करंट ( लोकसत्ता मधील लेखमाला २०१७ ) भाग ६ ते १० .

 

करंट  ६

प्रत्येक माणसाच्या व्यक्तीमत्वात इतर अनेक गुणांप्रमाणे एक महत्वाचा गुण असतो तो म्हणजे त्याचा अहंभाव . माणसाने ह्या अहंभावाचा वापर करून आजपर्यंत प्रचंड  उर्जेने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. कलाकार, शास्त्रज्ञ , संशोधक , विचारवंत , सामाजिक आणि राजकीय नेते , उद्योजक ह्यांच्यात असलेले अनेक गुण आपण तपासतो पण त्या सर्वांमध्ये असलेला एक महत्वाचा घटक आपण ओळखायला आणि मान्य करायला लाजतो किंवा संकोचतो तो म्हणजे त्या माणसाला असलेला अहंभाव (ego) आणि त्या व्यक्तीने आपल्या इगोचे आपल्या कामामध्ये केलेले रुपांतर. प्रत्येक माणसाकडे हा अहंभाव असला तरी सर्व माणसांना त्याचा चांगला वापर करण्याची बौद्धिक आणि नैसर्गिक कुवत नसते. बुद्धिमान माणसे आपली ताकद बुद्धी , त्यामुळे कमावलेले ज्ञान , त्यावर कमावलेली संपत्ती , त्या ओघाने येणारी सत्ता ह्या सगळ्याचा वापर काहीतरी नवे निर्माण करण्यासाठी वापरत राहतात ते करताना त्यांच्या मदतीला येतो तो त्यांच्या मनातील पोसलेला आणि सतत घासून पुसून ताजा केलेला अहंभाव. संकुचित वृत्तीच्या , परंपरांना शरण जाणाऱ्या आणि अर्धवट संतवांग्मय वाचून पोसलेल्या आपल्या मध्यमवर्गीय मूल्यव्यवस्थेत आपण सामान्य माणसे मानतो त्याप्रमाणे अहंभाव ही काही चुकीची भावना नाही. तिला बरोबर चूक किंवा चांगली वाईट असे ठरवता येणार नाही कारण ती  फक्त एक भावना आहे. भावनेला गुण देता येत नाही . भावनेच्या वापर करून केलेल्या क्रियेला गुणदोष देता येतात. अहंभाव हि फार आवश्यक आणि उपयोगी भावना आहे. दुर्दैवाने आपल्या सामाजिक विचारपद्धतीत आणि शिक्षणात इगोला योग्य पद्दतीने आणि योग्य प्रमाणात जपून पोसून मोठे करत कामाची ताकद वाढवायचे शिक्षण कुणीच कुणाला देत नाही. कुटुंबातहि नाही आणि बाहेरही नाही. त्यामुळे हट्टीपणा, हिंसक परंपराप्रियता आणि नाठाळपणा करणे ह्यापलीकडे ह्या भावनेचे काही काम असू शकते ह्याची जाणीव अनेकांना नसते.

मी इगोने फुललेली अनेक माणसे उत्तम कलाकृती तयार करताना , लिहिताना , भूमिका करताना , वेगवेगळे शोध लावताना पहिली आहेत. मला हे जे वाटते आहे ते आत्ता सर्वात महत्वाचे आहे , मी महत्वाचा आहे , माझा विचार हा नवा ताजा आणि आवश्यक आहे हि जाणीव जर नसेल तर कुणीही कोणतीही चांगली नवनिर्मिती करू शकत नाही.  इगो चा वापर करताना दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखणे महत्वाचे नसते तर स्वतःला महत्वाचे वाटणे हे फार आवश्यक असते. नवनिर्मितीसाठी ती एक फार अत्यावश्यक गोष्ट असते. अनेकदा कलाकार निर्मिती करताना शब्द , रंग , आकार , चाल ह्यापैकी कशाचेही प्राथमिक रूप सुचले कि आनंदाच्या भरात जातो आणि त्या उत्साहाच्या इंधनावर तो त्या प्राथमिक सुचलेल्या घटकाला आकार देत बसतो . ज्यातून काहीवेळा नवनिर्मिती होण्याची शक्यता तयार होते. एखाद्या उद्योजकाला , एखाद्या इंजिनीअर ला , एखाद्या वास्तुरचनाकाराला , एखाद्या मुरलेल्या राजकारणी माणसला , कुशल संघटकाला ह्याच पद्धतीच्या विचारप्रक्रियेतून जावे लागते. त्याचा अहंभाव  नीट वापरून नव्या कल्पनेची रचना आणि कामाची आखणी करावी लागते.आपण आपल्याला महत्वाचे मानले नाही तर आपल्या विचारांना व इतर कुणीही महत्वाचे मानणार नसते. नवा विचार सुचताना , नवे आडाखे मांडले जाताना , नवीन भूमिका लक्षात येताना आपण संपूर्ण एकटे असतो. आपल्याला काम करण्यासाठी स्वतःला फुलवून घ्यावे लागते. समोरच्या माणसाला आपल्याला सुचेलेले दिसत नसल्याने किंवा तसे दिसण्याची त्याची प्रज्ञा नसल्याने आपल्याला अहंभाव वापरून आपले नवे म्हणणे आत्मविश्वासाने साकारावे लागते. लोकांसमोर मांडावे लागते. त्यांना ते पचले नाही आणि जरी आपल्या कामाला जर अपयश आले तरी त्यावर मात करून पुन्हा नवीन कामाला सज्ज व्हावे लागते. त्यासाठी खूप मोठा इगो आपल्यात असावा लागतो. समानतेची भावना कोणत्याही निर्मितीच्या प्रक्रियेला पोषक नसते. समानता हा खूप मोठा रोमान्स आहे हे आता काळाने आपल्याला शिकवलेच आहे. ज्यांना अहंभाव फुलवून कष्टाने एकट्याने काम करता येत नाही ती अनेक माणसे समानतेचे भिरभिरे हातात घेऊन एकत्र येतात आणि सामूहिक वगैरे पद्धतीने नवनिर्मिती केल्यासारखी करून मग पुन्हा घरी परत जातात.

ज्या इगो मुळे घरातले जुने म्हातारे कालबाह्य परंपरा आणि रूढी पाळत घरातल्या सर्व माणसांची आयुष्ये नासवत बसतात , ज्या इगोमुळे दुय्यम दर्जाचे सेलिब्रिटी लोक बोलावलेल्या कार्यक्रमांना उशिरा जातात , घरी आपल्या बायकांना मारहाण करतात त्याच इगोमुळे कॅमेरासमोर उभा असलेला किंवा उघडणाऱ्या पडद्यासमोर रंगमंचावर उभा असलेला नट अप्रतिम अदाकारी दाखवून जातो. त्या इगो मध्ये फरक नसतो तर तो वापरायला शिकण्याचे ज्ञान सामान्य माणसला नसते . ते ज्ञान आणि ती ती जाणीव फक्त समाजातील काही ठराविक बुद्धिमान माणसांना आणि प्रज्ञावंत कलाकारांनाच असते. कारण अहंभाव हि दुधारी तलवार असल्याने सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोक काम झाले कि ती म्यान करून ठेवतात आणि असंस्कृत, अशिक्षित किंवा सामान्य बुद्धीचे लोक ती उघडी तलवार घेऊन बाजारात कोथिंबिरही आणायलासुद्धा जाऊ शकतात.

फेसबुकवर जाऊन अनेक माणसे काय बोलतात , समीक्षा किंवा मतप्रदर्शन करतात , तात्त्विक वादावादी करतात हे पहिले कि तलवारीचा आणि कोथिंबीरीचा मुद्द्दा आपल्याला लक्षात येऊ शकतो.

आपण सध्या आपला आब टिकवून ठेवणे विसरत चाललो आहोत. इंटरनेटवरील  सामाजमाध्यमांवर आपल्या सुरु असलेल्या अनिर्बंध आणि मोकाट शाब्दिक संचारामुळे आपल्या जगण्याचा आब हरवला आणि आपल्या मतांची किंमत रसातळाला गेली आहे. दूरदृष्टी असणारी चाणाक्ष माणसे ह्या समाजमाध्यमांवर फार विचारपूर्वक आखून मोजून मापून व्यक्त होतात. आणि उरलेले सर्व लोक सकाळी मोकाट कुत्र्यांसमोर ब्रेड टाकला कि ती कशी वसवस करतात तशी वागू लागतात. ह्याचे कारण आपल्याला समाजाने गांभीर्याने घेतले जावे ह्यासाठी आपल्यापैकी अनेकजण जीवाच्या आकांताने धडपड करत आहोत. समाजमाध्यमावरील आपला अनियंत्रित शाब्दिक संचार हा काही वेळाने व्यसनाचे स्वरूप घेतो आणि मग व्यसनी माणूस जसा व्यसनासाठी  इस्टेट  विकायला मागेपुढे पाहत नाही तसे आपण नकळत ह्या ठिकाणी स्वतःचा अहंभाव पणाला लावून खेळ खेळू लागतो.  सतत बदलत्या काळामुळे जुन्या  होत जाणाऱ्या अनेक जाणत्या व्यक्ती मला रोज सकाळी ह्या भिंतीवर आपली भरपूर धुलाई करून घेताना दिसतात. त्यांना काहीही करून आपला स्व ह्या क्रूर वेगाने बदलत्या काळात जपायचा असतो. पण त्यांना हे कळत नसते कि कुणीही अनिर्बंधपणे आणि काळवेळ न ओळखता आपले विचार रोजच मांडू लागले कि तुम्ही पुढील पिढीचे करमणुकीचे साधन बनता. अश्या अनेक म्हाताऱ्या विचारवंतांना , कालबाह्य समीक्षकांना , जुन्या कार्यकर्त्यांना , काळाचे भान सुटलेल्या नटांना , दमलेल्या लेखकांना , स्वप्निल कवींना  उसकवून , रोज सकाळी बोलायला भाग पाडून त्यांची करमणूक पाहत फिदीफिदी हसत बसणारी तरुण पिढी जन्माला आली आहे. ती पिढी तुमचा अहंभाव दुखावते. मग तुम्ही तुमचा उरलेला सगळा अहंभाव पणाला लावून आपले शहाणपण त्यांना शिकवत बसता. दुखावले जाता. आणि हाच खेळ खेळणे हे त्या बसमधून ऑफिसला निघालेल्या तरुण मुलांचे उद्दिष्ट असते.

शब्दाला महत्वाचे मानणाऱ्या , कामाची मूल्ये जपणाऱ्या पण कालबाह्य झालेल्या माणसाला स्वतःचा अहंभाव सांभाळणे सध्या ह्या काळात खूप अवघड होवून बसले आहे. तो अहंभाव जपण्याची तारेवरची कसरत करत , तरुण पिढीशी संवाद साधण्याचे प्रयत्न करत , आपण जुने झालेलो नाही आणि  आपण कधीही जुने होणार नाही हे नव्या पिढीला पटवत रोज जगणे सोपे नसते. कारण आपण जुने झालो आहोत हे आपल्याला माहिती असते. अश्या वेळी रंगीत टी शर्ट घालून लहान मुलांच्यात जाऊन नाचले तर आपण वेडेबिद्रे आणि भेसूर दिसतो हे सध्या अनेक लोकांना कळेनासे झाले आहे. घरात बसून एकटे वाटते आणि बाहेर गेले कि भांबावून जायला होते त्यामुळे समाजमाध्यमांवर नवेपपणाची लिपस्टिक लावून अनेक लोक ‘मला तुमच्यात सामील करून घ्या’ असे म्हणण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात त्या लोकांनी स्वताचा आब राखून आपल्या अहंभावाला नीट जपणे फार आवश्यक आहे.

 

करंट 7

 

दृश्यकलेचे साक्षात्कार . भाग १ .

भारतातील आणि जगातील समकालीन दृष्य्कलेचे खरे प्रदर्शन जर पहायचे असेल तर दृष्य्कलेवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने केरळमध्ये दर एका वर्षाआड होणाऱ्या ‘कोची मुझीरीस बिएनाले’ ह्या कोचीन  शहरभर पसरलेल्या आंतरराष्ट्रीय  प्रदर्शन सोहळ्याला आवर्जून जायला हवे.

दृश्यकलेचे भान, त्यात देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सद्यपरिस्थितीत चालू असणारे प्रयोग आणि उमटणारे आवाज समजून घेणे माझ्यासारख्या चित्रपट बनवणाऱ्या आणि मातृभाषेत लिहिणाऱ्या माणसाला फार आवश्यक ठरते. याचे कारण वृत्तपत्रे ,समाजमाध्यमे , संगीत, चित्रपट आणि पुस्तके ह्यांच्या पलीकडे जाऊन माहितीच्यापल्याडचे अनुभव घेण्याची सवय आणि क्षमता वाढवण्याचे काम ह्या प्रवासात बघायला मिळालेली अनेक प्रदर्शने करतात. मी ह्या अनुभवाचा फार लहानपणीपासून भुकेला आहे. माझे मन अश्या ठिकाणी आपोआप धाव घेते.

अश्या ठिकाणी जाऊन तिथे मांडलेले काम समजून घेण्यासाठी कपाळावर कमी आठ्या असायला हव्यात. किंबहुना जर इच्छा असेल तर त्या पुसण्याचे काम अशी प्रदर्शने करतात. मला हे समजत नाही म्हणजे हे टाकावू आहे हा बेगुमानपणा माझ्यातून घालवला तो मी अनेक जगातील शहरात प्रवास करून आवर्जून पाहिलेल्या अमूर्त दृष्य्कलेच्या प्रदर्शनांनी.

कोचीनला होणारे हे भारतातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन दर दोन वर्षातून एकदा होते. जगातील अनेक शहरांमध्ये अश्या प्रकारे दर दोन वर्षांनी दृष्य्कलेचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरावून जगभरातील उत्तम कलाकारांना तिथे काम दाखवण्यासाठी  आमंत्रित करायची परंपरा आहे. इटलीमधील वेनिस शहरात होणारे बिएनाले (दर दोन वर्षांनी होणारे) प्रदर्शन जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शांनापैकी एक असे आहे. बिएनाले प्रदर्शन हा शहरभर सुरु असलेला दृश्यकलेचा सुंदर सोहळा असतो.

कोचीन शहराची दोन रूपे आहेत. भारतातील महत्वाच्या बंदरांपैकी ते दक्षिणेतील एक प्रमुख बंदर आहे. तेल आणि वायू उत्पादन , मसाल्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार , केरळच्या उद्योगजगताची राजधानी आणि मल्याळी चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र असा ह्या शहराचा एक चेहरा आहे. स्थलांतरप्रिय आणि अतिशय कष्टाळू असणाऱ्या मल्याळी नागरिकांनी जगभरात कमावलेला पैसा घरी पाठवून ह्या शहराचे आधुनिक रूप साकारले आहे. ह्या नव्या गजबजलेल्या , ज्याला  आपण रेल्वेच्या मार्गावरील एर्नाकुलम म्हणून ओळखतो त्या शहरापासून बेटांना जोडणारा खाडीचा पूल ओलांडून पश्चिमेला गेले कि फोर्ट कोची हे सुंदर शांत बेट आपल्याला गवसते. हा जुना पोर्तुगीज भाग अजूनही युरोपातील एखाद्या सुंदर जुन्या गावासारखा होता तसा जपून ठेवलेला आहे. कोचीनचे बिएनाले ह्या भागात होते. ह्याचे कारण ह्या भागाला लाभलेला जुना शांत समुद्रकिनारा , हेरीटेज प्रभाग म्हणून इथे जपलेल्या शेकडो वर्षे जुन्या पोर्तुगीज वास्तू , त्या हजारो जुने वृक्ष आणि मुख्य म्हणजे सर्व बेटावर विखुरलेली पोर्तुगीजांनी मसाल्याच्या व्यापारासाठी बांधलेली अतिप्रचंड जुनी लाकडी गोदामे. ह्या गोदामांची लांबी रुंदी त्यांच्या इतिहासाइतकीच मोठी आहे. ह्या अनेक महाप्रचंड गोदामांचा कल्पक वापर ह्या शहरातील प्रशासनाने बिएनाले ह्या द्वैवार्षिक  प्रदर्शनासाठी करून घेतला आहे. ह्या सर्व प्रदर्शनावर जायफळ , दालचिनी तसेच मिरीचा जुना गंध पसरला आहे.

फोर्ट कोची ला गेले कि नेहमी मला माझ्यातून आपोआप गायब झालेला जुना निष्पापपणाचा परफ्युम आठवतो. काळाने तो ओढून नेला. उत्सुकता नेली , ओढ नेली , एखाद्या व्यक्तीसाठी , अनुभवासाठी झुरण्याची शक्यता नेली , निवांतपणा गेला . काही गोष्टी हव्या असतील तर काही सोडाव्या लागतील हे लहानपणी असणारे धाक गेले. आपल्यापाशी कमी गोष्टी असल्याने निवड करायची श्रीमंती आपल्याला नाही हि पूर्वीची जाणीव गेली. फोर्ट कोची ह्या बेटावर संध्याकाळी सात वाजता सामसूम झाली कि शांतपणे पायी फिरताना मला निघून गेलेले सोपेपण आठवते. जुना काळ परत आणण्याची मला कधीच इच्छा नसते पण हरवून गेलेले सोपेपण परत यावे असे मनाला वाटत राहते. इथली मैदाने , जुने वृक्ष , जुनी वास्तुरचना , इथल्या स्थानिक बेकरीमध्ये म्हाताऱ्या बायकांनी भाजेलेले पाव आणि रंगीत मायाळू केक खाताना , जेवणाच्या टेबलावर केळीच्या पानावर हलकी मिठ्मिरी लावून पहुडलेले मासे पाहताना मला आपले काहीतरी चुकून निसटून गेले आहे हि भावना दर वेळी येते. मी फोर्ट कोचीला ह्या अनुभवासाठी जातो. सूर्य मावळताना येणारा तो खाजगी अनुभव मी वर्षानुवर्षे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो पण मला तो मांडता येत नाही. नेमका ह्या वेळी बिएनाले बघताना एव्हा माग्यारोजी ह्या अतिशय तरुण हंगेरियन कावयीत्रीच्या कविता माझ्यासमोर आल्या आणि मला जे अस्वस्थ वाटते ते नक्की काय वाटते आहे ह्याची पुसटशी जाणीव मला होवू शकली. अश्या काही क्षणी आपण रोजची कामेधामे टाकून लांबवर प्रवास करून काहीतरी पाहायला आलो ह्याने फार बरे वाटत राहते.

२०१२ आणि २०१४ साली ह्या प्रदर्शनाच्या दोन आवृत्त्या होवून गेल्या आणि ह्या काळात कोचीनमधील ह्या प्रदर्शनाने मोठे आणि महत्वाचे स्वरूप धारण केले . शिवाय त्याला आंतरराष्ट्रीय स्वरुपासोबत एक राष्ट्रीय स्वरूप आले. भारतात अनेक आंतरराष्ट्रीय गोष्टी आहेत पण दुर्दैवाने त्या देशातील लोकांना आवडतील अश्या स्वरूपाच्या नसतात. किंवा कुणाला त्याची माहितीच नसते. तसे ह्या प्रदर्शनाचे झालेले नाही. भारतातील दृष्यकलेचे ते निर्विवादपणे महत्वाचे प्रदर्शन केंद्र बनले. गेले तीन दिवस मी ह्या शहरात अनेक उत्तम कामे पाहत पायी फिरताना मला देशभरातले अनेक विद्यार्थी, प्रवासी , मित्र रस्त्यात अचानक भेटले . आम्ही गप्पा मारल्या , एकत्र फिरून प्रदर्शने पहिली . त्यात दृष्य्कलेच्या क्षेत्रात काम करणारी माणसे होतीच पण त्यासोबत अनेक वास्तुरचनाकार होते , चित्रपट दिग्दर्शक होते , कवी होते , केरळ मध्ये फिरत फिरत असताना ‘’हे बिएनाले म्हणजे काय रे भाऊ? जरा बघून येऊ’’ असे म्हणून आलेले तरुण प्रवासी होते  ह्यावरून हे लक्षात येते कि ह्या प्रदर्शनाची व्याप्ती आणि महती आता मोठी होत जाते आहे. सर्वात आश्वासक गोष्ट जर कोणती असेल तर कोचीनमधील अनेक शाळांनी आपल्या विद्यार्थांसाठी ह्या प्रदर्शनाच्या सहली आखल्या आहेत.

२०१२ साली बोस कृष्णम्माचारी आणि रियाज कोमू हे ह्या प्रदर्शनाचे निवडप्रमुख ( curator ) होते. २०१४ साली जितिश काल्लात ह्यांनी निवडप्रमुख म्हणून काम पाहिले. २०१६ सालच्या डिसेंबर पासून २०१७ सालच्या मार्चच्या शेवटापर्यंत चालणाऱ्या ह्या तिसऱ्या आवृत्तीचे निवडप्रमुख सुदर्शन शेट्टी हे आहेत. अतिशय बारकाईने आणि सजगतेने वर्तमानाचा नेमका आढावा घेणे ह्या सर्व व्यक्तींना फार चांगले जमले आहे कारण हे चारहीजण आज भारतातील प्रमुख दृश्यकलाकार आहेत.

दृश्यकला हि संज्ञा चित्रकलेपेक्षा विस्तृत आहे. फोटोग्राफी , शिल्पकला , चित्रकला , व्हिडीओ कला , हस्तकला , लाकूडकाम , भौतिक शास्त्राशी जवळचे नाते सांगणारी कायनेटिक आर्ट , भित्तीचित्रे , आणि एकल कलाकाराने केलेलं साभिनय सादरीकरण ह्या सगळ्या माध्यमांचा अंतर्भाव दृश्यकला ह्या संज्ञेत होतो. इजलवर कागद लावून त्यावर रंगाने काम करणे ह्या आपल्याला ज्ञात असलेलेया कलासादरीकरणाच्या पारंपारिक स्वरूपाच्या लाखो मैल पुढे जाऊन आज कलेचा साक्षात्कार जगातले अनेक लोक वेगवेगळी माध्यमे वापरून करतात . त्या सर्व कलांचा अंतर्भाव ह्या दृष्य्कालेच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात केला जातो.

उमेश कुलकर्णी हा माझा मित्र ह्या प्रदर्शनात असलेल्या लघुपटांच्या विभागाचा निवडप्रमुख आहे. भारतातील अनेक महत्वाच्या फिल्म स्कूल मधील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांत बनवलेल्या short फिल्म्स पाहून , उत्तम फिल्म्स निवडून उमेशने इथे एक तीन दिवसांचा कार्यक्रम आखून दिला आहे. तो इथे असणार होता आणि आम्हा दोघांची दर वर्षी घडणारी केरळवारी ह्या वर्षी राहिली होती म्हणून मी अचानक उठून इथे निघून यायचा बेत ठरवला. प्रिया बापट हि माझी मैत्रीण ह्या हिवाळ्यात कोणताही नवीन सिनेमा साईन न करता एकटी भारतभर प्रवासाला निघाली होती. तामिळनाडू, मेघालय असे वेडेवाकडे प्रवास ती एकट्याने करत होती. तिने माज्यासोबत अचानक केरळला यायचे ठरवले. मेघालयहून ती परत येताच आम्ही केरळला निघालो .

क्रमश :

 

करंट ८

दृश्यकलेचे साक्षात्कार : भाग दुसरा.

अमूर्त कलेला घाबरून त्याची चेष्टा आणि थट्टा करण्याचे वातावरण लहानपणी माझ्या आजूबाजूला पुष्कळ होते. हे मी सांगतो आहे ते नौव्वदच्या दशकात स्वतःला महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र म्हणवून घेणाऱ्या पुण्यामध्ये. मग इतर ठिकाणच्या परिस्थितीचा विचारच न केलेला बरा. त्याच त्याच जुन्या नाटककारांच्या प्रसिद्ध संहिता उगाळून त्या झिजवत त्यांच्या उष्णतेवर आपल्या जुन्या आठवणी कुरवाळत रंगभूमीवर फार मोठे काहीतरी केल्याचा आव आणत महाराष्ट्र जगत असला तरी आधुनिक दृश्यकला , चित्रपट आणि आधुनिक संगीतातील जिवंत प्रयोग ह्या बाबतीत महाराष्ट्र भारतातील अनेक राज्यांपेक्षा ऐंशीच्या दशकातच खूप मागे पडलेला होता. M F हुसेनच्या चित्रांची चेष्टा करत बसणे , सध्याच्या काळात काम करणाऱ्या नव्या चित्रकारांची नावेही कुणाला माहिती नसणे , अमूर्त कलाप्रयोगांना फिदीफिदी हसणे हे मी दहा वर्षाचा मुलगा असताना माझ्या आजूबाजूला घरात आणि शाळेत वातावरण होते.

मुंबईत चालू असलेल्या दृष्य्कलेतील मोठ्या आणि महत्वाच्या उलाढाली आपल्या गावीही नव्हत्या. आमच्या शहरातील उद्दाम, उद्धट आणि परंपराप्रिय कलात्मक वातावरणाने उर्वरित जगाचे कोणतेही नुकसान झाले नाही. जगात होणाऱ्या उलाढालींचा परिणाम आधुनिक भारतीय दृष्य्कलेवर ठाशीवपणे होत होता. भारतात इतर प्रांतामधील कलाकार दृश्यकला , चित्रपट तंत्र आणि संगीत ह्या क्षेत्रात खूप पुढचे काम करीत होते.

‘रोजा’ हा मणीरत्नम ह्यांचा चित्रपट जेव्हा पाहिला तेव्हा आमच्या पिढीला आपली महाराष्ट्रातील सांगीतिक आणि दृश्यात्मक तांत्रिक जाणिव किती जुनाट होवून राहिली आहे हे उमजले. मुंबईत झालेल्या दंगली , बॉम्बस्फोटांची मालिका आणि त्यानंतर बदलेलेले सामाजिक जीवन ह्याचा मोठा परिणाम महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत राहून काम करणाऱ्या अनेक भाषिक आणि अनेक प्रांतीय कलाकारांच्या कामावर झाला. माझ्या पिढीच्या कामाला आणि शहरात जगण्याच्या अनुभवाला मुंबईच्या दंगली आणि स्फोटांनी महत्वाचा आकार दिला. आमच्या पिढीच्या मनातील भीती अंधाराची नाही. बॉम्बची आहे. मी दंगलीनंतर कायमच्या अस्थिर आणि अविश्वासू झालेल्या मुंबईतला स्थलांतरित आहे.

माझ्या शालेय काळात माधुरी पुरंदरे ह्यांनी पिकासोचे चरित्र मराठीत आणले नसते ,श्री पु भागवतांनी ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक प्रभाकर बरवे ह्यांच्याकडून लिहून घेतले नसते , सुधीर पटवर्धन ह्या प्रयोगशील आणि आधुनिक चित्रकाराने भारतीय चित्रकलेविषयी व्याख्यानाची मालिका गुंफली नसती तर आमच्या पिढीचे फार मोठे नुकसान झाले असते असे आज मला वाटते. माधुरी पुरंदरे , अरुण खोपकर , सुधीर पटवर्धन , शांता गोखले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आजच्या काळात अभिजित ताम्हाणे ह्यांनी आधुनिक भारतीय चित्रकलेविषयी , दृश्यकलेविषयी सतत लिखाण करून , व्याख्याने देऊन , लेख लिहून आमच्यासारख्या अनेक मराठी वाचकांना आणि वर्तमान समजून घेण्याची आसक्ती असणाऱ्या विद्यार्थाना त्याविषयी जागरूक ठेवले. शांता गोखले आणि अभिजित ताम्हाणे ह्यांचे विशेष आभार मानायला हवेत ह्याचे कारण कलेच्या वर्तमानाचे  नेमके टिपण आपल्या सकस वृत्तपत्रीय लिखाणातून ते दोघे सातत्याने करीत राहिले. अरुण कोलटकर , दिलीप चित्रे आणि प्रामुख्याने विलास सारंग ह्या त्रयीच्या साहित्यातून आधुनिक दृश्यात्मकता आणि विस्तृत जगाचे पडसाद आमच्यापर्यंत पोचत राहिले. साहित्य , चित्रपट आणि दृश्यकला ह्यातील अमूर्ततेला घाबरायचे नाही. समजून घ्यायचा प्रयत्न करायचा ह्याची जाणीव ह्या माणसांच्या कामाने आम्हाला करून दिली. ह्याच काळात चंद्रकात काळे आणि आनंद मोडक ह्या दोघांनी मराठी कविता आणि  लोकसंगीतामधील गोडी वाढावी आणि त्यातील अंतर्गत दृश्यात्मकता समोर साकारली जावी ह्यासाठी एकामागून एक अप्रतिम सांगीतिक कार्यक्रम सादर केले. अमूर्ततेचे चांगले भान ह्या अनेक लोकांच्या प्रयत्नामुळे आम्हाला येत गेले.

ह्या सर्व उर्जेला आणि उपक्रमांना  समजून घ्यायला लहान वयात आम्हाला प्रयत्न करावे लागले. अनेक वेळा पुस्तके आणि चित्रे लोकांकडून मागून वाचावी पहावी लागली. आमच्या घरी , शाळेत अशी  पुस्तके , चित्रांचे संग्रह नव्हते. मी गेल्या आठवड्यात केरळमधील शाळांच्या सहली कोचीनमध्ये बिएनाले पाहायला आल्या होत्या तेव्हा मला बरे वाटले ते ह्या एका कारणाने . लहान वयात त्या मुलांची वर्तमानाशी ओळख होते आहे म्हणून.

मी प्रभाकर बरवे ह्यांची चित्रे मुंबईच्या आधुनिक राष्ट्रीय चित्र संग्रहालयात भारावल्यासारखी पहिली आणि ‘कोरा कॅनव्हास’ हे त्यांचे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून काढले होते. अंजली एला मेनन ह्या भारतीय कलाकाराचे काम मी त्यांचे एक छोटे चित्र एका पुस्तकात सापडले म्हणून उठून मुंबईला जाऊन पाहून आलो. घरबसल्या दारापाशी कुणीही काही आणून देत नाही, आपली भूक असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतात. वासुदेव गायतोंडे ह्यांच्या चित्राकडे कसे पहावे ह्याची जाणीव देणारे तेव्हा माझ्या आयुष्यात कुणीही नव्हते.

माझ्या आजूबाजूचे असलेले साचेलेले निवांत सांस्कृतिक वातावरण माझ्यासाठी घातक आहे हि जाणीव माधुरी पुरंदरे ह्यांच्या पिकासोच्या मराठीतील चरित्राने पहिल्यांदा मला झाली. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत हे पुस्तक मी बसून सलग वाचून काढले आणि मला लक्षात आले कि आपण फार साचेबद्ध डबक्याच्या वातावरणात जगत आहोत. आपल्याला त्वेषाने इथून बाहेर पडायला हवे. इंग्रजी भाषा शिकून, बोलायचा आणि लिहायचा सराव करुन जगात घडणाऱ्या अनेक नव्या गोष्टींशी संपर्क वाढवायला हवा. नाहीतर आपले काही खरे नाही. नौवद सालातील हे सगळे  मला ह्या महिन्यातील कोचीनच्या प्रवासात बिएनाले प्रदर्शन बघताना पुन्हा पुन्हा आठवत राहिले .

कोचीनच्या कलाप्रदर्शनात एका मोकळ्या जागी भलामोठा पिरॅमिड उभारला आहे. माती आणि शेणाने सारवलेला . आत जायला एक छोटे दार . आपण आत शिरलो कि संपूर्ण अंधार. काळामिट्ट. आपोआप आजूबाजूच्या मातीच्या भिंतीचा आधार आपले हात घेतात. आणि आपण वळणे घेत जाणाऱ्या अंधाऱ्या वाटेवरून पुढे पुढे चालत राहतो. आणि सावकाश कानावर अनेक आवाज यायला लागतात. कविता वाचल्या जात आहेत. अनेक भाषांमध्ये. मातीच्या भिंतीमागे स्पीकर दडवले आहेत. त्यातून अनेक कविता वाचले जाण्याचे आवाज येत आहेत. ज्या कवींना त्यांच्या देशामधून हद्दपार केले गेले त्या जगभरतील अनेक हद्दपार कवींच्या त्या कविता आहेत. संपूर्ण अंधारात अनेक कविता ऐकत ऐकत अरुंद वाटेने आपण पुढे पुढे सरकत राहतो आणि अचानक बाहेर पडतो. युगोस्लावियामधील अलेश ष्टेजेर ह्या कलाकाराने बनवलेले हे इंस्टॊलेशन. माझ्यासाठी ह्या प्रवासातील एक महत्वाची आठवण.

सुनील पडवळ ह्या मुंबईतील कलाकाराने अनेक जुन्या वस्तू , फोटो आणि यंत्रे ह्यांच्या मांडणीतून गतकाळातील मुंबई शहराचे सत्व दोन दालनामध्ये मांडले आहे. तिथे भिंतीवर टांगलेले जुने दोन टाईपरायटर बघताच माझी बोटे शिवशिवतात. चोरी करावीशी वाटते. ते घेऊन धावत सुटावे वाटते. आणि वातावरण असे आहे कि चोरीला मी माझी सादरीकरण कला असे म्हणून न्याय मिळवू शकतो.

राउल झुरिता ह्या चिले देशातील कलाकाराने एका महाप्रचंड गोदामात जमिनीवर समुद्राचे पाणी भरले आहे. त्या पाण्यातून चालत चालत आपण  खूप लांबवर समोरच्या भिंतीवर लिहिलेली एक कविता वाचायला जायचे आहे . Sea Of Pain हे त्याचे २०१६ साली बनवलेले installation. सिरीयन निर्वासितांना युरोपमध्ये शिरताना सोसायला लागलेल्या यातना त्या कवितेत उमटल्या आहेत. ती कविता वाचायला आपण तो समुद्र चालत ओलांडायला हवा. मग ती आपल्याला सापडेल.

भरत सिक्का हे आपल्या देशातील एक महत्वाचे फोटोग्राफर . त्यांचे काश्मीरमधील दाहक फोटोची मालिका ह्या प्रदर्शांचा भाग आहे . ते फोटो एका जुन्या मोडकळीला आलेल्या वाड्यात जीर्ण भिंतीवर लावले आहेत. बिएनालेच्या संचालकांचे हे वैशिष्ठ्य आहे  कि त्यांनी जुन्या कोचीनमधील वास्तूंचा कलाप्रदर्शनासाठी फार कल्पकतेने वापर करून घेतला आहे.

ह्या बिएनलेच्या आवृत्तीत चीनी कलाकारांनी भव्य आकारात सादर केलेली video आर्ट्स कलेविषयी असलेल्या  आपल्या प्रस्थापित दृष्टीला मोडून फेकून देतील अशी आहेत. त्या video मधील राक्षसी आकारमानाची दृश्ये आणि भयावह रंगसंगती आपल्याला मोबाईल फोन वर खेळल्या जाणाऱ्या गेम्सच्या जगात घेऊन जाते. पण फार मोठ्या आकारात , शेकडो फुट लांब अश्या पडद्यावर . त्या दृश्यमालिकांना कोणतीही कथा पटकथा नाही . तंद्रज्ञान आणि सतत येणाऱ्या नवीन उपकरणांच्या काळात उमललेली ती एक न संपणारी अस्वस्थ आणि अथकपणे काही न उलगडता पुढे जात जाणारी चित्रमालिका आहे. कंटाळा आल्यावर हल्ली माणसे वाकडा चेहरा करून मोबाईल बाहेर काढून त्याची रागाने बटने दाबत बसतात तश्या भावनेची.

अमूर्ततेच्या सवयीने तुमच्या मनातील परक्या अनुभवाविषयीचा राग कमी होतो . मिसळण आणि भेसळ ह्याविषयी तुम्ही सजग होता. शुद्धतेच्या फंदात पडणे हे वेळ वाया घालवणे आहे हे आपल्याला लक्षात येऊन फार महत्वाचे असे राजकीय आणि सामाजिक भान आपल्या मनात सावकाश उमलत जाते. त्यामुळे शांत अमूर्त अनुभवाची आपल्या समाजाला आणि जगण्याला पूर्वी नको होती तितकी आज गरज आहे ह्याची जाणीव कोचीनमध्ये होणाऱ्या बिएनालसारख्या प्रकल्पामुळे मनात तयार होते.

भारतातील हिवाळ्यात घरात बसून राहू नाही. उठावे आणि चालू लागावे. मार्च महिना संपेस्तोवर कोचीनला बिएनाले चालू राहणार आहे.

 

करंट ९

जुने होणे    

माणसाचे नैसर्गिक आयुर्मान वाढले असल्याने, ज्यांना आयुष्यभराच्या कष्टानंतर एक साधारण सांपत्तिक स्थैर्य लाभले आहे अशी आजूबाजूची वयाने ज्येष्ठ माणसे सध्याच्या काळात वृद्धत्वाला घाबरत नाहीत असे दिसून येते. वयाच्या साठीनंतरही अनेक क्षेत्रात तुम्ही चांगले काम करीत पुढची दहा पंधरा वर्षे सहजपणे कार्यरत राहू शकता. त्यासाठी इच्छा लागते आणि अंगात बौद्धिक मांद्य आणि आळस नसेल तर फार बरे आयुष्य जाऊ शकते.

प्रश्न उरतो तो जुने होण्याचा. म्हातारे नाही तर जुने. ज्याला इंग्रजीमध्ये OUTDATED म्हणतात ते. सध्या सर्व माणसे जर कोणत्या एका गोष्टीला घाबरत असतील तर ती जुने होण्याला घाबरतात. म्हातारे नाही. कारण सध्या काळ असा आहे कि कोणत्याही कार्यक्षेत्रात चाळीशीच्या वरची माणसे हि अडगळ ठरू लागलेली असते. त्यामुळे म्हातारपण वगरे शब्द आपल्याला घाबरवत नाहीत. चाळीस वर्षांच्या वरील माणसांना सतत वेगाने बदलणाऱ्या काळातील गणिते समजून नवे गीयर सतत टाकावे लागतात नाहीतर आपण फार नकळतपणे कोपऱ्यात सरकवले जातो. वार्धक्य , कुणी घर देता का घर?  मुले घरी विचारत नाहीत असले बावळट प्रश्न आमच्या पिढीला कधीही पडणार नाहीत. सर्वात मोठा प्रश्न उरेल तो म्हणजे आपल्याला काम करायची उर्जा असूनही , आपण सजगपणे स्वतःला नव्या जगाशी जुळवून घेत बसण्यात जर कमी पडलो तर कुणीहि आपला अपमान करीत नाही किंवा आपल्याला वाईट वागवत नाही पण फार चलाखीने पन्नाशीला आलेल्या माणसांना जग नकळत हळुवारपणे बाजूला सारून टाकते. त्यासाठी साठी वगरे येण्याची वाट पहावी लागत नाही. तुम्ही कार्यरत असता पण  तुम्ही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत नसता. तुमची सही लागते पण तुमचे मत नको असते. त्या वयाच्या माणसांना आदर सन्मान वगरे दिला , त्यांची जुनी तीच ती मते ऐकून घेतली , त्यांच्या लिखाणाची दोन पुस्तके प्रकाशित केली, त्यांच्या फेसबुक वरील post लायिक केल्या कि त्या माणसांना बरे वाटते. पण नवीन उर्जा आणि भूमिका तसेच कामाच्या धोरणाची आखणी ह्या बाबतीत आजची पन्नाशीला आलेली पिढी एकारलेली , तर्कट आणि हास्यास्पदरित्या जुनी होत चालली आहे. ह्याचे कारण त्या पिढीची analog विचारसरणी आणि अतीव जुना आदर्शवाद . जुनी पारंपारिक मूल्यांची चौकट न सोडण्याची इच्छा . ह्या माणसांचा चांगुलपणासुद्धा कंटाळवाणा असतो कारण त्यावर जुन्या आदर्शवादाची पिवळट साय जमून राहिलेली असते. त्यांचे  शरीर तंदुरुस्त असले तरी मन वाळू लागलेले असल्याची सोपी नैसर्गिक अवस्था आलेली असते . भारतात हे घडताना जास्त दिसते कारण भारतात वय ह्या गोष्टीला फार पूर्वीपासून गरजेपेक्षा जास्त महत्व दिले गेले आहे. जो वयाने ज्येष्ठ तो जाणता असतो , हि जुनी समजूत बाळगून , वयाचा लॉलीपॉप चघळत अनेक माणसे सध्या जीन्स  आणि T shirt घालून पन्नाशीला पोचतात. हि माणसे साधारपणे भारतीय स्वातंत्र्याच्या आसपास दहा पंधरा वर्षांत जन्मून वाढेलली पिढी आहे. अशी माणसे सध्या भारतात प्रमुख पाहुणे म्हणून जिथे तिथे बोलावली जातात. त्यांना कामात सहभागी करून घेण्यापेक्षा त्यांचा मुलाखती घेणे , त्यांचा सत्कार करणे , त्यांचे सामाजिक मुद्द्यांवर मत विचारणे , असे सगळे करून त्यांना गुंतवून ठेवता येते आणि नव्या पिढीला काम करायची मोकळीक मिळते हे त्यामागचे सोपे कारण आहे. वय आणि अनुभव. वय आणि शहाणपण ह्याचा संबंध गेल्या पंधरा वीस वर्षात मोडीत निघाला आहे.

हि पिढी हल्ली शरीराने अतिशय फीट असते. कुठूनही कुठेही फिरू शकते. भरपूर वेळ बोलू शकते. लोकांचे तासनतास ऐकू शकते आणि ह्या अनुभवातून त्यांना आपण व्यग्र आहोत असा भास निर्माण होतो. तेव्हढे त्या पिढीला पुरते. त्यांचा आदर केला कि ते आपल्याला फार त्रास देत नाहीत.आजच्या काळात जर सगळ्यात पाप कोणते असेल तर रिकामे असणे. माणसाला रिकामे असण्याची भीती वाटते कारण रिकाम्या वेळेत करायच्या काही पोषक आणि आवश्यक गोष्टी आपल्याला शिकवलेल्या नसतात. माणसांना छंद नसतात. नवीन गोष्टी शिकण्याची आस नसते. प्रवास करायची सवय नसते. नव्या माणसांशी जुळवून घेण्याची जाण नसते. अनेक माणसे मला माहिती आहेत ज्यांना आकर्षक लोकसंग्रह करण्याची कलाच माहित नसते. कारण पैसे कमावणे आणि व्यवहार  ह्यापलीकडे अनेक माणसांनी  आयुष्यभर काहि केलेले नसते. आठवडाभर पैसा कमवायचा आणि शनिवार रविवारी झोपायचे किंवा प्यायचे , किंवा वृत्तपत्रीय पुरवण्या वाचत चर्चा करायच्या असे आयुष्य अनेक माणसे सहजपणे जगत आलेली असतात. आदर्शवादाचा भास हा व्हिस्कीच्या ग्लासइतकाच मस्त असतो.  अशी माणसे भारतात प्रमुख पाहुणे किंवा सभेचे अध्यक्ष म्हणून बसवण्यास अतिशय मुबलक उपलब्ध असतात असे आपल्याला सध्या दिसते.

जुने होणे हि गोष्ट घडते त्या लोकांच्या बाबतीत ज्यांना आयुष्यभर इतर कुणाच्यातरी संदर्भाने जगण्याची सवय असते. कुटुंब, स्वतः उभारलेले आणि वेळच्यावेळी बंद न केलेले व्यवसाय , सामाजिक काम करणाऱ्या संस्था , मित्रमंडळ आणि त्याचे जुने अड्डे. हजारो माणसे हि अश्या सामूहिक संदर्भात जगत आलेली असतात. व्यक्ती म्हणून त्यांना सोलून बाजूला ठेवले तर ती वाऱ्यावर उडून जातील अशी त्यांची आयुष्य असतात. आपण ताजे , नवे किंवा जुने हे लोकांच्या संदर्भाने जगल्यावर होतो. जी माणसे एकल वृत्तीची व शांतपणे स्वतःचे मार्ग आणि काम शोधणारी असतात त्यांना ह्या बदलत्या काळात outdated होण्याची कोणतीही शंकासुद्धा येत नाही.

माझ्यासाठी माझ्या माहितीतील अशी दोन हुशार माणसे आहेत. दोन वेगळ्या पिढीतील आणि संपूर्ण वेगळ्या वातावरणात जगणारी. एक आहेत कवी लेखक आणि दिग्दर्शक  गुलजारसाहेब. आणि दुसरे आहेत परममित्र मिलिंद सोमण . हो दोन्ही माणसे त्यांचा अभ्यास करावा इतकी वेगळी आणि हुशार आहेत. बुद्धिमान आहेत , कार्यरत आहेत , शारीरिक पातळीवर अतिशय तंदुरुस्त आहेत . सतत नवीन गोष्टी शोधून एकट्याने त्या पार पाडणारी आहेत आणि मुख्य म्हणजे शांत शहाणी आहेत. कमी बडबड करतात. सल्ले आणि सामाजिक शिकवण्या घेत नाहीत. कुणाला काहीही शिकवत नाहीत. कारण त्यांनाच त्यांचा वेळ थोडा आणि स्वप्ने खूप असे झाले आहे. आणि मुख्य म्हणजे रिटायर होण्याचे नाव नाही. ह्याचे कारण स्वतःची व्यग्रता आणि काम स्वतः निर्माण केले आहे . इतर कुणावरही ते कामासाठी अवलंबून नाहीत. ह्या दोन्ही माणसांचा वर्तमानकाळ हा त्यांच्या भूतकाळाइतकाच आकर्षक आहे. ह्या दोन्ही माणसांना आपण गप्पांचे फड रंगवताना , मुलाखती देताना , TV वर बरळताना , फेसबुकवर तरुण पोरांशी वाह्यात गप्पा मारताना कधीही पाहणार नाही. अशी माणसे फार पटकन कुणाला आपल्या खांद्यावर हात ठेवू देत नाहीत. आणि आपले बूट उगाच कुठल्याही नव्या पिढीच्या माणसाला घालूच देत नाहीत. ताजी माणसे आहेत ती. (तो मिलिंद सोमण कोण ? तो मॉडेल ? त्याने ते कपडे काढून फोटो काढले होते तो ? असले सिनिकल प्रश्न मनात असणाऱ्या गोडगोजिऱ्या माणसांना तो सध्या काय काम करतो आहे ह्याची माहिती इंटरनेटवर सहजपणे घेता येयील. गुलजार काय करतात हे सांगण्याची गरज पडू नये. पण सर्वात आकर्षक असे काय असेल तर आजही ऐंशीच्या टप्पा ओलांडलेले गुलजारसाहेब रोज पहाटे उठून त्वेषाने टेनिस खेळतात आणि घरी येऊन मस्त लिखाण करतात)

हल्लीच्या काळात कुणी आपला आदर करू लागले कि ती सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे हे समजावे. म्हणजे आपण प्रमुख पाहुणे व्हायला महाराष्ट्रात लायक झालो आहोत. वर्तमानपत्रातील वेंधळ्या गोड पोरी दुपारच्या वेळी फोन करून “ सर काल अमुकराव असे असे म्हणाले तर त्यावर तुम्हाला काय वाटते ?”  अशी मते विचारू लागल्या कि काळाची घंटा वाजते आहे असे समजावे. तुमच्या हस्ते कुणाला पारितोषिक द्यायला बोलावले तर जवळजवळ अपमान करून फोन बंद करावा. मॅजेस्टिक गप्पा मारायला कोठावळे आपल्याला बोलावतात तेव्हा त्यांनाच आपण चहा फराळाला ला घरी बोलवावे व त्यांच्याशी मस्त गप्पा माराव्यात. तिथे विलेपार्ल्यात किंवा पुण्याच्या S M जोशी सभागृहात जाऊन दिग्गज होवू नये. कौतुक करून मारून टाकणे हि महाराष्ट्राची फार जुनी परंपरा आहे. त्यामुळे आदर सत्कार आणि नव्या पिढीकडून स्तुती ऐकू येऊ लागली कि पटकन पायात पळण्याचे बूट चढवावे आणि दहा किलोमीटर पळून यावे.

 

 

करंट १०

 

नाटक लिहिणे

महाराष्ट्रात नाटक लिहिणाऱ्या व्यक्तीला ‘नाटककार’ असे संबोधले जाते. ज्याला डोळ्यासमोर दिसलेले नाटक कागदावर मांडता येते. ज्या लिखाणाला अतिशय आकर्षक दृश्यात्मकता असल्याने त्या लिहित संहितेभोवती जाणत्या, अजाणत्या पण उत्सुक कलाकारांचा वेढा पडतो आणि त्या संहितेला आपल्या भावनेचे , पोताचे आणि रंगाचे स्वरूप बहाल करून त्या संहितेचा प्रयोग सादर होतो . तिथे नाटक जन्म घेते. नाटक हि संहिता नसते . चांगल्या दिग्दर्शकाच्या जाणीवेने संहितेला दिलेले ते गोळाबंद जिवंत स्वरूप असते.

मला लिखाणाची उपजत आवड असल्याने मी पूर्वी काही नाटके लिहिली. ती नाटके मी स्वयंप्रेरणेने लिहिली नाहीत. महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये परंपरेने चालत आलेली आणि जोपासलेली प्रायोगिक नाटकांची अतिशय जिवंत प्रणाली आहे. अनेक उत्साही संवेदनशील तरुण मुले मुली आपल्या उमेदवारीच्या काळात ह्या प्रायोगिक नाटकांच्या रंगीत गर्दीत सामील होतात. कोणत्याही हिशोबापलीकडे जगण्याचे आयुष्यातले काही बेभान दिवस असतात , त्यात तुम्हाला सोबत देऊन तुमच्या अंगातल्या कलागुणांचा वापर करून काही चांगले साकारणारे कुणी भेटले कि तुम्ही अश्या नाटकांच्या कामात सहभागी होता. महाराष्ट्रात हे फारच आपसूकपणे आणि नकळत घडते कारण नाटक आपल्या आजूबाजूला खेळते असते आणि वाहत असते.

माझे तसेच झाले. पुण्यात राहत असताना मोहित टाकळकर ह्या अतिशय हुशार आणि प्रगल्भ दृश्यात्मकतेची जाण असलेल्या उत्साही मुलाने Progressive Dramatic Association  ह्या पुण्यातील प्रख्यात नाट्यसंस्थेत उमेदवारी करून स्वतःचे  कालसुस्वरूप प्रयोग करायला अनेक तरुण मित्रांना हाताशी घेऊन नवी मांडणी करायला घेतली. नाटकाबाहेरच्या माणसांना नाटकाकडे आकर्षित होण्यासाठी एक नवीन ताजी उर्जा देणारी ,कालसुसंगत ,ताजी , बुद्धिमान माणसे कारणीभूत ठरतात. अशी अनेक माणसे बहुदा दिग्दर्शकीय भूमिकेत असतात . ते आपापल्या नाट्यसंस्थेचे प्रवर्तक  असतात. महाराष्ट्रात अश्या हुशार आणि इतरांना प्रेरणा देत आपल्याभोवती जमवून त्यांच्यातले उत्तम गुण हेरून नाटक बांधणाऱ्या दिग्दर्शकांच्या अनेक पिढ्या आहेत. जब्बार पटेल ह्यांच्यापासून म्हणजे अगदी कालपरवापासून सुरुवात केली तरी आजच्या काळात कितीतरी चांगल्या माणसांनी उत्तम नव्या  संस्था उभारून , सतत चांगली प्रयोगशील नाटके उभी केली आहेत. चंद्रकांत कुलकर्णी , अतुल पेठे , चेतन दातार , संदेश कुलकर्णी हि ह्यातल्या काही माणसांची महत्वाची उदाहरणे. ह्यातल्या प्रत्येक माणसाने नाटक बसवताना नुसते काम केलेलं नाही तर आपापल्या पिढीमध्ये महाराष्ट्रात चांगले नट , संगीतकार , लेखक तयार केले आहेत. मोहित टाकळकर आणि त्यापुढे अगदी आत्ताचा अलोक राजवाडे हि ह्या व्यवस्थेतील पुढील पिढीची क्रमानुसार महत्वाची नावे आहेत.

मी पुण्यात असताना बारा चौदा वर्षांपूर्वी मोहित टाकळकरच्या उर्जेने आणि त्याच्या बुद्धिमान प्रयोगशील विचारांनी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला लाभलेल्या वेगळ्या दृश्यात्मक जाणीवेने अतिशय भारावून गेलो होतो. मला कुणीतरी ओळखीचे आणि आपले म्हणणे समजून घेणारा सहकारी मिळाल्याचा फार आनंद झाला होता.

मी नाटके लिहायला लागलो ते त्याच्या शांत आश्वासक कबुलीमुळे. तो मला म्हणाला होता कि तू संकोच न करता तुला हवे ते मोकळेपणाने लिही . मी त्याचे नाटक बसवेन . संकोच ह्यासाठी कि मी त्यापूर्वी कधीही नाटक लिहिले नव्हते . आणि त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट हि होती कि मी त्याआधी कोणतीच नाटके पाहिलेली नव्हती. लहानपणी नाही कारण घरात असलेले हिंदी चित्रपटांचे अतोनात वेड आणि मराठी नाटकांचा कंटाळा. शाळा कॉलेजात नाही कारण बारावीची परीक्षा संपताच मी चित्रपटाच्या सेट वर उमेदवार म्हणून कामाला लागलो होतो त्यामुळे आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचा, एकांकिकांचा अजिबातच अनुभव नाही. नाटकाचे जग माझ्यासाठी नवे होते.

समूहाला सोबत घेऊन सर्जक  काम करणे हे अजिबात सोपे नसते. विशेषतः प्रायोगिक नाटक हि जी गडबडलेली आणि सांडून घरभर पसरलेली संज्ञा महाराष्ट्रात आहे त्या व्यवस्थेत नवी दृष्टी आणि नव्या नाटकाचा आकृतिबंध ज्यांना उभारायचा असतो अश्या प्रत्येक पिढीतील दिग्दर्शकाला माणसे निर्माण करणे आणि ती सांभाळणे हे काम एखाद्या नटीला चेहरा ताजा ठेवायला जितके  वेळा  आरसा  पहावा लागतो तितके वेळा करावे लागते. आणि ती माणसे न दमता ते करतात म्हणून नव्या जाणिवेची नाटके तयार होतात. मोहित मला नाटक लिही म्हणाला तेव्हा त्याला माझ्याकडून नाटकाच्या संहितेचा बांधीव जुना आणि चिरेबंदी घाट अपेक्षित नव्हता हे मला आज विचार करताना कळते. त्याला काय हवे होते त्याची नक्की दृष्टी त्याच्याकडे होती. त्याला दृश्यात्मक शक्यता असलेले आजच्या काळातले , जुन्याचा कोणताही प्रभाव नसलेले , न घाबरणारे लिखित साहित्य हवे होते. त्या साहित्याला संहितेचा  टप्पा गाळून चांगल्या नटांच्या मदतीने तो फार मोहक आणि अनेकपदरी दृश्यात्मक स्वरूप रंगमंचाचा वापर करून देणार होता. मला नाटक लिहिता येत नाही हा त्याच्यासाठी प्रश्नच नव्हता . कारण ज्याला परंपरेने नाटकाची संहिता म्हणतात त्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक दृश्यकलेत असतो तसा नाटकाचा अनुभव देण्याचे त्याचे प्रयत्न चालू होते. नाटक नाही . नाटकाचा अनुभव. आणि त्यापेक्षाही पुढील काही.

हे होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याकाळात लिहिणारा आणि वाचणारा समाज हा बघणाऱ्या समाजात परावर्तीत होत होता. आमची पिढी बघत होती. ऐकत होती . आणि त्यामुळे नाटक ह्या माध्यमात नाटककाराचा शंब्द हा जो आजपर्यंत प्रमाण मानला गेला  होता त्याला नाटकाची गुंतागुंतीची दृश्यात्मक रचना आव्हान  देणार होती .

नाटक लिहिणाऱ्या माणसाला त्यावेळीसुद्धा नवा शब्द नव्हता. आजही नाही . म्हणून मला नाटककार असे म्हणले गेले. पण मी नाटककार नव्हतो आणि कधीही होवू शकलो नाही . नाटककार हि जास्त  विस्तृत आणि बांधिलकी असलेली जागा  आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक लिहिता माणूस हा त्याला जरी वाटले तरी लेखक नसतो त्याप्रमाणे नाटके लिहून कुणीही नाटककार होवू शकत नाही. मी झालो नाही. माझ्या लिखाणाची प्रशंसा करायला , मला पुरस्कार द्यायला आणि माझ्या कामाची समीक्षा करायला नाटककार हि संज्ञा वापरली गेली. २००६ साली नाटके लिहायचा थांबूनही मी माझ्या कामाच्या छापील वर्णनात ती संज्ञा वापरत राहिलो आणि मला सावकाश काही वर्षांनी हे लक्षात आले कि आपण भूमिकेने आणि लिखाणाच्या रचनेने कधीही नाटककार नव्हतो. नाटक हे आपले मूळ माध्यम नाही. एका हुशार आणि ताज्या  बुद्धीच्या आकर्षणाने आपण नाटकासाठी साहित्य निर्माण केले . त्यापलीकडे काही नाही.

२००४ ते २००६ ह्या काळात अतिशय वेगाने मी चार नाटके लिहिली. हा काळ माझ्या आयुष्यातला फार छोटा पण खूप भारावलेला काळ होता. मला माझे काम आवडत होते. मोहित म्हणाला कि मी उत्साहाने लिहित होतो. ती सर्व नाटके बसवली गेली , मला ती पाहता आली . त्यातल्या दोन नाटकांच्या संहिता प्रसिद्ध झाल्या . फार मोठ्या मनाने आणि अतिशय आपुलकीने देशभर नाटक करणाऱ्या लोकांनी त्या काळात माझ्याशी मैत्री केली , मला त्यांच्यासोबत बोलण्याची , फिरण्याची संधी दिली. महाराष्ट्रात विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे आणि  चेतन दातार ह्या तीन माणसांनी मला नुसतेच मुख्य प्रायोगिक नाटकाच्या वातावरणात नेऊन फिरवले नाही तर मी पुढे सातत्याने नाटकासाठी लिखाण करीन ह्या विश्वासाने मला अनेक साधने , गोष्टी आणि काही उत्तम आठवणी दिल्या. मी जेव्हा  आज नाटक लिहित नाही तेव्हा मी ह्या तीन माणसांचा नक्कीच विश्वासघात करीत आहे ह्याची जाणीव मला होते.

आज हे आठवण्याचे कारण म्हणजे मी पुण्यातील एका नाट्यगृहात बसलो आहे. विनोद जोशी नाट्यमहोत्सवाचा आज पहिला दिवस आहे. दर वर्षी आमचे उत्साही आणि अतिशय कार्यरत मित्र अशोक कुलकर्णी ह्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे पुण्यात एका साध्या पण सुंदर कार्यक्रमात साहित्य आणि रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे रंगभूमीवर चांगले काम करणाऱ्या पाच मुलांना एक लाख रुपयांची एक फेलोशिप दिली जाते. नऊ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ह्या उपक्रमाचा मी सर्वात पहिला फेलो आहे. मला त्यावेळी एक लाख रुपये मिळाले आणि त्याचे काय काय घ्यायचे आणि कुठे प्रवास करायचे ह्याची स्वप्ने पाहत मी स्टेजवरून विजय तेंडुलकरांना thank you म्हणालो तेव्हा ते मला म्हणाले कि आभार मानलेस तर हे पैसे परत घेईन. आभार मानायचे नाहीत आणि खर्चाचा हिशोब द्यायचा नाही. तू ते पैसे हवे तसे उडव. त्यासाठीच ते तुला दिले आहेत.

IMG_1586

 

 

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s