‘अपेयपान’ लोकमत मधील लेखमाला भाग ३४ ते ३६ .

 

अपेयपान  ३४

 

मोठा होत असताना मला माणसे सोडून गेली , माझ्या आजूबाजूच्या जागा अनोळखी होत गेल्या , मी लोकांना त्रास दिले आणि लोकांनी मला. ह्या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट माझ्यासोबत सतत शांतपणे चालत राहिली ती म्हणजे माझ्या आजूबाजूला असणारे ,वाजणारे , ऐकू येणारे ,गायले आणि वाजवले जाणारे संगीत. विविध प्रकारचे संगीत कानी पडत गेल्याने आणि संगीताचा संग्रह करण्याची आवड आणि वातावरण आमच्या घरामध्ये असल्यामुळे शब्द आणि रंग ह्याच्या पलीकडील फार मोठे संस्कार माझ्या कानावर होत राहिले.

मी आज जिथे जन्माला आलो आणि वाढलो त्या वातावरणापेक्षा अतिशय वेगळ्या वातावरणात राहतो आणि वावरततो . अश्या परिस्थितीत मला तरंगत पण संतुलित ठेवते ते म्हणजे मी सतत ऐकत असेलेल संगीत.

आमच्या घरी रेडीओ लावून ठेवायची सवय कुणाला नव्हती त्यामुळे मराठी नाट्यगीते , भावगीते गीत रामायण अश्या गोष्टींची जी आपसूक ओळख लहानपणी आकाशवाणीमार्फत सर्व मुलांना नकळत होत असते ती मला झाली नाही . माझ्या लहानपणीच्या स्मृतीमधील सगळ्यात जुना आणि एखाद्या दाट महागड्या अत्तरासारखा आवाज जर कुणाचा असेल तर तो आहे भीमसेन जोशींचा. तो भाषेच्या आणि कवितेच्या पलीकडे असलेला आत्म्याचा हुंकार असावा तसं आवाज आहे. आमच्या घराच्या भिंतींवरून वाहत असलेला. अतिशय चांगले शास्त्रीय संगीत लहानपणीपासून माझ्या कानावर सातत्यान पडत राहिले कारण माझे वडील आणि माझा धाकटा भाऊ . मला आठवत आहे तेव्हापासून घरामध्ये सुयोगचा हार्मोनियमचा रियाझ चालू असे आणि रियाझ संपल्यावर आमच्याकडे असलेल्या एका टेप रेकॉर्डर वर भीमसेन जोशींचा आवाज उमटून घरभर प्रसृत होत राही. पावसाळ्यात अंधारात बुडालेल्या घरात , दिवाळीच्या दिवशी उत्साहाने उजळून गेलेल्या घरात तो आवाज सतत सोबत करीत असे. हार्मोनियम च्या रीयाझाचा आवाज आणि भीमसेन जोशींचा आवाज जगात कुठेही आला तरी मला अचानक घरी आल्यासारखे वाटते ह्याचे ते कारण आहे.

मी जे संगीत जाणीवपूर्वक मनामध्ये रुजवले आणि  माझ्या आवडीने लहानपणीपासून सोबत बाळगले ते  म्हणजे R D Burman  ह्यांचे संगीत. माझ्या संपूर्ण लहानपणावर RD ची फार मोठी प्रेमळ सावली आहे. माझ्यात जे लिंबू आणि मीठ आहे ते माझ्या शिक्षणाचे नाही किंवा मी वाचलेल्या पुस्तकांचे नाही. ते RD ने माझ्यात पिळलेले आहे. माझ्या चांगल्या वाईट सवयी , माझी स्वप्न बघायची पद्धत , माझे रागलोभ ह्या सगळ्या रसायनांची सिद्धता माझ्या लहानपणी RD ने केली . मी सिनेमा बनवायचा निर्णय घेतला त्याला अप्रत्यक्षपणे RD कारणीभूत असणार ह्याविषयी मला शंका नाही.

संगीत घरामध्ये साठवून ठेवून आपल्याला हवे तेव्हा ऐकण्याचा काळ आता सोपा वाटत असला तरी अनेक वर्षे कानावर चांगले गाणे पडायला TV  किंवा रेडीओवर अवलंबून राहावे लागत असे. घरात टेपरेकॉर्डर यायचा आधीचा काळ मी अनुभवला आहे. कुठे रस्त्याने जाताना आपले आवडते गाणे कुठल्या दुकानाच्या किंवा घराच्या रेडियोवर लागले असेल तर तिथेच रस्त्यात थांबून ऐकून मी पुढे जात असे.

मग यथावकाश टेप रेकॉर्डर आणि माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा असा माझा Walkman माझ्या सोबतीला आले. Walkman ने माझ्या आयुष्याला आणि भावनांना खाजगीपणा मिळवून दिला. खाजगी जगामध्ये मोठी रंगीत स्वप्ने रंगवता येतात. माझे घरापासून डेक्कन वर चालत राहणे आणि कानात हेडफोन्स वर आवडते संगीत ऐकत राहणे माझ्यासाठी बहुमोल असे कारण मी ते ऐकत चालताना अनेक निर्णय घेत असे. तरुण माणसाचे साधेसोपे निर्णय असतात. त्यात एक खुळेपणा असतो. स्वप्नरंजकता असते . पण ती किती आवश्यक असते. गुलजारांनी मला ती शिकवली.त्यांच्या सिनेमाच्या गाण्यामधून. माझी भावनिक वाढ करून माझ्या सध्या स्वप्नांना गुलजारांनी मोकळ्या खिडक्या दिल्या. मला लिखित शब्दाचे महत्व सगळ्यात आधी गाण्यांमधून गुलजारांनी शिकवले. माझ्या हेडफोनला लागलेल्या माझ्या घामात त्यांचे शब्द  उतरत असत. माझा खोल खोल अंधारा खाजगीपणा मी सजवायला शिकलो . तिथे झुंबरे पेटवून आयुष्य सोपे करायला शिकलो , ह्या सगळ्याला गुलजार कारणीभूत ठरले आणि त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेली सुंदर गाणी आणि कविता.

RD  गाण्याच्यामध्ये जो अंतराळ असतो , ज्याला संगीताच्या  रचनेमध्ये इंटरल्यूड असे म्हणतात तो अंतराळ जादूने भरून टाकायचा. इजाजत मधील ‘कतरा कतरा मिलती है’ ह्या गाण्यातले अंतराळ असे विस्मयकारक जादुई रंगांनी भरलेले आहेत. आपल्या मनात संगीताच्या उत्कट अनुभवामुळे अनेकविध दृश्ये आठवणी आणि जुन्या जखमा जाग्या होतात. संगीत आपल्या मनाची स्वच्छता राखते. नको त्या गोष्टी बाहेर फेकून देते आपल्याला खूप ठोसपणे हि जाणीव करून देत राहते कि कितीही गर्दीमध्ये राहिले  एकटेपणाला  आणि त्यामुळे येणाऱ्या हतबलतेला आयुष्यात पर्याय नसतो.

मी आवडत्या संगीतकारांचा लेखकांचा आणि गायकांचा उल्लेख एकेरीमध्ये करतो ह्याचे कारण माझ्या मनातील उद्धटपणा नाही. मी उद्धट आहे पण तो ह्या बाबतीत अजिबात नाही . माझे ज्या कलाकारांशी वर्षानुवर्षांचे जवळचे नाते तयार झाले आहे , ते नाते असे करवून घेते. मी कुणालाही व्यक्ती म्हणून ओळखत नव्हतो आणि नाही पण संगीताने तुमचे कर्त्यासोबत एक फार घट्ट नाते तयार होते. त्यातून हे तो आणि ती असे शब्द येतात.

AR  रेहमान आयुष्यात येऊन वादळ तयार करण्याआधी काही छोट्या पण फार महत्वाच्या गोष्टी  गोष्टी घडल्या.  १९८४ , १९८५ च्या आसपास मी दहा एक वर्षांचा असताना मी मायकल जॅक्सन  चे Thriller . माझ्या मुंबईत राहणाऱ्या चुलत बहिणीच्या खोलीत ते लागले होते.

शाळेत असण्याचा काळात भारतात MTV आणि Channel V आले आणि त्यामुळे  तोपर्यंत आम्ही ज्या पद्धतीने संगीताकडे पाहत होतो ती दृष्टी आणि परिणाम बदलले ( शारदा देवी नावाची एक देवी आहे.  ती सकाळी उठून आवरून वीणा बिणा घेऊन आपण काय काय गाणी गातोय, ऐकतोय , काय काय अभ्यास करतोय, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा आदर करतोय कि नाही. संगीतामधून आपण परस्त्रीकडे तसल्या वाकड्या नजरेने तर पाहत नाही न ? ह्यावर लक्ष्य ठेवायला देवांच्या तर्फे बसून असते . संगीत हा देवाचा प्रसाद आहे , भारतीय संस्कृतीच्या गळ्यातील पदक हे भारतीय संगीत आहे , संगीतकार देव आहे. लेखक आणि कवी हे देवांचे पणजोबा आहेत. वादक देवांचा मामे आजोबा आहे .गायक अजूनच  काहीतरी म्हणजे देवांच्या देवाचा देव आहे ) अश्या सगळ्या उदबत्तीच्या धुराने गुदमरलेल्या सांगीतिक वातावरणात अचानक  मडोना आणि मायकल जॅक्सन माझ्या आयुष्यात आले आणि माझी मुंज झाली. मी अचानक गुरूगृही जाऊन पडलो आहे असे मला वाटले.

आपल्या मनात प्रेम आदर आणि आदर आणि प्रेम ह्याच्या पलीकडे खूप भावनानांचे जंजाळ असते. लहान वयात ते जंजाळ अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघड असते. राग असतो , नव्याने तयार झालेल्या आणि सतत उफाळणाऱ्या शारीरिक वासना असतात. त्यातून तयार होणारे गडद एकटेपण आणि रंगीत रोमान्स असतो. स्पर्धा असते, ईर्ष्या असते,तुच्छता असते. ह्या सगळ्या भावनांकडे भारतीय शिक्षणात ,भारतीय कुटुंब पद्धतीत बघायला किंवा त्या भावनांना हाताळायला शिकवत नाहीत. पाश्चिमात्य संगीताने माझ्या धरणाचे दरवाजे पटापट उघडले आणि मला मोकळे मोकळे वाटू लागले. आपल्याला समजून घेणारे आणि आपल्या मनातील रागाला वाईट न म्हणणारे कुणीतरी ह्या जगात आहे ह्या भावनेने मी मायकल जॅक्सनच्या संगीताशी जोडला गेलो. मला आज हे लक्षात आले तरी आश्चर्य वाटते कि मला इंग्रजी भाषेचा एकही शब्द त्या काळात कळत नसे. मी सोळा सतरा वर्षाचा होयीपर्यंत सलग एक वाक्य इंग्रजीत बोलू शकत  नव्हतो आणि तरीही दहा अकरा वर्षाचा असल्यापासून मी मडोना  आणि मायकल जॅक्सन  ह्यांच्या संगीताकडे कसा काय ओढला गेलो असेन? मीच नाही तर त्या काळात सगळे जग त्या दोघांनी काबीज केले होते. ह्याचे कारण त्यांचे उर्जा देणारे सळसळते संगीत होते. गरिबांना , कुरूप माणसांना , एकट्या जीवांना , हतबल अपयशी माणसांना ते संगीत जागे करून आत्मविश्वास देत होते. संगीताला एक दृश्यात्मकता आली होती. MTV वर गाण्यांचे म्युझिक व्हिडिओ  दिसायला सुरुवात झाली होती. अमेरिकेने जगाला दिलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे अमेरिकेने निर्माण केलेले संगीत . मला ते आयुष्यात फार योग्य वेळी मिळाले. मला नाही तर संपूर्ण भारतातील तरुण मुलांना .

क्रमशः

 

अपेयपान ३५

भारतामधील  सामान्य नागरिकांच्यातील भावनिक समृद्धी जिवंत ठेवण्याचे काम आपल्या सिनेमातील गाणी करतात. कारण घरात आणि समाजात परंपरा पाळत कुटुंबातील सर्वांचे पोट भरण्याचे आणि वंश चालवण्याचे काम करत भारतीय माणूस इतका मेटाकुटीला आलेला असतो कि त्याला कोणतीही सोपी संवेदना उरेल अशी शक्यता नसते. ह्या सगळ्यामुळे सामान्य माणसाच्या आतील स्वप्ने , त्याच्या कुंपणापलीकडील आकांक्षा , त्याचे राग, द्वेष , उन्माद , वासना ह्या व्यक्त करायला तो क्रिकेटपटू आणि सिनेमाच्या हीरोवर आयुष्यभर अवलंबून राहतो. क्रिकेट आणि सिनेमातली गाणी ह्यांनी भारतीय माणसाचे डोके ताळ्यावर ठेवले आहे . धार्मिक आणि कौटुंबिक परंपरा आणि आचारविचार ह्यांनी त्या माणसाचे हातपाय इतके करकचून बांधलेले असतात कि स्वतःतर्फे विजयी व्हायला , नाचायला , सेक्स आणि प्रेम करायला त्याला सचिन तेंडूलकर किंवा रणबीर कपूर लागतो. बाहेर जाऊन मोकळेपणाने स्वतः काही करायची धमक त्याच्यात उरलेली नसते. दुसर्याचे यश पाहून आपल्याला ते मिळाले आहे असे तो मानून घेतो . त्यामुळे  भारतात अनेक नोकऱ्या करणारी माणसे वर्षानुवर्षे सुट्ट्या टाकून क्रिकेट पाहतात किंवा मोबाईल वर सिनेमातली गाणी सतत पाहत बसतात. पावसात ओल्या झालेल्या हिरोयीनला हिरोने मारलेली मिठी आपणच मारली आहे असे समजून खुश होतात. भारतीय माणसाच्या ह्या सततच्या भुकेल्या अपंगत्वामुळे भारतात चित्रपट संगीताचा अप्रतिम  खजिना तयार होत राहिला आहे. जो जगात इतर कोणत्याही देशात नाही. जात पात धर्म भाषा सगळे विसरून वर्षानुवर्षे अनेक कलाकारांनी मराठी हिंदी बंगाली मल्याळी तमिळ तेलगु भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी निर्माण करत ठेवली आहेत. A R रेहमान सारखा निसर्गाची कुठलीतरी जादुई ताकद मिळालेला संगीतकार सर्व भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस गाणी गेली वीस एक वर्षे निर्माण करतोच आहे. माझ्या पिढीचा मोठे होण्याचा आलेख मांडायला बसले तर त्याच्या प्रत्येक टप्प्यावर रेहमानचे कोणतेतरी एक गाणे असते.

चित्रपट बनवताना माझा सगळ्यात जास्त आवडता भाग कोणता असेल तर तो चित्रपटातील गाणी बनवण्याचा. मला माझ्या चित्रपटांमध्ये आग्रहाने गाणी हवी असतात. पटकथेचे काम पूर्ण झाले कि मला संगीतकारांसोबत चालणारी अनेक म्युझिक सिटींग करायला फार आवडतात. मी गाण्याशिवायचा भारतीय सिनेमा असेल ह्याचा विचारच करू शकत नाही.

“तू कोणते संगीत ऐकतोस?” ह्या प्रश्नाचे मी कधीही नीट उत्तर देऊ शकत नाही . कारण मी पुष्कळ काही ऐकत असतो.  वाचत किंवा लिहित नसीन तर उरलेलेला बराच वेळ मी घरात आणि कारमध्ये खूप वेगवेगळे संगीत ऐकण्यात घालवतो. आपण ऐकायचे संगीत आपण निवडत नसतो. मांजर जसे राहायचे घर स्वतः निवडते तसेच संगीताचे आहे. ते आपल्याला निवडते. आपण कोणत्या प्रतलावर जगत आहोत , आपल्या मनामध्ये काय चालू आहे ह्यानुसार आपले मन आपोआप ओळखीच्या किंवा अनोळखी संगीताची निवड करीत असते.

माझी संगीताची जाणीव ज्या क्षणांनी , माणसांनी आणि दिवसांनी समृद्ध केली त्या क्षणांना आठवताना मी माझ्या आयुष्यातला तो दिवस विसरूच शकत नाही. २१ जून १९९९ चा. मी पहिल्यांदा परदेशात गेलो होतो तो काळ . पॅरीस  मध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या दिवशी म्युझिक फेस्टिवल होता. माझी म्युझिक फेस्टिवलची तोपर्यंतची समजून हि सवाई गंधर्व वर बेतलेली होती. एक मोठा हॉल  असेल किंवा स्टेज असेल तिथे आम्ही सगळ्यांनी जायचे , मग गायक येतील आणि आपण ते ऐकायचे. आम्हाला वीस जूनला फिल्म स्कूल मध्ये दुसऱ्या दिवशी वर्ग नसतील असे सांगण्यात आले. उद्या म्युझिक फेस्टिवल आहे . उद्या कॉन्सर्ट अटेंड करा . हाच तुमचा वर्ग. मी बर म्हणालो आणि रूमवर  आलो. सकाळी मी माझ्या हॉटेलच्या खोलीत उठलो ते एका वेगळ्याच वाद्याच्या आवाजाने. मी खिडकीबाहेर जाऊन पहिले आणि थक्क झालो. खालचा सगळा चौक माणसांनी फुलून गेला होता आणि सर्व रस्त्यांवर आपल्याकडे गणपती पाहायला माणसे फिरतात तशी शहरभर फिरत होती. मित्रांसोबत मी बाहेर पडलो आणि जातो तिथे वेगवेगळ्या देशांचे म्युझिक वाजवणारे लोक होते. फुटपाथवर , मेट्रो ट्रेन मध्ये , चौकातील कारंज्याच्या भोवती, सगळ्या विद्यापीठांच्या अंगणात. जिथे बघावे तिथे छोट्या आणि मोठ्या कॉन्सर्ट चालू होत्या. आफ्रिका , लॅटिन   अमेरिका , उत्तर आणि पूर्व आशिया  ह्या खंडांमधील संगीत मी कधी ऐकले नव्हते. मी दिवसभर मित्रांसोबत चालत राहिलो. भलेमोठे पॅरीस शहर जणू एक स्टेज बनले होते. किती आणि काय ऐकाल ? मी माझ्या ओळखीच्या प्रदेशापलीकडे त्या दिवशी जायला शिकलो. आपण नेहमी ओळखीचे आणि सुरक्षित संगीत ऐकत राहतो. अनोळखी अनुभवाची आपल्याला भीती वाटत राहते. ती भीती संपली. मला माहित असलेल्या पाश्चिमात्य रॉक आणि पॉप ह्या दोन्ही संगीताच्या पलीकडे मी गेलो. मी गायकांशी गप्पा मारल्या, अनोळखी वाद्ये हाताळून पहिली. सगळ्या शहरभर जणू मोठी पार्टी चालू होती. माणसे गप्पा मारत होती , गात होती , नाचत होती. प्रत्येकाला म्युनिसिपाल्टी तर्फे लायसन्स  आणि परफॉर्म करायची जागा आखून दिली होती. एका मोठ्या पार्क मध्ये त्या दिवशी रात्री माझा आवडता गायक ब्रायन अदाम्स येणार होता. माझी म्युझिकची आवड विस्तारून त्याला माझा आकार देण्यात ह्या दिवसाचा किती मोठा हात आहे !

शब्द रंग आणि समजुतीच्या आणि अर्थाच्या प्रदेशात मला संगीत घेऊन जाते. मी सध्या हेन्री निल्सन ह्या १९७० च्या दशकातील अमेरिकन गायक आणि लेखकाचे म्युझिक ऐकतो आहे. तसेच घरामध्ये मी लिहित असताना जॉन कोलट्रेन आणि मायील्स डेविस ह्यांचे संगीत लावून ठेवतो. मी स्वयपाक करताना नेहमी जॅझ  ऐकतो. त्याने सगळ्या घराला एक ताल आल्यासारखा होतो. मी सध्या महेश काळे ह्याला महाराष्ट्राचा एल्विस अशी पदवी दिली आहे , सतत तो मुलगा कुठेना कुठेतरी गातच असतो. आज इथे उद्या तिथे. शंकर महादेवन ने त्याच्याकडून गावून घेतलेला अरुणी किरणी हा तराणा मी परदेशात फिरत असताना इस्तंबूल मधील ताक्सिम स्क्वेअर मद्ध्ये एका रात्री बाकावर झोपून आकाशाकडे पाहत सतत ऐकत बसलो होतो. शंकर एहसान आणि लॉय ह्या त्रिकुटाचा मी फार मोठा फॅन   आहे. मला कधीतरी त्यांच्यासोबत एकत्र फिल्म करायची आहे. यान टीअर्सन ह्या फ्रेंच गायकाचे संगीत मला खूप उर्जा देते. त्याच्या संगीतामुळे मला लिहायला सुचते . तसाच मला उषा उत्थप ह्या तमिळ गायिकेचा आवाज खूप आवडतो. त्यांनी हिंदी चित्रपटात गायलेली अनेक गाणी मी ऐकत राहतो. लेडी गागा ह्या अमेरिकन पॉप गायिकेला मी उगीचच आजपर्यंत कमी दर्जाची मानत आलो होतो. नको तिथे आपला मराठी बाणा आड येतो. खूप प्रसिद्ध काही असले कि आपण नाके मुरडतो. मी काही दिवसांपूर्वी एका पार्टीत तिचे गाणे ऐकले आणि मी चाट पडलो. काय कमाल गाते ती. श्रेया घोशाल आणि सुनिधी चौहान माझ्या लाडक्या आहेत. माझ्या चित्रपटात त्या गायल्या आहेत. किती मोठी रेंज आहे दोघींच्या आवाजाला . टीना टर्नर आणि नीना सिमोन ह्या दोन्ही जुन्या अमेरिकन गायिका मला जाम आवडतात. व्हिस्की व्हॉइस म्हणता येईल असे त्यांचे आवाज आहेत . मला गदिमांनी लिहिलेली सर्वच्या सर्व गाणी आवडतात. ते माझे फार लाडके आहेत. लावण्यांचा मी मोठा फॅन आहे. आनंद मोडक ह्यांच्यासोबत लावणी ह्या विषयावर आम्ही किती तासनतास गप्पा मारत बसायचो. मी चित्रपटामधून भरपूर लावण्या ऐकल्या आहेत तसेच यमुनाबाई वाईकरांना बैठकीची लावणी सादर करताना पहिले आहे. शकुंतलाबाई नगरकर किती मस्त सिडक्षन करतात ते मी अनुभवले आहे. जगदीश खेबुडकरांनी मराठी गाण्यांना दिलेली झिंग आणणारी शब्दकळा माझ्या घरात तरंगत असते. मी पिंजराची गाणी सारखा ऐकतो. कधीतरी कुणालातरी परत असे मस्त करारे लिहिता यावे असे वाटते. अजय अतुल माझे लाडके आहेत आणि तसाच माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तो माझा संगीतकार मित्र अमित त्रिवेदी.

मी संगीताचा अनुभव घेताना मनाच्या सर्व खिडक्या आणि त्वचेची सर्व छिद्रे उघडी ठेवतो. भाषा किंवा संगीताचा प्रकार माझ्या आवडीनिवडीच्या आड येत नाही .

क्रमशः

 

अपेयपान ३६

मी स्वभावानुसार गर्दीत फिरणारा माणूस नाही .मी गर्दीला घाबरणारा प्राणी आहे. जास्त खाजगी स्वभावाचा आहे . माझी आनंद साजरा करायची कल्पना तीन ते चार जवळच्या लोकांसोबत असण्याची  असते. हजारो लोक जमतात तिथे जाऊन गर्दीचा भाग व्हायला मी थोडा बिचकतो. ह्या सगळ्याचा परिणाम मी संगीत कसे आणि कोणते ऐकतो ह्यावर होत असतो.

मी संगीत ऐकतो ते मोजके जाणकार लोक असलेल्या खाजगी मैफिलीमध्ये किंवा माझ्या हेडफोनवर ऐकतो. अनावश्यक गर्दीमध्ये संगीताचा अनुभव विसविशीत आणि विस्कळीत होवून जातो.दुसऱ्या बाजूला डेविड ग्वेत्ता किंवा स्क्रीलेक्स सारख्या EDMच्या ( इलेक्ट्रोनिक डान्स म्युझिक ) कॉन्सर्ट ना म्युझिकचा अनुभव हजारो लोकांसोबत एका उर्जेच्या पातळीवर जाऊन घेण्यात मजा असते.

मी खूप लहान वयापासून चित्रपट क्षेत्रात असल्याने मला आता गर्दीतला प्रेक्षक होणे शक्य होत नाही . किंबहुना प्रेक्षक होणेच शक्य होत नाही कारण तुम्ही काम करताना सतत मानसिक पातळीवर प्रेक्षकाच्या समोर उभे राहत असता. वर्षानुवर्षे प्रेक्षकाकडे एक न उलगडणारे कोडे म्हणून पाहत असता. काही वर्षांनी मग आपण साधे प्रेक्षक होवून गर्दीचा भाग होवून जाणे खूप अवघड बनते. गर्दी आणि सुसंकृत माणसांचा समूह ह्यातला फरक कळू लागतो. हि माझी जगाकडे बघण्याची जी पूर्वग्रहदूषित दृष्टी तयार झाली आहे त्या दृष्टीने मी किंवा प्रत्येक संगीताचा चाहता आपापले संगीत आणि ते ऐकायची पद्धत निवडत असतो. पूर्वग्रहाचा ( prejudice ) हा एक  महत्वाचा फायदा असतो. तुमची कलात्मक आवड निवड हि तुम्ही पूर्वग्रहदूषित ( heavily prejudiced) असलात कि जास्त उत्तम घडते. अतिसरळ आणि सपक अश्या तर्कशुद्ध मनाच्या आणि सद्सदविवेक बुद्धी सतत फुल ऑन मोड वर  ठेवून वागणाऱ्या माणसांना कलेचा संपूर्ण आनंद कधीही घेता येत नाही. त्यांच्या डोक्यात कोणतेही अधलेमधले नाजूक आनंद शिरू शकत नाहीत कारण त्यांच्या मनात द्वेष , स्पर्धा , नाराजी ह्यांच्या सारखे आवश्यक bacteria तयारच झालेले नसतात.

लेखक हा जसा बहुभाषिक असतो तसाच तो मनाच्या पातळीवर बहुलैंगिक असतो. मी लिहिण्याचे काम करताना , कथा रचत असताना नकळतपणे माझे मन संपूर्ण पुरुषाचे असते किंवा संपूर्ण स्त्री चे असते . ते वारंवार रंग बदलत राहते. काहीवेळा ते ह्या दोन्हीच्या मध्ये असणाऱ्या विस्तृत समुद्रामध्ये काही हे आणि काही ते बनून तरंगत राहते. मी म्युझिकची निवड करतो तेव्हा माझ्याही नकळत माझी त्यावेळची मनस्थिती माझ्या वतीने निर्णय घेत असते. मला काय आवडते यापेक्षा माझे मन कोणत्या प्रकारच्या म्युझिकला प्रतिसाद द्यायला उत्सुक आहे हि गोष्ट माझ्यासाठी महत्वाची होते.

माझ्याकडे काही अतिशय आवडत्या  गोष्टी आहेत त्या मी वारंवार ऐकतो. आमीर खान साहेबांचा मारवा असलेली एक CD आहे. लता मंगेशकरांची दोन गाणी आहेत (“जा रे उड जा रे पंछी” आणि “लग जा गले के फिर ये हसीन रात हो न हो”) एडिथ पियाफ ह्या जुन्या फ्रेंच गायिकेचे एक गाणे आहे.( Ne Me Quitte Pas)  माधुरी पुरंदरे ह्यांनी गायलेली ग्रेस ह्यांची एक कविता आहे (मी अशी बहरले होते) आणि लता मंगेशकरांच्याच आवाजातले पसायदान आहे. शिवाय मडोना चे ‘Don’t cry for me Argentina’ हे गाणे आहे. ह्या गोष्टी मला ऐकाव्या लागत नाहीत इतक्या त्या माझ्या मनाच्या आतमध्ये जाऊन शांतपणे बसल्या आहेत. माझ्या रक्ताचा भाग बनल्या आहेत. मी वारंवार ह्या गोष्टी मन शांत करून आणि डोळे बंद करून ऐकत राहतो. माझे आतले संगीत काय असे कुणी विचारले तर ह्या त्या चार सहा गोष्टी आहेत.

मी मनाने अगदी संपूर्ण शहरी माणूस आहे. मला लोकसंगीत फारसे आवडत नाही. ते माझ्या आत फारसे उतरत नाही. मला ते आता उर्जा देत नाही . ते आवडायला जो भाबडेपणा आणि मनाचा साधेपणा लागतो तो माझ्या आयुष्यात हळू हळू संपत गेला. त्यामुळे मला भारुडे , पोवाडे , अभंग , ओव्या ,आरत्या  ह्या सगळ्या साहित्याशी पूर्वी जोडता यायचे तसे आता नाते जोडता येत नाही. हा माझा मोठा  तोटा झाला असे मला वाटते. आयुष्यात पुढे जाताना आपला सोपेपणा कधी आणि कसा संपला ? बहिणाबाईंची कविता आता मला भावत नाही ह्याचे कारण माझ्या मनात नष्ट झालेले लहान मूल हे आहे. त्या विहिरीचे पाणी पिऊन माझे पोट भरले आहे.

मला सामाजिक संगीताचा मात्र फार मनापासून अगदी  कंटाळा आहे. समूहगीते आणि सामाजिक चळवळीची बेसूर आणि भेसूर गाणी मला जांभया आणतात .मी कोणतीही गोष्ट आवडल्याचे खोटे बोलू शकत नाही. उपयोगी कलात्मक वस्तू ह्या नेहमीच कुरूप असतात त्यामुळे सामाजिक कला नावाचे जे खूळ भारतात उगवले आहे ते फार विनोदी आहे. मी अश्या वातावरणात मोठा झालो ज्या वातावरणात कोणत्याही चिरंतन मूल्यव्यवस्थेविषयी मला फारसं आकर्षण उरलेलं नाही . एखादी गोष्ट केवळ खूप वर्ष टिकून आहे म्हणून मी त्या गोष्टीला गांभीर्याने घेऊन शकत नाही. सतत बदलणाऱ्या जगामध्ये मी बदलत बसलो आहे.  माझ्या आधीच्या पिढीला मिळाले ते स्थैर्य आणि सातत्य मला मिळाले असते तर मलाही फार आवडले असते. ! पण दर क्षणाला आमच्यासमोर जग बदलत गेले आहे. आमच्या पिढीला वेगाने बदलणाऱ्या जगाचा अनुभव इतर कोणत्याही पिढीपेक्षा जास्त पचवावा लागला आहे . त्यामुळे मी ज्या संगीताने स्वतःचे पोषण करतो ते संगीतही त्याच स्वरूपाचे आहे.

काही मोजके गायक,काही मोजके वादक आणि काही bands हे त्याला अपवाद ठरले आहेत. कारण हि माणसे काळासोबत बदलत जात अजूनही आश्चर्य निर्माण करायची थांबत नाहीत. त्यातले काही कलाकार आता मेले आहेत , काही जिवंत असले तरी आता नवे  काम करत नाहीत तरीही त्यांच्या कामातली उर्जा आजच्या काळातही रंग बदलत जिवंत राहिली आहे. रोलिंग स्टोन्स आणि बीटल्स हे दोन Bands .लिओनार्ड कोएन,बॉब डिलन आणि जिम मॉरीसन हे कवी आणि गायक ह्यांच्यापासून माझी हि यादी सुरु होते. भारतामध्ये आशा भोसले ह्यांनी निवडलेली आणि गायलेली गाणी हा सुद्धा बदलत्या काळाला पुरून उरणारा अनुभव आहे. मला त्या फार म्हणजे फारच आवडतात. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड आणि अमेरिकेत जन्मलेलं जे संगीत आहे ते आपल्याला पुन्हा जग नष्ट होईपर्यंत साथ देणार आहे. आधार देणार आहे. खऱ्या अर्थाने नवे संगीत हे दुख्खातून आणि विध्वन्सामधून तयार होते. त्यानंतर अनेक पिढ्या ह्या त्या संगीतावर उर्जा मिळवत किंवा त्या संगीताचा अर्थ लावत स्वतःचे नवे संगीत तयार करीत राहतात. मी सध्या ‘कोल्डप्ले’ ह्या तरुण ब्रिटीश band चे संगीत ऐकतो आहे. ते माझ्यासोबत  खूप वर्ष टिकेल. ते मला  संपूर्ण ओळखीची अशी भाषा बोलतात. मी बाहेर एकटा वणवण करत असताना ते मला समजून घेतात. Pink Floyd हा band असाच माझ्यासाठी खूप महत्वाचा असा आहे. त्यांचे संगीत मनाचा एक आतला स्तर बनून सतत माझ्यासोबत वावरत राहते.  ब्योर्ग हि ICELAND देशातील गायिका मला फार आवडते. तिचे संगीत गोंधळात पाडणारे आणि ओळखीच्या ताल सुरांच्या कक्षेच्या खूप बाहेरचे आहे.आणि मायकल   जॅक्सन माझ्यासाठी कधी संपेल असे मला वाटत नाही. All I want so say is that they don’t really care about us हे त्याने मला लहानपणीच सांगून जगायला तयार केले असे मला वाटते.

मी आनंद साजरा करण्यासाठी कधी संगीताकडे वळलो नाही .खूप आनंदी झालो कि मी मूक आणि शांत होतो.

हल्लीचे संगीत आम्हाला अगदी ऐकवत नाही असे म्हणणारी मनाने बुरसटलेली माणसे माझ्या आजूबाजूला इतकी आहेत कि मला आता त्यांच्या मनाच्या झापडबंद प्रवृत्तीवर हसूसुद्धा येत नाही. धार्मिक परंपरा जश्या जुन्या आणि कालबाह्य होतात तश्याच कलेच्या आणि संस्कृतीच्या परम्पारासुद्धा जुन्या होत असतात. वर्तमानकाळाकडे डोळ्यात डोळे घालून बघण्याची ताकद बऱ्याच माणसांमध्ये नसते . ती माणसे अशी विधाने करत तेच ते ऐकत आणि पाहत त्याचं त्या वाहवा देत कुजत बसतात.

सतत काहीतरी भरजरी सुप्रसिद्ध जुने आणि महत्वाचे ऐकण्यापेक्षा थोडं ओधडबोधड का असेना पण आज तयार होणारं ताज संगीत ऐकावं .नाहीतर तुम्ही मरणाच्या आधीच मनाने मेलेले राहाल.

 

kundalkar@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

2 thoughts on “‘अपेयपान’ लोकमत मधील लेखमाला भाग ३४ ते ३६ .”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s