शहर . मौज दिवाळी अंक २०१५.

श्री.निळू दामले ह्यांनी घेतलेली मुलाखत .

कोणतही शहर हे त्याच्या रहिवाश्याकडे दुर्लक्ष्य करून त्याला एक मोकळी जागा देत . निमशहरी किंवा ग्रामीण भागात तुमच्यावर समाज नावाच्या घुसखोर मूल्यव्यवस्थेचा सतत एक डोळा असतो. मला मी ज्या ज्या शहरांममध्ये राहिलो वाढलो त्या शहरांनी एक anonymity दिली . खेड्यामध्ये राहण्याचा मला अनुभव नाही , मला तिथे कंटाळा येतो आणि निसर्ग झाडेझुडुपे वगरे गोष्टी मला सुट्टी साठी चार दिवस बरया वाटतात पण फार काळ आवडत नाहीत . आणि निवांतपणा , जुन्या चालीरीती ,एकत्र कुटुंबव्यवस्था ,परंपरा वगरेशी माझे तर भांडणच आहे . त्यामुळे मला मोठ्या शहरात राहणे आवडते .

।। सचिन कुंडलकर एका फिल्ममधे अडकले होते. चित्रीकरण, डबिंग यासाठी मुंबई-पुणे फेऱ्या करत होते. शहर या त्यांच्या आवडत्या विषयावर लिहायला सांगितल्यावर ते म्हणाले की शहरावर लिहिण्यापेक्षा बोलायला जास्त आवडेल. म्हणजे ते बोलतील आणि त्याच शैलीत ते लिहून काढायचं. ते बोलले. ते इथं तसंच. इकडलं तिकडलं गाळून.।।

कुठलाही प्राणी एका अत्यंत सोप्या नैसर्गिक वातावरणात वाढलेला असतो.एका इकोसिस्टिमधे वाढलेला असतो. त्यातच त्याचं साकल्य असतं.त्याचं पोषण असतं. माणसाच्या संवेदना,त्याच्या जाणिवांची वृद्धी ही त्याच्या मूळ  इकोसिस्टिममधे खूप चांगली होते मी चांगल्यापैकी मोठ्या झालेल्या शहरात जन्मलो, वाढलो. १९७६ सालचा माझा जन्म . तेव्हां पुणे शहर चांगल्या पैकी शहर होतं. शहरीकरणाचं कातडं पांघरलेलं खेडं नव्हतं. जेव्हां पुण्यात मोठा होत होतो  तेव्हां मराठी माणूस असल्यामुळं शहरीकरणाविषयीच्या अपराधभावनेमधे होतो. याचं कारण मी वाचत असलेलं मराठी साहित्य , माझ्या समोर आलेल्या कविता आणि गाणी .  सर्व मराठी साहित्यात , चित्रपटात ‘गेले ते दिन गेले’ नावाचा सूर असे . गावातले लोक साधे भोळे आणि शहरातील लोक भामटे असत .चित्रपटांच्या शेवटी माणसे आपल्या गावी परत जात आणि मातीचे ऋण फेडीत .

मी वाचायला लिहायला लागलो तेव्हां मोठ्या प्रमाणामधे भारतात समाजवादी नशेचा हँगओवर होता. मी मोठा होण्याच्या काळात, नव्वदीच्या मध्या पर्यंत. भारत समाजवादी आहे, कृषी प्रधान देश आहे, खेड्यांचा देश आहे, शहरं महत्वाची नाहीयेत, खेड्यांचा विकास करा, खेड्यात चला, असं सारं. यामुळं शहरीकरणाबद्दल , शहरात राहण्याबद्दल एक अपराध भावना होती. आजही शहरातल्या माणसाला सतत वाटवून दिल जात की आपण काही तरी कमअस्सल जगतो आहोत, आपल्या जगण्याला काही अर्थ नाही.आपली हवा घाण,आपलं पाणी बेकार , आपला शेजार्याशी संवाद नाही वगैरे वगैरे  . मोकळ्या वातावरणात, रानावनात, शेतावर, डोंगरदऱ्यामधे जाऊन राहिलं, तिथल्या त्या मूळ रहिवाशांबरोबर राहिलं म्हणजे ग्रेट.

शिवाय अनिल अवचट वगरे लोकांचं लेखन वाचून सगळ्या पुण्याला सतत अपराधी आणि वाईट राही कि आपण सुखी आहोत इथे पुण्यात म्हणजे काहीतरी क्रूरकर्म केले आहे आपण . मग त्यावर उतारा म्हणून अनेक लोक आपल्या साध्याभोळ्या मुलांना आनंदवन, नर्मदा आंदोलन , इथे तिथे पाठवित. आपल्याला जमले नाही आपण बँकेत नोकर्या केल्या , डॉक्टर झालो तर तेव्हडीच मुले तरी खेड्यात समाजसेवा करून पुण्य मिळवतील . खेडीपाडी शेतीभाती झाडे झुडुपे वाचवतील , आणि गांधीबाबा विनोबाआजोबा ह्यांचे आत्मे मुक्त होतील . आपली एक समजूत असते की आपल्या देशात प्रत्येकाला मूळ गाव असतो. त्या गावाशी आपलं नातं आणि नाळ जोडलेली असते . माझं गाव मात्र पुणेच, माझी मुळं पुण्यातच. माझा नशीब बरं कि मी पुण्यात जन्मलो आणि माझी समजूत त्याहून बरी कि एका वयात मी पुणे सोडले .तिथेच बसून कुंडीत नारळाची झाडे वाढवत बसलो नाही 

  आमच्या कुटुंबाच मूळ गाव आहे . किर्लोस्कर वाडीजवळ. मी कधीही माझ गाव पाहिलं नाही. आई वडिलांनी कधी गाव दाखवायला नेलं नाही. मला गावाकडं जाण्याचं कंपल्शन नव्हतं. ग्रामीण जीवनाविषयी आस्था असावी अशी जबरदस्ती माझ्यावर नव्हती. मी लहानपणी एकदा दोनंदा कुलदैवताला गेलो होतो . तेव्हापासून मला गावात जाण्याचे धुळकट प्रवास करायला जीवावर येतं .गोवा हा एकच ग्रामीण भाग फार मस्त आहे . बाकी ठिकाणी जायचा मला जर कंटाळाच आहे थोडा. गोव्यात मी कितीही वेळा जायला तयार असतो. कारण मला चंगळ करत जगायला फार म्हणजे फार आवडते . मला सतत इंटरनेट चा अमर्याद पुरवठा लागतोच आणि वाहने लागतात . आणि जे जे काही सुख देते ते सगळे लागते.चांगली पुस्तके, उत्तम चित्रपट, उंची मद्य, देखण्या स्त्री पुरुषांचा आजूबाजूला वावर,बुद्धिमान लोकांशी गप्पा- विचारविनिमय , जगभरातले उत्तम जेवण आणि सुशिक्षित निधर्मी लोकांची मस्त संगत. 

 पुण्यातली मर्यादित इकोसिस्टिम नैसर्गिक होती, सुरक्षिततेचं एक कवच होतं. एक अंडच होतं. मराठी असणं हासुद्धा अंड्याचाच भाग होता.मराठी, ब्राह्मणी वातावरण होतं. सदाशिव पेठेत वाढलो, भावे स्कुलात शिकलो. आपली समज, आपल्याला जे वाटतं ते खरं असतं अशी माझी समज होती. पुणे शहर म्हणजे विद्यापीठ आहे. तिथं तुमचं पोषण होतं. पण विद्यापिठात कोणी आयुष्यभर रहात नसतं. अठराव्या वर्षानंतर माणसानं पुण्यात राहू नये. पुण्यात रहाणं म्हणजे बाल्यावस्थेत रहाणं होय. बाल्यावस्थेत सुख असतं, आपल्या मतांविषयी एक अनावश्यक खात्री असते . बाल्यावस्था कधी तरी संपावी लागते. बाल्यावस्थेनं दिलेल्या खात्रीच्या बाहेर माणसाला कधी तरी पडावं लागतं. पहिली दहा किंवा अकरा वर्ष पुण्यातल्या माझ्या घरात टेलेफोन नव्हता, टीव्ही नव्हता. तिथून मी टेक इव्होल्यूशन पाहिलं. काही नसणं, फक्त रेडियो असणं आणि आता दोन टीव्ही असणं, प्रत्येकाकडं दोन मोबाईल असणं, त्याचं कंपल्शन तयार होणं, हा फँटास्टिक इंटरेस्टिंग प्रवास आम्ही केला आहे. प्रशस्त ग्रंथालये , घराला मोठी अंगणे , उत्तम शिक्षक , चांगले सिनेमे नाटके पहायच्या जागा , उत्तम संगीत महोत्सव आणि रोमारोमात भरलेला निवांतपणा . हवा थंड . पाणी शुद्ध . काय विचारायची सोय नाही . मला वाचनाची आवड लागली, चित्रं – सिनेमे बघायची सवय लागली. .स्वतःची जडण घडण करून घ्यायला महाराष्ट्रभरातून कितीतरी तरूण मुले पुण्यात येवून शिकतात. आम्हाला पुण्यातल्या मुलांना कल्पना करता येणार नाही इतक्या पोषक गोष्टी सहजपणे उपलब्ध होत्या.  शहरात राहात नसतो तर मला ज्ञान मिळालं नसतं, माझी आजची घडण झाली नसती. पुण्यातला समाज म्हणजे स्वतःविषयी खात्री असणारा समाज आहे. त्याला कधी दुःख झालेलं नसतं. स्वतः विषयी डाऊट नसतो.प्रकाश संतांच्या लंपनचं जसं बालपण होतं तसं छान बालपण त्या शहरानं मला दिलं. पुण्यानं मला ‘नाही’ म्हणायला शिकवलं. हे चालत नाही, हे मला आवडत नाही, विशिष्ट वयापर्यंत माझी नाहीची भिंत मजबूत होती. याला हे चालत नाही, हे आवडत नाही, हे हा करणार नाही.ती नाही म्हणायची ताकद मला आजही खूप कमी येते .

माझे बाबा आणि आई मध्यमवर्गीय असले तरी मध्यमममार्गी घाबरलेले नसत. घरच्या मर्यादित आर्थिक परिस्थितीत त्यांना जे मिळाले नाही ते सगळा काही आम्ही दोघा भावंडांनी मिळवावे असे त्यांना वाटे . म्हणजे शिक्षण पुस्तके प्रवास आणि उत्तम कपडे . ते दोघे जे कमवत ते सगळा काही आमच्या पुस्तकांवर आणि शिक्षणावर खर्च करीत . पुण्यानंतर मी मुंबईत गेलो.  मुंबईत माझे मोठे काका कुलाब्यात रहायचे. त्यांच्याकडे मी प्रचंड राहिलो. असिस्स्टंट कमिशनर ऑफ पोलिस होते. रेडियो क्लबच्या समोर घर होतं. मुंबई एक्झॉटिक होती, समुद्र होता,जुन्या पद्धतीची श्रीमंती होती. ऐंशीच्या दशकातली. ओप्युलन्स. मुस्लिम, पारशी आणि ख्रिस्ती लोक. आमच्या इमारतीत काकांचं सोडून एकच मराठी कुटुंबं. ते तिरोडकर . जहाज बांधणी उद्योगातले . बाकीची इतर भारतीय माणसे . मुंबईने मला जगण्यातली तफावत दाखवली  मुंबईनं माझ्याभोवतीचं अंडं फोडलं. कवच मोडलं. मला टॉलरंट बनवलं. अनोळखी गोष्टींना आपलंसं करायला शिकवलं. इतर भाषेची लोकं तुझ्याबरोबर रहाणार आहेत, तू खातोस त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं अन्न खावं लागणार आहेत, तुला जे लेखक ग्रेट वाटतात त्यापेक्षा फार मोठे लेखक आहेत. हे सारं मला मुंबईनं समजावलं. पोल्युशनशी चांगली दोस्ती झाली. धूर आणि पाण्याचं पोल्युशन मी म्हणत नाहीये. ते भारतातल्या शहरात राहून मी पचवलंय. पोल्युशन म्हणजे परक्या ठिकाणी पोचल्यानंतर तिथं स्विकाराव्या लागणाऱ्या गोष्टी. आपण ज्याला खरं मानतो त्यापेक्षा नंतर काही तरी वेगळं येणार असतं. घराची रचना, खाणं हे सारं पोल्युट होत असतं. मुंबईत इतक्या नव्या गोष्टी समोर आल्या की माझी पोल्युशनची भीतीच गेली.

नंतर मी पॅरिसला शिष्यवृत्ती मिळवून सिनेमा शिकायला गेलो. तेव्हां २२ वर्षाचा होतो. माझ्याबरोबर अभ्यासक्रमात बारा देशातली बारा मुलं होती. एकमेकांशी ओळख झाली. पहिल्याच दिवशी इतर विद्यार्थांनी विचारलं ‘ तुझ्या आई वडिलांकडं तू रहातोस, त्यांच्या घरात रहातोस ?’ त्यांना आश्चर्य वाटलं. मी म्हणालो, “हो.”  पॅरिसमधे यू आर ऑन युवर ओन.   मी परत आल्यावर घर सोडलं. आईला म्हटलं वेळ झाली घर सोडून जायची. आई म्हणाली जा. पॅरिसला मला कळलं की आपलं घर हवं, स्वयंपाकघर आपलं हवं. कारण तुमच्या जगण्याचं डिझाईन अठराव्या वर्षी तुम्हीच करायला लागलं पाहिजे, सुरक्षिततेतून बाहेर पडलं पाहिजे, तुमचे पैसे तुम्ही कमावले पाहिजेत.तुम्हाला तुमची पोळीभाजी रांधून खाता आली पाहिजे आपापली . हे महत्वाचं शिक्षण मला युरोपनं दिलं.

पॅरिस किंवा तशा युरोपीय शहरात गेल्यावर ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळं पाहून झाली की खरं युरोप समजायला सुरवात होते. प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळं म्हणजे शहर नव्हे. मोना लिसा आणि लुवरचा राजवाडा आणि आयफेल टॉवर म्हणजे पॅरिस नव्हे. लहानपणी पुलंची अपूर्वाई वाचली होती. त्यामुळं फ्रेंच माणूस म्हणजे सतत वाईन पिणारा, उसासे टाकत प्रेम करणारा, चित्रे काढत बसणारा, पियानो वाजवणारा माणूस असं मला वाटे. प्रत्यक्षात फ्रेंच माणसाला घराचे हप्ते भरावे लागतात, त्याच्या घरावर जप्ती येते, पोट भरण्यासाठी त्याला आपल्यासारख्याच खटपटी कराव्या लागतात,त्याला गंभीर व्यसनाधीन मुले असतात ,रस्त्यावर भरपूर भिकारी असतात.Paris ने मला अपरिमित उर्जा दिली आणि मी माझा कोर्स संपवून परत येताना संपूर्ण बदलून आलो. आयडियल फुलबागेत मला जगायचंच नाहीये. मला सुरक्षितता नकोय. मला आजचं उद्या रहावं असं वाटत नाहीये. माझी भाषा, काम, तसंच रहावं असं वाटत नाहीये. टेंपररीनेस हा शहरीपणाचा भाग मला मुंबई आणि Paris ह्या शहरांनी  चांगला शिकवला.व्यक्तिवादी असण्याची, स्वतःची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेण्याची गरज उत्पन्न केली.

मला घोमळ्यात रहायला आवडत नाही. घोमळा. एकमेकांच्या पायात पाय अडकवलेला समूह. आमच्याकडं देशस्थांकडे  जेवायला घोमळा असतो. आटोपशीर प्लान नसतो. दहा माणसं येणार सांगितलं तर सतरा येऊ शकतात .मला कुटुंबात रहायला आवडत नाही. मला चार पाच माणसांत रहायला आवडत नाही. मी लहान असतानाच मला ओळखून आई वडिलांनी एक वेगळी खोलीच देऊन टाकली. लहान गावात सामाजिक प्रथा  सामाजिक जबाबदारी, कृतज्ञता इत्यादी गोष्टी जगण्यात तुम्हाला न विचारता गृहीत धरल्या जातात .मला हे सगळ मान्य नसल्याने, कुटुंबात राहायची आवड नसल्याने  पूर्ण खाजगीपणा देणारं आणि माझ्या आयुष्यात नाक न खुपसणारं मुंबई सारख शहर मला आत्ता तरी आवडत आहे . पुढे काय होईल ते माहित नाही . 

मला माणसांनी अनावश्यकपणे एकत्र येउन केलेल्या बर्याच गोष्टी आवडत नाहीत . सण आवडत नाहीत, रस्त्यावरच्या लग्नाच्या मिरवणुका आवडत नाहीत. मला उगाच  सेलेबरेट करता येत नाही. दिवाळी आली की मी म्हणतो की हे कृषीप्रधान सण आहेत. मला त्यानी आनंद होत नाही. मग मी कां तो साजरा करू? का नवे कपडे घालू? माझं पीक नाही आलेलं सुगीचं. सर्व पारंपारिक सणाचा संबंध इकॉनॉमिक्सशी आहे.मला त्यामुळे ते सण साजरे करावेसे वाटत नाहीत .मला ज्या दिवशी खुषी वाटेत तोच माझा क्षण. फिल्मची पहिली प्रिंट हाच सण. त्या दिवशी सर्वाना जेवायला घालेन. ३१ डिसेंबरला मला   आनंद व्यक्त करावासा वाटत नाही. मला त्या दिवशी आनंद होत नाही, मला ओरबाडून आनंद होत नाही. मला जयंत्यांना आनंद होत नाही पुण्यतिथीनं दुक्ख होत नाही.

सुचणं. सुचल्यावर फार आनंद असतो. ते सेलेबरेट करावेसं वाटतं. ज्यांना हे कळतं त्यांच्याशी मी तो आनंद शेअर करू शकतो. नविन काही सुचणे ह्यासारखा सणाचा मोठा दिवस नाही .

पुण्यात मला सुचायच थांबल कारण लाडावून पोषण केलेल्या गुबगुबीत वातावरणात राहिलात तर तुम्हाला सुचेल कसं? त्यामुळे प्रत्येकाने आपापले जन्मगाव उमेदीच्या काळात सोडून बाहेर जावे अश्या मताचा मी आहे . हे झाड आता आहे ते बघून ठेव, उद्या ते पिवळ्या फुलांचं झाड नसणार, पाडतील रात्री ते झाड, आता घे छान अनुभव त्या झाडाचा. ते झाड असणं हा नॉर्म करू नकोस.

पुणे मुंबई आणि Paris ह्या तीन शहरांनी माझी अंतर्गत आणि बाह्य जडणघडण केली आहे . Paris विषयी स्वतंत्रपणे लिहावे लागेल .ते माझ्यासाठी फार महत्वाचे शहर आहे. तो माझा पेट्रोल पम्प आहे . मला वारंवार तिथे जाऊन पुनुरज्जीवित व्हावे लागते . मला सध्या कोणत्याही शहराच्या इतिहासाचा कंटाळा येतो. विशेषतः Paris सारखी शहरे इतिहास दाखवून Tourism वर चिक्कार पैसे कमवत असतात . इतिहास हा शहरी अर्थव्यवस्थेत पैसा कमावायचे साधन आहे. ज्या समाजात सध्या काही फार घडत नाही त्या समाजाला इतिहासाची आणि महापुरुषांची फार गरज लागते. त्यांचे पुतळे ,वाडे आणि दंतकथा लागतात . मग Tourist येतात आणि शहरातली बेकार मुले गाईड बनून पैसे कमवू शकतात. शहरात एक देवूळ आणि एक महाल असेल तर पाचशे लोकांचे पोट वर्षभर भरते . पुण्यात आणि Paris मध्ये हे दोन्ही चिक्कार आहे . त्यामुळे मला ह्या दोन्ही शहरांच्या वर्तमानात जास्त रस आहे . भूतकाळात नाही.आणि आत्ताच्या काळात ह्या दोन्ही शहरातील मूळ रहिवाश्यांचा वर्तमान मजेशीरपणे गडबडलेला आहे. 

मी जे शहर सोडून गेलो तेच शहर गाठायला छोट्या गावातून हजारो लोक येतात . मी पुणे सोडताना पुण्याच्या आकर्षणाने छोट्या गावातली माणसे अभिमानाने आणि समाधानाने पुण्यात येवून राहातात याची मला मौज वाटते . आपण जे शहर सोडून पळतो ते इतर कुणालातरी अधिरतेने हवे आहे . सध्या महाराष्ट्रातील छोट्या गावातील श्रीमंत कुटुंबांमध्ये पुणेकर होणे हि एक सन्मानाची बाब आहे . मला त्याचे हसायला येत नाही पण मौज वाटत राहाते. आता ह्यांची पुढची पिढी ह्यांना शिव्या घालत पुणे सोडणार आणि हे लोक हात चोळत टेकड्यांवर फिरत बसणार . मी आता मुंबईत आहे . मी काही वर्षांनी मुंबई सोडून भलतीकडेच कुठेतरी जाणार. वेगळ्याच जगात वेगळ्या शहरात वेगळ्या भाषेत विरून हरवून जाणार . हे रक्ताभिसरण फार नाट्यमय आहे . शहरात सगळ तात्पुरत आहे . भाषा , चालीरीती , इमारती सगळा काही तात्पुरत. आणि तेच जगण्यासाठी फार आश्वासक आणि पोषक आहे हे आपल्या लक्षातच येत नाही .आपल्या भारतीय समाजाला सगळा काही कायमच हव असत . म्हणून मग अनेक लोक शहरांना घाबरून कोकणात वगरे आडगावी जमिनी घेऊन घर उभारतात आणि चुकीच्या वयात भलतीकडे जाऊन शेतीबीती करत बसतात. 

आता नीट विचार केल्यावर असाच वाटतंय मला कि शहरात जन्मलो आणि राहिलो हे बरच झालं . पुढे काय होईल आणि त्याप्रमाणे कशी मते बदलतील ते आत्ता तरी सांगता येत नाही. पण शहरी जीवन सोडून मी नक्कीच शांतता आणि हिरवाईच्या शोधत कुठेतरी जाऊन बसणार नाही हे नक्की. मी प्राणीच तसा नाही.

 

Kundalkar@gmail.com

One thought on “शहर . मौज दिवाळी अंक २०१५.”

  1. खूप सुंदर लिहीलंयस सचिन. मला गाव आणि शहर दोन्ही होतं. मला छोट्या शहरातलं निवांत आयुष्य कायम आवडलं असतं. पण आता मजल दरमजल करत शेवटी लक्षात आलं की घोमळा नसणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते भिनत जातं तुमच्यात. आपोआप तुम्ही अजून अजून तुम्ही स्वतःचे होत जाता. खूप दिवसांनी काहीतरी आश्वासक आणि छान वाचलं.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s