ISTANBUL DIARIES – part 1 . 2015.

Bosphorous  चा पूल . पुलाचा अनुभव घेणे , म्हणजे पुलावरून नदी ओलांडणे? कि तो पूल लांबून काठावरून पहाणे ?

तुम्ही या शहरामध्ये जरा पूर्वी यायला हवं होत . पूर्वी या शहराचे सौंदर्य दसपट चांगल होतं . हे वाक्य जगातल्या प्रत्येक शहरातली माणसे आपल्याला सांगतात , तसे इथल्याही भरपूर माणसांनी सांगितले .

इथे रस्त्यातून मध्येच काही फ्रेंच बायका चालत जाताना दिसतात .त्या बहुदा इथल्या फ्रेंच कल्चरल सेंटर मध्ये काम करणाऱ्या मुली असतात .त्यांच्या चेहऱ्यावर , ” ही मी कुठे नोकरीपायी येउन पडले इथे ? प्यारीसात होते तीच बरी होते ” असे भाव असतात .
इस्तंबूल . २०१५ 

सुट्टी घ्यायची आहे ती कशापासून ?

एखाद्या जागेविषयी आधीपासून वाचून माहिती असली , कि त्या शहराविषयी एक melancholy मनामध्ये तयार होते. त्या शहराची ती पहिली भेट नसते . ओरहान पामुक ह्या सुप्रसिद्ध टर्कीश लेखकाच्या साहित्यामधून मी या शहराला आधी कितीतरी वेळा भेटलेलो आहे . मला या शहरातल्या रस्त्यांची नावे आणि काही भाग इथे येण्याआधीच माहिती आहेत .असं वाटतंय कि आपण इथलेच होतो . बरीच वर्ष दूर निघून गेलो होतो . आणि आता परत आलो आहोत.

सुट्टी घ्यायची आहे ती कशापासून ? कामाची दगदग आणि दमवणूकीपासून? ओळखीच्या त्याच त्याच ठिकाणांचा कंटाळा आलाय ?

मी नव्या शहरामध्ये गेलो कि त्या शहरातल्या इतिहासाचे दमवून टाकणारे compulsion काढून टाकायचा प्रयत्न करतो . राजवाडे , चर्चेस , towers हे सगळ पाहायलाच हव , तिथे जायलाच हव , हा सगळा दबाव . मला ह्या शहराशी शांतपणे गप्पा मारायच्या आहेत . , त्या मारताना मध्येच आला तो सुप्रसिद्ध राजवाडा तर मी तो पाहून घेईन . आणि शिवाय संपूर्ण देश बघायची धावाधाव करणे शक्यच नाही . आपल्या मोजक्या आयुष्यात आणि मर्यादित आर्थिक परिस्थितीत अनेक शहरे पाहून होतील . त्या प्रत्येक शहरात आपण असू तेव्हा शांतपणे रेंगाळायला हवं . प्रेक्षणीय जागा बघत हपापलेली धावाधाव नको . एक शहर समजून घ्यायला हाती असलेले दिवस पुरत नाहीत . त्यात देश कुठे बघत बसणार ? आमच्या ओळखीची अनेक कुटुंबे आहेत , जी वाघ मागे लागल्यासारखी तीस चाळीस जण एकत्र जातात आणि युरोपातल्या आठ दहा देशांचा फडशा पाडून पुण्यात परत येतात . माझ्या अंगात देवाने अशी काही शक्तीच दिलेली नाही. मी अजिबातच या शहराबाहेर पाऊल ठेवणार नाही असे स्वतःला आणि माझ्यासोबत आलेल्या माझ्या मैत्रिणीला बजावतोय .

20151112_110347~2#1

मी आणि सई विमान उतरताना खिडकीबाहेर दिसणाऱ्या शहराकडे बघत बसलो होतो . तेव्हा मी Air Hostess शी गप्पा मारल्या . मग दुपारी ट्राम ची तिकिटे विकणाऱ्या आजोबांशी आणि संध्याकाळी एका कॅफे मधल्या एका अतिशय देखण्या वेटरशी . हे शहर अनोळखी लोकांशी बोलणारे शहर आहे. दुपारी ट्राम मध्ये चढताना तिकिटांचे घोळ झाले ते एका तरुण मुलीने निस्तरून दिले . तेव्हा तिने मला आणि सईला खाणाखुणा करून विचारले कि तुम्ही नवराबायको आहात का ? असं काही मला मुंबईत कोण विचारेल ? मीच संकोचून गेलो आणि हसून नाहीनाही असे म्हणत बसलो .

काल दुपारी मी ओरहान पामुकला मनामधून बाजूला करण्याचा प्रयत्न केला . मला माझे माझे इस्तंबूल पाहूदे . पण तो जातच नाही . त्याचा हात खांद्यावर आहेच . आणि त्याच्या लिखाणातून मला मिळणारी उर्जा मनामध्ये सतत भरून राहिली आहे . तोसुद्धा जायला नको असेल तर मला सुट्टी कशापासून हवी आहे ?

20151111_142513~2

घर बॉस्फरसच्या खाडीसमोर एका उंच टेकडीवर आहे . ह्या शहरातल्या जुन्या बेयोग्लू नावाच्या भागात . ओरहान पामुकच्या The strangness in my mind ह्या नव्या कादंबरीचा नायक , रोज रात्री त्याची खाद्यपदार्थ विकण्याची ढकलगाडी ढकलत ढकलत ज्या अवघड चढावरून चढत जातो , त्याच वळणावळणाच्या रस्त्यावर आमचे हे जुने apartment आहे . लिफ्ट नाही . मजला चौथा .आणि आमच्यासोबत  भरपूर bags . घराला एक प्रशस्त गच्ची , ज्यातून समोर समुद्र आणि त्यात दिवसभर निवांत फिरणारी जहाजे आणि बोटी दिसतात . सीगल पक्षी सतत डोक्यावर संथपणे फिरतात आणि आजूबाजूच्या कौलांवर बसून मोठमोठ्या आवाजात एकमेकांशी गप्पा मारत बसतात . मी माझी निळ्या रंगाची आवडती लिहायची वही घेऊन सकाळी गच्चीत बसलो आहे . नेहमीप्रमाणे नवं घेतलेला पेन हरवून बसलो आहे म्हणून तीन पेन्सिली आणि टोकयंत्र आयत्यावेळी bag मध्ये भरलं .

अपार्टमेंट आठ दिवसांसाठी भाड्याने घेतले आहे . काल रात्री सुलतानअहमेत ह्या जुन्या भागातून चालून परत येताना एका दुकानातून अंडी, ब्रेड ,चीज, बिस्किटे , टर्किश कॉफी, दूध , कपडे धुवायचा साबण असे सगळे घेवून आलो . सकाळी उठल्यावर मग आपल्या घरात जागे झाल्यासारखे वाटले आणि बरे वाटले . हॉटेल मध्ये राहत नाही आहोत , घरात आहोत असे समाधान मिळाले . मग मला सुट्टी नक्की कशापासून हवी आहे ?

पहिल्यांदाच एक आळशीपणा करायला शिकलो आहे . Bag मधले समान काढून घरातल्या कपाटात लावलेले नाही . त्यामुळे घरामध्ये कपडे अस्ताव्यस्त पसरले आहेत . कपडे , अनेक बूट, गॉगल , jackets , किल्ल्या , माझे पाकीट , तिची handbag , towels .अश्या ठिकाणी राहायची नव्याने करून घेतलेली सवय म्हणजे सुट्टी . काल रात्री एका जुन्या इमारातीतल्या मोठ्या घुमटाखालच्या खोलीमध्ये इथल्या प्रसिद्ध Whirling Derwishes ची सेमा नावाची dance ceremony बघायला गेलो होतो आणि तेव्हा जलालुद्दीन रुमी मनामध्ये अवतरला .माझ्या अतिशय जवळचा कवी . इथे टर्की मध्ये कोन्या इथे त्याची समाधी आहे .

We have a huge barrel of wine but no cups . Thats fine with us . Every morning we glow and in the evening we glow again . They say there is no future for us . They are right . Which is fine with us  

– Jalalludin RUMI . 

मी इथे येताना रुमीला संपूर्णपणे विसरून कसा गेलो होतो ? आमच्यासमोर मंद प्रकाशात , मोठे पांढरेशुभ्र झगे घातलेले आणि उंच काळी टोपी परिधान केलेले दरवेश हात आकाशाकडे करून स्वतःभोवती गिरक्या घेत तल्लीन झालेले . निसर्गाशी , सृष्टीशी , आत्म्याशी नाते जोडत . हे विश्व साकारल्याबद्दल देवाचे आभार मानत . माझ्या जवळ बसलेलेया एका मुलाच्या डोळ्यातून ते दृश्य बघताना घळाघळा पाणी वाहायला लागले मला त्याक्षणी मला सुट्टी कशापासून हवी आहे ह्याची गडद अनुभूती तयार झाली . त्या अनुभवाचे शब्द मनात तयार होइनात . मन फक्त ओलसर झाले . मग बाहेर पडून सई आणि मी खाडीसमोरच्या एका बाकावर बसून शांतपणे सिगरेट ओढत कॉफी पीत बसून राहिलो .

आम्ही राहतो तो जीहांगीर हा भाग Paris मधल्या मोन्मार्त्रसारखा आहे . खूप जुना परिसर . दोन तीन टेकड्यांवर पसरलेला . आणि त्या टेकड्यांवरचे एकमेकाला समांतर असे रस्ते . त्यांना जोडणारे दगडी पायऱ्यांचे जिने. जिन्यांच्या दोन्ही बाजूंना जुन्या इमारती . अरुंद रस्त्यांवरची कॅफे , जुन्या बेकऱ्या आणि छोटी दुकाने , जिथे दुकानदार सगळ्या शेजारच्या गिऱ्हाईकांना ओळखतात . अतिशय अरुंद असे अनेक जिने चढून धापा टाकत घरामध्ये गेल आणि गच्चीचा दरवाजा उघडला कि सगळा शीण निघून जातो . गच्चीतून समोर खाडीच्या पलीकडे आशियाचा किनारा दिसतो . इस्तंबूल हे शहर आशिया आणि युरोप ह्या दोन खंडांमध्ये विभागले गेले आहे . निम्मे शहर युरोपमध्ये , निम्मे आशियात . मध्ये bosphorous ची खाडी . सकाळी शेकडो लोक आशियायी भागातून खाडीतल्या बोटींवर चढून युरोपात कामाला येतात आणि संध्याकाळी परत जातात . आपण पाश्चिमात्य आहोत कि पौर्वात्य आहोत ह्या संभ्रमात सतत जगणारे हे शहर . ह्या संभ्रमातून ह्या शहराने फार सुंदर स्वरूप घेतले आहे . जे जगात इतर कोणत्याही शहराकडे नाही .

जुन्या रोमन साम्राज्याची हि प्रसिद्ध आणि श्रीमंत राजधानी , Bayzentium म्हणून ओळखली जाणारी , त्यानंतर ओट्टोमान सुलतानांनी हे शहर ताब्यात घेऊन इथून ख्रिश्चन धर्म क्रूरपणे मिटवून टाकून ह्या शहराला आपल्या प्रचंड ओट्टोमान साम्राज्याची राजधानी बनवले. Bayzentium , constantinople आणि इस्तंबूल ह्या शहराची हि तीन नावे . Constantinople बद्दल शाळेत अख्खा धडा होत. पूर्वेकडून निघणारा सिल्क रूट नावाचा खुष्कीचा मार्ग , पर्शियातून जात जात Constantinople पर्यंत पोचत असे. तिथे युरोप आणि आशियाची व्यापारी देवघेव चाले . इथे गुलामांचा जगातला सगळ्यात मोठा बाजार होता. चीन , भारत इथून मसाले , रेशीम , धान्ये घेऊन व्यापारी अख्खा आशिया ओलांडत इथे येत आणि युरोपशी व्यापार करित. ते हे शहर . आजचे इस्तंबूल .

ओट्टोमान साम्राज्याचा पहिल्या महायुद्धात पाडाव झाल्यानंतर , केमाल पाशा अतातुर्क ह्या मिलिटरी अधिकार्याने बंड करून हा देश ताब्यात घेतला आणि ह्या देशाला , ह्या शहराला मध्ययुगातून जागे करून आजचे आधुनिक स्वरूप दिले. युरोपची कास धरायला लावली . भाषा, लिपी,  पेहराव बदलले. आणि आता एकविसाव्या शतकात नव्याने कात टाकताना ह्या शहराने नवे प्रवाह स्विकारले अरब , फ्रेचं आणि जर्मन रंग स्वतःवर चढवून घेतले. अनेक माणसांनी राहून राहून अनेक वेळा सजवलेल , रंगवलेल जुने सुंदर घर असावे तसे काहीसे ह्या शहराचे झाले आहे .

चुकुर्जुमा ह्या एका निवांत आणि रंगीत भागामध्ये Museum Of innocence आहे . Innocence ला तुर्कि भाषेत ‘ मासुमीयत ‘ असे म्हणतात . ओरहान पामुकच्या Museum of innocence ह्या कादंबरीतील पात्रांच्या जगाबद्दल हे Museum आहे . जुन्या नाजूक वस्तूंचे . ह्या वस्तू कादंबरीच्या नायकाने , केमालने , फ़ुसुन ह्या आपल्या प्रेयसीची आठवण काढताना जमवल्या , पहिल्या , वापरल्या . तिच्या आठवणीत त्याने ओढलेल्या ४२३१ सिगारेटींची थोटके एका मोठ्या भिंतीवर लावली आहेत . आणि त्याखाली प्रत्येक सिगारेट ओढताना त्याला आलेली तिची आठवण एका ओळीत लिहिली अहे. इथूनच संग्रहालयाच्या अनुभवला सुरुवात होते जुने Typewriters , इस्तंबूल मधील लोकांचे असंख्य जुने बोलके फोटो , इस्तंबूलमधील राजांनी नव्हे तर सध्या माणसांनी वापरलेल्या अनेक वस्तू ज्या ह्या कादंबरीच्या वर्णनात आल्या , जुने साबण , जुने फोन , कात्र्या , घड्याळे , फुसून चे शहरात जागोजागी पडलेले दागिने , तिचा एक बूट , तिच्या कुटुंबातील लोकांचे कपडे , तिच्या आठवणीत , तिची वाट पाहत त्याने प्यायलेला चहाचा कप , जुन्या फ्रेंच परफ्युमच्या बाटल्या ,सर्व काही अद्भुत असे आणि हळूवार प्रेमाने मांडलेले . एका जुन्या हवेलीच्या तीन माड्या भरून हा प्रेमाचा पसारा सदर केला आहे . हे प्रदर्शन कादंबरीतल्या कल्पित पात्रांच्या वस्तूंचे असले तरीही ते इस्तंबूलमध्ये १९७० पासून आजपर्यंत जगणाऱ्या माणसांच्या आयुष्याचे आहे . पर्यायाने ते ह्या शहराचे एक सुंदर जुने कपाट आहे . ओरहान पामुकचे आपल्या ह्या शहरावर किती प्रेम आहे हे ह्या वस्तू बघताना जाणवते . शहरातल्या जुन्या माळ्यावरच्या वस्तू , जुने बझार , लोकांनी फेकून दिलेल्या वस्तू १९९० सालापासून नित जमवायला लागून त्याने परिश्रमपूर्वक हे संग्रहालय उभे केले. गेल्या पन्नास वर्षात माझ्या शहरातील लोक कसे जगले ह्याची मूकपणे गोष्ट सांगणारे हे संग्रहालय .

These were innocent people . So innocent that they thought poverty a crime which wealth would allow them to forget . 

तुर्की भाषेमध्ये “हुझुन ” हा शब्द आहे . हुझुन म्हणजे Melancholy . म्हणजे दु:ख नव्हे . ती एक जागृत हळवी उदास अवस्था आहे . प्रेमामधून तयार झालेली . मी खूप चांगले काही पहिले आणि अनुभवले , आणि ते पाहताना माझी जवळची व्यक्ती सोबत नसली कि अशी अवस्था वारंवार मनामध्ये तयार होते. आणि मग नकळत मी त्या व्यक्तीशी मनामध्ये संवाद साधू लागतो . i wish you were here. मी तुझ्या नजरेतून हे सगळ पाहतोय . हे सगळ मी तुझ्यासाठी शोषून घेतोय . आणि ह्या अद्वितीय आनंदामधून आपण दोघे मिळून काहीतरी पेरू.

12273629_10153395663054331_2633373712108862045_o

इस्तंबूल हे आपली भाषा येत नसली तरी आपल्याशी गप्पा मारणारे शहर आहे . मराठीमध्ये प्रश्न विचारल तरी काही न काही उत्तर मिळेल . इथली माणसे आडमुठी नाहीत . रस्त्यावर ग्रीक , इंग्लिश , फ्रेंच भाषा ऐकू येतात . तुर्कि भाषेतले अनेक शब्द हिंदी , उर्दू ला जवळचे आहेत . त्यांना इंग्लिश येत नसले तर इथली माणसे आपल्याला खाणाखुणा करून , प्रसंगी आपल्यासोबत चालत येउन पत्ता सांगतात . काल मी एका चारशे वर्षे जुन्या हमाखान्यात जाऊन अंग रगडून घेतले. ही इथल्या स्थानिक स्नानाची जुनी परम्परा . मला तासभर मालिश करून पुढचा तासभर कढत पाण्याने अंघोळ घालणारा तुर्की माणूस मला मोठमोठ्यांदा राजकपूर आणि नर्गिस ची गाणी गावून दाखवत होता . त्याने आवारा हा चित्रपट दोनदा पहिला होता . दुसऱ्या कोणाकडून अंघोळ घालून घेण्याचे लाडावलेले परमसुख भारतीयांना फक्त लहानपणीच मिळते . त्यानंतर जर तुमची प्रेयसी किंवा तुमचा प्रियकर जर रंगीत मनाचा असेल तर नवे प्रेम असेपर्यंत तो किंवा ती तुम्हाला अंघोळ घालतात . ( म्हणजे असावेत . मी काही वेळा ऐकले आहे . असो ) तुर्कस्थानात मात्र हे सुख अमाप . आठवड्यातून दोनदा मित्र मैत्रिणीना घेऊन हमाम्खान्यात जायचे आणि गावगप्पा मारत मस्तपैकी अंघोळ घालून घ्यायची . माझ्या अंगातला फार जुना मळ ह्या आंघोळीने काढून टाकला . पहिल्या स्नानानंतर एक लांबलचक बाष्पस्नान . एका महालासारख्या संगमरवरी खोलीमध्ये . मग पुन्हा अंगाचे मर्दन आणि मग शेवटचे मऊ फेसाचे स्नान . बाहेर पडल्यावर हातापायाचे स्पंज झालेले असतात . कोपर्यावरच्या बर मध्ये जाऊन राके हि स्थानिक दारू पिणे आणि घरी जाऊन झोपणे हि दोनच कामे त्यानंतर करता येतात

मी इथे एकटा आलेलो नाहीये . माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे . आणि ती नुसती मैत्रीण नसून एक नटी पण आहे . त्यामुळे ती सतत चांगले कपडे दिसले कि धावत सुटते आणि दुकानात शिरते. मागेमागे मी . मग मी तिथल्या दुकानदार बायांशी गप्पा मारत बसतो . मला भारतात मुलींसोबत खरेदीला जाण्याचा न मिळणारा अनुभव इथे सुट्टीला येउन इस्तंबुलमध्ये दिल्याबद्दल मी सईचे पायाला हात लावून आभार वगरे मानतो . मी तिथे गेल्याबद्दल मग ती माझ्यामागे इथल्या modern art gallery मध्ये येते , जिथे मी जवळजवळ रोज जातो . आणि गंभीर चेहरा करून शांतपणे इथली पेंटींग्स आणि installations पाहत बसते. उद्यापासून इथे तरुण दिग्दर्शकांच्या फिल्म्स चा एक फेस्टिवल सुरु होणार आहे . आम्ही दोघांनी तिथे जाऊन काही सिनेमे पहायचे ठरवले आहे .

इस्तंबूलमध्ये सध्या त्यांच Biennal म्हणजे दोन वर्षातून एकदा होणारे महत्वाचे राष्ट्रीय चित्रप्रदर्शन चालू आहे . जगातल्या अनेक शहरांमध्ये द्वैवार्षिक प्रदर्शने होतात , ज्यात इतर देशांमधील कलाकार जाऊन भाग घेतात . Venice ला होणारे Biennale त्यातले सगळ्यात महत्वाचे . भारतामध्ये केरळमधील कोची शहरात असे द्वैवार्षिक दृष्यकलेचे प्रदर्शन भरते . ह्यावर्षी इस्तंबूल मध्ये होणाऱ्या प्रदर्शनाचा मुख्य विषय Architecture हा आहे . Istanbul MODERN हे इथले आधुनिक राष्ट्रीय कलासंग्रहालय . समुद्रकाठच्या एका जुन्या भल्यामोठ्या गोदामाच्या जागी ते उभे केले अहे. तिथे एक मोठे वाचनालय , एक theater , भल्यामोठ्या art galleries आणि एक देखणे कॅफे असे पसरलेले आहे . मी दिवसातून एकदातरी काही न काही पाहायला इथे येतोच .

12240021_10153391515964331_4770140639199484913_n

देखणा आणि हसरा २३ वर्षांचा युसुफ आम्हाला एका कॅफे मध्ये भेटला .एका कार्यक्रमाला जायचे होते आणि आम्ही त्याजागी फार लवकर पोचलो . माझी नेहमीची सवय . घाईघाई करत लवकर घरातून निघायचे . कारण मुंबईत कुठेही पोचायला कितीही वेळ लागू शकतो . इथे आम्ही ट्राम मध्ये बसून पंधरा मिनिटात त्या भागात हजर होतो . मग वेळ काढायचा म्हणून आम्ही एका कॅफेमध्ये गेलो. तिथे युसुफ वेटरचे काम करत होता . University मध्ये economics शिकणारा . football खेळणारा . पण आता पायाला छोटीशी इजा झाल्यामुळे football मध्ये करीयर न करू शकलेला . आम्ही तिथे बराच एल बसून होतो , तेव्हा त्याच्याशी गप्पा झाल्या . मी हमाखान्यात गेलो असताना वेळ काढायचा म्हणून सई पुन्हा तिथे गेली त्याला म्हणाली कि उद्या आमच्यासोबत बोटीवर फिरायला येतोस का ? आम्हाला शहराचा आशियाचा भाग पहायचाय . तो लगेच तयार झाला आणि दुसर्या दिवशी युरोपातल्या शहरातून आम्ही तिघे आशियातल्या इस्तंबूलमध्ये गेलो. कोणतेही प्लान्स न करतो भरपूर भटकलो , पुस्तकांच्या दुकानात गेलो , त्या भागात marxist party ने चालवलेल एक उत्तम restaurant आहे तिथे तुर्कि beer आणि स्थानिक जेवण जेवलो . आणि समुद्राकाठी हिरवळीवर पडून राहिलो .

फारुकला अंशतः रंगांधळेपणा आहे . त्याला मोजकेच तीन चार रंग दिसतात . आपल्याला दिसतात तेव्हढे दिसत नाहीत . त्याने turkish beer प्यायला नकार दिला , त्याला italian beer हवी होती . एक इंग्लिश वाक्य जुळवून बोलायला तो दहा मिनिटे घेत असे , पण त्याच्याशी आमच्या खूप जास्त मोकळ्या आणि चांगल्या गप्पा झाल्या . आकाशातला देव बिव आपल्याला मान्य नाही हे कळल्यावर मग तो एकदम मोकळा झाला आणि आपल्याला आपल्या शहराचा कसा कंटाळा आला आहे हे सांगू लागला . तुम्ही टुरिस्ट लोक येउन इथे जे बघता ते बघायला मी आजपर्यंत एकदाही गेलेलो नाही . मी त्याला म्हणालो घाबरू नकोस मी पण अजून एकदाही शनिवारवाडा आतून पाहिलेला नाही . माझ्या घरापासून पाच मिनिटावर आहे तरीही

रात्री आम्ही फिल्म फेस्टिवल ला गेलो तिथे तो आमच्यासोबत आला आणि चित्रपट संपल्यावर दिग्दर्शक आणि नटांशी झालेल्या चर्चेत त्याने आमच्या दुभाष्याचे काम केले. ती तुर्कि फिल्म फारच अंगावर येणारी होती . लग्नाआधी मुलीनी जर पुरुषांशी शरीरीक संबंध ठेवले , तर लग्न ठरल्यावर त्यांना डॉक्टर कडे जाऊन hymen शिवून घ्यायचे operation करावे लागते . कारण इथे लग्नाची मुलगी virgin असली पाहिजे असा पुरुषांचा आग्रह असतो . इस्तंबूल मध्ये दररोज अशी शेकडो operations होतात . आपण जो समाज बघायला कौतुकाने जातो , तिथल्या लोकल फिल्म्स पहिल्या कि त्या समाजाची त्वचा उचलून आत काय व्यवहार चालतात ते बघता येतात . कारण इस्तंबूल सारखी tourist लोकांनी भरलेली शहरे स्वतः चा एकच चेहरा दाखवतात जो बघायला प्रवाशांना आवडतो . महाल , राजवाडे आणि चर्चेस . इथे या राजाने पाणी प्यायले,   इथे त्या राणीने खुनाचे कारस्थान केले. चीनी जपानी भारतीय आणि अमेरिकन प्रवासी हे सगळ पटापटा पाहून फोटो काढून लगेचच निघून जातात.

आया सोफिया हि भव्य मशीद ( रोमन काळातील चर्च ) आणि इथल्या सुलतानाचा तोपकापी राजवाडा हि इस्तंबूलमधील भव्य आणि देखणी वास्तुशिल्पे tourist लोकांनी बुजबुजलेली आहेत . ह्या सुंदर वस्तू बघायला आणि त्याच्या वास्तुरचना समजून घ्यायला जी शांतता हवी ती इथे मिळूच शकत नाही . याचे कारण जाऊ तिथे लागलेल्या भल्या मोठ्या रांगा . आया सोफिया चा इतिहास रक्तरंजित आणि नाट्यमय आहे . मी आजपर्यंत इतकी देखणी भव्य आणि श्रीमंत वास्तू फक्त रोममध्ये पहिली आहे . आग्रा जसा ताजमहालामुळे ओळखला जातो तसे आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्तंबूल ची ओळख ह्या दोन वास्तू आहेत . माझा असा स्वप्न आहे कि पुन्हा एकदा आया सोफिया पाहायला जावे आणि त्यादिवशी तिथे चिटपाखरू नसावे .

सामान्य माणसाच्या हातात स्वस्तातला डिजिटल कॅमेरा आल्यापासून माणसाने शांतपणे डोळ्यांनी अनुभव घेणे आणि ते मनामध्ये साठवून ठेवणे हे जवळजवळ बंद केल आहे . वाघ मागे लागल्यासारखी माणसे जाऊ तिथे पटापटा फोटो काढत सुटतात . त्यातले जवळजवळ सर्व फोटो वाईट असतात . सेल्फी ह्या प्रकाराने माणसाला वेड लागल्यासारखे लोक वागत सुटतात . अनेक सेल्फ़ि मध्ये लोकांचे हसरे चेहरे आणि वाईट दात दिसतात , मग हे फोटो घरात बसून नसते का काढता आले? डिजिटल कॅमेरे आल्यापासून आता मला खर्या photographers च महत्व कळायला लागले आहे . त्यांच्या कामाचा आनंद घेत येऊ लागला आहे . कोणतीही गोष्ट साध्या माणसाच्या हातात गेली , कि माणूस लगेच तिचा गैरवापर सुरु करतो . चांगले फोटो काढणे सगळ्यांना जमत नाही . जसं चांगली गाडी चालवणे सगळ्यांना जमत नाही , चांगलं भांडायला सगळ्यांना जमत नाही , चांगली साडी सगळ्यांना नेसता येत नाही तसेच फोटोग्राफीचे आहे . मला परक्या शहरात गेलं कि चांगले फोटो काढता येत नाहीत . मला काढावेसे वाटत नाहीत . शहर डोळ्यात , मनात भरून घ्यावास वाटत . आपल्याआधी इथे आलेल्या कितीतरी लेखकांच्या , फिल्म मेकर्स च्या नजरेतून हे शहर पाहत असतो ती नजर सावकाश उतरवून , आपली नजर सावकाश चढवून त्या शहराचा अनुभव घ्यावा लागतो

to be continued. ….

 

5 thoughts on “ISTANBUL DIARIES – part 1 . 2015.”

  1. Very nice well described. मला मराठी ब्लाॅग वाचून खूप जवळचा वाटला. प्रवासवर्णन व परखड इतिहास दोन्ही अनुभवल्यासारखे वाटले.

    Like

  2. What a diary ! I just long to read its second part asap. Look at the humour , the subtle shade of humour you paint throughout your text … the quality is diminishing in contemporary writing in Marathi. You expect my critical essay on this one once all your diary parts are out ☺ and sachin , recently and coicidently , on the very same line , i wrote a travelogue on wordpress itself , do read in if you find some time …

    Like

  3. It reminded me the marathi novel ” Mahanagar ” by Ramesh Mantri …..only difference, he travelled in UK with his Dutch friend Anna. Ofcourse, Sachin has followed a different path …sort of philosophical, spiritual…to listen and follow inner voice. Great. Keep writing.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s