करंट ( लोकसत्ता मधील लेखमाला २०१७) . भाग १ ते ५

 

 

करंट   १

तो दिवस अतिशय क्रूर आणि थंड काळजाचा असणार , जसे मुंबईत एकटे राहणाऱ्या अनेक लोकांचे सुरुवातीचे दिवस असतात. नव्याने राहायला आलो तरी रोजचे जगणे नीट शिजून त्याला घट्टपण आलेले नसते. माणसे ह्या शहरात भांबावलेली असतात. सुरुवातीचे काही दिवस असे असू शकतात जेव्हा तुमच्या आजूबाजूला बोलायला अक्खा दिवस कुणीही नसते. वेटरला खाण्याची ऑर्डर देण्यापलीकडे तुम्ही दिवसभर जिवंत माणसाशी बोलत नाही. पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी तसाच ह्या शहरात शिजून घट्ट होण्याची धडपड करणारा मुलगा होतो. लोकलमधून उतरून platform वरती सिनेमाची मोठी होर्डिंग पहिली की असे वाटायचे कि आपण कधी आणि कसा बनवणार आपला पहिला  सिनेमा ? किती लांब आहे ते जग आपल्यापासून . आपली कुणाशी ओळख नाही , आपल्याला मदत करणारे इथे कोणी नाही. चांगले अभिनेते आपल्या कथेला हो म्हणाल्याशिवाय आपल्याला कोण दारात उभे करेल ? उमेदवारीच्या काळात अश्या सगळ्या भावना गोळा झाल्या कि भोवतीचे रिकामपण वाढत जाऊन अधिकच एकटे पडायला होते.

मी त्या काळात एका छोट्या प्रोडक्शन हाउस मध्ये डॉक्युमेंटरी बनवणारा दिग्दर्शक म्हणून काम करायचो. महिन्यातले पंधरा दिवस भारतात अनेक राज्यांमध्ये फिरून पर्यावरणविषयक फिल्म्स बनवायचो. आणि उरलेले पंधरा दिवस घरी बसून माझ्या ‘कोबाल्ट ब्लू’ ह्या कादंबरीवर काम करायचो. अनेकदा संध्याकाळी एडिटिंग संपवून एकटा घरी येऊन मी इंटरनेटवरच्या chat रूमवर जाऊन अनोळखी लोकांशी तासनतास गप्पा मारत बसायचो.

तसाच तो दिवस. मी संध्याकाळी इंटरनेटवर गेलो आणि दोन तीन अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारणे सुरु केले . तेव्हा ती व्यक्ती मला भेटली. नवी ओळख नव्हती. गेले पाच सहा दिवस आम्ही गप्पा मारत होतो. प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. आज आम्हाला दोघांना वेळ होता म्हणून भेटूया का अशी चर्चा सुरु झाली. मी नुकताच दिवसभर काम करून घरी आलो असल्याने मला बाहेर पडायचे नव्हते. म्हणून मी त्या व्यक्तीला घरी यायचे आमंत्रण दिले.

दोन तासांनी ती व्यक्ती माझ्या घरात होती. आम्ही कॉफी पीत गप्पा मारत होतो. मी स्वयपाकघरात काहीतरी  आणायला उठलो  तेव्हा  त्या व्यक्तीने माझ्यावर मागून पहिला वार केला आणि मी भेलकांडत जमिनीवर पडलो.

पुढचा अर्धा तास ती व्यक्ती मला लाथाबुक्क्यांनी मारत होती . मी प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मी खूप शॉकमध्ये गेलो होतो. माझा एक हात लुळा पडला , डोळ्यावर बुक्क्की मारल्याने तो काळानिळा झाला आणि माझे डोके सोफ्यावर आपटले. माझी कपाटे आणि शेल्फ ह्यांची उचकपाचक करून , घरातल्या अनेक वस्तू खाली फेकून त्या व्यक्तीला माझे सातशे रुपये असलेले पाकीट आणि माझा नोकियाचा नुकता घेतलेला फोन मिळाला . तो घेऊन ती व्यक्ती घरातून पळून गेली.

साध्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या मला शारीरिक हिंसेचा इतका मोठा अनुभव पहिल्यांदा आला होता. हिंसेबद्दल मदत मागण्याआधी मला लोक काय म्हणतील आणि मला कोणत्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील ह्याचा विचार करत बसावे लागले. डोळ्याची सूज वाढत होती. हात दुखत होता.मला त्यावेळी पोलिसांवर विश्वास वाटला नाही. तो मार्ग जास्त भयंकर आहे हे लक्षात आले. कारण पोलीस यंत्रणेपासून बचाव करायला किंवा तिथले तंत्र सांभाळायला तुमच्यासोबत खमक्या व्यक्ती लागतात तसे माझ्यापाशी कुणीही नव्हते. मला माझे सातशे रुपये आणि मोबायील फोन परत नको होता. मला जोरात रडावेसे वाटत होते. कुणाच्यातरी कुशीत शिरून. पण फार भयंकर भीतीने मनाचा ताबा घेतला होता. दोन तासांनी मी कसाबसा  उठलो आणि दार लाऊन घेतले. पाणी प्यायले. घराची परिस्थिती पहिली. माझ्या चुलत भावाला आणि एका मित्राला फोन केला आणि खूप रडलो. सगळेच अंतराने खूप लांबवर  होते. फोनवरच बोलावे लागणार होते.

दुसऱ्या दिवशी दुपारी मला दिल्लीला जावे लागणार होते. तिथून संध्याकाळी ट्रेन ने डेहराडूनला शूटींगसाठी पोचणे भाग होते.

मी दादर स्टेशनवर उतरताना तोंडावर आपटून पडलो अशी कथा तयार केली कारण डोळ्याभोवती सुजून खूप काळे झाले होते. platform वरती माझा फोन पडून फुटला होता आणि कुणीतरी पाकीट  मारून नेले होते. देहरादून मध्ये पुढचे पंधरा असल्याने पुण्यात कुणाला काही कळण्याचा धोका नव्हता. मी हिंसेचा अनुभव बुजवून टाकला कारण समाज नावाच्या अदृश्य राक्षसाच्या भीतीने मी अपराधीपण स्वतःकडे घेऊन गप्पा बसून राहिलो.

पण त्या रात्री माझ्या मनावर खूप खोलवर जखम झाली ज्यातून पुढची अनेक वर्षे काहीतरी वाहत राहिले. ती सुकायला मला फार मोठी किंमत मोजावी लागली. खूप वाट पहावी लागली. मी मनातून अपंग होवून राहिलो.

झालेल्या गोष्टीबद्दल काही दिवसांनी शांतपणे लिहून काढले कि आपल्या अनुभवाला न्याय मिळतो ह्यावर माझा विश्वास आहे. दुसऱ्या माणसाशी बोलण्यापेक्षा मला त्याआधी शांतपणे लिहून काढणे आवडते. गेली सोळा वर्षे मी ह्या गोष्टीविषयी लिहायला घाबरत राहिलो. संकोच करीत राहिलो . कारण मध्यमवर्गीय वाचक आणि मध्यमवर्गीय प्रेक्षक नावाच्या जाणिवेची एक फार मोठी सत्ता असते. पोलिसांप्रमाणेच मी त्या लोकांना घाबरतो. कक्षेबाहेरचे लिहिताना शांतपणे दोनदा विचार करावा लागतो. अश्या भितीपायी मी संकोच करत गप्प बसून राहिलो. खाजगीतही वहीमध्येसुद्धा त्या रात्रीविषयी काही लिहवेना. अश्यावेळी आपल्याला कविता करता येत नाही ह्या जाणीवेने फार हतबल व्हायला होते.

मी सावध झालो. त्या घरात पुढचे अनेक महिने रात्री दिवे चालू ठेवून झोपू लागलो. इन्टरनेटने माझे आयुष्यात पुढे कधी काहीही वाईट केले नाही. मी अनेक अनोळखी त्यामुळे माणसे जोडली , मित्र बनवली. प्रवास केले , अनोळखी माणसांना सोबत घेऊन काम केले. पण त्या रात्रीपासून माझ्या त्वचेच्या आतमध्ये एक स्वेटर आपोआप विणला गेला. त्या रात्री मी मुंबईशी दोन हात करायला सक्षम झालो. लोकांच्या डोळ्यात डोळे घालून स्पष्ट बोलायला शिकलो. नाही म्हणायचे आहे तेव्हा नाही म्हणायला शिकलो. होकारापेक्षा वेळच्यावेळी दिलेला नकार महत्वाचा असतो.

मला स्पर्शाबद्दल अतिशय चुकीची जाणीव त्या रात्री तयार झाली. ती दुरुस्त व्हायला किती वर्षे जावी लागली ह्याची गणतीच नाही. एका बाजूला कुणाचाही स्पर्श नको असलेला आणि दुसर्या बाजूला सतत सध्या प्रेमाच्या स्पर्शासाठी भुकेला असा दोन अर्थांचा प्राणी माझ्यातून तयार झाला. त्या प्राण्याने पुढील अनेक वर्षे लोकांना आपलेसे केले आणि स्पर्शाच्या पांगळ्या घाबरट जाणीवेने पटकन दूर लोटले. सतत खऱ्या प्रेमाच्या स्पर्शासाठी भुकेले ठेवले.

मी लिहायला बसलो कि टाळाटाळ करायचो. ह्याविषयी लिहिणे टाळायचो. अगदी सिनेमात कोणत्याही पात्राच्यासुद्धा  आयुष्यात मी ती रात्र अजून येऊ दिली नाही. गेली अनेक वर्षे मी अनेक गोष्टीबद्दल मोकळेपणाने आणि शांतपणे लिहित आलो. पण हि गोष्ट लिहायला घाबरत राहिलो. मी अनेक हिंसा घडल्यावर त्याविषयी वाचले, सिनेमे पाहत आलो. शारीरिक हिंसेचा मी घेतलेला एकमेव क्रूर आणि काळा अनुभव फिका पडेल अशी दृश्ये मी सिनेमात पहिली.

काही वेळा मला बोलताबोलता अनुरागला त्या रात्रीविषयी शांतपणे सांगावे असे वाटेल. तो नक्कीच  आपल्याला उलटे न भोसकता आपले म्हणणे समजून घेऊ शकेल. पण मी आवंढा  गिळून गप्प बसलो.

मराठीत अशी ठिकाणे आहेत जिथे लिहीता आले असते. माझ्या ओळखीचे लोक आणि नातेवायिक अजिबात वाचत नाहीत अशी मासिके आहेत. त्यात लिहिणे सोपे होते. तिथे सहानुभूतीने आणि समजुतीने ह्या अनुभवाकडे बघणारा तोच नेहमीचा ओळखीचा वाचक होता.

सगळ्यात भीती असते ती कधीही स्वतःचे घरदार न सोडणाऱ्या आणि हिंसेकडे नैतिकतेने बघणाऱ्या आणि आपल्याला जपून राहण्याचे सल्ले देणाऱ्या जन्मगावाचा समाजाची. प्रत्येक लेखकावर जन्मगावच्या हुशार समाजाचा अप्रत्यक्ष धाक असतो. इंटरनेट वर जपून वागा रे असे सांगणाऱ्या ओरिजीनल बुद्द्धीच्या माणसांचा धाक.

पण आज जुने वर्ष सरताना मी शांतपणे बसून हे कागदावर लिहून काढले. नवीन वर्ष सुरु होताना ह्यापेक्षा वेगळी शांताता आणि आनंद दुसरा तो काय असणार ?

 

   करंट २

फ्रेंच भाषा शिकायला गेलो तेव्हा त्या भाषेला अंगभूत असणारा खळाळता प्रवाही उत्साह माझ्या मनात होता. बहुदा ती भाषा म्हणजेच तो प्रवाही उत्साह असे मी मनात धरून चाललो होतो. ‘अपूर्वाई’ हे घरातील पुस्तक नऊशे वेळा वाचून फ्रेंच माणूस म्हणजे सतत शाम्पेन पिणारा , उसासे टाकत प्रेम करणारा , एका हाताने सतत चित्रे काढणारा आणि रोज संध्याकाळी निरनिराळ्या प्रेयस्या सोबत घेऊन नाचगाणी करणारा असे काहीसे मत माझे झाले असल्याने मला त्या भाषेचे फार आकर्षण तयार झाले होते. इंग्रजी भाषा आम्हाला शाळेत शिकायला होती. पण इंग्रज माणसांप्रमाणे ती ज्ञान रचना आणि शिस्तीची भाषा होती. प्रेम करायला शिकवणारी फ्रेंच भाषा कुठे आणि कशी शिकतात ह्याचा पत्ता नव्हता.

सतराव्या वर्षी मी चित्रपटाच्या सेटवर सहायक म्हणून काम करू लागलो आणि जगभरातील अनेक वेगळ्या सिनेमाशी माझा संपर्क आला. मी पुण्यातील एका चित्रपट महोत्सवात सलग ओळीने न्यू वेव्ह काळातील फ्रेंच सिनेमे पाहत होतो. जान्न मरो ह्या माझ्या आवडत्या नटीचा ‘जूल ए जिम’ ( Jules and jim ) हा अप्रतिम सिनेमा खाली चालू असलेल्या इंग्रजी सबटायटल्स सकट बघताना मला असे वाटले कि हे काही खरे नाही. मला हि भाषा यायलाच  हवी. हि पात्रं काय बोलतात ते मला इंग्रजीशिवाय कळायला हवे म्हणून मी ती शिकायला गेलो. ‘अलियान्स फ्रोन्सेज द पुणे’ ह्या संस्थेत मी पहिल्या वर्गाला प्रवेश घेतला तेव्हा मी सोडून वर्गात सिनेमात रस असलेले कुणीच नव्हते. बहुतेक मुलामुलींना कॅनडियन विसा हवा होता म्हणून ते फ्रेंच शिकत होते. एक मुलगी फेमिना मिस इंडियाची तयारी करीत होती. एक शेफ होता ज्याला जहाजावर नोकरी हवी होती. प्रत्येकाला एक उद्देश होता. नोकरीचा किंवा विसाचा. मला कोणताच नव्हता. तू का फ्रेंच शिकतोस ह्यावर मी ‘असाच शिकतो’ गुलजारांच्या भाषेत ‘’युं हि’’ असे म्हणायचो.

भाषेला स्वतःचे शरीर असते. आकार असतो आणि स्वभावसुद्धा. प्राथमिक अवस्थेत पुण्यातील अतिशय तळमळीने आणि आवडीने शिकवणाऱ्या शिक्षकांकडून ती भाषा शिकताना मला दडपण वेगळ्याच गोष्टीचे आले होते. आपण भारतात किती कुढत आणि घाबरून जगतो ह्या गोष्टीचे. मी पाहत असलेल्या आणि ऐकत असलेल्या फ्रेंच सामाजिक जीवनात एक मोकळेपणा आणि बहारदार उत्साह होता. माणसाला त्याची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेला उद्धटपणा होता. निवड करण्याची मुभा होती आणि ती वय , आर्थिक परिस्थिती ह्या मुद्द्यान्पलीकडे सर्वांनाच होती.

बारावीच्या सुट्टीत मी डेक्कनवरील एका पुस्तकच्या दुकानातून गुस्ताव फ्लोबेर ह्या प्रसिद्ध फ्रेंच लेखकाच्या ‘मादाम बोव्हारी’ ह्या कादंबरीचा अनुवाद आणला होता आणि तो वाचून मी भारावून गेलो होतो. भाषा आणि ती भाषा बोलणाऱ्या समाजाचे निर्णय हातात हात घालून चालतात हे मला जाणवू लागले. मग मी मराठी भाषा बोलतो म्हणजे नुसती बोलत नाही तर मी मराठी समाजाने आखून दिलेले निर्णय नकळतपणे घेतो हे मला लक्षात आले आणि हि निर्णयप्रक्रिया बदलायला परकीय भाषेचे ज्ञान आपल्याला मदत करेल हे मला कळले तेव्हा ती भाषा शिकायचा उद्देश माझ्या मनात तयार झाला असावा. मला कोणताही विसा किंवा नोकरी नको होती. मला माझी समाजात आणि कुटुंबात आखून दिलेली निर्णय घेण्याची पद्दत स्वतःपुरती बदलायची होती. मोकळे व्हायचे होते म्हणून मी फ्रेंच भाषेकडे , फ्रेंच सिनेमा आणि साहित्याकडे आकर्षित झालो असणार असे मला आज विचार करताना वाटते. पण वर्गात मला कुणी कारण विचारले असता मी ते सांगू शकलो नाही. शिक्षकांनाही नाही.

फ्रेंच कवी रॅम्बोची कविता माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला मी शिकत असलेल्या ह्या भाषेची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून घ्यायला हवी अशी जाणीव झाली. रॅम्बोने मला खडबडून जागे केले. ओळखीच्या वाटणाऱ्या त्या भाषेचा माझ्या मनातील नाद बदलला. आज दरवेळी रॅम्बोची कविता वाचताना , पुन्हा नव्याने समजून घेताना आणि त्यात हरवून जाताना मी फ्रेंच भाषेच्या लवचिकतेने आणि तिच्या उच्चारणातील शब्दध्वनीच्या सौंदर्याने पुन्हा पुन्हा मोहित होतो. मी हि भाषा शिकतो आहे ह्याविषयी मनाला फार बरे वाटते.  रॅम्बोची हि कविता माझ्या आयुष्यात न सांगता आली. पण आज माझ्या आयुष्यात एक फार महत्वाची जागा तिने निर्माण केली आहे. मराठी कवी आरती प्रभू आणि लेखक महेश एलकुंचवार ह्यांनी केली आहे तशीच.

जां निकोला ऑर्थर रॅम्बो हा फ्रान्समधील एकोणिसाव्या शतकातील अतिशय महत्वाचा कवी. वयाच्या तेराव्या वर्षापासून तो कविता करू लागला होता. सतरा ते एकोणीस ह्या वयात त्याने आपल्या आयुष्यातील सर्व साहित्यनिर्मिती केली. जवळच्या मित्राच्या , Paul Verlaine ह्या कवीच्या विरहाने एकोणिसाव्या वर्षी त्याने लिहिणे जवळजवळ पूर्णपणे थांबवले. Verlaine हा त्याचा मित्र सहचर आणि महत्वाची प्रेरणा होता. रॅम्बोची कविता मला आज सोबत करते. सावकाश कळू लागली तेव्हा आकर्षित करीत होती. मी त्याची समग्र कविता आधी इंग्रजीतून वाचली . मग सावकाश फ्रेंच मधून वाचली . घाबरत वाचली . त्रोटकपणे. अर्थ समजण्याची अपेक्षा न धरता वाचली. शब्दाच्या आवाजाच्या मोहाने. पण मग सावकाशपणे त्या कवितेचा आकार मनामध्ये घर करू लागला. दुखावलेला एकटा पडलेला , आतून पोखरलेला हा तरुण मुलगा माझ्याशी शांतपणे बोलू लागला. तो माझ्याच वयाचा होता. मी मोठा झालो तरी तो एकोणीस वर्षाचा राहिला पण माझ्यापेक्षा नेहमीच जास्त धीट, जास्त उघडा आणि बेधडक . मी कधीच करू शकलो नाही अश्या अनेक गोष्टी तो त्याच्या कवितेत करत होता.

आठ दहा वर्षापूर्वी माझ्याकडे राहायला आलेला माझा एक मल्याळी मित्र परत जाताना A season in Hell हे रॅम्बोने १९८३ साली रचलेल्या कवितेचे पुस्तक घरी विसरून गेला. ती माझी रॅम्बोची पहिली ओळख ठरली. माझ्याने ती कविता सुरुवातीला वाचवेना इतकी ती दाहक आणि कठीण होती. मला संपूर्ण लक्ष्य त्या वाचनावर केंद्रित करावे लागले.संयम आणि संपूर्ण उर्जा वापरून ती कविता आत घ्यावी लागली. श्वास रोखून मी ते छोटे कवितेचे पुस्तक हाती घेऊन बसलो होतो .ते पचेना पण खालीहि  ठेववेना. माझी तोपर्यंतची कवितेची कल्पना मोडीत काढणारा तो अनुभव ठरला. मला ओढ निर्माण झाली. सतरा ते एकोणीस ह्या वयात हे दाहक विचित्र आणि गडद काव्य निर्माण करून त्यानंतर पस्तिसाव्या वर्षी संपून मरून गेलेल्या माणसाची ओढ. फ्रान्समधील शार्लव्हील ह्या खेड्यात १८५४ साली जन्मलेला रॅम्बो माझ्याशी बोलू लागला होता . आश्वासक आणि खाजगी.

रॅम्बोच्या कवितेने मला एकट्याने बसून मोठ्याने कविता म्हणण्याचा आनंद दिला . आपण गाणी म्हणतो . कविता नाही. पण त्याची कविता मी वाचताना मोठ्यांदा म्हणतो. मला त्या कवितेत दडलेली कथा अनुभवताना ती ज्या भाषेत लिहिली आहे त्या भाषेचा आनंद घेत ती पचवावी असे वाटते. मी अनेक कवींच्या कविता अश्या वाचून पहिल्या पण रॅम्बोच्या कवितेने मला म्हणायचा आनंद दिला तसा सर्व कवितांनी दिला असे नाही.

अनेक वर्षांनी मला हे लक्षात आले आहे कि नवी भाषा शिकण्याचे साकल्य त्या भाषेतील कविता अनुभवण्यामध्ये असते. कविता आपल्याला मुळाशी घेऊन जाते. कविता आपले जगणे डागडुजी करून काही काळ पूर्ववत् करून देते. आपल्यापाशी समजून घेणारे कुणी नसेल तर कविता आपली असते. शांतपणे एखाद्या विषासारखी भिनणारी कविता.

मला कविता करण्याची देणगी नाही. मी गद्य माणूस आहे. पण मला जगताना कविता लागते. प्रेमाची आणि देशप्रेमाची नाही तर आतल्या पोकळीची कविता. जी लहान असताना आरती प्रभूंनी दिली. आणि त्यानंतर रॅम्बोने.

महेश एलकुंचवार ह्यांच्या सर्व लिखाणात मला रॅम्बो पुन्हा वावरताना दिसतो. एल्कुन्चावारांना रॅम्बो नीट कळला आहे. त्यामुळेच  मला त्यांचे सर्व साहित्य नेहमी सोबत करते. मला रॅम्बोची कविता समजून घेण्यासाठी एलकुंचवारांच्या साम्राज्यातील पोकळीचा कितीतरी मोठा आधार तयार झाला असावा.

रॅम्बोने मला नेहमी सोबत केली आणि माझा लिहिण्याचा संकोच दूर केला. न लिहिण्याचा निर्णय हा महत्वाचा आहे हे त्याने मला समजावले. म्हणून मला तो फार आवडतो.

 

         करंट ३

 

मी काल नेटफ्लिक्सवर ‘टॉप गन’ पाहत बसलो होतो. आणि मला आयुष्यात पहिल्यांदा त्या सिनेमातली पात्रे काय बोलतायत हे कळले . कारण नेटफ्लिक्सचा फायदा हा कि अमेरिकन इंग्रजी चित्रपटांनासुद्धा इंग्रजी सबटायटल्स असतात. सिनेमा पाहता पाहता वाचून हे लक्षात येते कि समोरचे बापे आणि बाया काय बोलत आहेत. १९८६ साली टॉप गन प्रदर्शित झाला आणि एका वर्षात तो भारतात आला तेव्हा मी सहावीत होतो. इंग्रजी सिनेमे हे नव्याने शिकायला आलेल्या इंग्रजी भाषेचा सराव व्हावा म्हणून नेमाने पाहू लागलो होतो.

टॉप गन ने आमच्या सर्व वर्गालाच काय पण सर्व पिढीला खूप खर्चात टाकले. म्हणजे सहावी सातवीत असताना खिशात चिंचेच्या आणि संत्र्याच्या गोळ्या घेण्याइतकेच पैसे असताना आम्ही पुढे आयुष्यात करायच्या गोष्टींची मोठी यादी सगळेच मनातल्या मनात करून बसलो. एकमेकांना सांगत सुटलो.

मी दर शुक्रवारी अलका चित्रपटगृहात जाऊन भाषा शिकायला मिळेल असा उदात्त अविर्भाव आणून इंग्रजी सिनेमे पाहत असे. अलकाचे मालक आणि मॅनेजर ह्या दोघांना उत्तम इंग्रजी चित्रपटांची जाण होती . ते बारकाईने निवडून उत्तम अमेरिकन चित्रपट तिथे लावत. माझे वडील मला तिकीट काढून आत बसवून देत आणि सिनेमा संपला कि कोपर्यावरच्या ट्राफिक पोलिसाचा हात धरून चार मोठे रस्ते ओलांडून मी घरी परत येत असे. मनात सिनेमाची चव घेऊन. घरात जे कधीच होवू शकत नाही असे सर्व लैंगिक सामाजिक आणि भावनिक शिक्षण माझे अलका चित्रपटगृहाच्या चालकांनी केले.

‘टॉप गन’ ने आमचे खालील खर्च वाढवले आणि अनेक आकांक्षा आमच्या सदाशिवपेठी शुद्ध देशी बालमनात उत्पन्न केल्या . ‘टॉप गन’ हि आमची खरी मुंज होती. घरी पाहुणे रावळे बोलावून मुंडण करून मुंजीसारख्या कालबाह्य संस्कारांवर जो पैसा आमच्या आईवडिलांनी वाया घालवला त्याचे मला फार वाईट वाटते. तो पैसा आम्हा मुलांना सहावीत सातवीत दिला असता तर आम्ही खालील खर्च आणि कृती लगेच केले असते. आमचे भले झाले असते .हल्ली सिनेमा बघताना जो खाण्यापिण्यावर खर्च होतो तसा हा फालतू खर्च नव्हे. पूर्वी सिनेमा बघताना आपण ह्या ह्या गोष्टी करायच्या आहेत , इथे इथे जायचे आहे ,ह्या ह्या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत असले कपडे घालायचे आहेत हे मनसुबे मनात रचले जाऊन आमची आजूबाजूच्या त्याचत्या जगातून सुटका व्हायची. असा तो खर्च.जो सध्या अनेक वर्षांनी माझ्या लाडक्या जोया अख्तर चे सिनेमे बघताना करावासा वाटतो.

‘’टॉप गन’’ ने मनात निर्माण केलेले खालील खर्च आणि आकांक्षा.काही करायची ऐपत नंतर आयुष्यात आली . काही केले नाहीत.उरलेले करायची इच्छा निघू गेली आहे .

१ ) रे बॅन कंपनीचे aviator गॉगल्स घेणे. (टॉम क्रूज हा नट त्या aviators मध्ये जो काय सेक्सी  दिसला आहे ! हे गॉगल्स सहा हजारापासून पुढे मिळतात हि बातमी वर्गातील एका मुलाने काढल्यावर आम्ही चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवायला आणि उद्योगधंदे करायला प्रेरित झालो. तोपर्यंत आम्हाला ‘’पैसा नाही तर कुटुंब आणि देश महत्वाचा’’ असे काहीतरी शाळेत शिकवत. ‘’साधेपणा , अंथरूण पाहून पाय पसरणे’’ , ‘’गरिबी चांगली श्रीमंती वाईट’’  असे सगळे होते ते संपले. ‘’आधी aviator मग बाकीचे सगळे’’ हे आमच्या मनावर कोरले गेले.जे गॉगल्स आमच्या पिढीच्या प्रत्येकाने पहिल्या दमदार कमायीतून घेतले. माझ्याकडे अजूनही माझ्या गॉगल्सच्या कप्प्यात एक तरी aviator असतोच.)

२ ) पायलट बनणे (वर्गातले सगळेजण हा सिनेमा पाहून पायलट बनणार होते. एकही कार्टा बनलेला नाही. सगळा वर्ग कॅलिफोर्नियात सोफ्टवेअरसाठी  गेला.आम्ही वर्गातील मोजून तीन मुले सिनेमासृष्टीत आलो. एक जण डॉक्टर झाला आहे. दोन मुले बिचारी इंजिनियर पण झाली. कुणीही पायलट बनले नाही. पण ‘टॉप गन’ पाहून प्रत्येकाने जवळजवळ हे  ठरवून टाकले होते कि माझे आता जमिनीवर काय काम ? मी तर आकाशातला राजपुत्र . अनेक मुले वर्ग चालू असताना खिडकीबाहेरच्या आकाशाकडे पाहत बसत. पुण्यावरून तर एकही विमानसुद्धा जात नसे , तरी बिचारी गॉगल्स लावून विमाने उडवायची स्वप्ने पाहत)

३ ) शर्ट काढून बीचवर व्हॉलीबॉल खेळणे. (न बोललेलेच बरे. आमच्या एकेकाचे रूप बघता कुणी हे केले नाही हेच बरे आहे. गोव्याला गेले कि बनियन आणि अर्धी चड्डी घालून पोट सांभाळत काही मुले हे जुने स्वप्न पूर्ण करताना अजुनी दिसतात. अश्या मुलांच्या बायका पंजाबी ड्रेस घालून समुद्रात पोहत असतात)

४ ) वर्गात शिकवायला आलेल्या शिक्षिकेसोबत अफेयर करणे.(सर्व सातवी आठवीतल्या मुलांची साधी सोपी फॅंटसी. प्रत्येकजण वयात येताना असे काहीतरी कारावसे वाटणारच. टॉप गन मध्ये  टॉम क्रूज ला शिकवायला केली मॅकगिलिस हि अप्रतिम दिसणारी शिक्षिका येते. आणि चारच सीन नंतर ते एकमेकांसोबत रात्र घालवतात. पुण्यात … भावेस्कूल . … सदाशिव पेठ … हातावर मारल्या जाणार्या पट्ट्या …. गृहपाठ … पालकांना बोलावेन अश्या धमक्या…. शिवाय शनिवारी मारुतीच्या मूर्तीला घालायचा पानांचा हार … त्यामुळे हे स्वप्न थुंकी गिळावे तसे प्रत्येकाने गिळून टाकले असणार. नाहीच जमले ह्या आयुष्यात , अरेरे !)

५ )रोज काम संपल्यावर संध्याकाळी मिर्त्रांसोबत जवळच्या पबमध्ये जाणे आणि स्वतःचे गांभीर्य आणि पांडित्य बाजूला ठेवून थोडी नाचगाणी आणि मजा करणे. ( हे नंतर भारतातही करता आले ,सध्या तर नेहमीच करता येते. .धन्य ते शहरीकरण , धन्य ती खुली अर्थव्यवस्था आणि धन्य ती स्थलांतर करायची सवय. नौवद साली ज्यांच्या शाळा संपल्या ते आम्ही सगळे अतिशय निरागसतेने आणि सहजपणे खुल्या अर्थव्यवस्थेत सामावून गेलो. मौजमजा करायची आम्हाला खंत वाटली नाही आणि अपराधी तर कधीही वाटले नाही .नाहीतर आम्ही पुण्यातील मुले पिंपरीच्या पेनिसिलीन कारखान्यात काम करून संध्याकाळी दूरदर्शन पाहायला घरीबिरी आलो असतो.)

अमेरिकन सिनेमा आपल्याला जी उर्जा देतो त्याची तुलना इतर कशाशीशी होवू शकत नाही. अमेरिकन सिनेमा ,अमेरिकन साहित्य आणि अमेरिकन संगीताशी योग्य वयात संपर्क आपल्याने आमची पिढी फार सुदैवी ठरली. आमच्यातील लाजरा, कुढत स्वप्ने बघणारा भारतीय तरुण ह्या सिनेमाने खतम केला. आणि स्थलांतरण ह्या अतिशय आवश्यक प्रक्रियेसाठी ह्या अमेरिकन सिनेमाने आम्हाला तयार केले. नौवद सालानंतर आमच्या आजूबाजूला जे महत्वाचे बदल झाले ते म्हणजे digitization  आणि मोकळी अर्थव्यवस्था. संपर्क क्षेत्रातील वेग. आम्ही जुने analog जाग अनुभवून ह्या नव्या जगासाठी शांतपणे तयार  झालो असे होण्यात अमेरिकन सिनेमाचा फार महत्वाचा वाटा आहे. आपली शहरे बदलणार आहेत. आपली भाषा मिश्र होणार आहे. आपल्या आजूबाजूला अनोळखी संस्कृतीतले लोक वावरणार आहेत ह्याची तयारी अमेरिकन चित्रपट आमच्यासाठी लहानपणीपासून करीत होता. त्यामुळे आम्ही बदलत्या काळाकडे नाराजीने आणि संशयाने पाहत बसलो नाही. जग बदलेल तसे बदलत गेलो.

महत्वाची गोष्ट हि कि तेव्हा जे बदल घडायला सुरुवात झाली ते बदल घडणे अजूनही थांबलेले नाही. पण मूलतः आपले जुने होते तेच कसे चांगले होते ह्यावरचा आमचा विश्वास पुसून गेला असल्याने आम्हाला शांतपणे रोज नव्या बदलानांना सामोरे जाता येते.

भाषा कळणे महत्वाचे नसते. भाषा जपणे हेसुद्धा महत्वाचे नसते. त्या भाषेमागून आपल्यावर काय सोडले जात आहे ती मूल्ये ओळखून आणि जोखून त्याची मजा घेता आली तर सिनेमा बनवण्याचे काम सफल झाले असे मी स्वतःला सांगत गेलो. मी सिनेमा शिकलो , बनवू लागलो तेव्हा युरोपातून आलेला क्रांतिकारी बुद्धिवादी सिनेमा शिकवणारे शिक्षक आम्हाला हे सांगू लागले  कि अमेरिकन सिनेमा छचोर आहे , वरवरचा आणि खोटा आहे. पण लहानपणीच ‘’टॉप गन’’ पाहिलेला असल्याने ( तो खरच सुमार सिनेमा आहे, मला संवाद कळल्यावर कालच लक्षात आले!) आणि त्याचा फार फायदा माझ्या स्वनांना झालेला असल्याने मी कधीही अमेरिकन सिनेमाची आणि संगीताची घाईने चेष्टा केली नाही.

 

 करंट ४

काळ पुढे सरकतो आहे. शांतपणे. एका लयीत. जग बदलते आहे. काळ नाही. काळ फक्त मूकपणे प्रवास करतो आहे. कष्टाने केलेली उपासना , कार्यातून निर्माण केलेल्या सुंदर स्मृती आणि जुन्या वास्तू ह्या तिन्हीच्या निमित्ताने काळ थांबून राहिला असे वाटत असेल तरी तसे नाही. काळ शांतपणे आणि हट्टाने पुढे सरकतो आहे.

इंदूरच्या विमानतळावर विमान उतरण्याआधी शेकडो एकरांची सुंदर हिरवीगार शेतजमीन दिसते. ती जमीन माळवा प्रांतात आपले स्वागत करते. नजर जाईल तिथपर्यंत हिरव्यागार जमिनीचे तुकडे. नावालाही मनुष्यवस्ती नाही.त्या शेतांमधून जाणारे नागमोडी वळणावळणाचे सुंदर रस्ते. फुलांचे मोठाले ताटवे. मला वरुन पाहताना पु ल देशपांडे , सुनिता देशपांडे आणि त्यांच्या मित्रांची अचानक ठरवलेली सहल आठवते. कुमारजींना भेटण्यासाठी सहज आठवण आली म्हणून पुण्यातून गाडी काढून निघालेले मित्र आणि त्या नागमोडी रस्त्यांवरून देवासच्या दिशेने निघालेली त्यांची मोटारगाडी.  प्रत्यक्ष भेटण्याआधी किंवा अनुभवण्याआधी मी अनेक कलाकारांना सुनिता देशपांडे ह्यांच्या लिखाणातून भेटलेलो असतो. कोमकली कुटुंबीय हे त्यापैकी एक. आपल्या सर्वांचे लाडके कुमारजीच नाहीत तर संपूर्ण कोमकली कुटुंबाची एक साजरी चौकट महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना पु ल आणि सुनिताबाईंनी लिखाणातून समोर ठेवली आहे .मला त्या उभयतांची ह्या प्रवासात तीव्रेतेने आठवण येते आणि पुढचे दोन्ही दिवस ती आठवण सोबत राहते.

कुमार गंधर्व हे असे व्यक्तिमत्व आहे जे मला देशात आजही जागोजागी सापडत, उमजत आणि कोड्यात टाकत जाते. मी अनेक वयाच्या आणि तीन ते चार पिढ्यांच्या कोणत्याही कलासक्त माणसाशी भारतात कुठेही बोलत असेन तरी कुमार गंधर्व हा विषय निघाला कि नुसते शास्त्रीय गायनाचे रसिकच नाही तर अनेक कला महाविद्यालयातील विद्यार्थी , चित्रपटकलेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी , नृत्यकलेचे विद्यार्थी , पाश्चात्य वाद्यरचना शिकणारे विद्यार्थी गप्पा मारू लागतात. ह्या सर्वांना कुमारजी अतिशय आपले वाटतात . त्यांच्याविषयी ममत्व वाटते. ह्यात अगदी विशीतली तरुण मुलेही आली जी बाकी कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय संगीत ऐकत नाहीत, ती कुमारजींचे गाणे त्यांच्या फोनवर बाळगून असतात. एखाद्या पॉप स्टार चे गाणे ऐकून उर्जा मिळावी , स्वतंत्र मोकळे झाल्याची अनुभूती व्हावी , आपल्या अनाथ पाठीवरून प्रेमळ हात फिरवा तसे कुमारजींच्या आवाजाने मनाचे होवून बसते. त्यामुळे ते भारतातल्या सर्वांचे आपले आहेत. जवळचे आहेत . त्यांच्याविषयी ममत्व नसेल असा माणूस मला आजपर्यंत भेटलेला नाही.

 

त्यांच्या पंचविसाव्या पुण्यतिथीनिमित्त देवासला ‘भानुकुल’ ह्या त्यांच्या प्रसिद्ध निवासस्थानी कलापिनीने तिच्या आप्तांच्या आणि अनेक गंधर्वप्रेमी सहकार्यांच्या मदतीने एक देखणा सोहळा आयोजित केला आहे.

माळव्यातील प्रेमळ हिंदी भाषा तुम्हाला फार पटकन कवेत घेते. त्या भाषेतील अगत्य , तिची चाल आणि त्यातला साधेपणा तुमचे परकेपण कमी करतात. ह्या हिंदी भाषेत उर्दूचे मिश्रण नाही. त्या भाषेला मराठीप्रमाणे स्वतःची लाज वाटत नाही. ती खेळती, गाती, भांडती मोकळी भाषा आहे. कोमकली कुटुंबातील माणसे एकाच वेळी सफाईदारपणे हि हिंदी , माळवी आणि मराठी बोलतात. कलापिनी एका लंब्याचौड्या वाक्यात अनेकवेळा सफाईने ह्या भाषांचे मिश्रण करून जाते. “अपने करतलध्वनी के साथ उनका स्वागत किजीये “ असे कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणतात.  टाळ्यांना असलेला ‘करतलध्वनी’ हा शब्द ऐकून मी पुढचे दोन दिवस आपले मुंबईचे हिंदी बोलून इथे शोभा करुन घ्यायची नाही हे मनातल्या मनात मराठीतच ठरवतो.

कवी अशोक वाजपेयी आपल्या मिश्कील हसऱ्या शैलीने कार्याक्रमाची सुरवात करतात . भानुकुलच्या प्रांगणात उभारलेला एक विशाल मंडप अनेक संगीतप्रेमी रसिकांनी भरून गेला आहे. अशोक वाजपेयी असे बोलत आहेत जणू समोर कुठेतरी कुमारजी बसून त्यांचे बोलणे ऐकत असावेत. ते काळ थांबवू बघतात. श्रोत्यांना भूतकाळात नेण्याऐवजी आपल्या प्रसन्न शैलीने आणि भाषाप्रभुत्वाने ते कुमारजींना वर्तमानात आणू पाहतात. आठवणी आणि किस्से ह्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मित्राला आठवण्याची एक गत त्यांना अवगत आहे. ते सिद्धहस्त कवी आहेत. त्यांच्या आठवणी साध्या आणि लोभस आहेत. कोणत्याही प्रकारे ते कुमारजींचा सुपरहिरो करत नाहीत. ना ते आपल्या मित्राच्या नसण्याचे शोकमय वातावरण तयार करतात. कारण आपला मित्र कुठेही गेला नाहीये त्यावर त्यांच्या नितांत विश्वास आहे. आणि  त्यामुळे आपल्या अतिशय साध्या पण विचारपूर्वक केलेल्या भाषणाने ते कुमारजींचे ह्या कार्यक्रमाकडे लक्ष्य वेधून घेतायत असे वाटते. आपण ज्याप्रमाणे प्रेमाने देवाला आमंत्रित करतो. तू आमच्याकडे पहा , आमच्यासोबत जेवायला ये असे म्हणतो त्याप्रमाणे.

आता याआधी कधीही न अनुभवलेला अनुभव येतो तो म्हणजे दिल्लीच्या गांधर्व वाद्य वृंदाचा समूह्गानाचा कार्यक्रम. भारतातल्या प्रत्येक संगीतप्रेमी माणसाने घ्यायला हवा असा हा अनुभव आहे. श्री मधुप मुद्गल ह्या समूह्गानाचे संचलन करतात. मराठी ,पंजाबी, कोकणी ,राजस्थानी, बंगाली काश्मिरी, उर्दू अश्या अनेकविध भारतीय भाषांमधील लोकगीते , समूहगीते , प्रार्थना हा गायकांचा संच पाश्चिमात्य समूह्गानाच्या शैलीत सादर करतो. त्यात माळव्यातील भजने गायली जातात. रवींद्रसंगीत सादर केले जाते. ह्या समूहातील गायक नंतर एकत्र जेवताना मला आणि सचिन खेडेकरला मराठी गाणे गाऊन दाखवतात.

पहिल्या रात्रीची सांगता कुमारजींच्या एका जुन्या मैफिलीचे video recording पाहून होते. ज्याच्यासाठी आपण भारतभरातून सगळे  चाहते , स्नेही इथे जमलो तो माणूस समोर पडद्यावर अवतरतो. मी अश्या काळात जगतो जिथे मला पडद्यावर दिसणारे काही भूतकाळातले असण्याची गरज नसते. वर्तमान काळातील अनेक माणसांना मी फक्त पडद्यावरच भेटत असतो,बोलत असतो . कुमारजी त्या मैफिलीत पडद्यावर अवतरतात तेव्हा हे पूर्वी कधी होवून गेले आहे हि भावना माझ्या मनाला स्पर्शही करत नाही. लांबवर कुठेतरी हे चालू आहे असे मन समजून घेते आणि समोर कुमारजी गात असलेल्या सुरांच्या जाळ्यात मन उडी मारून टाकते. १९८० च्या आसपास मुंबईत झालेली ती मैफल आम्ही  सगळे एकत्र बसून अनुभवू लागतो. लांबवर ती चालू असते. दूरच्या देशात. दूरच्या काळात नव्हे. जणू ते कुठेसे गातायत आणि पडद्यावर ती मैफल आम्हाला लाईव्ह दिसते आहे. माझ्या शेजारी बसलेली कलापिनी अलिप्तपणे आनंदाने ती मैफल पहात आहे.त्याचवेळी समोर कुमारजींच्या मागे तानपुऱ्यावर ती बसलेली दिसते आहे. मला जाणवतात ते त्या मैफिलीतील माणसांचे कॅमेर्याला घाबरणारे जुन्या ८० च्या दशकातील मराठी माणसांचे चेहरे. भुलाभाई देसाई रोडवरील एका घरात बसून शांतपणे कुमारजींना ऐकणारी ती माणसे कॅमेरा समोर आला कि संकोच करीत आहेत. वसंत बापट सोडून. बापट तीन ते चारदा गाणे सोडून कॅमेऱ्यात डोकावून बघतायत. पण इतर माणसे त्या काळातील साजेसे वागत आहेत. वातावरणात एक साधेपणा आहे. कुणी झकपक कपडे केलेले नाहीत. कुणी उगीच काही कळत नसताना ‘क्या बात” असे आचरटपणे ओरडत नाही. कुमारजींचे गाणे हि छोटीशी प्रयोगशाळा असल्यासारखे आहे. गाताना त्यांना स्वतःला प्रमाणाबाहेर आनंद झालेला त्या कॅमेर्याने नीट टिपला आहे. ते सुराला शारीरिकता देतात. ते सुराकडे पाहिल्यासारखे करतात. त्याला हाताळ्यासारखे करतात. त्याला आकाशात सोडून दिल्याची मुद्रा करतात. गाताना त्यांच्या डोळ्यात एक पाणावलेली माया येऊन जाते. बापट अजूनही कॅमेर्यात पहातच आहेत. माझ्या शेजारी बसलेली एक धटिंगण बाई कलापिनीला धक्का मारून “ किती वयाची होतीस ग तू त्या वेळी ?” असले काहीतरी अनावश्यक विचारते आहे.

मला श्रोत्यांचे आणि प्रेक्षकांचे चेहरे बघायला फार आवडतं . मी अनेकवेळा सिनेमा पाहत असलो कि मध्येच आजूबाजूच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहत बसतो. आमच्या  अगदी शेजारी एक पोलीस उभा आहे. त्याने आपल्या बोटांनी  उभ्याउभ्या ताल धरला आहे. त्याची नजर मांडवाबाहेरील गर्दीवर असली तरी त्याच्या मनाचा एक कप्पा गाण्यात नकळत शिरला असावा. कुमारजी एका बंदिशीला विराम देवून थांबतात आणि कलापिनी पुढे जावून तो video बंद करून सर्वांना जेवणाला पिटाळते. पण  ते सुद्धा फार गोड हिंदी बोलून.

रुचकर गरमागरम आणि अनोख्या माळवी पद्दतीने तिच्या वैयक्तिक देखरेखीखाली बनवलेले अप्रतिम जेवण भानुकुलच्या अंगणात आमची वाट पाहत आहे.

क्रमश :

 

 

   करंट ५

परंपरेकडे मी अतिशय संशयाने बघत वाढलो आहे . माझे पोषण परंपरेला नाकारून नाही तर सातत्याने परंपरेला प्रश्न विचारत काळानुसार वाकवून झाले आहे . मी आजपर्यंत अनेक गोष्टी शिकलो पण कधीही कोणत्याही गुरुचे शंभर टक्के ऐकेलेले नाही. घरच्या पूर्वजांची मते प्रमाण मानेलेली नाहीत , कुणाचाही वय किंवा कुणाचाही अनुभव जास्त आहे म्हणून त्या व्यक्तीला  मी कधीही प्रमाणापेक्षा जास्त गांभीर्याने घेत नाही.

आमच्या घरात असलेली शास्त्रीय संगीताची आवड गेल्या दोन तीन पिढ्या एखादा झरा जमिनीत लुप्त व्हावा तशी नाहीशी झाली असताना माझ्या धाकट्या भावामुळे , सुयोगमुळे ती पुन्हा प्रवाही व जागती झाली. अतिशय लहान वयापासून त्याने आमच्या घरात संगीताचा अभ्यास सुरु केला आणि गाण्याचे अस्तित्व खेळते ठेवले. परंपरा कसोशीने पाळून ज्ञानार्जन करण्याच्या त्याच्या प्रक्रियेकडे मी नेहमीच संशयाने किंवा अनेक वेळा सख्खी भावंडे ज्या बेफिकीरीने एकमेकाची चेष्टा करतात त्या बेफिकीरीने पाहत आलो. माझे आयुष्य सिनेमात आणि सिनेमाच्या भोवती घडत असताना तो सर्व वेळ  शास्त्रीय संगीताचा अभ्यास करत राहिला. आणि मग फार सावकाशपणे मला हे लक्षात आले कि लिहिताना किंवा चित्रपट बनवताना जो अमूर्ततेचा ठाव आपल्याला घ्यावा लागतो ती अमूर्तता  आपल्याला संगीत ऐकल्याशिवाय उमगणार नाही. अमूर्ततेच्या ओढीने मी सावकाशपणे शास्त्रीय संगीत ऐकू लागलो. भारतीय आणि पाश्च्चात्य . दोन्ही प्रकारचे संगीत माझ्या मनातील तळघरे उपसू लागले तशी मला गाणे ऐकण्याची गोडी लागली. मला त्यातले कोणतेही ज्ञान अजूनही नाही पण गोडी आहे. ती वाढते आहे .

गाणे नव्याने ऐकू लागलेला माणूस कुमार गंधर्व ह्यांचे गाणे आवडीने ऐकत राहतो ह्याचे कारण कुमारजी नव्या श्रोत्याला कधीही दाराबाहेर उभे करत नाहीत. गाणे कळत नाही ह्याचा न्यूनगंड ते देत नाहीत.

दुसर्या दिवशी मी पहाटे उठून हॉटेलवरून चालत चालत उजाडायच्या वेळी भानुकुलमध्ये पोचतो आणि कुमारजींच्या रियाजच्या खोलीत बसून समोर सुरु असलेला कलापिनीचा रियाज ऐकतो. ती थोड्यावेळाने अंगणात गाणार आहे .गाणे संपताना ती हे म्हणणार आहे कि मी तर कुमारजींची छोटी गिलहरी आहे. खार . शिष्या नाही. मुलगी नाही. एक खार. परंपरा पाळणे , त्या जोपासणे आणि काळानुसार आपल्यात बदल घडवत , कलेची कालसापेक्ष मांडणी करत प्रयोगशील राहणे ह्याचे भान ज्याला आहे तो कुमार गंधर्व ह्यांचा चाहता आहे असे म्हणता येइल. मग तो कोणत्याही क्षेत्रातील कलाकार असो. पुण्यात चित्रपटाचा रसास्वाद शिकवताना आमचे आवडते शिक्षक समर नखाते हे म्हणतात कि परंपरा आणि नियम जरूर मोडा पण त्याआधी ते नीट समजून आत्मसात करून घ्या म्हणजे योग्य प्रकारे मोडणे सोपे जाईल. कलेच्या इतिहासाचा आणि राजकीय इतिहासाचा अभ्यासही ह्याचसाठी करायचा. कालसापेक्ष वागण्यासाठी. इतिहासाचा अभ्यास हा परंपरा पाळण्यासाठी करायचा नसतो तर त्या परंपरा प्रश्न विचारून काळासोबत वाकवून मोडण्यासाठी करायचा असतो.

इतर कोणत्याही क्षेत्रातील माणसांपेक्षा  हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील माणसे जुनाट किस्से आणि आठवणी सांगण्यात दिवसच्या दिवस घालवू शकतात. त्यात भाबडेपणा असतो त्याचप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा आणि हेवेदावे असतात. आपापल्या घराण्यांच्या परंपरेचे अभिमान असतात. जुन्या पद्धतीच्या मानापमानाच्या परंपरा पाळणे किंवा  त्या पाळल्यासारख्या दाखवणे आणि वयोवृद्ध कलाकारांचे  इगो जपणे हे दर तासाला करत बसावे लागते. तरुण कलाकारांना तर एकमेकांचे काम मोकळेपणाने आवडायला बंदी असल्यासारखे वातावरण आहे. समकालीन कलाकारांनी वादविवाद घालण्याचे आणि एकमेकांच्या कामाची परीक्षा एकमेकांना न दुखावता करण्याचे वातावरण ह्या क्षेत्रात अस्तित्वातच  नाही. त्यामुळे सर्व माणसे सतत एकमेकांच्या पाया पडत असतात आणि पाठ वळली कि कुरापती काढत बसतात. ह्या सगळ्या परंपरागत जगण्याचा गाण्याच्या गुणवत्तेशी किंवा प्रयोगशीलतेशी संबंध असतोच असे नाही.

कलापिनीने तिच्या वडिलांकडून , गुरूंकडून आत्मसात केलेली सर्वात आकर्षक गोष्ट हि कि ती समाजातील अनेक प्रकारच्या माणसांशी गप्पा मारते , त्यांच्यात रमते . गाण्याप्रमाणेच गाण्यापलीकडे जगणाऱ्या अनेक क्षेत्रातील माणसांशी मोकळेपणाने मैत्री करायचा तिचा स्वभाव आहे. त्याचे उदाहरण म्हणजे कुमारजींच्या पुण्यतिथीला देवासला एकत्र आलेली अनेक क्षेत्रातील माणसे. तसेच पंडित सत्यशील देशपांडे ह्यांच्यासारखे कुमारजींचे पट्टशिष्य. पंडित सत्यशील देशपांडे सकाळच्या सत्रात एका मोकळेपणाने  कुमारजी आणि त्यांच्या गुरु शिष्य नात्याची फोड करतात. ती करताना ते एक आकर्षक सप्रयोग व्याख्यान देतात जे गाणे समजू बघणाऱ्या  कुंपणावर बसलेल्या माणसाला सामावून घेइल. त्यांचे सत्र हे नुसत्या  पोकळ आठवणीच्या पलीकडे जाऊन गुरु शिष्य नात्याचे कारण आणि प्रयोजन सांगते. स्मरणरंजन करत नाही. त्या प्रत्येक आठवणीमागची भूमिका स्पष्ट करते.

माझ्या भावामुळे कलापिनी आमच्या घरी येऊ लागली तेव्हा  माझ्याशी गप्पा मारताना आमची दोघांची स्वयपाकाची आवड तिला उमजली. सकाळी घरात पोहे बनत होते तेव्हा  तिने पुढाकार घेऊन माळव्यात बनवतात तसे विशिष्ट चवीचे पोहे बनवले ज्याची चव अफलातून होती. त्या पोह्यात तिने फोडणी देण्याआधी मीठ हळद मिसळली आणि वरून डाळिंबाचे दाणे पेरले. ती अशी गायिका आहे जी उगाच शास्त्रीय संगीताचे गांभीर्याने अवडंबर करीत नाही. मला ती आवडते ह्याचे मुख्य कारण म्हणजे ती हसरी आहे. हा गुण हिंदुस्तानी शास्त्रीय गायन परंपरेला न शोभणारा आहे. ह्या क्षेत्रातील अनेक माणसे सतत कुणाचेतरी श्राद्ध चालू असल्यासारखी वागत असतात. लहानपणीच अकाली प्रौढत्व आल्यासारखी जगतात. ह्या वातावरणात कलापिनीची गाण्यासोबत गुरूंकडून आत्मसात केलेली आणि जोपासलेली नेटकेपणा आणि समाजप्रियता ह्याची आवड माझ्यासारख्या गाणे न समजणाऱ्या  माणसाच्या मनातील भीती आणि संकोच कमी करते. त्यामुळेच इतक्या विविध क्षेत्रातील माणसे देवासला आली आहेत.

माझ्यासोबत सचिन खेडेकर , त्याची पत्नी जल्पा आणि मराठीत अतिशय चांगला फूड ब्लॉग लिहिणारी सायली राजाध्यक्ष असे माझे मित्रगण आहेत. आम्ही सर्वचजण गाण्यासोबत उत्तम चित्रपट, उत्तम जेवण आणि दुपारच्या गाढ झोपेचे भोक्ते आहोत. ह्या दोन दिवसात भुवनेश आणि कलापिनीने जो पाहुणचाराचा मेन्यू ठरवला आहे त्याचे वर्णन करणे फार आवश्यक आहे. कारण त्या दोन दिवसात आजूबाजूला घडणारे गाणे , गप्पा आणि चर्चा ह्या गोष्टी त्यांनी कुशलतेने बनवलेल्या जेवणातून ओवून घेतल्या होत्या. हिवाळा सुरु आहे. बाजरीची गरम खिचडी आणि तूप गूळ , चविष्ट सार , इंदुरी पद्धतीचा मोकळा पुलाव ज्यात मी सकाळपासून शोधत असलेले डाळिंबाचे दाणे. रबडी आणि गोड बुंदी . दुपारच्या जेवणाआधी प्यायला समोर आलेली शिकंजी , नाश्त्याला इंदुरी पद्धतीचे जिरवण आणि शेव घातलेले गरम पोहे आणि गरम गरम कचोरी. त्यानंतर सचिनने शोधून काढलेला एक पानवाला. ह्या सगळ्यामुळे रविभैय्या दाते लहानपणीच्या गोड आठवणी सांगायला लागताच आम्हा सगळ्यांना आलेली गोड पेंग. मोकळा वाहता वारा. सतत समोर येणारा वाफाळता चहा.

उत्सवप्रिय माणसांना आपलेसे वाटेल असे वातावरण अश्या आपुलकीने आखलेल्या हिवाळ्यामधील खाजगी मैफिलींमध्ये आपसूक तयार होते . पुण्या मुंबईत होणाऱ्या भल्यामोठ्या व्यावसायिक महोत्सवांमध्ये बसून गाणे ऐकायला अशी मजा येत नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात पंडित योगेश सम्सी ह्यांचे एकल तबलावादन आणि मग उस्ताद अमजदअली खान साहेबांचे सरोदवादन .

काळ पुढे जाताना तो थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करता येतो. तो थांबत नाही. पण त्या प्रयत्नातून अश्या काही अनुभवांची मेजवानी तयार होते. मानले तर माणूस आपल्यातून गेलेला असतो. आणि मानले तर तो आपल्यात असतो. तो माणूस जाताना मागे जी उर्जा ठेवून जातो त्या उर्जेने काय घडू शकते ह्याचा प्रत्यय मला ह्या दोन दिवसात आला.

सर्व सोबतचे ओळखीचे आणि महत्वाचे लोक एकामागून एक निघून जाणार आहेत हे आपल्याला  आतमध्ये माहिती असते. प्रत्येक पुढची पिढी मग ठराविक काळाने जमून एकमेकांना आश्वासक वाटावे  म्हणून असे काही चांगले छोटे कार्यक्रम घडवून आणत असते. विजय तेंडूलकर गेले तेव्हा दोन तीन वर्षे आम्ही सगळे एकत्र जमायचो आणि गप्पा मारायचो , काहीतरी वाचायचो. दोन तीन वर्षांनी माझ्यातल्या अश्रद्ध आणि आळशी माणसाने ह्या सवयीला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मला जर काही आवडत नसेल तर ते मागे राहिलेल्या माणसांनी  एकत्र जमून कुणाचीतरी आठवण काढत बसायचे कार्यक्रम.

पण कलापिनीने माझ्या ह्या अनुभवाला आणि समजुतीला वाकवल्यासारखे केले त्यामुळे तिचे खूप आभार.

FullSizeRender

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s