अपेयपान . लोकमतमधील लेखमाला भाग ४१ ते ४५

अपेयपान ४१

मी ज्या नटांसोबत चित्रपट बनवताना एकत्र काम केले त्यापैकी हे दोन नट त्यांच्या विशेष गुणांमुळे माझ्या मनात कायम महत्वाचे राहतील. ते नट आहेत अतुल कुलकर्णी आणि राणी मुकर्जी. आणि त्या दोघांमध्ये असलेले महत्वाचे गुण म्हणजे कामातला चोखपणा (परफेक्शन) आणि वेळेची शिस्त. ते दोघेही अतिशय ताकदवान अभिनेते आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत , असे असले तरी , किंबहुना त्यामुळेच कि काय ते जेव्हा एखादी फिल्म निवडतात तेव्हा ते चित्रपटाच्या दिग्दर्शकाला संपूर्ण सोबत देतात. ह्याचा परिणाम असा कि तुमची काम करण्याची ताकद वाढते.
सिनेमा बनवणे हि अत्यंत गुंतागुंतीची आणि किचकट प्रक्रिया असते. शिवाय ती अतिशय महागडी कला आहे. सिनेमाचे शूटिंग करणे, तो चित्रपट पूर्ण करून योग्य वेळी , योग्य पद्द्धतिने प्रेक्षकांसमोर घेऊन जाणे हे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारासाठी अतिशय कष्टाचे काम ठरते.
अतुल कुलकर्णी चित्रपटाची निवड करताना अतिशय काळजीपूर्वक करतो. एखादा चित्रपट स्वीकारताना कथा आवडली तरी त्या दिग्दर्शकाला आपण वेळेची पूर्ण बांधिलकी देऊ शकणार आहोत ना? ह्यावर तो खात्रीशीर विचार करतो . एकाच वेळी खूप काम करत नाही , त्यामुळे चित्रपटाच्या तयारीपासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत तो निर्माता आणि दिग्दर्शकासोबत उभा राहतो. मी happy journey ह्या चित्रपटाची पटकथा त्याच्याकडे वाचायला घेऊन गेलो. त्याने पटकथेच्या रचनेत अनेक मोलाचे बदल सुचवले. निरंजन चे पात्र साकारण्यासाठी त्याने व्यवस्थित व्यायाम सुरु केला , त्याच्या भूमिकेसाठी त्याच्या पोशाखात आणि केशभूषेत बदल करणे आम्हाला आवश्यक वाटत होते. त्याने काही महिने आधी सवय होण्यासाठी वेगळे कपडे, बूट वापरून पाहायला सुरुवात केली. त्याचा मला अतिशय आवडणारा गुण म्हणजे तो हे सगळे कोणताही गवगवा न करता फार शांतपणे आणि एखाद्या नव्या विद्यार्थ्याप्रमाणे उत्कंठतेने करतो. त्याला भूमिका साकारताना मिळणार्या आनंदाइतकाच भूमिकेची तयारी करण्याचा आनंद खूप महत्वाचा असतो. प्रिया बापट ह्या त्याच्या सहकलाकारासोबत त्याने पटकथेची वाचने केली. सगळ्यांना अतिशय अगत्याने आपल्या मुंबई जवळील शेतावरच्या सुंदर घरी घेऊन गेला आणि तिथे एकत्र राहून सर्व कलाकारांना आणि तंत्रद्यांना चित्रपटाची तयारी करण्यासाठी एक छोटे workshop आयोजित केले . अतुलसाठी चित्रपट म्हणजे फक्त त्याचे शूटिंग असे नसते. तो चित्रपटसंस्कृतीत मुरलेला नट आहे. शूटिंगच्या अलीकडे आणि पलीकडे अनेक प्रक्रिया घडतात ज्यात चित्रपट आकार घेत असतो हे त्याला कळते. त्यामुळे त्याच्यासोबत दिग्दर्शक म्हणून काम करताना तुम्हाला नवी उर्जा सतत मिळत राहते. तो सर्व वेळी सतत सूचना करत असतो आणि बदल सुचवत असतो. असे असले तरी दिग्दर्शकाचा शब्द शेवटचा आहे हे मानण्याची त्याची नेहमी तयारी असते. त्याचे वाचन चौफेर असते. मी ज्या सर्व कलाकारांसोबत कामे करत आलो त्यात अतुल माझ्यासाठी महत्वाचा आहे कारण त्याच्यात एक अतिशय लहान मूल दडलेले आहे. ते लहान मूल अतिशय हट्टी आणि आग्रही आहे. शिवाय ते थोडे रागीटसुद्धा आहे. भांडकुदळ अजिबात नाही. त्याचा उत्साह सेटवर इतरांना खूप उर्जा देत राहतो. तो काम करताना माझ्यावर रोज रागावतो आणि रोज तो राग विसरतो. दररोज शूटिंग संपले कि सर्व कलाकारांना आणि तंत्रद्यांना तो गाडीत घालून कुठेतरी मस्त जेवायला घेऊन जातो. कोणताही शॉट कितीही वेळा पुन्हा करून पाहतो. एकदाही कामाचा कंटाळा करत नाही.प्रत्येक शॉट मनासारखा मिळावा म्हणून अतिशय कष्ट घेतो. सोबतच्या सहलाकाकारांची तो फार प्रेमाने काळजी घेतो. एकदा आम्ही त्याच्यासोबत प्रचंड थंडीत पहाटे तीन वाजेपर्यंत काम करत होतो तेव्हा त्याने स्वतः मोठी शेकोटी पेटवली होती आणि युनिट मधल्या सर्वांना तो तिथे बोलावून उत्साह देत होता. त्याने भारतातील अनेक भाषातील चित्रपटात काम केले आहे. अनेक वेळा नव्या ठिकाणी जाऊन तो नवी फिल्म करून आला कि तो आवर्जून सगळ्यांना त्या चांगल्या अनुभवाबद्दल सांगतो. दोन सिनेमांच्या मध्ये तो देशभर आणि जगभर मोकळे प्रवास करतो आणि अनेक गोष्टी पाहून शिकून परत येतो. अतुलसोबत चित्रपट करून संपला कि आणि आपण पुन्हा वेगळ्या माणसांकडे वळलो कि आपल्याला लक्षात येते कि अतुलची किती महत्वाची सोबत आपल्याला होती. ह्याचे कारण ह्या माणसाची व्यावसायिक जाणीव आणि उर्जा आणि त्याला असलेले भान आणि ज्ञान हे पंचविशीच्या माणसाइतके शार्प आणि ताजे आहे.
राणी मुकर्जीने अनुराग कश्यपच्या सांगण्यावरून माझा ‘गंध’ हा चित्रपट पहिला आणि मला घरी चहा साठी बोलावले. तिला गंध अतिशय आवडला होता. आमच्या पहिल्या भेटीपासून ते आमचा ‘अय्या’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या साडेतीन वर्षांच्या काळात त्या मुलीने सळसळत्या उत्साहाने मला भारून टाकले होते. त्या काळात एकदाही माझ्या आयुष्यात कंटाळ्याचा क्षण नव्हता. तो तिचा खास गुण आहे. ती आजूबाजूच्या माणसांना अतिशय सरळ सोप्या थेट संभाषणाने मोकळे वागवते.
राणीने मला चित्रपटाला होकार द्यायला काही महिने घेतले. मला त्या काळात असे वाटत राहिले कि ती बहुदा माझा चित्रपट करणार नाही. एकदा माझ्यासोबत बसून तिने मला चित्रपट निवडताना नुसते कलात्मक निकष लावून चालत नाहीत , तिला अजूनही काही गोष्टींची निर्मात्याकडून खात्री करून घ्यावी लागते हे समजावले . ती काम करत असेल तर तो चित्रपट एका विशिष्ठ प्रकारे देशभर आणि जगातील बारा तेरा देशांमध्ये प्रदर्शित होतो. ते करण्याची निर्मात्याची ताकद आहे का ह्याची तो खात्री करून घेत होती. एकदा चित्रपाटला होकार दिल्यावर मात्र ती अतिशय शिस्तीने आणि गांभीर्याने भूमिकेची तयारी करू लागली. तिने मराठी माणसे हिंदी बोलतात त्याचा विशिष्ट हेल शिकून घेतला. अमृता सुभाषला तिने घरी बोलावून तिच्या आवाजात हिंदी संवाद रेकोर्ड करून घेतले म्हणजे तिला मराठी चाल अंगीकारणे सोपे जाईल. पृथ्वीराज सुकुमारन हा मल्याळी नट आणि सुबोध भावे हा मराठी नट हे तिचे सहकलाकार असणार होते. तिने त्या दोघांना भेटण्याआधी त्यांचे चित्रपट पहिले. त्या दोघांना आपापल्या राज्यात चित्रपट क्षेत्रात मानाचे स्थान आहे हे ओळखून ती त्यांच्याशी अतिशय सोपेपणाने आणि मैत्रीने वागली. राणीचा स्वभाव फार वेगळा आहे. ती नुसती रागीट नाही तर पुरेशी भांडकुदळ आहे . ती समोरच्याला मनातले सगळे बोलून मोकळी होते. तिने फार कष्टाने तिची जागा तयार केली असल्याने तीला आपल्या प्रत्येक निर्णयाच्या परिणामाची अचूक जाण असते.
आपल्यामुळे इतर कलाकारांना आणि युनिटमधील नव्या तंत्राद्यांना बिचकायला होवू नये म्हणून तिने शूटिंगपूर्वी सगळ्यांना स्क्रिप्ट वाचनाच्या एका workshop ला एकत्र बोलावले. त्या दिवशी मोठे जेवण आयोजित केले.
सेटवर तिच्यासोबत काम करणे अजिबात सोपे नसते. ती सेटवर असली कि सेटवर आग लागल्यासारखे वातावरण असते. पण एकदा का कॅमेरा on झाला कि राणी रंग बदलते. तिचे डोळे एका क्षणात बदलतात आणि ती पटकन भूमिकेत शिरते. कामाविषयी आणि वेळेविषयी ती कमालीची शिस्त पाळते. एकही दिवशी ती उशिरा आल्याचे मला आठवत नाही. तिच्यासोबत काम करताना एकही दिवस मला कंटाळा आला नाही . तिने तो येउच दिला नाही.
शूटिंग संपले तरी ती सर्व टीमसोबत वर्षभर काम करत होती. चित्रपटाच्या गाण्यांच्या रेकोर्डिंगला हजर असायची , editing बारकाइने पहायची , पोस्टर तयार करताना , ट्रेलर बनवताना रात्रभर जागून सर्व टीमसोबत राहायची. तिच्यात अपरिमित उत्साह आणि आणि कमालीची ताकद आहे. तिच्यासोबत काम करून आता चारेक वर्ष झाली असतील , मला तिच्या इतकी उर्जा, प्रामाणिकपणा आणि अभिनयाची समजूत असलेली माणसे फार भेटलेली नाहीत.
मी असे का ह्याचा विचार करतो तेव्हा मला हे लक्षात येते कि हि माणसे काळासोबत बदलण्याची फार मोठी ताकद घेऊन जन्माला आलेली असतात. ती त्यांचाकडून शिकण्यासारखी फार मोठी गोष्ट आहे. शिवाय व्यावसायिक सुरक्षिततेतून हि माणसे स्वतःला सतत बाहेर काढून , नवनवी आव्हाने घेत नव्या पिढीच्या दिग्दर्शकांसोबत कायम काम करत राहतात.
सिनेमा बनवणे अवघड असले तरी अश्या काही माणसांमुळे तो बनवण्याची मजा सतत येत राहते. म्हणूनच तर आपण प्रत्येक सिनेमाच्या दमवणूकीनंतर , पुन्हा दुसरा सिनेमा सुरु करतोच.

img_1628

अपेयपान ४२

आपण लहानाचे मोठे होत जातो तसतसे आपले शहर आपल्यासाभोवती आकार आणि स्वरूप बदलत जाताना दिसत राहते . हा बदल दिवसागणिक लक्षात येत नाही. त्यासाठी काही वर्षे जावी लागतात. एखाद्या लहान मुलाला अनेक वर्षांनी पुन्हा भेटल्यावर आपण स्वाभाविकपणे म्हणतो , अरे किती बदलला हा ? तसेच शहराच्या बाबतीत होत राहते. शहर हि व्यक्ती असते. अतिशय सोशिक व्यक्ती.
माझ्या लहानपणी पुणे शहर हे जुन्या पेठांचे शहर होते. नदीच्या ह्या बाजूला आमचे एक वेगळे असे जग चालू होते. डेक्कन आणि त्यापुढील परिसर , पेठा आणि थोडा उच्चभ्रू असा कॅम्प चा भाग. इतके तीनच परिसर होते. कोथरूडला माझा शाळेतला मित्र राहत असे त्याच्याकडे आम्ही एक बस पकडून अलका सिनेमा पासून मोठा प्रवास करून जात असू हे मला आठवते. विद्यापीठाच्या पुढे जंगल होते आणि मग औंध नावाचे अर्धवट खेडे. जिथे माझी मावशी राहायची. पेठांमधील ठराविक गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेली ठराविक ठिकाणे , दुकाने. त्या दुकानातील आपल्याला ओळखणारे दुकानदार अशी सगळी लहानपणची चैन पुण्यात होती. जसे पुणे शहराचे म्हणून एक वैशिष्ठ्य होते तसेच प्रत्येक पेठेचेसुद्धा होते. प्रत्येक पेठ हि जणू एखादी व्यक्ती असल्याप्रमाणे तिला गुणदोष चिकटवलेले होते. सदाशिव पेठ अशी , नारायण पेठ तशी, नवी पेठ असली , मंगळवार पेठ तसली. ह्या सगळ्यावर माणसे तासनतास चर्चा करत बसलेली असत.
जेव्हा शहर आटोपशीर आणि छोटे असते आणि तिथे घडणाऱ्या उलाढाली मोजक्या असतात तोपर्यंत अश्या ठिकाणी अश्या छोट्या गोड गोष्टींची कौतुके करत बसायला माणसांना वेळ असतो आणि मुभा असते. पुण्याचे वय अनेक दशके हे वीस वर्षाचेच होते. काही घरांमध्ये विशीतली मुले असतात ती कधीही आपले घर आपले नातेवाइक ह्यांना सोडून राहिलेली नसतात , कधी त्यांनी कुठे बाहेर प्रवास करून अनुभव घेतलेले नसतात , तसे पुणे शहर होते. वीस वर्षांचे गोरेगोमटे बालक होते ते.
सुरक्षित आणि छोटे असल्याने शहराला इतिहास परवडत असे. जुन्या परंपरांचा अभिमान आणि माज परवडत असे. शांतता आणि ठेहराव सहन होत असे . माझ्या आठवणीतले लहानपणीचे पुणे शहर आत्ता आमचा मित्र जितेंद्र जोशी ह्याच्या ‘दोन स्पेशल’ ह्या नाटकात अनुभवायला मिळाले. अनेक वर्षांनी ह्या नाटकात ध्वनीरचनेमधून एक अख्खा काळ जिवंत झाल्याचा आभास झाला. मला ते नाटक बघताना पुण्यातली डिसेंबरमधली थंडी आठवली. आमच्या पंतांच्या गोटातील घरात लांब स्टेशनवरून सकाळची डेक्कन क़्विन निघाल्याची शिटी ऐकू यायची. आमचे आनंद आणि आमची नाराजी दोन्ही खूप मर्यादित होते. आपल्या शहराच्या पाण्याच्या चवीविषयी आम्हाला अभिमान होता . आमच्या गणपतीच्या मिरवणुकीविषयी अभिमान होता. आमच्या पुरुषोत्तम करंडकाविषयी अभिमान होता. पर्वती विषयी अभिमान होता. इतकंच काय पण असे अनेक लोक होते ज्यांना हिंदुस्तान बेकरीत रविवारी सकाळी मिळणाऱ्या patice विषयीसुद्धा अभिमान होता. अभिमान असणे हे आमच्या पिढीसाठी फार स्वस्त होते कारण आम्ही कशातूनच काही उभारले नव्हते. आम्ही एका टेकड्यांनी वेढलेल्या थंड हवेच्या कलासक्त गावात जन्मलो होतो. एव्हडेच कर्तृत्व. त्यापलीकडे फारसे कुणी काही नव्याने उभारताना दिसत नव्हते. माणसे परंपरा पाळण्यात मात्र कर्तबगार होती. जे आहे ते तसेच्या तसे चालू ठेवणे अशी जर काही भारतात स्पर्धा निघाली असती तर आमच्या शहराला पहिला करंडक नक्की मिळाला असता.
मी शाळा सोडत असताना अचानक असे काहीसे वातावरण पहिल्यांदा तयार झाले ज्यामुळे आम्हाला आमच्या जगण्याचा फेरविचार करावा लागणार हे आमच्या सर्व पिढीला लक्षात आले. अचानक सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षण जाहीर झाले आणि ज्या सुरक्षित आणि मर्यादित वातावरणात आमचे आईवडील वाढले होते त्या वातावरणाला सुरुंग लागला. आमच्या पिढीसाठी हि फार सुदैवी घटना घडली असे मी समजतो कारण त्यामुळे गेल्या दोन तीन पिढ्यांनी सुस्तपणे राहून आपल्या जगण्याच्या प्रवाहाचा विचार करणे सोडून दिले होते ते आम्हाला अचानक करायला भाग पडणार असे वातावरण तयार झाले.
खाजगी क्षेत्र त्यावेळी खुले होण्याची चिन्हे दिसू लागली आणि सतत आपण शिक्षण, नोकऱ्या , भांडवल ह्यासाठी सरकारचे पाय चेपत बसायची गरज उरणार नाही हे कळू लागले. माझ्या आजूबाजूची शेकडो मुले मुली ह्या काळात सरळ उठून इंग्लंड अमेरिकेला निघून गेली आणि कधीही परत आली नाहीत. आणि आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या सधन कुटुंबांचे लक्ष्य पुण्याकडे वळले. स्थलांतराचा मोठा सिलसिला सुरु झाला आणि सहस्र्तक संपायच्या आसपास आमच्या शहराचे वय अचानक विसावरून चाळीस वर्षाचे झाले.
हे आज आठवण्याचे कारण म्हणजे मी सध्या J M Coetzee ह्या दक्षिण आफ्रिकेतील नोबेल पुरस्कार विजेत्या लेखकाचे ‘समरटाईम’ हे पुस्तक वाचतो आहे . त्यामध्ये नायकाची आठवण काढताना त्याच्या आयुष्यात आलेल्या सर्व स्त्रिया हे म्हणतात कि तो जरी तीस वर्षाचा होता तरी आमच्याशी वागताना तो एखाद्या लहान मुलासारखा वागत असे .तो स्वतः मध्येच मग्न असायचा. आमच्यावर कसे प्रेम करायचे हे त्याला कळायचे नाही आणि मग अचानक तरुण होणे टाळून तो एकदम प्रौढच झाला. हे वाचताना मला का कोण जाणे माझ्या शहराची आठवण झाली. आणि ते शहर कधीही सोडून बाहेर न गेलेल्या तिथल्या माणसांची.
आमचे शहर कधीही तरुण नव्हते. आणि आतातर ते अचानक प्रौढ व्यक्तीसारखे होवून बसले आहे. ज्या व्यक्तीला खूप आठवणी असतात आणि नक्की आपण असे का दिसायला लागलोय हे आता तिला कळत नसते. मनाचे तरुणपण त्या व्यक्तीच्या हातातून निसटून गेलेले असते.

मी जेव्हा कधीही शहरात जातो तेव्हा शहरातील जुने नागरिक शहराविषयी तक्रारी करताना मला ऐकू येतात. तेव्हा मला फार वाईट वाटते. त्या माणसांविषयी काळजी तयार होते. शांतता आणि स्वच्छता ह्या अतिशय महाग झालेल्या गोष्टी तुम्हाला आता अपोआप कश्या हो मिळणार ? असे मी त्यांना कसे विचारू ? कारण त्यांच्या साधेपणाची आणि सोपेपणाची बूज राखावी वाटते. खरे सांगून आणि बाहेरच्या जगातील परिस्थितीची जाणीव करून देवून त्यांना अस्वस्थ करायला मला नको वाटते. घरच्या कार्यक्रमांना गेलो कि अस्वस्थ ते नाही तर मी होतो. कारण आठवणी सोडून कुणाकडे फारसे काही बोलायला उरलेले नसते. आणि मला भूतकाळाचे व्यसन परवडणारे नाही हे लक्षात आलेले असते.
प्रत्येक मोठ्या सामूहिक कुटुंबाला किंवा जातीसमुहाला एक मर्यादेनंतर फक्त भूतकाळ असतो . वर्तमानकाळ हा ज्याच्या त्याला असतो. तिथे तुमचे मोठे कुटुंब, तुमचे जातभाई कुणीही कामी येऊ शकत नाही.
आरक्षण नाकारले गेल्याने किंवा ते फक्त इतरांना दिले गेल्याने आमचे किती भले झाले हे मी सांगू शकत नाही . आमची पिढी मोकळ्या आणि विस्तृत जगामध्ये फेकली गेली आणि गटांगळ्या खात का होइना जगायला आणि तरायला शिकली. स्थलांतराचा फार मोठा फायदा आम्हाला झाला. ज्या सुरक्षित वातावरणात आमचे आई वडील वाढले ती सुरक्षितता नाकारली गेल्याने काही काळ बिथरायला झाले पण लगेच विचार करून , आपले गाव शहर, सोडून , कष्ट करून नवे शिक्षण घेऊन एक अख्खी पिढी स्वतःच्या पायांवर उभी राहिली. आम्ही आरक्षण न मिळाल्याची तक्रार कधीही केली नाही.
आपले हातपाय ताकदवान आणि आपली बुद्धी शाबूत असेल तर पोट भरायला आणि सुखी व्ह्यायला आपल्या आड कुणीही येऊ शकत नाही. मी फार गरिबीतून कष्ट करून वर आलेली माणसे पहिली आहेत. ज्यांना आपल्या वेळेची किंमत होती आणि बुद्धीचा आदर होता.
कितीही बिचारे वाटले तरी मला माझे जुने शहर आणि त्यातली माणसे महत्वाची वाटतात. कारण आत्मसन्मान नावाची एक शांत आणि ठाशीव गोष्ट त्या शहराने मला दिली. जुना फुकाचा अभिमान मी नाकारला पण आत्मसन्मान जपून ठेवण्याची सवय स्वत: ला लावली. आणि त्यामुळेच दुसऱ्याचाही आत्मसन्मान जपायला शिकलो.

img_1645

अपेयपान ४३
फटाके वाजवावेसे वाटत नाहीत , वर्षभर नवे कपडे घेणे चालूच असते त्यामुळे नव्या कपड्यांचे कौतुक उरत नाही. त्याचप्रमाणे हल्ली फराळाच्या गोष्टी सगळीकडे वर्षभर मिळतात . त्याचे अप्रूप राहत नाही. दिवाळीला पडायला हवी तशी पुरेशी थंडी आता पडत नाही. त्यामुळे गेली काही वर्षे मी दिवाळीत उसना आनंद आणणे थांबवले. दिवाळी हा प्रामुख्याने लहान मुलांचा सण उरला आहे. ज्यांना ह्या काळात सुट्टी असते आणि खायची प्यायची चंगळ असते. किल्ला बनवता येतो . नवे कपडे मिळतात. मला हि शंकाच आहे कि लहान मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या आग्रहाने आणि त्यांनी लहानपणी किल्ला बनवलेला असल्याने हे सगळे करावे लागत असणार. नाहीतर मुले आनंदाने घरात रिकामी लोळत मोबाईल फोन्स वर गेम्स खेळण्यात जास्त आनंदी असतील. त्यांच्याशी कुणीतरी खरे बोलायला हवे कि नक्की त्यांना काय हवे असते ? मुलांची खरी उत्तरे ऐकली तर आईवडिलांना हार्ट attack येतील इतकी हल्लीची मुले मोकळी आणि practical आहेत. आपली हौस आणि आपल्या लहानपणच्या सणावारांच्या आठवणीचे ओझे आपण त्यांच्यावर टाकले तर ती आपल्याला खाजगीत हसत आपली चेष्टा करत असतात हे बऱ्याच तरुण पालकांना समजत नाही.
पण असे बोलून चालत नाही. कारण हल्ली वातावरण असे आहे कि सगळे एकमेकांच्या धाकाने सण साजरे करतात. लहान शहरांमध्ये माणसांना शेजारचे आणि नातेवायीक आपल्याला काय म्हणतील ह्याचा सतत संकोच असतो. त्यामुळे घरातले फराळ आणि वारेमाप खर्च हे त्या भीतीने केले जातात. माझ्या वयाच्या एकाही मैत्रिणीला आणि मित्राला घरी फराळ बनवत बसणे ह्या गोष्टीचा उत्साह उरलेला नाही . पण सांगणार कुणाला ? कारण तुम्ही प्रथा बदललीत कि घरापासून दारापर्यंत अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. आणि त्याला आपण सगळे फार घाबरतो.
शिवाय वारेमाप जाहिरातबाजी करून आपल्याला खर्च करण्याची सक्ती केली जाते. पाश्चिमात्य देशांमध्ये नाताळ सणाला लोकांना भरपूर खरेदी करायला भाग पाडावे म्हणून एकमेकांना भेट देण्याची संस्कृती बाजारव्यवस्थेने काळजीपूर्वक रुजवली. त्याला धर्माचा सुंदर मुलामा दिला. आपल्याकडे तीच प्रथा सर्व मार्केटिंग कंपन्या दिवाळीत तंतोतंत कॉपी करून वापरू लागल्या आणि काही कारण नसताना दिवाळीत एकमेकांना भेटी देण्याचा बभ्रा केलं जाऊ लागला. सगळ्यांनी सगळ्यांना भेटवस्तू द्यायला हव्यात नाहीतर तुमची दिवाळी पूर्ण होवून शकत नाही असे वातावरण जाहिरातींमधून पसरवणे सुरु झाले आणि साधा भारतीय मध्यमवर्ग ह्या नव्या परंपरेला लगेच भुलला.
दिवाळी अशी कधीच नसायची. दिवाळी हि शांतता आणि स्वच्छता साजरा करण्याचा सण आहे . शांत सुंदर प्रकाशाचा सण आहे. भपक्याचा सण नाही . दिवाळीच्या मूळ आनंदापासून आज आपण एका खरेदी विक्रीच्या , गोंगाटाच्या आणि दिखावेबाजीच्या संस्कृतीपर्यंत कधी येऊन पोचलो ते आपल्याला कळलेसुद्द्धा नाही.
पूर्वी मी जे दिवाळी अंक वाचायचो त्यातला एकहि मला आता वाचवत नाही . कारण भडक जाहिराती हे नुसते कारण नाही . कुणाकडे नव्याने म्हणण्यासारखे फार काही उरलेले नसते हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. सर्व अंक हे जुन्या लोकांच्या जुनाट आठवणींनी भरलेले असतात. तेच तेच लेखक त्याचं अंकात वर्षानुवर्षे लिहित असतात. आणि फेसबुकवर त्याचं जुन्या कडब्याची मराठी माणसे दिवाळीत चर्चा करत बसलेली असतात. दिवाळी पहाट नावाच्या कार्यक्रमांची तीच तऱ्हा आहे. तेच ते जुने दळण. तेच ते गायक . तेच विनोद. सण साजरे करण्याचे नवे पर्याय आपण शोधून न काढल्याने आपण त्याचं गोष्टी दर वर्षी करत बसतो.
माझी एक मैत्रीण मला परवा म्हणाली मला दिवाळीत फराळ वगरे कारायचा इतका कंटाळा आला आहे अरे. नको वाटते आहे. कामाला चार दिवस सुट्टी आहे तर बाहेर शांत कुठेतरी घर बंद करून मुलांना घेऊन जावे वाटते आहे . पण तसे केले तर बरे दिसत नाही न . म्हणून शास्त्रापुरता थोडा फराळ बनवते आणि मुलांना वाईट वाटू नये म्हणून थोडे फटाके आणते. हे ती बोलत असताना तिची मुलागी म्हणाली आई प्लीज फटाके वगरे आणू नकोस आणि मला चिखलात जाऊन किल्ला वगरे करायला भाग पाडू नकोस. मला एकदम हसायला आले आणि माझ्या मैत्रिणीचा चेहरा पडला. काळ बदलला आहे हे आपल्याला कळत असते , ऋतुचक्र बदलले आहे हे आपल्याला माहित असते फक्त आपल्याला ते मान्य करण्याची भीती वाटत असते. दुसऱ्या कुणीतरी थोडे वेगळे वागू लागले कि मग आपण तसे वागू हा शहरी भित्रट मध्यमवर्गीय विचार त्यामागे असतो. सुरुवात आपल्यापासून नको.
एकदा आपल्याला मुलेबाळे झाली कि आपण जास्त संकोचलेले आणि घाबरट बनत जातो. आपल्यावर आपल्या आई वडिलांनी जे संस्कार केले तसेच आपल्याला कॉपी टू कॉपी आपल्या मुलांवर करायचे असतात. उगाच मुलांना संस्कृतीची माहिती नसली तर त्याचे बालंट आपल्यावर यायचे. पण सध्या मुले विशेषतः शहरातली मुले अतिशय हुशार निघाली आहेत. ती त्यांच्या आईवडिलानइतकी भाबडी आणि संकोचलेली उरलेली नसतात. त्यामुळे सर्व सोसायट्यानमध्ये सकाळचे दोन तास सोडले कि पारंपारिक दिवाळीचे वातावरण संपते आणि घरातले सगळे भरपेट चापून tv समोर आडवे होतात . दिवाळी हि इतर रविवारच्या सुट्ट्याप्रमाणे संपूनही जाते. अनेकदा ती संपून गेल्याचे आपल्याला हायसेसुद्धा वाटते कारण खिशाला भोक पडल्यासारखा वारेपाम खर्च चालू असतो. तो खर्च कारायचा कि नाही ह्याविषयी घरात कुणीच कुणाशी बोलत नाही. दरवर्षी हवे नको ह्याचा अजिबात विचार न करता अनेक कुटुंबात दिवाळीचा म्हणून एक ठराविक आणि तोच तो खर्च करत बसतात.
मला दिवाळीला घरापासून लांब राहवत नाही. दिवाळीचा हल्ली होणारा सर्वात मोठा आनंद हा कि त्या वेळी सर्व भावंडांना आणि मित्रांना निवांत बसून गप्पा मारायला खूप वेळ असतो. सगळ्यांचा मिळून रिकामा वेळ असणे हि हल्लीच्या काळात इतकी मोठी चैन झाली आहे कि मला सणाचा म्हणून जो आनंद होतो तो त्या रिकामटेकडेपणानेच होतो. एरवी वर्षभर कुणाला कुणाकडे जायला , आणि गेलोच तर घडयाळ ठार मारून गप्पा मारत बसायला कुठे वेळ उरला आहे ? दिवाळीच्या काळात हे जमून येते. मग अश्या वेळी उगाच घरातल्या बायका स्वयपाक पाण्यात वेळ न घालवता मजेत सुट्टी घेतात . आम्ही सरळ बाहेरून जेवण मागवतो आणि एकमेकांना वेळ देतो. जेवण खाण ह्याचा फारसा बाऊ आम्ही करत बसत नाही. शिवाय आता सगळ्या मित्रांची आणि भावंडांची मुले पुरेशी मोठी झाली असल्याने ( म्हणजे १० वर्षांची . ह्या वयात त्यांना स्वतंत्र विचार असतात ) ती आपापल्या विश्वात गर्क असतात.
अनेक ओळखीचे लोक दिवाळीत अनोळखी जागी प्रवास करतात . शहरातली कुटुंबे त्याचं त्या ओळखीच्या रुटीन पासून आणि माणसांपासून जरा लांबवर जातात.
दिवाळी जर नाविन्याने आणि काळाचे भान ठेवून मजेत साजरी केली तर खूप मजा येते. किती सुंदर दिसणारा सण आहे हा ? मला जिथे तिथे ह्या चार दिवसात केलेली दिव्यांची सजावट पाहायला फार आवडते. कितीही ताण मनावर असले तरी रात्री उशिरा आणि पहाटे जर ह्या काळात बाहेर पडले तर शहराचे सुंदर रूप पाहून आपल्याला बरे वाटते. जागोजागी रोषणाई केलेली असते , पणत्या लावलेल्या असतात आणि वातावरणात एक प्रसन्नता असते. ती आपण सगळ्यांनी मिळूनच तयार केलेली असते. वर्षभर राबून आपण हा एक वेळ हक्काच्या आनंदासाठी जपून ठेवलेला असतो. आपण त्याची वाट पाहत असतो. मग प्रश हा उरतो कि इतक्या चांगल्या शांत रिकाम्या मौल्यवान काळातही आपण आपल्यामागे अनेक घरगुती कामे कशाला लाऊन घेतो ? नवे मोठे खर्च का ओढवून घेतो ? सुट्टीचा आनंद हा काही न करता एकमेकांना भेटून भरपूर गप्पा मारण्यात आहे. तोच सण आहे. बाकी सगळा दिखावा आहे.

img_1620अपेयपान ४४

लहानपणी आम्ही जो हिंदी सिनेमा पाहायचो , त्यात कुणीतरी कुणावरतरी अन्याय करीत असे आणि मग काही वर्षांनी कुणीतरी त्याचा बदला घेत असे. मला बदल्याचे प्रसंग फार आवडत असत. विशेषतः शक्ती कपूर वगरे लोकांना सिनेमातल्या होरोयीनी हाणामारी करून सिनेमाच्या शेवटी लोळवत असत तेव्हा मजा येत असे किंवा हिरो बदला घेण्यासाठी व्हिलनचा खून करत असे तेव्हा फार बरे वाटत असे. वर्षानुवर्षे भारतामध्ये रामायणच सिनेमाच्या रुपात पुन्हा पुन्हा बनवले जात असे.
राखी हि नटी स्वतः बदला घेत नसे. ती तिची मुले अनेक वर्षांनी परत येऊन अमरीश पुरीला मारतील ह्या आशेवर जगत असे. वणवण फिरत असे. रेखा मात्र आपली कामे इतरांना सांगायची नाही. ती स्वतःच बदला घ्यायची. कारण रेखाला मुले होणेच मान्य नव्हते. आपल्यावरून इतरांवर नजर गेली तर आपले सौंदर्य कोण पाहील ? मुले झाले कि तरुण सुना येणार. त्या सुना कपडे काढून बागेत नाचणार . मग प्रेक्षक त्यांनाच पाहत बसणार. त्यापेक्षा नकोच ते. ती हृतिक रोशन ची आजी झाली पण आई वगरे होण्यात तिने वेळ घालवला नाही. डायरेक्ट आजी आणि ती पण ह्रितिकची. उगाच कुणी सायडी नाही . रेखा बदला घ्यायची तेव्हा ती आपले रूप संपूर्ण बदलून येत असे , प्रेक्षक सोडून तिला त्या नव्या रुपात कुणी ओळखत नसे आणि मग ती व्हिलनला प्रेमात पाडून योग्य वेळी त्याचा बदला घेत असे. श्रीदेवी सहसा मनुष्यरुपात बदला घेत नसे. ती नागीण बनून यायची. मला अजूनही स्वप्नांत तिचे ते भप्पकन उघडणारे नागिणीचे घारे डोळे येतात आणि मी घाबरून जागा होतो. मी कुणावर कधी इतका अन्याय केलेला नाही कि कुणी माझा बदला घ्यावा. कधीतरी पार्किंग करतांना मागच्याची गाडी ठोकली आहे. फारतर फार कधी सिनेमाच्या सेटवर आरडओरडा करून लोकांचे थोडे अपमान केले आहेत. एका मैत्रिणीचा नवरा शाकाहारी होता त्याला मासे खायची आवड निर्माण केली आहे. एक बिचारा मित्र फार लहानपणी लग्न करून पस्तीशिलाच कंटाळला होता , त्याची काही हुशार तरतरीत आणि देखण्या मुलींशी ओळख करून दिली आहे. पण कुणी माझा अगदी बदला घ्यावा असे हातून अजून काही घडलेले नाही.
अमरीश पुरी बिचारे ! किती बायकांकडून किती मार खाऊन घ्यावा त्या माणसाने ? आमचे सर्वच्या सर्व बालपण अमरीश पुरी, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर ह्यांची अनेक स्त्री पुरुषांकडून शेवटी होणारी पिटाई बघण्यात गेले. मला अमरापूरकर प्रत्यक्ष भेटले तेव्हा सेटवर पहिले काही दिवस त्यांचा उगाच राग येत असे. पण तो व्यर्थ होता. कारण तो राग त्यांचे लहानपणीचे सिनेमे पाहून मनात तयार झाला होता. प्रत्यक्षात किती सौम्य आणि शांत माणूस. त्यांचा बदला कुणी कशाला घ्यावा ?

आपल्या घरातील आया माझ्यासारख्या घरबैठ्या मुलाला नेहमी, ‘मी लग्न करून घरात आले तेव्हा मला घरात कसे सगळ्यांनी वाईट वागवले’’ ह्याच्या गोष्टी सांगत बसतात. कुणीही सूज्ञ बालक आपल्या आईने सांगितलेल्या तिच्यावर झालेल्या अन्यायाच्या कहाण्यांमधून सुटका करून घेऊ शकत नाही. कारण भारतीय बायका ह्या नेहमी अन्यायाचे राजकारण करून सहानभूती मिळवून सत्ता गाजवण्यात प्रसिद्ध आहेत. कुटुंब पातळीवर त्याची सुरुवात होत असते. मी होते म्हणून ह्या सगळ्यांना सहन केले. एखादी असती तर केव्हाच हे घर सोडून पळून गेली असती. माणसे ओळखायला शिक . आपल्या घराण्यात हे तात्या तसे आहेत. हे अण्णा असे आहेत. हि बाबी आतल्या गाठीची आहे. तो बाबा नुसते गोड बोलतो. मराठी सिरीयलच्या लेखकांना लाज वाटेल आणि त्यांची मन शरमेने खाली जायील इतके सुंदर एपिसोड भारतातल्या गृहिणी घरात बसून तयार करत असतात. ह्याचा मूळ उद्देश हा सर्व पोटच्या पोरांना नवऱ्याच्या विरोधात नेऊन आपल्या बाजूने वळवणे हाच असतो. पितृसत्ताक पद्धतीविरुद्ध बायका मुलांना वापरून घेऊन बंड करीत असतात. अश्या बायकांकडून गृहिणी असण्याचे इतके मोठे भांडवल केले जाते कि विचारता सोय नाही.
‘आपली आई आपल्या वडिलांपेक्षा जास्त चांगली आहे. तिने खूप सहन केले आहे. वडील एक तर अन्यायी आहेत किंवा लेचेपेचे आहेत’ अशी शिकवण खूप अनावश्यक आणि सतत बडबड करून भारतीय आया आपल्या मुलांना देत राहतात. आमच्या पिढीत बहुसंख्य बायका घरी बसून घरकाम करीत असत. घराबाहेर पडून कष्ट करून कामात यश मिळवणाऱ्या बायकांविषयी त्यांच्या मनात असूया तयार होत असे आणि मग त्यातून गृहिणी असण्याचे आणि घरकामाला प्रतिष्ठा मिळण्याचे फार मोठे भांडवल करणे भारतातल्या बायकांनी सुरु केले. मराठी साहित्यातील अनेक बायकांची आत्मचरित्रे आपण वाचली तर ती स्वतःविषयी कमी आणि नवऱ्याविषयी जास्त अशी असतात.
मला लहानपणी कोणताही हिंदी सिनेमा पाहून घरी आलो कि अशी भीती वाटायची कि कोणत्याही क्षणी आई उठेल आणि आपल्याला काका, मामा, आजी, आजोबा, शेजारच्या ठमाकाकू, मागच्या अंगणातील शकूमावशी ह्यांचे बदले घ्यावे लावेल. ‘तुझे अपने मा कि सौगंध’ असे काहीसे म्हणून. मग मी काय करणार ? मला व्यायाम करायला हवा. घोडेस्वारी , बंदुका चालवायला शिकायला हवे. चालत्या ट्रेन वर उभे राहून पुणे सोडून बदला घ्यायला आईच्या माहेरी जाता यायला हवे.
कॉलेजात , उमेदवारीच्या दिवसात आमच्या सोबत काम करणाऱ्या तरुण मुलीसुद्धा मी हे करीन आणि मी ते करीन असे म्हणणाऱ्या असल्या तरी संध्याकाळी सात नंतर त्यांना घरी सोडायला जावे लागत असे. त्यांना प्रवासाला गेल्यावर आपापले समान उचलता येत नसे. वय वाढले तरी साधे ड्रायविंग करता येत नसे. त्या मुली समाज मला हे करू देत नाही. समाज मला ते करू देत नाही असे बोलत बसायच्या. कधीतरी कोणत्यातरी कोपर्यातल्या नाटकाच्या स्पर्धेत एखाधी ढाल मिळाली कि आपण अभिनक्षेत्रातील राणी असल्यासारख्या वागायच्या . खूप बडबड करणाऱ्या आणि मला हे करायचे आहे मला ते करायचे आहे असे बोलणाऱ्या त्या सर्व मुली श्रीमंत आणि कर्तुत्ववान मुलांशी लग्न करून साडी पदरात गुंडाळल्या गेल्या किंवा सरळ अमेरिकेला पसार झाल्या. गप बसून काम करणाऱ्या आणि नाव कमावणारया हुशार मुली मी आमचे पूर्वेचे ऑक्सफर्ड गाव सोडून मुंबईला येईपर्यंत पहिल्या नव्हत्या. अश्या सर्व मुली आपापल्या घरात बसून दुस्वासाची भावना निर्माण करून समाजात आणि कुटुंबात मोठ्या प्रमाणावर चुकीचे राजकारण करताना आपल्याला दिसतात. मराठी सिरीयल चालतात ते ह्या सगळ्या रिकाम्या बायकांमुळे.
घरकाम आणि कुटुंब चालवणे हि फार सुंदर गोष्ट आहे आणि ती महत्वाची आहे पण त्याचे प्रमाणाबाहेर भांडवल करण्याइतकी ती अवघड नाही. गृहिणी बनून घर चालवणे हा आपला वैयक्तिक निर्णय असतो . त्यासाठी सतत दुसर्याला जबाबदार धरून सर्वांच्या मनात आपल्याविषयी सहानुभूती तयार करण्याचे मूर्खासारखे प्रयत्न करणे भारतीय गृहिणींनी थांबवायला हवे. आईच्या हातचा स्वयपाक, तिची चव , तिने भोगलेले कष्ट ह्या गोष्टी प्रमाणाबाहेर मोठ्या करून घरात त्याचे banner कारून लावायची गरज नसते. नवरा हा नेहमी दुष्ट नसतो आणि लेचापेचा नसतो. घरातल्या लहान मुलांसमोर चुकीची बडबड करणे बंद केले तर ती मुले आपल्या कौटुंबिक राजकारणातून मोकळी होवून बाहेर पडून काहीतरी चांगले काम करतील ह्याची काळजी पालक म्हणून दुपारचा वेळ रिकामा असणाऱ्या बायकांनी घ्यायला हवी.
आणि जो कष्ट करून घरासाठी आणि कुटुंबासाठी पैसा कमावतो आणि घर कष्टाने वर आणतो किंवा आणते त्या स्त्रीची किंवा पुरुषाची किंमत घरी बसून वरणभात करून आणि जुन्या कापडाचे पडदे शिवून दुपारी tv बघणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त असणार ह्याचे साधे आणि व्यावहारिक ज्ञान भारतीय गृहिणीला यायला हवे. खरे तर फार पूर्वीच यायला हवे होते. पण उशिरा आले तरी बिघडणार नाही. आपण निरुपा रॉय होणे आतातरी बंद करूया . कारण काळ बदलला आहे.

img_1655

अपेयपान ४५

मी नुकताच नव्या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी मराठी TV वरील एका प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमाचे शूटिंग पूर्ण करून पहाटे चार वाजता घरी परतलो आहे , समोर ठेवलेले एक पुस्तक मला खुणावते आहे. मी दमलो आहे . पुस्तक लहान मूल होवून थोडा वेळ तरी खेळायला ये असे म्हणते. पण मला खरंच शक्य होत नाही. चित्रपट बनवणे आणि तो लोकांपर्यंत पोचवणे ह्या दोन अतिशय स्वतंत्र गोष्टी आहेत. पहिली मला येते. दुसरी मी माझ्या टीम कडून शिकतो. मी त्यांचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकतो. दिवसातून दहा ठिकाणी मुलखती देतो. माझ्या कलाकारांसोबत अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतो. निवडणुकीच्या काळात राजकारणी लोकांचे ज्याप्रमाणे वेगवान आणि भन्नाट आयुष्य असते तसेच आयुष्य सिनेमा बनवणाऱ्या माणसांचे तो प्रदर्शित होण्याच्या काळात असते.
ह्या काळात वाचन संपूर्णपणे थांबते. एरवी मी सेटवर काम करत असलो तरी कधीही वाचनात खंड पडत नाही. शूटिंगच्या लोकेशनवर माझी लायब्ररी माझ्यासोबत गाडीतून प्रवास करत असते. दिवसभराचे चित्रीकरण संपले कि मी माझ्या खोलीत जातो. दुसऱ्या दिवशीची कामे माझ्या टीमला आखून देतो आणि पुस्तक हातात घेऊन त्यात शिरतो. माझे दिवसभराचे ताणताणाव संपून जातात.
पण चित्रपटाच्या रिलीज ची तारीख जवळ आली कि एक भरभक्कम कॅलेंडर हातात पडते . त्यात तुमचा संपूर्ण चार आठवड्याचा प्रवास मुलाखती , कार्यक्रम ह्यांचा लेखाजोखा असतो. ह्या काळात वाचन संपूर्ण थांबते.
पुस्तके आपली वाट पाहतात . आपणही त्यांची. काही पुस्तके अर्धवट वाचून झालेली पुन्हा जवळीक करू पाहतात. पुस्तकाला आपलेसे केले आणि त्यात रममाण झाले कि मनाला एक ठेहराव मिळतो. सिनेमा बघताना एक प्रेक्षक म्हणून माझे मन उत्साहाने उडत असते पण पुस्तक वाचताना मात्र ते कोणत्यातरी खिडकीपाशी जाऊन विसावते. तिथे माझ्यासाठी ठेवलेले पाणी पिते आणि खिडकीच्या काचेतून आतल्या भरलेल्या घरात ते पाहत बसते. त्या पुस्तकाने निर्माण केलेल्या घरात .
एकदा बनवलेला चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवून मी घरी परतलो कि एक शांत पोकळी मनामध्ये तयार झालेली असते. एखाद्या मोटारीच्या पत्र्याला पोचा पडावा तशी पोकळी. एक चित्रपट बनवायला एक संपूर्ण वर्ष लागते. तुमचे मन त्या कथेने आणि चित्रपटाच्या अनुभवाने ओतर्प्रोत भरलेले असते. वेगवान कामाची आणि भोवतालच्या गडबड गर्दीची सवय झालेली असते. चित्रपट रिलीज झाला कि सगळे वादळ शुक्रवारी शमून जाते आणि अचानक तुम्ही अश्या घरात परतता जिथे अनेक पुस्तके तुमची अधिरतेने वाट पहात असतात.

माझी सुट्टीची आणि निवांतपणाची कल्पना हि दिवसभर वाचत बसणे आणि भरपूर पोहणे हि आहे. मी बनवलेला नवा चित्रपट पूर्ण करून गेले तीन दिवस मी फक्त ह्या दोन गोष्टी करत बसलो आहे. हातात यान्न मार्टेल ह्या कॅनडियन लेखकाची ‘सेल्फ’ हि कादंबरी घेऊन बसलो आहे. वाचून डोळे दुखले कि भरपूर पोहायचे आणि मग पुन्हा वाचत बसायचे.
हिवाळा जवळ येत आहे. वर्ष संपताना भारतात ह्या ऋतुमुळे अतिशय उत्साही आणि शांत वाटते. मी खूप सारे उत्तम साबण आणि वेगवेगळ्या देशातून आणलेल्या उत्तम विंटर क्रीम्स चा साठा करत असतो . गडद सुवासाचे परफ्युम्स केवळ ह्या ऋतूमध्ये वापरण्यासाठी राखून ठेवत असतो. आणि डांबराच्या गोळ्यांचा हलकासा वास येणारे स्वेटर्स कपाटातून काढून ठेवतो. हिवाळा येताना , वर्ष संपताना आणि त्याआधी मी एका वर्षाने पुन्हा मोठा होताना मनावर एका हलक्या melancholy ची साय पसरते. कामामधून मिळालेली सुट्टी त्याला फार पोषक असते. सगळ्या दिवसांचा वेग हळूहळू शिथिल होवू लागतो. आणि माझा असा गुप्त अंदाज आहे कि भारतीय माणसे हिवाळ्यात एकमेकांशी जास्त चांगली वागू लागतात. थोडी जास्त हसतात. अनोळखी लोकांकडे पाहून good morning म्हणतात.

इथे चौकाचौकात
आणि कोपऱ्याकोपऱ्यावर
उघडी पुस्तके आहेत
सहज पाहून हसलं , कि बोलायला लागतात
त्यांची सगळी स्वप्न , दु:ख , उलाढाली
सगळे चढ उतार
अगदी मोकळेपणाने वाचू देतात
हसतात , हसवतात
आपण आपलं पुस्तक
तितक्याच मोकळेपणानं उघडलं
तर ते स्वतःचं एक पान
अलगद काढून
आपल्या पुस्तकात रोवतात
किती सुंदर भेसळ आहे हि
कथानकांची .
तेजस मोडक ह्या तरुण कवीची हि कविता ह्या ऋतुमध्ये आजूबाजूला खरा आकार घेऊ लागते. मला येऊ घातलेल्या हिवाळ्यातील शहरांची दृश्यात्मकता आवडते. शहरातील कर्कश्य आवाज कमी होतात. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम नसल्याने शहरांना एक माणूसपण येते. माणसाच्या मनातील प्रखरपणा ह्या काळात निसर्ग काढून घेतो.
ह्या ऋतूमध्ये एकटेपणा सुखावतो. तो विचार करायला , स्वतःवर येणारी नवी त्वचा शांतपणे बघायला मदत करतो. मी हिवाळ्यात अनेक नवे वेगळे पदार्थ शिकतो. वेगळ्या प्रकारचे आणि मला सवय नसलेले किंवा मी ह्यापूर्वी ज्याची आवड जोपासली नव्हती असे निराळे संगीत ऐकतो. माझ्या मनाची दारे ह्या काळात नव्या अनुभवांसाठी हळूहळू उघडी होत जातात. नकळत आतल्याआत नवे प्रवाह जन्म घेताना जाणवू लागते. नव्या कथा सुचतात.
रुमी ह्या कवीची एक मला आवडणारी कविता

We have a huge barrel of wine
But no cups
That’s fine with us
Every morning we glow
And in the evening we glow again
They say there is no future for us
They are right
Which is fine with us.

पुढील दोन महिन्याचा काळ हा भारतातील उत्तमोत्तम चित्रपट महोत्सवांचा काळ. गोवा , केरळ पुणे मुंबई इथे भरणाऱ्या महोत्सवामध्ये देशभरातील आणि परदेशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा आनंद घेता येतो.. तसेच ह्या काळात बनारस, राजस्थान आसाम महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई इथे अप्रतिम संगीत महोत्सव होतात. भारतीय शास्त्रीय संगीतापासून ते EDM पर्यंत अनेक प्रकारचे ताजे संगीत ह्या महोत्सवामधून आपल्याला ऐकायला मिळते.
शिवाय जयपूर सारख्या ठिकाणी होणारे अनेक साहित्य महोत्सव आता सुरु होतील. पुस्तकापरीस कपडेच भारी अशी विंग्रजी साहित्यातील अनेक दिग्गजे तिथे तोंड वाकडे करून अनेक अस्तित्वात नसलेल्या विषयांवर भरपूर पैसे खर्च करून चर्चेला येतात. मराठीतही तेच घडते. ज्याला जिथे जाऊन रिकामे , वेळ पुष्कळ असलेले लेखक आणि विचारवंत पहायचे असतील त्याने आपपल्या ऐपतीप्रमाणे जाऊन ते पहावे. मजा येते. मी माझे पुस्तक विंग्रजीत प्रसिद्ध झाले तेव्हा गेलो होतो. मराठी साहित्य संमेलनातले डायनोसॉर जाऊन बघावेत का हा मी या वर्षी विचार करतोय. ह्या वर्षी ज्युरासिक पार्क लावायचे आमंत्रण कोणत्या शहरात आहे हे पाहायला हवे.
घरी शांत बसून वाचत राहावे कि विना आखणी विना परवाना इकडून तिकडे भटकत बसावे हाच काय तो मोठा यक्षप्रश्न ह्या सुंदर काळात भारतात मनात उभा राहतो.
काहीही करा पण ह्या हिवाळ्यात अनोळखी वागा. करून तर पहा. घरच्यांना कोड्यात पाडलेत तरी हरकत नाही. कुणी वेडा म्हणाले तरी फरक पडत नाही.

One thought on “अपेयपान . लोकमतमधील लेखमाला भाग ४१ ते ४५”

  1. I am noe of those privileged mid 70s gen… i can relate every bit of ‘apeypan’ … right form those rebellious mixed feelings to reading hobbit. As well as impact of teachers in marathi school in those days 😍

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s