अपेयपान .लोकमत मधील लेखमाला . भाग २७ ते ३०

अपेयपान २७
स्वतःच्या घरातून उठून आपल्याच शहरामध्ये एखाद्या सुंदर हॉटेल मध्ये जाऊन राहायचा प्लान डोक्यात आकार घेऊ लागला आहे. अंधारून आले आहे . पाऊस पडतोय आणि जे घर आवडीने आवरून सजवून जागते ठेवतो , त्या घरामध्ये मनाच्या येरझाऱ्या घालायला जागा पुरत नाहीये.
शिस्त आड येते आहे. व्यवस्थित वागण्याची , टापटीप ठेवण्याची सवय आड येते आहे . स्वयपाक करता येतो हि गोष्ट सोय नसून गैरसोय होवू लागली आहे.
उशिरा उठायचे ठरवले तरी उशिरा उठू शकत नाही मी. साडेसात वाजता कचऱ्याची पिशवी न्यायला बाई येते. साडेआठ वाजता स्वयपाकाची बाई आणि मग नाश्ता करून नऊ वाजता लिहायला बसावेच लागते. साडेबारानंतर सगळ्या जगाला कामाचे फोन्स . एक नंतर बाहेरच्या भेटी गाठी . गाडीत बसून मनात चालू असलेले विचार . कामाचे , सिनेमाचे, आठवणीतल्या माणसांचे . आणि रात्री घरी परतल्यावर एखाद्या अतीशय लहान मुलासारखे गुपचूप वाट पाहणारे घर. दुपारी एक बाई येऊन ते आवरून पुसून जातात त्यामुळे अंघोळ घालून भांग पाडून नवा शर्ट घालून ठेवलेल्या लहान मुलासारखे दिसणारे माझे घर. रात्री घरी येऊन दार लावले कि धावत आपल्यापाशी येणारे. ह्या शहरात इतकी माणसे आहेत कि एकांत मिळण्यासारखे दुसरे सुख नाही .
त्या आपल्याच घराचा पावसाळ्यात कंटाळा येऊ लागतो. मी समुद्रापासून अर्धा पाऊण तास लांब राहतो. समुद्राची आठवण येत राहते. एरवी ह्या शहरातल्या वेगाच्या आयुष्यात हे लक्षातसुद्धा येत नाही कि आपण समुद्राच्या इतक्या जवळ असूनही त्याला भेटलेलो नाही , पाहिलेले नाही .
असे वाटते कि लहानपणी मावशीकडे राहायला जायचो आणि ती लाड करायची तसे कुणी आपल्याला उरलेले नाही . मावशी गेल्यापासून ती एक प्रेमळ जागा संपून जाते आणि परत तसे कुणीही उरत नाही. इतर नातेवाईकांकडे गेलो कि त्यांच्या लहान बेशिस्त कर्कश मुलांचा आरडओरडा सहन करावा लागतो. कुणाशीही कधीही शांत गप्पा मारता येत नाहीत कारण जाऊ तिथे सगळ्यांना असली आगाऊ मुलेमुली असतातच. ज्यांना मुले नसतात त्यांच्या बहुतेकांच्या बायका नवऱ्याला एक मिनिट मोकळा सोडत नाहीत. कारण तो नवरा हेच त्या बायकांचे एक मूल बनलेले असते. त्यामुळे आपली म्हणून जी प्रेमाची खाजगी माणसे असतात ती म्हणत जरी असली कि ये कि आमच्यात जरा गप्पा बिप्पा मारू ! तरी त्यांच्याकडे गेले तरी त्या आपल्या माणसांशी आता शांत गप्पा होणार नाहीत हे गेल्या काही वर्षात लक्षात आलेले असते. त्यांचे लहानपण संपून त्यांच्या मुलांचे सुरु झालेले असते . आपले अजून संपलेले नसते .आपल्यासारखी लहान मुलांच्या मनाची माणसे त्यानाही नको झालेली असतात. कौटुंबिक लोकांच्या जाणीवेचा एक समूह असतो . ती एक वेगळी जगण्याची पद्धत असते आणि जी माझ्यासारखी माणसे कुटुंबाच्या गर्दीशिवाय आयुष्य रचतात त्यांना अश्या ठिकाणी गोंधळून संकोचून जाऊन अतिशय परके वाटत राहते. एकास एक अश्या संवादाची सवय झालेल्या माणसाला फार तर फार दोन माणसांशी व्यवहार करता येतो . तीन नौ किंवा सतरा नाही. त्यामुळे माणसांचा घोळका दिसला कि मी संकोचून आकसून बसतो. सतत कुटुंबात राहिलेल्या माणसांना आपले मन कळू शकत नाही . आपल्याला त्यांचे कळू शकत नाही . आणि अशातून कितीतरी महत्वाच्या नात्यांवर शांततेचे पांढरे मुलायम कापड पसरले जाते.
आपल्या माणसासोबत गप्पा मारणे , फिरायला जाणे , मद्यपान करणे, संगीत ऐकणे, एकत्र स्वयपाक करणे हे शांत आश्वासक सुख. ते काही कारणाने तत्काळ मिळणार नसेल किंवा त्या माणसाच्या कामातून तो मोकळा होण्याची वाट पहावी लागणार असेल तर मात्र एका प्रकारच्या एकांताला चांगला पर्याय हा दुसऱ्या प्रकारचा एकांत ठरतो. अनोळखी माणसांनी गजबजलेले जग नाही.
शिवाय जरी कुणी लग्न केलेले असेल तरी कुणालाही सारखे आपले प्रेमाचेच तेच ते माणूस नको असते. पावसाळ्यात कात टाकावी वाटते. नवे काही हुंगावे वाटते. चुलीवरचे काही लागते. प्रेमाशिवायची सोबतही चालणार असते. सारखे प्रेम प्रेम साडी गाडी हफ्ता मुले फीया प्रेम प्रेम पोळी भाजी नवा flat प्रेम प्रेम दागिने भांडणे माझी आई तुझी आई माझा बाप तुझा बाप सासर माहेर दिवाळी दसरा असे करून कंटाळा आलेला असतो. प्रेमात पडून घरी लग्न करून आणलेल्या माणसांचे सुरुवातीला रोज उत्साहाने उतरवलेले आतले कपडे आता दिवसा दोरीवर वाळताना पाहून सगळे आकर्षण चार दिवसात संपलेले असते. त्यालाच लग्न म्हणतात हे कळलेले असते. अश्या परिस्थितीत कुणी बोलत नाही हे कुटुंबाला घाबरून ,पण पहिल्या पावसात नव्या मनाला भेटणे केव्हाही चांगले. त्यामुळे आपले भले होते . कामाला उत्साह येतो. तात्पुरते आणि नवे माणूस पावसाळ्यात सोबत असण्यासारखे सुख नाही . त्यामुळे एक उपाय सांगतो तो कुणालाही करून पाहता येईल.
गेल्या पावसाळ्यात मी गाडीत माझा i pod , दोन पुस्तके , चालयचे बूट आणि काही कपडे टाकून घरातून निघालो आणि ओल्या झालेल्या दक्षिण मुंबईत मस्तपैकी एका हॉटेलमध्ये जाऊन दोन दिवस राहिलो. आपल्याच शहरात पाहुणा म्हणून आल्यासारखे. मला किती मजा आली हे मी सांगूच शकत नाही आता तर जणू चटक लागल्यासारखी वाटते आहे.
खोलीत सामान पसरून टाकले आणि सरळ पोहायला गेलो. हातात मार्टीनी घेऊन पूल मध्ये डुंबत बसलो . अनोळखी लोकांशी गप्पा मारल्या . मी मुंबईत अनेक वेळा मी इथे राहत नाही पुण्याहून आलोय असे सांगतो तसे सगळ्यांना सांगितले .थोड्यावेळाने माझाही माझ्यावर विश्वास बसू लागला. दम लागेस्तोवर पोहलो आणि बाहेर पडून कॉफी शॉप मध्ये जेवलो. आणि चालायचे बूट घालून सरळ पावसात फिरायला बाहेर पडलो. रविवारी दक्षिण मुंबई रिकामी असते. फार सुंदर दिसते. मोठ्या ब्रिटीशकालीन इमारतींना ग्लानी आलेली असते आणि मोठे रस्ते आपली वाट पाहत असतात. मी नरीमन point पासून गिरगाव चौपाटी पर्यंत समुद्राकाठाने रमत गमत चालत राहिलो. समुद्राच्या प्रचंड लाटा पावसाळ्यात मरीन लायीन्स च्या किनार्यावर येतात. त्या अंगावर घेत .
मग चालायचा कंटाळा आल्यावर taxi ला हात करून हॉटेलवर परत गेलो . गरम shower घेऊन लोळत tv वर सिनेमे पहिले . उठलो आणि स्पा मध्ये जाऊन थाई मसाज घेतला . आपण कुठे आहोत हे शांतपणे हळू विसरून गेलो. मी ओळखीच्या शहरात आहे हे विसरलो. आणि होतो तिथेच पाहुणा बनलो. घरच्या जबाबदारीतून सुट्टी घेतली. कुणाही ओळखीच्या माणसाला भेटणे टाळले . स्पा मधून बाहेर पडून ग्रीन टी पीत एक पुस्तक घेऊन तिथेच लोळत पडलो आणि झोपी गेलो. काही वेळाने स्पा बंद होताना मला कुणीतरी उठवायला आलं.
मी एरवी कधीही करत नाही त्या सगळ्या गोष्टी अश्यावेळी करतो. कारण मी नसतोच न माझ्या जगात. मग मी आखलेले नियम बदलून टाकतो. आपले नियमच आपल्या आड येतात हे अश्या वेळी कळते. उदाहरणार्थ त्या वेळी मी स्पा मधून जागा होवून , खोलीत जाऊन तयार झालो आणि न लाजता माझे ढेरपोटे शरीर घेऊन पब मध्ये गेलो आणि मोकळेपणाने घेरी येईपर्यंत नाचलो.
सुट्टीला बाहेर गेलं कि दिवस एकट्याने घालवावा रात्र नव्हे. आपल्याच शहरात विरघळून गेलं कि हे करणे शक्य होते त्यासाठी कुठेही बाहेर सुट्टीला जावे लागत नाही. उत्तम चांगल्या हॉटेल मध्ये जाऊन गुप्त होवून जायचे.
आपल्याच वातावरणात विरघळून गेले नाही आणि सतत दिसत राहिले तर आपल्याला गुदमरल्यासारखे होते. त्यासाठी मधेमध्ये आपल्या मनाच्या हितासाठी प्रत्येक स्त्री पुरुषाने मिस्टर इंडिया व्हायला लागते. नाहीतर आयुष्य फार रटाळ आणि तेच ते बनते.

सचिन कुंडलकर

अपेयपान २८

मराठीतले सुप्रसिद्ध संपादक , मौज प्रकाशनाचे प्रमुख श्री. पु .भागवत ह्यांच्यासमोर मी माझ्या पहिल्या कादंबरीचे , ‘कोबाल्ट ब्लू’ चे हस्तलिखित घेऊन बसलो होतो. ते त्यांनी एकदा बारकाईने वाचून संपवले होते . मला त्यांचे पत्र आले होते . माझ्याशी इतर आवश्यक चर्चा करून , कादंबरीविषयी बोलून श्री .पु. भागवत असे म्हणाले होते कि तुम्ही चित्रपट क्षेत्रात लेखक म्हणून आणि साहित्य क्षेत्रात चित्रपटदिग्दर्शक म्हणून मिरवत बसाल आणि असे करण्यात तुमचा फार वेळ वाया जाईल तर कृपया तसे होवू देवू नका. शिस्तीने लिहित राहा कारण तुमच्यामध्ये चांगल्या शक्यता आहेत. सिनेमे बनवण्यात आपला फार वेळ जात नाहीना ह्याकडे काळजीपूर्वक लक्ष दया.
मला ते काय म्हणतायत हे तेव्हा नीट कळले नव्हते . पण ते जे बोलत होते ते खरे होते . ज्याचा मला आज रोज आतून साक्षात्कार झाल्यासारखा होत रहातो. त्यावेळी मी दोन्हीही नव्हतो. मी लेखक नव्हतो कारण ‘कोबाल्ट ब्लू’ सोडून मी काही लिहिले नव्हते आणि मी चित्रपट दिग्दर्शक तर अजिबातच नव्हतो. त्या भेटीनंतर चार वर्षांनी मी माझा ‘restaurant’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित करणांर होतो . माझ्या मनात कोणतेही आराखडे किंवा वेळापत्रके नव्हती आयुष्य जास्त अनिश्चित सोपे आणि उघडेवागडे होते. त्याला कोणताही घट्ट आकार दिला गेला नव्हता. मी लिहिलेले काही प्रकाशित होईल हेच मला खरे वाटत नव्हते . मी अपोआप आणि माझ्यासाठी लिहीले होते. पण ते तिथे थांबणार नव्हते. त्या लिखाणाचा , त्या गोष्टीचा स्वतंत्र आपापला प्रवास विधिलिखित होता. श्रीपु त्यादिवशी जे म्हणाले ते मी आयुष्यात खरे करून दाखवले. ते म्हणत होते त्या चुका केल्याच . किती द्रष्टेपणाने आणि सोप्या साधेपणाने सांगत होते ते . पण ते काय सांगत आहेत हे समजून घेण्याची पात्रता तेव्हा माझ्यात नव्हती ह्याची मला खंत वाटते.
महाराष्ट्रात, केरळात आणि बंगाल मध्ये लेखक होणे एकाच वेळी फार सोपे आणि एकाच वेळी महाकठीण.कारण मोठी साहित्य परंपरा हे एक छोटे कारण आणि सांस्कृतिक आणि सर्जनशील उपद्व्याप करण्याची हौस सामान्य माणसांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असणे हे दुसरे कारण. काही घडले कि ओढला कागद पुढे , लिहून काढले आणि दिले मासिकाला पाठवून. झालो लेखक. लिहित्या माणसावर अतिशय मोठ्या लेखकांचे वजन आणि दडपण , त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला जवळजवळ सर्व साक्षर माणसांना कागदावर खरडले कि लिहून झाले असे वाटायचा धोका मोठा.
त्यामुळे एकाच वेळी ह्या तिन्ही राज्यांमध्ये खूप जास्त लेखक असतात आणि त्याचं वेळी खरे कसदार लेखक फार कमी असतात अशी परिस्थिती. जी महाराष्ट्रात अजुनी चालू आहे. इंग्रजी भाषेमध्ये लिखाण आणि साहित्य ह्यातली जी सीमारेषा मानतात ती मराठीमध्ये संपून गेली आहे . प्रकाशित होणे सोपे होवून बसले आहे .आणि सातत्य , संशोधन आणि परिश्रमपूर्वक सावकाश केल्या गेलेल्या लेखनाचा मराठीतला काळ जवळजवळ संपुष्टात आला आहे.

माझ्या संपूर्ण जाणिवेचे पोषण लहानपणी पुस्तकांनी केले . चित्रपटाचा मोठा पगडा मनावर तयार व्हायचा आधी . TV आणि मराठी रंगभूमी हि दोन्ही माध्यमे माझ्या वाट्याला आली नाहीत. कारण माझ्या घरात कुणालाही त्यांची आवड नव्हती. पुस्तकांची आवड असायला हवी हे वातावरण होते आणि जवळजवळ सगळ्यांना सिनेमाचे व्यसन होते. आणि त्यामुळे माझे मन अजूनही वाचणारे मन आहे . पाहणारे मन नाही . माझ्यापेक्षा जी लहान वयाची भारतीय पिढी आहे त्या पिढीचा ज्ञानाचा आणि अनुभवाचा मार्ग ‘पाहणे’ हा आहे .तसा माझा ‘वाचणे’ हा आहे. कारण मी एकोणीसशे नौवद च्या आधीच्या analog काळात जन्मलेला मुलगा आहे. digital क्रांती भारतात घडण्यापूर्वी आणि त्याचे परिणाम मध्यमवर्गाच्या रोजच्या आयुष्यात उमटण्यापूर्वी जन्मलेला. त्यामुळे माझ्या ज्ञानेंद्रियांना वाचणे जास्त सुलभ जाते. बघणे नाही. त्याच्या बरोबर उलट माझ्या कुटुंबातील माझ्याहून लहान भाचरे आहेत माझ्यासोबत काम करणारे लहान वयाचे हुशार तंत्रज्ञ आहेत त्यांना पाहायला आवडते . वाचायला नाही. कोणताही अनुभव , माहिती , भावनेचा अविष्कार त्यांना दृश्य स्वरुपात असला कि कळतो. मला साधे सोपे शब्द लागतात. मला वर्तमानपत्र वाचले तरी चालते. त्यांना छोट्या video च्या स्वरुपात बातम्या पाहायच्या असतात. मी जुना आहे. मला भाषा लागते. भाषेचे व्याकरण लागते. लिखित किंवा बोली शब्दातून उत्तर लागते. त्यांना नाही .मी कोणत्याही अनुभवाचा पटकन फोटो काढून ठेवत नाही . मी तो अनुभव स्मृतीमध्ये ठेवतो आणि जर महत्वाचा वाटला तर त्याविषयी काही दिवसांनी लिहितो.
विकसनशील देशांमध्ये आपण फार पटकन जातीय राजकारण ,अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाला वैयक्तीक पातळीवर बळी पडतो. आयुष्यातले पटकन सगळे घाबरून बदलून टाकतो. आपली आपली खास रचना ठेवत नाही . त्यामुळे आपल्यासारख्या देशातील लहान पिढीवर जाणिवेचे संस्कार करताना तांत्रिक व्यवस्था आणि जातीव्यवस्था फार ताकदवान ठरते. आपल्याला मुले कशी वाढवायची आहेत ह्याच्या निवडीची फारशी संधी आपल्याला मिळत नाही .आपल्याला साधे मातृभाषेत आपल्या मुलांना शिकवायची सोय राहिलेली नाही. मराठी शाळांची जी सध्या शहरांमध्ये भीषण अवस्था आहे त्यात आपल्या मुलांना त्या शाळांमध्ये घालणे हे त्या मुलांच्या आयुष्याचे कायमचे नुकसान करणे आहे. मराठी शाळेतल्या शिक्षकांच्या हाती आपली मुले देण्यापेक्षा ती मुले घरी शिकवलेली बरी असा आजचा काळ आहे.
त्यामुळे भारतीय पालकांनी आधी पुस्तके सोडून tv बघणारी पिढी पटकन तयार केली. ती त्यांना सोयीची होती. त्यानंतर इंटरनेट वापरणारी पिढी तयार केली . जी फारच सोयीची होती . जे सोपे आणि चारचौघांसारखे असते ते आपल्याला करता येते. आपली कुवत तेव्हढीच असते. सोयीपुरती. आपण मुले सुद्धा म्हातारपणाची सोय म्हणून जन्माला नाही का घालत ? शिवाय लोक काय म्हणतील ह्याची सर्वसामान्य भारतीय माणसाला खूप भीती असते . आपण शेजारयासारखे वागणारा भित्रा समाज आहोत. चांगली बेफिकिरी आणि आवश्यक उद्धटपणा आपल्याला घरांमध्ये शिकवला जात नाही. ह्या सगळ्याचा परिणाम पुस्तके , साहित्य , वाचनसंस्कृती , लेखकांना त्या समाजात मिळणारे स्थान , त्या समाजत असणारी किंवा नसणारी पुस्तकांची दुकाने ह्यावर पडत असतो. आपणच आपला देश आणि आयुष्य आपल्या प्रत्येक निर्णयामधून घडवत असतो.
मला वाचनाची गोडी घरातून प्रोत्साहन मिळून लागली त्याचप्रमाणे अतिशय उत्तम शालेय शिक्षकांनी ती अतिशय तळमळीने लावली.
असे म्हणतात कि ‘ये रे घना ये रे घना’ हि कविता आरती प्रभूंनी आपल्या कविता आता प्रकाशित होणार , लोक त्या वाचणार , त्या आपल्या उरणार नाहीत ह्या संकोचाने केली. “फुले माझी अळुमाळू वारा बघे चुरुगळू . नको नको म्हणताना गंध गेला रानावना”
मी लहान असताना मराठी भाषेत प्रकाशन संस्था आणि त्यांचे स्वतःचे हुशार आणि तीक्ष्ण जाणिवेचे संपादक ह्यांच्या दुपेडी जाणीवेतून साहित्य आकार घेत होते. स्वतःचे लिहिलेले इतक्या चटकन प्रकाशित करणे सोपे नव्हते. लेखक आमच्यासाठी महत्वाचा होता. मी मोठा होताना मराठीतील जे महत्वाचे लेखक समजले जातात ते मरून गेले होते किंवा वृद्ध झाले होते. महाराष्ट्र तेव्हाच जुना होवू लागला होता . तरीही महाराष्ट्र नावाची एक जाणीव साहित्यात आणि रंगभूमीवर जिवंत होती. आज ती प्रादेशिक जाणीवच संपली आहे.
सत्तर ते नौव्वाद्च्या दशकामध्ये साहित्याचा दबदबा होता. मराठी पुस्तकांची दुकाने ताजीतवानी असत. आज जे स्मशानात थडगी पाहायला गेल्यासारखे मराठी पुस्तकांच्या द्कानात वाटते तसे तेव्हा वाटत नसे. लिहिते लेखक होते आणि मुख्य म्हणजे वाचता तरुण समाज होता. पुढच्या काळात श्री पु भागवत ह्यांच्या नंतर हळूहळू संपादक हि व्यक्ती नगण्य पगारी आणि कमकुवत होत गेली . नुसतेच खंडीभर प्रकाशक आणि मोठमोठी पुस्तक प्रदर्शने एव्हडेच आपल्या भाषेत साहित्याचे स्वरूप उरले.
आता गेल्या तीन चार वर्षात मग नव्या कवींच्या पिढीने प्रकाशन आणि संपादक ह्या दोन्ही संस्था झुगारून लावल्या आणि आक्रमक होवून इंटरनेट वर कविता जन्माला घालून पसरवली. कुणीही आपल्याला समजून घेण्याची वाट पाहत ते लोक बसले नाहीत. कारण जळमटे लागलेल्या जुन्या प्रकाशन संस्थांना आपली जाणीव कळणार नाही हे त्यांना माहित होते. छापलेल्या शब्दाचा दरारा संपुष्टात येऊ लागला आणि मराठी वृत्तपत्रांच्या संपादकाला दबकून असण्याचे दिवस संपले. शेजारचा किंवा वरच्या मजल्यावरचा माणूसही मराठी वृत्तपत्राचा संपादक बनू लागला.

सचिन कुंडलकर

अपेयपान २९
आपल्या आईवडिलांना असलेले अनेक भयगंड, त्यांच्या लहानपणीच्या अनेक न्यूनतेच्या भावना आणि त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने आपण खूप लहानपणीपासूनच पूर्ण करत असतो. आपण आपल्या आईवडिलांची एका प्रकारे वेबसाईट असतो. जगाला दाखवून देण्यासाठी त्यांना जे जे करायचे असते ते सगळे करण्यासाठी ते आपल्याला घडवत असतात. आपल्या आईवडिलांनी विशिष्ट निर्णय घेऊन आपल्याला त्याप्रमाणे मोठे केलेले असते. आपल्याला हे करता आले नाही किंवा आपल्याला हे मिळाले नाही ते माझा मुलगा किंवा मुलगी करेल . त्यामुळे लहानपणी आपण काय करणार असतो ह्यामध्ये फारसे सरप्राईज उरलेले नसते. आपल्या आई वडिलांनी त्यांच्या समजुतीनुसार आपल्या जगण्याचा मार्ग आणि आपल्या आवडी निवडी फार लहानपणी घडवायला घेतलेल्या असतात. कुटुंबामध्ये प्रत्येक लहान मूल हे आधीच्या पिढीने सोसलेल्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी तयार केलं जात असतं. अगदी पांढरपेशा शहरी सुशिक्षित घरातही हे नेहमी घडते , टाळता येत नाही. ज्या अन्यायाचा बदला घ्यायचा ते अन्याय बदलतात. पण हे चक्र न थांबता चालूच असते. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला लहानपणी नीट इंग्रजी बोलता येत नसेल , त्याची लाज वाटत असेल तर तो हमखास हा न्यूनगंड भरून काढण्यासाठी आपल्या मुलांना ती जन्मण्याआधीच convent मध्ये घालतो तसे आहे हे.
माझ्या आजोबांनी माझ्या आईने लिहिलेले लिखाणाचे कागद विहिरीत फाडून फेकून दिले , पुन्हा लिहिलेस तर याद राख असे तिला बजावले आणि असले काही करून वेळ वाया घालवण्यापेक्षा पोटापाण्याची नोकरी करायला फार लहान वयात घराबाहेर ढकलले म्हणून मी आज लिहितो. माझ्या वडिलांना संगीताची अतिशय आवड असूनही गरीब परिस्थितीमुळे आणि घरी झालेल्या दुर्लक्षामुळे स्वत चे शिक्षण आवडी निवडी मनासारख्या जोपासता आल्या नाहीत म्हणून माझा भाऊ आज शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात इतकी मोठी कामगिरी करतो आहे. उत्तम नाव कमावतो आहे. हे सगळे आमच्या आईवडिलांच्या जगविरुद्ध तयार झालेल्या त्वेषामुळे घडले. त्या त्वेषाला त्यांनी चांगले स्वरूप दिले. एक प्रकारे अनुरागच्या वासेपूर चित्रपटात घेतला जातो तसा मुलांच्याकरवी घेतलेला जगाचा बदलाच आहे हा. पण त्याचे स्वरूप उपयुक्त आणि आनंदी ठरले.
मी भरपूर लिहावाचायला लागलो ते घरातील वातावरणामुळे नाही . आमच्या घरात व पु काळे आणि पु लं देशपांडे सोडून काहीही वाचले जात नसे. पुलं आमच्या घरी आले असते तर रागावून गेले असते. फक्त माझी पुस्तके काय वाचता रे ठोम्ब्यानो ? जरा इतर काही वाचन करा , असे म्हणाले असते. तसे ते सतत आमच्या घरात असल्यासारखेच होते कारण लहानपणी त्यांच्या कथाकथनाच्या कॅसेट घरात सतत लागलेल्या असत. त्यांचा आवाज घरात येतच राहायचा . घरात पुस्तकसंग्रह मर्यादित असला तरी हवी ती पुस्तके हवी तेव्हा आणि हवी तेव्हडी विकत आणायला आईवडिलांची ना नसायची. पुस्तके आणायची आहेत हे म्हटल्यावर ते महिनाअखेर असला तरी पैसे कसेबसे जमवून द्यायचे .पण काय आणायचे आणि काय वाचायचे ह्याचे निर्णय आम्हाला करायला लागत. त्यामुळे बरेवाईट पुष्कळच वाचून वाचनाची स्वतः ची निवड करता आली आणि ती काळ आणि वयाप्रमाणे फार वेगाने बदलत गेली. मी मोठा होताना काळ माझ्यापेक्षा वेगाने बदलत होता. हि ऐंशी आणि नौवदच्या दशकाची कहाणी आहे.
पुण्यात तेव्हा नुसते ‘असून’ पुरायचे नाही. दाखवायला लागायचे. अनिल अवचट हे प्रसिद्ध लेखक हि आमची नव्याने आयुष्याकडे बघायची खिडकी होती . कारण ते सतत सर्व कार्यक्रमाना दिसत. चांगले आणि सोप्या भाषेत थेट लिहित. आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाशी गप्पापण मारत. तेव्हा ते लाकूड कोरण्याचा छंद जोपासत होते. ते जिथे तिथे हातात एक छोटे लाकूड घेऊन कोरत उभे असलेले दिसायचे. नाटकाला आले तरी पहिल्या रांगेत बसून लाकूड कोरत बसायचे. पुण्यात सगळे दाखवावे लागे. आपण जी पुस्तके वाचतो आहोत ती नावे दिसतील अशी हातात घेऊन फिरायची फार आवड पुणेकरांना होती. कुठेही जाताना हातात अशी दोन पुस्तके बाळगली कि मग काय विचारायचं नाही. अश्या गावात राहून वाचायची आवड कुणाला नाही लागणार ? गौरी देशपांडे किंवा तत्सम परपुरुषी धाडशी पुस्तके हातात घेऊन फिरले कि लोक आपल्याला गांभीर्याने घेत. मी ब्रिटीश लायब्ररीची मेंबरशीप घेतली तेव्हा मी लायब्ररीतून डेक्कन वरून चार पाच महत्वाची पुस्तके अशी दाखवत चालत चालत फर्ग्युसन रस्त्यावरून घरी येत असे. आणि वाचत त्यातले एखादेच असे. आमच्या गावात अनेक महिलांना गौरी देशपांडे व्हायचे होते आणि ज्यांची वये वाढूनही लग्न झाली नसत त्यांना पु शी रेग्यांची सावित्री व्हायचे असे. मोर मिळाला नाही तर आपणच मोर व्हायचे . असे कसे होणार ? एक मोर मिळाला नाही तर दुसरा मोर शोधायला नको का ? सगळं आपणच कसे होणार ? पण स्रीवादाची लाट शहरात वेगात पसरत असल्याने असले भयंकर प्रश्न विचारून बायकांचा रोष ओढवून घायची टाप पुण्यात कुणाच्यातही नव्हती. ‘बॉयकटाचे कट’ अशी एखादी मजेशीर कादंबरी माझे लाडके भा. रा. भागवत लिहितील अशी मला अपेक्षा होती . पण त्यांनी ती लिहिली नाही. मलाच ती कधीतरी पुढे लिहावी लागणार हे मला लहानपणीच लक्षात आले.
मी तर बरीच वर्षे चांदोबा , चंपक , फास्टर फेणे आणि इंद्रजाल कॉमिक्स सोडून काही वाचतच नव्हतो. फास्टर फेणे तर मला अचानक लकडी पुलावर भेटेल कि काय असे वाटायचे इतका मी त्याच्या जगात गुंगून जायचो . पाचवी सहावीत गेल्यापासून मला गौतम राजाध्यक्ष ह्यांनी संपादित केलेले ‘चंदेरी’ हे सिनेमाचे मासिक वाचायची सवय लागली. माझ्या बहिणींमुळे मला लागलेले हे व्यसन फार काळ टिकले. मला ते मासिक सोडून दुसरे काही वाचायलाच नको असे. मी आणि माझ्या बहिणी त्यातले मोठे मोठे नटांचे फोटो कापून भिंती भरून चिकटवत असू. डिम्पल कपाडिया तेव्हा कपडे कसे घालावेत? परफ्युम कसे वापरावेत ? ह्या विषयावर एक सदर लिहित असे ते सगळे मी नीट वहीत नोद्वून ठेवत असे. मला मुंजीत ‘श्यामची आई’ हे पुस्तक मिळाले होते. त्यातली लोचट आई मलाच काय पण माझ्या आईलासुद्धा आवडली नाही. सनी देओलचा ‘बेताब’ आला तेव्हा माझी एक बहिण ताबडतोब त्याच्या प्रेमात पडली आणि तीने सनीला पत्र लिहीले. सनीने तिला thank you असे उत्तर पाठवले. त्याचे फोटो उशाखाली घेऊन ती झोपायची. हा माझ्या आयुष्यात घडलेला पहिला ताकदवान पत्र व्यवहार. मराठी साहित्यातील मोठ्या आणि महत्वाच्या गोष्टींची ओळख होण्याआधी माझे आयुष्य असे चालले होते. छचोर आणि सुंदर.
शाळेत मराठीच्या तासाला एकदा आमच्या श्रीवा कुलकर्णी सरांनी सुनीता देशपांडे आणि g a कुलकर्णी ह्यांच्यातील पत्रव्यवहाराचा उल्लेख केला आणि g a कुलकर्णी ह्यांचे काही लिखाण वाचून दाखवले. त्या दिवशी कोणत्यातरी अनामिक आकर्षणाने मी शाळेच्या ग्रंथालयातून जीएंची दोन पुस्तके घेऊन गेलो. माझे वाचन आणि पुस्तक ह्या गोष्टीशी असणारा माझा romance त्या दिवशी सुरु झाला असे मी समजतो. कारण मी घरी येऊन tv न पाहता गुपुचूप ‘कैरी’ हि कथा वाचली आणि खूप अस्वस्थ होवून रडलो. मला आई वडील आहेत आणि मी अनाथ नाही ह्याचे मला त्या दिवशी खूप बरे वाटले. मी ते पुस्तक परत करायला गेलो आणि शाळेत ग्रंथपालांना विचारले आपल्याकडे अजून कोणती चांगली मराठी पुस्तके आहेत ? ते मोकळे हसले आणि म्हणाले हे सगळं तुमच्यासाठीच उभं केलं आहे बाळांनो. आत जा आणि हवी ती दोन पुस्तके निवडून आण. वि दा सावकर , ग दि माडगुळकर , शांता शेळके , आचार्य अत्रे , बालकवी , भा रा तांबे , लक्ष्मीबाई टिळक , दुर्गा भागवत , इंदिरा संत . काळाचा उभा आडवा सुरेख पसारा होता तिथे . माझी वाट पाहत होता. माझ्या बैठ्या आयुष्याची निवांत लोळत सुट्टी घालवण्याची आखणी करत होता. मी काय निवडू आणि कसे निवडू हेच मला कळेना.
खूप जास्त आणि कळले नाही तरी वाचयची सवय मला शाळेमुळे आणि शाळेतल्या शिक्षकांमुळे लागली. आणि सुनिता देशपांडे ह्यांच्या लिखाणामुळे माझ्या वाचनाला आणि लिखाणाला दिशा मिळाली. त्यामुळे इतर कुणाहीपेक्षा सुनिता देशपांडे ह्यांचे माझ्यावर खूप जास्त अप्रत्यक्ष संस्कार आहेत.
सचिन कुंडलकर

अपेयपान ३०
सुनीता देशपांडे आणि G A कुलकर्णी ह्यांच्यातील पत्रव्यवहार माझ्यासाठी मराठी आणि इंग्रजी साहित्याकडे आकर्षित होण्यासाठी पुरेसे प्रबळ असे कारण ठरला. मला सुनीता देशपांडे ह्यांच्याविषयी अतीव आदर आणि त्यांच्या बुद्धीचे आकर्षण निर्माण झाले. त्या दोघांनी एकेमकांना लिहिलेल्या पत्रांमध्ये इतक्या विविध प्रकारच्या लेखकांचा आणि पुस्तकांचा उल्लेख आहे आणि तो इतक्या सहज पणे आनंदात केला आहे कि वाचताना आपल्याला दडपण न येता पुस्तके वाचण्याच्या सवयीविषयी खूप लोभस आकर्षण तयार होते
एकदा वाचायची सवय लागली तेव्हापासून अंतरीच्या एकटेपणावर फुंकर घालण्याचे माध्यम गवसले. कारण मोठा होत होतो तसा जगापासून तुटल्यासारखा होत होतो . आत मनात शरीरात काय चालू आहे हे सांगण्यासारखे , समजून घेणारे कोणी आजूबाजूला नव्हते. खूप काही आतल्याआत घडत होते पण ते मूकपणाने सोसावे किंवा चाखावे लागत होते. आपल्या सुखात आणि दुखात आपल्या सभोवतालीचे कुणीही आता ह्यापुढे कधीच सहभागी होवू शकणार नाही हि जाणीव शारीरिक पौगंडावस्थेत वाढत होती . त्या काळात मला पुस्तकांनी आणि वाचनाच्या सवयीने खूप मोठी सोबत केली. माझे मराठी वाचन वाढू लागले.
मी अश्या सांस्कृतिक वातावरणात होतो जिथे तुम्ही काहीही केलेत तरी तुमच्यापेक्षा खूप जास्त केलेली माणसे सभोवताली असतात आणि ती तुम्हाला सारख्या सूचना देत बसतात किंवा तुच्छ लेखत बसतात. अशी माणसे पुण्याच्या पाण्यात मोप पिकत. त्यामुळे आपण पु शी रेगे वाचून काढले कि ते म्हणत अरे तू अजून दुर्गा भागवतांचे लिखाण वाचत नाहीस ? कि आपण ते वाचायचे. ते वाचून झाले कि ते म्हणत काय हे ? इरावती कर्वे तुला माहित नाहीत ? अरेरे . कि आपण लगेच धावत जाऊन इरावती बाईंची पुस्तके आणायची . सतत तुलनेचे आणि प्रदर्शनाचे वातावरण सभोवताली असल्याने काय मजा विचारता ? आमच्या गावात तुमची सोडमुंज होवूनच तुम्हाला बाहेर काढतात. मराठी साहित्याचा जो आखीव आणि ठराविक परीघ आहे , म्हणजे ज्या लेखकांच्या लिखाणाने मौजेचे राजहंस चे , पोप्युलरचे , majestic चे stall भरलेले असतात ते लेखक वाचण्यातच माझी अक्खी विशी गेली. कारण श्री पुं नी , मोठ्या आणि धाकट्या माजगावकरांनी , मोठे भटकळ ह्यांनी , कोठावळे बंधूंनी कामच इतके मोठे आणि चांगले करून ठेवलेले होते कि सुबक सकस आणि उत्तम साहित्यावर माझे पोषण होतच राहिले. दिवाळी अंकांचे अजब आणि प्रचंड विश्व गवसले. त्यात सापडणारे वेगळे नवे ताजे प्रवाह आकर्षित करू लागले. अरुण जाखडे ह्यांच्यासारखे अनेक नवे संपादक सातत्याने काहीतरी नवीन शोधात असतात ते समजून घेण्याची इच्छा तयार झाली . त्याकाळात मी नुसता वाचत बसलेला होतो. पुण्यात वाचनाची जणू स्पर्धा चालू असल्यासारखा. कधी काही खेळलो नाही , कुठे मारामाऱ्या केल्या नाहीत. काही फार नव्याने शिकलो नाही.
त्या काळात मला जे आवडत नाही ते मोकळेपणाने सांगायचे धाडस माझ्यात नव्हते. मला इतिहासाची आणि महापुरुषांची अजिबात आवड नाही. मला चळवळी करणाऱ्या लोकांचे अनुभव वाचण्यात काडीचाही रस नाही , मला कुसुमाग्रज ह्यांचे लिखाण कधीच आवडले नाही ते माझ्याशी बोलत नाहीत, मला भावगीते ऐकली कि अंगावर शिसारी येते असे काही मी तेव्हा बोलत नसे. कारण मराठी साहित्य हि फार गांभीर्याने आणि सोवळेपणाने घ्यायची गोष्ट आहे असे मला वाटायचे. आणि आपण ह्या सगळ्यांपुढे फक्त एक सामान्य वाचक आहोत. आपली मते चुकीचीच असणार असेही मला वाटायचे. त्या वेळचा नम्रपणा आणि जिभेचा संयम आठवून मला तर हल्ली हसूच येते.
प्रवास करायला लागलो तेव्हा लक्षात आले कि आपल्या भाषेतील साहित्य आता आपली भूक भागवू शकत नाही . कारण आपली भाषा ज्ञानभाषा नाही. आपली भाषा आठवणीप्रधान , सामाजिक किंवा भावनिक साहित्य लिहिण्याची भाषा उरली आहे. आपल्या भाषेला फक्त अभिमान आणि आठवण उरली आहे . इतर भारतीय भाषांमधील इंग्रजीमध्ये आलेले साहित्य आपण वाचायला हवे. नाहीतर आपणही मराठीतील वयोवृद्ध माणसांप्रमाणे साठी सत्तरीचे साहित्य घोळवत बसू.
त्यावेळी सातत्याने लिहिती माणसे मरून गेल्याने आणि जुन्या लेखकांचा धाक संपल्याने साहित्य संमेलने राजकारणी माणसांनी काबीज केली. आणि जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व साक्षर माणसे स्वतःला लेखक म्हणवून घेतील अशी परिस्थिती येऊ लागली आणि मराठी साहित्य हि THE LAND OF EXCESS PRODUCTION बनली. सगळे सोमेगोमे , सगळ्या साळकाया माळकाया उठून लिहू लागल्या आणि कुत्र्याच्या छत्रीसारखी रानावनात प्रकाशन करणारी माणसे उगवली. सामाजिकतेचा गोंगाट खूप वाढला आणि खोटी दिखावू समानता बोकाळली. त्या नव्या लोकांनी दुसरी बायको आली कि जशी पहिली जे करायची ते करते त्या रिवाजाप्रमाणे पुस्तक प्रकाशने , लेखकांच्या मुलाखती , सत्कार , गल्ली बोळातली साहित्य संमेलने ह्यांचा धडाका लावला. त्या सुमारास मी मराठी वाचनाची आवड आटोपती घेतली.
मी जे आजचे शहरी आयुष्य जगतो , माझे म्हणणे , माझी सुक्दुक्खे आता मला मराठी सिनेमात , मराठी नाटकात, मराठी पुस्तकात जाणवणार नाहीत हे माझ्या लक्षात आले. मी शेतकरी नाही, मी दलित नाही , मी बाजीप्रभू किंवा बाजीराव नाही त्यामुळे मराठी पुस्तके किंवा सिनेमे माझे उरलेले नाहीत. मी साधा पांढरपेशा घरातून आलेला , बुद्धिमान आणि संवेदनशील शहरी माणूस आहे. मला ह्या सगळ्या वातावरणाचा कंटाळा येऊ लागला कारण वाचा वाचा असे जे ओरडतात ते सगळे चांगले माझे वाचून झाले होते . लक्ष्या आणि अशोक सराफ ह्यांच्या सिनेमाने मला ओकारी येयील इतके त्या काळात घाण वाटत असे. मला बाबासाहेब पुरंदरे वगैरे माणसांचे कधीच आकर्षण वाटले नाही. मग आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत ? आपल्या पिढीतल्या महाराष्ट्रातील शहरात जन्मलेल्या माणसांना अमेरिकेत जायचे नसेल आणि इथे राहायचे असेल तर आपण काय वाचूया ? काय पाहूया ? जे आपल्याशी बोलेल . आपल्याला जवळचे वाटेल ? कारण आयुष्याप्रमाणे साहित्य सुद्धा प्रवाही हवे. लहानपणी जे महत्वाचे वाटते त्याचा मोठेपणी कंटाळा किंवा राग आला नाही तर आपण मोठे झालोच नाही.
आपण असे सहजपणे जरी बोललो घरीदारी तरी लोक आपल्याला वेड्यात काढतील असे मला वाटायचे.
विजय तेंडुलकरांनी माझी ह्याविषयीची अपराधीपणाची भावना घालवली. आमची ओळख झाली आणि स्नेह तयार झाला तेव्हा कधीतरी एकदा बोलताना त्यांना मी हे म्हणालो कि मला आता तेच ते मराठी लेखक वाचण्याचा कंटाळा येतो. मिलिंद बोकील सोडून इतर कोणाचेही नवीन लिखाण ताजे आणि आकर्षक वाटत नाही . पुस्तकांच्या दुकानात जावेसे वाटत नाही. जुन्या बाजाराच्या बजबजपुरीत गेल्यासारखे मराठी पुस्तकांचे झाले आहे. मला हे वातावरण समजून घेवू शकत नाही. मी जसा आहे तसे काहीही ह्या मराठी साहित्यात आता मला सापडत नाही . तेव्हा ते  हसले आणि म्हणाले कि उत्तमच वाटते आहे कि मग ! वाचन आणि लिखाण महत्वाचे. भाषा सर्वात कमी महत्वाची. भाषा हे माध्यम आहे . साध्य नाही . मराठी भाषा अजिबातच महत्वाची नाही. आपल्या आयुष्याचा परीघ उमटवणारे, आपल्याला आतून ओले करणारे साहित्य ज्या ठिकाणी असेल तिथे ते जाऊन वाच. सोपे आहे.
सचिन कुंडलकर

image

 

One thought on “अपेयपान .लोकमत मधील लेखमाला . भाग २७ ते ३०”

  1. i agree . i went through the same feeling. वाढत्या वयात पुष्कळ मराठी वाचल्यानंतर अचानक कधीतरी त्यात काहीतरी कमतरता जाणवायला लागली. आपल्या अनुभवाशी नातं सांगणारं ह्याच्यात काही नाही असं वाटायला लागलं. अति भावनाप्रधान, गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा नाहीत,सरधोपट प्रश्न आणि सरधोपट उत्तरं. बराच काळ मग काहीच वाचलं नाही आणि मग कधीतरी इंग्लिश वाचनाकडे वळले.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s