Istanbul Diaries Part 2 .

एका हातामध्ये सिगरेट धरून एका हाताने शांतपणे वहीत लिहित बसणे आणि हे लिखाण रस्त्याशेजारच्या कॅफेमध्ये बसून करणे हि कला मी जुन्या फ्रेंच लेखकांचे फोटो पाहून शिकलो . असे बसून लिहिताना मनामध्ये स्वतःबद्दल एक उबदार ग्लोरी तयार होते. इथे तुर्कस्थानात चहा ला आपल्याप्रमाणेच “चाय” म्हणतात . तो लागतो थोडा वेगळा , त्यात न दूध असते न साखर आणि ज्या सुबक पेल्यामधून आपल्याला देतात  ते काचेचे पेले हि इथली खासियत . चाय चे घुटके घेत मी दिवसभर इथेतिथे बसून लिहित बसतो . बहुदा हीच माझी शहरांचे फोटो काढायची पद्धत आहे .

नव्या शहरात गेल्यावर त्यांची कॉफी आणि स्थानिक बियर प्यायली कि त्या चवीपासून शहराची ओळख व्हायला सुरुवात होते . माणसांची ओळख नंतर सावकाश होते. ब्रेड , फळं , त्याजागी तयार होणारे चीज ह्या गोष्टी तुमच्याशी आधी गप्पा मारायला लागतात . इस्तंबूल हे पर्यटनाचे केंद्र असल्याने इथे अस्सल तुर्की जेवण मिळवायच्या जागा नीट शोधून काढाव्या लागतात . शिवाय इतक्या प्रकारच्या मिश्र संस्कृतीची माणसे इथे राहून गेली आहेत कि इथल्या स्थानिक अन्नसंस्कृतीवर अरबी , ग्रीक आणि पूर्व युरोपातील पाककलेचा खूप प्रभाव आहे . जेवणात भाज्या घातलेली omlettes , हरतर्हेचे कबाब , सलाड्स आणि ayran नावांचे दह्यापासून बनवलेले पेय असते . इथे ताजे मासे मुबलक मिळतात . संध्याकाळी इथे मासा भाजून त्याला मीठ मिरपूड चोळून तो एका छोट्या ब्रेड मध्ये ठेवून तयार केलेली sandwiches लोक खातात . आपल्या वडा पाव सारखे हि sandwiches विकणाऱ्या गाड्या जागोजागी असतात . इथली स्थानिक माणसे सुऱ्या चमचे बाजूला टाकून हाताने खायला लाजत नाहीत . तरुण मुलांना मात्र लवकरात लवकर युरोपिअन व्हायचे असते त्यामुळे ते असे काही करत नाहीत . रोज संध्याकाळी इथे तीळ लावलेले गरम गरम ब्रेड गाडीवर मिळतात त्याला simit असे म्हणतात . भाजलेल्या chestnuts आणि कणसे हिवाळ्यात लोक सतत खात उभे असतात . इथल्या खायच्या जागा सध्या आणि अगत्यशील आहेत . बहुधा तिथे काम करणारी माणसे आजूबाजूच्या खेड्यांमधून स्थलांतरित झालेली असतात . अनेक ठिकाणी मुंबई पुण्यासारखी होम delivery ची पद्धत आहे . चहा ची दुकाने तर अमाप आणि तिथे कट्टा टाकून बसणारे रोजचे लोक पुष्कळ . बीफ अतिशय चविष्ट बनवतात . भाताचे अनेक प्रकार त्यासोबत देतात . उन्हाळ्यात जागोजागी ice cream च्या छोट्या छोट्या गाड्या उभ्या असतात . इथले मसाल्याचे आणि धान्याचे जुने बझार आहेत ते जवळजवळ किलोमीटरभर लांबलचक आहेत . आणि मिठायांची तर बातच सोडा . हजारो प्रकारच्या तुर्की मिठायांनी सजलेली दुकाने कोपऱ्याकोपऱ्यावर आहेत . दूध बदाम पिस्ते जर्दाळू घालून बर्फिसारख्या अनेक मिठाया हे लोक बनवतात . त्याचे शंभर पाचशे प्रकार मिळतात . इथल्या तरुण मुलांना मात्र उठता बसता italian जेवण जेवायचे असते . आपल्या स्थानिक जेवणाचे त्यांना कौतुक नसते हे उघडच आहे . त्यामुळे भरपूर इतलिअन restaurants सगळीकडे पसरलेली आहेत . आणि आता यत्र तत्र सर्वत्र असलेले Mc D आणी Starbucks ताक्सिम चौकात उघडले आहेत . इथले पब्स आणि bars सतत आधुनिक संगीताचे कार्यक्रम करीत असतात . रोज रात्री इस्तिकलाल Avenue वरील पब्स मध्ये संगीताचे असंख्य चांगले कार्यक्रम असतात . मुंबईत ज्याप्रमाणे Blue Frog इथे कार्यक्रम होतात तसे हे कार्यक्रम नीट निवड केलेले आणि आखलेले असतात . त्यामुळे जगभरातले उत्तम संगीत ऐकणार्या लोकांना इथे पर्वणी असते .

20151116_185655~2

इथल्या स्थानिक लोकांना बर्यापैकी इंग्लिश बोलता येते . हळू आणि मोडकेतोडके बोलतात . त्यामुळे इथे गप्पा मारायला लगेच सुरुवात होते. सई इथे बिनधास्त लोकांशी मराठीत बोलत असते . ;” अहो दादा चहा द्या कि ” किंवा “अहो अजून का नाही आल जेवण माझं ? ” आणि माणसे ते समजल्यासारखे पुढे बोलायला किंवा उत्तरे द्यायला लागतात . कुणी कुणाचाही शब्द खाली म्हणून पडू देत नाही . बोलत सुटतात . सध्या सईने इथे एक नवीन प्रकार आरंभला आहे तो म्हणजे रस्त्यावर मोकळेपणाने नाचायचा . ती जवळजवळ इथे स्पानिश ग्रामीण मुलीसारखी वागते . ट्राममध्ये , समुद्राकाठी , कॅफेमध्ये ती अचानक नाचायला लागते . आणि मी ढिम्म पुणेरी मुलगा अश्या वेळी चकित होवून तिच्याकडे पाहत बसतो . हे सगळं परत गेल्यावर गोरेगावात , पुण्यात किंवा सांगलीमध्ये करून धाखाव असे मी मनातल्या मनात म्हणतो . पण कुणी सांगावे ? ती सई आहे . ती करेल सुद्धा .

इस्तंबूलमध्ये शहरभर जाड्याजाड्या मांजरी फिरत असतात . गब्दुल . सगळ्या शहरातल्या आत्याबाई त्यांना दिवसभर खायला घालत असतात . त्यामुळे ह्या शहरातील मांजरींमध्ये एखाद्या सिनेमातील नटीला शोभावा असा आत्मविश्वास सतत असतो . त्या बिनधास्त तुमच्या डोळ्यात रोखून बघत बसतात . पायातपायात करतात , लाड करवून घेतात आणि पळून जातात . आमच्या घराच्या गच्चीत शेजार्यांची मांजर दिवसभर येउन बसलेली असते . उन त्यांच्यापण गच्चीत येत , पण तिला आमचच उन आवडत . कपडे धवून गच्चीत वाळत घातले कि ती मोकळेपणाने ते stand वरून काढून त्यांच्याशी खेळत बसते . सईला ती मांजर आवडत नाही . याचे कारण साहजिक आहे , इक ठिकाणी दोन नट्या राहू शकत नाहीत .

20151112_121028

अहमेद तानपिनार आणि याह्या केमाल या दोन महत्वाच्या तुर्की लेखकांच्या पुस्तकांची भाषांतरे शोधत मी काळ इथली पुस्तकांची दुकाने फिरलो . मला फार हेवा वाटला . रशियन, स्पानिश , इतलिअन , फ्रेंच आणि इंग्लिश ह्या सर्व भाषांमधून अनेक लेखकांचे साहित्य तुर्की भाषेत भाषांतरित केलेले आहे . त्यामुळे इंग्लिश अजिबातच न येणारा तुर्की माणूस , इच्चा असेल तर जगातले सगळे चांगले साहित्य वाचू शकतो . शिवाय दुसर्या बाजूला , तुर्की लेखकांच्या इंग्लिश भाषांतराचेही विभाग कमी नाहीत , ज्यामुळे चांगल्या तुर्की लेखकांची जगाला ओळख होतेय . तानपिनार आणि याह्या केमाल ह्यांच्या साहित्यावर आधारित दोन स्वतंत्र म्युझीअम्स शहरामध्ये आहेत . विजय तेंडुलकर आणि द्वारकानाथ कुलकर्णी ह्या माझ्या दोन ज्येष्ठ मित्रांनी माझी पामुकच्या साहित्याशी ओळख करून दिली आणि माझा ह्या शहराशी परिचय वाढला. खुद्द इथे तुर्की सामान्य जनतेला मात्र ओरहान पामुकविषयी मनात अढी आहे याचे कारण त्याचे मोकळे विचार आणि त्याची राजकीय विचारसरणी , जी सातत्यानी पारंपारिक तुर्की धर्मांधतेला टोचत राहते . २००५ साली पामुक्विरुध्द कोर्टात खटला चालवला गेला , याचे कारण ओट्टोमान सुलतानांच्या काळात ह्या देशाने पद्धतशीरपणे कुर्दस्तान आणि आर्मेनिया मधून आलेल्या लोकांची हत्या केली त्याला त्याने तोंड फोडले . एकांगी राष्ट्रवादी विचारसरणीचीह्या काळात इथे वाढ होवू लागली होती . वर्षभर हा खटला चालू राहिला , पामुकवर देशद्रोही असण्याचा आरोप होत राहिला . पण पामुकला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा हा खटला आवरण्यात घेण्यात आला . याचे कारण तुर्कस्थानला आता युरोपिअन युनियन मध्ये यायचे आहे आणि युरोपला जो लेखाख आवडतो त्याला त्रास देणे ह्या देशाला परवडणार नाही . जगभरात जे चालते तेच इथे आहे . जगाला तुमच्या देशातली जी माणसे महत्वाची वाटतात त्यांची नेहमीच त्या देशात उपेक्षा होत राहते .

20151111_143525

कोणत्याही शहरातल्या माणसाच्या डोळ्यात नीट पहिले कि त्या शहराचे आतले रूप समोर येते . मी जाता येत इथल्या सध्या माणसांच्या डोळ्यात पाहत बसतो . त्यांचे लक्ष नसताना , ती आपल्यातच मग्न असताना . युरोपमधली मग्रुरी आणि बेफिकिरी इथल्या डोळ्यांमध्ये सापडत नाही , अगदी तरुण मुलांच्याही नाही . आपल्याला पाश्चिमात्य व्हायचे आहे , त्याची सगळी तयारी करून आपण बसलो आहोत पण आपल्याला अगदी तसेच्या तसे होता येत नाहीये हे भाव इथल्या अनेक तरुण मुलामुलींच्या डोळ्यात असतात . अधलेमधले . त्या बाबतीत आपल्या देशातील लोकांशी ह्या देशाचे संपूर्ण साधर्म्य आहे . विकसित पाश्चिमात्य श्रीमंत देशातले डोळे मुख्यतः बेफिकीर , एकटे किंवा मग्रूर असतात , किंवा वाटतात . आपलेही डोळे आयुष्यातल्या अनेक क्षणी तसे होवून जातात पण आपण भारतीय माणसे मूलतः तसे चेहरे करून बाहेर फिरत नाही . इथे आल्यावर मला लक्षात आले कि किती सुंदर एकलकोंडे आणि बिचारे शहर आहे हे . आहे त्याचा कंटाळा आलाय पण जे व्हायचे ते होता येत नाहीये . कशाचीतरी वाट बघत बसल आहे हे शहर . आणि त्या व्याकुळतेने सगळीकडे एक गोड बिचारेपणा आहे . तो इथल्या तरुण मुलांच्या fashion sense मध्ये आहे . इथल्या Billboard वरील जाहिरातींमध्ये आहे . ह्यांच्या स्वप्नात येणारी माणसे ह्यांच्या देशातील नसावीत . आपल्यासारखेच बहुदा . त्यामुळे इस्तंबूल मध्ये आल्यावर भारतीय मनाला कसलीतरी ओळखीची खूण सापडते . हा माझा इथे आल्यापासूनचा सर्वात गडद अनुभव. दुसऱ्याला स्वीकारणाऱ्या समाजाचे लक्षण म्हणजे , माणसांनी एकमेकांच्या नजरेला नजर देण्यास घाबरू नये . Paris , लंडन सारख्या मोठ्या शहरांमध्ये हे शक्यच होत नाही . कारण समाजामध्ये साचलेली मोठी असुरक्षितता . मी प्रवास करताना हा सामाजिक नियम फार उशिरा शिकलो . कुणाकडेही नजरेत चुकूनही पहायचे नाही , त्याने माणसे प्रमाणाबाहेर अस्वस्थ आणि संशयी होतात . त्यांच्या खाजगीपणावर हल्ला झाल्यासारखा त्यांना वाटतो . इथे तसे होताना मला दिसले नाही . अनोळखी माणसे तुमच्याकडे पाहून हसतात , घाबरत नाहीत . ह्या शहराचे म्हणून जे सर्व न्यूनगंड आहेत ते इथल्या नागरिकांच्या डोळ्यात पुरेपूर उतरले अहेत.

20151112_121158

 

इथे घरातली सकाळ फार शांतपणे आकार घेते . पाहते उठलो कि समोरच्या bosphorous च्या खाडीत फिरणाऱ्या वेगवेगळ्या जहाजांचे आणि बोटींचे आकार अंधुक दिसू लागतात . समोर आशियाचा किनारा दिव्यांनी उजळलेला असतो तो शांतपणे दिवे विझवत राहतो . काही छोट्या बोटींवर एकाच दिवा लागलेला असतो त्या पाण्यावरून काजवा जावा तश्या सरकत जातात . मी कॉफी बनवून घेऊन कच्चे दार उघडतो तेव्हा अचानक थंडी घरामध्ये शिरते . टेरेसवर बसून शांतपणे कॉफी चे घोट घेत मी लिहित बसतो . मग घरात जाऊन अंडी उकडत ठेवतो , मध , कॉर्न फ्लेक्स , चीज , ब्रेड , दूध फ्रीजमधून काढून ठेवतो आणि पुन्हा बाहेर येउन लिहायला बसतो .पेन्सिल संपूर्ण झिझली कि मग सईला ढोसून उठवायला जातो . तिच्यासाठी कॉफी बनवायला घेतो . तिला उठवला नाही तर ती सरळ बारा वाजेपर्यंत झोपून राहू शकते . जागे व्हायच्या प्रक्रियेला ती अर्धा ते पाऊण तास घेते . दिवसभरात कुठे फिरायचं , काय पहायचं हे ठरवायच काम माझं . घर सोडताना सई भांडी स्वच्छ घासते , ओटा लख्ख पुसून ठेवते . आम्हाला या घरच्या रूटीनमुले ह्या शहराचा भाग असल्यासारखं वाटत . हॉटेलमध्ये जाऊन पडलो नाहीयोत ह्यामुळे बरं वाटतं .

 

20151115_170710

काल हि मुलगी उठायचं नावच घेईना तेव्हा मी सरळ ट्राम मध्ये बसून शहराच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत फिरून आलो . टूरिस्ट जातात त्याच्या पलीकडे जे सध्या माणसांचे इस्तंबूल आहे तिकडे भटकून आलो .

तुर्की भाषेतले अनेक शब्द पर्शिअन – उर्दू – हिंदी ह्या नात्याने आपल्या ओळखीचे असतात . “तमाम” म्हणजे ठीक आहे . “पनीर” म्हणजे चीज . “ताजे” म्हणजे मराठीतले ताजे . फ्रेश . सावधान म्हणायचे असेल तर “दिक्कत” म्हणतात . भारताला “हिंदीस्तान” म्हणतात . माश्याला “बालिक” म्हणतात . ब्रेडला “एकमेक” असे लडिवाळ नाव अहे. त्यामुळे fish sandwich मागायचे असेल तर “बालिक एकमेक” द्या असे मागावे लागते आणि आपण काहीतरी लहान बाळांचे खाणे मागवलय असे मराठीत वाटते . पाण्याला “सू ” म्हणतात हे मला जर फारच कसेतरी वाटते . मी आपले इंग्लिशमध्ये water प्लीज असे मागायचो . “अनार” म्हणजे डाळींब . “चाय” म्हणजे चहा . सगळ्यात मजेशीर गोष्ट हि ह्या देशाच्या बॉर्डरवर BATMAN नावाचे शहर आहे .आणि इस्तंबूल मधल्या एका रस्त्याचे नाव  PANGALTI (पानगळती ?) street असे आहे .

गेल्या काही महिन्यात सिरियात उद्भवलेल्या गोंधळामुळे शहरात शेकडो सिरियन कुटुंबे रस्त्यावर वावरत आहेत . ती आपल्या लहान मुलांना घेऊन जागोजागी भिक मागत हिंडत असतात . आज सकाळी बहुदा कॉलेजमध्ये परीक्षा असाव्यात . सगळ्या मेट्रोचा डबा विद्यार्थ्यांनी भरलेला होता आणि सगळेच्या सगळे पाठांतर आणि आकडेमोड करीत होते . एक मुलगा दुसऱ्या मुलाकडून काहीतरी पाठ करून घेत होता . मग University चा स्टेशन आल्यावर सगळे पटापटा उतरून गेले.

मी काळ युसुफला म्हणालो कि तुमचे शहर फार सुंदर आहे . तो म्हणाला ऑफ course , टूरिस्ट साठी ते सुंदर आहे . आमच्यासाठी ते अवघड आहे . मी त्याला म्हणालो हो , कारण मी इथे आल्यावर माझ्यावर साचलेला मळ निघून गेला .

इस्तंबुलमध्ये आल्यापासून आम्ही रोज सकाळी उठून नुसते चालत सुटतो . किती चालतो याची पर्व न करता . सगळ्या अनोळखी भागांमध्ये फिरत राहतो . युसूफच्या फोनवर एक app आहे ते उघडून परवा त्याने आम्हाला सागितले कि आज आपण १२ km चालत होतो . मी आज इथल्या सगळ्यात मध्यवर्ती चौकात ताक्सिम स्क्वेयर मध्ये उभा राहिलो आणि आकाशाकडे पाहत बसलो . सकाळपासून मी शहरभर फिरताना सुबोधच्या कट्यार मधली शंकर महादेवनची ची गाणी ऐकत होतो . अचानक तिथे उभा असताना कानात महेश काळे ने गायलेला तराणा सुरु झाला आणि माझे मन स्वच्छ प्रसन्न आणि मोकळे झले. मला वाटले कि आपल्या शरीराबाहेर वेगवेगळी शहरे आहेत तसे एक आपल्या आत आहे . ते शहर रूप बदलत नव्याने वसत राहणार . आपल्या आतले शहर आपल्याला नीट आखता येणारच नाही . पण तिथले दिवे पेटलेले राहायला हवेत . तिथे ट्राफिक जाम होणार , त्या शहरात घुसखोरी होणार , तिथे हल्ले होणार , पण त्या शहरामध्ये हे सगळं पाचावोन तरीही चालत राहायची , वाहत राहायची ताकद हवी . मी चालणारं , श्वास घेणारं , जगण्याची धडपड करणारं एक शहरच आहे .

लंडनला निघायचा दिवस फार भरकन आला . मी दुपारी लंडनला जाणार आणि संध्याकाळी सई मुंबईला . मला रात्रभर झोपच आली नाही .मी इथे घेतलेली पुस्तके चाळत बसलो , सई सोबत गप्पा मारत दोन राके चे ग्लास रिकामे केले आणि आमच्या गच्चीतून दिसणारा सूर्योदय व्हायची वाट पाहत बसलो. मला निघताना खुळेपणाने असे वाटत होते कि फार लवकर आपण इथे परत येणार अहोत. मी सईला घर बंद करून चाव्या मालकाकडे देण्याविषयी एक हजार सूचना दिल्या , ती मला सोडायला खाली रस्त्यावर आली आणि मी सावकाश bag ओढत त्या गल्लीतून , मग त्या शहरातून चालता झालो .

 

20151111_143533

मी निघताना विजय तेंडुलकरांना मनातल्या मनात हे सांगितले कि मी जाऊन पाहून आलो , इस्तंबूल ला .

सचिन कुंडलकर .

via Facebook.

13 thoughts on “Istanbul Diaries Part 2 .”

 1. अतिशय छान लोहिलाय्स लेख इस्तानबुलवर.या शहराबद्दल मलाही आताशा खूप आकर्षण वाटू लाहलंय्.नुक्तच मी “a letter to democratic ammi”हे सईद मिर्झाचं पुस्यक वाचुन संपवलं.त्यात इस्तानबुलचं त्यांनीहिो केलेलं वर्णन …तिथल्या लोकांविषईचं सगळं…केमाल पाशाबद्दल …मांज़रींबद्दल….आपल्या अोर्हान पामुखमुळे त्या शहराबद्दल आपुलकी होतिच…त्याचं “इस्तानबुल”मी अर्धं वाचून पुढलं राहिलं होतं ते सईद आणि तुझं वाचुन पुर्ण करावं असं मनात आलं.एखाद्या अनिळखी शहराबद्दल देशाबद्दल निर्मल वर्मामधे जी कवितिक quality होती ती तुझ्यालिखाणात आलिये.ती अधी पासुन होतिच.तूझ्यात एक छुपा कवी अहे जो कधी कधी तुझ्या सोनेमाच्या shorts मधे अधुमधुन लिखाणात दिसतो.
  असो.छान वाटलं वाचुन.आणि हो तो “in july” चा directore मी अता पटचकन् नाव विसरलो त्यावं तोही इसतान बुलचाच अाहे.आणि तो “hony /milk/ege” करणाराही.या सगळ्यांमुळे अणि आता तुझ्या लेखामुळे इस्तामबुल अजुन आवडू लागलंय्.आणि हो तेंडुलकरांना दिलेला निरोपही आवडला.

  Liked by 1 person

 2. फ़िल्म फ़ेस्टिव्हल मधुन तिथल्या गरिबी आणि स्त्रियांविषयी पाहतो तसच आहे का?

  Like

 3. सचिन दादा, लेख वाचला. छान आहे. तुम्ही चित्रदर्शी लिहता. वाचता वाचता दृश्य उभे राहते. आणखी प्रवास वर्णन लिहा, ही आग्रही विंनती.
  – अमित कुलकर्णी.

  Like

 4. Sachin: loved this piece. बालिक एकमेक फारच आवडलं. काल रात्री NPR (रेडिओ) वर पामुकचं बोलणं ऐकलं आणि आज इथे त्याचंच नाव. गंमत!!

  Like

 5. खूप छान वाटले वाचून। अअत्त असाच भटकाव वाटतंय आपल्या खेड्यांमधे। बहुतेक अशीच शांतता न शांतपणा मिळेल तिकडे।

  Like

 6. तुम्हाला पामूक यांच्या कोणत्या कादंबरया अावडत नाहीत ?

  Like

 7. Nice blog. Would like to read more such blogs. I thought of my trip to Nepal. At the end of the Annapurna Circuit trek we had the local liquor called “chang”. One of fellow trekker wanted to carry one bottle to Pune, they ordered one jug worth of Chang. They realized that you do not get bottled chang as it gets fermented later. 🙂
  I am not going to take pictures but enjoy what my eye captures!

  Thanks again…

  Like

 8. अप्रतिम .. किशोर म्हणतात तसा कवी आहेसच तु.. रुढ भाषेत कविता न लिहीणारा कवी .शहराकडं इतक्या तरल संवेदनेनं पाहणारी दृष्टी कवीचीच असते.
  म्युझियम ऑफ इनोसन्स ‘बद्दल वाचले होते (प्रत्यक्षातल्या ) पण ते , त्यामागची संवेदना ( नुसते फॅड वा स्टंट नव्हता तो ) थेट पोचली…

  Like

 9. Sachin, Would love to read more such travel related, especially human , experiences from you…..may be on London. You have a keen eye to capture the under currents.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s