रोमांस ( नवी कथा )

                                 

तिचा नवरा तिला वेगवेगळ्या प्रकारे घाबरवायचा . ती घरामध्ये एकटी बसून टीव्ही पाहात भाजी निवडत असताना  तो हळूच आवाज न करता दार उघडून घरात यायचा आणि तिच्यापुढे धसकन उभा राहायचा. ती घाबरून दचकायची . किंचाळायची. ती काचेचे पेले हातामध्ये घेऊन उभी असली कि तो अचानक मेन स्वीच बंद करून घरामध्ये अंधार करायचा . पुन्हा चालू. पुन्हा बंद. त्या वेळी खरतर तिने त्याला ब्रेड आणायला खाली पाठवलेलं असायचं . अंधार उजेड अंधार उजेड अंधार . ती घाबरायची आणि तिच्या हातातले सगळे काचेचे ग्लास खाली पडून फुटायचे. त्या दोघांना मूल नव्हते.त्यांनी ठरवून होवू दिले नव्हते. सहा सात काचेचे ग्लास एकत्र खाली पडून फुटतात तो आवाज त्याला अतिशय आवडायचा. तो खूश व्हायचा . ती घाबरून किंचाळली कि तो धावत घरात यायचा आणि तिला कुशीत घेऊन तिच्या पटापट पाप्या घ्यायचा . ती त्याची लहान गोबरी लाडकी मुलगी बनायची आणि तो तिचा वडील. एकमेकांना घट्ट मिठी मारून ते शरीराच्या उबेत उभे राहायचे . शांत व्हायचे. मग हळुवारपणे दोघे मिळून खालच्या बोचरया काचा गोळा करायचे.

त्याने एकदा अतिशय उग्र मांजर घरामध्ये पाळली होती.तो बाहेर गेला आणि ती घरात एकटी असली कि ती मांजर तिच्याकडे मग्रुरीने एकटक दिवसभर पाहत बसायची. तो संध्याकाळी टीव्हीसमोर मांडी घालून बसला कि त्याच्या दोन पायांमधील उष्णतेमध्ये ती जाऊन बसायची. त्याच्यावर हक्क सांगत राहायची. तो पलंगाकडे जायला लागला कि विस्फारून ओरडायची. ती त्या मांजरीला पुरून उरली. तिने तक्रार केली नाही. जे होतंय ते होवू दिले . मांजराला आपल्यातले जे  होते ते खाऊ  घातलं. तिला असूया येत नाही अस कळल्यावर  मग ती मांजर निघून गेली.

मांजर गेल्यावर त्याने पाण्याचे नळ ठिबकावायला सुरुवात केली. रात्री बेडरुममध्ये तिला दूर स्वयपाकघरातील पाण्याचा नळ एका संथ भीतीदायक तालात हुंकार सोडत असल्यासारखा ऐकू यायचा . ती त्याचा हात गच्च धरायची. त्याला घट्ट बिलगायची. तो गाढ झोपेचे सोंग घेऊन हाताच्या मुठी घट्ट बंद करून बसायचा कि ज्यामुळे तिला आपला हात पकडताच  येऊ नये.  ती मग  उठायची आणि सावकाश स्वयपाकघराकडे चालायला लागायची. कशीबशी अंधारात चालत जाऊन तो ठिबकणारा नळ बंद करायची. ती घाबरून परत पलंगाकडे आली कि तिला जो वास येत असे त्याने तो उत्तेजित व्हायचा. तिच्यावर अतोनात प्रेम करायचा. ती सगळं विसरून  त्याच्या पकडीत सुखावून जायची.

लहानपणी तिचे वडील प्रवासात रेल्वे मधल्या कुठल्यातरी स्टेशनावर थांबली कि तिला एकटीला डब्यात बसवून चहा आणायला खाली उतरायचे. गाडी कधीही सुटेल ह्या भीतीने ती घाबरायची. कावरीबावरी होवून इकडेतिकडे पहात बसायची. तिची मजा पाहायला वडील गाडी सुटेपर्यंत डब्यात यायचे नाहीत. मागच्या एखाद्या डब्यात चढायचे. गाडी सावकाश सुरु झाली कि तिचे डोळे भरून यायचे. ती ओठ काढायची. एकट्या लहान मुलांना ट्रेनमधून पळवून नेतात आणि त्यांचे हातपाय तोडून त्यांना भिक मागायला लावतात असे तिला वडिलांनी अनेक वेळा सांगितले असे. ती पुरेशी जोरात रडायला लागली कि मग तिचे वडील त्यांचा चहा आणि तिचा आवडता खाऊ घेऊन शांतपणे तिच्या शेजारी येऊन बसायचे.

एकदा ती सकाळी उठली तेव्हा तो घरातून गायब झाला होता.घरातले सगळे फोन घेऊन तो निघून गेला होता.बाहेर मुसळधार पाऊस. तिची घालमेल होवू लागली. तिला रडू फुटले. तो नेहमीच असं  काहीतरी करतो हे समजून ती काही वेळ शांत व्हायची पण काही वेळाने पुन्हा ती चिंतेने आणि भीतीने कासावीस होवून जायची. असे दिवसभर चालू राहिले. भीतीची आणि शांततेची आवर्तने . ती भरपूर रडली. भिजत गावभर जाऊन त्याला शोधून आली. तिच्या मनात त्याच्या आत्महत्येची कल्पना गडद होयीपर्यंत तो बाहेर भटकत राहिला. मग अचानक घरात येऊन त्याने तिला कुशीत घेतली.

तो देखणा आणि हुशार होता. हसरा होता. लग्नाच्या वेबसाईटवरून दोघे भेटले होते. ती आळशी आणि संथ आहे. तिला बाहेरच्या जगातील स्पर्धा झेपत नाही हे तिने त्याला मोकळेपणाने सांगतिले होते. तिला पैसे कमवायचेच नव्हते. तिचे ते कामच नव्हते. खूप सुदैव लागते अशी सुंदर आणि घरबैठी  मुलगी इंटरनेटवर भेटायला. तो सुदैवी ठरला. ते दोघे लग्नाच्या वेबसाईटवर एकमेकांना फोन नंबर देऊन एकदा एका कॉफी शॉप मध्ये भेटले मग रविवारी फिरायला टेकडीवर गेले. पुढील आठवड्यात पावसात त्यांनी एकमेकांना शांत आणि खोलवर किस केलं आणि मगच घरच्या लोकांना सांगितलं.

त्याला आई नव्हती.आपण काम करून किंवा शिकून किंवा खेळून घरी आलोय आणि आपले कुणी लाड करतय ह्या अनुभवाला तो आसुसलेला होता.कुणीतरी आपली सतत वाट पहावी असे त्याला वाटे.त्याची सुखाची कल्पना ही ताटातल्या  गरम गरम पोळीची आहे हे ऐकून तिला मायेने भरून आले होते.

त्याचातले एक मूल लग्न झाल्यावरच्या नव्या काळात ऑफिसातून धावत धावत घरी येत असे. त्याला भूक लागली कि अकांडतांडव करून घर डोक्यावर घ्यायला आवडत असे. ते मूल आता खूप पैसे कमावत असले तरी रोज तिच्याकडून खर्चाला ठराविक पैसे घेत असे. ती त्याला मउसूत पोळ्या करून वाढायची. त्याला जेवण आवडले का विचारायची. ती त्याच्या कपड्यांना बाजारात आलेला नवा फाब्रिक सोफ्टनर लावायची. दुपारी त्याच्या कपड्यांना लिलीच्या फुलांचा मंद सुवास येत असे. सिनेमा बघताना तो थेटरमध्ये रडायचा तेव्हा ती त्याला रुमाल द्यायची. बसमध्ये चढताना तो तिचा हात नकळत घट्ट धरायचा. त्याला खायला काही विकत हवे असेल तर घेऊ का मी ते विकत ? असे तिला विचारायचा. हे सगळे पृष्ठभागावर कधी आले नाही. जगाला दिसले नाही . तरंग नव्हते. त्या दोघांची आपापली समजूत होती.

तिने फेसबुकवर तिच्यासारख्याच घरबैठ्या बायका जमवल्या होत्या.  तो कामाला गेला कि त्यांच्याशी ती  गप्पा मारत असे. त्यांना आपल्या केकचे फोटो पाठवत असे. तिच्यासारखा मनुका आणि क्रीम घालून केलेला केक कुणालाच जमत नसे. ती त्यातल्या एकीलाही कधीही प्रत्यक्ष भेटली नव्हती. त्या सगळ्या जमून जेवायला जात तेव्हा ती दिवसभर ऑफलाईन राहायची. घरातले खाजगी फोटो तिने कधीही अपलोड केले नाहीत. ती सुंदर होती . काही केल्या तिच्या अंगावर चरबी चढत नसे. मजेत खायची प्यायची . बिल्डींगचे चार जिने चढण्यापलीकडे व्यायामही करत नसे. तरी त्याच्या हातात , त्याच्या कुशीत ती अलगद मावायची. संध्याकाळी चार साडेचार झाले कि ती इतक्या लगबगीने आवरायला आणि खायचे करायला घेत असे कि आपला नवरा घरी येणारे कि शाळेतला मुलगा हेच तिला कळेनासे होत असे.

अंघोळ केल्यावर कपडे घालण्याआधी आपले लांब केस मोकळे सोडून त्याच्या कमरेभोवती दोन्ही पाय अडकवून , आपले हात त्याच्या गळ्यात टाकून ती त्याला घरभर फिरवायला लावायची आणि अगदी ऑफिसला जायची वेळ झालेली असताना त्याला उत्तेजित करायची. त्याच्या कानात हलक्या आवाजात तिला पडलेली त्यांची  नग्न स्वप्ने लाजून सांगायची . चालताना त्याला तिचा भार व्हायचा नाही .नाजूक आणि हसरी होती ती.  अश्यावेळी प्रमाणाबाहेर उत्तेजित झाला कि तो उभ्याउभ्याच तिच्यात शिरून स्वतःला शांत करत असे आणि बस पकडण्यासाठी धावपळ करत जात असे.

ती घाबरली कि लालेलाल व्हायची आणि लगेच रडायला लागायची. तिचे रडणे सावकाश फुलून यायचे. गरम अश्रू काही वेळाने वाहायला लागत आणि भीती ओसरली तरी ते वाहतच राहत. तिच्या पलंगात त्याने थायलंडहून आणलेला रबरी बुळबुळीत साप ठेवला होता. एकदा बाथरूममध्ये प्लास्टिकचा बेडूक तिच्या अंघोळीच्या बादलीत तळाला ठेवला होता. तो नवीन लग्न झाले तेव्हा मुद्दाम घरामध्ये भीतीदायक सिनेमे लावून पाहत बसायचा. तिला ते जराही पाहवत नसत. कारण ते तळमजल्यावर राहत आणि असे सिनेमे पहिले कि रात्री तिला खिडकीपाशी कुणीतरी येऊन उभे आहे असे वाटत राही. त्यांच्या खिडकीच्या पडद्यावर सावल्या हलत.ती त्याच्याशेजारी उशीमध्ये तोंड खुपसून बसायची. घाबरत असली तरी त्याने निर्माण केलेल्या भीतीचं तिला आकर्षण होतं .हळूच दुलई वर करून ती एका डोळ्याने समोरचे बीभत्स दृश्य पाहत असे. आणि पुन्हा दुलईमध्ये शिरत असे. असे ती दोनतीनदा कारे तेव्हा त्याचा हात तिला मायेने थोपटत असे.

त्याचं घर स्वच्छ होतं .गारवा होता.घराबाहेर भरपूर हिरवाई आणि शांतता होती. बिल्डींगमधील  इतर बायका तिच्यापेक्षा कमी सुंदर होत्या आणि बाहेरपेक्षा स्वस्त आणि ताजी भाजी विकणारे भाजीवाले त्यांच्या अंगणात आपसूक येत.

बिल्डींगच्या गच्चीच्या वरती उंचावर एक पाण्याची टाकी होती. रात्री जेवणानंतर तो वर टाकीवर जाऊन उभा राही आणि तिला कॉफीचा कप घेऊन डगमगत्या शिडीने वरती बोलावून घेत असे . एका हाताने कप सांभाळत शिडीच्या पायऱ्या चढताना तिचे दात भीतीने एकमेकांवर आपटत. उंचावरून खाली पाहून तिला गरगरत असे. पण एकदा वर पोचली कि मग त्याच्या कुशीत मोकळ्या हवेत ती आनंदाने झोपत असे. तो आकाशातले तारे पाहत बसायचा आणि तिच्या स्वप्नात तिचे वडील यायचे.

मूल न झालेली जोडपी कुत्री किंवा तत्सम आज्ञाधारक प्राणी पाळतात. त्यांना माणसांची नावे ठेवून त्यांना डिसेंम्बरात स्वेटर शिवतात तसे काही त्या दोघांनी केले नव्हते. त्यांनी स्वतःचे ओझे जगावर टाकले नव्हते.

कधी रविवारी ती सुरेख स्वयपाक करून त्याच्या चार मित्रांना आणि त्यांच्या बायकांना जेवायला बोलावी. त्यांना कुणी बोलावले तर फार नीटनेटके कपडे करून मंद वासाचा एकच परफ्युम दोघे लावून आठवणीने सुंदर फुले घेऊन ते मित्रांकडे जेवायला जात. लग्नात त्यांना ते दोघे मावतील आणि जरासुद्धा भिजणार नाहीत अशी नाजूक कलाकुसरीची आणि भक्कम मुठीची जपानी छत्री भेट मिळाली होती.

ते इतर कुणाला फारसे त्यांच्यात येऊ देत नसत. एकमेकांची तक्रार बाहेर कुणाकडेही करत नसत. दोघेही फार साधे होते. उतारवयात इंग्लंड अमेरिकेला फिरायला जाता यावं म्हणून ते नेमाने सेव्हिंग करत होते. ती जुना मोबाईल वापरायची . तो घरून डबा न्यायचा . त्याची आई केळफुलाच्या भाजीत सोडे घालायची तसे करायला ती शिकली होती.रविवारी बाजारातून येताना तो नेमाने दोन खेकडे जिवंत आणत असे. पहिल्या रविवारी तिने पिशवीत हात घातला आणि ती छतापर्यंत किंचाळली. एका खेकड्याने तिचे बोट पकडले होते.

पण काही दिवसातच तिला त्याचा खेळ समजला . आता ती पिशवी हातात घेऊन सरळ उकळत्या पाण्यात उपडी करू लागली. खेकड्यांशी गप्पा मारत ती त्यांच्या नांग्या कटाकट मोडू लागली. माशाचे खवले काढू लागली. नाजूक हातांनी शिंपले साफ करू लागली. गाबोळी, भेजा बनवू लागली. नारळाचे ताजे दूध काढू लागली. कलेजीचे फ्राय तर अश्या सफाईने कि जणू ते तिला लहानपणीपासून येत होते.त्याला कधी कळलेच नाही कि ती लग्नाआधी शाकाहारी होती.

एकदा त्याने दाराची कुलुपे बदलून ठेवली आणि तीला किल्ल्या दिल्या नाहीत. ती दूध तापवायला ठेवून दार ओढून खाली टोमाटो आणायला भाजीवाल्याकडे अंगणात गेली . परत दारापाशी येऊन कुलुपाशी घाबरून जुन्या किल्ल्यांनी धडपड करत बसली. आत दूध करपू लागले. रात्री पाहुणे जेवायला येणार होते.

लहानपणी तो सगळ्यांमध्ये एकटाच असा होता ज्याला आई नव्हती. बाकी सर्व घरातील सर्व मुलांना आई असायची आपले मित्र त्यांच्या आयांशी बोलताना पाहून तो मान खाली घालून बसायचा. आपला नवरा आपल्याला घाबरवतो ह्याचा उल्लेख तो कधीही त्याच्या मित्रांसमोर करत नसे त्यामुळे त्याला ती जास्तच आवडायची.

लहानपणी तिचे वडील तिला दारू पिऊन मार मार मारत आणि मग स्वतः रडत बसत.मग दुसर्या दिवशी तिचे लाड करत.

अनेकदा रात्री तो तिच्यासोबत कन्सोलवर विडीओ गेम्स खेळत बसे. दोघेही जोर जोरात आरडा ओरडा करत अनेक माणसे बंदुकीने मारून टाकत आणि मग हसून हसून दमून तिथेच एकमेकांच्या कुशीत आडवे होत.

लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने एक भेसूर हसरी बाहुली त्यांच्या पलंगात पांघरुणाखाली ठेवली होती.हॉटेलच्या पलंगाचे मऊ पांढरे पांघरूण बाजूला करताच ती इतका वेळ भीतीने किंचाळत ओरडत राहिली कि त्या रात्री त्यांच्या शारीरिक संयोग होवू शकला नाही . त्या भीतीने तिला ताप आला आणि ती त्याच्या कुशीत थरथरत झोपी गेली .पण दुसर्या दिवशी सकाळी उठताच त्याच्या अधीन झाल्यानंतर तिला इतर कोणत्याही पुरुषाचे शरीर नजरेलाही आवडेनासे झाले . त्याला तर आता तिच्या थरथरत्या घाबरलेल्या शरीराचे व्यसन लागले होते.

त्यांच्या लग्नाला आता सहा वर्षे झाली होती .त्यांनी नव्याने घर रंगवून काढले होते. सवयीची आणि कंटाळ्याची साय जरासुद्धा त्यांच्यावर साचली नव्हती. ते एकमेकांना सतत अनोळखी वाटत रहात .घाबरवून टाकणाऱ्या प्रत्येक क्षणाला त्यांची एकमेकांशी असलेली ओळख पुसली जात असे आणि ते नव्याने एकमेकांजवळ  येत. एकदा त्याने ती घरात येण्याआधी  घराच्या दारापासून बाथरुमपर्यंत रक्तासारखा दिसणारा लाल रंग सांडून ठेवला होता आणि तो बाथरूमचे दार आतून लावून तिची मजा ऐकत खो खो हसत बसला होता.

असे घडत असे कारण तो दोन घटनांच्यामध्ये पुरेसा वेळ जाऊ देत असे. त्याच्या अश्या वागण्याची त्याने तिला सवय होवू दिली नव्हती. त्यामुळे अचानक घडणाऱ्या प्रसंगांनी तिला धक्के बसायचे थांबत नसत. शिवाय तो एकसारख्या गोष्टी पुन्हा दुसर्यांदा करत नसे.

संध्याकाळी बेल वाजली आणि दर उघडलं कि दारात कुणीच उभं नसायचं . बाहेर गडद अंधार. ती दरवाजा लावायची . पुन्हा बेल वाजायची. पुन्हा दरवाजा उघडावा तर कुणीच उभं नसायचं.

तिच्याकडे तीचा लहानपणीचा एक फोटो होता. ज्यात तिच्या वडिलांनी तिला खांद्यावर बसवले होते आणि ती कॅमेर्यात पाहून हसत होती . तिच्या नवर्याचे हात तिच्या वडिलांसारखेच दणकट होते. ते पाहूनच ती लग्नाला हो म्हणाली होती.

तो अनेकदा रात्री निशिगंधाची फुले घेऊन येई . त्याचा घमघमाट घरामध्ये पसरे. तिच्या कुशीत शिरून तो तिला थोपटायला सांगे . एखादे गाणे गुणगुणायला सांगे आणि अंगाचे प्रेमळ मुटकुळे करून तो तिच्या पोटाशी शांत झोपी जाई. काही वेळा तो तिच्या शरीरात तिथून प्रवेश करू पहायचा. त्याला पुन्हा पोटाच्या आत जायचे असल्यासारखा. अंधाऱ्या शांत गर्भाशयात. इतका जवळ बिलगायचा कि असे वाटायचे कि इथूनच पोटाच्या त्वचेच्या आत तो निघून जायील. तो अत्यानंदाने रिकामा झाला कि डोळे मिटून झोपी जायचा आणि झोपेत तिला म्हणायचा ,मला तुझ्या आत आत जाऊदे. पुन्हा सगळं पहिल्यापासून सुरु करुदे. जन्मापासून सुरु करुदे.

एकदा ती दुपारी घरात काम करत होती . घराकडे पाहत होती. हात स्वयपाकात होते. आटोपशीर टापटीप घर. इथली उब नव्याने होती तशीच आहे. हे सगळं असच चालू रहाणार का ? थरारक . मग पुन्हा शांत ? पुन्हा अचानक नवा थरार.

बराच वेळ झाला त्याचा आवाज येईना.कारण तो घरात असेल तर खूप मोठ्यांदा बोले आणि वस्तुंची पाडापाडी करत खोल्यांमधून फिरे. गेला अर्धा तास तो दाराबाहेरचा मेनस्वीचचा बॉक्स उघडून फ्यूज ची वायर बदलणार बदलणार असे तिला आश्वासन देत होता. अचानक पुन्हा गायब झाला. काही वेळाने अंधार होयील.

ती बाहेरच्या खोलीत आली तर तो काळानिळा होवून दारात पडलेला .शिवाय तोंडातून फेस. हातात विजेची वायर. ती घाबरली नाही .स्थिर उभी राहिली.

तिचं लहानपण निघून गेलं. ती मोठी झाली. तो गेल्यावर काही महिन्यात तिच्या वयाच्या बायकांची होते तशी तिची त्वचा थोडी निबर होवू लागली. आपलं लहानपण निघून गेलं तसच त्याक्षणी त्याचेही निघून गेले असणार हे तिच्या लक्षात आलं.

सचिन कुंडलकर .

पूर्वप्रसिद्धी ( माहेर दिवाळी अंक. २०१६ )

 

 

 

 

 

 

 

 

3 thoughts on “रोमांस ( नवी कथा )”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s