अपेयपान . लोकमत मधील लेखमाला . भाग ४६ ते ४९ ( शेवट )

अपेयपान ४६

आपला चित्रपट तयार होवून प्रसिद्ध होणार असतो त्याआधी त्या चित्रपटाशी संबंधित एक तापदायक दिवस  चित्रपटाच्या सर्वच्या सर्व टीम ला भोगावा लागतो तो म्हणजे सेन्सॉर चा दिवस. चित्रपटाला प्रसिद्धीपूर्व जे सर्टिफिकेट मिळवावे लागते तो मिळण्यासाठी तुमचा चित्रपट एका कमिटीला दाखवावा लागतो. ती कमिटी सरकारी वारा ज्या दिशेला वाहत असतो त्या हुकुमानुसार त्या त्या वर्षी चित्रपटांच्या परीक्षणाचे आडाखे लावत आपल्या चित्रपटाची प्रतवारी करत बसलेली असते.

पूर्वी आमच्या पुण्यात मला असे एकदोन लोक माहिती होते जे अश्या कमिटीवर काम करीत. छोट्या गावात राहताना लहान वयात आपल्यात एक भाबडेपणा असतो . मला ते लोक फार महत्वाचे वाटत असत. म्हणजे सिनेमा बनवण्याचे जे एक भरीव काम आपल्या देशात चालते त्यात ह्यांचा काहीतरी उपयुक्त हातभार असणार असे मला वाटे.

मी स्वतः चित्रपट बनवायला लागल्यावर असल्या सरकारी भातुकलीच्या कमिट्या भूषविणाऱ्या माणसांचे खरे पाणी कालानुरूप आपसूक तुमच्यासमोर येऊ लागते तसे माझे झालेच.

तिथे सेन्सॉर वर बसून हि माणसे स्वतःचे डोके चालवून देशावर कोणत्याही प्रकारचे उपकार वगरे करत नसतात. ती सगळी वय वाढलेली आणि आता बाकी कुठे काही जमत नसलेली हरलेली फार दयनीय माणसे असतात. आपल्या देशात सांस्कृतिक कामांच्या यादीत अक्षरश: काहीही येऊ शकते. तशी काही फुटकळ सांस्कृतिक कामे ह्या लोकांनी केलेली असतात. सरकारदरबारी पुचाट ओळखी असतात . काही लोकांच्या मदतीची सरकारला परतफेड करायची असते. काही लोकांचे मंत्रालयात मागे लागलेले लचांड व्यग्र अधिकाऱ्यांना सोडवायचे असते. अश्या सगळ्या जुन्यापान्या आणि बंद पडायला आलेल्या मेंदूंची सोय अश्या ठिकाणी लावून त्यांची कटकट सांस्कृतिक खाते संपवत असावे.

मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा चित्रपटाच्या सेन्सॉर च्या दिवशी ह्या कमिटीसमोर मान खाली घालून उभा राहिलो आहे त्या कोणत्याही वेळी एकही ताजातवाना , तरुण , सतर्क , बुद्धिमान किंवा सेन्सॉर ज्या कारणासाठी अस्तित्त्वात आहे त्याचे कालानुरूप भान असलेला माणूस मला भेटलेला नाही. मला सिनेमातल्या लोकांपेक्षा त्या कमिटीचीच  दर वेळी दया येत राहते. निर्मात्याच्या पैशाने त्या दिवशी त्या लोकांचे खाणेपिणे होते. सरकार त्यांना ट्रेन चा किंवा प्रवासाचा खर्च देते. ड्रायविंग लायसन्स काढायला बाहेर पूर्वी असायचे तसे  सेन्सॉर ऑफिसच्या बाहेर अनेक दलाल उभे असतात जे आत जाऊन निर्मात्याची हवी ती कामे पैसे फेकले कि करून देतात. सरकारी नियंत्रण आले कि दलाल जन्माला आला हे भारतात वेगळे सांगायला नको. उतारवयात माणसाला स्वतः चे अस्तित्व टिकवून ठेवायला किती लाचार आणि निर्बुद्ध कामे करावी लागतात ह्या विचाराने मला भरून येते. पूर्वी मला निर्माते आणि दिग्दर्शकांची काळजी वाटायची. आता मला असल्या निरर्थक सेन्सॉर कमिट्यावर बसणाऱ्या माणसांची वाटते. त्या माणसांची आणि त्या सेन्सॉर कमिटीच्या अध्यक्षांची सुद्धा. किती घाणेरडे बोलतात त्या माणसाविषयी सगळेजण. तिथे बसून हे सगळे सहन कारायला गेंड्याची कातडीच हवी.

ह्या कमिटीला अंधारात बसून अतिशय सुमार सिनेमे सतत पाहायला लागतात हि ह्या कामाची सर्वात दयनीय बाजू आहे. ह्या कामापेक्षा मी सन्मानाने माझ्या शहरातले रस्ते झाडेन. ते जास्त उपयुक्त काम आहे. शिवाय त्यात खरे कष्ट करून पैसे मिळवल्याचा आनंद आहे. सिनेमा  झाडून काय मिळणार ? दर दिवशी मुंबईतल्या अनेक छोट्या सिनेमाघरात बसून हे बुवे आणि बाया शेकडो सिनेमांचा फडशा पाडत असतात. किती भयंकर यातना होत असतील त्यांना ? हिंदी इंग्रजी आणि प्रादेशिक सिनेमांच्या कमिट्या वेगळ्या असतात. हिंदीचे एकवेळ ठीक आहे. पण मराठीत जे सिनेमाच्या नावाखाली रोज त्यांना बघायला लागत असेल ते पाहून त्या बायांना साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार करावा असे मला वाटते.

ह्या कमिट्यावर जास्त बायका असतात हे मी बारकाईने  संशोधन केले आहे. त्या बहुदा चित्रपट पाहताना स्वेटर विणत असाव्यात किंवा चक्क डुलकी काढत असाव्यात असे मला वाटत राहते. किंवा दार बंद करून सई ताम्हणकर किंवा धाकट्या सोनाली कुलकर्णीचे कपडे कुठून शिवून मिळतात ह्यावर चर्चा करीत असाव्यात. महत्वाची माहिती हि कि सेन्सोरचे गंभीर देशप्रेमी आणि समाज हितावह काम चालू असताना दरवाजे बंद असतात. पोटच्या  पोराचे ऑपरेशन चालू असताना आई बाप जसे सुतकी चेहऱ्याने बाहेर उभे असतात तसे निर्माता आणि दिग्दर्शक त्या बंद दाराबाहेर उभे राहून नखे खात असतात. बंधूभगिनींची फिल्म पाहून झाली कि ते त्यावर चर्चा कारतात. मग महाद्वार उघडते आणि दिग्दर्शकाला आत पाचारण केले जाते. मग त्याच्या पापांचा पाढा वाचून दाखवला जातो.

एका दिवशी तीन मराठी सिनेमे सलग पाहून दाखवा. तुमची काय अवस्था होयील? आपण एक अनावश्यक आणि जुनाट पद्धतीचे काम करत आहोत. सगळे जग आपल्यावर रागावून आहे. आपण एखादे उत्तान प्रणयदृश्य कापले तरी नंतर लहान लहान मुले ते internet वर बघणारच आहेत हि भावना ह्या माणसांना नसेल?  आपण निर्बुद्ध आणि निरर्थक काम करीत आहोत हे लहान मुलांना  सुद्धा कळते ह्या विचारांनी त्यांची झोप उडत नसेल ? असे असूनही देशासाठी आणि आपल्या भूमीतील संस्कार टिकवून ठेवावेत म्हणून ते सेन्सॉरबंधू आणि त्या सेन्सॉरभगिनी घरदार वाऱ्यावर सोडून अंधारात बसून समोरच्या पडद्यावर दिसणारे नको नको ते पाहत असतात. समाजाला विष पचवायला लागू नये म्हणून त्या विषाचे घोट आधी स्वतः घेत असतात. चुंबने , बलात्कार , शिव्या , हिंसा रक्त सिगरेटी ह्या सगळ्या अनुभवातून स्वतः जाऊन जिथे तीथे कात्री लावून मग ते विष विरहित चित्रपट आपल्यासमोर येतात. ते ह्या बंधू आणि भगिनींच्या कामामुळे. त्यांना माझा त्रीवारच काय पण शंभर वेळा  सलाम.

इतके विष पचवून हि माणसे घरी जाऊन कशी वागत असतील हा मला प्रश्न पडतो. ह्यांच्या घरची मुले porn कसे आणि कुठे पाहत असतील ? ह्यांच्या बायकांना हे बंधू चुंबन देत असतील का? ह्यांना प्रणय करून मुले जन्माला  घालताना खूप अपराधी आणि अगदी A वाटत असेल का ? आपल्या नवरा पावसात कधी बहकला तर ह्या सेन्सॉरभगिनी त्याला नीती नियमांची नियमावली दाखवत असतील का ? ‘’नाही हं मी नाही बाई पदर ढळू देणार. आमच्या नियमाच्या आड येते हो’’.

सेन्सॉर बंधू कधी रागावले तर आईमायीवरून शिव्या घालत असतील का ? मला एकदा ह्या सेन्सॉर बंधूंवर एक माहितीपट काढायचा आहे. मला त्यांची कुचंबणा आणि त्यांचे प्रश्न समाजासमोर मांडायचे आहेत. मला एक सेन्सॉर बंधू खाजगीत म्हणाले होते कि हल्ली ते बायकोने बनवलेल्या भाजीला सुद्धा A / U / UA अशी सर्टिफिकेट देतात. म्हणजे भाजी करताना तू समोर राहणाऱ्या बबन कडे पाहिलेस आणि कामुक हसलीस. आजची भाजी A. आमटी करताना तू शालीन हसत पदर सांभाळून फोडणी दिलीस. आजची आमटी U. आज धुणे धुताना तुझे साडीचोळी ओली झाली. आजचे धुणे A.

मी हैप्पी जर्नी हा सिनेमा केला तो खूप पूर्वी नाही. म्हणजे ह्याच दशकात केला. त्याचे सेन्सॉर स्क्रीनिंग संपल्यावर मला आत बोलावण्यात आले. आत गंभीर सुतकी चेहरे होते. त्यांनी सिनेमाला  U/ A प्रमाण पत्र द्यायचे ठरवले होते. म्हणजे अठरा वर्षाखालील मुले असतील तर त्यांनी एकटे न जाता आईवडिलासोबत जावे. मला त्यांचा निर्णय मान्यच होता. कारण एकतर अठरा वर्षाखालील मराठी मुले video गेम्स खेळतात. मराठी सिनेमा बघायला कोण मरायला जायील त्या वयात ? त्यामुळे मी हो म्हणालो. एक बाई मला म्हणाल्या कि तुमच्या सिनेमात बहिणीसाठी ब्रा आणायला भाऊ दुकानात जातो. असा प्रसंग तुम्ही का ठेवलात ? मी म्हणालो कि त्यात काय वाईट आहे ? बहिण जिवंत नाही . ती भूत आहे. तिला आपापले ब्रा आणायला दुकानात जाता  येत नाही म्हणून ती भावाला पाठवते. त्यावर त्या म्हणाल्या कि बरोबर आहे तुमचे , पण अहो न , हिंदी सिनेमात  ब्रा वगरे सगळे ठीक वाटते. पण मराठी संस्कृतीत ब्रा वगरे दाखवणे बसत नाही न , म्हणून मला आपले तुम्हाला सांगावेसे वाटले. आपल्या मराठी संस्कृतीचे आपणच रक्षण नको का करायला ?

मला त्या भगिनीचा गोड गोड पापा घेऊन तिला एक मराठी संत्र्याची गोळी देऊन राणीच्या बागेत वाघोबा बघायला पाठवावे असे वाटले.

 

IMG_2142

अपेयपान ४७

माझ्या कुटुंबातील काही माणसे अचानक आखाती देशांमध्ये काम करायला निघून गेली. मी एकदा शाळेतून  परत आलो तर मला असे कळले कि माझा  एक मामा आणि एका मावशीचे यजमान फॉरेन ला जाणार आहेत. म्हणजे कुठे असे मी विचारले तर आमच्या शेजारी राहणारी एक मुलगी म्हणाली कि फॉरेन नावाचा एक देश असतो. तो आपल्या भारत देशापासून लांब आहे.

तोपर्यंत मला इतिहासाच्या पुस्तकात असलेले देश माहित होते जिथे गोरे राहत. गोरे आणि यवनी. गोरे ग्रेट ब्रिटन  मध्ये राहत. यवनी राहत ते देश मला माहित नव्हते. पण जगात भारत सोडून सगळीकडे गोरे आणि यवनी लोक असतात असे मला वाटायचे ह्यापैकी फॉरेन हा देश कुठे आहे हे मला कळेना. मला सिलसिला हा सिनेमा त्यातले काही कळत नसूनही फार आवडला होता कारण त्या सुंदर बागांमधून फिरणारे अमिताभ आणि रेखा. माझी इतर भावंडे जया च्या बाजूची होती पण मी एकटा रेखा ची बाजू घेऊन भांडत असे. ती मला म्हणत कि जया चा त्याग वगरे. पण मला आपली रेखा पहिल्यापासूनच आवडायची. साडी घालून घरी रडत बसणाऱ्या बायका मला तेव्हाही आवडत नसत. त्या तसल्या फुलांच्या बागा कुठे आहेत असे विचारले असता आमच्या शेजारचे काका म्हणाले कि त्या तश्या बागा लंडनला आहेत. लंडन कुठे आहे ? ते इंग्लंड ला आहे. आणि इंग्लंड युरोपात आहे. आमच्या पेठेत आत्मविश्वासाची कमी कधीच नव्हती. पैशाची असेल पण आत्मसन्मान हजरजबाबीपणा आणि बाणा ह्यात आम्ही गोऱ्या लोकांपेक्षा मागे नव्हतो. त्यामुळे मुलांनी काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरे ताबडतोब देऊन टाकणे एव्हडे एकमेव काम आमच्या आजूबाजूचे लोक तत्परतेने करीत. माझा मामा आणि मावशीचे यजमान फॉरेनला जाणार म्हटल्यावर मला माझ्या मामीची आणि मावशीची काळजी वाटू लागली होती. याचे कारण सिलसिला हा मी नुकताच पाहिलेला सिनेमा आणि वाट्टेल त्या गोष्टी वाट्टेल तिथून गोळा करून आणून एकमेकांना जोडायची माझ्या मनाला लागलेली तिखट आंबट सवय. फार लहानपणीच मला ती लागली.

घरचे मामा  आणि काका आखाती देशात कष्टाची कामे करायला गेले आहेत फुलबागामधून हिंडायला नाही हे माझे मन मान्यच करत नव्हते. कारण मला फिक्शन फार आवडे. अगदी लहान असल्यापासून मनाला स्टोर्या लागत. मग मी त्यात माझे रंग भरत कुणालाही त्रास न देता घरात पुस्तक वाचत किंवा कागदावर काहीतर गिरगीटत पडून राही. मला फिल्मफेयर वाचता यायला लागेपर्यंत मीच माझे घरगुती फिल्मफेयर लिहित असे.

अचानक एकदा एका उन्हाळ्यात ते फॉरेन ला गेलेले काका आणि माझा मामा परत आले. येताना त्यांनी काय काय भन्नाट गोष्टी आणल्या होत्या. माझ्या भावंडांसाठी कपडे , एका  भावासाठी छोट्या कार ची मॉडेल , सुंदर दिसणारे डिनर सेट असे काय काय. तिथे मिळणारे चकाकते शर्टचे कापड. आणि भरपूर सुकामेवा. आणि सोबत दोन टू इन वन प्लेयर आणि पिशवीभरून कॅसेट्स . आणि सगळ्याच्या सगळ्या डिस्को च्या. त्या काळात हिंदी सिनेमात वाजत असलेले डिस्को.

१९८० च्या काळ आमच्या आजूबाजूला फक्त डिस्को वाजत होते. ते इतके गाजत होते कि आमच्या गावात सर्व प्रकारच्या पाश्चिमात्य सांगितला डिस्को असे नाव दिले जाई. ह्या डिस्को म्युझिकने माझे बालपण व्यापून टाकले होते.

मी मामाने आणलेल्या कॅसेट्स मधून नाझिया आणि झोएब हसन ह्या भावंडांच्या डिस्को पॉप संगीताच्या कॅसेट्स लाखभर वेळा ऐकल्या. मला तेव्हा इंग्लिश भाषा कळत नसे आणि त्यामुळे पाश्चिमात्य संगीतातली गाणी कळत नसत.अ आमच्या घराखाली रिगल नावाचे पुण्यातील प्रसिद्ध जुने इराणी हॉटेल होते. तिथे जुन्या पद्धतीचा ज्यूकबॉक्स होता ज्यावर नेहमी एल्विस प्रिस्लेची गाणी वाजत असत. मला ती गाणी बेफाम आवडायची. पण भाषा कळत नसे. नाझिया आणि झोएब हसन ने माझी हि उलझन सोडवली कारण ते उर्दूत गात होते. त्या बिट्स डिस्को च्या होत्या. मी खल्लास होवून त्यांच्या प्रेमात पडलो.

मग एखादा झंझावात यावा तसे डिस्कोने आम्हाला वेढून टाकले. ८० सालातले ते सुरुवातीचे डिस्को म्युझिक , ज्याला आता लोक खेळकरपणे चेष्टेने हसतात ते माझे आयुष्य बनून गेले होते. त्या संगीताने मला खूप उर्जा आणि रंग दिले आणि माझ्या मनातील कथांना ताल मिळाला. ऋषी कपूर आणि मिथुन चक्रवर्ती ह्या दोन नटांनी मग हिंदी सिनेमात ह्या संगीताचे सोने केले. त्या दहाही वर्षांमध्ये एकपेक्षा एक वाईट सिनेमे आले पण गाणी कधीच वाईट नव्हती.

सिनेमात ऋषी कपूर नाचताना त्याच्या पायाखालच्या जमिनीवर दिवा लागायचा. तो पाय ठेवेल तिथे दिवा लागे त्याने पाय उचलला कि दिवा बंद होई. मी पाचवीत होतो . मी ह्या जादूने भारावून गेलो होतो. मला त्या कर्ज सिनेमातले पुनर्जन्म वगरे कसले काही पडले नव्हते. मी गाणी बघायला भुकेला झालो होतो. अफाट उर्जेची डिस्को बीट ची गाणी.

आमचे शहर कोणत्याही नव्या ऊर्जेकडे नाराजीने बघणारे होते. जुने ते सोने म्हणत लवकर झोपणारे. आमच्या सारसबागेत रेखा असती तरी तिला घेऊन फिरता आले नसते . कारण बागेत मधेच मंदिर होते आणि ओळखीचे लोक सतत दर्शनाला येत. मनात एक आणि बाहेर एक अशी दोन शहरे वसायला माझी ह्या काळात सुरुवात झाली ज्याला ह्या सोप्या तालाच्या अफाट उर्जा देणाऱ्या डिस्को संगीताने लहानपणी खूप मदत केली.

हिंदी सिनेमात व्हाम्प नावाच्या उग्र बायका असत ज्या डिस्को वर नाचत. कमी कपडे घालत. मला त्या मुख्य नायिकांपेक्षा आवडू लागल्या. उषा उत्थप ह्या गायिकेच्या मी प्रेमात पडलो. खर्जातला आवाज. जेम्स बॉन्ड् च्या सिनेमातल्या गाण्यात असतो तसा.  मला गोड मंजुळ आवाज आणि त्या आवाजात गायलेली पादरट गाणी आवडेना झाली. नाझिया आणि झोएब ह्या भावंडांनी मला त्यानंतर माझ्या आयुष्यात येणाऱ्या मडोना साठी कपडे घालून भांग पाडून तयार केले. मला आता उंच रंगीत फुलांच्या बागेत फिरायचे नव्हते. मला त्या दिवे लागणाऱ्या आणि विझणारया डान्स फ्लोअर वर माझ्या आयुष्याची गोष्ट लोकांना ओरडून सांगत रंपाट नाचायचे होते.

नाझिया हसन अचानक गेली. आजारी होती. खूप तरुणपणी गाता गाता गेली. आणि मग ते भाऊ बहिण एकत्र गायचे ते गाणे संपले. दोन वर्षांपूर्वी मी एका मैत्रिणीसोबत मुबईत जेवत असताना तिला झोएबचा लंडनहून फोन आला . त्याला नाझिया च्या आयुष्यावर सिनेमा बनवायचा आहे आणि तो मुंबईत येणार होता. मी तिच्या हातातून फोन खेचून घेतला आणि त्याच्याशी बोललो तेव्हा मला मी कोपऱ्यात सारून ठेवलेलं माझं अख्खं च्या अख्खं बालपण पुन्हा सापडलं. अचानक  झाडताना कॉटखाली सापडाव तसं.

मी शोधत निघालो तशी दिवे लागणारी आणि विझणारी जमीन मला आयुष्यात कधी सापडली नाही.अजूनतरी नाही. आता ह्यापुढे सापडेल असे वाटत नाही कारण आपण स्वतः खूप सिनेमे  बनवले कि मग सिनेमात असणाऱ्या जगाविषयीचा आपला भाबडेपणा कमी होत जातो. कुणाच्याही खांद्यावर मान न टाकता किंवा कुणालाही कुशीत न घेता मी त्या फॉरेनच्या  उंच रंगीत फुलांच्या बागांमधून एकटा सिगरेटी ओढत भरपूर फिरलो. त्या बागा लंडनला नाहीत हे परत येऊन सांगायला माझे जुने शहर उरले नाही. कोणत्याही बॉम्बस्फोटाशिवायच ते शहर स्वतः च्या कर्मानेच जुनाट बनून  काळाच्या उदरात विरून गेले. माझ्या मामाने काकांनी आखाती देशात जाऊन राबराब राबून केलेले कष्ट मला लक्षात आले. आपल्या कुटुंबाची धाव आणि वेग समजून घेता आला आणि फार बरे वाटले कि ह्या सगळ्यात आपल्याला आपल्या कुटुंबाने हवे ते संगीत ऐकू दिले , जोरात वाजवू दिले आणि खोल्यांची दारे बंद करून जोरात गाणी लावून आत नाचताना कधी माझ्या मोकळ्या साध्या माणसांनी उगाच दार वाजवले नाही .

 

IMG_1893

अपेयपान ४८

अतिशय लहानपणापासून ज्या एका तात्विक मूल्याची पुण्यासारख्या शांत संपन्न आणि सुशिक्षित शहरात राहून मला सवय आणि गोडी लागली ते मूल्य म्हणजे खाजगीपणा. ज्याला इंग्रजीत Privacy ( प्रायव्हसी ) असे म्हणतात .

माझ्या आयुष्यात मी माझा खाजगीपणा जपण्याला आवर्जून महत्व देत गेलो ज्यामुळे माझी आवडती कामे मला हवी  तशी करता आली आणि माझे आयुष्य नक्की मला हवे आहे तसेच  बांधता आले.

खाजगीपणा हा भौतिक आणि मानसिक दोन्ही बाबतीतला. मी खूपच लहान असताना मला हे जाणवत होते कि मला गर्दी आणि गोंगाटाचा कंटाळा आहे. असा गोंगाट जो घरातील माणसे अनावश्यक कारणे  काढून सतत एकमेकांसमोर येऊन करतात. मला जाणीव यायला लागली तेव्हापासून सामूहिक जगण्याचा तीटकारा येऊ लागला होता . मी एकांतप्रिय मुलगा होतो . न सांगता अचानक उगवणारे पाहुणे , उगाच धार्मिक करणे काढून जेवाखायला घरी बोलावलेली त्याच त्याच माणसांची गर्दी , रस्त्यावरची गर्दी , अनावश्यक प्रश्न विचारून आपल्याला गोंधळात टाकणारे शेजारी पाजारी ह्या सगळ्यांपासून मला सतत लांब जावे वाटत असे. मी माणूसघाणा कधीही नव्हतो. उलट नेहमीच योग्य माणसांच्या सहवासाला भुकेलाच राहिलो . पण गर्दीपासून आणि कुणालाही उत्तर देण्याच्या बांधिलकीपासून पळत राहिलो.

माझे सुदैव हे कि आमचे घर पुरेसे मोठे होते आणि मी दहा वर्षाचा असताना मला माझी स्वतंत्र खोली मिळाली . मी स्केचपेनने त्या खोलीच्या भिंतीवर माझे नाव लिहिले होते. मी तेव्हापासून आग्रहाने माझे राहण्याचे आणि काम करण्याचे खाजगीपण जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आलो.

माझी हि वेगळे राहण्याची आणि गर्दीत न मिसळण्याची आवड अनेक लोकांना कळत नसे. मला अनेकदा अजूनही घरामध्ये आणि कुटुंबात ह्या सवयीबद्दल फारसे बरे बोलले जात नाही पण मी कधीच ह्या गोष्टीची फिकीर न करणारा माणूस असल्याने माझे आयुष्य बरेच शांततेत आणि माझ्या आवडत्या कामात गेले. लिहिण्याच्या आणि कथा निर्माण  करत राहण्याच्या माझ्या कामाला ह्या एकांताची आणि खाजगीपणाची फार मदत झाली. मी नुसता एकटा काही न करता बसून असलो तरी “एकटा बसून काय विचार करत बसला आहेस?” असले फालतू कौटुंबिक प्रश्न मला कधी कुणी विचारले नाहीत. मला माझ्या कुटुंबाने लहानपणीपासून हवे तसे असण्याची मुभा दिली. म्हणजे हवे तेव्हा आनंदी आणि हवे तेव्हा दुखी राहू दिले. त्यात ढवळाढवळ केली नाही हे त्यांनी माझ्यावर केलेले मोठे उपकारच म्हणायला हवेत. कारण भारतीय घरांमध्ये तरुण मुलांना साधे रडण्याचीसुद्धा सोय नसते. माझे मला कळू लागल्यावर मला आवडतील ती माणसे मी शांतपणे जोडली , जोपासली आणि ज्या माणसामध्ये जायचा कंटाळा येतो त्यांच्यात केवळ उपचार म्हणून कधीही गेलो नाही. कुटुंबाचे आणि समाजाचे कोणतेही बंधन मी ह्या बाबतील पाळले नाही.

शेजारी आणि नातेवाईक ह्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी लहान असल्यापासून खरी उत्तरे द्यायचे ठरवले असते तर ते सगळे बेशुद्ध पडून त्यांच्या तोंडाला फेस आला असता इतके चित्रविचित्र विचार आणि मते माझ्या मनात खूप लहानपणीपासून संचार करीत होती. मी ती खुबीने लपवली. लिखाणात उतरवली आणि आमच्या अनेक मट्ठ आणि पारंपारिक नातेवाईकांना ह्रिदयाचे झटके येण्यापासून वाचवले. मी  माझ्या आतमध्ये असलेल्या सर्व वैचित्र्याची  खाजगीत राहून कागदावर चित्रे काढली. घरात खूप गर्दी झाली कि मी अचानक माझ्या खोलीत येऊन दर लावून शांतपणे पाच मिनिटे बसत असे आणि मग पुन्हा बाहेर जात असे.

माझ्या घरीदारी शेजारीपाजारी  आणि भावंडांना मला आवडतात त्या गोष्टी कधीही आवडल्या नाहीत. तो सर्व वेगळी माणसे आहेत. हे मला कळू लागले होते. क्रिकेट , लग्ने आणि धार्मिक कार्यक्रम हे विषय सोडता आमच्या घराण्यात अजूनही कुणी इतर कोणत्याही गोष्टीवर बोलत नाही. त्यामुळे मला माझी वाट शोधून काढणे क्रमप्राप्त होते. मला लहानपणी स्वतंत्र खोली देऊन माझ्या आईवडिलांनी माझी फार चांगली बाजू घेतली आणि मला मदत केली. शिवाय मला खोलीला आतून कडी लावायची नेहमी मुभा होती. माझे कपाट उघडे असले तरी विचारल्याशिवाय कधीही माझ्या घरातल्या कुणीही ते उघडून पहिले नाही. स्वतंत्र राहण्याचे आणि आपला तसेच इतरांचा खाजगीपणा जपण्याचे शिक्षण माझ्या घरात मला मिळाले. हि गोष्ट त्यावेळी एका दहा बारा वर्षाच्या मुलाच्या बाबतीत होणे मराठी निम्नमध्यमवर्गीय घरात नवीन असल्याने आमची अनेक वेळा खिल्ली उडवली जात असे पण मी कधीच सदाशिवपेठी वातावरणातील भोचक आणि तर्कट माणसांना बधलो नसल्याने आम्ही सगळे लोकांचे बोलणे इकडून ऐकून तिकडून सोडून देत असू.

खाजगीपणा हे साधे आणि आवश्यक मूल्य लहान मुलांच्या काय पण अजूनही आजूबाजूच्या मोठ्या माणसांच्या बाबतीतही भारतीय कुटुंबांमध्ये पाळले जात नाही. मला ह्याचे फार वाईट वाटते. जुन्या ग्रामीण संस्कृतीत ह्या खाजगीपणाची सवय माणसांना नव्हती. पण अनेक वर्षे शहरात राहून , शहरात जन्मून आणि मोठे होवूनही आपल्याला माणसाचा खाजगीपणा जपण्याची सवय नसते.

आपल्या समाजात माणसे सतत सर्वत्र एकमेकांसमोर आणि एकमेकांना बांधील राहतात. खोटे उपचार म्हणून घोळके करून जगतात. कुणी कुणाला एकटे सोडत नाही. अनेक नवराबायको तर सिनेमाला आणि प्रवासाला सुद्धा एकमेकांशिवाय जात नाहीत. आपल्या  मनातल्या जगावेगळ्या आतल्या इच्छा चोरून , लपवून अपराधीपणे पूर्ण करतात. लोक आपल्याला पाहतील , लोक आपल्याला काय म्हणतील ह्या भीतीने साधे आवडते कपडेसुद्धा घालायची मुभा अनेक माणसांना नसते. भौतिक आणि सामाजिक पातळीवर खाजगीपणा पाळायची सवय नसली कि आपण माणसाचा मानसिक खाजगीपणासुद्धा पाळायला शिकत नाही. आपल्या अनेक मोठ्या शहरांमधील राहणारी माणसेसुद्धा  हि ह्या बाबतीत अगदी खेडूत असतात. दुसऱ्या माणसांच्या आयुष्यात नको  तेव्हढे लक्ष देणे. आपली पारंपारिक जुनी मूल्यव्यवस्था नव्या पिढीवर लादणे , त्यांनी काय शिकावे , काय खावे , कसे जगावे, कुणाशी लग्न करावे ह्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करणे हा सर्व खाजगीपणा जपण्याचे शिक्षण आपल्याला नसण्याचा भाग आहे. मी अनेक वेळा माणसांशी ह्यावर बोलायला जातो तेव्हा माणसे उसळून मला भारतीय कुटुंबव्यवस्था , माणसे एकमेकांशी जोडलेली असणे , वेळेला एकमेकांच्या मदतीला जाणे असली वायफळ लेक्चर देत बसतात. माणसांना एकमेकांवर प्रेम करायला आणि एकमेकांना वेळ पडली तर मदत करायला जगात कोणताही समाज थांबवत नाही. पण हे करण्यासाठी सगळ्यांनी सतत एकमेकांच्या पायात पाय अडकवून एकमेकांना अपंग करण्याची गरज नसते. भारतीय कुटुंबव्यवस्था हि अतिशय लवचिक आणि काळासोबत बदलणारी ताकदवान गोष्ट आहे. कुटुंबव्यवस्थेचा अर्थ कुटुंबाचा तुरुंग असा होत नाही.

माझ्या आजूबाजूची अनेक मराठी तरुण मुले बेचव आणि वयोवृद्ध झाल्यासारखी जगतात कारण ते खाजगीपणा जपायला शिकलेले नसतात. सतत आपण कुणालातरी उत्तर द्यायला बांधील आहोत ह्या भूमिकेत राहिल्याने हि मुले संकोचून राहतात. साधे स्वतःच्या करियरचे निर्णय त्यांनी कुटुंबातल्या लोकांचा विचार करून घेतलेले असतात. हि मुले हवे तेव्हा स्थलांतर करू शकत नाहीत, मोकळे प्रवास करू शकत नाहीत ह्याचे कारण त्यांचा स्वतःचा खाजगी वेळ आणि त्यांचे खाजगी आयुष्य ह्या गोष्टी त्यांच्या आईवडिलांनी ओळखलेल्या नसतात. तसे करणे काहीतरी अमेरिकन आणि चुकीचे आहे असा त्यांचा भ्रम झालेला असतो. त्यापेक्षा इतर भारतीय समाज हे मोकळे आणि स्थलांतरप्रिय असतात. त्यांच्याकडची मुले शिकायच्या किंवा नोकरी करायच्या निमित्ताने पटापट घरे सोडून मोकळी होतात आणि बाहेर फेकली जातात.

आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीला दिवसातला काही वेळ सुटा आणि एकट्याचा द्यायला येता हवा. कुणालाही घरामध्ये संपूर्ण एकटे असण्याची मुभा असायला हवी. अगदी लहानपणीपासून हि सवय असायला हवी. कुणीही कुणाच्याही निर्णयात एका मर्यादेपलीकडे हस्तक्षेप करू नये. माणसे मदत हवी असेल तेव्हा आवर्जून मागतात. कुटुंबात राहणे म्हणजे सतत दारे उघडी ठेवून सगळ्यांनी एकमेकांसमोर कपडे बदलणे हा होत नाही.

 

FullSizeRender (2)

अपेयपान ४९

चालू असलेले वर्ष संपताना मी लांबवर केरळमध्ये आहे. त्रिवेन्द्रम इथे चालू असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पाहायला आलो आहे. हा भारतातील अतिशय सुनियोजित असा चित्रपट महोत्सव . इथे चित्रपटांची निवड उत्तम असते. जगभरात ह्या वर्षी बनलेले चांगले सर्व चित्रपट इथे पाहता येतात त्याचप्रमाणे चांगल्या दिग्दर्शकांच्या कामांचे retrospectives इथे भरवले जातात. दरवर्षी चित्रपट क्षेत्रातील मोठ्या तज्ञांचे इथे चांगले व्याख्यान असते. मुंबई गोवा इथे भरणाऱ्या मोठ्या दिखावेबाज आणि कुणी कसले कपडे घातले आहेत ह्याची चर्चा करणाऱ्या ,हिंदी सिनेमाच्या तारकांवर अवलंबून असलेल्या महोत्सावांपेक्षा इथे येणे मला वर्षानुवर्षे फार आवडते. अनेक वेळा मी बनवलेली फिल्म इथे असते आणि ती नसली तरी मी प्रेक्षक म्हणून इथे येऊन जगभरातील चित्रपट बघणे पसंत करतो.

इथे चित्रपटावर प्रेम करणारा सामान्य माणूस आहे. हजारो विद्यार्थी , कामगार , सरकारी कर्मचारी , शिक्षक ह्या काळात संपूर्ण सुट्टी घेऊन इथे महोत्सवात चित्रपट पाहतात. त्यावर चर्चा करतात. करमणूक ह्या एकाच गोष्टीच्या पलीकडे जाऊन जगभरातील चांगल्या सिनेमाचा आस्वाद घेणारा सामान्य माणूस इथे आपल्याला सापडतो. गरीब श्रीमंत असले भेदभाव नसतात. अनेक वेळा मी ज्या रिक्षाने चित्रपट गृहात आलो त्या रिक्षाचा चालक माझ्यासमोरच्या रांगेत बसून चित्रपट पाहताना मला आढळला आहे. इथे चित्रपटाची निवड बारकाईने होते. त्यामुळे जगातील अनेक देशांमधून चित्रपट निवडणारे तज्ञ इथे हजेरी लावतात. भारतातील ह्या वर्षी बनलेल्या सर्वोत्तम चित्रपटांचा इथे खास विभाग असतो.

मी नुकताच बनवलेल्या चित्रपटाच्या कामामधून मोकळा होवून शांतपणे सुटी घेउन दिवसभर सिनेमे पाहतो आहे. एका प्रकारे नवे काही शिकतो आहे .जगात लोक करत असलेले नवे प्रयोग पाहतो. नव्या कथा अनुभवतो. गर्दीत उभा राहतो. रांग लावून सावकाश चित्रपटगृहात जाऊन बसतो. रिक्षातून अनोळखी माणसांशी गप्पा मारत फिरतो. एका दिवसात इतरांप्रमाणेच चार ते पाच चित्रपट पाहून होतात. एक चित्रपट पाहून झाला कि दुसरा पाहायला शहराच्या वेगळ्या भागात धावाधाव करत पोचतो . सर्व शहरातील माणसे ह्या काळात चित्रपट आणि त्याच्या अनुभवाने भारलेली असतात. काही वेळा एखादा ताकदवान चित्रपट पहिला कि त्याचा अंमल मनावर इतका गडद राहतो कि लगेच दुसरीकडे जाऊन वेगळा चित्रपट बघणे मनाला नकोसे होते. नुकत्याच घेतलेल्या चांगल्या अनुभवाच्या उबेत मनाला रेंगाळावेसे वाटते.

एरवीपेक्षा इथे मन शांत आणि मूक होते. दर काही तासांनी ताकदवान चित्रपट आपला ताबा घेतात आणि आपण करत असलेल्या कामाविषयी विचार करायला लावतात. आपल्या देशात आणि मुख्य आपल्या महाराष्ट्रात बनणाऱ्या चित्रपटांपेक्षा जगात सिनेमाचे तंत्र , सिनेमाची कथा कितीतरी पुढे गेली आहे आणि आपण अजूनही त्याचं त्या जुन्या नात्यागोत्यांच्या आणि लग्नाच्या प्रेमाच्या गोष्टी आवळून बसलो आहोत हे लक्षात आले कि फार दुर्दैवी वाटते. केरळ आणि तामिळनाडू मधील प्रेक्षक भूतकाळातून बाहेर पडून अनेक चांगल्या नव्या तरुण दिग्दर्शकांच्या प्रयोगांना दाद देतो हे पहिले कि महाराष्ट्रात असे कधी होणार असे वाटून जाते. इथला प्रेक्षक आपल्या भाषेतील फिल्म हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील चित्रपटापेक्षा आधी पाहतो . ह्याचे कारण तरुण माणसाचा विचार करून इथे दक्षिणेत सिनेमा बनतो. महाराष्ट्रात वयस्कर माणसांना जुन्यापान्या कथा आणि जुनी नाटके ह्यावर आधारित चित्रपट बघायची चटक लागली असल्याने तरुण माणसांना मराठी चित्रपट पहायचा कंटाळा येतो.

सुप्रीम कोर्टाने नुकत्याच केलेल्या हुकुमाने इथे वादळ पेटले आहे. सक्ती आणि देशप्रेम ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक चित्रपटाआधी राष्ट्रागीत वाजले कि उभे राहावे लागते. असे दिवसातून चार पाच वेळा देशभक्तीचे प्रदर्शन करावे लागते. काही विद्यार्थ्यांनी ह्याविरोधात बंड केले आणि ते उभे राहिले नाहीत. त्यांचे सांगणे हे होते कि असल्या देखाव्याने देशभक्तीचे खोटे प्रदर्शन करायची गरज नाही . इथे आपण चित्रपट पाहायला आलो आहोत . देशप्रेमाचे देखावे करायला नाही.  देशप्रेमाचे खोटे दिखावे करायला फेसबुक आहे. इथे तो त्रास कशाला ? जी मुले गाणे वाजल्यावर उभी राहिली नाहीत त्यांना पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकले आहे. दर वेळी गाणे लागले कि चड्डी वर करून उभे राहायचे असले पोकळ दिखावू  नियम करण्यात आणि ते पाळले जात आहेत कि नाहीत हे तपासण्यात देशाच्या कोर्ट आणि पोलीस यंत्रणेचा बराच वेळ यापुढे जाणार असे दिसते. हे सरकार असले अनेक गुदगुल्या चिमटे चापट्या स्वरूपाचे कायदे करून लोकांचे लक्ष वेगळ्याच चर्चेत गुंतवून ठेवून आतल्याआत वेगळी क्रीडा खेळणारे आहे असे दिसते.

दिवसातून पाच वेळा गाणे लागते आणि पाच वेळा आम्ही उभे राहतो कि नाही हे पाहायला पोलिसांचा फौजफाटा थेटर बाहेर उभा असतो. मी जन्मायच्या आधी आणीबाणी नावाची एक काही गोष्ट आली होती म्हणतात. तसे काही पुन्हा सुरु  होणारे कि काय असे वाटते आहे.

पाब्लो नेरुदा ह्या चिली देशातील प्रसिद्ध कवीच्या आयुष्यावरील चित्रपटाने माझ्या मनाची पकड घेतली आहे. गेले वर्षभर आपल्यावर कुणीतरी लक्ष्य ठेवून आहे हि भावना ह्या चित्रपटाने गडद केली आहे. आपण काय लिहितो काय वाचतोय , कसे सिनेमे काढतोय त्यावर नव्या सरकारचा एक डोळा आहे. आपण सतत कुणाच्यातरी देखरेखीखाली आहोत हि भावना अधिरेखीत केली जाणारे वातावरण गेल्या वर्षभरात तयार होते आहे.

पाब्लो नेरुदा च्या कवितांना घाबरून त्याला मारायला एका पोलीस अधिकार्याची नेमणूक केली गेली आहे. पण पाब्लो दर वेळी ह्या अधिकाऱ्याच्या हातावर तुरी देवून पळून जात आहे. त्याचे कुटुंबीय आणि त्याचे सहकारी त्याला तू देश सोडून पळून जा असे सांगत आहेत. पण पाब्लो त्याला तयार नाही . त्याचे त्याच्या देशावर प्रेम आहे . पण त्याच्या देशाच्या राष्ट्राध्याक्षाला पाब्लो आवडत नाही. त्याला पाब्लोची नाही तर त्याच्या कवितांची भीती वाटते कारण त्याच्या कविता प्रश्न विचारून लोकांना जागृत ठेवतात.

प्रत्येक वेळी पळून जाताना पोलीस अधिकाऱ्याला सापडेल अश्या ठिकाणी पाब्लो एक कवितेचे पुस्तक ठेवून जातो. काही काळाने ह्या धावपळीत आणि ताणात पाब्लोचे आणि पोलीस अधिकार्याचे एक अव्यक्त नाते तयार होत जाते. ते दोघे एकमेकांना कधीही न भेटता तयार होणारे हे नाते. लेखकाचे आणि वाचकाचे नाते. पाब्लो धाडसी खंबीर आहे. पोलीस अधिकारी त्याला ओळखू लागला आहे.

शिकारी आणि प्राणी ह्यांचे हे नाते. वाचक आणि लेखक ह्यांचे तेच नाते. शासक आणि कलाकार ह्यांचेही तेच नाते.

पाब्लो कविता करत राहतो. त्याच्या कविता पोस्टातून जगभर जातील अशी व्यवस्था करीत राहतो. अचानक रात्री अपरात्री पोलिसांची धाड पडत राहते. पाब्लो सटकत राहतो.

माझ्यासाठी बंदूक घेऊन फिरणाऱ्या माझ्या वाचका मी इथे आहे. पाब्लो दुरून कवितांमार्फत पोलीस अधिकार्याशी संवाद साधत राहतो. पोलीस अधिकारी आता पाब्लोला समजून घेऊ लागला आहे. पण त्याला पाब्लो हवा आहे कारण पाब्लोला मारणे  हे देशभक्तीचे एक महत्वाचे साधन होवून बसले आहे. देशभक्ती नुसती असून चालत नाही. ती वारंवार सिद्ध करावी लागते. देश्प्रमुखाच्या समोर आपल्या देश्भक्तीचे पुरावे सतत सादर करावे लागतात.

अखेरीस पाब्लोच्या कवितेचे चाहते पाब्लोला वाचवतात आणि त्याच्या मागावर आलेल्या पोलिसाचा बर्फाळ प्रदेशात खून करतात. चित्रपटाच्या शेवटी पाब्लो आपल्या शिकाऱ्यासमोर येतो. तोवर न भेटताही त्या दोघांचे नाते कवितेतून प्रगाढ झालेले असते. ते जवळजवळ एकरूप झालेले असतात. वाचक आणि कवी. शासक आणि कवी. पाब्लो अतिशय हळुवारपणे पोलीस अधिकार्याचा निरोप घेतो. त्याच्या प्रेताचे डोळे मिटवतो.

लेखक आणि वाचक ह्यांच्या नात्याची हि गोष्ट. शासक कधीही वाचक नसतो. तो न वाचताच लेखकाची आणि कलाकाराची शिकार करतो. पण शासक जर वाचक झाला तर लेखकाला मारून टाकणे मूर्खपणाचे आहे हे त्याच्या लक्षात येते.

लेखक आणि वाचक ह्यांचे नाते कायमचे बांधले गेलेले आहे. लेखक त्या जागेवरून पळून गेला तरी त्याने वाचकासाठी तिथे एक कविता मागे सोडली आहे. ती शोधा.

kundalkar@gmail.com

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s