अपेयपान . ‘लोकमत’ मधील लेखमाला . भाग १ ते ४ .

 

अपेयपान भाग  १

आयुष्यामध्ये निघून गेलेल्या वेळाइतके रोमांचकारी आणि पोकळ काहीही नाही . आठवणींचे चाळे करणे हा शुद्ध बौद्धिक दिवाळखोरपणा आहे ह्या विचारात माझी अनेक वर्षे गेली . मी भूतकाळाकडे साशंकतेने पाहणारा माणूस आहे . कारण भूतकाळात वेळ साचून राहिलेला , अप्रवाही आणि दुर्गंधी येणाऱ्या चिकट पदार्थासारखा असतो . मानवी मनाला भूतकाळाकडे बघण्याची चिकित्सक वृत्ती जोपासायची सवय नसते . भूतकाळ हि त्याच्यासाठी  एकप्रकारे सुटका असते . पटकन बाहेर जाऊन गुपचूप ओढून आलेली एक सिगरेट.  स्मृती ( memory ) आणि स्मरणरंजन ( nostalgia ) ह्यातला फरक ना आपल्याला घरी शिकवला जात ना दारी . आणि त्यामुळे  आपण आठवणी काढतो आणि भूतकाळात रमतो त्यातून नवे मिळवत काहीच नाही , तर स्मरणरंजनाच्या चिखलात काही काळ लोळत पडून  बाहेर येतो . महाराष्ट्रात  आपल्याला  नुकते आवडलेले  चार सिनेमे , दोन नाटके , तीन पुस्तके ह्यांचे विषय पहा . ते आपल्याला असेच काही काळ त्या चिखलात लोळून यायला मदत करतात . आणि म्हणूनच आपल्या साजऱ्या, गब्दुल  मराठी मनाला ते आवडतात . कारण आपण  स्वतः फार काही करायला नको . भूतकाळ आपला भरजरी होता हे एकदा स्वतः ला समजावून आपला वेळ रविवारच्या  पुरवण्या वाचत संपवला कि आपण सोमवारी पाट्या टाकायला मोकळे .

महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाची स्मृती एकवेळ सोपी, नटवी आणि चावट असते . पण महाराष्ट्र सोडून परदेशात स्थायिक झालेल्या वयस्कर माणसाची स्मृती हि विनोदी वेड्या म्हातारीसारखी भेसूर  असते . त्यांना जो महाराष्ट्र आज आहे असे वाटत असते , तो महाराष्ट्र स्मृतीपूर्व काळातला असतो .  एकोणीसशे साठ सत्तर वगरे सालातला .  महाराष्ट्राचा सुवर्णकाळ वगरे जो काही होता असे म्हणतात त्यातला .  अश्या माणसांची पोटची मुलेच त्यांना ताळ्यावर आणायला सक्षम असतात हे एक बरे . त्या मुलाना काहीच माहिती नसते . कारण ती  त्यांचा स्वत चा  काळ विणत योग्य दिशेने वर्तमानात जगात असतात . विस्मृती आणि अज्ञान हा जुन्या सत्तेच्या आणि जुनाट काळाच्या विरोधातला  एक रामबाण उपायच नसतो का ?

भारतीय लेखिका दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे , लेखक महेश एलकुंचवार आणि  अमिताव घोष , तुर्की लेखक ओरहान पामुक तसेच फ्रेंच लेखक मिशेल हुलबेक  ह्यांच्या साहित्यामुळे मी फार सतर्कतेने  भूतकाळाकडे बघायला आयुष्यात सावकाशपणे  शिकलो. उशीराच शिकलो कारण मी काही कुठे आकाशातून पडलो नव्हतो . पुण्यातल्या सदाशिव पेठेत , महाराष्ट्राच्या  आठवणींच्या कारखान्यातला जन्म माझा . उशीर लागणारच . पण उशिरा का होईना , आठवणींचा गुलाम होण्याऐवजी त्या आठवणींमधून काळाची तार्किक सुसंगती लावायचा प्रयत्न करायला लागलो  . कारण मी फार साधा आणि चुका करत शिकणारा माणूस आहे . मला माझा वर्तमान फार आकर्षक वाटतो , कारण काळाच्या ज्या तुकड्यात मी माणूस म्हणून वाढलो , शिकलो मोठा झालो तो काळाचा तुकडा अतिशय नाट्यमय , प्रवाही आणि गजबजलेला आहे . मी १९७६ साली पुण्यात जन्मलो ते शहर आज काळाने गिळून टाकले आहे आणि त्याची त्वचा सुकवण्यासाठी खिडकीबाहेर वाळत टाकली आहे . मी ऐकलेली गाणी , मी वाचलेली पुस्तके , मी फार महत्वाचे मानलेले महान लोक ह्यापैकी काही म्हणून मला आज जगायला पुरे पडत नाहीये . ह्याचे कारण मी ज्या काळात मोठा  झालो तो नव्वोदोत्तरीचा काळ हे आहे  . १९९२ पासून आजपर्यंतचा . वेगवान , क्रूर , हसरा आणि मायावी काळ . आपल्या सर्व भारतीय समाजाची स्मृती ढवळून काढणारा आणि आपल्याला झटके देवून जागे करणारया ह्या काळाचे कधीतरी पुनरावलोकन करायला हवे .

आपल्याला कळायला लागते , भान येते ते नक्की कधी ? माझ्या समजुतीप्रमाणे आठवण यायचे वय तयार झाले कि आपल्याला जगाचे भान यायला सुरुवात होते . त्याचा संबंध शारीरिक परीपक्वतेशी असतो . आपण वयात येत जातो तसे पहिल्यांदा आपले जगाशी काहीतरी देणेघेणे सुरू होते . आपले स्वतः चे . कुटुंब , पालक ह्यांच्या पलीकडचे . भारतीय समाजात ह्या वयात मुले माध्यमिक शिक्षण पूर्ण करायच्या बेतात आलेली असतात . माझेही तसेच होते. मी शरीरीकतेने सतर्क आणि उत्सुक झालो तेव्हा नुकताच ‘कयामत से कयामत तक’ हा तरुण जाणीवेचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा आठवणीने पिढीची वर्गवारी करणे भारतात सोपे जाते म्हणून  हा उल्लेख .

माझी पुण्यातली मराठी माध्यमाची फक्त मुलांची शाळा  भावेस्कूल हे माझे सुरक्षित , आनंदी अभयारण्य होते . शाळा संपली १९९२ साली आणि मी जगामध्ये असुरीक्षतेत लोटला गेलो असे म्हणता येईल . ह्याचे कारण माझ्या  आईवडिलांना तोपर्यंतच माझ्यासाठी निर्णय घेता येत होते. त्यापुढच्या वाटचालीचे निर्णय माझे मलाच घेणे भाग होते कारण ते दोघे महाविद्यालयात शिकलेच नव्हते . मी जे म्हणीन त्याला संपूर्ण पाठींबा द्यायचा असे त्यांनी ठरवले होते पण  निर्णय घ्यायची जबाबदारी माझी होती . शाळा संपली नेमकी त्याच वर्षी बाबरी मशीद पडली आणि पहिली अनामिक  सामाजिक भीती माझ्या पोटात उगम पावली . विध्वंस आणि दंगलीमधून तयार झालेली भीती .  तोपर्यंत आम्हा मुलांना  कुणालाच आडनावावरून जात  ओळखता येत नव्हती . बाबरी माशिदिनंतर आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणी  नंतर आम्ही अड्नावांकडे लक्ष्य द्यायला शिकलो. ह्या सगळ्याच्या  आगेमागेच बर्लिनची भिंत पडली , सोविएत साम्राज्य संपले , राजीव गांधीची हत्या झाली . आम्ही शाळेतल्या शिक्षकांच्या आग्रहाने रोजचे पेपर वाचात होतो त्यातले अंधुकसे काही कळायला लागले आणि हे जाणवायला लागले कि आपला ह्या सगळ्याशी फार थेट संबंध येणार आहे . तोपर्यंत आमच्या आयुष्यात आणि पुणे शहरात काही म्हणजे काहीही वाकडे घडलेच न्हवते . पानशेतचा पूर आणि जोशी अभ्यंकर खून खटला हि आमच्या शहराच्या वेदनांची  जुनी ग्रामदैवते होती . पण  त्यानंतर सगळे फार झपाट्याने बदलू लागले . शाळा संपताच आजूबाजूचे सर्वजण computer च्या क्लास ला जाऊ लागले. आणि चादरीच्या आकाराच्या floppy घेऊन फिरू लागले.

ह्या काळापासून आजपर्यंत स्वतःचे निर्णय घेत पुढे जात राहणे  आणि काम करत राहणे हा माझ्यासाठी आयुष्याचा मोठा भाग राहिलेला आहे. ज्या काळात हे घडले त्या काळापासून पुढची पंचवीस वर्षे अर्थकारण , विज्ञान , तंत्रज्ञान आणि समाजकारण ह्याची घडी विस्कळीत होवून मोठी उलथापालथ होणार आहे ह्याची आम्हाला त्या काळात कल्पना नव्हती . माणसाचे जगणे आणि माणसाच्या आठवणी ह्यावर पुढील काळात होणार्या आर्थिक आणि तांत्रिक घडामोडींचा सखोल परिणाम होणार होता आणि पाच पाच वर्षांच्या काळात नवनव्या  गोष्टी निर्माण होवून नाहीश्या होणार होत्या. आज  चांगले वाटेल ते उद्याच अनावश्यक  वाटू लागणार होते  आणि  आमचे सगळे पुढचे महिने आणि वर्षे आपल्या जुन्या मूल्यांकडे जमेल तसे लक्ष्य देत , नवी मूल्ये वेगाने आत्मसात करण्यात जाणार होती . वेगवान आणि भन्नाट . ह्या सगळ्यात जर कशावर अंतस्थ परिणाम  होणार होता तर तो आमच्या मेंदूतल्या आठवणी तयार करण्याच्या  कारखान्यावर .

मी या लेखमालेत यापुढे ह्या विचित्र वेगवान झगमगीत आणि वाह्यात आठवणीनंविषयी  लिहिणार आहे . ह्या सदरामध्ये . इथे सुरुवातीला मी  काय लिहिले होते ते मी पूर्ण विसरून जाईस्तोवर .

 

10489623_10152207016792267_8148827493166830975_n

सचिन कुंडलकर .

 

अपेयपान भाग २

गेल्या अनेक वर्षात माझ्यासोबत जर काही सातत्याने  राहिले असेल तर विविध जागा आणि व्यक्ती ह्यांच्यासंदर्भात मला वाटत असलेला न्यूनगंड.Inferiority complex . आपल्यात इतरांपेक्षा काहीतरी कमी आहे ,आपण  ह्या नव्या वातावरणात रुळून जायला कमअस्सल किंवा अपात्र आहोत   ही भावना . ही न्यूनगंडाची भावना मला मी मोठा होत असताना सतत बदलत राहणाऱ्या माझ्या आजूबाजूच्या वातावरणाने दिली . जग फार वेगाने बदलतेय असं आपल्याला जो अनुभव येत राहिला, अनेक वस्तू,गोष्टी, शहरे नव्या स्वरुपात आली तो हा काळ. आर्थिक उदारीकरणाच्या परिणामांचा आणि digital technology ने आपले आयुष्य व्यापण्याचा. ह्या काळाने मला दिलेली मोलाची भेट म्हणजे सततचा न्यूनगंड .माझ्या मध्यमवर्गीय जडणघडणीमुळे तो वृद्धिंगत झाला आणि मला ह्या भावनेमुळे सतत सतर्क,जागे राहावे लागले .माझी परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागत राहिले.

माझी ही कहाणी इतर चार चौघांपेक्षा वेगळी नाही. तुम्हा सर्वांसार्खीच आहे. आपण सगळ्यांनी,ज्यांनी ज्यांनी सुरक्षितता सोडून बाहेर पडून काही करण्याचा ह्या काळात प्रयत्न केला आहे त्या सगळ्यांना ह्या न्यूनगंडाने साथ दिली आहे . गाव सोडून शहरात येणार्यांना . छोटी शहरे सोडून मोठ्या शहरात जाणार्यांना.आपल्या कुटुंबापेक्षा वेगळे काही कामाचे मार्ग शोधणार्यांना .

आपण साध्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही हि माझी  पहिली मोठी घाबरवणारी  भावना . आपले कपडे कॉलेजमधील इतर मुलांइतके चांगले नसतात हि  दुसरी एक भावना.आपण मुंबईत गेलो कि ह्या मोठ्या शहराच्या वेगवान आणि अतर्क्य चालीरीती आपल्याला कधी कळत नाहीत हि एक पूर्वीची जुनी भावना . आपल्यावर कुणी प्रेम करत नाही कारण आपण जगाला हवे तसे सुंदर दिसत नसू, आपल्यात दुसर्यावर छाप पाडण्याची कोणतीही कला नाही ही भावना . आता आठवले तर मौज वाटेल अश्या ह्या असंख्य भावनांच्या जंजाळात मी खूप वर्षे राहिलो आणि त्यांच्याशी झगडण्याची उर्जा इथून तिथून झगडत मिळवत राहिलो . इथून तिथून म्हणजे खूप सारी पुस्तके वाचून आणि सिनेमा पाहून.मला हिंदी सिनेमाने मोठे होताना अपरिमित उर्जा आणि आत्मविश्वास पुरवला. नौव्वदीच्या दशकातला साधा मनोरंजक सिनेमा. श्रीदेवी विरुद्ध माधुरी ह्या काळातला .सगळी खानबाळे मिसरूडात होती त्या वेळी आणि सनीच्या  “धायी किलोका हाथ” ला टाळ्या मिळत तो सिनेमा . हिंदी सिनेमाने मला प्रेम करायला, रागवायला, जमलेच तर मनातल्या मनात बदलाबिदला घ्यायला, प्रेमभंग झाला तर कसे रडायचे ह्याला, तात्पुरते का होईना तयार केले. तो नसता तर मी कुठून माझ्या सैरभैर मनाला बळ पुरवले असते ते मला माहित नाही .माझ्या मनात कुटुंब ,शाळा आणि शहर सोडून जाताना जी भीती आणि असुरक्षितता होती, ती दूर केली फक्त हिंदी सिनेमाने आणि असंख्य पुस्तकांनी ,पर्यायाने ती लिहिणाऱ्या लेखकांनी .मराठी लेखक आणि त्यानंतर अपरिमित कष्ट करून इंग्लिश वाचता यायला लागल्यावर वाचलेले जगभरातले सर्व जुने, नवे लेखक.

वीस वर्षापूर्वी मला इंग्लिशमध्ये दोन वाक्ये सरळ बोलता येत नसत. चमचे वापरून नीट खाता येत नसे आणि साधी इंग्लिश पुस्तके वाचताना मोठी डिक्शनरी सोबत घेऊन सतत त्यात बघावे लागे. एकेक पुस्तक वाचायला महिना महिना लागत असे . फ्लोबेर ह्या लेखकाची ‘मादाम बोवारी’ ही कादंबरी मी बारावीत धाडस करून वाचायला घेतली तेव्हा मी डिक्शनरी बघून बघून रडकुंडीला आलो होतो.ह्या सगळ्यातून तयार होणारया न्यूनगंडाने मला ढकलत सावकाशपणे पुढे नेले.पुढे मी न घाबरता जगभर अनोळखी ठिकाणी प्रवास केले, फ्रेंच भाषा शिकलो ,स्वयपाक करायला शिकलो  सिनेमा शिकलो, तो बनवायलाही शिकलो, चांगल्या संगीताचा, चांगल्या दृष्यकलेचा आस्वाद घ्यायला शिकलो,परक्या लोकांना न घाबरता आपलेसे करायला शिकलो हे सगळे करताना मला प्रत्येक टप्प्यावर सातत्याने दुय्यम आणि कमअस्सल वाटतच रहीले कारण माझ्यासमोर सतत त्या त्या क्षेत्रातली मोठी हुशार आणि ताकदवान माणसे ,समाजात फोफावणारी आणि प्रदर्शित केली जाणारी श्रीमंती, वेगाने बदलणारे तंत्रज्ञान ,न हाताळता येणारी यंत्रे येतच राहिली. काही शिकले तर नवीन काहीतरी  पुढे उभे येऊन थांबे .कधी काही स्थिर म्हणून राहिले नाही. आता आपण कुठेतरी पोचलो आहोत जिथे सर्वात सक्षम आणि ताकदवान आपणच आहोत असे कधीही झाले नाही .आपल्याला ज्ञान मिळाले आहे आणि आता त्या ज्ञानाने आपल्याला आत्मविश्वासाचे स्थैर्य लाभेल हि भावनाच ह्या काळाने येऊ दिली नाही.

मला संपूर्ण आत्मविश्वास कि काय म्हणतात तो कधीहि नव्हता आणि आजही तो माझ्यापाशी बरेचवेळा नसतो हे माझे फार चांगले नशीब आहे .

मला आज असे लक्षात आले आहे कि मला सतत सोबतीला असणारा हा न्यूनगंड माझ्यासाठी आजपर्यंत फार मोठे वरदान ठरला . त्यामुळे मी शिकत  राहिलो, धडपडत राहिलो आणि काळाशी जुळवून घेत राहिलो .जुन्या अडचणी पार केल्यावर नव्या तयार होत गेल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याने मला सतर्क राहता आले. मुख्य म्हणजे जमेल तसे काम करत राहण्यावर माझा विश्वास कायम राहिला आणि सर्व बाबतीत perfect  होण्याच्या शापातून मला मुक्तता मिळाली . Perfectionism is the death of many simple pleasures of life .

मी आज त्या न्यूनगंडाचे आभार मानतो . शिवाय त्या सर्व माणसांचे ज्यांनी आयुष्यात विवीध टप्प्यांवर माझी ती दुय्यम असण्याची भावना प्रबळ केली . त्यात ओळखीचे अनेक मोठे फिल्मस्टार्स आले, मोठे यशस्वी श्रीमंत लोक आले , मोठमोठे लेखक , मोठे fashion designers आले आणि जगातली मोठी चकचकीत वेगवान शहरे आली. Paris सारखे वाह्यात आणि हुशार शहर माझ्या वाट्याला फार तरुणपणी आले. आणि मला त्या शहराने गुदगुल्या करकरून त्या वेळी बेजार केले.  मराठी शाळा सोडून BMCC कॉलेज मध्ये गेल्यावर फटाफटा इंग्लिश बोलणारी मुले आली, कॉलेजमध्ये कार आणि ड्रायव्हर घेऊन येणारी आणि सोळाव्या वर्षीच अप्रतिम fashion sense असणारी नमिता मेहता नावाची हुशार मुलगी आली. मला अजुनी हॉटेलात नीट खेकडा खाता येत नाही म्हणून माझ्यावर हसणारे अनेक मित्र आले. पृथ्वी थेटर ला पहिल्यांदा गेल्यावर हिंदी इंग्लिश रंगभूमीवर काम करणारे smart रंगकर्मीज आले ,आणि मी सारखी माझ्या मोठ्या कमरेची pant वर ओढत फिरतो तेव्हा हळूच मला हसणारे लोक आले .सगळेच आले. सतत बदलायची आणि आहोत त्यापेक्षा नवनवे काहीतरी शिकायची एक शीस्त ह्या वातावरणाने मला आपोआप लागली.

मला काही गोष्टी अजुनी जमत नाहीत . नीट गोल पोळी नेहमीच लाटता येत नाही .Labyrinth ह्या  शब्दाचा अर्थ नुकताच कळलाय पण तो नीट म्हणता येत नाही. फ्रेंच अस्खलित बोलता येते पण नीट लिहीत येत नाही. अजूनही टीप नक्की किती द्यायची ते कळतच नाही. इंग्लिश सिनेमात अनेक वेळा काय बोलतात ते कळत नाही, जरा धडधडीत मोठ्याने बोला हो असे वाटते आणि कुणाला किती वाजता फोन करावा आणि करू नये ह्याची शहरी सभ्यतेची गणिते कळत नाहीत (जगातील प्रत्येक शहरात ह्याची वेगळी आखणी आहे) आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते game of thrones ही जी काय महान आणि must कलाकृती आहे ती मी अजुनी पाहिलेली नाही. म्हणजे तर मी पुण्यामुंबईत जगायला लायकच नाही . कारण लहान पोरेसोरे उठून हल्ली फक्त त्यावरच बोलत बसतात. आणि तेव्हा तुम्ही कितीही पुस्तके वाचून टिकोजीराव झाले असाल तरी त्यांच्यापुढे तुम्ही अगदी कापूसबोळा ठरता.

ह्या सगळ्यामुळे मी सारखं ओशाळून बसतो आणि आता जरा नीट काही चार गोष्टी शिकून घेऊया  असे मनाला बाजावत राहतो .

सचिन कुंडलकर .

 

IMG_1709

 

अपेयपान   भाग ३

गेल्या आठवड्यात मुंबईतील सुप्रसिद्ध रिदम हाउस हे जुने आणि महत्वाचे संगीताचे केंद्र बंद होणार अश्या बातम्या प्रसिद्ध झाल्या तेव्हापासून प्रत्येक संगीतप्रेमी माणूस हळहळत आहे.प्रत्येकाला वाटते आहे कि इतके जुने आणि चांगले दुकान बंद व्हायला नको .रिदम हाउस हे नुसते कॅसेट्स आणि सी. डी ज विकत घेण्याचे दुकान नव्हते, तर त्या दुकानामुळे तीन चार पिढ्यांना जगभरातले उत्तम संगीत ऐकण्याची आणि संगीताचा संग्रह करण्याची सवय लागली. माझ्या अनेक मोलाच्या आठवणी काळाघोडा भागातील ह्या दुकानाशी जोडल्या गेल्या आहेत .मी एकदा शेवटची भेट म्हणून तिथे पुढील आठवड्यात जायचे ठरवले आहे. एवढे मोठे आणि महत्वाचे दुकान बंद करण्यामागचे कारण मालकांना एका पत्रकाराने विचारले असता, मालक त्याला व्यवहारी मनाने म्हणाले कि तुम्हाला वाईट वाटणे हे  साहजिक आहे पण वाईट वाटण्याने हे दुकान चालणार नाही . लोक आता पूर्वीसारखे इथे येत नाहीत . संगीत विकत घेत नाहीत .ते इंटरनेटवरून मोफत डाउनलोड करतात . आम्ही वेगवेगळ्या प्रकारे तग धरायचा प्रयत्न गेली चार वर्षे करत आलो पण आता आंम्हाला ह्या नव्या काळात टिकून राहणे आता शक्य नाही.

गेल्या काही वर्षातला आपल्या देशातला  हा एक ठळक अनुभव. चांगली पुस्तकांची दुकाने आणि चांगली म्युझिक स्टोअर्स बंद होणे .आपण लहानपणी जिथून पुस्तके,संगीत ,कॉमिक्स आपल्या पहिल्या रंगपेट्या घेतल्या त्या सर्व जागा एकामागून एक नाहीश्या होत जाणे. प्रत्येक वेळी एक पुस्तकाचे ओळखीचे दुकान बंद झाले , एक music store नाहीसे झाले कि मला खूप वाईट वाटत राही. मी त्याच्या आठवणी काढत राही , फेसबुकवर त्याचे जुने फोटो टाकत बसे. आपले आवडते जुने इराणी restaurant गेल्या वेळी होते , आज अचानक पहातो तर नाही, तिथे कहीतरि वेगळेच उभे राहिलेय . ते चीनी आजी आजोबा प्रेमाने चीनी जेवणाचे हॉटेल चालवत होते , ते सगळे आवरून कुठे गेले ? मी लहानपणी असंख्य कॉमिक्स , आणि चांदोबाचे अंक ज्यांच्याकडून घ्यायचो ते दाते काकांचे अलका टोकिजसमोरचे दुकान आता उदास होवून बंदच का असते ? आपल्याला ताजे पाव आणि नानकटाई बनवून देणारी ती जुनी बेकरी बंद झालेली आपल्याला कळलेच नाही. घराजवळची पिठाची गिरणी जाऊन तिथे हे काय आले आहे ?

हळूहळू मला सवय लागली . आपल्या मनातले आणि आपल्या आठवणीतले शहर नष्ट होत जाण्याकडे बघायची सवय . मी पुस्तकांबाबत फार हळवा आहे . त्यामुळे पुस्तकांची दुकाने गेल्याचे आणि तीथे मोबाइलची दुकाने आल्याचे  काळे डाग माझ्यावर खूप वेळ राहत. नंतर काही चांगले पहिले , कुणी काही चांगली जागा नव्याने तयार केली कि असे वाटे कि हे सगळे टिकून राहो . कारण सध्या सगळे फार वेगाने वितळून जाते . पण काळ हि गोष्ट आतल्या गाठीची आणि काळाची पावले ओळखण्याची कला आपल्या रोमांटिक मराठी मनाला अजिबातच नाही. मला अनेक वेळा काही कळेना होई . हे सगळे होते आहे त्यासाठी माणूस म्हणून मी काय केले पाहिजे ? ह्या चांगल्या जागा , उत्तम जुनी दुकाने , महत्वाच्या संस्था बंद पडू नयेत , विकल्या जाऊ नयेत म्हणून मी काय करावे ?

रिदम हाउस च्या मालकाची मुलाखत वाचली आणि मला शांत साक्षात्कार झाला.आपण ज्या जागा बंद पडल्या त्या जागा पहायला, तिथून पुस्तके आणायला,त्या लोकांना भेटायला गेल्या काही वर्षात किती वेळा गेलो ? खूपच कमी. बंद पडल्याची बातमी आली नसती तर अजून वर्षभर तरी मी तिथे पावूल टाकले नसते. मी पण सध्या बिनधास्त इंटरनेट वरून पुस्तके ऑर्डर करतो ,संगीत डाऊनलोड करतो. एका जागी मिळते म्हणून सुपर मार्केटमधून सामान आणतो .मग मला बरे वाटावे आणि माझ्या बालपणीच्या आठवणी जशाच्या तश्या टिकून राहाव्यात म्हणून भुकेकंगाल राहून माझ्या छोट्या जुन्या जगातील सारी माणसे,  पुस्तकविक्रेते , जुनी हॉटेले चालवणारे मालक,  जुने शेंगदाणे विक्रेते , जुनी भाजीवाली बाई ,जुन्या इमारतींचे पेठांमधील वाड्यांचे मालक रोज संध्याकाळी रंगसफेती करून , दिवाबत्ती करून , साजशृंगार करून माझी वाट पाहत बसणार आहेत कि काय?  कि कधीतरी हा बाजीराव उगवेल तेव्हा त्याला सगळे जसेच्या तसे सगळे मिळावे . कारण मी इतका हळवा मराठी जीव . मला जरा काही बदललेले चालत नाही .ह्या सगळ्यात माझी साधी जबाबदारी हि होती कि मी नेहमी जाऊन त्या दुकानांमधून पुस्तके , संगीत,चित्रे विकत घ्यायला हवी होती . मी माझ्या शाळेतल्या  शिक्षकांना अधेमध्ये जाऊन भेटायला हवे होते , मी आणि माझ्या कुटुंबाने जुन्या चांगल्या ठिकाणांचा , वस्तूंचा वापर करणे , त्यांचा आस्वाद घेणे थांबवायला नको होते. मी माझा भूतकाळ नीट जपून ठेवायला हवा होता . जुन्या इमारतींच्या रुपात , जुन्या संगीताच्या, चांगल्या साहित्याच्या , जुन्या कलाकृतीच्या रुपात . सणवार आणि गणेशोत्सवाचा गोंगाट हे सोडून मराठी माणूस काहीहि जतन करू शकलेला नाही .चांगले काही जपून पुढच्या पिढ्यांना दाखवण्यासाठी जिवंत ठेवावे हि गरजच मला कधी वाटली नाही .मग मला वाटणारी हळहळ किती फालतू आणि बिनकामाची आहे? माझ्यासारख्या माणसाला त्याची मातृभाषा कमी बोलली जाते म्हणूनही वाईट वाटण्याचा अजिबात हक्क नाही . कारण मी त्या भाषेसाठी काही केलेलं नाही . मी माझ्या भाषेत लिहित नाही,माझी मुले त्या भाषेत शिकत नाहीत . मग उगाच फेसबुकवर चकाट्या पिटायला वेळ आहे म्हनून भाषेचा अभिमान बाळगला तर ह्याने  भाषा टिकणार नाही  आपण ह्यापुढे ज्या पद्धतीने पैसे खर्च करू , त्या पद्धतीने आपली शहरे आकार घेत राहाणार. पैश्यापलीकडच्या गोष्टी स्पर्शाने आणि काळजीने जतन होत राहणार . बाकी सगळे निघून जाणार. मग काय टिकवायचे आणि काय जाऊ द्यायचे हि माझी जबाबदारी आहे

 

झेपेनसे झाले कि माणसे गाशा गुंडाळतात . ज्या वेगाने लोकसंख्या वाढली शहरे वाढली ,माणसांच्या आवडीनिवडी बदलल्या ,जगण्याचा वेग वाढला ,इंटरनेट आले त्या वेगाने जुने सारे काही नष्ट होण्याचा वेग वाढणे हे अपरिहार्य होते . कारण आपण काळापुढे मान तुकवलेले जीव आहोत . आपले चांगले झाले तर देवाने केलेले असते आणि वाईट घडले कि आपले सरकार जबाबदार असते ह्या ब्रिटीशकालीन गुलामी भावनेचे आपण भारतीय लोक. आपण एक व्यक्ती आणि नागरिक म्हणून  अतिशय घाबरट आणि पुचाट असतो . साहित्य संमेलने , मोर्चे , मिरवणुका , लग्न, सणवार असल्या झुंडीच्या ठिकाणी फक्त आपण चेकाळतो .आपल्याला आपल्या जगण्याची वैयक्तिक जबादारी नसते आणि कुणी दिली तरी ती घ्यायची नसते . त्यामुळे काळाचा वरवंटा फिरून आपले जुने जग नष्ट होणे हीच आपली बहुतांशी वेळा लायकी असते . आणि तसेच आपल्या देशात गेल्या वीस पंचवीस वर्षात वेगाने घडले आणि आपण आपली जुनी शहरे कणाकणाने नष्ट होताना आपण पाहत आलो.

ह्याच सगळ्याची दुसरी बाजू हि सुद्धा.अगदी ताजी.संजय दत्त आणि सलमान खानला रोज सकाळी पेपर वाचून शिव्या देताना आपण हे विसरलो आहोत कि त्या नटांना आपणच गरजेपेक्षा जास्त मोठे करून ठेवले आहे. आपण  त्यांच्यावर पैसे उधळले आहेत.आपण जबाबदार आहोत. जे चालू आहे त्या सगळ्याला. सरकार नाही आणि नशीब तर त्याहून नाही .आपण थेट जबाबदार आहोत. आपले निर्णय ,आपले पैसे खर्च करण्याचे मार्ग आणि आपल्या कृतींनी काळ आकार घेत राहतो आहे.

सचिन कुंडलकर .

अपेयपान  भाग  ४

 

वेश्या, गुंड आणि ठेवलेल्या बायका ह्या तीन शब्दांबद्दल मला वाढत्या वयात एक न संपणारी आसक्ती होती . कारण मी ज्या वातावरणात वाढलो तिथे ह्या तीनही शब्दांचे अर्थ माहित असूनहि, त्याचे प्रत्यक्ष क्रियेत रुपांतर करणाऱ्या व्यक्ती मी कधी पहिल्या नव्हत्या. हिजडा हा अजून एक शब्द होता पण मी रस्त्यावर पुरेसे हिजडे पहिले होते . रिक्षाने इथेतिथे जाताना सिग्नलला ते येऊन गाणी म्हणत आणि माझे गाल कुस्करून आईकडून दोन पाच रुपये नेत. तेही शुद्ध मराठीत बोलून .आमच्या इथला एक हिजडा तर चक्क “हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे” हे  गाणे म्हणत असे . आमच्या शाळेत आम्ही ‘हिजडा असणे’ म्हणजे नक्की काय यावर तासन तास चर्चा करुन स्वतःच्या गोंधळात भर पाडली होती . पण वेश्या, गुंड आणि ठेवलेली बाई ह्यांची काही केल्या भेट घडत नव्हती .

हिंदी सिनेमामध्ये वरील कामे करणाऱ्या तीनही व्यक्ती सतत भेटत. पण आपल्या आजूबाजूला असे कुणी का नाही? किती प्रश्न विचारायचे होते मला. का करता ? कसे करता ? कसे वाटते ?  मी तेव्हा अनिल अवचट ह्यांची पुस्तके वाचून फार भारावून गेलो होतो आणि  फार प्रश्न विचारणारा मुलगा बनू लागलो होतो . कारण तेव्हा आमच्याकडे माहिती मिळवायला गूगल नव्हते. माझ्या एका आजीला मी एकदा भर चैत्रगौरीच्या हळदीकुंकवात ,” आजी , आईला कावळा  शिवलाय म्हणजे काय झाले आहे? असे मोठ्यांदा विचारून तिच्या तोंडाला फेस आणला होता. कारण त्या दिवशी आई बाजूला बसून होती आणि कशालाही शिवत नव्हती.

आमच्या समोरचे ज्ञानेश्वरकाका गुंड आहेत असे घरात बोललेले मला कानावर पडे . पण ते माझ्याशी फार प्रेमाने वागत स,तत टापटीप कपड्यात असत आणि त्यांच्या पानाच्या टपरीसमोरून गेले कि ते मला नेहमी लवंग वेलदोडे खायला देत. ते गुंड असतील ह्यावर माझा विश्वास बसत नसे. पण ते खरच होते म्हणे. त्यांनी दोन खून पचवले होते. आणि असा माणूस आपल्याला लवंग वेलदोडे देतो ह्याचे मला फार भारी वाटे. पण तरीही माझ्यासाठी  ते गुंड नव्हते . खरा गुंड म्हणजे तेजाब मधल्या अनिल कपूर सारखा .ज्ञानेश्वर काकांच्या हाताखाली काम करत असणार असे अनिल कपूर सारखे लोक . त्यांच्यात माझी उठबस,जमल्यास थोडे लवंग वेलदोडे – चहा गप्पा असे काही होतच नव्हते. फार रटाळ सपक बालपण चालूच होते.

वेश्या मला पहिल्यांदा  दिसल्या त्या लक्ष्मी रस्त्यावर आईसोबत कापडखरेदीला गेलो तेव्हा . सिटीपोस्टाचा चौक लागला कि आमच्या शहराच्या हवेतले रंग आणि वास बदलू लागत . पाच मिनिटावर असणार्या आमच्या सदाशिवपेठेपेक्षा पूर्ण वेगळे. गजरेवाले , भेळवाले , अत्तरे विकणारी दुकाने , त्या तसल्या फिल्म दाखवणारे श्रीकृष्ण टाकीज , उकडलेली अंडी विकणारे फेरीवाले.तो भाग जवळ येऊ लागला कि आई माझा हात घट्ट धरून ठेवी आणि त्या भागातून झपझप चालत असे .तिथे त्या उभ्या असत . रस्त्याच्या दुतर्फा .तोंड भडक रंगवलेल्या.आत बुधवार पेठेत त्यांची मोठी वस्ती होती . मी आई पुढे खेचून नेत असताना मागे वळून त्यांच्याकडे पाहत राही .मला फार भेसूर आणि भयंकर काहीतरी वाटत असे.

मी विचारलेल्या कोण्याही प्रश्नाला उत्तर देणे माझी आई टाळत नसे. मला कसलाही संकोच वाटू नये ह्याची ती काळजी घेत असे. त्या बायका आहेत म्हणून आज शहरातील आमच्यासारख्या बायांची आयुष्य सुखरूप आहेत. त्या नसत्या तर विचार कर , पुरुषांच्या भुका त्यांनी आमच्यासारख्या बायकांवर भागवायला सुरुवात केली असती . तिने मला सगळे शांतपणे आणि स्पष्ट सांगितले. त्या बायका फार दुर्दैवी असतात .त्या खऱ्या देवासारख्या आहेत. आई शांतपणे म्हणाली . मीरा नायरचा ‘सलाम बॉम्बे’ हा सिनेमा मी आणि आईने TV वर एकत्र पहिला. त्यानंतर काही वर्षांनी सुमित्रा भावे ‘जिंदगी जिंदाबाद’ हा एड्स वरील चित्रपट करत असताना मी सहाय्यक होतो आणि एक संपूर्ण दिवस बुधवार पेठेत वेश्यांनी बुजबुजलेल्या एका इमारतीत आम्ही शूटींग करत होतो . त्या दिवशी मला जे दिसले त्यामुळे माझ्यातला पेठेतला पुणेकर मरून जायला मला मदत झाली. माझे सर्व प्रश्न उत्तरीत झाले. आणि मी आपण सोवळे, जग ओवळे ह्या मानसिकतेतून कायमचा बाहेर आलो. मी त्या दिवशी नरक म्हणजे काय ह्याचा अनुभव घेतला. अश्या जागी जावून कुणाला शारीरिक  तृप्ती कशी मिळत असेल ? मला तिथल्या लहान लहान मुली पाहून गोठून गेल्यासारखे झाले. आई कस्टमर सोबत आत गेल्यावर बाहेर खेळत बसणाऱ्या.

ठेवलेल्या बायका मला दिसायला आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क यायला जरा वेळ लागला . पण मी ज्या ज्या ठेवलेल्या बायकांना भेटलो त्या सगळ्या मजेत गुबगुबीत असलेल्या बायका होत्या. हिंदी सिनेमात अश्या बायकांना ‘रखेल’ म्हणतात आणि त्या संसार उध्वस्त करतात अशी त्यांची ठरलेली प्रतिमा माझ्या मनात होती . पण मी अश्या ज्या बायकांना भेटलो त्या बायका फारच स्वावलंबी , हुशार आणि कर्तृत्ववान होत्या . आमच्या कुटुंबातल्या काही पुरुषांनी , काही मित्रांनी , ठेवलेल्या बायकांना मला भेटायचा योग आला. पण मला वाटत होते तितक्या ह्या काही दुक्खी बायका नव्हत्या . त्या कितीतरी श्रीमंत होत्या . केवळ सोबत आणि प्रेम असावे म्हणून त्यांनी दुय्यम जागेचे हे नाते स्वीकारून आयुष्याशी तडजोड केली होती . एक दोन ठिकाणी तर मला हे दिसले कि त्या पुरुषाच्या कुटुंबाने त्यांना काळासोबत मूकपणे स्वीकारलेदेखील आहे. त्यांना अदृश्य ठेवले जाते , त्यांचे उल्लेख टाळले जातात पण त्या बायकांना कुटुंबाच्या वेशीवर का होइना , एक जागा दिली गेलेली असते.

मी एकदा Paris मध्ये माझा क्लास संपवून मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो होतो . एका छोट्या कॅफेमध्ये त्याचे दहा बारा मित्र जमलेले. एका मुलीने संत्र्याची साल घातलेला त्याचा आवडता केक बनवून आणलेला. जेवताना गप्पा मारत होतो तेव्हा ती मला शांतपणे म्हणाली मी वेश्या आहे . मी पोटापाण्यासाठी ते काम करते. माझा चमचाच खाली पडला. ती म्हणाली त्यात काय आहे लाजण्यासारखे ? ते माझे काम आहे . मी काहीतरी नवीन शिकून , कायमचा नवा जॉब मिळेपर्यंत हे काम करतीये . मग सोडून देयीन.  मी माझ्या मित्राकडे पाहून तिला विचारले , त्याला हे माहिती आहे ? ती म्हणाली हो . तो माझा जवळचा मित्र आहे. ऑफ कोर्स त्याला हे माहिती आहे .तिने तो विषय तिथे सहज सुरु झालेला तिथेच शांतपणे संपवला कारण तीच्यादृष्टीने त्यात अजून काही बोलण्यासारखे नव्हते . ती फोटोग्राफीचा अभ्यास करत होती . ती भारतात येऊन गेली होती . तिला गाणे शिकायचे होते. आणि निदान सहा मुलांना मी जन्म देणार आहे असे ती म्हणाली. तिला आई व्हायचे होते.

नाशिकला एकदा माझ्या भावासोबत एका ठिकाणी मिसळ खायला गेलो असता त्याच्या एका मित्राने बेसिनपाशी जाऊन हात धुताना खिशातले रीवोल्वर बाहेर काढून पुन्हा  आत नीट खोचून ठेवले . मी गप्पगार . आम्ही गेला अर्धा तास केवढ्या गप्पा मारलेल्या आणि हसलेलो . तो आत्ताही हसत होता आणि मी वेगळ्याच तंद्रीत . गुंड आहे हा !  भेटलाच शेवटी आपल्याला !  वाह . मला फार म्हणजे फारच बरे वाटले. आपण वाट पाहणे सोडले तेव्हा जगातली हि रंगीत माणसे आपोआप येऊन भेटली कि आपल्याला.

सचिन कुंडलकर .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2 thoughts on “अपेयपान . ‘लोकमत’ मधील लेखमाला . भाग १ ते ४ .”

  1. समवयस्क आणि समान विषय यामुळे connect होऊ शकले.

    Like

  2. I was in BMCC same year. I remember Namita Meheta 🙂 Didnt know you were in same college. 🙂 Could relate to this blog so much.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s