे. भुलाभाई देसाई रोडवरील एका घरात बसून शांतपणे कुमारजींना ऐकणारी ती माणसे कॅमेरा समोर आला कि संकोच करीत आहेत. वसंत बापट सोडून. बापट तीन ते चारदा गाणे सोडून कॅमेऱ्यात डोकावून बघतायत. पण इतर माणसे त्या काळातील साजेसे वागत आहेत. वातावरणात एक साधेपणा आहे. कुणी झकपक कपडे केलेले नाहीत. कुणी उगीच काही कळत नसताना ‘क्या बात” असे आचरटपणे ओरडत नाही. कुमारजींचे गाणे हि छोटीशी प्रयोगशाळा असल्यासारखे आहे. गाताना त्यांना स्वतःला प्रमाणाबाहेर आनंद झालेला त्या कॅमेर्याने नीट टिपला आहे. ते सुराला शारीरिकता देतात. ते सुराकडे पाहिल्यासारखे करतात. त्याला हाताळ्यासारखे करतात. त्याला आकाशात सोडून दिल्याची मुद्रा करतात. गाताना त्यांच्या डोळ्यात एक पाणावलेली माया येऊन जाते. बापट अजूनही कॅमेर्यात पहातच आहेत. माझ्या शेजारी बसलेली एक धटिंगण बाई कलापिनीला धक्का मारून “ किती वयाची होतीस ग तू त्या वेळी ?” असले काहीतरी अनावश्यक विचारते आहे.

मला श्रोत्यांचे आणि प्रेक्षकांचे चेहरे बघायला फार आवडतं . मी अनेकवेळा सिनेमा पाहत असलो कि मध्येच आजूबाजूच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहत बसतो. आमच्या  अगदी शेजारी एक पोलीस उभा आहे. त्याने आपल्या बोटांनी  उभ्याउभ्या ताल धरला आहे. त्याची नजर मांडवाबाहेरील गर्दीवर असली तरी त्याच्या मनाचा एक कप्पा गाण्यात नकळत शिरला असावा. कुमारजी एका बंदिशीला विराम देवून थांबतात आणि कलापिनी पुढे जावून तो video बंद करून सर्वांना जेवणाला पिटाळते. पण  ते सुद्धा फार गोड हिंदी बोलून.

रुचकर गरमागरम आणि अनोख्या माळवी पद्दतीने तिच्या वैयक्तिक देखरेखीखाली बनवलेले अप्रतिम जेवण भानुकुलच्या अंगणात आमची वाट पाहत आहे.

क्रमश :

 

 

   करंट ५

परंपरेकडे मी अतिशय संशयाने बघत वाढलो आहे . माझे पोषण परंपरेला नाकारून नाही तर सातत्याने परंपरेला प्रश्न विचारत काळानुसार वाकवून झाले आहे . मी आजपर्यंत अनेक गोष्टी शिकलो पण कधीही कोणत्याही गुरुचे शंभर टक्के ऐकेलेले नाही. घरच्या पूर्वजांची मते प्रमाण मानेलेली नाहीत , कुणाचाही वय किंवा कुणाचाही अनुभव जास्त आहे म्हणून त्या व्यक्तीला  मी कधीही प्रमाणापेक्षा जास्त गांभीर्याने घेत नाही.

आमच्या घरात असलेली शास्त्रीय संगीताची आवड गेल्या दोन तीन पिढ्या एखादा झरा जमिनीत लुप्त व्हावा तशी नाहीशी झाली असताना माझ्या धाकट्या भावामुळे , सुयोगमुळे ती पुन्हा प्रवाही व जागती झाली. अतिशय लहान वयापासून त्याने आमच्या घरात संगीताचा अभ्यास सुरु केला आणि गाण्याचे अस्तित्व खेळते ठेवले. परंपरा कसोशीने पाळून ज्ञानार्जन करण्याच्या त्याच्या प्रक्रियेकडे मी नेहमीच संशयाने किंवा अनेक वेळा सख्खी भावंडे ज्या बेफिकीरीने एकमेकाची चेष्टा करतात त्या बेफिकीरीने पाहत आलो. माझे आयुष्य सिनेमात आणि सिनेमाच्या भोवती घडत असताना तो सर्व वेळ  शास्त्रीय संगीताचा अभ्यास करत राहिला. आणि मग फार सावकाशपणे मला हे लक्षात आले कि लिहिताना किंवा चित्रपट बनवताना जो अमूर्ततेचा ठाव आपल्याला घ्यावा लागतो ती अमूर्तता  आपल्याला संगीत ऐकल्याशिवाय उमगणार नाही. अमूर्ततेच्या ओढीने मी सावकाशपणे शास्त्रीय संगीत ऐकू लागलो. भारतीय आणि पाश्च्चात्य . दोन्ही प्रकारचे संगीत माझ्या मनातील तळघरे उपसू लागले तशी मला गाणे ऐकण्याची गोडी लागली. मला त्यातले कोणतेही ज्ञान अजूनही नाही पण गोडी आहे. ती वाढते आहे .

गाणे नव्याने ऐकू लागलेला माणूस कुमार गंधर्व ह्यांचे गाणे आवडीने ऐकत राहतो ह्याचे कारण कुमारजी नव्या श्रोत्याला कधीही दाराबाहेर उभे करत नाहीत. गाणे कळत नाही ह्याचा न्यूनगंड ते देत नाहीत.

दुसर्या दिवशी मी पहाटे उठून हॉटेलवरून चालत चालत उजाडायच्या वेळी भानुकुलमध्ये पोचतो आणि कुमारजींच्या रियाजच्या खोलीत बसून समोर सुरु असलेला कलापिनीचा रियाज ऐकतो. ती थोड्यावेळाने अंगणात गाणार आहे .गाणे संपताना ती हे म्हणणार आहे कि मी तर कुमारजींची छोटी गिलहरी आहे. खार . शिष्या नाही. मुलगी नाही. एक खार. परंपरा पाळणे , त्या जोपासणे आणि काळानुसार आपल्यात बदल घडवत , कलेची कालसापेक्ष मांडणी करत प्रयोगशील राहणे ह्याचे भान ज्याला आहे तो कुमार गंधर्व ह्यांचा चाहता आहे असे म्हणता येइल. मग तो कोणत्याही क्षेत्रातील कलाकार असो. पुण्यात चित्रपटाचा रसास्वाद शिकवताना आमचे आवडते शिक्षक समर नखाते हे म्हणतात कि परंपरा आणि नियम जरूर मोडा पण त्याआधी ते नीट समजून आत्मसात करून घ्या म्हणजे योग्य प्रकारे मोडणे सोपे जाईल. कलेच्या इतिहासाचा आणि राजकीय इतिहासाचा अभ्यासही ह्याचसाठी करायचा. कालसापेक्ष वागण्यासाठी. इतिहासाचा अभ्यास हा परंपरा पाळण्यासाठी करायचा नसतो तर त्या परंपरा प्रश्न विचारून काळासोबत वाकवून मोडण्यासाठी करायचा असतो.

इतर कोणत्याही क्षेत्रातील माणसांपेक्षा  हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील माणसे जुनाट किस्से आणि आठवणी सांगण्यात दिवसच्या दिवस घालवू शकतात. त्यात भाबडेपणा असतो त्याचप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा आणि हेवेदावे असतात. आपापल्या घराण्यांच्या परंपरेचे अभिमान असतात. जुन्या पद्धतीच्या मानापमानाच्या परंपरा पाळणे किंवा  त्या पाळल्यासारख्या दाखवणे आणि वयोवृद्ध कलाकारांचे  इगो जपणे हे दर तासाला करत बसावे लागते. तरुण कलाकारांना तर एकमेकांचे काम मोकळेपणाने आवडायला बंदी असल्यासारखे वातावरण आहे. समकालीन कलाकारांनी वादविवाद घालण्याचे आणि एकमेकांच्या कामाची परीक्षा एकमेकांना न दुखावता करण्याचे वातावरण ह्या क्षेत्रात अस्तित्वातच  नाही. त्यामुळे सर्व माणसे सतत एकमेकांच्या पाया पडत असतात आणि पाठ वळली कि कुरापती काढत बसतात. ह्या सगळ्या परंपरागत जगण्याचा गाण्याच्या गुणवत्तेशी किंवा प्रयोगशीलतेशी संबंध असतोच असे नाही.

कलापिनीने तिच्या वडिलांकडून , गुरूंकडून आत्मसात केलेली सर्वात आकर्षक गोष्ट हि कि ती समाजातील अनेक प्रकारच्या माणसांशी गप्पा मारते , त्यांच्यात रमते . गाण्याप्रमाणेच गाण्यापलीकडे जगणाऱ्या अनेक क्षेत्रातील माणसांशी मोकळेपणाने मैत्री करायचा तिचा स्वभाव आहे. त्याचे उदाहरण म्हणजे कुमारजींच्या पुण्यतिथीला देवासला एकत्र आलेली अनेक क्षेत्रातील माणसे. तसेच पंडित सत्यशील देशपांडे ह्यांच्यासारखे कुमारजींचे पट्टशिष्य. पंडित सत्यशील देशपांडे सकाळच्या सत्रात एका मोकळेपणाने  कुमारजी आणि त्यांच्या गुरु शिष्य नात्याची फोड करतात. ती करताना ते एक आकर्षक सप्रयोग व्याख्यान देतात जे गाणे समजू बघणाऱ्या  कुंपणावर बसलेल्या माणसाला सामावून घेइल. त्यांचे सत्र हे नुसत्या  पोकळ आठवणीच्या पलीकडे जाऊन गुरु शिष्य नात्याचे कारण आणि प्रयोजन सांगते. स्मरणरंजन करत नाही. त्या प्रत्येक आठवणीमागची भूमिका स्पष्ट करते.

माझ्या भावामुळे कलापिनी आमच्या घरी येऊ लागली तेव्हा  माझ्याशी गप्पा मारताना आमची दोघांची स्वयपाकाची आवड तिला उमजली. सकाळी घरात पोहे बनत होते तेव्हा  तिने पुढाकार घेऊन माळव्यात बनवतात तसे विशिष्ट चवीचे पोहे बनवले ज्याची चव अफलातून होती. त्या पोह्यात तिने फोडणी देण्याआधी मीठ हळद मिसळली आणि वरून डाळिंबाचे दाणे पेरले. ती अशी गायिका आहे जी उगाच शास्त्रीय संगीताचे गांभीर्याने अवडंबर करीत नाही. मला ती आवडते ह्याचे मुख्य कारण म्हणजे ती हसरी आहे. हा गुण हिंदुस्तानी शास्त्रीय गायन परंपरेला न शोभणारा आहे. ह्या क्षेत्रातील अनेक माणसे सतत कुणाचेतरी श्राद्ध चालू असल्यासारखी वागत असतात. लहानपणीच अकाली प्रौढत्व आल्यासारखी जगतात. ह्या वातावरणात कलापिनीची गाण्यासोबत गुरूंकडून आत्मसात केलेली आणि जोपासलेली नेटकेपणा आणि समाजप्रियता ह्याची आवड माझ्यासारख्या गाणे न समजणाऱ्या  माणसाच्या मनातील भीती आणि संकोच कमी करते. त्यामुळेच इतक्या विविध क्षेत्रातील माणसे देवासला आली आहेत.

माझ्यासोबत सचिन खेडेकर , त्याची पत्नी जल्पा आणि मराठीत अतिशय चांगला फूड ब्लॉग लिहिणारी सायली राजाध्यक्ष असे माझे मित्रगण आहेत. आम्ही सर्वचजण गाण्यासोबत उत्तम चित्रपट, उत्तम जेवण आणि दुपारच्या गाढ झोपेचे भोक्ते आहोत. ह्या दोन दिवसात भुवनेश आणि कलापिनीने जो पाहुणचाराचा मेन्यू ठरवला आहे त्याचे वर्णन करणे फार आवश्यक आहे. कारण त्या दोन दिवसात आजूबाजूला घडणारे गाणे , गप्पा आणि चर्चा ह्या गोष्टी त्यांनी कुशलतेने बनवलेल्या जेवणातून ओवून घेतल्या होत्या. हिवाळा सुरु आहे. बाजरीची गरम खिचडी आणि तूप गूळ , चविष्ट सार , इंदुरी पद्धतीचा मोकळा पुलाव ज्यात मी सकाळपासून शोधत असलेले डाळिंबाचे दाणे. रबडी आणि गोड बुंदी . दुपारच्या जेवणाआधी प्यायला समोर आलेली शिकंजी , नाश्त्याला इंदुरी पद्धतीचे जिरवण आणि शेव घातलेले गरम पोहे आणि गरम गरम कचोरी. त्यानंतर सचिनने शोधून काढलेला एक पानवाला. ह्या सगळ्यामुळे रविभैय्या दाते लहानपणीच्या गोड आठवणी सांगायला लागताच आम्हा सगळ्यांना आलेली गोड पेंग. मोकळा वाहता वारा. सतत समोर येणारा वाफाळता चहा.

उत्सवप्रिय माणसांना आपलेसे वाटेल असे वातावरण अश्या आपुलकीने आखलेल्या हिवाळ्यामधील खाजगी मैफिलींमध्ये आपसूक तयार होते . पुण्या मुंबईत होणाऱ्या भल्यामोठ्या व्यावसायिक महोत्सवांमध्ये बसून गाणे ऐकायला अशी मजा येत नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात पंडित योगेश सम्सी ह्यांचे एकल तबलावादन आणि मग उस्ताद अमजदअली खान साहेबांचे सरोदवादन .

काळ पुढे जाताना तो थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करता येतो. तो थांबत नाही. पण त्या प्रयत्नातून अश्या काही अनुभवांची मेजवानी तयार होते. मानले तर माणूस आपल्यातून गेलेला असतो. आणि मानले तर तो आपल्यात असतो. तो माणूस जाताना मागे जी उर्जा ठेवून जातो त्या उर्जेने काय घडू शकते ह्याचा प्रत्यय मला ह्या दोन दिवसात आला.

सर्व सोबतचे ओळखीचे आणि महत्वाचे लोक एकामागून एक निघून जाणार आहेत हे आपल्याला  आतमध्ये माहिती असते. प्रत्येक पुढची पिढी मग ठराविक काळाने जमून एकमेकांना आश्वासक वाटावे  म्हणून असे काही चांगले छोटे कार्यक्रम घडवून आणत असते. विजय तेंडूलकर गेले तेव्हा दोन तीन वर्षे आम्ही सगळे एकत्र जमायचो आणि गप्पा मारायचो , काहीतरी वाचायचो. दोन तीन वर्षांनी माझ्यातल्या अश्रद्ध आणि आळशी माणसाने ह्या सवयीला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मला जर काही आवडत नसेल तर ते मागे राहिलेल्या माणसांनी  एकत्र जमून कुणाचीतरी आठवण काढत बसायचे कार्यक्रम.

पण कलापिनीने माझ्या ह्या अनुभवाला आणि समजुतीला वाकवल्यासारखे केले त्यामुळे तिचे खूप आभार.

FullSizeRender

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

              एकट्या माणसाचे स्वयंपाकघर

 

 

                                                          एकट्या माणसाचे स्वयंपाकघर

सचिन कुंडलकर

माझी लहानपणीची आमच्या पुण्याच्या स्वयंपाकघराची आठवण ही जिथे खूप आणि सतत जेवण बनत असते हि आहे. आमचे स्वयपाकघर कधीही दुपारचे शांत डोळे मिटून लवंडलेले मी पहिल्याचे मला आठवत नाही. आमचे घर अतिशय प्रशस्त आणि शहराच्या मध्यवर्ती भागात आहे .घरी कुलदैवत असल्याने कुळाचार वर्षभर होतात. आणि शिवाय माझे आईवडील हे मनाने अतिशय अघळपघळ प्रेमळ देशस्थ आहेत हे त्याचे अजून एक कारण असावे. जेवण कसे आहे यापेक्षा ते भरपूर आहे न ? अचानक कुणी आले तर उपाशी परत तर गेले नाही न ? ह्या भावनेत आनंद असणारे. देवाचे प्रसाद आणि सणाची जेवणे अतिशय साग्रसंगीत पद्धतीने पार पाडणारे , अपरात्री अचानक कुणीही आले तरी नुसताच पिठ्लभात नाही तर पोळी भाजी पापड कोशिंबीर असे सगळे वेगाने शिजवणारे , कुणाच्याही आजारीपणात त्या व्यक्तीकडे जेवण पोचवणारे , सगळे उपासतापास चविष्ट पिष्टमय पदार्थ रांधून साजरे करणारे आणि फ्रीज उरलेल्या पदार्थांनी ओसंडून वाहणारे असे आमचे स्वयपाकघर होते आणि अजुनी आहे . आई माहेरची कोकणस्थ शाकाहारी. वडील पक्क्के देशस्थ – अतिशय चमचमीत आणि तेलकट खाणारे , कोल्हापुरी पद्धतीचे जेवण आवडणारे. सर्व पदार्थ वाटून घाटून झणझणीत हवेत. कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला वाटणात हवाच. चटण्या तिखट आणि भाजीचा रंग लाल नसेल तर वडील जेवायचे नाहीत. वडील आणि माझे काका ह्यांच्यामुळे मला मांसाहारी जेवण करायची आवड तयार झाली . धाकटा भाऊ आणि आई संपूर्ण शाकाहारी होते आणि राहिले .

आईचा एकमेव नियम हा कि जे काही करायचे ते कुटुंबात मिळून सगळ्यांसमोर करायचे. ती साधे अन्डेही खात नसली तरी ती इकडे तिकडे विचारून विचारून मासे,मटण ,चिकन करायला आमच्यासाठी शिकली. आपले घर हीच सर्व मौज मजा करायची जागा आहे. बाहेर लपवून काही करू नका असे तिने मला लहानपणीच सांगितले होते. आठवीमध्ये असताना ती म्हणाली, ‘’काय ती बियर प्यायची असेल आणि सिगरेटी ओढून पहायच्या असतील त्या घरात ओढून पहा. लपवून बाहेर व्यसने करू नका. जे कराल ते संयमाने करा. सगळे खा प्या , सगळ्या गोष्टी अनुभवा पण कशाच्याहि आहारी जाऊ नका.’’ असे सांगितल्याने मला कॉलेजात जाईपर्यंत कशाचे काही थ्रीलच उरले नव्हते. तुम्हाला खूप क्रांतिकारी वागायचे असेल पण क्रांती करायला काही विषय तर हवा?आमच्या आईवडीलांमुळे आमच्या क्रांतीला काही विषयच उरला नव्हता. आमच्या स्वयपाकघराला कशाचेच अप्रूप नव्हते आणि आईच्या स्वभावामुळे घरात होकाराची यादी जास्त आणि नकाराची यादी कमी होती.

 

आईने मला ठरवून दोन गोष्टी लहानपणीच शिकवल्या .एक म्हणजे लिहायची आवड लावली आणि दुसरे म्हणजे घर आवरायला आणि पोळी भाजी करायला शिकवले. कुकर लावायला शिकवले. तिला माझे भवितव्य दिसले असणार. माझा प्रवास तिने मूकपणे ओळखला असणार. सर्व आया आपापल्या मुलांचे प्रवास ओळखून असतात. त्या मुलांना दुरून शांतपणे पाहत असतात. विचार करत असतात. फार बोलत नसल्या तरी मुलांच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे याचे आडाखे बांधत असतात. आम्हा दोघा भावांपैकी मलाच तिने बरोब्बर ह्या गोष्टीचे ज्ञान का दिले ह्याचे मला आता आश्चर्य वाटत नाही. मला पुढे आयुष्यात कुठे कसे फिरावे लागेल ,एकट्याने काय काय उभे करावे लागेल हा सिनेमा तिने माझ्या लहानपणी तिच्या डोळ्यासमोर पहिला असणार ह्याची मला खात्री आहे. तिने मला माझ्या आयुष्याच्या त्या प्रवासासाठी सक्षम करायला घरकामाची आणि स्वयपाकाची आवड लावली.

घरात पुरुषांची कामे- बायकांची कामे असा भेदभाव कधीच नव्हता. आईवडील इतक्या गरिबीतून आणि कष्टाने वर आले होते कि वडिलोपार्जित मोठे घर सोडता आमच्याकडे फार काही नव्हते. त्यामुळे घरची सर्वच्या सर्व कामे आईसोबत बाबाही करत. स्वयपाकाची तयारी ,चीराचीरी बाबा करत . रात्री पाहुणे गेले कि भांड्याचे ढीग धुवून साफ करून ठेवत. सकाळचा पहिला चहा आयुष्यभर बाबा बनवत. मी फार लहानपणीपासून हे पहिले असल्याने मला कधी कणिक मळायला,पोळ्या लाटायला , कुकर लावायला लाज वाटली नाही. मी स्वयंपाकाच्या बाबतीत अतिशय gender neutral माणूस बनलो ते आमच्या आईबाबांमुळे.

तेवीस वर्षाचा असताना एका सकाळी माझ्या मित्राच्या कारमध्ये माझे कपडे , CD प्लेयर , कॅमेरा , कॉम्प्युटर , पुस्तके आणि एक मोठी आईने दिलेली पिशवी घेऊन मी घर आणि शहर सोडून मुंबईत राहायला आलो. त्याच्या एक वर्ष आधी मी फ्रांस मध्ये एका स्कॉलरशिपवर राहून आलो होतो आणि तिथे शिकत असताना मी परत भारतात गेल्यावर कुटुंबाबाहेर एकट्याने राहून पहायचा निर्णय घेतला होता. अर्थातच घरून माझ्या निर्णयाला संपूर्ण पाठींबा होता. आईने दिलेल्या पिशवीत घरचे तूप ,तिने आणि बाबांनी नुकतीच बनवलेली भाजणी आणि आमच्या घरातले दोन पिढ्या जुने असे पोळपाट लाटणे होते. मला मुंबईत ती पिशवी उघडून हे सगळे पाहिल्यावर फार बरे वाटले होते.

मी परदेशात शिकताना अनेक घरांमध्ये स्वयपाकघराविषयी कंटाळ्याची वृत्ती अनुभवली होती. आपल्या मनात फ्रांस हि एक जुनी भरजरी कल्पना असते.आपण तिथे जाताना ‘अपूर्वाई’ पुस्तकात वाचलेली १९६० सालातली रोमांटिक कल्पना घेऊन जात असलो तरी एकविसाव्या शतकात मिश्र संस्कृती , नोकऱ्या, भयंकर बेकारी, व्यसने ,घराचे हफ्ते, गुन्हेगारी , चोर्यामार्या , धार्मिक हिंसा , मोडणारी लग्ने ,एकटेपणा हे सगळे अंगावर वागवत सर्व जुनी युरोपियन शहरे जगत असतात. मी गेलो तेव्हा नुकतेच इंटरनेट ने जग जोडले जाऊ लागले होते. माझ्या पिढीच्या अनेक फ्रेंच माणसांनी मोठे कुटुंब आणि स्वयपाक हि गोष्ट फार पूर्वीच आयुष्यातून काढून टाकलेली मी पहिली. ती वेळखाऊ आणि अनावश्यक होती. माणसाची आयुष्ये सुटसुटीत होती,दिवसाचा जास्त वेळ माणसे काम करीत असत. मी तिथे राहताना वेळेचा आणि कामाचा आदर करायला शिकलो. घरे छोटी होती.लग्नसंस्था जवळजवळ शिल्लक राहिली नव्हती. आयुष्याचा वेग प्रचंड. ह्या सगळ्यात घरात रांधून खायला कुणालाहि वेळ नव्हता. कुठेही बाहेर जेवले तरी जेवण अतिशय उत्तम आणि बहारदार. घरासारखेच स्वच्छ.त्यामुळे एका माणसाचे स्वयपाकघर चालवायचे प्रयोजन कुणाला कळत नसे. कशाला एकट्यासाठी हे सगळे करत बसायचे? बाहेरचे शहर अतिशय उर्जा देणारे आणि रंगीत आणि वैयक्तिक राहायच्या जागा खूप मोजून मापून आखलेल्या. तरुण मुलांच्या एकेकट्याच्या घरात कुणी खायला बनवत नसे. एकत्र कुणाबरोबर राहत असतील तरी घरी महिनोन महिने स्वयपाक करत नसत. मित्र मैत्रीण स्वतंत्र बाहेरून जेऊन येत. मला हे सगळे नवीन होते. मी कुणाला कधीहि जोखत बसत नाही. व्यक्तीस्वातंत्र्य हवे असेल तर त्याची अशी किंमत असते एव्हडेच मला परदेशात राहून कळले होते. माझ्या ओळखीच्या सवयी आणि अपेक्षांमधून मी वेगाने बाहेर पडत होतो.

परत आल्यावर मी एकटा राहायची स्वप्ने पाहत असताना मात्र माझ्या मनात पुण्यातले माधुरी पुरंदरे ह्यांचे घर होते. देखणे आणि बुद्धिमान घर.आणि मुंबईतील माझी अभिनेत्री असलेली मैत्रीण सोनाली कुलकर्णी हिचे घर. सोनालीचे घर अतिशय शिस्तीचे .त्या दोन्ही घरांमध्ये एकएकटीच व्यक्ती राहत असली तरी चविष्ट असा संपूर्ण स्वयपाक केला जात असे. मोजका, रंगीत,सौम्य आणि आटोपशीर. मला आटोपशीरपणाचे फार अप्रूप वाटे कारण मी आयुष्यात आटोपशीरपणा कधी पहिला अनुभवला नव्हता. मी त्या काळात घराबाहेर इतका प्रवास करू लागलो होतो कि मला घरची सवय संपूर्ण गेली होती. माझ्या चवी सौम्य होवू लागलेल्या, मसाल्यावारचा हात कमी. माझे प्रमाण मोजके बनू लागलेले. माझी क्रोकरी आणि भांडी ह्याची आवड उत्तम आकार घेऊ लागलेली. मला कडू कॉफी आवडू लागलेली. पोळी भाजी भात ह्याचा आग्रह संपलेला. वन डिश मील चे महत्व आणि रूप परदेशात राहून आवडू लागलेले. घरी आईने किंवा बायकोने केलेली पोळी खाणे म्हणजेच सुख आणि ब्रेड खाणे म्हणजे भारी बिचारे दुर्दैव अश्या पुणेरी माणसांच्या घरी बसून बसून तयार केलेल्या मूल्यव्यवस्था मला पटेनाश्या झाल्या होत्या. आणि घरच्या माणसांकडून असणाऱ्या अपेक्षा शांतपणे संपत आलेल्या.

मला घरातून आणि मित्रांकडून काही गोष्टी शिकाव्या वाटत होत्या. मी सुनील सुकथनकर कडून सगळा स्वयपाक करायला शिकलो. सोनाली इतके सुंदर ताट वाढते कि पाहत बसावे. दडपे पोहे तर इतक्या ओलाव्याचे करते कि तिच्याशी लग्नच करावे असे वाटून जाते. माझ्या वडिलांसारखी खलबत्त्यात कुटून केलेली शेंगदाण्याची चटणी मला येत नाही. माझा मित्र अभिजित देशपांडे फार चांगले मासे आणि केरळी स्ट्यू बनवतो तसे मला अजुनी येत नाही. त्याच्या पास्ता सॉस ची consistency नेहमी फार उत्तम असते. बाई आणि पुरुष असण्याच्या पलीकडे ह्या सवयी असायला हव्यात असे मला वाटते . मला एकट्याचे घर असले तरी ते चालणाऱ्या स्वयपाकघराचे असायला हवे होते.

पहिल्या दिवशी मी त्या पार्ल्यातल्या रिकाम्या flat मध्ये सामान टाकून नुसता इकडे तिकडे पाहत उभा राहिलो तेव्हा मला लक्षात आले कि आपल्याला वाटते आहे तितके स्वतंत्र होणे सोपे नाही. म्हणजे एकटे राहायला लागून काही कुणी स्वतंत्र होत नाही. माधुरीताई , सोनाली किंवा महेश एलकुंचवार ह्यांच्यासारखे एकट्याने, टुकीने आणि नेटाने घर चालवणे हि सोपी गोष्ट नाही. खरे कबूल करायचे झाले तर मला मुंबईत येताक्षणी एकटा घरात असताना रडायलाच आले होते. आणि असे वाटले होते कि नको जाऊदे , नाही झेपणार आपल्याला. परत जाऊ.

मला तो दिवस आठवतो आहे. मी खाली जाऊन सगळे सामान आणले आणि दिवसभर राबून घर साफ केल्यावर रात्री बटाट्याच्या तेलकट काचर्या, दोन खूप जाड पोळ्या असे बनवून जेवलो. लाटताना चिकटू नयेत ह्या भीतीने प्रमाणाबाहेर पीठ लावलेल्या त्या पोळ्या. स्वयपाकाचे आणि दिवसभर केलेल्या साफसफाई आणि कष्टाचे कौतुक करायला घरात कुणी नाही ह्याचा जास्त राग येत होता. पण मन हे सांगत होते कि इंग्लिश सिनेमात माणसे एकटी राहतात तसे राहायचे असेल तर ह्याची सवय करून घ्यावी लागेल. जेवून झाल्यावर भांडी धुवून नुकत्याच साफ केलेल्या फिनैलचा वास येणाऱ्या गारेगार फरशीवरच पंखा लावून मी झोपून गेलो होतो. माझ्यापाशी दुसर्या दिवशी काही काम नव्हते. कुणी माझी वाट पाहणार नव्हते. मी घर सोडून एकटा राहायला आलो आहे ह्याचे glamour कुणालाही नव्हते.

एकट्या माणसाने स्वयपाकघर का चालवायला हवे ह्याचे उत्तर मला आजपर्यंत कधी मिळाले नाही. मी हा प्रश्नच स्वतःला कधी विचारलेला नाही. पण मी इतकी वर्षे आवडीने माझे घर चालवताना हे पाहत आलो आहे कि ज्या वेळी मी स्वयपाकघर बंद ठेवून हॉटेलातून येणाऱ्या होम डिलिव्हरी वर जगलो आहे तेव्हा जगण्याचा कसलातरी आकार हरवून बसला आहे. न सांगता येणारी अस्वस्थता तयार झाली आहे. आमच्या मूळ घराच्या सवयींपासून मी आता कितीतरी लांब येऊन पोचलो. लग्न न केलेल्या मुलामुलींच्या स्वयपाकघरावर त्यांच्या आया रिमोट कंट्रोल ने नको तितका ताबा ठेवून असतात. ती सवय मी रागावून मोडून काढली. घराला स्वतःची शिस्त आणि आकार दिलाच त्याचप्रमाणे बेशिस्त असण्याचीसुद्धा घराला सवय लावली.

सगळ्यात आधी उगीचच सणवार आणि व्रतांचा आरडओरडा करणारे आणि आपले खाणेपिणे त्यामुळे ठरवणारे ते ‘कालनिर्णय’ नावाचे भयंकर कॅलेंडर मी घरातून फेकून दिले. कधीतरी मस्त मासे मिळावेत बाजारात आणि त्या दिवशी नेमका दसरा कि फिसरा असावा कि ते मासे घशाखाली जाणार नाहीत. त्यापेक्षा नकोच ते ! बहुतांशी कृषिप्रधान भारतीय सणांचे अर्थ आणि गरज आता संपून गेली आहे. ऋतुचक्र संपूर्ण बदलले आहे. मी शेतकरी बितकरी नाही, माझ्याकडे गाई ,बैल,सवाष्णी वगरे कुणी नाही. माझ्या स्वप्नात कुणी विधवा येऊन मला शाप वगरे देत नाहीत. मला सुगीबिगी, पिक कापणी, पहिला पाऊस , काळी आई ,तिचे ऋण, नागोबा ,पणजोबा असले कोणतेही आनंद नाहीत. मला आज गांधी मेले कि उद्या टिळक जन्मले ह्याने रोजच्या आनंदात कोणताही फरक पडत नाही. कॅलेंडर मोबाईल फोन वर आल्याने माझी जातीतून आणि कर्मकांडातून बरीच सुटका झाली. मोदक, पुरणपोळी ,चिरोटे ,चकल्या हे खायला मी नित्यनेमाने पुण्याला जायचे ठरवले. सगळे सगळीकडे वर्षभर मिळते. चवीने खाणे कुणीही कधीही सोडू नये. उगाच समाजाचा राग प्रसादाच्या शिर्यावर का काढा? तो हवा तेव्हा बनवून मस्त चापावा. मनुके बदाम अहाहा. साजूक तूप घातलेले मोदक, ओल्या नारळाच्या कारंज्या . देवा देवा ! पोटाच्या वळ्या !

स्वयपाकघर हे त्या त्या दिवशीच्या मूड नुसार आणि आवडीनुसार रोज रंग वास आकार बदलेल ह्याची मी काळजी घेतली. स्वयपाकघरात शिस्तीचा आणि रुटीनचा बडेजाव तयार होताच त्यांना फेकून द्यावे. हे सगळे आपोआप आकार घेत गेले तरी आज बघताना असे लक्षात येते कि तसे करणे सोपे नव्हते. कारण बदल होत जाताना मनामध्ये सतत बदलाविषयीची अप्रिय आणि अपराधी भावना आपल्या आजूबाजूचे लोक फार नकळत तयार करत असतात. त्या लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकावे लागते. माझे स्वयपाकघर आता मराठी ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या पुरुषाचे स्वयपाकघर उरलेले नाही. त्याला जात नाही तसेच त्याला लिंगभाव नाही. ते मोठ्या वेगवान शहरात राहणाऱ्या आणि आवडीचे काम करणाऱ्या एकट्या व्यक्तीचे स्वयपाकघर आहे. असे स्वयपाकघर मुलाचे किंवा मुलीचे कोणाचेही असू शकते. ते अगदी टिपिकल भारतीय मात्र आहे. मी परदेशात मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या माणसांची बेफिकिरी आणू शकत नाही. घरी कुणी आले तर मी पहिल्यांदा खायला प्यायला बनवतो. कुणी उपाशी असेल तर मला सहन होत नाही . माझ्या घरून कुणीही रिकाम्या पोटी जाऊ नये असे मला वाटते.

जी माणसे कधीच स्वयपाक करत नाहीत त्यांच्याविषयी मला कधी काही वावगे वाटत नाही. मी क्रिकेट खेळत नाही तशी ती स्वयपाक करत नसावीत इतके ते साधे आहे. मी सुटीला बाहेर गेलो तरी स्वयपाक करत बसतो. मी परदेशात किंवा बाहेरगावी घर भाड्याने घेऊन निवांत रहातो तेव्हा पहिल्या दिवशी bag घरात टाकताच मी supermarket मध्ये जाऊन सगळे सामान घेऊन येतो. लिहिणे आणि खायला बनवणे ह्या माझ्यासोबत आनंदाने सगळीकडे फिरणाऱ्या माझ्या सवयी आहेत.

माझ्या स्वयंपाकवर मी केलेल्या जगभरातील प्रवासाचा, मी सतत इंटरनेट वर पहात असलेया कुकिंग शोज चा आणि माझ्या त्या वेळी असणाऱ्या मूडचा खूप प्रभाव आहे. माझ्या मनाच्या नदीत तरंगणारे ते फ्लोटिंग किचन म्हणजे तरंगते स्वयपाकघर आहे. किनाऱ्यावर ज्या गोष्टी दिसतात त्याची त्यात रेलचेल होत जाते. एक असे ठराविक स्वरूप नाही. त्याला शिस्त आणि आकार असला तरीही कायमचे नियम नाहीत. मी बाहेर जाऊन नव्या उर्जेने उत्साही होवून रंग बदलून आलो कि माझे स्वयपाकघर तो आकार आणि रंग घेते.

सगळ्यात महत्वाचे अतिशय आणि सर्वोच्च महत्वाचे म्हणजे मला गौरी देशपांडे आणि ह्यांच्या पुस्तकांचा आता प्रमाणाबाहेर कंटाळा आहे. त्या जिवंत असत्या तर त्यांनाही हे पटून आम्ही दोघे मस्त रम पीत बसलो असतो ह्याची मला खात्री आहे.माझी एकटेपणाची कल्पना हि त्यांच्या पुस्तकातील आहे ती नाही. ती आता जुनी झाली आहे पण मराठी बायकांच्या घरी अजून नवा सिलेंडर आलेला नाही त्यामुळे त्या गौरीचा तोच सिलेंडर पुरवून पुरवून वापरतात हे मला दिसते.

त्याचप्रमाणे अरेरावी करत फणा काढून गावभर फिरणाऱ्या आणि अजून १९६८ ची क्रांतीच जगात चालू आहे असे समजणाऱ्या चळवळखोर स्त्री पुरुषांसारखे मी एकट्याने आयुष्य जगत नाही. तसे जगणे विनोदी आणि outdated आहे. मी तसले समतेचे आणि साधेपणाचे स्वयपाकघर उभे केलेले नाही. मी फार snobbish माणूस आहे. डाव्या अंगाने पहिले तर मी खूपच पारंपारिक आहे आणि उजव्या अंगाने पहिले तर मी खूपच अपारंपरिक आहे. मला फार चांगलेचुंगले खायची सवय आहे. घरातल्या वाईन , कॉफी आणि चीज नेहमी उत्तमच असायला हवीत. ब्रेड ताजा आणि मुंबईतल्या सर्वोत्तम बेकरीतलाच हवा , घरात नेहमी ताजी खमंग भाजणी असावी, ताजा नारळ भरपूर खवून ठेवलेला असावा , फ्रीजमध्ये भरपूर अंडी आणि चिकन असावे , चार माणसे अचानक आली तर लवकर करता येतील असे पदार्थ कपाटात असावेत. चार पोळ्यांची कणिक मळून नेहमी फ्रीजमध्ये तयार असावी आणि पार्ल्याच्या भाजीबाजारातून आलेल्या ताज्या भाज्या असाव्यात ह्याकडे माझे नीट लक्ष्य असते. ज्या गोष्टी ज्या देशात उत्तम बनतात त्या तिथूनच यायला हव्यात असे मला वाटते. मला योगासने आवडत नाहीत. By the way पार्ल्याचा भाजीबाजार हे खूपच सेक्सी ठिकाण मुंबईत आहे.

अनेक वर्षे पाश्चिमात्य देशांमधील शेकडो लेखक, कलाकारांनी त्यांचे एकट्याने राहणायचे अनुभव नोंदवून ठेवले.स्वतःच्या रोजच्या सवयी, वैयक्तिक आवडीनिवडी स्वयपाक ह्याविषयी भरपूर लिहिले. मी लहान वयात युरोपमध्ये राहायला गेलो नसतो तर मला भारतात एकट्याने राहणे किती दुक्खाचे आणि जड गेले असते ? अवघड अजूनही जाते. पण आपले जगणे चुकीचे नाही अशी मला जी खात्री वाटते तशी खात्री मला कुठल्याही मराठी किंवा भारतीय पुस्तकाने किंवा सिनेमाने मोठा होताना दिली नाही. जी आत्ता मला अयान मुकर्जीचा ‘Wake up sid’ पाहून मिळाली. एकटे राहायचे असेल तरी रणबीर कपूर घरात येऊन जाऊन हवाच. नाहीतर कसली मजा? त्याने यावे ,पण जावे सुद्धा. राहू अजिबात नये. मला घरात कुणी असले कि लिहिताच येत नाही.

एकट्यामाणसाच्या आयुष्याचे अनुभव नोंदवून ठेवण्याची आपल्याकडे पद्धत नसावी. कारण आपली सर्व कला , आपले साहित्य, आपले जगणे आणि पर्यायाने आपला सर्व स्वयपाक हा सामाजिक भूमिकेचा आहे. घोळक्याचा आहे. आपल्या समाजासाठी एकटेपणा हि विकृती किंवा दुक्ख आहे म्हणून आपण त्याची सांस्कृतिक नोंद केलेली नाही.त्याच्या अनुभवाविषयी नीट मांडणी होवू दिलेली नाही. दुर्गा भागवत हा एक मोठा अपवाद . जगण्याचे आणि त्याच्या विविध रसांचे जे चित्ररूप देखणे लिखाण दुर्गा भागवत करू शकल्या त्याने मला नेहमी फार बळ मिळत राहिले आहे. संशोधनपर गंभीर साहित्य निर्माण करताना दुर्गाबाई आपसूक जेव्हा स्वयपाकाकडे वळतात तेव्हा घरात जणू गप्पा मारायला येऊन बसतात असे मला सारखे वाटत राहिले. त्या सोडता माझ्या आयुष्याची रचना मला भारताबाहेरच्या लेखकांनी करून दिली तशीच ती भारताबाहेरचे सिनेमे पाहून झाली. मुख्यतः भरपूर चांगले देशोदेशीच्या साहित्याचे वाचन करून झाली. भारतीय पाकसंस्कृती जगातल्या अतिशय प्रगत आणि सुधारित संस्कृतींपैकी एक अशी आहे. आपल्या जेवणाला , त्यामागच्या विचारला आणि सजावटीला तोड नाही .पण तरीही अजूनही आपली स्वयपाकाची भांडी , आपल्या स्वयपाकघराच्या वास्तुरचना , आपले मेन्यू ह्या सगळ्यात कधीही वैयक्तिक विचार केला जात नाही .किंबहुना तो करणे चुकीचे मानले जाते. असे होणे स्वाभाविक आहे कारण शांत आणि कार्यमग्न एकट्या जगण्याची आपल्या समाजाला पुरेशी ओळख नाही. नव्याने आकार घेणाऱ्या महानगरांमध्ये आता ह्याची नुकती सुरुवात होवू घातली आहे.

मी नुकते मुंबईत स्वतःचे घर विकत घेतले तेव्हा मोजकी छोटी भांडी आणली. पसारा कमी ठेवला. साठवणुकीचे कोणतेही डबे घरात येऊ दिले नाहीत. मी ठरवून माझे लहानपण आणि गोंगाट पुसून टाकायला निघालो. माझ्या लहानपणीच्या व्यवस्था , माझे शहर, मी मोठा होत असताना सतरा अठराव्या वर्षी त्या मराठी मिजासखोर पारंपारिक शहराने मला दिलेले दुक्ख आणि भोगायला लावलेला एकटेपणा हे सगळे मी स्वयपाकघराच्या माध्यमातून पुसून टाकले. आपल्याला पुढे जायचे असते तेव्हा सगळ्यात सोपे असते ते आपल्या लहानपणावर रागावणे. तुम्हाला जेव्हा एकट्याने उर्जा कमवायची असते तेव्हा ती तुम्हाला प्रेमातून नाही तर रागातूनच कमवावी लागते. मी स्वयपाकघरातून माझे सगळे लहानपण पुसून काढले तेव्हा मला मोकळे वाटू लागले. मी माझे स्वयपाकघर ज्या दिवशी लावले त्या दिवशी माझ्या अतिशय वेदनामय लहानपणाला समजून घेऊ शकलो. स्वयंपाकाने आणि घरकामाच्या सवयीने मला इतरांना समजून घेण्याची दृष्टी हळूहळू मिळत गेली. तसेच अनेक माणसांना आणि घटनांना माफ करण्याची दृष्टी नकळत स्वयंपाकामुळे मिळाली . असे कसे झाले ह्याचे विश्लेषण करणे फार सोपे नाही .पण स्वयपाक करणे हे एखादी आवडती स्पोर्ट्स activity करण्यासारखे आहे. टेनिस खेळणे, कुशलतेने पोहणे किंवा football खेळणे ह्यासारखे ते आहे. त्यातून जशी चांगल्या खेळाडूला जगण्याची उमज आणि जगाची समजूत येते तशी काही जणांना स्वयपाक करण्यातून येत असावी. वेळेची आखणी आणि संयम ह्या दोन गोष्टी तुम्हाला स्वयपाकघरात फार चांगल्या शिकायला मिळतात. सारखे झाकण उघडून बघायचे नाही हि समजूत आयुष्यात फार महत्वाची असते. तसेच अपयश पचवायची सवय तुम्हाला स्वयपाक करताना लागते.मी बनवलेले नेहमी सगळे चांगलेच होत नाही.रोज गोष्टी फसतात. पोळ्या तर मी फारच वाईट बनवतो.त्या बाबतीत मी अगदी सातत्य टिकवून आहे.

माझे ज्या व्यक्तींवर प्रेम आहे त्यांना हाताने करून खाऊ घालायला मला फार आवडते. माझ्या ह्या तरंगत्या स्वयपाकघरात सतत संगीत वाजत असते. मी हल्ली स्वयपाक करताना Jazz ऐकतो. मी घरात लिहित असतो तेव्हा लिहून हात दुखू लागले कि मी नकळत स्वयपाकघरात जातो , इंटरनेट वर एखादी रेसिपी पाहतो आणि विचार करत करत भाज्या चिरायला,कांदे सोलायला घेतो. विजय तेंडुलकर मला नेहमी सांगायचे कि लिहिणे म्हणजे लिहून काढणे नाही .The act of writing हे आपल्या मनात सतत चालू असते. आपण टेबलापाशी प्रत्यक्ष लिहितो तेव्हा फक्त उतरवून काढत असतो. मला त्यांचे म्हणणे पटते .मी स्वयपाक करताना बहुतांशी लिखाण मनामध्ये आपोआप करत असतो. डोसा करून खाताना मात्र नेहमी असे हळहळत वाटते कि घरात कुणीतरी दुसरे माणूस असायला हवे. एकट्याने डोसा करून तो खात बसणे फार कंटाळ्याचे होते. मग मी पुण्याच्या घरी किंवा इतर कुणाकडे गेलो आणि कुणी मला काय करू तुझ्यासाठी? असे विचारले तर मग जे पदार्थ तव्यावरून पानात थेट येत राहण्यात मजा आहे असे पदार्थ मी त्यांना करायला सांगतो. आंबोळ्या,डोसे, धपाटे आणि धिरडी.

मी मुलगा असून कसे सगळे घरातले करतो ह्याचे कुणी कौतुक केले तर ते माझ्यापर्यंत आत पोचत नाही. मला असल्या मध्यमवर्गीय मानसिकततेच्या कौतुकांचा फार कंटाळा येतो. मी नीट स्वयपाकघर चालवून काही वेगळे करतो आहे असे मला वाटत नाही. कारण ज्या क्षणी मला घर चालवायचा कंटाळा येतो त्या क्षणी मी डोक्यातले ते बटण बंद करून निवांत बाहेरच्या खाण्यावर जगतो. होस्टेल मध्ये राहणाऱ्या मुलांसारखा चार दिवस आळशीपणा करतो. ZOMATO वरून सारखे घरी जेवण मागवतो. मला काही काळ असे करण्यात काही वावगे वाटत नाही.

आता माझी, एक रात्री खूप उशिरा करून खायच्या एका आवडीच्या पदार्थाची रेसिपी . रात्री उशिरा गादीवर लोळत पुस्तक वाचता वाचता.

एका काचेच्या भांड्यात ओट्स घ्या. ते संपूर्ण बुडतील एव्हढे दूध घाला. त्यात वरून दालचिनी पावडर आणि ड्रिंकिंग चोकलेट पावडर घाला. मायक्रोवेव्ह मध्ये २ मिनिटे शिजवून घ्या . बाहेर काढून एक चमचा मध घालून ढवळून घ्या आणि हळू हळू पुस्तक वाचत मिटक्या मारत खात राहा.

 

सचिन कुंडलकर

 

IMG_1960

 

 

 

 

अपेयपान . लोकमत मधील लेखमाला . भाग ४६ ते ४९ ( शेवट )

अपेयपान ४६

आपला चित्रपट तयार होवून प्रसिद्ध होणार असतो त्याआधी त्या चित्रपटाशी संबंधित एक तापदायक दिवस  चित्रपटाच्या सर्वच्या सर्व टीम ला भोगावा लागतो तो म्हणजे सेन्सॉर चा दिवस. चित्रपटाला प्रसिद्धीपूर्व जे सर्टिफिकेट मिळवावे लागते तो मिळण्यासाठी तुमचा चित्रपट एका कमिटीला दाखवावा लागतो. ती कमिटी सरकारी वारा ज्या दिशेला वाहत असतो त्या हुकुमानुसार त्या त्या वर्षी चित्रपटांच्या परीक्षणाचे आडाखे लावत आपल्या चित्रपटाची प्रतवारी करत बसलेली असते.

पूर्वी आमच्या पुण्यात मला असे एकदोन लोक माहिती होते जे अश्या कमिटीवर काम करीत. छोट्या गावात राहताना लहान वयात आपल्यात एक भाबडेपणा असतो . मला ते लोक फार महत्वाचे वाटत असत. म्हणजे सिनेमा बनवण्याचे जे एक भरीव काम आपल्या देशात चालते त्यात ह्यांचा काहीतरी उपयुक्त हातभार असणार असे मला वाटे.

मी स्वतः चित्रपट बनवायला लागल्यावर असल्या सरकारी भातुकलीच्या कमिट्या भूषविणाऱ्या माणसांचे खरे पाणी कालानुरूप आपसूक तुमच्यासमोर येऊ लागते तसे माझे झालेच.

तिथे सेन्सॉर वर बसून हि माणसे स्वतःचे डोके चालवून देशावर कोणत्याही प्रकारचे उपकार वगरे करत नसतात. ती सगळी वय वाढलेली आणि आता बाकी कुठे काही जमत नसलेली हरलेली फार दयनीय माणसे असतात. आपल्या देशात सांस्कृतिक कामांच्या यादीत अक्षरश: काहीही येऊ शकते. तशी काही फुटकळ सांस्कृतिक कामे ह्या लोकांनी केलेली असतात. सरकारदरबारी पुचाट ओळखी असतात . काही लोकांच्या मदतीची सरकारला परतफेड करायची असते. काही लोकांचे मंत्रालयात मागे लागलेले लचांड व्यग्र अधिकाऱ्यांना सोडवायचे असते. अश्या सगळ्या जुन्यापान्या आणि बंद पडायला आलेल्या मेंदूंची सोय अश्या ठिकाणी लावून त्यांची कटकट सांस्कृतिक खाते संपवत असावे.

मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा चित्रपटाच्या सेन्सॉर च्या दिवशी ह्या कमिटीसमोर मान खाली घालून उभा राहिलो आहे त्या कोणत्याही वेळी एकही ताजातवाना , तरुण , सतर्क , बुद्धिमान किंवा सेन्सॉर ज्या कारणासाठी अस्तित्त्वात आहे त्याचे कालानुरूप भान असलेला माणूस मला भेटलेला नाही. मला सिनेमातल्या लोकांपेक्षा त्या कमिटीचीच  दर वेळी दया येत राहते. निर्मात्याच्या पैशाने त्या दिवशी त्या लोकांचे खाणेपिणे होते. सरकार त्यांना ट्रेन चा किंवा प्रवासाचा खर्च देते. ड्रायविंग लायसन्स काढायला बाहेर पूर्वी असायचे तसे  सेन्सॉर ऑफिसच्या बाहेर अनेक दलाल उभे असतात जे आत जाऊन निर्मात्याची हवी ती कामे पैसे फेकले कि करून देतात. सरकारी नियंत्रण आले कि दलाल जन्माला आला हे भारतात वेगळे सांगायला नको. उतारवयात माणसाला स्वतः चे अस्तित्व टिकवून ठेवायला किती लाचार आणि निर्बुद्ध कामे करावी लागतात ह्या विचाराने मला भरून येते. पूर्वी मला निर्माते आणि दिग्दर्शकांची काळजी वाटायची. आता मला असल्या निरर्थक सेन्सॉर कमिट्यावर बसणाऱ्या माणसांची वाटते. त्या माणसांची आणि त्या सेन्सॉर कमिटीच्या अध्यक्षांची सुद्धा. किती घाणेरडे बोलतात त्या माणसाविषयी सगळेजण. तिथे बसून हे सगळे सहन कारायला गेंड्याची कातडीच हवी.

ह्या कमिटीला अंधारात बसून अतिशय सुमार सिनेमे सतत पाहायला लागतात हि ह्या कामाची सर्वात दयनीय बाजू आहे. ह्या कामापेक्षा मी सन्मानाने माझ्या शहरातले रस्ते झाडेन. ते जास्त उपयुक्त काम आहे. शिवाय त्यात खरे कष्ट करून पैसे मिळवल्याचा आनंद आहे. सिनेमा  झाडून काय मिळणार ? दर दिवशी मुंबईतल्या अनेक छोट्या सिनेमाघरात बसून हे बुवे आणि बाया शेकडो सिनेमांचा फडशा पाडत असतात. किती भयंकर यातना होत असतील त्यांना ? हिंदी इंग्रजी आणि प्रादेशिक सिनेमांच्या कमिट्या वेगळ्या असतात. हिंदीचे एकवेळ ठीक आहे. पण मराठीत जे सिनेमाच्या नावाखाली रोज त्यांना बघायला लागत असेल ते पाहून त्या बायांना साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार करावा असे मला वाटते.

ह्या कमिट्यावर जास्त बायका असतात हे मी बारकाईने  संशोधन केले आहे. त्या बहुदा चित्रपट पाहताना स्वेटर विणत असाव्यात किंवा चक्क डुलकी काढत असाव्यात असे मला वाटत राहते. किंवा दार बंद करून सई ताम्हणकर किंवा धाकट्या सोनाली कुलकर्णीचे कपडे कुठून शिवून मिळतात ह्यावर चर्चा करीत असाव्यात. महत्वाची माहिती हि कि सेन्सोरचे गंभीर देशप्रेमी आणि समाज हितावह काम चालू असताना दरवाजे बंद असतात. पोटच्या  पोराचे ऑपरेशन चालू असताना आई बाप जसे सुतकी चेहऱ्याने बाहेर उभे असतात तसे निर्माता आणि दिग्दर्शक त्या बंद दाराबाहेर उभे राहून नखे खात असतात. बंधूभगिनींची फिल्म पाहून झाली कि ते त्यावर चर्चा कारतात. मग महाद्वार उघडते आणि दिग्दर्शकाला आत पाचारण केले जाते. मग त्याच्या पापांचा पाढा वाचून दाखवला जातो.

एका दिवशी तीन मराठी सिनेमे सलग पाहून दाखवा. तुमची काय अवस्था होयील? आपण एक अनावश्यक आणि जुनाट पद्धतीचे काम करत आहोत. सगळे जग आपल्यावर रागावून आहे. आपण एखादे उत्तान प्रणयदृश्य कापले तरी नंतर लहान लहान मुले ते internet वर बघणारच आहेत हि भावना ह्या माणसांना नसेल?  आपण निर्बुद्ध आणि निरर्थक काम करीत आहोत हे लहान मुलांना  सुद्धा कळते ह्या विचारांनी त्यांची झोप उडत नसेल ? असे असूनही देशासाठी आणि आपल्या भूमीतील संस्कार टिकवून ठेवावेत म्हणून ते सेन्सॉरबंधू आणि त्या सेन्सॉरभगिनी घरदार वाऱ्यावर सोडून अंधारात बसून समोरच्या पडद्यावर दिसणारे नको नको ते पाहत असतात. समाजाला विष पचवायला लागू नये म्हणून त्या विषाचे घोट आधी स्वतः घेत असतात. चुंबने , बलात्कार , शिव्या , हिंसा रक्त सिगरेटी ह्या सगळ्या अनुभवातून स्वतः जाऊन जिथे तीथे कात्री लावून मग ते विष विरहित चित्रपट आपल्यासमोर येतात. ते ह्या बंधू आणि भगिनींच्या कामामुळे. त्यांना माझा त्रीवारच काय पण शंभर वेळा  सलाम.

इतके विष पचवून हि माणसे घरी जाऊन कशी वागत असतील हा मला प्रश्न पडतो. ह्यांच्या घरची मुले porn कसे आणि कुठे पाहत असतील ? ह्यांच्या बायकांना हे बंधू चुंबन देत असतील का? ह्यांना प्रणय करून मुले जन्माला  घालताना खूप अपराधी आणि अगदी A वाटत असेल का ? आपल्या नवरा पावसात कधी बहकला तर ह्या सेन्सॉरभगिनी त्याला नीती नियमांची नियमावली दाखवत असतील का ? ‘’नाही हं मी नाही बाई पदर ढळू देणार. आमच्या नियमाच्या आड येते हो’’.

सेन्सॉर बंधू कधी रागावले तर आईमायीवरून शिव्या घालत असतील का ? मला एकदा ह्या सेन्सॉर बंधूंवर एक माहितीपट काढायचा आहे. मला त्यांची कुचंबणा आणि त्यांचे प्रश्न समाजासमोर मांडायचे आहेत. मला एक सेन्सॉर बंधू खाजगीत म्हणाले होते कि हल्ली ते बायकोने बनवलेल्या भाजीला सुद्धा A / U / UA अशी सर्टिफिकेट देतात. म्हणजे भाजी करताना तू समोर राहणाऱ्या बबन कडे पाहिलेस आणि कामुक हसलीस. आजची भाजी A. आमटी करताना तू शालीन हसत पदर सांभाळून फोडणी दिलीस. आजची आमटी U. आज धुणे धुताना तुझे साडीचोळी ओली झाली. आजचे धुणे A.

मी हैप्पी जर्नी हा सिनेमा केला तो खूप पूर्वी नाही. म्हणजे ह्याच दशकात केला. त्याचे सेन्सॉर स्क्रीनिंग संपल्यावर मला आत बोलावण्यात आले. आत गंभीर सुतकी चेहरे होते. त्यांनी सिनेमाला  U/ A प्रमाण पत्र द्यायचे ठरवले होते. म्हणजे अठरा वर्षाखालील मुले असतील तर त्यांनी एकटे न जाता आईवडिलासोबत जावे. मला त्यांचा निर्णय मान्यच होता. कारण एकतर अठरा वर्षाखालील मराठी मुले video गेम्स खेळतात. मराठी सिनेमा बघायला कोण मरायला जायील त्या वयात ? त्यामुळे मी हो म्हणालो. एक बाई मला म्हणाल्या कि तुमच्या सिनेमात बहिणीसाठी ब्रा आणायला भाऊ दुकानात जातो. असा प्रसंग तुम्ही का ठेवलात ? मी म्हणालो कि त्यात काय वाईट आहे ? बहिण जिवंत नाही . ती भूत आहे. तिला आपापले ब्रा आणायला दुकानात जाता  येत नाही म्हणून ती भावाला पाठवते. त्यावर त्या म्हणाल्या कि बरोबर आहे तुमचे , पण अहो न , हिंदी सिनेमात  ब्रा वगरे सगळे ठीक वाटते. पण मराठी संस्कृतीत ब्रा वगरे दाखवणे बसत नाही न , म्हणून मला आपले तुम्हाला सांगावेसे वाटले. आपल्या मराठी संस्कृतीचे आपणच रक्षण नको का करायला ?

मला त्या भगिनीचा गोड गोड पापा घेऊन तिला एक मराठी संत्र्याची गोळी देऊन राणीच्या बागेत वाघोबा बघायला पाठवावे असे वाटले.

 

IMG_2142

अपेयपान ४७

माझ्या कुटुंबातील काही माणसे अचानक आखाती देशांमध्ये काम करायला निघून गेली. मी एकदा शाळेतून  परत आलो तर मला असे कळले कि माझा  एक मामा आणि एका मावशीचे यजमान फॉरेन ला जाणार आहेत. म्हणजे कुठे असे मी विचारले तर आमच्या शेजारी राहणारी एक मुलगी म्हणाली कि फॉरेन नावाचा एक देश असतो. तो आपल्या भारत देशापासून लांब आहे.

तोपर्यंत मला इतिहासाच्या पुस्तकात असलेले देश माहित होते जिथे गोरे राहत. गोरे आणि यवनी. गोरे ग्रेट ब्रिटन  मध्ये राहत. यवनी राहत ते देश मला माहित नव्हते. पण जगात भारत सोडून सगळीकडे गोरे आणि यवनी लोक असतात असे मला वाटायचे ह्यापैकी फॉरेन हा देश कुठे आहे हे मला कळेना. मला सिलसिला हा सिनेमा त्यातले काही कळत नसूनही फार आवडला होता कारण त्या सुंदर बागांमधून फिरणारे अमिताभ आणि रेखा. माझी इतर भावंडे जया च्या बाजूची होती पण मी एकटा रेखा ची बाजू घेऊन भांडत असे. ती मला म्हणत कि जया चा त्याग वगरे. पण मला आपली रेखा पहिल्यापासूनच आवडायची. साडी घालून घरी रडत बसणाऱ्या बायका मला तेव्हाही आवडत नसत. त्या तसल्या फुलांच्या बागा कुठे आहेत असे विचारले असता आमच्या शेजारचे काका म्हणाले कि त्या तश्या बागा लंडनला आहेत. लंडन कुठे आहे ? ते इंग्लंड ला आहे. आणि इंग्लंड युरोपात आहे. आमच्या पेठेत आत्मविश्वासाची कमी कधीच नव्हती. पैशाची असेल पण आत्मसन्मान हजरजबाबीपणा आणि बाणा ह्यात आम्ही गोऱ्या लोकांपेक्षा मागे नव्हतो. त्यामुळे मुलांनी काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरे ताबडतोब देऊन टाकणे एव्हडे एकमेव काम आमच्या आजूबाजूचे लोक तत्परतेने करीत. माझा मामा आणि मावशीचे यजमान फॉरेनला जाणार म्हटल्यावर मला माझ्या मामीची आणि मावशीची काळजी वाटू लागली होती. याचे कारण सिलसिला हा मी नुकताच पाहिलेला सिनेमा आणि वाट्टेल त्या गोष्टी वाट्टेल तिथून गोळा करून आणून एकमेकांना जोडायची माझ्या मनाला लागलेली तिखट आंबट सवय. फार लहानपणीच मला ती लागली.

घरचे मामा  आणि काका आखाती देशात कष्टाची कामे करायला गेले आहेत फुलबागामधून हिंडायला नाही हे माझे मन मान्यच करत नव्हते. कारण मला फिक्शन फार आवडे. अगदी लहान असल्यापासून मनाला स्टोर्या लागत. मग मी त्यात माझे रंग भरत कुणालाही त्रास न देता घरात पुस्तक वाचत किंवा कागदावर काहीतर गिरगीटत पडून राही. मला फिल्मफेयर वाचता यायला लागेपर्यंत मीच माझे घरगुती फिल्मफेयर लिहित असे.

अचानक एकदा एका उन्हाळ्यात ते फॉरेन ला गेलेले काका आणि माझा मामा परत आले. येताना त्यांनी काय काय भन्नाट गोष्टी आणल्या होत्या. माझ्या भावंडांसाठी कपडे , एका  भावासाठी छोट्या कार ची मॉडेल , सुंदर दिसणारे डिनर सेट असे काय काय. तिथे मिळणारे चकाकते शर्टचे कापड. आणि भरपूर सुकामेवा. आणि सोबत दोन टू इन वन प्लेयर आणि पिशवीभरून कॅसेट्स . आणि सगळ्याच्या सगळ्या डिस्को च्या. त्या काळात हिंदी सिनेमात वाजत असलेले डिस्को.

१९८० च्या काळ आमच्या आजूबाजूला फक्त डिस्को वाजत होते. ते इतके गाजत होते कि आमच्या गावात सर्व प्रकारच्या पाश्चिमात्य सांगितला डिस्को असे नाव दिले जाई. ह्या डिस्को म्युझिकने माझे बालपण व्यापून टाकले होते.

मी मामाने आणलेल्या कॅसेट्स मधून नाझिया आणि झोएब हसन ह्या भावंडांच्या डिस्को पॉप संगीताच्या कॅसेट्स लाखभर वेळा ऐकल्या. मला तेव्हा इंग्लिश भाषा कळत नसे आणि त्यामुळे पाश्चिमात्य संगीतातली गाणी कळत नसत.अ आमच्या घराखाली रिगल नावाचे पुण्यातील प्रसिद्ध जुने इराणी हॉटेल होते. तिथे जुन्या पद्धतीचा ज्यूकबॉक्स होता ज्यावर नेहमी एल्विस प्रिस्लेची गाणी वाजत असत. मला ती गाणी बेफाम आवडायची. पण भाषा कळत नसे. नाझिया आणि झोएब हसन ने माझी हि उलझन सोडवली कारण ते उर्दूत गात होते. त्या बिट्स डिस्को च्या होत्या. मी खल्लास होवून त्यांच्या प्रेमात पडलो.

मग एखादा झंझावात यावा तसे डिस्कोने आम्हाला वेढून टाकले. ८० सालातले ते सुरुवातीचे डिस्को म्युझिक , ज्याला आता लोक खेळकरपणे चेष्टेने हसतात ते माझे आयुष्य बनून गेले होते. त्या संगीताने मला खूप उर्जा आणि रंग दिले आणि माझ्या मनातील कथांना ताल मिळाला. ऋषी कपूर आणि मिथुन चक्रवर्ती ह्या दोन नटांनी मग हिंदी सिनेमात ह्या संगीताचे सोने केले. त्या दहाही वर्षांमध्ये एकपेक्षा एक वाईट सिनेमे आले पण गाणी कधीच वाईट नव्हती.

सिनेमात ऋषी कपूर नाचताना त्याच्या पायाखालच्या जमिनीवर दिवा लागायचा. तो पाय ठेवेल तिथे दिवा लागे त्याने पाय उचलला कि दिवा बंद होई. मी पाचवीत होतो . मी ह्या जादूने भारावून गेलो होतो. मला त्या कर्ज सिनेमातले पुनर्जन्म वगरे कसले काही पडले नव्हते. मी गाणी बघायला भुकेला झालो होतो. अफाट उर्जेची डिस्को बीट ची गाणी.

आमचे शहर कोणत्याही नव्या ऊर्जेकडे नाराजीने बघणारे होते. जुने ते सोने म्हणत लवकर झोपणारे. आमच्या सारसबागेत रेखा असती तरी तिला घेऊन फिरता आले नसते . कारण बागेत मधेच मंदिर होते आणि ओळखीचे लोक सतत दर्शनाला येत. मनात एक आणि बाहेर एक अशी दोन शहरे वसायला माझी ह्या काळात सुरुवात झाली ज्याला ह्या सोप्या तालाच्या अफाट उर्जा देणाऱ्या डिस्को संगीताने लहानपणी खूप मदत केली.

हिंदी सिनेमात व्हाम्प नावाच्या उग्र बायका असत ज्या डिस्को वर नाचत. कमी कपडे घालत. मला त्या मुख्य नायिकांपेक्षा आवडू लागल्या. उषा उत्थप ह्या गायिकेच्या मी प्रेमात पडलो. खर्जातला आवाज. जेम्स बॉन्ड् च्या सिनेमातल्या गाण्यात असतो तसा.  मला गोड मंजुळ आवाज आणि त्या आवाजात गायलेली पादरट गाणी आवडेना झाली. नाझिया आणि झोएब ह्या भावंडांनी मला त्यानंतर माझ्या आयुष्यात येणाऱ्या मडोना साठी कपडे घालून भांग पाडून तयार केले. मला आता उंच रंगीत फुलांच्या बागेत फिरायचे नव्हते. मला त्या दिवे लागणाऱ्या आणि विझणारया डान्स फ्लोअर वर माझ्या आयुष्याची गोष्ट लोकांना ओरडून सांगत रंपाट नाचायचे होते.

नाझिया हसन अचानक गेली. आजारी होती. खूप तरुणपणी गाता गाता गेली. आणि मग ते भाऊ बहिण एकत्र गायचे ते गाणे संपले. दोन वर्षांपूर्वी मी एका मैत्रिणीसोबत मुबईत जेवत असताना तिला झोएबचा लंडनहून फोन आला . त्याला नाझिया च्या आयुष्यावर सिनेमा बनवायचा आहे आणि तो मुंबईत येणार होता. मी तिच्या हातातून फोन खेचून घेतला आणि त्याच्याशी बोललो तेव्हा मला मी कोपऱ्यात सारून ठेवलेलं माझं अख्खं च्या अख्खं बालपण पुन्हा सापडलं. अचानक  झाडताना कॉटखाली सापडाव तसं.

मी शोधत निघालो तशी दिवे लागणारी आणि विझणारी जमीन मला आयुष्यात कधी सापडली नाही.अजूनतरी नाही. आता ह्यापुढे सापडेल असे वाटत नाही कारण आपण स्वतः खूप सिनेमे  बनवले कि मग सिनेमात असणाऱ्या जगाविषयीचा आपला भाबडेपणा कमी होत जातो. कुणाच्याही खांद्यावर मान न टाकता किंवा कुणालाही कुशीत न घेता मी त्या फॉरेनच्या  उंच रंगीत फुलांच्या बागांमधून एकटा सिगरेटी ओढत भरपूर फिरलो. त्या बागा लंडनला नाहीत हे परत येऊन सांगायला माझे जुने शहर उरले नाही. कोणत्याही बॉम्बस्फोटाशिवायच ते शहर स्वतः च्या कर्मानेच जुनाट बनून  काळाच्या उदरात विरून गेले. माझ्या मामाने काकांनी आखाती देशात जाऊन राबराब राबून केलेले कष्ट मला लक्षात आले. आपल्या कुटुंबाची धाव आणि वेग समजून घेता आला आणि फार बरे वाटले कि ह्या सगळ्यात आपल्याला आपल्या कुटुंबाने हवे ते संगीत ऐकू दिले , जोरात वाजवू दिले आणि खोल्यांची दारे बंद करून जोरात गाणी लावून आत नाचताना कधी माझ्या मोकळ्या साध्या माणसांनी उगाच दार वाजवले नाही .

 

IMG_1893

अपेयपान ४८

अतिशय लहानपणापासून ज्या एका तात्विक मूल्याची पुण्यासारख्या शांत संपन्न आणि सुशिक्षित शहरात राहून मला सवय आणि गोडी लागली ते मूल्य म्हणजे खाजगीपणा. ज्याला इंग्रजीत Privacy ( प्रायव्हसी ) असे म्हणतात .

माझ्या आयुष्यात मी माझा खाजगीपणा जपण्याला आवर्जून महत्व देत गेलो ज्यामुळे माझी आवडती कामे मला हवी  तशी करता आली आणि माझे आयुष्य नक्की मला हवे आहे तसेच  बांधता आले.

खाजगीपणा हा भौतिक आणि मानसिक दोन्ही बाबतीतला. मी खूपच लहान असताना मला हे जाणवत होते कि मला गर्दी आणि गोंगाटाचा कंटाळा आहे. असा गोंगाट जो घरातील माणसे अनावश्यक कारणे  काढून सतत एकमेकांसमोर येऊन करतात. मला जाणीव यायला लागली तेव्हापासून सामूहिक जगण्याचा तीटकारा येऊ लागला होता . मी एकांतप्रिय मुलगा होतो . न सांगता अचानक उगवणारे पाहुणे , उगाच धार्मिक करणे काढून जेवाखायला घरी बोलावलेली त्याच त्याच माणसांची गर्दी , रस्त्यावरची गर्दी , अनावश्यक प्रश्न विचारून आपल्याला गोंधळात टाकणारे शेजारी पाजारी ह्या सगळ्यांपासून मला सतत लांब जावे वाटत असे. मी माणूसघाणा कधीही नव्हतो. उलट नेहमीच योग्य माणसांच्या सहवासाला भुकेलाच राहिलो . पण गर्दीपासून आणि कुणालाही उत्तर देण्याच्या बांधिलकीपासून पळत राहिलो.

माझे सुदैव हे कि आमचे घर पुरेसे मोठे होते आणि मी दहा वर्षाचा असताना मला माझी स्वतंत्र खोली मिळाली . मी स्केचपेनने त्या खोलीच्या भिंतीवर माझे नाव लिहिले होते. मी तेव्हापासून आग्रहाने माझे राहण्याचे आणि काम करण्याचे खाजगीपण जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आलो.

माझी हि वेगळे राहण्याची आणि गर्दीत न मिसळण्याची आवड अनेक लोकांना कळत नसे. मला अनेकदा अजूनही घरामध्ये आणि कुटुंबात ह्या सवयीबद्दल फारसे बरे बोलले जात नाही पण मी कधीच ह्या गोष्टीची फिकीर न करणारा माणूस असल्याने माझे आयुष्य बरेच शांततेत आणि माझ्या आवडत्या कामात गेले. लिहिण्याच्या आणि कथा निर्माण  करत राहण्याच्या माझ्या कामाला ह्या एकांताची आणि खाजगीपणाची फार मदत झाली. मी नुसता एकटा काही न करता बसून असलो तरी “एकटा बसून काय विचार करत बसला आहेस?” असले फालतू कौटुंबिक प्रश्न मला कधी कुणी विचारले नाहीत. मला माझ्या कुटुंबाने लहानपणीपासून हवे तसे असण्याची मुभा दिली. म्हणजे हवे तेव्हा आनंदी आणि हवे तेव्हा दुखी राहू दिले. त्यात ढवळाढवळ केली नाही हे त्यांनी माझ्यावर केलेले मोठे उपकारच म्हणायला हवेत. कारण भारतीय घरांमध्ये तरुण मुलांना साधे रडण्याचीसुद्धा सोय नसते. माझे मला कळू लागल्यावर मला आवडतील ती माणसे मी शांतपणे जोडली , जोपासली आणि ज्या माणसामध्ये जायचा कंटाळा येतो त्यांच्यात केवळ उपचार म्हणून कधीही गेलो नाही. कुटुंबाचे आणि समाजाचे कोणतेही बंधन मी ह्या बाबतील पाळले नाही.

शेजारी आणि नातेवाईक ह्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी लहान असल्यापासून खरी उत्तरे द्यायचे ठरवले असते तर ते सगळे बेशुद्ध पडून त्यांच्या तोंडाला फेस आला असता इतके चित्रविचित्र विचार आणि मते माझ्या मनात खूप लहानपणीपासून संचार करीत होती. मी ती खुबीने लपवली. लिखाणात उतरवली आणि आमच्या अनेक मट्ठ आणि पारंपारिक नातेवाईकांना ह्रिदयाचे झटके येण्यापासून वाचवले. मी  माझ्या आतमध्ये असलेल्या सर्व वैचित्र्याची  खाजगीत राहून कागदावर चित्रे काढली. घरात खूप गर्दी झाली कि मी अचानक माझ्या खोलीत येऊन दर लावून शांतपणे पाच मिनिटे बसत असे आणि मग पुन्हा बाहेर जात असे.

माझ्या घरीदारी शेजारीपाजारी  आणि भावंडांना मला आवडतात त्या गोष्टी कधीही आवडल्या नाहीत. तो सर्व वेगळी माणसे आहेत. हे मला कळू लागले होते. क्रिकेट , लग्ने आणि धार्मिक कार्यक्रम हे विषय सोडता आमच्या घराण्यात अजूनही कुणी इतर कोणत्याही गोष्टीवर बोलत नाही. त्यामुळे मला माझी वाट शोधून काढणे क्रमप्राप्त होते. मला लहानपणी स्वतंत्र खोली देऊन माझ्या आईवडिलांनी माझी फार चांगली बाजू घेतली आणि मला मदत केली. शिवाय मला खोलीला आतून कडी लावायची नेहमी मुभा होती. माझे कपाट उघडे असले तरी विचारल्याशिवाय कधीही माझ्या घरातल्या कुणीही ते उघडून पहिले नाही. स्वतंत्र राहण्याचे आणि आपला तसेच इतरांचा खाजगीपणा जपण्याचे शिक्षण माझ्या घरात मला मिळाले. हि गोष्ट त्यावेळी एका दहा बारा वर्षाच्या मुलाच्या बाबतीत होणे मराठी निम्नमध्यमवर्गीय घरात नवीन असल्याने आमची अनेक वेळा खिल्ली उडवली जात असे पण मी कधीच सदाशिवपेठी वातावरणातील भोचक आणि तर्कट माणसांना बधलो नसल्याने आम्ही सगळे लोकांचे बोलणे इकडून ऐकून तिकडून सोडून देत असू.

खाजगीपणा हे साधे आणि आवश्यक मूल्य लहान मुलांच्या काय पण अजूनही आजूबाजूच्या मोठ्या माणसांच्या बाबतीतही भारतीय कुटुंबांमध्ये पाळले जात नाही. मला ह्याचे फार वाईट वाटते. जुन्या ग्रामीण संस्कृतीत ह्या खाजगीपणाची सवय माणसांना नव्हती. पण अनेक वर्षे शहरात राहून , शहरात जन्मून आणि मोठे होवूनही आपल्याला माणसाचा खाजगीपणा जपण्याची सवय नसते.

आपल्या समाजात माणसे सतत सर्वत्र एकमेकांसमोर आणि एकमेकांना बांधील राहतात. खोटे उपचार म्हणून घोळके करून जगतात. कुणी कुणाला एकटे सोडत नाही. अनेक नवराबायको तर सिनेमाला आणि प्रवासाला सुद्धा एकमेकांशिवाय जात नाहीत. आपल्या  मनातल्या जगावेगळ्या आतल्या इच्छा चोरून , लपवून अपराधीपणे पूर्ण करतात. लोक आपल्याला पाहतील , लोक आपल्याला काय म्हणतील ह्या भीतीने साधे आवडते कपडेसुद्धा घालायची मुभा अनेक माणसांना नसते. भौतिक आणि सामाजिक पातळीवर खाजगीपणा पाळायची सवय नसली कि आपण माणसाचा मानसिक खाजगीपणासुद्धा पाळायला शिकत नाही. आपल्या अनेक मोठ्या शहरांमधील राहणारी माणसेसुद्धा  हि ह्या बाबतीत अगदी खेडूत असतात. दुसऱ्या माणसांच्या आयुष्यात नको  तेव्हढे लक्ष देणे. आपली पारंपारिक जुनी मूल्यव्यवस्था नव्या पिढीवर लादणे , त्यांनी काय शिकावे , काय खावे , कसे जगावे, कुणाशी लग्न करावे ह्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करणे हा सर्व खाजगीपणा जपण्याचे शिक्षण आपल्याला नसण्याचा भाग आहे. मी अनेक वेळा माणसांशी ह्यावर बोलायला जातो तेव्हा माणसे उसळून मला भारतीय कुटुंबव्यवस्था , माणसे एकमेकांशी जोडलेली असणे , वेळेला एकमेकांच्या मदतीला जाणे असली वायफळ लेक्चर देत बसतात. माणसांना एकमेकांवर प्रेम करायला आणि एकमेकांना वेळ पडली तर मदत करायला जगात कोणताही समाज थांबवत नाही. पण हे करण्यासाठी सगळ्यांनी सतत एकमेकांच्या पायात पाय अडकवून एकमेकांना अपंग करण्याची गरज नसते. भारतीय कुटुंबव्यवस्था हि अतिशय लवचिक आणि काळासोबत बदलणारी ताकदवान गोष्ट आहे. कुटुंबव्यवस्थेचा अर्थ कुटुंबाचा तुरुंग असा होत नाही.

माझ्या आजूबाजूची अनेक मराठी तरुण मुले बेचव आणि वयोवृद्ध झाल्यासारखी जगतात कारण ते खाजगीपणा जपायला शिकलेले नसतात. सतत आपण कुणालातरी उत्तर द्यायला बांधील आहोत ह्या भूमिकेत राहिल्याने हि मुले संकोचून राहतात. साधे स्वतःच्या करियरचे निर्णय त्यांनी कुटुंबातल्या लोकांचा विचार करून घेतलेले असतात. हि मुले हवे तेव्हा स्थलांतर करू शकत नाहीत, मोकळे प्रवास करू शकत नाहीत ह्याचे कारण त्यांचा स्वतःचा खाजगी वेळ आणि त्यांचे खाजगी आयुष्य ह्या गोष्टी त्यांच्या आईवडिलांनी ओळखलेल्या नसतात. तसे करणे काहीतरी अमेरिकन आणि चुकीचे आहे असा त्यांचा भ्रम झालेला असतो. त्यापेक्षा इतर भारतीय समाज हे मोकळे आणि स्थलांतरप्रिय असतात. त्यांच्याकडची मुले शिकायच्या किंवा नोकरी करायच्या निमित्ताने पटापट घरे सोडून मोकळी होतात आणि बाहेर फेकली जातात.

आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीला दिवसातला काही वेळ सुटा आणि एकट्याचा द्यायला येता हवा. कुणालाही घरामध्ये संपूर्ण एकटे असण्याची मुभा असायला हवी. अगदी लहानपणीपासून हि सवय असायला हवी. कुणीही कुणाच्याही निर्णयात एका मर्यादेपलीकडे हस्तक्षेप करू नये. माणसे मदत हवी असेल तेव्हा आवर्जून मागतात. कुटुंबात राहणे म्हणजे सतत दारे उघडी ठेवून सगळ्यांनी एकमेकांसमोर कपडे बदलणे हा होत नाही.

 

FullSizeRender (2)

अपेयपान ४९

चालू असलेले वर्ष संपताना मी लांबवर केरळमध्ये आहे. त्रिवेन्द्रम इथे चालू असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पाहायला आलो आहे. हा भारतातील अतिशय सुनियोजित असा चित्रपट महोत्सव . इथे चित्रपटांची निवड उत्तम असते. जगभरात ह्या वर्षी बनलेले चांगले सर्व चित्रपट इथे पाहता येतात त्याचप्रमाणे चांगल्या दिग्दर्शकांच्या कामांचे retrospectives इथे भरवले जातात. दरवर्षी चित्रपट क्षेत्रातील मोठ्या तज्ञांचे इथे चांगले व्याख्यान असते. मुंबई गोवा इथे भरणाऱ्या मोठ्या दिखावेबाज आणि कुणी कसले कपडे घातले आहेत ह्याची चर्चा करणाऱ्या ,हिंदी सिनेमाच्या तारकांवर अवलंबून असलेल्या महोत्सावांपेक्षा इथे येणे मला वर्षानुवर्षे फार आवडते. अनेक वेळा मी बनवलेली फिल्म इथे असते आणि ती नसली तरी मी प्रेक्षक म्हणून इथे येऊन जगभरातील चित्रपट बघणे पसंत करतो.

इथे चित्रपटावर प्रेम करणारा सामान्य माणूस आहे. हजारो विद्यार्थी , कामगार , सरकारी कर्मचारी , शिक्षक ह्या काळात संपूर्ण सुट्टी घेऊन इथे महोत्सवात चित्रपट पाहतात. त्यावर चर्चा करतात. करमणूक ह्या एकाच गोष्टीच्या पलीकडे जाऊन जगभरातील चांगल्या सिनेमाचा आस्वाद घेणारा सामान्य माणूस इथे आपल्याला सापडतो. गरीब श्रीमंत असले भेदभाव नसतात. अनेक वेळा मी ज्या रिक्षाने चित्रपट गृहात आलो त्या रिक्षाचा चालक माझ्यासमोरच्या रांगेत बसून चित्रपट पाहताना मला आढळला आहे. इथे चित्रपटाची निवड बारकाईने होते. त्यामुळे जगातील अनेक देशांमधून चित्रपट निवडणारे तज्ञ इथे हजेरी लावतात. भारतातील ह्या वर्षी बनलेल्या सर्वोत्तम चित्रपटांचा इथे खास विभाग असतो.

मी नुकताच बनवलेल्या चित्रपटाच्या कामामधून मोकळा होवून शांतपणे सुटी घेउन दिवसभर सिनेमे पाहतो आहे. एका प्रकारे नवे काही शिकतो आहे .जगात लोक करत असलेले नवे प्रयोग पाहतो. नव्या कथा अनुभवतो. गर्दीत उभा राहतो. रांग लावून सावकाश चित्रपटगृहात जाऊन बसतो. रिक्षातून अनोळखी माणसांशी गप्पा मारत फिरतो. एका दिवसात इतरांप्रमाणेच चार ते पाच चित्रपट पाहून होतात. एक चित्रपट पाहून झाला कि दुसरा पाहायला शहराच्या वेगळ्या भागात धावाधाव करत पोचतो . सर्व शहरातील माणसे ह्या काळात चित्रपट आणि त्याच्या अनुभवाने भारलेली असतात. काही वेळा एखादा ताकदवान चित्रपट पहिला कि त्याचा अंमल मनावर इतका गडद राहतो कि लगेच दुसरीकडे जाऊन वेगळा चित्रपट बघणे मनाला नकोसे होते. नुकत्याच घेतलेल्या चांगल्या अनुभवाच्या उबेत मनाला रेंगाळावेसे वाटते.

एरवीपेक्षा इथे मन शांत आणि मूक होते. दर काही तासांनी ताकदवान चित्रपट आपला ताबा घेतात आणि आपण करत असलेल्या कामाविषयी विचार करायला लावतात. आपल्या देशात आणि मुख्य आपल्या महाराष्ट्रात बनणाऱ्या चित्रपटांपेक्षा जगात सिनेमाचे तंत्र , सिनेमाची कथा कितीतरी पुढे गेली आहे आणि आपण अजूनही त्याचं त्या जुन्या नात्यागोत्यांच्या आणि लग्नाच्या प्रेमाच्या गोष्टी आवळून बसलो आहोत हे लक्षात आले कि फार दुर्दैवी वाटते. केरळ आणि तामिळनाडू मधील प्रेक्षक भूतकाळातून बाहेर पडून अनेक चांगल्या नव्या तरुण दिग्दर्शकांच्या प्रयोगांना दाद देतो हे पहिले कि महाराष्ट्रात असे कधी होणार असे वाटून जाते. इथला प्रेक्षक आपल्या भाषेतील फिल्म हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील चित्रपटापेक्षा आधी पाहतो . ह्याचे कारण तरुण माणसाचा विचार करून इथे दक्षिणेत सिनेमा बनतो. महाराष्ट्रात वयस्कर माणसांना जुन्यापान्या कथा आणि जुनी नाटके ह्यावर आधारित चित्रपट बघायची चटक लागली असल्याने तरुण माणसांना मराठी चित्रपट पहायचा कंटाळा येतो.

सुप्रीम कोर्टाने नुकत्याच केलेल्या हुकुमाने इथे वादळ पेटले आहे. सक्ती आणि देशप्रेम ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक चित्रपटाआधी राष्ट्रागीत वाजले कि उभे राहावे लागते. असे दिवसातून चार पाच वेळा देशभक्तीचे प्रदर्शन करावे लागते. काही विद्यार्थ्यांनी ह्याविरोधात बंड केले आणि ते उभे राहिले नाहीत. त्यांचे सांगणे हे होते कि असल्या देखाव्याने देशभक्तीचे खोटे प्रदर्शन करायची गरज नाही . इथे आपण चित्रपट पाहायला आलो आहोत . देशप्रेमाचे देखावे करायला नाही.  देशप्रेमाचे खोटे दिखावे करायला फेसबुक आहे. इथे तो त्रास कशाला ? जी मुले गाणे वाजल्यावर उभी राहिली नाहीत त्यांना पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकले आहे. दर वेळी गाणे लागले कि चड्डी वर करून उभे राहायचे असले पोकळ दिखावू  नियम करण्यात आणि ते पाळले जात आहेत कि नाहीत हे तपासण्यात देशाच्या कोर्ट आणि पोलीस यंत्रणेचा बराच वेळ यापुढे जाणार असे दिसते. हे सरकार असले अनेक गुदगुल्या चिमटे चापट्या स्वरूपाचे कायदे करून लोकांचे लक्ष वेगळ्याच चर्चेत गुंतवून ठेवून आतल्याआत वेगळी क्रीडा खेळणारे आहे असे दिसते.

दिवसातून पाच वेळा गाणे लागते आणि पाच वेळा आम्ही उभे राहतो कि नाही हे पाहायला पोलिसांचा फौजफाटा थेटर बाहेर उभा असतो. मी जन्मायच्या आधी आणीबाणी नावाची एक काही गोष्ट आली होती म्हणतात. तसे काही पुन्हा सुरु  होणारे कि काय असे वाटते आहे.

पाब्लो नेरुदा ह्या चिली देशातील प्रसिद्ध कवीच्या आयुष्यावरील चित्रपटाने माझ्या मनाची पकड घेतली आहे. गेले वर्षभर आपल्यावर कुणीतरी लक्ष्य ठेवून आहे हि भावना ह्या चित्रपटाने गडद केली आहे. आपण काय लिहितो काय वाचतोय , कसे सिनेमे काढतोय त्यावर नव्या सरकारचा एक डोळा आहे. आपण सतत कुणाच्यातरी देखरेखीखाली आहोत हि भावना अधिरेखीत केली जाणारे वातावरण गेल्या वर्षभरात तयार होते आहे.

पाब्लो नेरुदा च्या कवितांना घाबरून त्याला मारायला एका पोलीस अधिकार्याची नेमणूक केली गेली आहे. पण पाब्लो दर वेळी ह्या अधिकाऱ्याच्या हातावर तुरी देवून पळून जात आहे. त्याचे कुटुंबीय आणि त्याचे सहकारी त्याला तू देश सोडून पळून जा असे सांगत आहेत. पण पाब्लो त्याला तयार नाही . त्याचे त्याच्या देशावर प्रेम आहे . पण त्याच्या देशाच्या राष्ट्राध्याक्षाला पाब्लो आवडत नाही. त्याला पाब्लोची नाही तर त्याच्या कवितांची भीती वाटते कारण त्याच्या कविता प्रश्न विचारून लोकांना जागृत ठेवतात.

प्रत्येक वेळी पळून जाताना पोलीस अधिकाऱ्याला सापडेल अश्या ठिकाणी पाब्लो एक कवितेचे पुस्तक ठेवून जातो. काही काळाने ह्या धावपळीत आणि ताणात पाब्लोचे आणि पोलीस अधिकार्याचे एक अव्यक्त नाते तयार होत जाते. ते दोघे एकमेकांना कधीही न भेटता तयार होणारे हे नाते. लेखकाचे आणि वाचकाचे नाते. पाब्लो धाडसी खंबीर आहे. पोलीस अधिकारी त्याला ओळखू लागला आहे.

शिकारी आणि प्राणी ह्यांचे हे नाते. वाचक आणि लेखक ह्यांचे तेच नाते. शासक आणि कलाकार ह्यांचेही तेच नाते.

पाब्लो कविता करत राहतो. त्याच्या कविता पोस्टातून जगभर जातील अशी व्यवस्था करीत राहतो. अचानक रात्री अपरात्री पोलिसांची धाड पडत राहते. पाब्लो सटकत राहतो.

माझ्यासाठी बंदूक घेऊन फिरणाऱ्या माझ्या वाचका मी इथे आहे. पाब्लो दुरून कवितांमार्फत पोलीस अधिकार्याशी संवाद साधत राहतो. पोलीस अधिकारी आता पाब्लोला समजून घेऊ लागला आहे. पण त्याला पाब्लो हवा आहे कारण पाब्लोला मारणे  हे देशभक्तीचे एक महत्वाचे साधन होवून बसले आहे. देशभक्ती नुसती असून चालत नाही. ती वारंवार सिद्ध करावी लागते. देश्प्रमुखाच्या समोर आपल्या देश्भक्तीचे पुरावे सतत सादर करावे लागतात.

अखेरीस पाब्लोच्या कवितेचे चाहते पाब्लोला वाचवतात आणि त्याच्या मागावर आलेल्या पोलिसाचा बर्फाळ प्रदेशात खून करतात. चित्रपटाच्या शेवटी पाब्लो आपल्या शिकाऱ्यासमोर येतो. तोवर न भेटताही त्या दोघांचे नाते कवितेतून प्रगाढ झालेले असते. ते जवळजवळ एकरूप झालेले असतात. वाचक आणि कवी. शासक आणि कवी. पाब्लो अतिशय हळुवारपणे पोलीस अधिकार्याचा निरोप घेतो. त्याच्या प्रेताचे डोळे मिटवतो.

लेखक आणि वाचक ह्यांच्या नात्याची हि गोष्ट. शासक कधीही वाचक नसतो. तो न वाचताच लेखकाची आणि कलाकाराची शिकार करतो. पण शासक जर वाचक झाला तर लेखकाला मारून टाकणे मूर्खपणाचे आहे हे त्याच्या लक्षात येते.

लेखक आणि वाचक ह्यांचे नाते कायमचे बांधले गेलेले आहे. लेखक त्या जागेवरून पळून गेला तरी त्याने वाचकासाठी तिथे एक कविता मागे सोडली आहे. ती शोधा.

kundalkar@gmail.com

 

 

 

अपेयपान . लोकमतमधील लेखमाला भाग ४१ ते ४५

अपेयपान ४१

मी ज्या नटांसोबत चित्रपट बनवताना एकत्र काम केले त्यापैकी हे दोन नट त्यांच्या विशेष गुणांमुळे माझ्या मनात कायम महत्वाचे राहतील. ते नट आहेत अतुल कुलकर्णी आणि राणी मुकर्जी. आणि त्या दोघांमध्ये असलेले महत्वाचे गुण म्हणजे कामातला चोखपणा (परफेक्शन) आणि वेळेची शिस्त. ते दोघेही अतिशय ताकदवान अभिनेते आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत , असे असले तरी , किंबहुना त्यामुळेच कि काय ते जेव्हा एखादी फिल्म निवडतात तेव्हा ते चित्रपटाच्या दिग्दर्शकाला संपूर्ण सोबत देतात. ह्याचा परिणाम असा कि तुमची काम करण्याची ताकद वाढते.
सिनेमा बनवणे हि अत्यंत गुंतागुंतीची आणि किचकट प्रक्रिया असते. शिवाय ती अतिशय महागडी कला आहे. सिनेमाचे शूटिंग करणे, तो चित्रपट पूर्ण करून योग्य वेळी , योग्य पद्द्धतिने प्रेक्षकांसमोर घेऊन जाणे हे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारासाठी अतिशय कष्टाचे काम ठरते.
अतुल कुलकर्णी चित्रपटाची निवड करताना अतिशय काळजीपूर्वक करतो. एखादा चित्रपट स्वीकारताना कथा आवडली तरी त्या दिग्दर्शकाला आपण वेळेची पूर्ण बांधिलकी देऊ शकणार आहोत ना? ह्यावर तो खात्रीशीर विचार करतो . एकाच वेळी खूप काम करत नाही , त्यामुळे चित्रपटाच्या तयारीपासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत तो निर्माता आणि दिग्दर्शकासोबत उभा राहतो. मी happy journey ह्या चित्रपटाची पटकथा त्याच्याकडे वाचायला घेऊन गेलो. त्याने पटकथेच्या रचनेत अनेक मोलाचे बदल सुचवले. निरंजन चे पात्र साकारण्यासाठी त्याने व्यवस्थित व्यायाम सुरु केला , त्याच्या भूमिकेसाठी त्याच्या पोशाखात आणि केशभूषेत बदल करणे आम्हाला आवश्यक वाटत होते. त्याने काही महिने आधी सवय होण्यासाठी वेगळे कपडे, बूट वापरून पाहायला सुरुवात केली. त्याचा मला अतिशय आवडणारा गुण म्हणजे तो हे सगळे कोणताही गवगवा न करता फार शांतपणे आणि एखाद्या नव्या विद्यार्थ्याप्रमाणे उत्कंठतेने करतो. त्याला भूमिका साकारताना मिळणार्या आनंदाइतकाच भूमिकेची तयारी करण्याचा आनंद खूप महत्वाचा असतो. प्रिया बापट ह्या त्याच्या सहकलाकारासोबत त्याने पटकथेची वाचने केली. सगळ्यांना अतिशय अगत्याने आपल्या मुंबई जवळील शेतावरच्या सुंदर घरी घेऊन गेला आणि तिथे एकत्र राहून सर्व कलाकारांना आणि तंत्रद्यांना चित्रपटाची तयारी करण्यासाठी एक छोटे workshop आयोजित केले . अतुलसाठी चित्रपट म्हणजे फक्त त्याचे शूटिंग असे नसते. तो चित्रपटसंस्कृतीत मुरलेला नट आहे. शूटिंगच्या अलीकडे आणि पलीकडे अनेक प्रक्रिया घडतात ज्यात चित्रपट आकार घेत असतो हे त्याला कळते. त्यामुळे त्याच्यासोबत दिग्दर्शक म्हणून काम करताना तुम्हाला नवी उर्जा सतत मिळत राहते. तो सर्व वेळी सतत सूचना करत असतो आणि बदल सुचवत असतो. असे असले तरी दिग्दर्शकाचा शब्द शेवटचा आहे हे मानण्याची त्याची नेहमी तयारी असते. त्याचे वाचन चौफेर असते. मी ज्या सर्व कलाकारांसोबत कामे करत आलो त्यात अतुल माझ्यासाठी महत्वाचा आहे कारण त्याच्यात एक अतिशय लहान मूल दडलेले आहे. ते लहान मूल अतिशय हट्टी आणि आग्रही आहे. शिवाय ते थोडे रागीटसुद्धा आहे. भांडकुदळ अजिबात नाही. त्याचा उत्साह सेटवर इतरांना खूप उर्जा देत राहतो. तो काम करताना माझ्यावर रोज रागावतो आणि रोज तो राग विसरतो. दररोज शूटिंग संपले कि सर्व कलाकारांना आणि तंत्रद्यांना तो गाडीत घालून कुठेतरी मस्त जेवायला घेऊन जातो. कोणताही शॉट कितीही वेळा पुन्हा करून पाहतो. एकदाही कामाचा कंटाळा करत नाही.प्रत्येक शॉट मनासारखा मिळावा म्हणून अतिशय कष्ट घेतो. सोबतच्या सहलाकाकारांची तो फार प्रेमाने काळजी घेतो. एकदा आम्ही त्याच्यासोबत प्रचंड थंडीत पहाटे तीन वाजेपर्यंत काम करत होतो तेव्हा त्याने स्वतः मोठी शेकोटी पेटवली होती आणि युनिट मधल्या सर्वांना तो तिथे बोलावून उत्साह देत होता. त्याने भारतातील अनेक भाषातील चित्रपटात काम केले आहे. अनेक वेळा नव्या ठिकाणी जाऊन तो नवी फिल्म करून आला कि तो आवर्जून सगळ्यांना त्या चांगल्या अनुभवाबद्दल सांगतो. दोन सिनेमांच्या मध्ये तो देशभर आणि जगभर मोकळे प्रवास करतो आणि अनेक गोष्टी पाहून शिकून परत येतो. अतुलसोबत चित्रपट करून संपला कि आणि आपण पुन्हा वेगळ्या माणसांकडे वळलो कि आपल्याला लक्षात येते कि अतुलची किती महत्वाची सोबत आपल्याला होती. ह्याचे कारण ह्या माणसाची व्यावसायिक जाणीव आणि उर्जा आणि त्याला असलेले भान आणि ज्ञान हे पंचविशीच्या माणसाइतके शार्प आणि ताजे आहे.
राणी मुकर्जीने अनुराग कश्यपच्या सांगण्यावरून माझा ‘गंध’ हा चित्रपट पहिला आणि मला घरी चहा साठी बोलावले. तिला गंध अतिशय आवडला होता. आमच्या पहिल्या भेटीपासून ते आमचा ‘अय्या’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या साडेतीन वर्षांच्या काळात त्या मुलीने सळसळत्या उत्साहाने मला भारून टाकले होते. त्या काळात एकदाही माझ्या आयुष्यात कंटाळ्याचा क्षण नव्हता. तो तिचा खास गुण आहे. ती आजूबाजूच्या माणसांना अतिशय सरळ सोप्या थेट संभाषणाने मोकळे वागवते.
राणीने मला चित्रपटाला होकार द्यायला काही महिने घेतले. मला त्या काळात असे वाटत राहिले कि ती बहुदा माझा चित्रपट करणार नाही. एकदा माझ्यासोबत बसून तिने मला चित्रपट निवडताना नुसते कलात्मक निकष लावून चालत नाहीत , तिला अजूनही काही गोष्टींची निर्मात्याकडून खात्री करून घ्यावी लागते हे समजावले . ती काम करत असेल तर तो चित्रपट एका विशिष्ठ प्रकारे देशभर आणि जगातील बारा तेरा देशांमध्ये प्रदर्शित होतो. ते करण्याची निर्मात्याची ताकद आहे का ह्याची तो खात्री करून घेत होती. एकदा चित्रपाटला होकार दिल्यावर मात्र ती अतिशय शिस्तीने आणि गांभीर्याने भूमिकेची तयारी करू लागली. तिने मराठी माणसे हिंदी बोलतात त्याचा विशिष्ट हेल शिकून घेतला. अमृता सुभाषला तिने घरी बोलावून तिच्या आवाजात हिंदी संवाद रेकोर्ड करून घेतले म्हणजे तिला मराठी चाल अंगीकारणे सोपे जाईल. पृथ्वीराज सुकुमारन हा मल्याळी नट आणि सुबोध भावे हा मराठी नट हे तिचे सहकलाकार असणार होते. तिने त्या दोघांना भेटण्याआधी त्यांचे चित्रपट पहिले. त्या दोघांना आपापल्या राज्यात चित्रपट क्षेत्रात मानाचे स्थान आहे हे ओळखून ती त्यांच्याशी अतिशय सोपेपणाने आणि मैत्रीने वागली. राणीचा स्वभाव फार वेगळा आहे. ती नुसती रागीट नाही तर पुरेशी भांडकुदळ आहे . ती समोरच्याला मनातले सगळे बोलून मोकळी होते. तिने फार कष्टाने तिची जागा तयार केली असल्याने तीला आपल्या प्रत्येक निर्णयाच्या परिणामाची अचूक जाण असते.
आपल्यामुळे इतर कलाकारांना आणि युनिटमधील नव्या तंत्राद्यांना बिचकायला होवू नये म्हणून तिने शूटिंगपूर्वी सगळ्यांना स्क्रिप्ट वाचनाच्या एका workshop ला एकत्र बोलावले. त्या दिवशी मोठे जेवण आयोजित केले.
सेटवर तिच्यासोबत काम करणे अजिबात सोपे नसते. ती सेटवर असली कि सेटवर आग लागल्यासारखे वातावरण असते. पण एकदा का कॅमेरा on झाला कि राणी रंग बदलते. तिचे डोळे एका क्षणात बदलतात आणि ती पटकन भूमिकेत शिरते. कामाविषयी आणि वेळेविषयी ती कमालीची शिस्त पाळते. एकही दिवशी ती उशिरा आल्याचे मला आठवत नाही. तिच्यासोबत काम करताना एकही दिवस मला कंटाळा आला नाही . तिने तो येउच दिला नाही.
शूटिंग संपले तरी ती सर्व टीमसोबत वर्षभर काम करत होती. चित्रपटाच्या गाण्यांच्या रेकोर्डिंगला हजर असायची , editing बारकाइने पहायची , पोस्टर तयार करताना , ट्रेलर बनवताना रात्रभर जागून सर्व टीमसोबत राहायची. तिच्यात अपरिमित उत्साह आणि आणि कमालीची ताकद आहे. तिच्यासोबत काम करून आता चारेक वर्ष झाली असतील , मला तिच्या इतकी उर्जा, प्रामाणिकपणा आणि अभिनयाची समजूत असलेली माणसे फार भेटलेली नाहीत.
मी असे का ह्याचा विचार करतो तेव्हा मला हे लक्षात येते कि हि माणसे काळासोबत बदलण्याची फार मोठी ताकद घेऊन जन्माला आलेली असतात. ती त्यांचाकडून शिकण्यासारखी फार मोठी गोष्ट आहे. शिवाय व्यावसायिक सुरक्षिततेतून हि माणसे स्वतःला सतत बाहेर काढून , नवनवी आव्हाने घेत नव्या पिढीच्या दिग्दर्शकांसोबत कायम काम करत राहतात.
सिनेमा बनवणे अवघड असले तरी अश्या काही माणसांमुळे तो बनवण्याची मजा सतत येत राहते. म्हणूनच तर आपण प्रत्येक सिनेमाच्या दमवणूकीनंतर , पुन्हा दुसरा सिनेमा सुरु करतोच.

img_1628

अपेयपान ४२

आपण लहानाचे मोठे होत जातो तसतसे आपले शहर आपल्यासाभोवती आकार आणि स्वरूप बदलत जाताना दिसत राहते . हा बदल दिवसागणिक लक्षात येत नाही. त्यासाठी काही वर्षे जावी लागतात. एखाद्या लहान मुलाला अनेक वर्षांनी पुन्हा भेटल्यावर आपण स्वाभाविकपणे म्हणतो , अरे किती बदलला हा ? तसेच शहराच्या बाबतीत होत राहते. शहर हि व्यक्ती असते. अतिशय सोशिक व्यक्ती.
माझ्या लहानपणी पुणे शहर हे जुन्या पेठांचे शहर होते. नदीच्या ह्या बाजूला आमचे एक वेगळे असे जग चालू होते. डेक्कन आणि त्यापुढील परिसर , पेठा आणि थोडा उच्चभ्रू असा कॅम्प चा भाग. इतके तीनच परिसर होते. कोथरूडला माझा शाळेतला मित्र राहत असे त्याच्याकडे आम्ही एक बस पकडून अलका सिनेमा पासून मोठा प्रवास करून जात असू हे मला आठवते. विद्यापीठाच्या पुढे जंगल होते आणि मग औंध नावाचे अर्धवट खेडे. जिथे माझी मावशी राहायची. पेठांमधील ठराविक गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेली ठराविक ठिकाणे , दुकाने. त्या दुकानातील आपल्याला ओळखणारे दुकानदार अशी सगळी लहानपणची चैन पुण्यात होती. जसे पुणे शहराचे म्हणून एक वैशिष्ठ्य होते तसेच प्रत्येक पेठेचेसुद्धा होते. प्रत्येक पेठ हि जणू एखादी व्यक्ती असल्याप्रमाणे तिला गुणदोष चिकटवलेले होते. सदाशिव पेठ अशी , नारायण पेठ तशी, नवी पेठ असली , मंगळवार पेठ तसली. ह्या सगळ्यावर माणसे तासनतास चर्चा करत बसलेली असत.
जेव्हा शहर आटोपशीर आणि छोटे असते आणि तिथे घडणाऱ्या उलाढाली मोजक्या असतात तोपर्यंत अश्या ठिकाणी अश्या छोट्या गोड गोष्टींची कौतुके करत बसायला माणसांना वेळ असतो आणि मुभा असते. पुण्याचे वय अनेक दशके हे वीस वर्षाचेच होते. काही घरांमध्ये विशीतली मुले असतात ती कधीही आपले घर आपले नातेवाइक ह्यांना सोडून राहिलेली नसतात , कधी त्यांनी कुठे बाहेर प्रवास करून अनुभव घेतलेले नसतात , तसे पुणे शहर होते. वीस वर्षांचे गोरेगोमटे बालक होते ते.
सुरक्षित आणि छोटे असल्याने शहराला इतिहास परवडत असे. जुन्या परंपरांचा अभिमान आणि माज परवडत असे. शांतता आणि ठेहराव सहन होत असे . माझ्या आठवणीतले लहानपणीचे पुणे शहर आत्ता आमचा मित्र जितेंद्र जोशी ह्याच्या ‘दोन स्पेशल’ ह्या नाटकात अनुभवायला मिळाले. अनेक वर्षांनी ह्या नाटकात ध्वनीरचनेमधून एक अख्खा काळ जिवंत झाल्याचा आभास झाला. मला ते नाटक बघताना पुण्यातली डिसेंबरमधली थंडी आठवली. आमच्या पंतांच्या गोटातील घरात लांब स्टेशनवरून सकाळची डेक्कन क़्विन निघाल्याची शिटी ऐकू यायची. आमचे आनंद आणि आमची नाराजी दोन्ही खूप मर्यादित होते. आपल्या शहराच्या पाण्याच्या चवीविषयी आम्हाला अभिमान होता . आमच्या गणपतीच्या मिरवणुकीविषयी अभिमान होता. आमच्या पुरुषोत्तम करंडकाविषयी अभिमान होता. पर्वती विषयी अभिमान होता. इतकंच काय पण असे अनेक लोक होते ज्यांना हिंदुस्तान बेकरीत रविवारी सकाळी मिळणाऱ्या patice विषयीसुद्धा अभिमान होता. अभिमान असणे हे आमच्या पिढीसाठी फार स्वस्त होते कारण आम्ही कशातूनच काही उभारले नव्हते. आम्ही एका टेकड्यांनी वेढलेल्या थंड हवेच्या कलासक्त गावात जन्मलो होतो. एव्हडेच कर्तृत्व. त्यापलीकडे फारसे कुणी काही नव्याने उभारताना दिसत नव्हते. माणसे परंपरा पाळण्यात मात्र कर्तबगार होती. जे आहे ते तसेच्या तसे चालू ठेवणे अशी जर काही भारतात स्पर्धा निघाली असती तर आमच्या शहराला पहिला करंडक नक्की मिळाला असता.
मी शाळा सोडत असताना अचानक असे काहीसे वातावरण पहिल्यांदा तयार झाले ज्यामुळे आम्हाला आमच्या जगण्याचा फेरविचार करावा लागणार हे आमच्या सर्व पिढीला लक्षात आले. अचानक सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षण जाहीर झाले आणि ज्या सुरक्षित आणि मर्यादित वातावरणात आमचे आईवडील वाढले होते त्या वातावरणाला सुरुंग लागला. आमच्या पिढीसाठी हि फार सुदैवी घटना घडली असे मी समजतो कारण त्यामुळे गेल्या दोन तीन पिढ्यांनी सुस्तपणे राहून आपल्या जगण्याच्या प्रवाहाचा विचार करणे सोडून दिले होते ते आम्हाला अचानक करायला भाग पडणार असे वातावरण तयार झाले.
खाजगी क्षेत्र त्यावेळी खुले होण्याची चिन्हे दिसू लागली आणि सतत आपण शिक्षण, नोकऱ्या , भांडवल ह्यासाठी सरकारचे पाय चेपत बसायची गरज उरणार नाही हे कळू लागले. माझ्या आजूबाजूची शेकडो मुले मुली ह्या काळात सरळ उठून इंग्लंड अमेरिकेला निघून गेली आणि कधीही परत आली नाहीत. आणि आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या सधन कुटुंबांचे लक्ष्य पुण्याकडे वळले. स्थलांतराचा मोठा सिलसिला सुरु झाला आणि सहस्र्तक संपायच्या आसपास आमच्या शहराचे वय अचानक विसावरून चाळीस वर्षाचे झाले.
हे आज आठवण्याचे कारण म्हणजे मी सध्या J M Coetzee ह्या दक्षिण आफ्रिकेतील नोबेल पुरस्कार विजेत्या लेखकाचे ‘समरटाईम’ हे पुस्तक वाचतो आहे . त्यामध्ये नायकाची आठवण काढताना त्याच्या आयुष्यात आलेल्या सर्व स्त्रिया हे म्हणतात कि तो जरी तीस वर्षाचा होता तरी आमच्याशी वागताना तो एखाद्या लहान मुलासारखा वागत असे .तो स्वतः मध्येच मग्न असायचा. आमच्यावर कसे प्रेम करायचे हे त्याला कळायचे नाही आणि मग अचानक तरुण होणे टाळून तो एकदम प्रौढच झाला. हे वाचताना मला का कोण जाणे माझ्या शहराची आठवण झाली. आणि ते शहर कधीही सोडून बाहेर न गेलेल्या तिथल्या माणसांची.
आमचे शहर कधीही तरुण नव्हते. आणि आतातर ते अचानक प्रौढ व्यक्तीसारखे होवून बसले आहे. ज्या व्यक्तीला खूप आठवणी असतात आणि नक्की आपण असे का दिसायला लागलोय हे आता तिला कळत नसते. मनाचे तरुणपण त्या व्यक्तीच्या हातातून निसटून गेलेले असते.

मी जेव्हा कधीही शहरात जातो तेव्हा शहरातील जुने नागरिक शहराविषयी तक्रारी करताना मला ऐकू येतात. तेव्हा मला फार वाईट वाटते. त्या माणसांविषयी काळजी तयार होते. शांतता आणि स्वच्छता ह्या अतिशय महाग झालेल्या गोष्टी तुम्हाला आता अपोआप कश्या हो मिळणार ? असे मी त्यांना कसे विचारू ? कारण त्यांच्या साधेपणाची आणि सोपेपणाची बूज राखावी वाटते. खरे सांगून आणि बाहेरच्या जगातील परिस्थितीची जाणीव करून देवून त्यांना अस्वस्थ करायला मला नको वाटते. घरच्या कार्यक्रमांना गेलो कि अस्वस्थ ते नाही तर मी होतो. कारण आठवणी सोडून कुणाकडे फारसे काही बोलायला उरलेले नसते. आणि मला भूतकाळाचे व्यसन परवडणारे नाही हे लक्षात आलेले असते.
प्रत्येक मोठ्या सामूहिक कुटुंबाला किंवा जातीसमुहाला एक मर्यादेनंतर फक्त भूतकाळ असतो . वर्तमानकाळ हा ज्याच्या त्याला असतो. तिथे तुमचे मोठे कुटुंब, तुमचे जातभाई कुणीही कामी येऊ शकत नाही.
आरक्षण नाकारले गेल्याने किंवा ते फक्त इतरांना दिले गेल्याने आमचे किती भले झाले हे मी सांगू शकत नाही . आमची पिढी मोकळ्या आणि विस्तृत जगामध्ये फेकली गेली आणि गटांगळ्या खात का होइना जगायला आणि तरायला शिकली. स्थलांतराचा फार मोठा फायदा आम्हाला झाला. ज्या सुरक्षित वातावरणात आमचे आई वडील वाढले ती सुरक्षितता नाकारली गेल्याने काही काळ बिथरायला झाले पण लगेच विचार करून , आपले गाव शहर, सोडून , कष्ट करून नवे शिक्षण घेऊन एक अख्खी पिढी स्वतःच्या पायांवर उभी राहिली. आम्ही आरक्षण न मिळाल्याची तक्रार कधीही केली नाही.
आपले हातपाय ताकदवान आणि आपली बुद्धी शाबूत असेल तर पोट भरायला आणि सुखी व्ह्यायला आपल्या आड कुणीही येऊ शकत नाही. मी फार गरिबीतून कष्ट करून वर आलेली माणसे पहिली आहेत. ज्यांना आपल्या वेळेची किंमत होती आणि बुद्धीचा आदर होता.
कितीही बिचारे वाटले तरी मला माझे जुने शहर आणि त्यातली माणसे महत्वाची वाटतात. कारण आत्मसन्मान नावाची एक शांत आणि ठाशीव गोष्ट त्या शहराने मला दिली. जुना फुकाचा अभिमान मी नाकारला पण आत्मसन्मान जपून ठेवण्याची सवय स्वत: ला लावली. आणि त्यामुळेच दुसऱ्याचाही आत्मसन्मान जपायला शिकलो.

img_1645

अपेयपान ४३
फटाके वाजवावेसे वाटत नाहीत , वर्षभर नवे कपडे घेणे चालूच असते त्यामुळे नव्या कपड्यांचे कौतुक उरत नाही. त्याचप्रमाणे हल्ली फराळाच्या गोष्टी सगळीकडे वर्षभर मिळतात . त्याचे अप्रूप राहत नाही. दिवाळीला पडायला हवी तशी पुरेशी थंडी आता पडत नाही. त्यामुळे गेली काही वर्षे मी दिवाळीत उसना आनंद आणणे थांबवले. दिवाळी हा प्रामुख्याने लहान मुलांचा सण उरला आहे. ज्यांना ह्या काळात सुट्टी असते आणि खायची प्यायची चंगळ असते. किल्ला बनवता येतो . नवे कपडे मिळतात. मला हि शंकाच आहे कि लहान मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या आग्रहाने आणि त्यांनी लहानपणी किल्ला बनवलेला असल्याने हे सगळे करावे लागत असणार. नाहीतर मुले आनंदाने घरात रिकामी लोळत मोबाईल फोन्स वर गेम्स खेळण्यात जास्त आनंदी असतील. त्यांच्याशी कुणीतरी खरे बोलायला हवे कि नक्की त्यांना काय हवे असते ? मुलांची खरी उत्तरे ऐकली तर आईवडिलांना हार्ट attack येतील इतकी हल्लीची मुले मोकळी आणि practical आहेत. आपली हौस आणि आपल्या लहानपणच्या सणावारांच्या आठवणीचे ओझे आपण त्यांच्यावर टाकले तर ती आपल्याला खाजगीत हसत आपली चेष्टा करत असतात हे बऱ्याच तरुण पालकांना समजत नाही.
पण असे बोलून चालत नाही. कारण हल्ली वातावरण असे आहे कि सगळे एकमेकांच्या धाकाने सण साजरे करतात. लहान शहरांमध्ये माणसांना शेजारचे आणि नातेवायीक आपल्याला काय म्हणतील ह्याचा सतत संकोच असतो. त्यामुळे घरातले फराळ आणि वारेमाप खर्च हे त्या भीतीने केले जातात. माझ्या वयाच्या एकाही मैत्रिणीला आणि मित्राला घरी फराळ बनवत बसणे ह्या गोष्टीचा उत्साह उरलेला नाही . पण सांगणार कुणाला ? कारण तुम्ही प्रथा बदललीत कि घरापासून दारापर्यंत अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. आणि त्याला आपण सगळे फार घाबरतो.
शिवाय वारेमाप जाहिरातबाजी करून आपल्याला खर्च करण्याची सक्ती केली जाते. पाश्चिमात्य देशांमध्ये नाताळ सणाला लोकांना भरपूर खरेदी करायला भाग पाडावे म्हणून एकमेकांना भेट देण्याची संस्कृती बाजारव्यवस्थेने काळजीपूर्वक रुजवली. त्याला धर्माचा सुंदर मुलामा दिला. आपल्याकडे तीच प्रथा सर्व मार्केटिंग कंपन्या दिवाळीत तंतोतंत कॉपी करून वापरू लागल्या आणि काही कारण नसताना दिवाळीत एकमेकांना भेटी देण्याचा बभ्रा केलं जाऊ लागला. सगळ्यांनी सगळ्यांना भेटवस्तू द्यायला हव्यात नाहीतर तुमची दिवाळी पूर्ण होवून शकत नाही असे वातावरण जाहिरातींमधून पसरवणे सुरु झाले आणि साधा भारतीय मध्यमवर्ग ह्या नव्या परंपरेला लगेच भुलला.
दिवाळी अशी कधीच नसायची. दिवाळी हि शांतता आणि स्वच्छता साजरा करण्याचा सण आहे . शांत सुंदर प्रकाशाचा सण आहे. भपक्याचा सण नाही . दिवाळीच्या मूळ आनंदापासून आज आपण एका खरेदी विक्रीच्या , गोंगाटाच्या आणि दिखावेबाजीच्या संस्कृतीपर्यंत कधी येऊन पोचलो ते आपल्याला कळलेसुद्द्धा नाही.
पूर्वी मी जे दिवाळी अंक वाचायचो त्यातला एकहि मला आता वाचवत नाही . कारण भडक जाहिराती हे नुसते कारण नाही . कुणाकडे नव्याने म्हणण्यासारखे फार काही उरलेले नसते हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. सर्व अंक हे जुन्या लोकांच्या जुनाट आठवणींनी भरलेले असतात. तेच तेच लेखक त्याचं अंकात वर्षानुवर्षे लिहित असतात. आणि फेसबुकवर त्याचं जुन्या कडब्याची मराठी माणसे दिवाळीत चर्चा करत बसलेली असतात. दिवाळी पहाट नावाच्या कार्यक्रमांची तीच तऱ्हा आहे. तेच ते जुने दळण. तेच ते गायक . तेच विनोद. सण साजरे करण्याचे नवे पर्याय आपण शोधून न काढल्याने आपण त्याचं गोष्टी दर वर्षी करत बसतो.
माझी एक मैत्रीण मला परवा म्हणाली मला दिवाळीत फराळ वगरे कारायचा इतका कंटाळा आला आहे अरे. नको वाटते आहे. कामाला चार दिवस सुट्टी आहे तर बाहेर शांत कुठेतरी घर बंद करून मुलांना घेऊन जावे वाटते आहे . पण तसे केले तर बरे दिसत नाही न . म्हणून शास्त्रापुरता थोडा फराळ बनवते आणि मुलांना वाईट वाटू नये म्हणून थोडे फटाके आणते. हे ती बोलत असताना तिची मुलागी म्हणाली आई प्लीज फटाके वगरे आणू नकोस आणि मला चिखलात जाऊन किल्ला वगरे करायला भाग पाडू नकोस. मला एकदम हसायला आले आणि माझ्या मैत्रिणीचा चेहरा पडला. काळ बदलला आहे हे आपल्याला कळत असते , ऋतुचक्र बदलले आहे हे आपल्याला माहित असते फक्त आपल्याला ते मान्य करण्याची भीती वाटत असते. दुसऱ्या कुणीतरी थोडे वेगळे वागू लागले कि मग आपण तसे वागू हा शहरी भित्रट मध्यमवर्गीय विचार त्यामागे असतो. सुरुवात आपल्यापासून नको.
एकदा आपल्याला मुलेबाळे झाली कि आपण जास्त संकोचलेले आणि घाबरट बनत जातो. आपल्यावर आपल्या आई वडिलांनी जे संस्कार केले तसेच आपल्याला कॉपी टू कॉपी आपल्या मुलांवर करायचे असतात. उगाच मुलांना संस्कृतीची माहिती नसली तर त्याचे बालंट आपल्यावर यायचे. पण सध्या मुले विशेषतः शहरातली मुले अतिशय हुशार निघाली आहेत. ती त्यांच्या आईवडिलानइतकी भाबडी आणि संकोचलेली उरलेली नसतात. त्यामुळे सर्व सोसायट्यानमध्ये सकाळचे दोन तास सोडले कि पारंपारिक दिवाळीचे वातावरण संपते आणि घरातले सगळे भरपेट चापून tv समोर आडवे होतात . दिवाळी हि इतर रविवारच्या सुट्ट्याप्रमाणे संपूनही जाते. अनेकदा ती संपून गेल्याचे आपल्याला हायसेसुद्धा वाटते कारण खिशाला भोक पडल्यासारखा वारेपाम खर्च चालू असतो. तो खर्च कारायचा कि नाही ह्याविषयी घरात कुणीच कुणाशी बोलत नाही. दरवर्षी हवे नको ह्याचा अजिबात विचार न करता अनेक कुटुंबात दिवाळीचा म्हणून एक ठराविक आणि तोच तो खर्च करत बसतात.
मला दिवाळीला घरापासून लांब राहवत नाही. दिवाळीचा हल्ली होणारा सर्वात मोठा आनंद हा कि त्या वेळी सर्व भावंडांना आणि मित्रांना निवांत बसून गप्पा मारायला खूप वेळ असतो. सगळ्यांचा मिळून रिकामा वेळ असणे हि हल्लीच्या काळात इतकी मोठी चैन झाली आहे कि मला सणाचा म्हणून जो आनंद होतो तो त्या रिकामटेकडेपणानेच होतो. एरवी वर्षभर कुणाला कुणाकडे जायला , आणि गेलोच तर घडयाळ ठार मारून गप्पा मारत बसायला कुठे वेळ उरला आहे ? दिवाळीच्या काळात हे जमून येते. मग अश्या वेळी उगाच घरातल्या बायका स्वयपाक पाण्यात वेळ न घालवता मजेत सुट्टी घेतात . आम्ही सरळ बाहेरून जेवण मागवतो आणि एकमेकांना वेळ देतो. जेवण खाण ह्याचा फारसा बाऊ आम्ही करत बसत नाही. शिवाय आता सगळ्या मित्रांची आणि भावंडांची मुले पुरेशी मोठी झाली असल्याने ( म्हणजे १० वर्षांची . ह्या वयात त्यांना स्वतंत्र विचार असतात ) ती आपापल्या विश्वात गर्क असतात.
अनेक ओळखीचे लोक दिवाळीत अनोळखी जागी प्रवास करतात . शहरातली कुटुंबे त्याचं त्या ओळखीच्या रुटीन पासून आणि माणसांपासून जरा लांबवर जातात.
दिवाळी जर नाविन्याने आणि काळाचे भान ठेवून मजेत साजरी केली तर खूप मजा येते. किती सुंदर दिसणारा सण आहे हा ? मला जिथे तिथे ह्या चार दिवसात केलेली दिव्यांची सजावट पाहायला फार आवडते. कितीही ताण मनावर असले तरी रात्री उशिरा आणि पहाटे जर ह्या काळात बाहेर पडले तर शहराचे सुंदर रूप पाहून आपल्याला बरे वाटते. जागोजागी रोषणाई केलेली असते , पणत्या लावलेल्या असतात आणि वातावरणात एक प्रसन्नता असते. ती आपण सगळ्यांनी मिळूनच तयार केलेली असते. वर्षभर राबून आपण हा एक वेळ हक्काच्या आनंदासाठी जपून ठेवलेला असतो. आपण त्याची वाट पाहत असतो. मग प्रश हा उरतो कि इतक्या चांगल्या शांत रिकाम्या मौल्यवान काळातही आपण आपल्यामागे अनेक घरगुती कामे कशाला लाऊन घेतो ? नवे मोठे खर्च का ओढवून घेतो ? सुट्टीचा आनंद हा काही न करता एकमेकांना भेटून भरपूर गप्पा मारण्यात आहे. तोच सण आहे. बाकी सगळा दिखावा आहे.

img_1620अपेयपान ४४

लहानपणी आम्ही जो हिंदी सिनेमा पाहायचो , त्यात कुणीतरी कुणावरतरी अन्याय करीत असे आणि मग काही वर्षांनी कुणीतरी त्याचा बदला घेत असे. मला बदल्याचे प्रसंग फार आवडत असत. विशेषतः शक्ती कपूर वगरे लोकांना सिनेमातल्या होरोयीनी हाणामारी करून सिनेमाच्या शेवटी लोळवत असत तेव्हा मजा येत असे किंवा हिरो बदला घेण्यासाठी व्हिलनचा खून करत असे तेव्हा फार बरे वाटत असे. वर्षानुवर्षे भारतामध्ये रामायणच सिनेमाच्या रुपात पुन्हा पुन्हा बनवले जात असे.
राखी हि नटी स्वतः बदला घेत नसे. ती तिची मुले अनेक वर्षांनी परत येऊन अमरीश पुरीला मारतील ह्या आशेवर जगत असे. वणवण फिरत असे. रेखा मात्र आपली कामे इतरांना सांगायची नाही. ती स्वतःच बदला घ्यायची. कारण रेखाला मुले होणेच मान्य नव्हते. आपल्यावरून इतरांवर नजर गेली तर आपले सौंदर्य कोण पाहील ? मुले झाले कि तरुण सुना येणार. त्या सुना कपडे काढून बागेत नाचणार . मग प्रेक्षक त्यांनाच पाहत बसणार. त्यापेक्षा नकोच ते. ती हृतिक रोशन ची आजी झाली पण आई वगरे होण्यात तिने वेळ घालवला नाही. डायरेक्ट आजी आणि ती पण ह्रितिकची. उगाच कुणी सायडी नाही . रेखा बदला घ्यायची तेव्हा ती आपले रूप संपूर्ण बदलून येत असे , प्रेक्षक सोडून तिला त्या नव्या रुपात कुणी ओळखत नसे आणि मग ती व्हिलनला प्रेमात पाडून योग्य वेळी त्याचा बदला घेत असे. श्रीदेवी सहसा मनुष्यरुपात बदला घेत नसे. ती नागीण बनून यायची. मला अजूनही स्वप्नांत तिचे ते भप्पकन उघडणारे नागिणीचे घारे डोळे येतात आणि मी घाबरून जागा होतो. मी कुणावर कधी इतका अन्याय केलेला नाही कि कुणी माझा बदला घ्यावा. कधीतरी पार्किंग करतांना मागच्याची गाडी ठोकली आहे. फारतर फार कधी सिनेमाच्या सेटवर आरडओरडा करून लोकांचे थोडे अपमान केले आहेत. एका मैत्रिणीचा नवरा शाकाहारी होता त्याला मासे खायची आवड निर्माण केली आहे. एक बिचारा मित्र फार लहानपणी लग्न करून पस्तीशिलाच कंटाळला होता , त्याची काही हुशार तरतरीत आणि देखण्या मुलींशी ओळख करून दिली आहे. पण कुणी माझा अगदी बदला घ्यावा असे हातून अजून काही घडलेले नाही.
अमरीश पुरी बिचारे ! किती बायकांकडून किती मार खाऊन घ्यावा त्या माणसाने ? आमचे सर्वच्या सर्व बालपण अमरीश पुरी, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर ह्यांची अनेक स्त्री पुरुषांकडून शेवटी होणारी पिटाई बघण्यात गेले. मला अमरापूरकर प्रत्यक्ष भेटले तेव्हा सेटवर पहिले काही दिवस त्यांचा उगाच राग येत असे. पण तो व्यर्थ होता. कारण तो राग त्यांचे लहानपणीचे सिनेमे पाहून मनात तयार झाला होता. प्रत्यक्षात किती सौम्य आणि शांत माणूस. त्यांचा बदला कुणी कशाला घ्यावा ?

आपल्या घरातील आया माझ्यासारख्या घरबैठ्या मुलाला नेहमी, ‘मी लग्न करून घरात आले तेव्हा मला घरात कसे सगळ्यांनी वाईट वागवले’’ ह्याच्या गोष्टी सांगत बसतात. कुणीही सूज्ञ बालक आपल्या आईने सांगितलेल्या तिच्यावर झालेल्या अन्यायाच्या कहाण्यांमधून सुटका करून घेऊ शकत नाही. कारण भारतीय बायका ह्या नेहमी अन्यायाचे राजकारण करून सहानभूती मिळवून सत्ता गाजवण्यात प्रसिद्ध आहेत. कुटुंब पातळीवर त्याची सुरुवात होत असते. मी होते म्हणून ह्या सगळ्यांना सहन केले. एखादी असती तर केव्हाच हे घर सोडून पळून गेली असती. माणसे ओळखायला शिक . आपल्या घराण्यात हे तात्या तसे आहेत. हे अण्णा असे आहेत. हि बाबी आतल्या गाठीची आहे. तो बाबा नुसते गोड बोलतो. मराठी सिरीयलच्या लेखकांना लाज वाटेल आणि त्यांची मन शरमेने खाली जायील इतके सुंदर एपिसोड भारतातल्या गृहिणी घरात बसून तयार करत असतात. ह्याचा मूळ उद्देश हा सर्व पोटच्या पोरांना नवऱ्याच्या विरोधात नेऊन आपल्या बाजूने वळवणे हाच असतो. पितृसत्ताक पद्धतीविरुद्ध बायका मुलांना वापरून घेऊन बंड करीत असतात. अश्या बायकांकडून गृहिणी असण्याचे इतके मोठे भांडवल केले जाते कि विचारता सोय नाही.
‘आपली आई आपल्या वडिलांपेक्षा जास्त चांगली आहे. तिने खूप सहन केले आहे. वडील एक तर अन्यायी आहेत किंवा लेचेपेचे आहेत’ अशी शिकवण खूप अनावश्यक आणि सतत बडबड करून भारतीय आया आपल्या मुलांना देत राहतात. आमच्या पिढीत बहुसंख्य बायका घरी बसून घरकाम करीत असत. घराबाहेर पडून कष्ट करून कामात यश मिळवणाऱ्या बायकांविषयी त्यांच्या मनात असूया तयार होत असे आणि मग त्यातून गृहिणी असण्याचे आणि घरकामाला प्रतिष्ठा मिळण्याचे फार मोठे भांडवल करणे भारतातल्या बायकांनी सुरु केले. मराठी साहित्यातील अनेक बायकांची आत्मचरित्रे आपण वाचली तर ती स्वतःविषयी कमी आणि नवऱ्याविषयी जास्त अशी असतात.
मला लहानपणी कोणताही हिंदी सिनेमा पाहून घरी आलो कि अशी भीती वाटायची कि कोणत्याही क्षणी आई उठेल आणि आपल्याला काका, मामा, आजी, आजोबा, शेजारच्या ठमाकाकू, मागच्या अंगणातील शकूमावशी ह्यांचे बदले घ्यावे लावेल. ‘तुझे अपने मा कि सौगंध’ असे काहीसे म्हणून. मग मी काय करणार ? मला व्यायाम करायला हवा. घोडेस्वारी , बंदुका चालवायला शिकायला हवे. चालत्या ट्रेन वर उभे राहून पुणे सोडून बदला घ्यायला आईच्या माहेरी जाता यायला हवे.
कॉलेजात , उमेदवारीच्या दिवसात आमच्या सोबत काम करणाऱ्या तरुण मुलीसुद्धा मी हे करीन आणि मी ते करीन असे म्हणणाऱ्या असल्या तरी संध्याकाळी सात नंतर त्यांना घरी सोडायला जावे लागत असे. त्यांना प्रवासाला गेल्यावर आपापले समान उचलता येत नसे. वय वाढले तरी साधे ड्रायविंग करता येत नसे. त्या मुली समाज मला हे करू देत नाही. समाज मला ते करू देत नाही असे बोलत बसायच्या. कधीतरी कोणत्यातरी कोपर्यातल्या नाटकाच्या स्पर्धेत एखाधी ढाल मिळाली कि आपण अभिनक्षेत्रातील राणी असल्यासारख्या वागायच्या . खूप बडबड करणाऱ्या आणि मला हे करायचे आहे मला ते करायचे आहे असे बोलणाऱ्या त्या सर्व मुली श्रीमंत आणि कर्तुत्ववान मुलांशी लग्न करून साडी पदरात गुंडाळल्या गेल्या किंवा सरळ अमेरिकेला पसार झाल्या. गप बसून काम करणाऱ्या आणि नाव कमावणारया हुशार मुली मी आमचे पूर्वेचे ऑक्सफर्ड गाव सोडून मुंबईला येईपर्यंत पहिल्या नव्हत्या. अश्या सर्व मुली आपापल्या घरात बसून दुस्वासाची भावना निर्माण करून समाजात आणि कुटुंबात मोठ्या प्रमाणावर चुकीचे राजकारण करताना आपल्याला दिसतात. मराठी सिरीयल चालतात ते ह्या सगळ्या रिकाम्या बायकांमुळे.
घरकाम आणि कुटुंब चालवणे हि फार सुंदर गोष्ट आहे आणि ती महत्वाची आहे पण त्याचे प्रमाणाबाहेर भांडवल करण्याइतकी ती अवघड नाही. गृहिणी बनून घर चालवणे हा आपला वैयक्तिक निर्णय असतो . त्यासाठी सतत दुसर्याला जबाबदार धरून सर्वांच्या मनात आपल्याविषयी सहानुभूती तयार करण्याचे मूर्खासारखे प्रयत्न करणे भारतीय गृहिणींनी थांबवायला हवे. आईच्या हातचा स्वयपाक, तिची चव , तिने भोगलेले कष्ट ह्या गोष्टी प्रमाणाबाहेर मोठ्या करून घरात त्याचे banner कारून लावायची गरज नसते. नवरा हा नेहमी दुष्ट नसतो आणि लेचापेचा नसतो. घरातल्या लहान मुलांसमोर चुकीची बडबड करणे बंद केले तर ती मुले आपल्या कौटुंबिक राजकारणातून मोकळी होवून बाहेर पडून काहीतरी चांगले काम करतील ह्याची काळजी पालक म्हणून दुपारचा वेळ रिकामा असणाऱ्या बायकांनी घ्यायला हवी.
आणि जो कष्ट करून घरासाठी आणि कुटुंबासाठी पैसा कमावतो आणि घर कष्टाने वर आणतो किंवा आणते त्या स्त्रीची किंवा पुरुषाची किंमत घरी बसून वरणभात करून आणि जुन्या कापडाचे पडदे शिवून दुपारी tv बघणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त असणार ह्याचे साधे आणि व्यावहारिक ज्ञान भारतीय गृहिणीला यायला हवे. खरे तर फार पूर्वीच यायला हवे होते. पण उशिरा आले तरी बिघडणार नाही. आपण निरुपा रॉय होणे आतातरी बंद करूया . कारण काळ बदलला आहे.

img_1655

अपेयपान ४५

मी नुकताच नव्या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी मराठी TV वरील एका प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमाचे शूटिंग पूर्ण करून पहाटे चार वाजता घरी परतलो आहे , समोर ठेवलेले एक पुस्तक मला खुणावते आहे. मी दमलो आहे . पुस्तक लहान मूल होवून थोडा वेळ तरी खेळायला ये असे म्हणते. पण मला खरंच शक्य होत नाही. चित्रपट बनवणे आणि तो लोकांपर्यंत पोचवणे ह्या दोन अतिशय स्वतंत्र गोष्टी आहेत. पहिली मला येते. दुसरी मी माझ्या टीम कडून शिकतो. मी त्यांचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकतो. दिवसातून दहा ठिकाणी मुलखती देतो. माझ्या कलाकारांसोबत अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतो. निवडणुकीच्या काळात राजकारणी लोकांचे ज्याप्रमाणे वेगवान आणि भन्नाट आयुष्य असते तसेच आयुष्य सिनेमा बनवणाऱ्या माणसांचे तो प्रदर्शित होण्याच्या काळात असते.
ह्या काळात वाचन संपूर्णपणे थांबते. एरवी मी सेटवर काम करत असलो तरी कधीही वाचनात खंड पडत नाही. शूटिंगच्या लोकेशनवर माझी लायब्ररी माझ्यासोबत गाडीतून प्रवास करत असते. दिवसभराचे चित्रीकरण संपले कि मी माझ्या खोलीत जातो. दुसऱ्या दिवशीची कामे माझ्या टीमला आखून देतो आणि पुस्तक हातात घेऊन त्यात शिरतो. माझे दिवसभराचे ताणताणाव संपून जातात.
पण चित्रपटाच्या रिलीज ची तारीख जवळ आली कि एक भरभक्कम कॅलेंडर हातात पडते . त्यात तुमचा संपूर्ण चार आठवड्याचा प्रवास मुलाखती , कार्यक्रम ह्यांचा लेखाजोखा असतो. ह्या काळात वाचन संपूर्ण थांबते.
पुस्तके आपली वाट पाहतात . आपणही त्यांची. काही पुस्तके अर्धवट वाचून झालेली पुन्हा जवळीक करू पाहतात. पुस्तकाला आपलेसे केले आणि त्यात रममाण झाले कि मनाला एक ठेहराव मिळतो. सिनेमा बघताना एक प्रेक्षक म्हणून माझे मन उत्साहाने उडत असते पण पुस्तक वाचताना मात्र ते कोणत्यातरी खिडकीपाशी जाऊन विसावते. तिथे माझ्यासाठी ठेवलेले पाणी पिते आणि खिडकीच्या काचेतून आतल्या भरलेल्या घरात ते पाहत बसते. त्या पुस्तकाने निर्माण केलेल्या घरात .
एकदा बनवलेला चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवून मी घरी परतलो कि एक शांत पोकळी मनामध्ये तयार झालेली असते. एखाद्या मोटारीच्या पत्र्याला पोचा पडावा तशी पोकळी. एक चित्रपट बनवायला एक संपूर्ण वर्ष लागते. तुमचे मन त्या कथेने आणि चित्रपटाच्या अनुभवाने ओतर्प्रोत भरलेले असते. वेगवान कामाची आणि भोवतालच्या गडबड गर्दीची सवय झालेली असते. चित्रपट रिलीज झाला कि सगळे वादळ शुक्रवारी शमून जाते आणि अचानक तुम्ही अश्या घरात परतता जिथे अनेक पुस्तके तुमची अधिरतेने वाट पहात असतात.

माझी सुट्टीची आणि निवांतपणाची कल्पना हि दिवसभर वाचत बसणे आणि भरपूर पोहणे हि आहे. मी बनवलेला नवा चित्रपट पूर्ण करून गेले तीन दिवस मी फक्त ह्या दोन गोष्टी करत बसलो आहे. हातात यान्न मार्टेल ह्या कॅनडियन लेखकाची ‘सेल्फ’ हि कादंबरी घेऊन बसलो आहे. वाचून डोळे दुखले कि भरपूर पोहायचे आणि मग पुन्हा वाचत बसायचे.
हिवाळा जवळ येत आहे. वर्ष संपताना भारतात ह्या ऋतुमुळे अतिशय उत्साही आणि शांत वाटते. मी खूप सारे उत्तम साबण आणि वेगवेगळ्या देशातून आणलेल्या उत्तम विंटर क्रीम्स चा साठा करत असतो . गडद सुवासाचे परफ्युम्स केवळ ह्या ऋतूमध्ये वापरण्यासाठी राखून ठेवत असतो. आणि डांबराच्या गोळ्यांचा हलकासा वास येणारे स्वेटर्स कपाटातून काढून ठेवतो. हिवाळा येताना , वर्ष संपताना आणि त्याआधी मी एका वर्षाने पुन्हा मोठा होताना मनावर एका हलक्या melancholy ची साय पसरते. कामामधून मिळालेली सुट्टी त्याला फार पोषक असते. सगळ्या दिवसांचा वेग हळूहळू शिथिल होवू लागतो. आणि माझा असा गुप्त अंदाज आहे कि भारतीय माणसे हिवाळ्यात एकमेकांशी जास्त चांगली वागू लागतात. थोडी जास्त हसतात. अनोळखी लोकांकडे पाहून good morning म्हणतात.

इथे चौकाचौकात
आणि कोपऱ्याकोपऱ्यावर
उघडी पुस्तके आहेत
सहज पाहून हसलं , कि बोलायला लागतात
त्यांची सगळी स्वप्न , दु:ख , उलाढाली
सगळे चढ उतार
अगदी मोकळेपणाने वाचू देतात
हसतात , हसवतात
आपण आपलं पुस्तक
तितक्याच मोकळेपणानं उघडलं
तर ते स्वतःचं एक पान
अलगद काढून
आपल्या पुस्तकात रोवतात
किती सुंदर भेसळ आहे हि
कथानकांची .
तेजस मोडक ह्या तरुण कवीची हि कविता ह्या ऋतुमध्ये आजूबाजूला खरा आकार घेऊ लागते. मला येऊ घातलेल्या हिवाळ्यातील शहरांची दृश्यात्मकता आवडते. शहरातील कर्कश्य आवाज कमी होतात. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम नसल्याने शहरांना एक माणूसपण येते. माणसाच्या मनातील प्रखरपणा ह्या काळात निसर्ग काढून घेतो.
ह्या ऋतूमध्ये एकटेपणा सुखावतो. तो विचार करायला , स्वतःवर येणारी नवी त्वचा शांतपणे बघायला मदत करतो. मी हिवाळ्यात अनेक नवे वेगळे पदार्थ शिकतो. वेगळ्या प्रकारचे आणि मला सवय नसलेले किंवा मी ह्यापूर्वी ज्याची आवड जोपासली नव्हती असे निराळे संगीत ऐकतो. माझ्या मनाची दारे ह्या काळात नव्या अनुभवांसाठी हळूहळू उघडी होत जातात. नकळत आतल्याआत नवे प्रवाह जन्म घेताना जाणवू लागते. नव्या कथा सुचतात.
रुमी ह्या कवीची एक मला आवडणारी कविता

We have a huge barrel of wine
But no cups
That’s fine with us
Every morning we glow
And in the evening we glow again
They say there is no future for us
They are right
Which is fine with us.

पुढील दोन महिन्याचा काळ हा भारतातील उत्तमोत्तम चित्रपट महोत्सवांचा काळ. गोवा , केरळ पुणे मुंबई इथे भरणाऱ्या महोत्सवामध्ये देशभरातील आणि परदेशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा आनंद घेता येतो.. तसेच ह्या काळात बनारस, राजस्थान आसाम महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई इथे अप्रतिम संगीत महोत्सव होतात. भारतीय शास्त्रीय संगीतापासून ते EDM पर्यंत अनेक प्रकारचे ताजे संगीत ह्या महोत्सवामधून आपल्याला ऐकायला मिळते.
शिवाय जयपूर सारख्या ठिकाणी होणारे अनेक साहित्य महोत्सव आता सुरु होतील. पुस्तकापरीस कपडेच भारी अशी विंग्रजी साहित्यातील अनेक दिग्गजे तिथे तोंड वाकडे करून अनेक अस्तित्वात नसलेल्या विषयांवर भरपूर पैसे खर्च करून चर्चेला येतात. मराठीतही तेच घडते. ज्याला जिथे जाऊन रिकामे , वेळ पुष्कळ असलेले लेखक आणि विचारवंत पहायचे असतील त्याने आपपल्या ऐपतीप्रमाणे जाऊन ते पहावे. मजा येते. मी माझे पुस्तक विंग्रजीत प्रसिद्ध झाले तेव्हा गेलो होतो. मराठी साहित्य संमेलनातले डायनोसॉर जाऊन बघावेत का हा मी या वर्षी विचार करतोय. ह्या वर्षी ज्युरासिक पार्क लावायचे आमंत्रण कोणत्या शहरात आहे हे पाहायला हवे.
घरी शांत बसून वाचत राहावे कि विना आखणी विना परवाना इकडून तिकडे भटकत बसावे हाच काय तो मोठा यक्षप्रश्न ह्या सुंदर काळात भारतात मनात उभा राहतो.
काहीही करा पण ह्या हिवाळ्यात अनोळखी वागा. करून तर पहा. घरच्यांना कोड्यात पाडलेत तरी हरकत नाही. कुणी वेडा म्हणाले तरी फरक पडत नाही.

अपेयपान लोकमत मधील लेखमाला भाग ३७ते ४०

अपेयपान ३७

आई देव खरंच असतो का ? असला तर मग तो कुठे असतो ? आपल्या देवघरात आहेत ते सगळे देव वरती आकाशात एकत्र राहतात का ? त्यांचा वेगवेगळ्या सोसायट्या असतात का? मग वेगवेगळ्या सणांना ते आपल्या आणि इतरांच्या घरी येऊन जातात का ? लक्ष्मी तर रोजच संध्याकाळी येते आणि घरावरून नजर टाकून जाते असे तू म्हणालीस मग ती रात्रभर फिरते का ? कारण कितीतरी घरे आहेत ? आपले गुरुजी येऊन पूजा करून मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करून जातात तेव्हा गणपती खराखुरा आपल्याकडे पाच दिवस राहायला येतो ? मग आपल्याकडे येतो तसा सगळ्यांकडेच येत असेल न ? मग नक्की किती गणपती आहेत ? गौरी येतात त्या नक्की कुठून येतात ? हि पावले त्यांची असतात का ? आपल्या अंगणात ती कधी उमटतात ? मी दोन करंज्या खाऊ का ? नैवेद्य कधी होणारे ?एक लाडू तरी देतेस का ? मी सोवळे नाही नेसले तर चालेल का ?, माझे पोट खूप मोठे झाले आहे मी गुरुजींसमोर असं उघडा बसण्या ऐवजी सोवळ्यावर टीशर्ट घालू का ? मूर्ती विसर्जन केली कि ती देव नदीतून पोहत स्वर्गात जाणारे का ? म्हणजे आपली मुठा नदी पुढे स्वर्गात जाते का ? नद्यांची नवे कुणी ठेवली ? तुला मोदक कुणी शिकवले ? आज्जीला मोदक कुणी शिकवले ? आज्जीच्या आईला ? आई रस्त्यावरच्या गणेशोत्सवाची वर्गणी मागायला ती मवाली मुले परत आली तर काय सांगू ? दार उघडू का ? ओटी म्हणजे काय ? आजी परत कधी जाणारे ? ती गेली कि मग तू मला आम्लेट करून देशील का ? पण स्वयपाकघरात बनवले तर गणपती गौरीना कळेल का ? मग विसर्जन झाले कि बनवून देशील का ? कट म्हणजे काय ? गणपती नसतो तेव्हा वर्षभर आपले गुरुजी काय करतात ? ते सिनेमा बघतात का ? गणपती पाहायला कधी बाहेर पडायचे ? कावरे आईस्क्रीम घेऊन देशील का? आई सनम बेवफा गाणे आहे त्यातले बेवफा म्हणजे काय ? बाबा हे तुझे सनम आहेत का ? गणपतीला हिंदी येते का ? संस्कृत ? बिल्लनची नागीण म्हणजे काय ? टिळक कोणती गाणी लावायचे ? टिळकांच्या वेळी हिंदी पिक्चरची गाणी होती का ? पारतंत्र्य म्हणजे काय ? पण ब्रिटीश लोक हिंदू नव्हते का ? ख्रिचन लोक इंग्लिश बोलतात का ? आपल्याकडे पाच आणि गोखले काकूंकडे दीड दिवस कारण काकू आळशी आहेत का ? घरचा गणपती दहा दिवस का नसतो ? आपल्याकडे गौरी येतात आणि शिंदे काकूंकडे महालक्ष्म्या येतात त्या सेमच असतात का ? शाळेच्या संस्कृत मंडळाला दगडूशेठ हलवाई गणपती समोर सकाळी पाच वाजता अथर्वशीर्ष म्हणायला बोलावलंय तर मी जाऊ का ? सकाळी रिक्षा मिळेल का ? सगळे साबुदाणे आणि केळी का खात बसतात तिथे सकाळी सकाळी ? तिथे सोवळ्यावर मला टी शर्ट घालता येईल का असे सरांना विचारशील का ? सगळ्यांना उघडे करून का बसवतात देवापुढे ? मुलांनीच का टी शर्ट काढायचे ? मुली का नाही काढत ? अमेरिकेतपण गणपती असतो का ? का नसतो ? अमेरिकेत पारतंत्र्य नव्हते का ? ब्रिटीश लोकांचे अमेरिकेवर राज्य नव्हते का ? तुमच्या लहानपणी तुम्ही डेकोरेशन कसे करायचात ? प्रस्तुतकर्ता म्हणजे काय ? देणगी म्हणजे काय ? गणपती बरोब्बर त्याच दिवशी कसा येतो ? स्वर्गात कालनिर्णय लटकवलेले असते का ? स्वर्गात अप्सरा आणि दारू असते ती कुणासाठी ? मग बाबा गणपतीत घरी का पीत नाहीत ? स्वर्गात हिंदी सिनेमाची गाणी लागतात का ? आजोबा स्वर्गात गेले आहेत ते वर गणपतीला भेटत असतील का ? महाभारत सिरीयल मध्ये असतो तसा तिथे धूर निघत असतो का सतत ? म्हणून तुम्ही उदबत्त्या लावता का ? देवांना दोन तीन बायका असतात मग आपल्याला एकच का असते ? चिकन शाकाहारी नसते का ? गणेशोत्सव मंडळाची मुले मवाली का असतात ? ते शिव्या देतात आणि मांडवाखाली दारू पितात ते चालते का? बुद्धीची देवता असते तर मग इंग्लंड अमेरिकेत ज्यांना बुद्धी आहे ते पण गणेशोत्सव साजरा करतात का ? न्यूटन कडे पण गणपती बसायचा का ? देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढकर कौन स्वामी तुमसे बढकर कौन हे गाणे सारखे का लावतात ? मिथुन चक्रवर्ती त्या मूर्तीवारचे दागिने चोरणार असतो का ? अमजद खान गणपतीजवळ गेलेला चालतो का ? आपल्याकडे तीनच आरत्या का म्हणतात? फार गोड गोड जेवण झालेय थोडी तिखट भजी तळतेस का ? गणपती आणि santa clause एकमेकांना स्वर्गात भेटत असतील का ? कॅम्प मध्ये गणपती का बसत नाही ? बिन अंड्याचा केक घेऊन दे न चालेल का ? आपण आपले मंडळ काढूया का ? म्हणजे आपली आवडती गाणी मोठ्यांदा वाजवता येतील ? जया बच्चन ने गणपतीला सोन्याचे कान दिल्यावर मग अमिताभ बरा झाला का ? आपण माझ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेआधी गणपतीला सोन्याचे नाक देऊया का ? cadbury मध्ये अंडे असते का ? गणपतीला नुडल्स आवडतील का ? पॉपकोर्न ? पु ल देशपांडे गणपती बसवतात का ? आणि कुसुमाग्रज बसवतात का ? अंधश्रद्धा म्हणजे काय ? त्या दोन गौरी एव्हढा चिवडा आणि शेव घेऊन जाणारेत का ? मग मला तू पुन्हा करून देशील न ? आजी गणपतीला नमस्कार करताना का रडते ? मला दगड टोचतात तर विसर्जनाला चपला घातल्या तर चालतील का ? मी विसर्जनानंतर video कॅसेट आणून सिनेमा पाहू का ? ते पेशवे अजून त्या शनिवार वाड्यात राहतात का? बँकेतून गणपतीत सोन्याचे दागिने सगळ्यांना देतात का ? सोन्याचे दागिने दुकानातून का नाही आणत ? बँकेतून का आणता ? तोळा म्हणजे काय ? धर्मेंद्रला दोन बायका आहेत तर मग त्याच्याकडे दोन गणपती बसतात का ? प्रत्येक बायकोला वेगळा गणपती बसवावा लागतो का ? नगरसेवक म्हणजे काय ? महापौर बायकाच का होतात ? तू महापौर होणारेस का ? पुण्याच्या महापौर आणि मुंबईच्या महापौर भांडत असतील का ? हिंदी सिनेमात गणपती असतो तर गौरी का नसते ? नवस म्हणजे काय ? मावशीने गणपतीला स्वेटर शिवलाय तिचे डोके फिरले आहे का ? पिको म्हणजे काय ? आणि फॉल ? हरतालका इतक्या छोट्या का असतात ? त्या बसून का असतात ? आपल्या गौरींना हात का नसतात ? परंपरा म्हणजे काय ? म्हणजे बाबा वागतात तसेच मी वागायचे आहे का ? गुप्ते आज्जी गौरी च्या दिवशी वाईन पितात ते कसे चालते ? सोन्याचे पाणी म्हणजे काय ? इंग्लिश मिडीयम च्या मुलांना आरत्या कोण शिकवणार ? अनाथनाथे आंबे म्हणजे काय ? नयना मला म्हणाली कि ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत विसर्जनाच्या गर्दीत पळून जाणारे तर पळून कुठे जातात ? पळून लग्न करणे म्हणजे कसे करायचे ? मी कुणाचा बॉयफ्रेंड आहे ? मनाली ला आरत्या येत नाहीत तर तिला पाप लागणारे का ? मला आरत्यांचे किती पुण्य मिळणारे ? पुण्य साठले कि काय करायचे ? कुणाला सांगायचे ? कुळाचार म्हणजे काय ? अमिताभ आजारी होता तेव्हा रेखाला त्याला भेटू दिले का ? गांधीजी गणपती बसवायचे का ? टिळक गेले आणि गांधी आले मग त्यांनी गणपती का बसवला नाही? गांधीजी गुजराती होते न ? त्यांना आरत्या येत नव्हत्या का ? गुजरात्यांकडे आपल्यासारख्याच आरत्या असतात का? डालडा म्हणजे काय ? त्यापेक्षा दिवाळी आधी का येत नाही ? गणपतीत फटाके का घेत नाहीत ? नानाआजोबा आले कि सारखे श्लोक का म्हणून दाखवायला सांगतात ? त्यांना मी सिनेमाचे गाणे म्हणून दाखवू का? हार्ट attack म्हणजे काय ? त्यांना परत कधी येणारे ?

IMG_1629.JPG

अपेयपान ३८

मत प्रदर्शित करण्याचे आणि हवे तसे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवे हे खरे आहे. आपल्याला काहीतरी सुचणे आणि ते व्यक्त करणे ह्या दोन्हीच्या मध्ये काळाचे अंतर जायला हवे. आपण राग आला कि दहा आकडे मोजून मग तो बाहेर काढावा असे म्हणतात तसेच आपल्याला काही सुचले आणि म्हणावेसे वाटले कि ते काही वेळाने म्हणावे. कदाचित असे केल्याने आपले म्हणणे जास्त टोकदार आणि आवश्यक होयील. कदाचित असे होईल कि काही वेळाने ते म्हणायची गरज उरणार नाही. पण असे केले तर आपल्या आणि दुसऱ्याच्या मनाचा आत्मसन्मान टिकून राहू शकतो. आणि आपल्या म्हणण्याला थोडी किंमत उरू शकते. लिहिणे आणि गरळ ओकणे ह्यात फरक आहे. तसाच फरक मते मांडणे आणि बरळणे ह्यात आहे. फेसबुककर्ते श्री झुकरबर्ग हे हुशार व्यक्तिमत्व आहेत . त्यांना महाराष्ट्रात मनोरुग्ण तयार व्हावे असे अजिबात वाटत नव्हते. त्यांना फेसबुक तयार करताना महाराष्ट्र माहीतच नव्हता. ( अरे बापरे किती हा घोर अपमान ) आणि आपल्याला मात्र वाटते आहे कि हे सगळे पांढरे निळे मायाजाल मराठी समाजाच्या परंपरांच्या अस्मितेसाठी आणि संस्कृतीसंवर्धनासाठी जन्माला आले आहे. पण तसे नाही. जसे कि परदेशात महाराष्ट्र मंडळे निघावीत आणि अमेरिकेत नाट्यसंगीताचे स्वर कानी पडावेत म्हणून software कंपन्या इथल्या कोवळ्या, हुशार आरत्या पाठ असणाऱ्या किंवा सुरळीची वडी करता येणाऱ्या मुलामुलींना खुडून सातासमुद्रापार कामाला नेत नाहीत. तसेच आहे हे . सर्व गोष्टींचा उद्देश मराठी माणसांपाशी आणि त्यांच्या इतिहास आणि परंपरा ह्यांच्यापाशी येऊन थांबत नाही. आपल्यामागे आपल्यापुढे आणि आजूबाजूला खूप विशाल विस्तृत आणि जग पसरले आहे ह्याची जाण ठेवली कि मग घरातून ऑफिसला जाताना सिग्नल ला उभे असले कि माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या फोटोला किती लाईक पडले असतील ह्या विचाराने जीव घाबरा होत नाही. ब्लडप्रेशर वाढत नाही.
आपले राहते जग सोडून मनाच्या पातळीवर इतरत्र रहावेसे वाटणे हि मनुष्याभावना खूप महत्वाची आहे. शांतता आणि स्थैर्य आलेल्या मनाला सुचू लागते तसेच अतिशय अस्वस्थ मनाला खूप काही सुचते . मग ते मन ते मन आजूबाजूच्या ओळखीच्या वातावरणातून सुटका मागते आणि वेगळ्या जगामध्ये जायला उत्सुक बनते. हि भावना प्रत्येक जगणाऱ्या मनुष्याला आहे. नुसतीच लेखकांना असते असे नाही .लेखक ह्या भावनेला अतिशय कष्टाने घाटदार आकार देऊन परिश्रमपूर्वक कथा आकाराला आणत असतात. पण वेगळ्या आभासी जगात जाण्याची इच्छा आणि तसे करण्याची ताकद प्रत्येक माणसाकडे असते. पण ह्या ताकदीचे काय करायचे ह्याची समज जर शिक्षणातून आली नसेल तर मग सातत्याने पर्यायी आणि आभासी जग तयार करून त्यात राहण्याचे व्यसन आधी एकेकट्या व्यक्तीला आणि मग मोठ्या प्रमाणावर संपूर्ण समाजाला लागते. व्यसन जरूर केले पाहिजे पण त्याचे दीर्घकाळाने होणारे परिणाम लक्षात घेऊन आणि त्याची संपूर्ण किंमत फेडायची ताकद मनात असेल तर ते करावे. आयुष्यभर व्यसने करून मग भक्तिमार्गाला लागणारी आणि इतरांना व्यसने सोडायला लावणारी माणसे व्यसनाचा अपमान करत असतात. व्यसनाचा शेवट हा ते करणाऱ्या माणसाच्या अंतामध्ये असतो आणि त्यामुळे अतिरेक आणि व्यसने हि फक्त जिगरबाज लोकांनाच शोभतात. हि जाणीव आता पर्यायी आभासी जगात सतत वावरणाऱ्या माणसांना यायला हवी आहे. पर्यायी जगात सतत वावरले कि मग प्रत्यक्ष आयुष्यातले छोटे आनंद आणि शांतता उपभोगण्याची माणसाची क्षमता नष्ट होत जाते. पर्यायी जगात जर काही आपल्याला लागेल असे बोलले गेले तर त्याचा मोठा परिणाम आपल्या विचारांवर आणि प्रत्यक्ष जगातील आपल्या कृतींवर होत राहतो. आपण गरजेपेक्षा जास्त मोठे होवून बसतो. चित्रपटातील नट हे काम संपले कि त्यांच्या खाजगी जगात गुप्तपणे आणि शांतपणे राहतात. कारण प्रसिद्धी हा त्यांचा व्यवसाय असतो , गरज नसते ह्याची त्यांना जाणीव असते. सामान्य माणूस पर्यायी जगामध्ये स्टार होवून बसला कि त्याला आपल्या आजूबाजूचे दिवे बंद करून अंधारात एकट्याला बसताच येत नाही. स्वतःला तो गरजेपेक्षा जास्त महत्वाचा मानून बसतो. त्या जगात कोणी त्याला काही बोलले कि तो क्रूरपणे त्या माणसाला तिथे जाऊन डसतो. आपल्याला वाटणे आणि आपल्याला कळणे ह्यातला फरक त्याला कळेनासा होतो. आणि तो इतरांच्या कामावर , ज्ञानावर आणि कलाकृतींवर जहरी टीका करून आपण मोठे झालो आहोत असे स्वतःला मानून घेऊ लागतो.
महानगरमध्ये राहणाऱ्या माणसाला आपण सामान्य आहोत हि आवश्यक जाणीव रोजच होत असते पण छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये राहणारी माणसे प्रसिद्धीला भयंकर भुकेली बनतात आणि मग समाजमाध्यमांवर नकळतपणे स्वतःच्या प्रतिमा तयार करत आणि त्या सांभाळत बसतात. तिथे माणसाची दमणूक सुरु होते. सुशिक्षित आणि हुशार शहरी माणसाला हे माहित असते कि समाजमाध्यमे हि भुकेले राक्षस असतात. तुम्ही तुमचा सगळा वर्तमान तिथे ओकलात कि मग ती तुम्हाला तुमचा भूतकाळ तिथे ओकायला लावतात असे करत करत ती तुम्हाला जगासमोर नागडी करून ठेवतात. तुम्ही काही वर्षांनी तिथे आपल्याजवळचे सगळे खाजगी , वैयक्तिक आणि मोलाचे असे देवून बसता आणि तुमच्या आयुष्याचे एक TV channel कधी तयार झाले हे तुम्हाला कळतच नाही. काही वर्षांनी नकळत माणसाच्या मनावर ह्या गोष्टीचा मानसिकदृष्ट्या गंभीर परिणाम होवू लागतो. आपण प्रत्यक्ष कसेही दिसू पण पर्यायी जगात आपली प्रतिमा चांगली राहायला हवी. आपले सेलिब्रेटीसोबत तिथे भरपूर फोटो हवेत. आपल्या हसऱ्या सेल्फी हव्यात. आपले घर आपले कुटुंब ह्याची इतर माणसांना असूया वाटायला हवी असे आपल्याला सतत वाटत राहते. कारण आपल्याला आपल्या गावात आपल्या गल्लीत आपल्या कुटुंबात स्टार होण्याचे व्यसन सतत समाजमाध्यमे वापरून तयार झाले आहे हे आपल्याला कळत नाही.
पर्यायी जगामध्ये जाऊन शांतपणे मनाला मोकळे सोडण्यासाठी माणसे एकटी किंवा एकत्र येऊन दारू पितात , गांजा ओढतात त्यापेक्षा वेगळे असे काहीही ह्या बाबतीत घडत नसते. शिवाय महाराष्ट्रात समाज उपयोगी आणि सामाजिक जाणीव असण्याचे जे व्यसन लागले आहे त्यामुळे अनेक माणसे घरची सोडून गावाची धुणी धूत बसतात आणि त्याविषयी कंटाळा येईल इतके बोलत बसतात. समाजसेवा करून स्टार बनता येते ह्याचे वाईट व्यसन आपले चित्रपट कलाकार आपल्याला लावत असतात आणि आपण सगळेच महान समाजसेवक बनून तिथे वावरतो.
कधीतरी मेन स्वीच बंद करून टाकायला हवा आणि ह्या जाळ्यातून मोकळे आणि निवांत व्हायला हवे.
मनाने उभारी घेतली आणि काही सुचले तर डायरीत लिहून ठेवायला हवे . आपला खाजगीपणा आपली मुले , आपले कुटुंब मोलाचे असते . ते लोकांच्या स्पर्धात्मक नजरेतून जपायला हवे. एखादी गोष्ट नाही आवडली तर काही वेळाने विचार करून मग व्यक्त व्हायला शिकायला हवे. सारासार विचार करण्याची आपली बुद्धी जागृत ठेवायला हवी . मुख्य म्हणजे आपल्या गल्लीत प्रसिद्ध होण्याची हौस थोडी आवरली तर आपलेच हसे होणार नाही ह्याची जाणीव असायला हवी. समाजमाध्यमांचे फार चांगले परिणामही होत असतात . अनेक माणसे एकत्र येऊन चांगले उपक्रम करायला आणि आपल्याकडे असलेल्या आवश्यक माहितीची देवाण घेवाण करायला त्यांचा चांगला वापर करत असतात. आपल्या चेहर्याचे फोटो आणि आपल्या कुटुंबाची माहिती अशी उघड्यावर टाकणे चांगले लक्षण नाही. आपल्याला हे माहित असते कि दुसर्याविषयी उगाच आपण वाईट बोललो कि आपले आपले मन आपल्याला खाते. हे असूनही जवळजवळ रोज आपण सर्व गोष्टींविषयी इंटरनेट वर जाऊन गरळ ओकत बसतो हे किती योग्य आहे ह्याचा विचार प्रत्येकाने नीट आणि समंजसपणे करायला हवा.
छोट्या गावात आणि अर्धवट मोठ्या शहरात जे हल्ली अनेक लोक समिक्षक बनून चित्रपटांना स्टार देतात त्यांना ह्या मानसिक रोगाची किती मोठी लागण झाली आहे हे आपल्याला लक्षात येणार नाही. सगळा फरक हा आपल्याला वाटणे आणि आपल्याला कळणे ह्या एकाच गोष्टीत असतो. वाटले म्हणजे कळले असे नाही. पण फेसबुकवर जाऊन बसले कि सगळे वाटलेले कळले आहे असे आपल्याला वाटू लागते. हि मानसिक आजार होवू लागण्याची लक्षणे आहेत.
सिनेमातील माणसे आणि राजकारणी माणसे जेव्हा फेसबुक वापरतात तेव्हा ते नीट आखून विचार करून आणि ठरवून केलेले असते . त्यांची प्रतिमा तयार करणारी अक्खी टीम त्यावर काम करत असते कारण प्रतिमा तयार करून ती विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे. स्वतःच्या मुलांचे , घराचे फोटो कधी टाकायचे , केव्हा किती शब्दात कुठे आणि काय बोलायचे , कशावर आणि कुठे मते व्यक्त करायची हे त्यांचे आठवडा आठवडा आधी नीट ठरलेले असते. आपल्याला नटांचे वागणे आपलेसे करायचे असेल तर त्यामागचे त्यांचे डावपेच सुद्धा कळायला हवेत. आणि आपल्या खाजगी आयुष्याची शोरूम होण्यापासून स्वतःला वाचवायला हवे.

img_1627

अपेयपान ३९

TV वर पाहिलेल्या दोन प्रतिमा डोळ्यासमोरून जात नाहीत. प्रत्येक पिढीची TV वर पाहिलेल्या आणि न विसरता येणाऱ्या क्षणांची आठवण असते . माझ्यासाठी हे दोन प्रसंग आहेत. सुस्मिता सेन ने मिस युनिवर्स स्पर्धा जिंकल्याचा क्षण. आणि न्यूयॉर्क मधील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन्ही towers कोसळतानाचा क्षण. TV वर मी हजारो लाखो प्रतिमा जवळजवळ रोज पाहत आलो असेन. पण ह्या दोन क्षणांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर जे अप्रत्यक्षपणे दूरगामी परिणाम केले त्यामुळे बहुदा हे क्षण मला विसरता आले नसावेत. एक क्षण विजयाचा आणि अभिमानाचा आणि दुसरा दहशत आणि मती गुंगवून टाकणाऱ्या जागतिक राजकारणाचा.

सुस्मिता सेन आणि पाठोपाठ मिस वर्ल्ड बनलेल्या ऐश्वर्या राय चा सगळ्या देशाला खूप अभिमान वाटला होता. त्या क्षणापासून ते आज TV वर शाहरुख खान आणि जॉन अब्राहम पुरुषांनी गोरे बनण्याच्या क्रीम ची जाहिरात करीत आहेत , ह्या दोन गोष्टींच्यामधील वीस बावीस वर्षांत भारतीय माणसाने स्वप्रतीमेचा फार मोठा असा प्रवास केलां आहे .
आपापल्या घरांमधील जुने फोटोंचे अल्बम काढून पुन्हा शांतपणे कधी पाहत बसला आहात का ? कशी होती ती माणसे? जास्त साधी होती. फोटोग्राफी हि अशी एक कला आहे जी भूतकाळाची कविता तयार करते. जुन्या फोटोमध्ये नुसती त्या प्रसंगाची आठवण नसते तर माणसाच्या आयुष्याचे त्या काळचे डिझाईन त्या फोटोत गोठवून ठेवलेले असते. आपले चेहर ,आपले हसू ,आपली उभे राहायची बसायची पद्धत. आपले पेहराव , आपलं आत्मविश्वास .आपली घरे. त्यात कुठे कुठे आपण स्वतः सुद्धा बसलेलो असू .साध्या परवडेल अश्या कपड्यात. कुणी दिसण्याची फरशी तमा न बाळगता प्रेमाने एकत्र आले आहेत. सर्व भावंडांना एकसारखे कपडे शिवले आहेत. बायका बाहेर पडण्यासाठी,फोटो साठी किती सोपेपणाने तयार होत असत. त्या त्या गावच्या किंवा शहराच्या बाजारात सर्वोत्तम जे मिळेल आणि परवडेल ते घालून. आपण आणि सिनेमातले नट ह्यात फरक असतो हि जाणीव होती आपल्या सगळ्यांना त्या काळामध्ये.
जुने फोटो पाहताना मला लक्षात येते कि ज्याचा हातात कॅमेरा असे त्याच्या हातात फार मोठी सत्ता आहे हि नकळत भावना समोरच्या लोकांच्या चेहऱ्यावर येई. माणसाच्या हसण्यामध्ये काळानुसार जो फरक पडत जातो त्याचा फार सुंदर अंदाज जुन्या फोटोंचे अल्बम पाहताना येतो. त्या काळच्या फोटो मधील हसू सुद्धा जास्त सोपे आणि निरागस होते. दात पुढे असलेली एखादी मावशी कधी ते लपवत नसे. तसेच मोकळेपणाने हसायची. फोटो काढायचा क्षण आला कि माणसे श्वास रोखून पोट आत घेत नसत. माणसे जास्त शांत निवांत होती. दिसण्याची स्पर्धा आणि भीती समाजात कमी होती. माणसांना पाप पुण्याची , नीती अनीतीची , फसवले जाण्याची भीती असेल पण मी कसा दिसतो आहे आणि मी असा दिसलो नाही तर लोक मला काय म्हणतील हि भीती घेऊन माणसे जगत नव्हती. हाउस आणि भीती ह्यात फरक असतो. माणसे साधी असली तरी त्यांना सौदर्याची आवड आणि जाण होती. दिवाळी दसर्याला, सणावाराला , लग्नाला माणसे तेजस्वी दिसत. कारण आतून काहीतरी फुलून आले असे. एक निरागसपणा होता. सणवार असतील तेव्हाचे मोजके आणि त्याचं वेळी मिळणारे दिखाव्याचे क्षण असत. त्यामुळे त्यांना किंमत होती.
सुस्मिता सेन आणि ऐश्वर्या राय ह्यांना जिंकवून भारतीय समाजाचा निरागसपणा खूप नकळतपणे कडून घेतला गेला.
उत्तरेला दिल्ली सारखी दिखाऊ वृत्तीच्ची सत्ताधारी श्रीमंत शहरे सोडता संपूर्ण भारत देश आपापल्या स्थानिक दृष्टीने स्वतः ला नटवत असे. त्यामुळे पोशाखांची जास्त विविधता होती. लोकांना भारतीय पेहरावाची लाज वाटत नसे , अगदी तरुणांनासुद्धा नाही. जुन्या फोटोमध्ये कुटुंबाच्या खास प्रसंगी किती विविधतेने नटलेली माणसे दिसतात. मला आठवते त्याप्रमाणे माणसे भारतातील इतर प्रांतामधील पोशाख सणावारांना हौशीने घालायची. कितीतरी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये पुरुष पठाणी पोशाख शिवायचे , मुली गुजराती पद्धतीचे घागरे घालायच्या, गंमत म्हणून बंगाली पद्धततीच्या साड्या नेसायच्या. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या आजूबाजूची अनेक कुटुंबे काश्मीरला जाऊन येत आणि तिथल्या स्थानिक पोशाखात स्वतःचे फोटो काढून आणत.बहुतांशी घरात आता ते फोटो लाजून लपवून ठेवलेले असतील.
माझा एक काका होता ज्याला फोटो काढायची खूप आवड होती. काही दिवसांनी अचानक तो कॅमरा घेऊन आमच्याकडे येत असे. माझा धाकटा भाऊ आमच्या घरात सगळ्यात गोरा गुबगुबीत आहे. काकाला त्याचे फोटो काढायचे असत. त्याला तयार करून त्याचे फोटो काढणे सुरु झाले कि मी खूप हिरमुसला होवून घरामध्ये बसून राहत असे. असे किती तरी वेळा घडल्याचे मला आठवते. आपण चांगले दिसत नाही हि जाणीव मला घरातल्या काकाच्या फोटोच्या अनेक प्रसंगांनी करून दिली. आमच्याकडे तीन चार तरी फोटो असे आहेत ज्यात मी कंटाळून रडतो आहे , कारण माझ्या भावाचे फोटो काढून संपल्यावर मग माझा एक फोटो काढायला काकाने मला बोलावले आहे. उगाच माझी समजूत घालायला.
आपण चांगले दिसत नाही, आपले हसू इतरांपेक्षा बरे नाही.आपले शरीर सुंदर नाही,आपल्याला टक्कल आहे , आपले दात पुढे आहेत , आपण गोरे नाही , आपण उंच नाही, आपण सडपातळ नाही अश्या अनेक न्यूनगंडात्मक भावना भारतीयांच्या मनामध्ये वाढू लागल्या जेव्हा सुस्मिता सेन ने आंतरराष्ट्रीय सौदर्यस्पर्धा जिंकली . स्त्रीने आणि पुरुषाने कसे दिसायचे , कोणत्या मापात असायचे ह्याचे सक्त मापदंड शहरी नागरिकांमध्ये वेगाने पसरू लागले. दिसण्यावर अतिरिक्त पैसे खर्च करायची सवय भारतीय मध्यमवर्गाला लागली. गावोगावी प्रचंड वेगाने gym उघडल्या , ब्युटी पार्लर उघडली. शिवून घेण्याच्या कपड्यांची संस्कृती संपत गेली, आणि दुकानात ज्या अमेरिकन किंवा युरोपियन मापाचे छोटे कपडे मिळतात त्या कपड्यात बसण्याची सक्ती सामान्य माणसावर येऊन पडली. सर्व समाजामध्ये असणारा एक अबोल निरागसपणा होता तो वेगाने नष्ट होत गेला . भीड आणि संकोच वाढीला लागला. भारतीय शरीराची एक निसर्गदत्त ठेवण आहे. तिला संपवून टाकायला सुरवात झाली. छाती कंबर ह्याची मापे आंतरराष्ट्रीय fashion catalog नुसार ठरू लागली.
आजच्या लग्नसमारंभात घरातले लोक ज्यापद्धतीने नटतात ते पहिले कि मला त्यांची दया येते. पंजाबी आणि गरीब अमेरिकन धेडगुजरी पद्धतीने घातलेले कपडे, बायकांच्या चेहर्यावर थापलेला मेक अप , जे घालून पायाला फोड येतील असे बूट. आपल्या सर्व मराठी सणसमारंभात माणसे फार भयंकर आणि कुरूप दिसतात. आपले जुने फोटो काढून पाहावेसे वाटत नाहीत ह्याचे कारण आपल्या समाजामधील आत्मविश्वास आणि निरागसपणा ह्या परस्परपूरक पण विरोधी भावना अगदी रसातळाला जाऊन पोचल्या आहेत आणि आपण TV आणि भडक चित्रपटाचे गुलाम होवून बसलो आहोत.
मी १९९४ साली बारावीत होतो. फार वेगाने पुढच्या दोन तीन वर्षात दिसण्याच्या पद्धतीत तरुण मुलांनी बदल सुरु केले. आमच्या शहराचा कपड्याचा आणि fashion चा सेन्स हा मुंबईहून येत असे कारण आमच्याकडे पुरेशी दुकाने नव्हती.
मी जाड दिसतो आणि तसे दिसणे चांगले नाही ह्याची जाणीव मला ह्या काळात नकळत करून दिली गेली. माझ्यातला न्यूनगंड ह्या काळात प्रचंड वाढीला लागला. आपण जाड आहोत म्हणून एकटे पडतो आणि आपण एकटे पडतो म्हणून अजून अजून जाड होत जातो ह्या दुष्टचक्रात माझा नकळत प्रवेश होवू लागला. मला बाजारात तयार कपडे मिळेनासे झाले. मी त्या काळात अघोरी उपासमार आणि चुकीचे व्यायाम केले . माझे चुकत असूनही ते का आणि कसे चुकते आहे हे सांगायला माझ्या आजूबाजूला कुणीही नव्हते. त्या काळात डी odorant मारून मुली पटवता येतात अश्या पद्धतीच्या जाहिराती tv वर सुरु झाल्या. सगळेच्या सगळे लोक गल्लीबोळात उघडलेल्या gym मध्ये जाऊन चुकीचे आणि घातक असे body बिल्डींगचे व्यायाम करू लागले. प्रेम आणि SEX ह्या दोन्ही गोष्टीमध्ये असणारा फरक कॉलेजच्या मुलामुलींना कळेनासा झाला. मी त्या काळाचे प्रोडक्ट आहे.

img_1619

अपेयपान ४०
नैसर्गिकरित्या चांगले दिसणाऱ्या माणसांना आयुष्य जगणे थोडे सोपे जात असेल का? ह्या प्रश्नाचे आजच्या काळातले उत्तर ‘हो’ असे आहे. जे गोरे असतात , उंच असतात , देखणे दिसतात , ज्यांचे हसू सुंदर आहे , दात व्यवस्थित आहेत , ज्यांना चश्मा नाही , ज्यांच्या केसांचा रंग काळभोर आणि चमकदार आहे अश्या सुंदर स्त्री पुरुषांना इतरांपेक्षा जगताना दरवाजे पटापट उघडले जातात. आजचे जग असे आहे जे दिसण्यावर फार लवकर भाळते. त्वचेचा रंग काळा असलेल्या , शरीराने जाड असलेल्या , टक्कल असलेल्या , केस पांढरे झालेल्या दात थोडे पुढे असलेल्या माणसांना ती कितीही हुशार असली किंवा संवेदनशील असली तरी जगण्याची लढाई थोडी जास्त करावी लागते. समाजामध्ये हे इतके बेमालूमपणे आणि अपोआप चाललेले असते कि वरवर पाहता तसे असण्यात काही चूक आहे असे दिसत नाही. आणि त्याविषयी कुणी काही बोलले कि त्या व्यक्तीला स्वतःविषयी खोटी सहानुभूती तयार करायची असेल असे वातावरण तयार केले जाते.
ह्याची सुरुवात शाळा कॉलेजातून होते. सुंदर दिसणारी माणसे शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जास्त लोकप्रिय होतात. इतरांना आपल्यात काय कमी आहे असा प्रश्न पडत राहतो. गोऱ्या आणि देखण्या माणसांना नाटकात लवकर कामे मिळतात. त्यांच्यासाठी लेखक संहिता लिहितात. कॉलेजात पाहुणे आले कि स्वागत करायला नेहमी उंच गोऱ्या आणि ज्याला smart म्हणतात अश्या मुलांची निवड केली जाते. अश्या वातावरणात काळ्या दिसणाऱ्या , जाड्या असणाऱ्या , बुटक्या असणाऱ्या मुलांमुलींना काय वाटत असेल ह्याचा विचार कधी केला जात नाही. आपल्याकडे ह्या वयात अश्या सध्या दिसणाऱ्या लोकांच्या मनात फार मोठा न्यूनगंडात्मक भाव वाढीला लागतो आणि मग आयुष्यभर तो त्यांची साथ सोडत नाही. शुद्ध भाषा येणे हा त्यातला अजून एक भयंकर प्रकार. भाषेचे आपण इतके मोठे राजकारण आपण सर्वांनी करून ठेवले आहे कि संवेदना महत्वाची कि भाषा असा प्रश्न सुद्धा आपल्या पालकांना ,शिक्षकांना किंवा वर्गमित्रांना पडत नसावा कि काय असे वाटते.
मी ह्या सगळ्याचा अप्रत्यक्ष आणि थेट असं दोन्ही अनुभव घेतला आहे. आपण दिसायला चांगले नसतो तेव्हा आपण शाळाकॉलेजात कसे पुढे येत नाही हे मी अनुभवलेले आहे.नीट मराठी बोलता येत असले तरी नीट इंग्रजी बोलता न आल्याने आमच्या कॉलेजात माझे अनेक वेळा हसे झाले आहे. नुसते इंग्रजी बोलता येत नाही म्हणून नव्हे , तर आमच्या कॉलेजात जी मुले बाहेरगावाहून येत आणि आपल्या गावाकडची बोली मराठी बोलत त्यांनाही सगळे पुष्कळ हसत असत. जाडेपणावर सतत विनोद करणे, ज्यांना PT च्या तासाला धावता पळता येत नाही अश्या मुलांना आणि मुलींना शिक्षकांनी मारहाण करणे हे मी पहिले आणि अनुभवलेले आहे. माझ्या पुण्याच्या सुप्रसिद्ध वाणिज्य महाविद्यालयात आमच्या PT च्या बाई आम्ही पंधरा सोळा वर्षाचे असताना सुद्धा आम्हाला सतत कानाखाली मारायच्या , वस्तू फेकून मारायच्या आणि अर्वाच्य शिव्या द्यायच्या. मला शारीरिक कसरतींची कधी गोडी नव्हती. माझे वजन खूप होते आणि मला वेगाने धावता पळता येत नसे. त्या बाईंमुळे माझी कोलेजची सर्व गोडी संपली. मला ती जागा आवडेनाशी झाली. त्यांच्याइतकी भीतीदायक आणि बिकट बाई मी त्यानंतर कधी आयुष्यात पहिली नाही. आपण जे करतो आहोत त्याची त्यांना जरासुद्धा लाज कशी वाटत नसेल?
साध्या दिसणारया माणसांचे प्रश्न इथे सुरु होतात , ते संपत कधी नाहीत. त्यांची लग्ने होताना त्यांचे रूप आड येते. आपण कसेही दिसत असलो तरी सगळ्यांना मुली मात्र सिनेमातील नटी सारख्या हव्या असतात. आपल्या सिनेमातला हिरो कसाही काळासावळा असला तरी नटी मात्र गोरी आणि सुंदरच लागते. कुठलाही मराठी सिनेमा आठवून पहा. काळ्या नट्यांना आई ,मावशी , मैत्रीण अश्या भूमिका किंवा मग सरळ सामाजिक चित्रपटात समाजसेविकेच्या किंवा शिक्षिकेच्या भूमिका कराव्या लागतात. असा हा काळ आहे. महाराष्ट्र , तामिळनाडू , आंध्र , केरळ ह्या राज्यातील सर्व सिनेमात हिरो कसाही दिसला तरी चालतो पण मुलगी गोरीपान आणि देखणी असावी लागते हा सिनेमाच्या धंद्याचा नियम बनवून ठेवला गेला आहे.
हल्ली लग्नाच्या ज्या वेबसाईट उघडल्या आहेत तिथे फोटो टाकावा लागतो. जी मुले आणि मुली सुंदर असतात , गोरी असतात त्यांना आपसूक जास्त लग्नाच्या मागण्या येतात. मुलींनासुद्धा फक्त गोरे आणि देखणे नवरे असले कि पुरे असे वाटते. माझ्या आजूबाजूच्या कुटुंबातील अनेक मुलींनी कोलेजच्या वयात एकापेक्षा एक अश्या बिनडोक गोऱ्या मुलांशी लग्ने केली आणि आता त्या चाळीशीला आल्यावर पस्तावून बसल्या आहेत. आमच्या घरातसुद्धा अशी घाइने दिसण्याच्या प्रेमात पडून केलेली बरीच लग्ने मोडली. दिसणे आयुष्यभर पुरत नाही हे त्यांना तरुण वयात कधीच कळले नाही. माझी एक मोठी बहिण सरळ आणि शहाणी निघाली जिने रूपापेक्षा त्या माणसाचे गुण पहिले. मला तिचे फार कौतुक आहे. माणसाचे मन काय आहे , त्याचे विचार कसे आहेत , त्याच्या आवडीनिवडी आपल्याशी जुळतात का ह्याचा विचार सोयरिक जुळवताना जवळजवळ केला जात नाही. अनेक व्यवसाय आणि नोकऱ्या अश्या आहेत जिथे दिसण्याने छाप पाडणार्या माणसांनाच कामाला ठेवून घेतले जाते. मग उरलेली साधीसुधी दिसणारी माणसे आपले आयुष्य कसे जगत असतील ? मोठ्या शहरामध्ये जगताना जो एक सतत आत्मविश्वास गोळा करत राहावा लागतो तो कुठून गोळा करत असतील ? त्यांना त्यांची प्रेमाची माणसे “ तू छान दिसतोस किंवा तू छान दिसतेस , असे कधी म्हणत असतील का ? मला स्वतःला माझ्याविषयी हा प्रश्न अनेकवेळा पडला आहे आणि त्यामुळे तो मला इतरांविषयीसुद्धा पडतो.
अशी समाजाकडून अप्रत्यक्षपणे दुखावलेली आणि बाजूला सारलेली माणसे मग गोरे होण्याची क्रीम वापरतात. अघोरी व्यायाम आणि चुकीची उपासमार करून बारिक होण्याचे प्रयत्न करत राहतात. उंची वाढवणारी फसवी औषधे घेतात. tv च्या जाहिराती पाहून वेगवेगळ्या जडीबुटी घेत राहतात. सुंदर दिसण्यासाठी दातांचे आकार बदलून घेतात. अनेक चुकीचे सल्ले घेऊन शरीरावर शस्त्रक्रिया करून घेतात. केसांचे विग शिवून घेतात. टक्कल होते म्हणून हसणारा समाज तुम्हाला तुम्ही विग घातलीत तरीही हसत बसतो. ह्या सगळ्या उपायांचे माणसाच्या मनावर खोलवर परिणाम होत असतात. माझ्या मापाचे कपडे मोठ्या दुकानात मिळेनासे झाले म्हणून एका काळात मी महागडे बूट खरेदी करायचो. कारण मोठ्या ब्रांड चे काहीतरी आपल्याकडे हवे अशी ओढ मला वाटायची. माझ्या मापाचे दुकानात फक्त बुटच मिळायचे. दुकानात कपडे घ्यायला गेलो कि तीथले सेल्समन मला अनेक वेळा चेष्टा करून सांगत कि माझ्या मापाची रेडी मेड pant मिळणार नाही. ह्या गोष्टीमुळे मी रागावून व्यायामाला लागलो. आनंदाने आणि किंवा चांगल्या प्रेरणेने नाही. आणि त्यामुळे चांगल्या व्यायामाचे फायदेसुद्धा मला कधी मिळाले नाहीत.
माझी एक मैत्रीण मला म्हणाली कि तिने चरबी कमी करण्याची शस्त्रक्रिया करून घेतली कारण तीचा नवरा खाजगीत तिच्या बाळंतपणा नंतर वाढलेल्या कमरेबद्दल मित्रांसमोर चारचौघात तिची चेष्टा करून हसू लागला. त्या शस्त्रक्रियेनंतर तिला खूप त्रास झाला.
आपण लोकांची सतत चेष्टा केली नाही तर आपला काही तोटा होयील का ? काळ्यासावळ्या , जाड्या , टकल्या , दात पुढे असलेल्या, चष्म्याचा मोठा नंबर असलेल्या ,पायावर मोठी काळी जन्मखुण असलेलेया अश्या सगळ्या माणसांनी काय करावे अशी लोकांची अपेक्षा असते ? चुकीचे आणि अशुद्ध बोलणाऱ्या माणसाला आपण कधी पुढे येण्याची संधीच देणार नाही का ? लहानपणी केस पांढरे झालेल्या मुलीला कुणी लग्नाला स्वीकारणार नाही का ? सुंदर आणि smart असण्याची हि काय सक्ती आहे ?