‘अपेयपान’ लोकमत मधील लेखमाला भाग ३४ ते ३६ .

 

अपेयपान  ३४

 

मोठा होत असताना मला माणसे सोडून गेली , माझ्या आजूबाजूच्या जागा अनोळखी होत गेल्या , मी लोकांना त्रास दिले आणि लोकांनी मला. ह्या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट माझ्यासोबत सतत शांतपणे चालत राहिली ती म्हणजे माझ्या आजूबाजूला असणारे ,वाजणारे , ऐकू येणारे ,गायले आणि वाजवले जाणारे संगीत. विविध प्रकारचे संगीत कानी पडत गेल्याने आणि संगीताचा संग्रह करण्याची आवड आणि वातावरण आमच्या घरामध्ये असल्यामुळे शब्द आणि रंग ह्याच्या पलीकडील फार मोठे संस्कार माझ्या कानावर होत राहिले.

मी आज जिथे जन्माला आलो आणि वाढलो त्या वातावरणापेक्षा अतिशय वेगळ्या वातावरणात राहतो आणि वावरततो . अश्या परिस्थितीत मला तरंगत पण संतुलित ठेवते ते म्हणजे मी सतत ऐकत असेलेल संगीत.

आमच्या घरी रेडीओ लावून ठेवायची सवय कुणाला नव्हती त्यामुळे मराठी नाट्यगीते , भावगीते गीत रामायण अश्या गोष्टींची जी आपसूक ओळख लहानपणी आकाशवाणीमार्फत सर्व मुलांना नकळत होत असते ती मला झाली नाही . माझ्या लहानपणीच्या स्मृतीमधील सगळ्यात जुना आणि एखाद्या दाट महागड्या अत्तरासारखा आवाज जर कुणाचा असेल तर तो आहे भीमसेन जोशींचा. तो भाषेच्या आणि कवितेच्या पलीकडे असलेला आत्म्याचा हुंकार असावा तसं आवाज आहे. आमच्या घराच्या भिंतींवरून वाहत असलेला. अतिशय चांगले शास्त्रीय संगीत लहानपणीपासून माझ्या कानावर सातत्यान पडत राहिले कारण माझे वडील आणि माझा धाकटा भाऊ . मला आठवत आहे तेव्हापासून घरामध्ये सुयोगचा हार्मोनियमचा रियाझ चालू असे आणि रियाझ संपल्यावर आमच्याकडे असलेल्या एका टेप रेकॉर्डर वर भीमसेन जोशींचा आवाज उमटून घरभर प्रसृत होत राही. पावसाळ्यात अंधारात बुडालेल्या घरात , दिवाळीच्या दिवशी उत्साहाने उजळून गेलेल्या घरात तो आवाज सतत सोबत करीत असे. हार्मोनियम च्या रीयाझाचा आवाज आणि भीमसेन जोशींचा आवाज जगात कुठेही आला तरी मला अचानक घरी आल्यासारखे वाटते ह्याचे ते कारण आहे.

मी जे संगीत जाणीवपूर्वक मनामध्ये रुजवले आणि  माझ्या आवडीने लहानपणीपासून सोबत बाळगले ते  म्हणजे R D Burman  ह्यांचे संगीत. माझ्या संपूर्ण लहानपणावर RD ची फार मोठी प्रेमळ सावली आहे. माझ्यात जे लिंबू आणि मीठ आहे ते माझ्या शिक्षणाचे नाही किंवा मी वाचलेल्या पुस्तकांचे नाही. ते RD ने माझ्यात पिळलेले आहे. माझ्या चांगल्या वाईट सवयी , माझी स्वप्न बघायची पद्धत , माझे रागलोभ ह्या सगळ्या रसायनांची सिद्धता माझ्या लहानपणी RD ने केली . मी सिनेमा बनवायचा निर्णय घेतला त्याला अप्रत्यक्षपणे RD कारणीभूत असणार ह्याविषयी मला शंका नाही.

संगीत घरामध्ये साठवून ठेवून आपल्याला हवे तेव्हा ऐकण्याचा काळ आता सोपा वाटत असला तरी अनेक वर्षे कानावर चांगले गाणे पडायला TV  किंवा रेडीओवर अवलंबून राहावे लागत असे. घरात टेपरेकॉर्डर यायचा आधीचा काळ मी अनुभवला आहे. कुठे रस्त्याने जाताना आपले आवडते गाणे कुठल्या दुकानाच्या किंवा घराच्या रेडियोवर लागले असेल तर तिथेच रस्त्यात थांबून ऐकून मी पुढे जात असे.

मग यथावकाश टेप रेकॉर्डर आणि माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा असा माझा Walkman माझ्या सोबतीला आले. Walkman ने माझ्या आयुष्याला आणि भावनांना खाजगीपणा मिळवून दिला. खाजगी जगामध्ये मोठी रंगीत स्वप्ने रंगवता येतात. माझे घरापासून डेक्कन वर चालत राहणे आणि कानात हेडफोन्स वर आवडते संगीत ऐकत राहणे माझ्यासाठी बहुमोल असे कारण मी ते ऐकत चालताना अनेक निर्णय घेत असे. तरुण माणसाचे साधेसोपे निर्णय असतात. त्यात एक खुळेपणा असतो. स्वप्नरंजकता असते . पण ती किती आवश्यक असते. गुलजारांनी मला ती शिकवली.त्यांच्या सिनेमाच्या गाण्यामधून. माझी भावनिक वाढ करून माझ्या सध्या स्वप्नांना गुलजारांनी मोकळ्या खिडक्या दिल्या. मला लिखित शब्दाचे महत्व सगळ्यात आधी गाण्यांमधून गुलजारांनी शिकवले. माझ्या हेडफोनला लागलेल्या माझ्या घामात त्यांचे शब्द  उतरत असत. माझा खोल खोल अंधारा खाजगीपणा मी सजवायला शिकलो . तिथे झुंबरे पेटवून आयुष्य सोपे करायला शिकलो , ह्या सगळ्याला गुलजार कारणीभूत ठरले आणि त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेली सुंदर गाणी आणि कविता.

RD  गाण्याच्यामध्ये जो अंतराळ असतो , ज्याला संगीताच्या  रचनेमध्ये इंटरल्यूड असे म्हणतात तो अंतराळ जादूने भरून टाकायचा. इजाजत मधील ‘कतरा कतरा मिलती है’ ह्या गाण्यातले अंतराळ असे विस्मयकारक जादुई रंगांनी भरलेले आहेत. आपल्या मनात संगीताच्या उत्कट अनुभवामुळे अनेकविध दृश्ये आठवणी आणि जुन्या जखमा जाग्या होतात. संगीत आपल्या मनाची स्वच्छता राखते. नको त्या गोष्टी बाहेर फेकून देते आपल्याला खूप ठोसपणे हि जाणीव करून देत राहते कि कितीही गर्दीमध्ये राहिले  एकटेपणाला  आणि त्यामुळे येणाऱ्या हतबलतेला आयुष्यात पर्याय नसतो.

मी आवडत्या संगीतकारांचा लेखकांचा आणि गायकांचा उल्लेख एकेरीमध्ये करतो ह्याचे कारण माझ्या मनातील उद्धटपणा नाही. मी उद्धट आहे पण तो ह्या बाबतीत अजिबात नाही . माझे ज्या कलाकारांशी वर्षानुवर्षांचे जवळचे नाते तयार झाले आहे , ते नाते असे करवून घेते. मी कुणालाही व्यक्ती म्हणून ओळखत नव्हतो आणि नाही पण संगीताने तुमचे कर्त्यासोबत एक फार घट्ट नाते तयार होते. त्यातून हे तो आणि ती असे शब्द येतात.

AR  रेहमान आयुष्यात येऊन वादळ तयार करण्याआधी काही छोट्या पण फार महत्वाच्या गोष्टी  गोष्टी घडल्या.  १९८४ , १९८५ च्या आसपास मी दहा एक वर्षांचा असताना मी मायकल जॅक्सन  चे Thriller . माझ्या मुंबईत राहणाऱ्या चुलत बहिणीच्या खोलीत ते लागले होते.

शाळेत असण्याचा काळात भारतात MTV आणि Channel V आले आणि त्यामुळे  तोपर्यंत आम्ही ज्या पद्धतीने संगीताकडे पाहत होतो ती दृष्टी आणि परिणाम बदलले ( शारदा देवी नावाची एक देवी आहे.  ती सकाळी उठून आवरून वीणा बिणा घेऊन आपण काय काय गाणी गातोय, ऐकतोय , काय काय अभ्यास करतोय, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा आदर करतोय कि नाही. संगीतामधून आपण परस्त्रीकडे तसल्या वाकड्या नजरेने तर पाहत नाही न ? ह्यावर लक्ष्य ठेवायला देवांच्या तर्फे बसून असते . संगीत हा देवाचा प्रसाद आहे , भारतीय संस्कृतीच्या गळ्यातील पदक हे भारतीय संगीत आहे , संगीतकार देव आहे. लेखक आणि कवी हे देवांचे पणजोबा आहेत. वादक देवांचा मामे आजोबा आहे .गायक अजूनच  काहीतरी म्हणजे देवांच्या देवाचा देव आहे ) अश्या सगळ्या उदबत्तीच्या धुराने गुदमरलेल्या सांगीतिक वातावरणात अचानक  मडोना आणि मायकल जॅक्सन माझ्या आयुष्यात आले आणि माझी मुंज झाली. मी अचानक गुरूगृही जाऊन पडलो आहे असे मला वाटले.

आपल्या मनात प्रेम आदर आणि आदर आणि प्रेम ह्याच्या पलीकडे खूप भावनानांचे जंजाळ असते. लहान वयात ते जंजाळ अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघड असते. राग असतो , नव्याने तयार झालेल्या आणि सतत उफाळणाऱ्या शारीरिक वासना असतात. त्यातून तयार होणारे गडद एकटेपण आणि रंगीत रोमान्स असतो. स्पर्धा असते, ईर्ष्या असते,तुच्छता असते. ह्या सगळ्या भावनांकडे भारतीय शिक्षणात ,भारतीय कुटुंब पद्धतीत बघायला किंवा त्या भावनांना हाताळायला शिकवत नाहीत. पाश्चिमात्य संगीताने माझ्या धरणाचे दरवाजे पटापट उघडले आणि मला मोकळे मोकळे वाटू लागले. आपल्याला समजून घेणारे आणि आपल्या मनातील रागाला वाईट न म्हणणारे कुणीतरी ह्या जगात आहे ह्या भावनेने मी मायकल जॅक्सनच्या संगीताशी जोडला गेलो. मला आज हे लक्षात आले तरी आश्चर्य वाटते कि मला इंग्रजी भाषेचा एकही शब्द त्या काळात कळत नसे. मी सोळा सतरा वर्षाचा होयीपर्यंत सलग एक वाक्य इंग्रजीत बोलू शकत  नव्हतो आणि तरीही दहा अकरा वर्षाचा असल्यापासून मी मडोना  आणि मायकल जॅक्सन  ह्यांच्या संगीताकडे कसा काय ओढला गेलो असेन? मीच नाही तर त्या काळात सगळे जग त्या दोघांनी काबीज केले होते. ह्याचे कारण त्यांचे उर्जा देणारे सळसळते संगीत होते. गरिबांना , कुरूप माणसांना , एकट्या जीवांना , हतबल अपयशी माणसांना ते संगीत जागे करून आत्मविश्वास देत होते. संगीताला एक दृश्यात्मकता आली होती. MTV वर गाण्यांचे म्युझिक व्हिडिओ  दिसायला सुरुवात झाली होती. अमेरिकेने जगाला दिलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे अमेरिकेने निर्माण केलेले संगीत . मला ते आयुष्यात फार योग्य वेळी मिळाले. मला नाही तर संपूर्ण भारतातील तरुण मुलांना .

क्रमशः

 

अपेयपान ३५

भारतामधील  सामान्य नागरिकांच्यातील भावनिक समृद्धी जिवंत ठेवण्याचे काम आपल्या सिनेमातील गाणी करतात. कारण घरात आणि समाजात परंपरा पाळत कुटुंबातील सर्वांचे पोट भरण्याचे आणि वंश चालवण्याचे काम करत भारतीय माणूस इतका मेटाकुटीला आलेला असतो कि त्याला कोणतीही सोपी संवेदना उरेल अशी शक्यता नसते. ह्या सगळ्यामुळे सामान्य माणसाच्या आतील स्वप्ने , त्याच्या कुंपणापलीकडील आकांक्षा , त्याचे राग, द्वेष , उन्माद , वासना ह्या व्यक्त करायला तो क्रिकेटपटू आणि सिनेमाच्या हीरोवर आयुष्यभर अवलंबून राहतो. क्रिकेट आणि सिनेमातली गाणी ह्यांनी भारतीय माणसाचे डोके ताळ्यावर ठेवले आहे . धार्मिक आणि कौटुंबिक परंपरा आणि आचारविचार ह्यांनी त्या माणसाचे हातपाय इतके करकचून बांधलेले असतात कि स्वतःतर्फे विजयी व्हायला , नाचायला , सेक्स आणि प्रेम करायला त्याला सचिन तेंडूलकर किंवा रणबीर कपूर लागतो. बाहेर जाऊन मोकळेपणाने स्वतः काही करायची धमक त्याच्यात उरलेली नसते. दुसर्याचे यश पाहून आपल्याला ते मिळाले आहे असे तो मानून घेतो . त्यामुळे  भारतात अनेक नोकऱ्या करणारी माणसे वर्षानुवर्षे सुट्ट्या टाकून क्रिकेट पाहतात किंवा मोबाईल वर सिनेमातली गाणी सतत पाहत बसतात. पावसात ओल्या झालेल्या हिरोयीनला हिरोने मारलेली मिठी आपणच मारली आहे असे समजून खुश होतात. भारतीय माणसाच्या ह्या सततच्या भुकेल्या अपंगत्वामुळे भारतात चित्रपट संगीताचा अप्रतिम  खजिना तयार होत राहिला आहे. जो जगात इतर कोणत्याही देशात नाही. जात पात धर्म भाषा सगळे विसरून वर्षानुवर्षे अनेक कलाकारांनी मराठी हिंदी बंगाली मल्याळी तमिळ तेलगु भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी निर्माण करत ठेवली आहेत. A R रेहमान सारखा निसर्गाची कुठलीतरी जादुई ताकद मिळालेला संगीतकार सर्व भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस गाणी गेली वीस एक वर्षे निर्माण करतोच आहे. माझ्या पिढीचा मोठे होण्याचा आलेख मांडायला बसले तर त्याच्या प्रत्येक टप्प्यावर रेहमानचे कोणतेतरी एक गाणे असते.

चित्रपट बनवताना माझा सगळ्यात जास्त आवडता भाग कोणता असेल तर तो चित्रपटातील गाणी बनवण्याचा. मला माझ्या चित्रपटांमध्ये आग्रहाने गाणी हवी असतात. पटकथेचे काम पूर्ण झाले कि मला संगीतकारांसोबत चालणारी अनेक म्युझिक सिटींग करायला फार आवडतात. मी गाण्याशिवायचा भारतीय सिनेमा असेल ह्याचा विचारच करू शकत नाही.

“तू कोणते संगीत ऐकतोस?” ह्या प्रश्नाचे मी कधीही नीट उत्तर देऊ शकत नाही . कारण मी पुष्कळ काही ऐकत असतो.  वाचत किंवा लिहित नसीन तर उरलेलेला बराच वेळ मी घरात आणि कारमध्ये खूप वेगवेगळे संगीत ऐकण्यात घालवतो. आपण ऐकायचे संगीत आपण निवडत नसतो. मांजर जसे राहायचे घर स्वतः निवडते तसेच संगीताचे आहे. ते आपल्याला निवडते. आपण कोणत्या प्रतलावर जगत आहोत , आपल्या मनामध्ये काय चालू आहे ह्यानुसार आपले मन आपोआप ओळखीच्या किंवा अनोळखी संगीताची निवड करीत असते.

माझी संगीताची जाणीव ज्या क्षणांनी , माणसांनी आणि दिवसांनी समृद्ध केली त्या क्षणांना आठवताना मी माझ्या आयुष्यातला तो दिवस विसरूच शकत नाही. २१ जून १९९९ चा. मी पहिल्यांदा परदेशात गेलो होतो तो काळ . पॅरीस  मध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या दिवशी म्युझिक फेस्टिवल होता. माझी म्युझिक फेस्टिवलची तोपर्यंतची समजून हि सवाई गंधर्व वर बेतलेली होती. एक मोठा हॉल  असेल किंवा स्टेज असेल तिथे आम्ही सगळ्यांनी जायचे , मग गायक येतील आणि आपण ते ऐकायचे. आम्हाला वीस जूनला फिल्म स्कूल मध्ये दुसऱ्या दिवशी वर्ग नसतील असे सांगण्यात आले. उद्या म्युझिक फेस्टिवल आहे . उद्या कॉन्सर्ट अटेंड करा . हाच तुमचा वर्ग. मी बर म्हणालो आणि रूमवर  आलो. सकाळी मी माझ्या हॉटेलच्या खोलीत उठलो ते एका वेगळ्याच वाद्याच्या आवाजाने. मी खिडकीबाहेर जाऊन पहिले आणि थक्क झालो. खालचा सगळा चौक माणसांनी फुलून गेला होता आणि सर्व रस्त्यांवर आपल्याकडे गणपती पाहायला माणसे फिरतात तशी शहरभर फिरत होती. मित्रांसोबत मी बाहेर पडलो आणि जातो तिथे वेगवेगळ्या देशांचे म्युझिक वाजवणारे लोक होते. फुटपाथवर , मेट्रो ट्रेन मध्ये , चौकातील कारंज्याच्या भोवती, सगळ्या विद्यापीठांच्या अंगणात. जिथे बघावे तिथे छोट्या आणि मोठ्या कॉन्सर्ट चालू होत्या. आफ्रिका , लॅटिन   अमेरिका , उत्तर आणि पूर्व आशिया  ह्या खंडांमधील संगीत मी कधी ऐकले नव्हते. मी दिवसभर मित्रांसोबत चालत राहिलो. भलेमोठे पॅरीस शहर जणू एक स्टेज बनले होते. किती आणि काय ऐकाल ? मी माझ्या ओळखीच्या प्रदेशापलीकडे त्या दिवशी जायला शिकलो. आपण नेहमी ओळखीचे आणि सुरक्षित संगीत ऐकत राहतो. अनोळखी अनुभवाची आपल्याला भीती वाटत राहते. ती भीती संपली. मला माहित असलेल्या पाश्चिमात्य रॉक आणि पॉप ह्या दोन्ही संगीताच्या पलीकडे मी गेलो. मी गायकांशी गप्पा मारल्या, अनोळखी वाद्ये हाताळून पहिली. सगळ्या शहरभर जणू मोठी पार्टी चालू होती. माणसे गप्पा मारत होती , गात होती , नाचत होती. प्रत्येकाला म्युनिसिपाल्टी तर्फे लायसन्स  आणि परफॉर्म करायची जागा आखून दिली होती. एका मोठ्या पार्क मध्ये त्या दिवशी रात्री माझा आवडता गायक ब्रायन अदाम्स येणार होता. माझी म्युझिकची आवड विस्तारून त्याला माझा आकार देण्यात ह्या दिवसाचा किती मोठा हात आहे !

शब्द रंग आणि समजुतीच्या आणि अर्थाच्या प्रदेशात मला संगीत घेऊन जाते. मी सध्या हेन्री निल्सन ह्या १९७० च्या दशकातील अमेरिकन गायक आणि लेखकाचे म्युझिक ऐकतो आहे. तसेच घरामध्ये मी लिहित असताना जॉन कोलट्रेन आणि मायील्स डेविस ह्यांचे संगीत लावून ठेवतो. मी स्वयपाक करताना नेहमी जॅझ  ऐकतो. त्याने सगळ्या घराला एक ताल आल्यासारखा होतो. मी सध्या महेश काळे ह्याला महाराष्ट्राचा एल्विस अशी पदवी दिली आहे , सतत तो मुलगा कुठेना कुठेतरी गातच असतो. आज इथे उद्या तिथे. शंकर महादेवन ने त्याच्याकडून गावून घेतलेला अरुणी किरणी हा तराणा मी परदेशात फिरत असताना इस्तंबूल मधील ताक्सिम स्क्वेअर मद्ध्ये एका रात्री बाकावर झोपून आकाशाकडे पाहत सतत ऐकत बसलो होतो. शंकर एहसान आणि लॉय ह्या त्रिकुटाचा मी फार मोठा फॅन   आहे. मला कधीतरी त्यांच्यासोबत एकत्र फिल्म करायची आहे. यान टीअर्सन ह्या फ्रेंच गायकाचे संगीत मला खूप उर्जा देते. त्याच्या संगीतामुळे मला लिहायला सुचते . तसाच मला उषा उत्थप ह्या तमिळ गायिकेचा आवाज खूप आवडतो. त्यांनी हिंदी चित्रपटात गायलेली अनेक गाणी मी ऐकत राहतो. लेडी गागा ह्या अमेरिकन पॉप गायिकेला मी उगीचच आजपर्यंत कमी दर्जाची मानत आलो होतो. नको तिथे आपला मराठी बाणा आड येतो. खूप प्रसिद्ध काही असले कि आपण नाके मुरडतो. मी काही दिवसांपूर्वी एका पार्टीत तिचे गाणे ऐकले आणि मी चाट पडलो. काय कमाल गाते ती. श्रेया घोशाल आणि सुनिधी चौहान माझ्या लाडक्या आहेत. माझ्या चित्रपटात त्या गायल्या आहेत. किती मोठी रेंज आहे दोघींच्या आवाजाला . टीना टर्नर आणि नीना सिमोन ह्या दोन्ही जुन्या अमेरिकन गायिका मला जाम आवडतात. व्हिस्की व्हॉइस म्हणता येईल असे त्यांचे आवाज आहेत . मला गदिमांनी लिहिलेली सर्वच्या सर्व गाणी आवडतात. ते माझे फार लाडके आहेत. लावण्यांचा मी मोठा फॅन आहे. आनंद मोडक ह्यांच्यासोबत लावणी ह्या विषयावर आम्ही किती तासनतास गप्पा मारत बसायचो. मी चित्रपटामधून भरपूर लावण्या ऐकल्या आहेत तसेच यमुनाबाई वाईकरांना बैठकीची लावणी सादर करताना पहिले आहे. शकुंतलाबाई नगरकर किती मस्त सिडक्षन करतात ते मी अनुभवले आहे. जगदीश खेबुडकरांनी मराठी गाण्यांना दिलेली झिंग आणणारी शब्दकळा माझ्या घरात तरंगत असते. मी पिंजराची गाणी सारखा ऐकतो. कधीतरी कुणालातरी परत असे मस्त करारे लिहिता यावे असे वाटते. अजय अतुल माझे लाडके आहेत आणि तसाच माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तो माझा संगीतकार मित्र अमित त्रिवेदी.

मी संगीताचा अनुभव घेताना मनाच्या सर्व खिडक्या आणि त्वचेची सर्व छिद्रे उघडी ठेवतो. भाषा किंवा संगीताचा प्रकार माझ्या आवडीनिवडीच्या आड येत नाही .

क्रमशः

 

अपेयपान ३६

मी स्वभावानुसार गर्दीत फिरणारा माणूस नाही .मी गर्दीला घाबरणारा प्राणी आहे. जास्त खाजगी स्वभावाचा आहे . माझी आनंद साजरा करायची कल्पना तीन ते चार जवळच्या लोकांसोबत असण्याची  असते. हजारो लोक जमतात तिथे जाऊन गर्दीचा भाग व्हायला मी थोडा बिचकतो. ह्या सगळ्याचा परिणाम मी संगीत कसे आणि कोणते ऐकतो ह्यावर होत असतो.

मी संगीत ऐकतो ते मोजके जाणकार लोक असलेल्या खाजगी मैफिलीमध्ये किंवा माझ्या हेडफोनवर ऐकतो. अनावश्यक गर्दीमध्ये संगीताचा अनुभव विसविशीत आणि विस्कळीत होवून जातो.दुसऱ्या बाजूला डेविड ग्वेत्ता किंवा स्क्रीलेक्स सारख्या EDMच्या ( इलेक्ट्रोनिक डान्स म्युझिक ) कॉन्सर्ट ना म्युझिकचा अनुभव हजारो लोकांसोबत एका उर्जेच्या पातळीवर जाऊन घेण्यात मजा असते.

मी खूप लहान वयापासून चित्रपट क्षेत्रात असल्याने मला आता गर्दीतला प्रेक्षक होणे शक्य होत नाही . किंबहुना प्रेक्षक होणेच शक्य होत नाही कारण तुम्ही काम करताना सतत मानसिक पातळीवर प्रेक्षकाच्या समोर उभे राहत असता. वर्षानुवर्षे प्रेक्षकाकडे एक न उलगडणारे कोडे म्हणून पाहत असता. काही वर्षांनी मग आपण साधे प्रेक्षक होवून गर्दीचा भाग होवून जाणे खूप अवघड बनते. गर्दी आणि सुसंकृत माणसांचा समूह ह्यातला फरक कळू लागतो. हि माझी जगाकडे बघण्याची जी पूर्वग्रहदूषित दृष्टी तयार झाली आहे त्या दृष्टीने मी किंवा प्रत्येक संगीताचा चाहता आपापले संगीत आणि ते ऐकायची पद्धत निवडत असतो. पूर्वग्रहाचा ( prejudice ) हा एक  महत्वाचा फायदा असतो. तुमची कलात्मक आवड निवड हि तुम्ही पूर्वग्रहदूषित ( heavily prejudiced) असलात कि जास्त उत्तम घडते. अतिसरळ आणि सपक अश्या तर्कशुद्ध मनाच्या आणि सद्सदविवेक बुद्धी सतत फुल ऑन मोड वर  ठेवून वागणाऱ्या माणसांना कलेचा संपूर्ण आनंद कधीही घेता येत नाही. त्यांच्या डोक्यात कोणतेही अधलेमधले नाजूक आनंद शिरू शकत नाहीत कारण त्यांच्या मनात द्वेष , स्पर्धा , नाराजी ह्यांच्या सारखे आवश्यक bacteria तयारच झालेले नसतात.

लेखक हा जसा बहुभाषिक असतो तसाच तो मनाच्या पातळीवर बहुलैंगिक असतो. मी लिहिण्याचे काम करताना , कथा रचत असताना नकळतपणे माझे मन संपूर्ण पुरुषाचे असते किंवा संपूर्ण स्त्री चे असते . ते वारंवार रंग बदलत राहते. काहीवेळा ते ह्या दोन्हीच्या मध्ये असणाऱ्या विस्तृत समुद्रामध्ये काही हे आणि काही ते बनून तरंगत राहते. मी म्युझिकची निवड करतो तेव्हा माझ्याही नकळत माझी त्यावेळची मनस्थिती माझ्या वतीने निर्णय घेत असते. मला काय आवडते यापेक्षा माझे मन कोणत्या प्रकारच्या म्युझिकला प्रतिसाद द्यायला उत्सुक आहे हि गोष्ट माझ्यासाठी महत्वाची होते.

माझ्याकडे काही अतिशय आवडत्या  गोष्टी आहेत त्या मी वारंवार ऐकतो. आमीर खान साहेबांचा मारवा असलेली एक CD आहे. लता मंगेशकरांची दोन गाणी आहेत (“जा रे उड जा रे पंछी” आणि “लग जा गले के फिर ये हसीन रात हो न हो”) एडिथ पियाफ ह्या जुन्या फ्रेंच गायिकेचे एक गाणे आहे.( Ne Me Quitte Pas)  माधुरी पुरंदरे ह्यांनी गायलेली ग्रेस ह्यांची एक कविता आहे (मी अशी बहरले होते) आणि लता मंगेशकरांच्याच आवाजातले पसायदान आहे. शिवाय मडोना चे ‘Don’t cry for me Argentina’ हे गाणे आहे. ह्या गोष्टी मला ऐकाव्या लागत नाहीत इतक्या त्या माझ्या मनाच्या आतमध्ये जाऊन शांतपणे बसल्या आहेत. माझ्या रक्ताचा भाग बनल्या आहेत. मी वारंवार ह्या गोष्टी मन शांत करून आणि डोळे बंद करून ऐकत राहतो. माझे आतले संगीत काय असे कुणी विचारले तर ह्या त्या चार सहा गोष्टी आहेत.

मी मनाने अगदी संपूर्ण शहरी माणूस आहे. मला लोकसंगीत फारसे आवडत नाही. ते माझ्या आत फारसे उतरत नाही. मला ते आता उर्जा देत नाही . ते आवडायला जो भाबडेपणा आणि मनाचा साधेपणा लागतो तो माझ्या आयुष्यात हळू हळू संपत गेला. त्यामुळे मला भारुडे , पोवाडे , अभंग , ओव्या ,आरत्या  ह्या सगळ्या साहित्याशी पूर्वी जोडता यायचे तसे आता नाते जोडता येत नाही. हा माझा मोठा  तोटा झाला असे मला वाटते. आयुष्यात पुढे जाताना आपला सोपेपणा कधी आणि कसा संपला ? बहिणाबाईंची कविता आता मला भावत नाही ह्याचे कारण माझ्या मनात नष्ट झालेले लहान मूल हे आहे. त्या विहिरीचे पाणी पिऊन माझे पोट भरले आहे.

मला सामाजिक संगीताचा मात्र फार मनापासून अगदी  कंटाळा आहे. समूहगीते आणि सामाजिक चळवळीची बेसूर आणि भेसूर गाणी मला जांभया आणतात .मी कोणतीही गोष्ट आवडल्याचे खोटे बोलू शकत नाही. उपयोगी कलात्मक वस्तू ह्या नेहमीच कुरूप असतात त्यामुळे सामाजिक कला नावाचे जे खूळ भारतात उगवले आहे ते फार विनोदी आहे. मी अश्या वातावरणात मोठा झालो ज्या वातावरणात कोणत्याही चिरंतन मूल्यव्यवस्थेविषयी मला फारसं आकर्षण उरलेलं नाही . एखादी गोष्ट केवळ खूप वर्ष टिकून आहे म्हणून मी त्या गोष्टीला गांभीर्याने घेऊन शकत नाही. सतत बदलणाऱ्या जगामध्ये मी बदलत बसलो आहे.  माझ्या आधीच्या पिढीला मिळाले ते स्थैर्य आणि सातत्य मला मिळाले असते तर मलाही फार आवडले असते. ! पण दर क्षणाला आमच्यासमोर जग बदलत गेले आहे. आमच्या पिढीला वेगाने बदलणाऱ्या जगाचा अनुभव इतर कोणत्याही पिढीपेक्षा जास्त पचवावा लागला आहे . त्यामुळे मी ज्या संगीताने स्वतःचे पोषण करतो ते संगीतही त्याच स्वरूपाचे आहे.

काही मोजके गायक,काही मोजके वादक आणि काही bands हे त्याला अपवाद ठरले आहेत. कारण हि माणसे काळासोबत बदलत जात अजूनही आश्चर्य निर्माण करायची थांबत नाहीत. त्यातले काही कलाकार आता मेले आहेत , काही जिवंत असले तरी आता नवे  काम करत नाहीत तरीही त्यांच्या कामातली उर्जा आजच्या काळातही रंग बदलत जिवंत राहिली आहे. रोलिंग स्टोन्स आणि बीटल्स हे दोन Bands .लिओनार्ड कोएन,बॉब डिलन आणि जिम मॉरीसन हे कवी आणि गायक ह्यांच्यापासून माझी हि यादी सुरु होते. भारतामध्ये आशा भोसले ह्यांनी निवडलेली आणि गायलेली गाणी हा सुद्धा बदलत्या काळाला पुरून उरणारा अनुभव आहे. मला त्या फार म्हणजे फारच आवडतात. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड आणि अमेरिकेत जन्मलेलं जे संगीत आहे ते आपल्याला पुन्हा जग नष्ट होईपर्यंत साथ देणार आहे. आधार देणार आहे. खऱ्या अर्थाने नवे संगीत हे दुख्खातून आणि विध्वन्सामधून तयार होते. त्यानंतर अनेक पिढ्या ह्या त्या संगीतावर उर्जा मिळवत किंवा त्या संगीताचा अर्थ लावत स्वतःचे नवे संगीत तयार करीत राहतात. मी सध्या ‘कोल्डप्ले’ ह्या तरुण ब्रिटीश band चे संगीत ऐकतो आहे. ते माझ्यासोबत  खूप वर्ष टिकेल. ते मला  संपूर्ण ओळखीची अशी भाषा बोलतात. मी बाहेर एकटा वणवण करत असताना ते मला समजून घेतात. Pink Floyd हा band असाच माझ्यासाठी खूप महत्वाचा असा आहे. त्यांचे संगीत मनाचा एक आतला स्तर बनून सतत माझ्यासोबत वावरत राहते.  ब्योर्ग हि ICELAND देशातील गायिका मला फार आवडते. तिचे संगीत गोंधळात पाडणारे आणि ओळखीच्या ताल सुरांच्या कक्षेच्या खूप बाहेरचे आहे.आणि मायकल   जॅक्सन माझ्यासाठी कधी संपेल असे मला वाटत नाही. All I want so say is that they don’t really care about us हे त्याने मला लहानपणीच सांगून जगायला तयार केले असे मला वाटते.

मी आनंद साजरा करण्यासाठी कधी संगीताकडे वळलो नाही .खूप आनंदी झालो कि मी मूक आणि शांत होतो.

हल्लीचे संगीत आम्हाला अगदी ऐकवत नाही असे म्हणणारी मनाने बुरसटलेली माणसे माझ्या आजूबाजूला इतकी आहेत कि मला आता त्यांच्या मनाच्या झापडबंद प्रवृत्तीवर हसूसुद्धा येत नाही. धार्मिक परंपरा जश्या जुन्या आणि कालबाह्य होतात तश्याच कलेच्या आणि संस्कृतीच्या परम्पारासुद्धा जुन्या होत असतात. वर्तमानकाळाकडे डोळ्यात डोळे घालून बघण्याची ताकद बऱ्याच माणसांमध्ये नसते . ती माणसे अशी विधाने करत तेच ते ऐकत आणि पाहत त्याचं त्या वाहवा देत कुजत बसतात.

सतत काहीतरी भरजरी सुप्रसिद्ध जुने आणि महत्वाचे ऐकण्यापेक्षा थोडं ओधडबोधड का असेना पण आज तयार होणारं ताज संगीत ऐकावं .नाहीतर तुम्ही मरणाच्या आधीच मनाने मेलेले राहाल.

 

kundalkar@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

“अपेयपान” लोकमत मधील लेखमाला . भाग १३ ते १७ .

अपेयपान १३

 

पूर्वीच्या जगण्यामध्ये आमच्या आजूबाजूला मद्यपान करणे आणि मांसाहार करणे ह्या गोष्टींबद्दल कितीतरी मजेशीर वातावरण होते. त्या गोष्टी काहीतरी वाईट किंवा भयंकर आहेत अशी काहीतरी भावना . पण सगळेजण दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणत करत असत . अगदी आमच्या सोवळ्या सदाशिव पेठेत सुद्धा .

फरक हा होता कि कोणतीही गोष्ट करताना तारतम्य बाळगून करणे हे भारतात कधी शिकवले जात नाही आणि त्यामुळे संकोच आणि अपराध भावना . ह्यामुळे काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून दारूच्या बाटल्या किंवा चिकन घरी येत असे. मांसाहार करण्याचे अंतिम टोक म्हणजे चिकन खाणे असे . त्यापलीकडे आमच्यातले कोणी गेल्याचे मला आठवत नाही . काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रयोजन मला कधी कळले नाही. सगळेच काळ्या पिशव्यांमधून काय आणतात हे सगळ्यांना माहिती असेल तर मग चोरून आणि लाजून आणि ‘आम्ही नाही त्यातले’ असे म्हणण्याचे प्रयोजन कसे साध्य होणार असा मला प्रश्न पडत असे.

बर धार्मिक भावना वगरे असे काही असेल तर ते सगळे भुक्कड थोतांड होते. आमच्या घरात पार्टी असली कि सगळे एकजात स्टील च्या पेल्यामधून दारू पीत आणि आम्हा लहान मुलांना आम्ही कसे औषधच पीत आहोत असे सांगत . काही वेळाने आपापल्या बरळणाऱ्या आणि आउट झालेल्या नवर्यांना एक एक पतिव्रता आत नेवून झोपवत असे आणि आम्ही मुले घाबरून आपापली जेवणाची पाने साफ करत हा प्रकार पाहत असू.

मला आमच्या बिचार्या आईवडिलांचा पिढीची सतत दया येत राहते ती यामुळे कि आमच्या आजूबाजूची सगळी सुशिक्षित पांढरपेशा पिढी संकोचत आणि घाबरण्यात जगली .दारू पिणे आणि मांसाहार करणे ह्यात चांगलेही काही नाही आणि वाईटसुद्धा काही नाही . प्रत्येकाच्या जगण्याचा तो एक वैयक्तिक प्रश्न असावा . पण दिवसा सगळ्यांसमोर आम्ही कसे सोवळ्यातले शाकाहारी असे मिरवायचे आणि रविवारी दारे खिडक्या बंद करून आत तंगड्या तोडत ग्लासवर ग्लास दारू रीचवायची. असे करताना जो एक ओशाळ आनंद मिळेल तेव्हडा घ्यायचा कारण सतत आपल्याला कोण काय म्हणेल ह्याची भीती . सगळा समाज ह्या भीतीत राहत असे . मला नव्या जगात जगताना आजच्या काळातील सुट्ट्या कुटुंबव्यवस्थेत आणि मोठ्या शहरांमध्ये आश्वासक हे वाटते कि कुणीही कुणाला काहीही बोलू शकत नाही . निदान आमच्या आई वडिलांपेक्षा कमी संकोचाने आम्ही जगण्यातले रंगीत आणि अमान्य आनंद घेत राहतो. आम्हाला वर तोंड करून काही बोलायची सोय कुणाला आम्ही ठेवलेली नाही .

स्वतः कष्ट करून कमावलेल्या पैशाने उपभोग घ्यायचा नाही आणि उपभोग घेतलाच तर कुणालाळी कळू न देता गपचूप आपल्याआपल्यात दारे बंद करून तो घ्यायचा असे करणयात आमच्या पिढीच्या बहुतांशी लोकांची बालपणे गेली . ह्याचे कारण रिती आणि धर्म ह्याचा समाजावर असलेला अनावश्ह्यक पगडा . दुसर्या बाजूला आनंद कसा घ्यायचा आणि किती प्रमाणात घ्यायचा ह्याचे कधीही भारतीय कुटुंबात मुलांना न दिले गेलेले शिक्षण . अजिबात एखादी गोष्ट करायची नाही , एखादी गोष्ट आपल्यात चालत नाही एवढेच सतत सांगितले जाते. असे नसेल करायचे तर काय करावे , आनंद कसा घ्यावा , बेहोष मस्ती कशी करावी ह्याचे न घरी वातावरण असते न दारी. होकारार्थी संस्कारच नसतात. काय करू नये ह्याची अगडबंब यादी . त्यातून एकाबाजूला मनातून घाबरलेली आणि दुसर्याबाजूला सुखांसाठी हपापलेली पिढी तयार होते . आणि ती सर्व पिढी प्लास्टिकच्या काळ्या पिशव्यांमध्ये चिकन आणून बायकोला भरपूर खोबरे वाटून बनवायला सांगते आणि स्वतः भोक पडलेले बनियन घालून स्टील च्या ग्लास मध्ये दारू पीत क्रिकेट पाहत बसते. मराठी पांढरपेशा मध्यमवर्गाइतका घाबरट दुटप्पी आणि दुतोंडी वर्ग मी जगात अनेक ठिकाणी फिरलो तरी कुठेही पहिला नाही . ती आमच्या लहानपणीएक अद्वितीय जमात होती ती नशिबाने काळासोबत अस्तंगत होत जात आहे.

मला खोटी बंधने नुसती दाखवण्यासाठी पाळायला आवडत नाहीत . असे करणाऱ्या लोकांचा मला मनस्वी कंटाळा येतो .

घर, शहर ,जात आणि माझे बालपणीचे वातावरण सोडून बाहेर पडल्यावर मला गेल्या पंचवीस वर्षाच्या आयुष्याने संकोचाशिवायचा आनंद उपभोगायला शिकवला. मला अनेक मनस्वी, रंगीत, मनाने स्वच्छ आणि प्रामाणिक माणसे भेटली .‘नैतिक माज’ जो माझ्या पुणेरी मराठी बालपणात फोफावला होता तो विरघळून गेला. मला अनेक स्त्रीपुरुषांनी कसे—केव्हा– काय –खायचे प्यायचे , काय ओढायचे , कुठे ताणायचे , काय सैल करायचे ह्याचे मस्त शिक्षण देत देत लहानाचे मोठे केले . देशाबाहेर गेल्यावर पहिल्याच दिवशी समोर पानामध्ये ससा आला. गरम गरम लुसलुशीत . मी तेव्हापासून आपण कोणता प्राणी खात आहोत ह्याविषयी घृणा बाळगणे सोडून दिले. चवीवर आवडी निवडी ठरवल्या. त्याचप्रमाणे मैत्री करताना ,प्रेम करताना किंवा नुसते तात्पुरते शारीरिक संबंध मोकळेपणाने ठेवताना भीती संकोच शरम वाटणे कमी झाले. आपण काय करत आहोत ह्याच्या जबादारीचे भान आले. समोरच्या व्यक्तीच्या मनाचा आणि शरीराचा आदर कसा ठेवायचा ह्याचे ज्ञान जगण्यामधून मिळत गेले.भारतीय कुटुंबव्यवस्थेने हे जबाबदारीचे ज्ञान मला कधीही दिले नाही. इतर अनुभवांशी मिसळत , चुका करत , चार ठिकाणी थोबाडीत खात , रडतखडत जे काही मनाला आणि शरीराला सापडले तीच खरी मुंज होती. त्या ज्ञानाने एक अपार बेहोशी ,अपार उन्माद आणि त्यानंतर येणारी थंड शांतता पेलायला हळूहळू शिकवले.

आमचे सगळे घराणेच तसे रंगीत. त्यांचे औपचारिक आभार ह्या सगळ्यात मानायलाच हवेत. मी लहानपणी अनेक वेळा हे पाहत असे कि आजोबांचे हात लुळे असताना त्यांना बिडी प्याची हुकी येई तेव्हा आई बिडी पेटवून त्यांच्या तोंडात धरत असे. ते मजेत झुरके घेत . आमच्या सबंध घराण्यात एकही म्हणजे एकही पुरुषाने एकपत्नीव्रत पाळले नव्हते . अजूनहि आमच्यात ती पद्धत नाही. त्यामुळे आमच्या घरातील बायका फार सोशिक आणि शहाण्या आहेत . महा हुशार आहेत आणि सतत सावध असतात . आमची आई संपूर्ण कडक शाकाहारी पण तिचा नियम हा होता कि जी मौजमजा करायची ती घरात करा . हॉटेलात जाऊ नका . त्यासाठी ती चिकन , मटण मासे सगळे शिकली . दहावीत तिने मला बजावले कि मित्रांसोबत बाहेर जाऊन बियर वगरे पिऊ नकोस , काय करायचे आहे ते घरात मोकळेपणाने कर. व्यसनी बनू नका. माझ्या नजरेसमोर मोकळेपणाने राहा . माझा भाऊ त्याच्या निर्णयाने शुद्द्ध शाकाहारी राहिला , मला व वडिलांना तिने हवे ते करून खाऊ घातले. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ अश्या घरात मी वाढलो . पण ते आमच्या चौघांचे अतिशय खाजगी जग होते. प्लास्टिकच्या काळ्या पिशवीतून पापलेट घरी येत असे. अचानक कोणी आजी आजोबा छाप माणसे आली कि आम्ही लगेच शुभंकरोती वगरे म्हणत असू . मी तर लहानपणी सारखं दिसेल त्याच्या पायापण पडत असे. मला लहानपणी पाढे आरत्या असला सगळा मालमसाला येई ज्याने नातेवायिक मंडळी आणि शेजारपाजारचे गप्प होतात .

उशिरा का होयीना पण मला माझे शहर सुटल्यावर मला जगण्याची तालीम मिळायला सुरुवात झाली . ह्याचा संबध नुसता खाणेपिणे आणि चंगळ करण्याशी नव्हता . ती मी पुष्कळ केली पण त्यापेक्षा महत्वाचे मला असे वाटले कि सतत आपण कुणीतरी विशेष , शुद्ध आणि महत्वाचे आहोत आणि जग सामान्य चुका करणारे आणि खोटे आहे हा जो पुणेरी विश्वात खोटा माज होता तो प्रवास केल्याने आटोक्यात आला. मला नवे चार गुण शिकता आले . प्रमाणात साजरे केले तर किती सुंदरपणे बेहोष होता येते ह्याचे शिक्षण मला मराठी लोकांच्या बाहेर राहून मिळाले. शरीराचे आणि मनाचे सर्व आनंद उपभोगणं ह्याविषयी असणारा संकोच आणि भीती हळूहळू मनातून जायला मदत झाली . काळ्या प्लास्टिकच्या पिशवीची गरज भासेनाशी झाली.

 

IMG_0353

 

 

अपेयपान १४

वयाने मोठे होताना आपल्यामधील अनेक सवयी, जुन्या भावनांची वळणे आणि आपले वागणे असे सगळेच बदलत राहते. काही बाबतीत आपण संपूर्ण होत्याचे नव्हते असल्यासारखे वागतो , तर काही भावना आपल्या मनाला लहानपणीपासून चिकटून बसलेल्या अजिबात सुटता सुटत नाहीत.

मी लहानपणी अतिशय एकलकोंडा आणि हळवा मुलगा होतो. ज्याला घरकोंबडा म्हणता येईल असा. सतत बसून पुस्तके वाचणारा आणि घरी आल्यागेल्या सगळ्यांशी तासनतास गप्पा मारत बसणारा. कधीही खेळायला बाहेर न जाणारा . घरी आलेले कुणी जायला निघाले कि मला वाईट वाटून रडायला येत असे . कितीही कमी वेळामध्ये माझा माणसावर खूप जीव बसत असे . नंतरच्या आयुष्यात अतिशय घातक ठरू शकेल अशी हि सवय . माझा समोर आलेल्या माणसावर अतोनात विश्वास बसत असे आणि त्या व्यक्तीविषयी एक कायमची आपुलकी मनामध्ये काही क्षणात उमटत असे. एखाद्या सोप्या पाळीव कुत्र्याचे मन असावे तसे शेपूटहलवे मन माझ्या लहानपणीच मला लाभले . जागा आणि माणसे सोडून जाताना माझ्या मनावर त्यांचे दाट आणि गाढ रंग उमटत असत .

अश्या वेळी मी रडायचो . आणि मग घरचे मला समजवायचे कि अरे चिंचवडची मावशी थोडीच कायमची सोडून चालली आहे ? ती लगेचच परत येणार आहे . किंवा असे सांगायचे कि मी फक्त ऑफिसला जातो आहे , हा गेलो आणि हा आलो . आणि मग ती माणसं निघून जायची आणि बराच काळ पुन्हा समोर यायची नाहीत.

काही वेळा ती परत कधीही भेटायची नाहीत . माणसांप्रमाणे जागासुद्धा लुप्त व्हायच्या . काहीतरी melodramatic विश्वास होता माझ्या मनात , कि आता परत काही या जागी आपण येणार नाही . हि वेळ शेवटची . आमच्या शहरात विद्यापीठाच्या बाहेर एक सुंदर भव्य कारंजे होते पूर्वी . आम्हाला लहानपणी तिथे फिरायला नेत असत . त्या कारंज्याच्या तुषारांचा गारवा मला त्या बुजवलेल्या जागी धुरकट ट्राफिकजाम मध्ये आजही उभा असताना जाणवतो . मी ते कारंजे अचानक बुजवून नाहीसे झाल्यावर खूप उदास झालो होतो . ते कारंजे म्हणजे माझ्या शहराच्या दाराशी उभा असणारा हसरा दरबान होता. तो गेला. त्याने मला जाताना काही सांगितले नाही .

एखादी व्यक्ती आपल्याला ह्या आयुष्यात आता पुन्हा कधीही भेटणार नाही हा आपला मृत्यूच असतो. त्या व्यक्तीच्या नातेसंबंधात आपण जे काही तयार झालो असतो त्या आपल्या व्यक्तिमत्वाचा मृत्यू.

अनेक वर्षांपूर्वी जेराल्ड हा माझा मित्र Paris च्या एयरपोर्टवर मला आग्रहाने सोडायला आला. त्याच्या स्कूटरवर डबलसीट बसून फिरत मी दीडदोन महिने Paris पहिले होते . माझा तो चांगला मित्र झाला होता. त्या दिवशी सकाळी लवकर उठून गावाबाहेर लांब असणार्या एयरपोर्टवर तो का येतोय हे मला लक्षात येत नव्हते . कारण तसे वागायची उठसूट पद्धत युरोपात नाही . इमिग्रेशन करून आत जाताना मी वळलो आणि त्याला पाहून हसलो आणि टाटा केला . भेटूच लवकर . त्याने मला पुन्हा जवळ बोलावले आणि मला म्हणाला नीट राहा , काळजी घे आणि एकटा पडण्यापासून स्वतः ला जप . तो काय बोलतो आहे हे माझ्या मनात नीट उमटले नाही कारण मी चार महिन्यांनी भारतात घरी परत जाण्याच्या आनंदात होतो . फोन करू कि , e मेल पाठवू कि . आणि मी येइनच ना परत पुढच्या वर्षी . मला असे सगळे वाटत होते . मी त्याला हसून होकार दिला आणि वळलो . ती आमची शेवटची भेट असणार होती . तो जाणीवपूर्वक माझा नीट शांत निरोप घेत होता हे मला लक्षात आले नाही. मी परत आलो आणि काहीच दिवसात जेराल्ड paris मधून काहीतरी गूढ घडल्याप्रमाणे गायब झाला. फोन बंद, घर सोडले आणि स्वतः चे नामोनिशाण पुसून टाकले. विरघळून गेला आणि संपला. अजूनही त्याच्या मृत्यूची कोणतीहि बातमी आलेली नाही . त्याच्या दुक्खांनी त्याला गायब केले आहे . मी त्या दिवशी त्याच्या निरोपाची खूण ओळखली नाही.

मी त्यानंतरच्या काळात माझ्या माणसाना स्टेशनवर आणि एयरपोर्ट वर न्यायला आणि सोडायला जायची सवय स्वतःला लावून घेतली. फोन , e मेल ह्या गोष्टींवरचा माझा सर्व विश्वास उडून गेला आणि समोर दिसणारा माणूस दिसेनासा होताना त्याला नीट भरीवपणे पाहून घ्यायला मी शिकलो.

शिवाय एक दुसरी गोष्ट मी फार सावकाशपणे शिकलो . जी करायला कुणी शिकवत नाही . ती म्हणजे आपण शेवटचा निरोप घेत आहोत हि भावना न संकोचता शांतपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवणे. एका ओळीमध्ये लिहायला आता सोपे जात असले तरी ते वळण घ्यायला मला अनेक संकोचलेल्या क्षणांचा अनुभव घ्यावा लागला.

लिफ्ट चा दरवाजा बंद होताना , स्टेशनवरून ट्रेन हलताना , जिना उतरून गाडीत बसायच्या आधी वर खिडकीकडे पाहताना आपल्याला लक्षात आलेले असते कि हि शेवटची भेट आहे . काही वेळा एका व्यक्तीला किंवा काही वेळा दोघांनाही कळलेले असते . आपण खोटे हसून आणि काहीच कसे घडले नाहीये असे एकमेकांना सांगत ती वेळ मारून नेत असतो . नाते संपत आलेले माहित असते पण चांगला निरोप घेण्यासाठी जी शांत शब्दसंपदा लागते ती आपण माणूस म्हणून कमावलेली नसते . ती कमवायला हवी.

हि समजूत सावकाश येत गेली तसं मी माणसांचा नाही तर जागांचा आणि शहरांचा निरोपही नीट घ्यायला शिकलो. आवडत्या जागा आणि शहरे ह्या आवडत्या व्यक्तीच असतात . कधीही मृत्यू न होणार्या व्यक्ती . आपण त्यांना सोडून जातो . त्या तीथेच असतात . माझ्यात अजूनही एक भाबडा मुसाफिर आहे ज्याला जग अगदी तळहातावर सामावेल एव्हडे सोपे आणि छोटे वाटते आणि कुठूनही निघताना असे त्या शहराला सांगावे वाटते कि हा मी आलोच जाऊन परत. पण कसचे काय ? कामांच्या रगाड्यात आणि जगण्याच्या उग्र प्रवाहात आपण तिथे परत कधीही जाणार नसतो . त्या जागेचा तसा एकमेवाद्वितीय अनुभव आपल्याला परत कधीही येणार नसतो .

गीझेला मन्सूर नावाच्या एका अतिउत्साही आणि प्रेमळ बाईच्या घरी पाहुणा म्हणून जर्मनीतल्या ब्रेमेन शहरात मी काही दिवस राहिलो. तिने माझे अतिशय लाड केले , गाडीत घालून शहर फिरवून आणले. आमच्या पुण्यात ब्रेमेन चौक आहे तसा तिथे पुणे चौक आहे तिथे नेऊन आणले आणि अश्या सर्व प्रसंगांना येतो तसं निघायचा दिवस भरकन येऊन उभा ठाकला. गीझेला मला स्टेशनवर सोडायला आली आणि मी तिला म्हणालो कि गाडी सुटेपर्यंत आपण गप्पा मारू . ती म्हणाली थांब तुझा ब्रेकफास्ट झाला नाहीये मी तुला फळे विकत आणून देते ती गाडीत खा . ती तिथल्या फळांच्या stall कडे पळाली आणि काही मिनिटात गाडी सुटली.

माझे लहानपण संपावे आणि त्या आठवणींच्या जाळ्यातून मुक्त व्हावे म्हणून मी काही महिन्यांपूर्वी माझ्या रिकाम्या शाळेच्या इमारतीला जाऊन हे सांगून आलो कि आपला संबंध आता संपला. मी आपल्या जुन्या आठवणींच्या नात्यामधून आता मोकळा होत आहे.

मला पूर्वी भाबडेपणाने आवडणारे आणि मोठा झाल्यावर अजिबात न पटणारे भैरप्पा ह्या कन्नड लेखकाचे एक पुस्तक मी एकदा विमानांत जाणीवपूर्वक विसरून आलो. जुन्या उग्र अत्तराची एक बाटली शांतपणे बेसिनमध्ये रिकामी केली . एका जुन्या नात्याचे कपाटातले कपडे गुलझारांचे ऐकून बांधून परत पाठवून दिले आणि सोबत टवटवीत फुले.

एकदा पहाटे उठलो तर माझ्या मुंबईतल्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा मेसेज फोनवर वाचला . आपण ह्यापुढे परत काही काळ भेटायला नको. तो निरोप मी शांत श्वास घेऊन पचवला. तिचे आभार मानले . ह्या सुसंकृत कृत्याबद्दल .

आपण गर्दीतून वाट शोधत बाहेर आल्यावर आपल्याला कुणी न्यायला आलेले असणे ह्यासारखे दुसरे सुख नाही आणि आपल्याला कुणी शांतपणे वाहनापाशी सोडायला आलेले असणे ह्यासारखे मनावर गूढ वलय दुसरे नाही . मी नेहमीच सोडायला आलेल्या माणसाशी हल्ली शांत प्रेमाने वागतो आणि गाडी निघताना नक्क्की मागे वळून पाहतो .

 

IMG_0320

 

अपेयपान १५

 

कोणत्याही साधारण तरुण माणसाला हे विचारा कि आकाश समीर आणि सिद हे कोण आहेत ? कुठून आले आहेत ? त्या माणसाने कोणताही विचार न करता’ दिल चाहता है’ असे उत्तर दिले तर तो साधारण किती वयाचा आहे आणि साधारण कोणत्या काळात जन्मला ह्याचा अंदाज घेणे सोपे जाते . जर त्या बिचाऱ्या माणसाला फार काही आठवले नाही , तर त्याला विचारा रान्चो, राजू आणि फरहान कोण आहेत ? जर त्याने ‘थ्री इडीयटस’ असे लागेच उत्तर दिले तर ते बाळ थोडे लहान आहे , आत्ताच मिसरूड फुटलेले आहे असे समजावे .

प्रत्येक पिढीचा एक सिनेमा असतो . जो त्या त्या पिढीला हलवून सोडतो आणि भरपूर उर्जा देतो. आमची ‘दिल चाहता है’ ची पिढी आहे. ह्या सिनेमामुळे आम्ही चांगल्या हेयर styles शिकलो . gogle घालायला शिकलो. आपल्या लहानपणीच्या सिद्धार्थ नावाच्या मित्राला सिद म्हणायला शिकलो आणि अजून काही मित्र गोळा करून कोल्हापूरमार्गे गोव्याला जायला शिकलो. पण असे असले तरी आम्ही आई वडिलांना सांगून जातो . उगाच तसले काही भलतेसलते वागत नाही . आणि लगेच सोमवारी परत पण येतो .

महाराष्ट्रात तुम्ही नुसते तरुण असून ,किंवा नुसते श्रीमंत असून किंवा फक्त हुशार असून भागात नाही . कारण त्या सगळ्या उर्जेचे आणि आपल्या स्मार्टपणाचे काय करायचे ह्याचे उत्तर आपल्या मराठी समाजाकडे , आपल्या संगीताकडे , आपल्या रोजच्या जगण्याकडे कधीच नसते . आपण दिग्गज लोकांचा आणि महापुरुषांचा देश आहोत आणि तरुणांच्या अंगात उधळायला जी रग काठोकाठ साठलेली असते त्याचे काही करायची सोय ह्या बहु असो कि संपन्न , प्रिय अमुच्या देशात नाही . कारण आमच्या राज्यात स्मारके बनवण्याचा जास्त उत्साह आहे. मौजमजा करणे आम्हाला पटणारे नाही . आमच्या राज्यातली तरुण मुले आधी हिंदी सिनेमे बघतात आणि मग त्यातले हिरो जे काही करतील त्याची कॉपी करून स्वतः च्या मोकळेपणाची आणि बेभान होण्याची हौस भागवून घेतात . मराठी सिनेमातले हिरो पाहून आपण फक्त मातृप्रेम ,लग्न( वेळच्यावेळी ), कुलादैवताची आराधना , पूर्वजांच्या वास्तू बिल्डरपासून वाचवणे किंवा शेतीवाडी एव्हडेच करू शकतो. जगण्यासाठी आणि स्वप्न पाहण्यासाठी मराठी हिरो कामी येत नाहीत. कारण त्यांची पोटे आपल्या एव्ह्डीच किंवा आपल्यापेक्षा जास्त सुटलेली असतात आणि त्याच्न्ह्यातल्या अनेकांपेक्षा आपल्या गल्लीतील अनेक पोरेपोरी जास्त बरी दिसत असतात.

‘दिल चाहता है’ मुळे आमच्या सगळ्या साध्या बिचाऱ्या आणि साळसूद घरातून आलेल्या तरुण मुलामुलींना हाफचड्ड्या आणि हिरवे निळे gogle घालून गोव्याला जाऊन फुल्टू मजा करायची सवय लागली. जी गोव्याला जायला लाजली ती उरलेली आदर्शवादी बाळे ‘रंग दे बसंती’ सारखा साधारण देशप्रेमी सिनेमा पाहून प्रेरित होत राहिली आणि आदर्शवादाची अफूची गोळी घेऊन पुण्यात बसून सामाजिक चर्चा करत बसली . जे हुशार होते ते तडक मित्र गोळा करून गोव्याला गेले.

मी फरहान अख्तरला जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी त्याला हे म्हणालो कि गोवा सरकारने तुम्हाला दर महिन्याला पैसे दिले पाहिजेत त्यांचे पर्यटन कैक पटींनी वाढवल्याबद्दल !

महाराष्ट्रातून मुलेमुळे गोव्याला आणि मुलीमुली स्वतंत्रपणे अलिबाग किंवा गुहागरला जातात. असं एकत्र उठून गोव्याला गेलेले आमच्या मराठी संस्कृतीला अजिबात मान्य नाही . आणि शिवाय आपापले गेलेलेच बरे असते असे माझ्या काही तरुण मित्रांनी मला गपचूप गाठून सांगितले . कारण नाहीतर मग रशियन मुलींकडे मोकळेपणाने बघत बसता येणार नाही.

युरोपातल्या राज्यसत्ता भारतातून निघून गेल्यावर त्यांनी आपल्यासाठी जी अनेक सुंदर हिलस्टेशन आणि अप्रतिम जुनी ठिकाणे नीट राखून ठेवली त्यापैकी गोवा हे एक आतिशय महत्वाचे असे एक रत्न आहे. अजूनही भारतीय लोकांच्या मनातील ह्या जागेविषयी असलेले बेफाम आकर्षण आटोपलेले दिसत नाही . आपल्या सुंदर कोकणाला लागून असलेला हा निसर्गरम्य किनार्याचा भाग पोर्तुगीज लोकांनी आणि जगभरातून आलेल्या साठीच्या दशकातील हिप्पी लोकांनी अतिशय गूढ आकर्षक आणि रंगीत बनवला . निसर्गसौदर्यात कोकणची किनारपट्टी गोव्यापेक्षा अजीबातच कमी नाही . कोकणाचा अतिशय नेटका शांत आखीव बाज आहे . पण तिथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गोव्यात देशभरातून आणि जगभरातून इतकी माणसे सतत येत राहतात याचे कारण तिथे मोकळे आणि बेभान व्हायला आपणच आपल्या मनाला परवानगी देतो आणि मनातील भीती संकोच बाजूला सारून हवे तसे वागतो , समुद्रात पोहतो , चार रंगीत व्यसने करतो .

आपल्याला परदेशी लोकांसारखे काही दिवस वागून पहायचे असते आणि गोवा तुम्हाला तसे करण्याची मुभा देतो हे भारतीय तरुण मुले गोव्याला का निघून जातात ह्यामागचे महत्वाचे कारण आहे . आणि दुसरे अतिशय चुकीचे आणि वाईट कारण असे आहे कि तिथे दारू स्वस्त आहे . दारूवर तिथे कर नसल्याने इतर ठिकाणहून रासवटासारखी येऊन माणसे तिथे पीत बसतात .

आपल्या समाजात आपल्याला आनंदाचा उपभोग घ्यायला आपल्या कुटुंबामधून कधीच शिकवले जात नाही .आणि मग जिथे चोरून आनंद घेता येतो तिथे जाऊन आपण हपापल्यासारखे वागून मन शांत करून घेतो आणि परत घरी येऊन वेगळा मुखवटा धारण करून आपले कौटुंबिक आयुष्य जगत राहतो

उत्तरेच्या अश्वेम पासून खाली पणजीजवळच्या कांदोळी पर्यंत गोव्याचे पर्यटकांनी बुजबुजलेले किनारे आपल्या शरीराची आणि मनाची सर्व प्रकारची भूक ताबडतोब भागवायला सज्ज असतात . गोव्यात पोचताच हॉटेलांवर सामान टाकून देशभरातून आलेली तरुण मुले मुली दारू सिगरेटी गोळा करून किनार्यावर धावतात आणि युरोपीयन माणसे त्यांच्या सिनेमात समुद्रकिनार्यावर जशी वागतात त्याची बिचारी नक्कल करताना दिसतात . कारण आनंदाने जगण्याचे आपापले मॉडेल आपण बनवू शकत नाही . आपल्याला सुट्टी घालवण्यासाठीसुद्धा कुणाचीतरी कॉपी करावी लागते . कारण नसताना आपण उघड्या अंगाने किनार्यावर पुस्तके वाचत पोट वर करून गोर्या माणसांप्रमाणे लोळतो . जमत नसतानाहि फेसबुकवर फोटो टाकता यावेत म्हणून बीच volleyball खेळतो , उगाच खोल्यांमध्ये दिवसभर gogle घालून बसतो , मोठ्या hats घालून सुसाट गाड्या चालवतो पण पोहताना मात्र आपण लांब हाफ चड्ड्या आणि पंजाबी ड्रेस घालतो . किनारे घाण कारून टाकतो.

खरा गोवा हा ह्या किनार्यांपासून थोडा आतवर आणि शांत जागी आहे . काही मोजक्या जाणकार पर्यटकांना त्या जागा माहित असतात ज्यांची जाहिरात केलेली आपल्याला कधीच कुठे दिसणार नाही .

ह्या गोव्यात जगभरातून आलेले अनेक लेखक , कवी आणि चित्रकार राहतात . शांत वाहणाऱ्या नद्या आहेत . छोटी सुरेख गावे आहेत , निर्मनुष्य समुद्र किनारे आहेत . आणि जुन्या भव्य पोर्तुगीज वास्तू आहेत जिथल्या खोल्या राहण्यासाठी काही दिवस मिळतात . दारू , पब्स आणि पार्ट्या ह्याच्यापलीकडे गोव्यात आतमध्ये गेलो कि फार मस्त माणसे आणि निवांतपणा आहे . पावसाळ्यात किनार्यावरचे बुजबुजलेले आखीव पर्यटन बंद होते तेव्हा गोवा एक वेगळे सुंदर स्वरूप धारण करतो . शांतता पचवायची ताकद असलेले अनेक जाणते पर्यटक ह्या काळात जगभरातून गोव्यात येतात आणि कुणालाही कळणार नाही अश्या अतिशय सुंदर गावांमध्ये प्रशस्त घरांमध्ये राहतात . लिहितात , गिटार वाजवतात , नवीन गाणी तयार करतात , चित्रे काढतात , पोहतात , पावसात फिरायला जातात. गोव्यातली स्थानिक माणसे अतिशय रंगीत शांत आणि आपुलकी असलेली आहेत. त्यांचे जेवण , त्यांचे सणवार , मराठी आणि हिंदू समाज आणि ख्रिश्चन समाज यांच्यात असणारे छोटे खटके , वाद , त्या सगळ्यासकट चालणारी त्यांची आयुष्य ह्या गोष्टी दिसल्या , भेटल्या कि फार मजा येते.

खूप माणसाना एखादी गोष्ट समजली कि माणसे तिथे जाऊन त्या जागेची वाट लाऊन टाकतात . त्यामुळे हा जगापासून लपून असलेला आतला गोवा तसाच खाजगी राहावा असे मला मनापासून वाटते .

 

IMG_1293

अपेयपान १६

 

जिथे पर्यायी विचार करणाऱ्या लोकांची सतत खिल्ली उडवली जात असे अश्या वातावरणामध्ये मी लहानपणी वाढलो. पर्यायी विचार करणारे लोक म्हणजे ज्यांना पर्यावरणाचे रक्षण करायचे आहे , ज्यांना स्त्रीवादाचा अभ्यास करायचा आहे , ज्यांना जातीपातींवर आधारलेली समाजाची घडी बदलायची आहे , ज्यांना अंधश्रद्धेविरोधी जागृती निर्माण करायची आहे असे आणि अश्या प्रकारचा वेगळा विचार करणारे लोक. परंपरेने चालत आलेल्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने पाहणारे .

माझ्या लहानपणीच्या शहरात पुरोगामी वातावरण आहे असे वरवर भासत असले तरी शहरातील बहुसंख्य समाज हा अश्या लोकांची चेष्टा करणे , त्यांच्याविषयी नाराजी असणे आणि शक्यतो आपली मुलेबाळे अश्या माणसांच्या नदी लागू नयेत ह्याचा काळजीत असायचा . शिक्षण , चांगल्या पगाराची नोकरी , वंशवृद्धी ह्याच्यापलीकडे कुणी कसलाही विचार करायला उत्सुक नसे. सुरक्षित परंपरेत जगणारी माणसे सुखाने तुस्त झाली असली तरी घाबरलेली असत आणि कुणीही आपली जगण्याची सुरक्षित चाकोरी मोडून बाहेर पडू नये असे त्यांना वाटत असे. वेगळा विचार करणारा माणूस किंवा संस्था हि धोकादायक मानली जात असे. त्यामुळे कौतुक करून मारून टाकणे हे जे मराठी माणसांचे ताकदवान अस्त्र आहे त्याचा वापर अश्या माणसांवर समाज करत असे. कुणी काही वेगळे करताना दिसला कि त्याचे सत्कार , कौतुक वारेमाप करून त्याला महाराष्ट्रात संपवून टाकले जाते. त्यामुळे अनेक चांगल्या माणसांचे आमच्याकडे सत्कार , त्यांची व्याख्याने , त्यांच्यावर पेपरात रकाने असे सगळे होत असले तरी समाजजीवनात अश्या माणसांची हेटाळणी केली जात असे.

ह्याच मनोवृत्तीतून ऐंशी नव्वदच्या दशकातील जुन्या पुण्यामध्ये समाजवादी ,पर्यावरणवादी , स्त्रीमुक्तिवादी , गांधीवादी माणसांना आणि संस्थांना थोडे हिणवण्याची प्रवृत्ती होती. पुणे हे वेगवेगळ्या संस्थांनी गजबजलेले शहर असले तरी त्याचा चेहरा हा पारंपरिकच होता . जुना इतिहास खणत बसणे आणि आपण पूर्वी कसे वैभवशाली आणि बलवान होतो ह्या असल्या विषयांवर काम करणाऱ्या माणसे आणि संस्थांचे पुण्यात लाड होत.

अनिल अवचट ह्या लेखकाने सर्वप्रथम मध्यमवर्गीय सामान्य वाचकापर्यंत जगण्याचे दुसरे उपलब्ध पर्याय आपल्या लिखाणातून मांडायला सुरुवात केली आणि चाकोरीबाहेरचे आयुष्य जगणाऱ्या अनेक माणसांची , संस्थांची आणि विचारांची ओळख त्यांच्या प्रांजळ ,खऱ्या आणि रोचक लिखाणाने महाराष्ट्राला झाली . त्या वेळी महाराष्ट्रात छोट्या स्वतंत्र ग्रंथालयांचे ( libraries ) जाळे होते आणि माणसे पुस्तके विकत घेत तसेच मोठ्या प्रमाणात ह्या ग्रंथालयांच्या मेंबरशीप मधून अनेक पुस्तके वाचायला घरी आणत . अनिल अवचटांची पुस्तके ह्या ग्रंथालायांमार्फत महाराष्ट्रात प्रचंड पोचू लागली आणि त्याच्या प्रवासप्रीय वृत्तीमुळे ते लोकांना सहजपणे भेटू लागले . आमच्या पिढीला non fiction लिखाणाची गोडी लावण्याचे मोठे काम त्यांच्या साहित्याने केले. तोपर्यंत कथा कादंबरया आणि मराठी अश्रुप्रपाती नाटके हेच आमच्यासाठी साहित्याचे स्वरूप होते. मला आठवते त्याप्रमाणे आमच्या पिढीचा शालेय आदर्शवाद घडत असताना आम्ही मोठ्या प्रमाणावर अवचटांच्या पुस्तकांनी भारावले गेले होतो.

हा नव्वदीचा काळ अर्थाव्यवस्थेच्या मुक्तीचा आणि प्रामुख्याने digital क्रांतीचा काळ होता . आर्थिक आणि जातीय संक्रमणे मोठ्या प्रमाणावर होत होती . उच्चवर्णीय समाजामध्ये आपापल्या मुलांना लवकरात लवकर शिकवून ह्या देशाबाहेर काढणे हा एकमेव पर्याय होता कारण आरक्षणामुळे सगळ्यांचे धाबे दणाणले होते. त्यांमुळे देश सोडून अमेरिकेला जाणे आणि तीथे आपल्या बुद्धीचे आणि श्रमांचे चीज करून घेणे हा आमच्या पिढीचा अतिशय महत्वाचा कार्यक्रम होता . त्यामुळे वेगळे काही काम करण्याच्या विचाराने एका बाजूला भारावून जाणे आणि दुसर्या बाजूला अमेरिकेला , इंग्लंडला किंवा कॅनडा ला जाण्यासाठी शिक्षणाचे आणि नोकरीचे पर्याय शोधणे अश्या तीव्र संभ्रमात आमची पिढी बराच काळ होती. आपण जे वाचतो , ज्या चांगल्या माणसांना भेटतो आणि आणि त्यांच्या विचारांनी , कामांनी भारावून जातो ती माणसे आणि त्या संस्था आपले जगण्याचे प्रश्न कसे सोडवतील अश्या चर्चा तरुण पिढीच्या निर्णयप्रक्रियेत होत असत. मी स्वतः शालेय शिक्षण संपताना सोबातच्या मित्रांसोबात अनेक वेळा ह्या चर्चा केल्या आहेत.

मेधा पाटकरांचे नर्मदा आंदोलन , आमटे कुटुंबियांचे आनंदवन , अभय आणि राणी बंग ह्यांचे गडचिरोलीत चालणारे काम , पुण्यातील मिळून सार्याजणी ह्या मासिकाच्या सानिध्यात जिवंत असलेली स्त्रीवादी विचारांची चळवळ , अवचट कुटुंबियांचे व्यसनमुक्तीचे काम ह्या आणि अश्या अनेक छोट्या मोठ्या चळवळी , आंदोलने , विचारप्रवाह आमच्यासमोर येत होते आणि आपण काहीतरी करून ह्यापैकी कोणत्यातरी कामामध्ये स्वताहाला जोडून घेऊ , काही नव्या गोष्टी शिकू असे महाराष्ट्रात खूप तरुण मुलामुलींना वाटत असे. प्रश्न होता तो ह्या सगळ्या दिशेला आपल्याला नेयील किंवा मार्गदर्शन करेल असं कोणताही ओळखीचा चेहरा आणि व्यक्ती कुणाच्याच आजूबाजूला नव्हती त्यामुळे अनेक वेळा मुलामुलींचे हे विचार म्हणजे फक्त त्यांची आदर्शवादी स्वप्ने राहत . पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे हे एकमेव जोडपे असे होते कि जे दशकानुदशके सर्वसामान्य माणसाची ह्या संस्थांशी आणि माणसांशी गाठ घालून देत होते . ते दोघे आमच्या वेळी सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातून निवृत्त झाले होते आणि सगळ्या सामाजिक कामांना एका आखीव NGO सारखे स्वरूप यायला लागले होते. सामान्य माणूस आणि सामाजिक कामे ह्यांच्यातला दुवा संपत चालला होता.

महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे स्थान ह्या काळात नगण्य असल्याने सामान्य माणसापर्यंत पोचण्याचा जो एक प्रवाही दृष्टीकोन असतो तो पर्यायी विचार करणाऱ्या माणसांनी आणि संस्थांनी नव्वदीच्या दशकात गमावला होता. ग प्र प्रधान , एस एम जोशी ह्या प्रभावी विचारवंतांच्या निर्वृत्तीनंतरचा हा काळ . आता ह्या विचारला आणि कार्यक्रमाला राजकीय पाठबळ नव्हते आणि सामाजिक कामात नव्या पिढीचे रक्ताभिसरण नव्हते. जी माणसे होती ती मुख्यतः त्यांच्याच कुटुंबातील असत ज्यांना पूर्वीपासून अश्या विचारांची सवय किंवा वैचारिक सक्ती होती . त्यामुळे एकमेकांचे कौतुक करणे आणि एकमेकांना पाठींबा देणे अश्या मर्यादित आणि साचलेल्या स्वरुपात ह्या संस्थांच्या कामाचा प्रसार नव्वदीत आणि त्यानंतरच्या काळात होत असे. ह्या संस्थांनी चालवलेली अनेक उत्तम आणि सकस लिखाणाची मासिके हि फक्त त्याचे विचार आधीच पटलेली माणसेच वाचत असत . नव्या तरुण पिढीशी आवश्यक असणारी प्रवाही देवाणघेवाण ह्या संस्थांकडून होत नव्हती आणि त्यामुळे पुण्यात पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या माणसांची छोटीछोटी बेटं तयार होवू लागली होती.उन्हाळ्याच्या सुट्टीत जाऊन शिबिरे करतात तितपतच नव्या तरुण पिढीचा ह्या संस्थाशी संबंध होता. साठ सत्तर सालातला सामाजिक आदर्शवाद संपत चालल्याची घंटा वाजू लागली होती पण बहुदा ती ऐकून स्वतः मध्ये काही बदल करावेत असे वातावरण दिसत नव्हते . त्यामुळे पर्यायी आणि सामाजिक क्षेत्राविषयी एक मोठ उदासीनता शहरी बुद्धिवादी वर्गात ह्या काळामध्ये पसरली . आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसे हि फक्त सत्कार करण्याच्या वस्तू झाल्या.

समाजाला सत्कार करायला आणि देणग्या द्यायला नेहमी अशी माणसे लागतात . कारण सत्कार करणारा माणूस त्यामुळे जास्त नाव कमवत असतो. आदर मिळत असला तरी त्याचा अर्थ समाजाचा मनातून ह्या गोष्टीना पाठींबा असेल असा होत नाही .हि गोष्ट सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना कळली होती असे दिसले नाही .

महाराष्ट्रातील अनेक संस्थांना आता समाज बदलला आहे , समाजाचे प्रश्न बदलले आहेत ह्याची जाणीव कधीही झाली नाही . आर्थिक वातावरणाचे भान काही केल्या आले नाही. गांधीवादी विचारसरणीतून उत्पन्न झालेला ग्रामसुधारणा आणि ग्रामीण समाजव्यवस्थापनाचा जुना एककलमी कार्यक्रम हि माणसे दोन हजार साल उजाडले तरी राबवत बसली. तीच ती दहा बारा माणसे एकमेकांची पाठराखण करत बसली . स्त्रीवादी विचारांची महाराष्ट्रातल्या स्त्रियांनीच मजेत कत्तल केली असे आज दिसते . बहुतेक संस्थांचे काम हे त्यांच्या सोयीच्या आणि सवयीच्या लांबच्या ग्रामीण भागात सुरु राहले आणि शहरी सामातून ह्या माणसांनी स्वतःची दृष्यात्मकता नाहीशी केली. सामाजिक काम म्हणजे लांब गावात जाऊन काही माणसांना काहीतरी सतत शिकवणे . प्रश्न फक्त ग्रामीण समाजाला असतात . आपल्या रोजच्या जगण्याशी आपल्या प्रश्नाशी ह्या माणसांचा काही संबंध नसतो अशी जाणीव शहरी तरुण वर्गात मोठ्या प्रमाणत पसरली आणि ठराविक सेलेब्रिटी माणसांची आत्मचरित्रे वाचणे ह्यापलीकडे मराठी समाजाने ह्यानंतरच्या काळात सामाजिक क्षेत्राशी संबंध ठेवला नाही.

आजच्या काळात पुरोगामी माणूस हा शब्द पद्धतशीरपणे चेष्टा करण्यासाठी आणि खिल्ली उडवण्यासाठी राजकीय हेतूने वापरला जातो तेव्हा मला वाईट वाटते . आणि असे का झाले असावे ह्याचा महाराष्ट्राने विचार करायला हवा असे वाटते. हि प्रक्रिया पद्धतशीरपणे फार पूर्वी सुरु झाली . त्याचे पक्व फळ आपल्याला निराशाजनक वातावरणात आज दिसते आहे.

 

sachin snap on set .jpeg

 

अपेयपान १७

 

जिवंत आणि कार्यरत लेखक वाचकाला आणि आजूबाजूच्या लेखकांना सातत्याने आत्मभान देत असतात . मी आज टेबलापाशी बसून लिहिताना माझ्यासमोरच्या लाकडी फडताळात महेश एलकुंचवार ह्यांची नाटकांची आणि ललितलेखांची पुस्तके ओळीने समोर उभी दिसताहेत. सध्या दर रविवारी एका वृत्तपत्रात त्यांचे एक सदर चालू आहे. आजही भारतात कुठे न कुठे त्यांनी लिहिलेल्या नाटकांच्या तालमी आणि प्रयोग सतत चालू आहेत .मी ज्या गतीने आणि तालाने वाचन करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त उर्जेने आणि कमालीच्या शिस्तीने गेली अनेक वर्ष महेश एलकुंचवार गांभीर्याने आणि सातत्याने लिखाण आणि वाचन करत आहेत.

माझ्या अतिशय आवडत्या,जिवंत आणि कार्यरत भारतीय लेखकांपैकी महत्वाचे असे हे लेखक.

गेले अनेक दिवस मी प्रयत्नपूर्वक सध्याच्या कार्यरत लेखकांचे जगभरातले साहित्य वाचत आहे. त्यात फ्रेंच लेखक मिशेल विल्बेक , ब्रिटीश लेखक जेफ डायर , नायजेरियन अमेरिकन लेखक टेजू कोल , जपानी लेखक हारूकी मुराकामी , कॅनडीयन लेखिका मार्गारेट अट्वूड , भारतीय लेखक अमिताव घोष आणि महेश एलकुंचवार . महेश एलकुंचवार हे माझ्या मातृभाषेत मराठीमध्ये लिहितात. जिवंत आणि कार्यरत लेखकांचे साहित्य वाचल्याने मला वर्तमानात जगण्याची सवय लागली आहे. हे वाक्य वाचायला वाटते तितके गुळगुळीत आणि सोपे नाही . ह्याचे कारण मानवी मनाला वर्तमानाचे भान शक्यतो टाळायचे असते . आणि त्यामुळे आपण सातत्याने गोंजारणारे आणि गालगुच्चा घेणारे काहीतरी सतत वाचत किंवा पाहत असतो. उत्तम आणि ताजे साहित्य आपल्याला मोठ्या गुंगीमधून जागे करते.

ह्याचा अर्थ असा होत नाही कि हे सगळे च्या सगळे लेखक वर्तमानाविषयीच लिहितात . अमिताव घोष आणि महेश एलकुंचवार तसे करत नाहीत. तरीही ते माझ्या काळात हे दोघे सातत्याने कार्यरत असल्याने मला वाचक आणि लेखक म्हणून हे लेखक आजच्या जगण्याविषयी अतिशय जागे ठेवत आले आहेत.

आपण अनेकवेळा तरुण आणि बंडखोर हे शब्द फार उथळपणे जिथे तिथे थुंकल्यासारखे वापरतो. सोपे करून टाकले आहेत आपण ते शब्द. एलकुंचवार ह्यांचे लिखाण सतर्कपणे वाचले कि तरुण दाहक आणि बंडखोर लिखित साहित्य त्यांच्यानंतर मराठीत तयार झालेले नाही हे आपल्या लक्षात येते. एकवेळचे किंवा दुवेळचे लेखक महाराष्ट्रात किलोभर आहेत. बंडखोर , पुरोगामी वगरे माणसे तर आपल्याकडे रद्दीसारखी आहेत. तरुण तर महाराष्ट्रात सगळेच असतात त्याला काही तोटाच नाही आणि अनेकविध स्त्री लेखिकांनी मराठी साहित्याचे आठवणी पुसायचे पोतेरे करून टाकले आहे. अनेक पुरोगामी वैचारिक साक्षरांना तसेच पत्रकारी पाणचट लिखाण करणार्यांना महाराष्ट्राने लेखक म्हणून उगाच लाडावून ठेवले आहे. त्या लोकांना ह्या चर्चेत नक्कीच बाजूला ठेवायला हवे.

शिस्त आणि सातत्य ह्या दोन्ही गुणांनी बहरलेले , प्रखर सत्याची आस धरलेले आणि आयुष्यातल्या एकटेपणाचा दाहक मुलामा असलेले ललित लेखन महेश एलकुंचवार ह्यांच्यानंतर महाराष्ट्रात कुणालाही साध्य झालेले दिसत नाही. अजूनही .

एलकुंचवार शिस्त ,सातत्य आणि कामावरचे अतोनात प्रेम ह्या बाबतीत अतीशय जुन्या वळणाचे ब्रिटीश आहेत. त्यांच्या मांडणीत, शब्दसंपदेत लेखन प्रवाहात आणि भावनांच्या अविष्कारात ते जागोजागी जाणवते. त्यांच्या लिखाणातल्या दुखऱ्या आणि बोट चेपून काळेनिळे पडलेल्या मनाच्या पात्रांनी मला सातत्याने त्यांच्या लेखनाची वाट पाहायला लावली आहे . मला ते लिखाण कालसुसंगत वाटते आणि ते लिखाण माझे सातत्याने पोषण करीत राहते.

लिहायला बसले कि लक्षात येते कि आठवणींना आणि भूतकाळातील व्यक्तींना लिखाणात आणणे हे किती अवघड आणि जबादारीचे काम आहे. त्याचा घाट घालता येत नाही . तो अवघड असतो . आठवले आणि बसून लगेच लिहून काढले असा मराठी साहित्यिक पद्धतीचा तो मामला नसतो . अनेक वर्षे सातत्याने भारतीय रंगभूमीला एकापेक्षा एक चांगली आणि ताकदवान नाटके देवून झाल्यावर अचानक एका टप्प्यावर एलकुंचवारांनी ललित लिखाणाला आपलेसे केले आणि मला आणि माझ्यासारख्या अनेकविध वाचकांना सकस बुद्धिनिष्ठ ताज्या साहित्याचा नवा झरा मराठी भाषेत आल्यासारखे वाटले. ‘मौनराग’ वाचून मी आतून हलून गेलो आणि लिहिण्याची क्राफ्ट ज्याला म्हणतात त्याचा एक ताजा आणि अतिशय original असा अनुभव त्या लिखाणापासून मला येऊ लागला . असे म्हणतात कि शेतकऱ्याप्रमाणे लेखकानेही वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे पिक घेऊन आपला कस राखून ठेवायचा असतो. आपल्या सवयीचा फॉर्म मोडायचा असतो . तसे काहीतरी एलकुंचवारांनी केले .आणि एकदाच करून ते थांबले नाहीत. गेल्या दशकभरात सातत्याने त्यांनी वैयक्तिक स्मृतींना सुबक आणि तेजस्वी स्वरूप दिलेले ललित लेखन सातत्याने चालू ठेवले आणि ते प्रकाशितही करत राहिले. लिखाण आणि प्रकाशन हे दोन्ही स्वतंत्र निर्णय असतात आणि ते दोन्ही निर्णय लेखकालाच घ्यायचे असतात. प्रकाशनाचा निर्णय हा जबाबदारीचा निर्णय असतो . त्याचा एक खाजगी ताल असतो. महेश एलकुंचवार ज्यांच्या निर्णयामध्ये मला त्यांनी निवडलेला तो ताल ऐकू येतो. तो सातत्याचा ताल आहे. विलंबित शांत चालीने जाणारा.

प्रकाशन करणे , प्रकाशित करणे ही किती सुंदर क्रियापदे आहेत ! प्रकाशित करणे ह्या क्रियापदाला जी दृश्यात्मकता आहे तिला न्याय देणारे शांत उग्र आणि तरीही आतून हळवे असे लिखाण एलकुंचवारांकडून सतत येत आहे. एखादी जखम दुर्लक्षिली जाऊन त्यातून बारीक रक्त वाहतच राहावे तसे हे लिखाण. अतिशय खाजगी असले तरी त्याला साहित्याचे स्वरूप कष्टाने आणि सातत्याने काम करून दिलेले दिसते. ते पुन्हा उघडून वाचले तरी मनातले कसलेसे जुने दाह कमी होतात आणि रडू येऊन मोकळे झाल्यासारखे वाटते. मला एकटेपणाचा आणि अनाथपणाचा एक बोचरा शापासारखा गंड मनात फार पूर्वीपासून आहे . त्यावर काही वेळ फुंकर घालून शांत झाल्यासारखे वाटते.

पुण्यात फिल्म इंन्सस्टीटयूटला शिकत असताना पहिल्या वर्षात पटकथा हा विषय शिकवायला महेश एलकुंचवार आमच्या वर्गावर आले आणि माझे विद्यार्थी म्हणून फार चांगले दिवस त्यांच्यामुळे सुरु झाले . त्यांनी आम्हाला संगीताचे भान दिले आणि लिखाणाचा आणि संगीताच्या श्रवणाच्या मूलभूत संबंध उलगडून दाखवला. शिक्षक म्हणून त्यांनी मला दिलेले हे एक महत्वाचे भान. ते एका वर्षासाठी पुण्यात राहायला आले होते आणि त्यांनी आमच्या लिखाणाच्या वर्गाला एक हसरे मोकळे आणि जिवंत स्वरूप दिले. त्यांच्या प्रकृतीच्या अतिशय विरुद्ध असे वागून त्यांनी आम्हाला त्यांच्या परिसरात यायला जायला मुभा दिली . कितीतरी प्रकारचे संगीत त्यांनी आम्हाला सातत्याने ऐकवले . किती वेगळ्या प्रकारच्या दृष्टीने लिखाणाकडे पाहायला शिकवले . शब्दांना दृश्यात्मकता देण्याचा अवघड प्रयत्न त्यांनी आम्हाला न घाबरता अनेक छोट्या लिखाणाच्या उपक्रमांमधून करायला लावला. आणि मग वर्ष संपताच ने निघून गेले.

मी अनेक वर्षांनी ‘डेड पोएट्स सोसायटी’ हा अप्रतिम इंग्रजी सिनेमा पहिला तेव्हा मला एलकुंचवारांचे पुण्यातील सानिध्य आणि त्यांनी मर्यादित काळासाठी निर्माण केलेली जवळीक आणि मैत्री खूप आठवली . तो चित्रपट साहित्याचे विद्यार्थी आणि त्यांचा एक अफलातून शिक्षक ह्यांच्या नात्याविषयी आहे.

मराठी लेखकाच्या सामान्य स्वरूपाला नाकारून , त्याला एक भारदस्त आणि अप्राप्य असण्याचा जुना ब्रिटीश आयाम एलकुंचवारांनी दिला म्हणून माझे ते माणूस म्हणूनही अतिशय लाडके आहेत. एक शिक्षक ,लेखक आणि माणूस म्हणून माझे त्यांच्यावर प्रेम आहे. मी त्यांना मराठी साहित्यातला शेवटचा प्रिन्स म्हणतो कारण त्यांचे ठाशीव शीस्तबद्द आणि मोहक असे काम .आणि ज्याला इंग्रजीत unbelonging म्हणतात तशी समाजापासून थोडे लांब जाऊन एखाद्या राजपुत्रासारखे राहण्याची सुंदरपणे जोपासलेली प्रवृत्ती. महाराष्ट्रात ती अजुनी नवीन आहे. कारण आपण अजूनही बेशिस्त आणि अघळपघळ समाज आहोत. पण नागपुरात उगाच जाऊन जातायेता एल्कुन्चवारांकडे उठबस करता येत नाही . त्यांचा मोजका सहवास आपल्याला कमवावा लागतो. मला त्यांनी जोपासलेला हा ब्रिटीश शिष्टाचार खूप आवडतो .

त्यांनी मला खाजगीत जर काही माणूस म्हणून बहाल केले असेल तर ते म्हणजे त्यांच्या आणि माझ्यामधील एक अंतर आणि शांतता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अपेयपान ‘लोकमत ‘मधील लेखमाला भाग ९ ते १२

अपेयपान ९

मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो कि तुम्ही चित्रपट दिग्दर्शित करण्याचे कसे आणि केव्हा ठरवलेत . त्याचे प्रामाणिकपणे उत्तर दिले तर मात्र लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. कसे ठरवलेत हे थोड्या विस्ताराने सांगावे लागते पण कधी ठरवलेत ह्याचे उत्तर मात्र शाळेत असताना असे आहे . मी हे उत्तर दिले कि लोक “ काय काहीपण सांगता काय ? शाळेत कुणाला काही माहिती असते काय?” असे म्हणतात. पण त्यांना तसे वाटणे स्वाभाविक असले तरी माझ्या बाबतीत ते खरे घडले.

त्याला काही प्रमाणात घरच्या व्यक्ती जबाबदार आहेत .माझे आजोबा, आईचे वडील घरात सगळ्यांना सांगत कि एक वेळा उपाशी राहा, दोन कपडे जुने नेसा पण शुक्रवारी लागणारा नवा हिंदी सिनेमा चुकवू नका. त्यांना सिनेमाची भारी आवड होती. त्यामुळे ते हिंदी सिनेमाचे वेड आपसूकच त्यांच्याकडून आईकडे आणि मग माझ्याकडे चालत आले. साधे व्यावसायिक हिंदी सिनेमे बघण्याचे व्यसन. १९७२ साली माझी आई माहेरी वसईला राहत असताना तिने डिम्पलचा bobby पाहिला आणि घरात बंड करून short skirt घालणे सुरु केले. अशी माझी आई . माझ्या वडिलांच्या वडिलांना दादा कोंडके भारी आवडत. दादांचा सिनेमा लागला कि ते मस्त झकपक कपडे करून जाऊन पाहून येत .

आणि माझ्या वडिलांना हिंदी सिनेमाचा मनस्वी कंटाळा . ते इंग्लिश सिनेमाचे मोठे Fan . आमच्या घराजवळचे अलका चित्रपटगृह तेव्हा फक्त आणि फक्त इंग्लिश चित्रपटच दाखवे . बाबा मला खूप लहान असल्यापासून ते पाहायला नेत.आणि उत्तम ब्रिटीश आणि hollywood च्या चित्रपटांची विस्मयकारी दुनिया हि माझ्या वडिलांमुळे माझ्या आयुष्याचा भाग बनली.

मराठी सिनेमा आमच्या घरात पहिला जात नसे कारण त्या काळी तो फारच वाईट टुकार दर्जाच्या बनत होता आणि मराठी नाटकांना न माझे आई वडील जात न त्यांनी कधी आम्हाला नेले.त्या दहा बाय दहा फुटाच्या स्टेज वर चार माणसे इकडे तिकडे फिरत मोठ्याने बोलणार .त्यात काय मजा ? त्यापेक्षा ग्रेगरी पेक किंवा ओमार शेरीफचा चांगला सिनेमा पहा असे बाबांचे मत

बाबा मला शनिवारी tv वर लागणारे भालजी पेंढारकर , राजा परांजपे , जब्बार पटेल इत्यादी जुन्या लोकांचे सिनेमे आवर्जून पाहायला सांगत. त्यामुळे बरीच वर्षे मराठी सिनेमा काळा पांढरा असतो आणि हिंदी सिनेमा रंगीत असतो असे मला वाटे.

आपली मुले आपल्याला हवी तशीच नीट वाढवली जावीत असे प्रत्येकच आई वडिलांना वाटते. बर त्यात त्यांचे एकमत असतेच असे नाही .त्यामुळे जवळजवळ दर शुक्रवारी अमिताभ ,विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा ह्यांचे सिनेमे आई आणि मावशीसोबत जाऊन विजय चित्रपटगृहात पहायचे आणि दर रविवारी अलकाला जाऊन वडिलांसोबत इंग्लिश सिनेमे पहायचे ह्यात माझा मस्त वेळ जाई . आई इकडे येत नसे आणि बाबा तिकडे येत नसत पण दोघे माझे खूप लाड करत . लाड म्हणजे हळद तेल लावलेले ते पूर्वीचे popcorn आणि रंगीत आणि थंडगार goldspot .

अमीर खानचा ‘कयामत से कयामत तक’ येईपर्यंत सिनेमाचे सगळे निर्णय आईवडील घेत . त्या चित्रपटापासून आमचे सगळेच बदलले आणि आम्ही सर्वार्थाने वयात येऊन स्वतंत्र झालो .

मला सिनेमा फार म्हणजे फार आवडे . मी जे काही शिकायचो ते जवळजवळ हिंदी सिनेमे पाहून . माझी भावनिक वाढ मी जे सिनेमे पाही त्याप्रमाणे होत होती. प्रेम , सेक्स, हिंसा , लबाडी , त्याग अश्या अनेक खऱ्या आणि आवश्यक भावनांची हिंदी सिनेमामुळे माझी ओळख झाली. नाहीतर मराठी साहित्य वाचून जवळजवळ सखाराम गटणे होण्याची वेळ आमच्यावर आली असती . कारण आमच्या घरात समग्र वपु , समग्र पुल , मृत्युंजय आणि ती रमा माधवांची एक कोणतीतरी प्रसिद्ध कादंबरी . पेशवाई वरची, ज्याचे नाव मी आता विसरलो. खेळ खलास. एव्हडीच पुस्तके होती . हिंदी आणि इंग्रजी सिनेमाने माझे खऱ्या अर्थाने उत्तम पोषण करत ठेवले . सिलसिला , जंजीर , दिवार , मुक्कदर का सिकंदर ( ह्याचा अर्थ मला अजुनी कळत नाही), बेताब , मासूम , मिस्टर इंडिया  वाह वाह वाह !  सिनेमाच्या व्यसनी घरामध्ये अमचे बालपण फार मस्त चालू होते.

मी साहजिकच आणि आपसूकच ठरवले होते कि आपल्याला असे काहीतरी नाट्यमय करून गोष्ट सांगायची आहे .गोष्ट सांगायला आवडायची .गौतम राजाध्यक्ष ह्या व्यक्तीचे माझ्यावर अगणित उपकार आहेत ह्याचे कारण अगदी नेमक्या त्या काळात त्यांनी सुरु केलेले ‘चंदेरी’ हे मासिक . अतिशय नेमकेपणे आणि जाणतेपणे गौतमने तयार केलेलं चंदेरी मी नियमित वाचू लागलो आणि मला सिनेमाच्या जगाविषयी ओढ तयार झाली .

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळी घरी आलेला VCR . त्यामुळे थेटरमध्ये न बघता येणारे सगळे सिनेमे घरी भरपूर बघता येऊ लागले. ‘राम तेरी गंगा मैली’ पाहायला आपल्याला आई वडील का नेत नाहीत ? चला त्याची कॅसेट आणून गुपचूप घरी पाहू . एकदा तर मला ‘सागर’ पाहायला आईने नेले तर दारावरच्या क्रूर माणूस  ‘ह्या लहान मुलाला आत सोडणार नाही’ असे म्हणाला. त्यामुळे डिम्पलचा तो लाल साडीतला सुंदर शॉट घरी video वर पहावा लागला. शिवाय हे पण ठरवता आले कि आयुष्यात आपल्याला काय व्हायचे नाहीये . ‘हम आपके है कोन’ मध्ये जो मोहनीश बहल होता , सतत नम्र, अल्यागेल्यांच्या पाया पडणारा आणि रेणुका शहाणेसोबत सतत हसत बसणारा,  आपल्याला तसे पुचाट तुपकट व्हयाचे नाही हे पण कळले आणि सतत घरच्या लोकांसोबत नाचत बसायचे नाही हे सुद्धा ठरवता आले .

आणि मग दोन मोठ्या गोष्टी घडल्या . १९८९ साली ‘चालबाज’ आला. श्रीदेवीचा डबल रोल असणारा , सीता और गीता ह्या जुन्या चित्रपटाचा रिमेक . मी तो इतक्या प्रेमाने आणि इतक्या वेळा पहिला कि मी आधीचे- पुढचे- मागचे- वरचे- खालचे- शेजारचे- पाजारचे सगळे काही विसरून गेलो . मी तेव्हा सातवीत होतो . आणि मी ठरवले कि बस , जर काही आयुष्यात करायचे तर असे काही करूया. श्रीदेवीने मला उलटे पालटे करून ह्या सिनेमाच्या जगात नेवून विकून टाकले. मी तिचा ऋणी होतो आणि आहे .

आणि अचानक मला एक दिवशी आई म्हणाली कि किशोरीमावशींचा आशुतोष एक हिंदी सिनेमा बनवतोय . रविना टंडन आहे त्यात . मी फुल खल्लास . माझा आ वासलेला बंदच होयीना. त्या सिनेमाचे नाव होते ‘पहेला नशा’. म्हणजे आपण ज्याला अनेक वेळा  भेटलोय आणि ओळखतो तो माणूस डायरेक्ट सिनेमाच बनवतोय. म्हणजे असे करणे शक्य आहे , आपल्याला पण. आजूबाजूचे आणि  ओळखीचे कुणी असे करतय म्हटल्यावर मला फारच धीर आला .मी तर त्यावेळी ठरवलेच कि जर कुणी मला आता विचारले कि “बाळ , मोठेपणी तू काय करणार ?” तर आपण डॉक्टर , सैन्य , समाजसेवा , इंजिनियर असे काही न म्हणता  थेट उत्तर द्यायचे “ काका , मी सिनेमा बनवणार”

पुढचे सगळे प्रवास अतिशय अवघड होते पण शाळा संपताच तीन वर्षाच्या आत मी फिल्म च्या सेट वर clap देत होतो.  मी तेव्हा सतरा वर्षाचा होतो . आणि तेव्हापासून आजपर्यंत मी दुसरे कोणतेही काम केलेलं नाही.

मला अनेक वर्षांनी यश चोप्रा भेटले तेव्हा मी कधीही करत नाही ती एक गोष्ट केली ती म्हणजे त्यांना नीट वाकून नमस्कार केला. खूप मनापासून केला. ते माझ्या सेट वर काही वेळ आले होते आणि  माझ्यासोबत monitor जवळ उभे होते. मी मनात इतका खुश झालो , कि ज्याचे नाव ते. त्यांनी मला फिल्म स्कूल मध्ये जाण्याआधी , खूप लहानपणापासून सिनेमा शिकवला होता.

IMG_1553

 

अपेयपान १०

घरातून कामाच्या आवडीने बाहेर पडल्यावर आणि जगात एकटे फेकले गेल्यावर आपल्याला घराची, सुरक्षिततेची आणि आपल्या माणसांची खरी किंमत कळते , ह्याचा मला फारच गडद असा अनुभव येत राहिला आहे . ह्याची एक दुसरी बाजूसुद्धा आहे . ती सांगतो .

काम करताना मला अनेक तरुण मुले मुली भेटत राहिली ज्यांचे आईवडील आमच्या चित्रपटक्षेत्रात होते. किंवा आमच्या क्षेत्रात नसले तरी अतिशय नावाजलेले ,प्रसिद्ध किंवा ज्याला समाजात स्वयंप्रज्ञ म्हणता येतील असे होते. मी अगदीच माझ्या मर्जीने आणि स्वभानुसार घाईने जगाचा अनुभव घ्यायला बाहेर पडलो होतो. आमच्याकडे न भरमसाठ पैसे होते न समाजात मोठी पत किंवा ओळखीपाळखी होत्या. फक्त आईवडिलांचे प्रॉमिस होते कि तुला केव्हाही काहीही लागले तरी आपले घर उघडे आहे आणि तुझ्या सगळ्या निर्णयांना आमचा पाठींबा आहे . मी सरळ त्या ताकदीवर C A चा कंटाळवाणा अभ्यास सोडून चित्रपटक्षेत्रात उमेदवारी करायला सुरुवात केली होती .

ज्यांचे आईवडील मोठे लेखक ,चित्रपट दिग्दर्शक ,कलाकार ,गायक किंवा समाजात नाव कमावलेले विचारवंत होते त्या मुलांचा मला फार हेवा वाटे .असे वाटत राही कि ह्यांना किती सोपे आहे सगळे करणे .साध्या साध्या कामाच्या पहिल्या संधी ह्यांना किती सहज मिळतात ? ह्यांना काही सल्ला लागला,मार्गदर्शन लागले तर किती सहज  मिळत असेल. ह्याचे कारण ह्यांचे प्रसिद्ध आईवडील. मी मुंबईला राहायला आलो तेव्हा मला मुंबईत जन्मलेल्या माझ्या आजूबाजूच्या मुलामुलींचासुद्धा हेवा वाटत असे. ह्याचे साधे कारण त्यांची मुंबईत राहती घरे होती आणि काही जणांच्या आपसूकच चित्रपटक्षेत्रात ओळखी होत्या.ह्या जन्मतः मिळणाऱ्या सुखसोयी मला त्या काळात फार आकर्षित करत.कारण तुमच्या उमेदवारीच्या काळातला खूप मोठा आर्थिक आणि मानसिक ताण ह्या सगळ्याने कमी होत असतो .

पण आज मला, मी साध्या घरातून आलो आणि माझे आईवडील फार कुणी प्रज्ञावंत, विचारवंत आणि महत्वाचे नव्हते ह्याचे फार म्हणजे फारच बरे वाटते .कारण त्यामुळे माझे फार भले झाले.आणि अतिविचारी अतिप्रसिद्ध आणि ताकदवान आईवडिलांची माझ्या आजूबाजूची मुले फारच दुबळी सामान्य आणि फुकाची निघाली असे मोठ्या प्रमाणात जाणवू लागले. तुमची आडनावे तुमच्या नावापेक्षा मोठी होवून बसली कि तुमचा पराजय होत राहतो आणि सतत तुमच्या आईवडिलांचाच विजय होत असतो.

असे होण्यामागचे कारण आमच्या वेळी भारतात मुले कशी आणि का जन्माला घातली जात ह्यामागे आहे .

मुले होण्याचे कोडकौतुक आणि जन्म दिल्याचे भारावलेले फिलिंग आईवडिलांना होत असले तरी आईवडील होणे हे निसर्गाने दिलेले फुकटचे आणि कर्तृत्वशून्य काम आहे ह्याची जाणीव आजच्या तरुण जोडप्यांना असते तशी माझ्या आईवडिलांच्या पिढीला नव्हती . असुरक्षित संभोग करत बसले कि काही दिवसांनी  मुले होतात ह्यापलीकडे कोणत्याही जोडप्याचे पालक होण्यात कोणतेही कर्तृत्व नसते. आव मात्र असा आणला जाई कि आपण समाजाचे काहीतरी देणे लागत होतो ते फेडले, कुटुंबाला वारस दिला, कुलदैवताचा प्रसाद मिळाला ,वंश चालवला वगरे वगैरे फालतूपणा .मग मुलांना हे आईवडील आयुष्यभर हे ऐकवत बसत “ आम्ही तुमच्यासाठी इतके केले,आता तुम्ही आमचे ऐका”

सुदैवाने आता माझ्या पिढीतली तरुण मुले जर पालक झालीच तर दोन महिन्याच्या आत गुपचूप पोटापाण्याच्या कामाला लागतात.काही मूर्ख मुले फेसबुकवर अजूनही ‘proud parent झालो’ असे फोटो टाकतात . मुले दुसरीपासून शाळेत नापास व्हायला लागली कि लगेच ह्यांचे प्रावुडपण कमी होते आणि ते मुलांना बदडायला लागतात.

त्यात हि भारतीय पालक मंडळी सधन सुशिक्षित आणि सामाजिक विचारवंत घराण्यातील असतील तर मुले झाली रे झाली कि ती त्यांच्यावर आपली स्वप्ने लादायला लागतात .जणू आपली स्वप्ने आणि आपले उद्योगधंदे पुढे चालवायला हा जीव पृथ्वीतलावर देवाने पाठवला असावा असे आईवडिलांना वाटत असे. त्या काळी स्थलांतराचे प्रमाण कमी असल्याने सगळे आईवडील आपापल्या आईवडिलांकडेच राहत . त्यामुळे त्या बिचारया मुलामुलींवर आईवडील , आजीआजोबा , पणजीपणजोबा ह्यांनी दिवसरात पाहिलेली लाखो स्वप्ने पूर्ण करण्याची किंवा त्याचा आदर्शवाद पुढे चालवाण्याची जबाबदारी येई. आणि त्यात अश्या घरात जन्मलेल्या मुलांची पुरती वाट लागत असे . माझा एक मित्र मला म्हणाला कि माझे वडील स्मगलर असते तरी परवडले असते पण ते साले मोठे समाजसुधारक आहेत. सतत आदर्शवादी बडबड करतात आणि स्वतःचे करियर त्यात करतात .पण त्यामुळे आम्हाला साधे कॉलेजच्या कोपर्यावर बिड्या फुकत सुद्धा उभे राहता येत नाही .येता जाता सगळी पुणेरी माणसे मला त्यांचा मुलगा म्हणून ओळखतात.

मी स्वतः पालक आणि मुलांची अतिशय गंभीरपणे हिंसात्मक नाती पाहिलेली आणि अनुभवलेली आहेत आणि ह्या सर्व बाबतीत मला हे दिसले आहे कि आपल्या मुलांच्या आयुष्यात नको तेवढि  ढवळाढवळ करणारे हे सर्व पालक पांढरपेशा आणि बुद्धिवादी घरातील यशस्वी आणि जाणती माणसे होती आणि त्यांच्या मुलांचा आयुष्यातला सर्व वेळ आणि ताकद त्यांच्या आई वडिलांपेक्षा वेगळे होण्यात गेली.त्यात ती मुले दमून थकून जवळजवळ नष्ट झाली.  काही मुलांनी आईवडिलांच्या डोक्यावर यथेच्छ मिऱ्या वाटल्या आणि रागाने त्यांची घराण्याची पूर्ण बेअब्रू केली . उरलेली मुले घाबरून आईवडिलांचे अतिरिक्त गुणगान गात असतात ,त्यांनी चालवलेल्या संस्था चालवत बसतात ,त्यांचेच व्यवसाय पुढे चालवायचा प्रयत्न करत बसतात पण आतून त्यांना स्वतःचा आवाज सापडत नाही किंवा आईवडलांच्या धाकात त्या मुलांना तो सापडण्याची शक्यता नष्ट होते. अशी मुले गंभीरपणे अंतर्गत नैराश्यात जगत राहतात

सोपी उदाहरणे द्यायची तर अनेक मोठ्या फिल्मस्टार्सची किंवा खेळाडूंची मुले पाहता येतील. त्यांच्या आईवडिलांच्या जवानीचा बहर कधीच ओसरत नाही आणि त्यात हि मुलेमुली चाळीस चाळीस वर्षाची झाली तरी आईचा किंवा वडिलांचा हात धरून बसलेली असतात. आपल्याला अभिनय करता येत नाही ते आपल्या आईवडिलांचे काम आहे,  आपले नाही हे त्यांना कुणी सांगायला जात नाही. आणि ह्या पुढच्या पिढीचे बोन्सायवृक्ष होवून बसतात .तसेच गायकांच्या मुलांचे झालेले दिसते .त्यांच्या आईवडिलांचेच कौतुक आणि लाड समाजात इतके चालू असतात कि ह्या मुलांनी वेळच्यावेळी आपला वेगळा मार्ग शोधला नाही तर ती पन्नाशीची होईपर्यंत आईवडिलांचेच तंबोरे लावत बसलेली असतात. किंवा मग आईवडील मेले कि मग त्यांची चरित्रे लिहिणे हे एक बिनडोक काम अशी मुले करतात. हा भारतीय कुटुंबव्यवस्थेचा फार मोठा तोटा आहे. आपल्याकडे पुढील पिढीला आपण आपली कामे आणि स्वप्ने पूर्ण करण्याची factory म्हणून पाहतो.

अश्या अनेक प्रसिद्ध अप्पलपोटी क्रूर आणि ताकदवान आईवडिलांच्या घरात जन्मून आपली स्वप्ने धुळीला मिळालेली किंवा आपल्याला स्वतंत्र विचार करण्याची मुभाच नसलेली अनेक ओळखीची मुलेमुली मी पहिली तेव्हा मला मी साध्या आणि अजिबातच प्रसिद्ध नसलेल्या आईवडिलांचा मुलगा आहे ह्याचे फार बरे वाटले. पण त्याला थोडा काळ जावा लागला . इतरांचा नाश होताना पहिले कि आपल्याला आपले सुदैव कळते तसे झाले.

आम्ही मोठे होताना आमच्या आईवडीलानी फार विचार केला नाही आणि आम्हाला आमचे आमचे टक्केटोणपे खायला जगात सोडून दिले हे त्यांनी आमच्यावर केलेले सगळ्यात मोठे उपकार आहेत. साध्या मराठी शहरी मध्यमवर्गात जन्मल्याचे जे फायदे असतात त्यापैकी हा एक.

माझ्या आईवडीलांना माझ्या आणि माझ्या भावाच्या कार्याक्षेत्रातले काही म्हणजे काहीही कळत नाही. त्यामुळे ते आम्हाला सल्ले देत नाहीत आणि बहुमूल्य मार्गदर्शनपण करत नाहीत. ते आम्हाला एकटे सोडतात आणि आम्हाला आमच्या चुका करू देतात. अनेक वेळा आम्ही संपूर्ण हरलो आहोत तेव्हा त्यांनी घराची दारे आमच्यासाठी उघडी ठेवली आहेत हे मोठे आणि महत्वाचे काम त्यांनी केल्याचे बळ आम्हाला वेळोवेळी मिळाले आहे .

IMG_1655

अपेयपान ११

स्थलांतर केल्याचा नक्की असा एक दिवस नसतो . खूप आधी मनामध्ये आतल्याआत सामान बांधणे चालू झालेले असते .विचारांचे जाळे विणायला सुरुवात झालेली असते.

आपण शहर नक्की कधी सोडतो हे आठवेनासे होते. तो एक दिवस असा काही नसतो ती एक प्रक्रिया असते. आजूबाजूच्या वातावरणातला प्राणवायू पुरेनासा होतो, आणि मनाला पोषणासाठी वेगळ्या जगाची आस लागून राहते. मी पुणे शहर नक्की कधी सोडले ते मला आजपर्यंत आठवत नव्हते. असं काही एक दिवस होतं का? ते कळत नव्हते. पण परवा एका नव्या मित्राशी गप्पा मारता मारता त्या काळातले काही सांगता सांगता मला तो दिवस आठवला. मी शहर सोडल्याचा एक निश्चित असा दिवस होता . मित्राच्या कारमध्ये माझे सगळे समान भरून भल्या पहाटे आम्ही मुंबईत पार्ल्यात जिथे माझी राहायची सोय केली होती त्या घरी जायला निघालो होतो. फार सोपा नव्हता तो दिवस . मी सगळा प्रवास गप्प बसून केला होता . माझे भरपूर समान आणि ढिगावारी पुस्तके वरती पोचवून माझा मित्र मला म्हणाला होता कि चल मी आता निघतो . नीट राहा . काही लागले तर कळव . आणि तो  लिफ्ट पाशी गेला.

त्या घरातला फोन बंद पडला होता . घरात gas नव्हता . जुना एक फ्रीज होता जो गेली पाच सहा वर्षे बंद होता आणि नशिबाने नळाला पाणी होते. माझ्या पोटात जबरदस्त खड्डा पडला होता. आपल्याला फ्रान्समध्ये शिकताना आणि तिथला सिनेमा बघताना एकटी राहणारी माणसे पाहून तसे राहण्याचे फार आकर्षण मनात तयार झाले होते. शिवाय इथे गौरीची पुस्तके वाचून आमचे सदाशिवपेठी मन प्रत्यक्ष जाण्याधीच युरोपला पोचलेले. आता बसा बोंबलत. त्या कर्वे-परांजपे लोकांची पुस्तके वाचून भारावून जा .पहा अजून युरोपातले सिनेमे , त्यांच्या स्टायली मारायला जा . राहा एकटे.

त्या क्षणी मला पहिली उबळ आली ती म्हणजे धावत खाली जावे , मित्राला मिठी मारून म्हणावे कि माझी मोठी चूक झाली . चल सामान गाडीत भरू आणि आत्ताच्या आता मला पुण्याला घेऊन चल . पण काय कोण जाणे मी तसे केले नाही . तो परत जाताना मला वरून दिसला . गाडीत बसण्याआधी त्याने मला हात केला, तो हसला आणि त्याची गाडी कोपऱ्यावर वळून लुप्त झाली . ह्या सगळ्या गोष्टी मोबाईल फोन हातात येण्यापूर्वीच्या काळात घडल्या .

घर प्रशस्त होते. सहाव्या मजल्यावरचे हवेशीर . मजल्यावरची बाकीची दोन्ही घरे बंद . फक्त हेच एक घर राहते असणार होते. डाव्या बाजूच्या घरातले लोक अमेरिकेत राहत होते आणि उजव्या बाजूच्या  घरात नुकतीच कुणीतरी गळफास लावून आत्महत्या केली होती त्यामुळे ते घर बंद करून ते लोक निघून गेले होते. ह्या गोष्टीची भीती मला जाणवेल असे मला वाटले नव्हते पण माझा मित्र निघून जाताच मला ती भीती तीक्ष्णपणे जाणवली आणि मला हमसून हमसून रडू आले.डोळ्यांत पाणी वगरे नाही . चांगले भरपेट रडू . तिथल्या तिथे . उगाच आपण असे धाडस केले. भलत्याच विचारांच्या अधीन झालो .कशाला एकटे जगायचं आहे? चांगले आईवडिलांच्या घरात राहत होतो काय कमी होते? मन स्वतःच्याच निर्णयांना विरोध करायला लागले. मी डोळे पुसले आणि मला तेव्हा अचानक चहाची तल्लफ आली . असे वाटले कि सिनेमात लोक पितात तसं दुख्ख झाले असता गरम चहा पीत नित विचार करावा. नाक फुरफुरत . पण घरात काहीही सामानच नव्हते . मी कुलूप लावून खाली उतरलो , आणि कोपर्यावर जाऊन टपरीवर चहा प्यायला . STD बूथ वर जाऊन  पुण्याला घरी फोन करून सांगितले कि मी नीट पोचलो माझी काळजी करू नका. मी असा कधी एकटा रिकाम्या घरात राहिलो नव्हतो जिथे फक्त रिकामा ओटा आणि रिकामी कपाटे होती. Paris मध्ये मी तीन महिने एकटा रहात होतो पण ती हॉटेल ची खोली होती. आणि त्यात शेजारच्या सर्व खोल्यात आमच्या फिल्म च्या कोर्स ला आलेली मुलेच राहत होती.

घरात आलो आणि मनातला सगळं रिकामेपणा समोर येऊन पुन्हा उभा राहिला . घर उभे करायला  कुठून सुरुवात करावी ?

मग पुढच्या दोन दिवसात मी रिकामे डबे ,स्वयपाकाची भांडी, धान्य , भाज्या , मसाले , इतर किराणा सामान आणले . घर झाडून लख्ख पुसून काढले . तयार पडदे आणून ते खिडक्यांना लावले . नवीन पायपुसणी आणली .बिल्डींगच्या कचरा गोळा करणाऱ्या माणसाना माझ्या घराची वर्दी लावून दिली. gas आणला . इलेक्ट्रिशिअन , प्लंबर ह्यांना शोधून काढले . मला मोलकरणी आणि काम करणाऱ्या मावश्यांची लहानपणीपासून खूप भीती वाटायची. त्यामुळे कुणाला केर फरशी करायला ठेवायचा प्रश्नच नव्हता. मी जमतील तश्या पोळ्या करायला शिकलो . भात पिठले कोशिंबिरी आणि भाज्या यांच्यात आठ दहा दिवसात गती येत गेली. फोडण्या जमू लागल्या. हळूहळू घर माझ्यासाभोवती आकार घेत गेले आणि माझ्या मनाची तगमग शांत होत गेली .

आणि आठ दहा दिवसात ती एक सुंदर संध्याकाळ आली ज्या दिवसाचे स्वप्न पाहत मी घर सोडले होते. माझ्या पुढ्यात मी शिजवलेले गरम गरम जेवण होते .फ्रीजमध्ये गार सरबत ,पाणी आणि बियरच्या बाटल्या होत्या .घर अतिशय स्वच्छ झाले होते . घरातला landline चा फोन चालू झाला होता.  नवे पडदे वार्यावर उडत होते .घरात मडोना गात होती.  समोरच्या पार्ले बिस्कीट factory मधून ताजी गरम बिस्किटे भाजली गेल्याचा सुंदर वास आसमंतात पसरला होता.( पुढे अनेक आठवडे  मी हि बिस्किटे भाजण्याची वेळ लक्षात ठेवून त्या वेळी घरी परत यायचो . एकटेपणा कमी करण्यासाठी . कारण त्या वासाने काहीतरी घरगुती प्रेमळ वातावरण तयार होत असे. मुंबईत सूर्योदय किंवा चंद्र वगरे असे उगाच दिसत नाहीत. घरात झाडे वेली लावता येत नाहीत.आपल्याला आपल्या घरातले छोटे आनंद असे शोधून काढावे लागतात) मी गरम गरम जेवणाचे शांत घास घेत माझ्या नव्या घराकडे कौतुकाने पाहत होतो आणि स्वतः ला सांगत होतो कि आपल्याला शहर सोडून दुसरीकडे जाणे जमले आहे. शेल्फमध्ये नीट रचून ठेवलेल्या माझ्या पुण्यातल्या खोलीतून आलेल्या पुस्तकांची मला त्या वेळी मोठी सोबत वाटली . त्या क्षणापर्यंत पोचायला मात्र मला खूप मेह्नत घ्यावी लागली .

आपल्या एकटेपणाला नीट घाट ,पोत आणि आकार देत त्याचे चांगल्या गोष्टीत रुपांतर करण्याचा खेळ मी त्या दहा दिवसात शिकलो .त्यानंतरचे प्रश्न मी हळूहळू धडपडत सोडवले. ह्या नव्या शहरात आपले मित्र जमवणे.  काम शोधणे . ह्या शहराच्या वागण्याच्या चालीरीती शिकणे . हे सर्व जमत गेले. पण मुंबईतली ती संध्याकाळ मला आजपर्यंत विसरता आलेली नाही.

घरकामाला कमी मानण्याचा तो दुर्दैवी काळ होता .बाहेर जाऊन वसवस करत पैसे मिळवणे जास्त महत्वाचे मानले जाई आणि घरात राहून जाणतेपणाने  आणि नेमकेपणाने ते चालवणाऱ्या व्यक्तींना कमी प्रतिष्ठा मिळत असे . याचे कारण आमच्या पुण्यातले विनोदी आणि अर्धवट feminism. आणि  त्याचा प्रचार करणाऱ्या कर्कश्श बुद्धिमान बायका . मी त्यांचे फार कधीच  ऐकले नाही आणि घरातल्या सगळ्या मुलींना बायकांना पाहत ,त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत वाढलो . त्या सगळ्यांनी मला घरकामाला तयार केले आणि त्याला कमी न लेखण्याचे आपल्या कृतींमधून दाखवत ठेवले.

मला आजही माझे घरकाम स्वयपाक आणि त्याची हजारो व्यवधाने आयुष्यातल्या अनेक ताणानपासून मुक्त ठेवतात .ते माझे sport आहे. क्रिकेट किंवा badminton असावे तसे . आणि जगात बाहेर पडून कर्तुत्व गाजवणार्या अनेक व्यक्तीनइतकाच आदर मला निगुतीने शांतपणे आणि संयमाने उत्तम घरे चालवणाऱ्या आणि नेटका स्वयपाक करणाऱ्या हुश्शार व्यक्तींबद्दल आहे . किंबहुना त्यांच्याविषयी थोडासा जास्तच .

IMG_1643

अपेयपान १२

गेल्या आठवड्यात P.K नायर ह्यांचे निधन झाले तेव्हा मी एक गोष्ट करण्याचा मोह टाळला ती म्हणजे फेसबुकवर जाऊन त्यांचे निधन झाले आहे हे जगाला पुन्हा सांगणे आणि ते किती महत्वाचे होते ह्याची लगेच माहिती देणे.मला त्यांच्या जाण्याने खिन्न व्हायला झाले. आपल्यासाठी अतिशय चांगले महत्वाचे आणि आपल्या आयुष्याला नीट आकार देणारे काम करून ठेवलेली व्यक्ती आता ह्या जगातून कायमची नाहीशी झाली . नायर सरांची प्रकृती चांगली नव्हती आणि वयसुद्धा खूप होते. कामातून ते निवृत्त झाले होते पण अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ते भेटत असत . उत्साहाने नव्या दिग्दर्शकांचे चित्रपट पाहायला येत असत .

माझ्याप्रमाणेच अनेक चित्रपटकलेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी आदर होता . ह्याचे कारण त्यांनी परिश्रमपूर्वक जवळजवळ एकहाती उभी केलेली “राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय” ( National Film Archives Of India )  हि पुण्यातील महत्वाची संस्था . ह्या माणसाने आणि पर्यायाने ह्या संस्थेने आमची चित्रपट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची  आयुष्ये बदलून टाकली . आमचीच काय , देशातल्या हजारो लोकांची , ज्यांना चित्रपट बनवायचे होते , त्याचे रसग्रहण करणे शिकायचे होते , जगातल्या उत्तम चित्रपटांचा अभ्यास करायचा होता आणि आस्वाद घ्यायचा होता.

पाठीला किंवा मांडीला खाज आल्यावर खाजवून आनंद होतो तश्या प्रकारची सोपी आणि तात्पुरती करमणूक करून घेणे हा भारतीय व्यावसायिक चित्रपटसृष्टीचा आजपर्यंतचा विशेष उपयोग मानायला हवा. आपण एक सततचा  दुखी आणि दुर्दैवी  समाज असल्याने वसवसलेली आणि उफाळलेली करमणुकीची भूक अधाश्यासारखी भागवून घेणे असेच आपल्याकडच्या बहुतांशी चित्रपटांचे काम असते.  चित्रपटांचा समाजाला एव्हढाच उपयोग असतो असे आपण मानतो . हे मनोवृत्ती आजही चालू असेल तर नायर सरांनी पूर्वी चित्रपटाच्या मोठ्या संपन्न वारश्याचे जतन आणि संग्रह करणारी संस्था उभारूया अशी कल्पना मांडली असेल तेव्हा किती लोकांनी त्यांना गंभीरपणे घेतले असेल ह्याचा विचारच न केलेला बरा. त्यांनी आपले जवळजवळ सर्व आयुष्य ह्या कामासाठी वापरले . ते केल्याबद्दलचे एक शांत समाधान त्यांच्या चेहऱ्यावर सतत दिसत असे. ते अतिशय संथ आणि सौम्य असे व्यक्तिमत्व होते . एक शास्त्रज्ञ , एक खेळकर संग्राहक आणि एक जाणकार इतिहासकार अशी सगळी रूपे तिथे एकवटलेली .

NFAI हि संस्था  पुण्यात आत्ताच्या फिल्म इन्सटीटयूटच्या प्रांगणात एका छोट्या बंगलीवजा इमारतीत सुरु झाली आणि कालांतराने त्याची मोठी देखणी वास्तू प्रभात रोडवरील जुन्या barister जयकर ह्यांच्या बंगल्यात उभी राहिली . जुन्या भारतीय चित्रपटांच्या प्रिंट्स आणि निगेटिव्ह चे काळजीपूर्वक जतन करणे आणि जगभरातील उत्तमोत्तम जुन्या आणि नव्या चित्रपटांच्या प्रिंट्स चा संग्रह करणे , चित्रपटाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकाना उत्तम ग्रंथालय आणि अभ्यासाची साधने उपलब्ध करून देणे हे ह्या संस्थेच्या स्थापनेमागचे महत्वाचे उद्दिष्ट .

माझी पुण्यातील महाविद्यालयीन काळातील आयुष्याला ह्या संस्थेमुळे फार मोठी कलाटणी मिळाली . ह्या संस्थेचे नायर सरांनी उभारलेले एक देखणे चित्रपटगृह होते जिथे दर शनिवारी भारतातील आणि संपूर्ण जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखवले जात. अजूनही हा शनिवारचा फिल्म क्लब चालू आहे. ह्या चित्रपटगृहाचे एक मोठे अदबशीर वैशिष्ठ्य असे कि तिथे आत जाताना बाहेर चपलाबूट काढून शिरावे लागते. लाल मखमलीच्या खुर्च्या आणि पायाखाली उबदार गालीचा . समोर पांढरा मोठ्ठा पडदा. तिथे आम्ही लहान वयातच अनेक भारतीय , रशियन , जपानी , इटालीयन , फ्रेंच दिग्दर्शकांचे चित्रपट दर शनिवारी जाऊन पाहू शकायचो . आपल्या नाचगाणी आणि दंगेधोपे ह्यांच्या पलीकडे वेगळा चित्रपट आपल्या देशातही आणि बाहेरही बनतो ह्याची जाणीव आम्हाला झाली आणि उत्तम चित्रपट ३५ mm च्या प्रिंट वर बघण्याचे भाग्य आम्हाला घरबसल्या पुण्यात राहून सहजपणे मिळाले. नायर सर तेव्हा सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते पण ते आवर्जून शनिवारच्या ह्या फिल्म क्लबला येत. सगळ्यांसोबत बसून सिनेमा पाहत आणि नंतर अनोळखी लोकांशी मोकळेपणाने गप्पाही मारीत . मी माझी पहिली short फिल्म बनवेपर्यंत कधी त्यांच्याशी जाऊन प्रत्यक्ष बोलण्याचे धाडस केले नव्हते .

आपल्यापैकी कुणी ‘सिनेमा पारादिसो’ हा जुना इतलिअन सिनेमा पहिला आहे का ? त्या सिनेमातला लहान मुलगा म्हणजे आम्ही सगळे शनिवारचे प्रेक्षक  होतो आणि नायर सर हे त्या चित्रपटातले फिल्म प्रोजेक्टर चालवणारे त्या मुलाचे मोठ्या वयाचे मित्र होते.

अशी माणसे गेली कि काय करायचे ? माणूस जाण्याचे दुक्ख होते जेव्हा माणूस काम अर्धवट सोडून जातो किंवा त्याच्या कामाला पूर्णत्व येऊनही न्याय मिळत नाही . नायर सरांच्या कामाला नुसते पूर्णत्व आले असे नाही तर त्यामुळे भारतात दिग्दर्शक , लेखक आणि प्रेक्षकांच्या अनेक पिढ्या घडल्या . अनेक चित्रपटमहोत्सव भरवणे शक्य होवू लागले. भारतीय चित्रपटांचा अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये अभ्यास सुरु झाला . अनेक जुन्या नव्या महत्वाच्या चित्रपटांच्या प्रिंट्स आज पुण्यात NFAI मध्ये काळजीपूर्वक जतन करण्यात आल्या आहेत. पुस्तके आहेत . सिनेमांच्या जुन्या जाहिराती आहेत . रसिकांना आणि अभ्यासकांना मदत करणारी माणसे आहेत . असे असताना नायर सरांच्या शारीरिक मृत्यूचे वाईट मला वाटले नाही . एका संपन्न अवस्थेत त्यांनी आम्हाला कायम ठेवले आणि ते स्वतः शांतपणे प्रसिद्द्धीचा हव्यास न करता केरळमधील आपल्या गावी आणि मध्येमध्ये पुण्यात असे सतर्कपणे जगले . त्यांनी त्यांचे जगण्याचे कारण संपूर्ण केले होते म्हणून त्यांच्याविषयी कोणताही गळेकाढू शोक मला कधीच करता येणार नाही .

एरवी शांत असणार्या नायर सरांचे एक वेगळे रूप मी आयुष्यात एकदाच पाहिले होते. मी त्यांना एकदा आवर्जून माझी एक short फिल्म दाखवली होती . आम्ही नेहमी भेटत असू असेही नाही . २००९ साली  केरळमधील त्रिवेन्द्रम अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माझ्या “गंध “ ह्या चित्रपटाची प्रेस कॉन्फरन्स  होती . ती सुरु झाल्यावर काही वेळाने शांतपणे नायर सर तिथे येऊन पुढच्या रांगेत बसले . मी त्यांना स्टेजवरून नमस्कार केला . प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली होती आणि अचानक काहीतरी वेडेवाकडे वातावरण तयार झाले. केरळमध्ये सर्व कलात्मक रसग्रहण हे राजकीय दृष्टीकोनातून होते. आणि तिथले ‘राजकीय’ म्हणजे मार्क्सिस्ट . शब्दाला शब्द वाढत गेले आणि माझ्या स्वभावानुसार मी भडकलो आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना रागावून उत्तरे देऊ लागलो . नायर सर अचानक उभे राहिले आणि चिडीचूप शातंता झाली . ते मागे वळले आणि त्यांनी प्रेक्षकांना आणि पत्रकारांना फैलावर घेतले. आपल्याकडे वेगळ्या राज्यातून आणि वेगळ्या भाषेत सिनेमा बनवणारा एक दिग्दर्शक आला आहे . त्याचे बोलणे समजून न घेता तो तुमच्या मतांच्या फूटपट्ट्यानमध्ये बसत नाही म्हणून त्याच्याशी सभ्यता सडून बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? ह्यासाठी आपण हे चित्रपटमहोत्सव भारावतोय का ? मग खाली बसून त्यांनी मला बोलायला सागितले आणि पुढची प्रेस अतिशय नीट पार पडली . मी खाली उतरलो आणि सरांना thanks म्हणालो आणि त्यांना माझ्या फिल्म च्या शो ला यायचे आमंत्रण दिले. ते मला हसून म्हणाले अरे मी तुझी फिल्म पहिली नसती तर तुझी बाजू घेऊन भांडलो कशाला असतो ? मला ती फिल्म खूप जास्त आवडली आहे. ती माझी नायर सरांची शेवटची भेट . त्यानंतर ते मला प्रत्यक्षपणे कधीच भेटले नाहीत

नायर सरांसारखी आपले आयुष्य घडवणारी  माणसे एका प्रकारे अप्रत्यक्षपणे सतत राहतील सोबत असतील असे वाटते. पण तसे होत नाही. शरीराचा मृत्यू होतो आणि मग एक खोलवर खिन्नता तयार होते. ती खाजगी असते . काही महत्वाच्या माणसांचे मोल सगळ्या जगाला असतेच असे नाही मग आपण कुणाकडे अशी खिन्नता व्यक्त करणार ?

P K नायर सरांवर The Celluloid Man नावाचा अतीशय सुंदर माहितीपट शिवेंद्र सिंघ डुंगरपुर यांनी २०२१२ साली बनवला आहे . भारतीय चित्रपटावर प्रेम असणार्या प्रत्येकाने पहावा असा. त्या माहितीपटाचा You Tube वर ट्रेलर आहे . मी खाली त्या ट्रेलरची लिंक देत आहे

https://www.youtube.com/watch?v=mTPcHAKk4bo

 

IMG_1650 (1)

 

सचिन kundalkar

kundalkar@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अपेयपान – लोकमत मधील लेखमाला भाग ५ ते ८

अपेयपान ५

 

सर्व गोरी माणसे त्यांना स्वतः ला जरी वाटत असले तरी नट नसतात. ती फक्त गोरी माणसेच असतात . सर्वच साक्षर माणसे त्यांना जरी वाटत असले तरी लेखक नसतात .ते फक्त साक्षरच असतात. आणि सर्व प्रकाशित लेखक हे साहित्यिक नसतात. हि साधीशी गोष्ट जी आपल्या सध्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकार्यांना कळायला हवी, ती आम्हाला लहानपणी शाळेतच शिकवली गेली होती. असे काही महत्वाचे अप्रत्यक्षपणे शिकवणाऱ्या आमच्या मराठीच्या शिक्षकांचे नाव होते श्री. वा. कुलकर्णी. माझ्या गेल्या सर्व वर्षातील माझ्या वाचन लेखन प्रवासात हि व्यक्ती मला सतत सोबत करत राहिली आहे .

आपल्याला प्रत्येकाला असे काही मोलाचे शिक्षक भेटलेले असतात.ते शिक्षक शिकवत असताना फार वेगळे आणि भारावलेले असे काही वाटत नाही . पण नंतर शाळा मागे पडली,आयुष्य जगायला लागतो ,काम करायला लागतो कि त्या व्यक्तीने आपल्याला कितीतरी महत्वाचे दिले आहे हे लक्षात येते   आमच्या भावेस्कूलमध्ये शिकताना आम्हाला अनेक चांगले , कळकळीने शिकवणारे , विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे शिक्षक लाभले . त्यामध्ये अगदी महत्वाचे असे होते ते म्हणजे आमचे श्री.वा. कुलकर्णी . आमच्या शाळेत शिक्षकांचा उल्लेख मराठीतल्या त्यांच्या नावाच्या आद्याक्षरानी करायची जुनी पद्धत तेव्हा अस्तित्वात होती . त्यांमुळे आम्ही त्यांना ‘श्रीवा’ असेच म्हणत असू .

श्रीवांनी माझ्या वाचनाला शिस्त लावली .अगदी शालेय वयात असताना.अशी शिस्त आपल्याला लावली जात आहे हे आपल्याला अजिबातच कळत नसताना. शाळेमध्ये आम्ही त्यांना टरकून असू . ते शिक्षा म्हणून ज्या पद्धतीने हातावर पट्टी मारत त्याची आठवण मला अजूनही आहे. पण मी कोणतेही पुस्तक वाचायला उघडले आणि त्याच्या नोंदी करण्यासाठी टोक केलेली पेन्सिल घेऊन बसलो कि मला नेहमीच त्यांची आठवण येते.

अभ्यासक्रमात असलेल्या लेखकांचे सर्व साहित्य आम्ही आगून मागून वाचावे असा त्यांचा आग्रह असे. त्यासाठी कोणताही धडा शिकवताना ते त्या लेखकाची नीट ओळख करून देण्यात एक संपूर्ण तास कारणी लावत असत . सोबत प्रत्येक लेखकाची, कवीची पुस्तके घेऊन येत. आणि त्या लेखकाच्या कामाचे विस्तृत टीपण त्यांनी तयार केलेले असे .हा त्यांचा अगदी खास आवडता मराठी शब्द. ‘टिपणे काढा’ जे वाचाल त्याबद्दल विस्तृत नोंदी ठेवत जा .न समजणाऱ्या गोष्टी शब्दकोशात पाहत जा . मग पुढे जात जा असे ते ओरडून ओरडून सांगत. आचार्य अत्रे , कुसुमाग्रज, बहिणाबाई , इंदिरा संत, विंदा करंदीकर , पाडगावकर , वसंत बापट , दळवी ,सुनीता देशपांडे , गो नी दांडेकर , बा.सी .मर्ढेकर , बोरकर , आरती प्रभू ,विठ्ठल वाघ ,माधव आचवल असे विविध मिश्र काळातील लेखक कवी त्यांनी आम्हाला शाळेचे नेमून दिलेले धडे शिकवण्याआधी व्यक्ती म्हणून समोर आणले. लेखक कोण होता , कसा घडला, त्याची मते काय होती ,तो कसा लिहिता झाला , समाजाने त्याला लिहिताना कसे वागवले, हे सगळे त्यात आले. दलित साहित्याच्या संदर्भात त्यांनी सोप्या भाषेत ‘दुखः आणि वेदना’ ह्या विषयावर आम्हा शालेय मुलांसाठी एक छोटे टिपण बनवले होते तेव्हा आमचा आयुष्यातील दुक्खाशी सामनाच झाला नव्हता. पुढे होणार होता. मी माझ्या दुख्खाविषयी काही वर्षांनी लिहिणार होतो . ज्यासाठी दलित साहित्याची त्यांनी करून दिलेली ओळख अनेक वर्षांनी मला सह अनुभूतीची ठरली . दया पवार ह्यांच्या ‘बलुतं’ ची त्यांनी करून दिलेली ओळख .

मराठी साहित्य व्यवहारातील अनेक सुसंस्कृत व्यक्तींची माहिती देण्यासाठी ते आम्हाला छोटी व्याख्याने देत ,ज्याची तयारी ते तास सुरु होण्याआधी करून येत असत . श्री. पु. भागवत कोण आहेत? आणि ‘मौज प्रकाशन’ हे मराठी साहित्य विश्वातील किती महत्वाचे आणि मानाचे प्रकरण आहे हे सांगता सांगता एकदा आमचा मराठीचा तास संपून गेला होता. जी. ए . कुलकर्णी हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय . त्यांच्यावर किती बोलू आणि किती नको असे त्यांना होत असे . जीएंची ‘भेट’ हि कथा आम्हाला शाळेत अभ्यासाला होती , त्या धड्याच्या अनुषंगाने जवळजवळ चार दिवस ते विस्तृतपणे जीएंच्या सर्व साहित्यावर बोलत होते. आम्हाला शाळेच्या ग्रंथालयात जाऊन त्यांनी जीएंचे सर्व साहित्य वाचायला प्रोत्साहन दिले . संत ज्ञानेश्वर शिकवायला लागण्याआधी त्यांनी आम्हाला त्या काळातील सामाजिक परिस्थिती कशी होती हे सोप्या भाषेत सांगितले होते. त्यामुळे आम्ही संतसाहित्य भाबड्या श्रद्धेच्या पलीकडे जाऊन समजून घेऊ शकलो. हे सगळं घडताना आम्ही तेरा ते पंधरा ह्या वयातील मुले होतो. आणि माझ्या मते फारच नशीबवान मुले होतो .

गाणे शिकवावे तशी भाषा सातत्याने शिकवावी आणि शिकावी लागते . ती लहान मुलांच्या आजूबाजूला बोलीतून,गाण्यांमधून ,शिव्यांमधून , ओव्यांमधून , लोकगीते , तमाशे ,सिनेमा , नाटकातून प्रवाही असावी लागत.पण तरीही ती शिकवावी लागतेच .तिची गोडी मुलांना लावावी लागते . भाषेची तालीम असणे एका वयात फार आवश्यक ठरते . श्रीवा हे माझ्यासाठी कळकळीने शिकवणाऱ्या एका आख्ख्या मराठी शालेय शिक्षकांच्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात . त्या पिढीचे शिकवण्याच्या कामावर अतोनात प्रेम होते . ती नुसती नोकरी नव्हती. जातीच्या आणि आरक्षणाच्या राजकारणात ती एक पिढी वाहून गेली . मराठी शाळाच नष्ट झाली. आज मी लिहिलेले कुठेही काही वाचले , माझा चित्रपट प्रदर्शित झाला कि आमच्या भावेस्कूल मधील सर्व शिक्षकांचे मला आवर्जून फोन येतात . श्रीवा त्यांच्या खास शैलीत एक एसेमेस आधी पाठवतात आणि मग मागाहून विस्तृतपणे फोन करतात .

माझ्या छोट्या आयुष्यात मला प्रमाणाबाहेर आणि न मागता जे काही चांगले मिळाले ते म्हणजे माझे शालेय शिक्षक आहेत . अजूनही काम करताना वाचन करताना ,काही नवीन शोधताना सतत आपला शब्दसंग्रह अपुरा आहे , आपण कमी वाचन केले अशी मनाला बोच लागून राहते. वाचनाची एक शिस्त असते .जगातले सर्व भाषांमधील मोठे विद्वान लेखक किती परिश्रमपूर्वक वाचन करतात हे मी जेव्हा पाहतो , तेव्हा प्रत्येक वेळी मला श्रीवांचा मराठीचा तास आठवतो. आजच्या काळात तर फार प्रकर्षाने आठवतो कारण आज मराठी भाषेतील साहित्याबद्दल आपल्याकडे अभिमान सोडून काहीही शिल्लक नाही.

शाळा संपल्यावर अनेक वर्षांनी श्री पु भागवताना मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांच्या घरात शिरताना माझे अंग कोमट झाले होते . भीतीने वाचा पूर्ण बंद . सोबत मोनिका गजेंद्रगडकर बसली होती . श्री पु भागवत शांतपणे माझ्या पहिल्या कादंबरीचे हस्तलिखित हाताळत होते आणि मला काही प्रश्न विचारत होते . मी चाचरत उत्तरांची जुळवाजुळव करत होतो. तितक्यात दाराची बेल वाजली आणि सहज म्हणून सकाळचे गप्पा मारायला पाडगावकर तिथे आले. ते येऊन एक नवी कविताच वाचू लागले. मला हे सगळे आजूबाजूला काय चालले आहे तेच कळेना . मला तेव्हा श्रीवांची खूप आठवण आली . मी आनंदाने भांबावून गेलो. मला इतका अद्भुत आनंद सहन करता येत नव्हता आणि मला सोबत ते हवे होते असे वाटले.

उमेश कुलकर्णी हा चित्रपट दिग्दर्शक हा माझा शाळेतील वर्गमित्र. आम्ही दोघेही श्रीवांचे विद्यार्थी . त्याच्या ‘विहीर’ ह्या चित्रपटात श्रीवा आहेत .ते वर्गातील मुलांना ‘भेट’ हा धडा शिकवत आहेत . माझ्या आणि त्याच्या स्वतःच्या आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा अनुभव खूप सुंदर पद्धतीने चित्रपटात गोठवून साजरा केल्याबद्दल मी वेळोवेळी उमेशचे आभार मानत असतो.अश्या काही वेळी आपण चित्रपट बनवण्याचे काम निवडले आहे ह्याचे मला फार म्हणजे फारच बरे वाटते .

 

IMG_1646

 

                                   अपेयपान ६

 

मी डावरा आहे ,डाव्या हाताने लिहितो हे समजल्यावर माझ्या एका ओळखीच्या गृहस्थांनी मला आपुलकीने “येत्या रविवारी संध्याकाळी अमुक अमुक ठिकाणी एक सभा आहे तिथे ये असे सुचवले . डावर्या लोकांची संघटना पुण्यात आहे आम्ही सगळे महिन्यातून दोनदा तिथे भेटतो. मी बर म्हणालो.

ते डाव्या विचारसरणीचे म्हणून जे लोक असतात असे आपण वाचतो ते तर आपण नाही?मला बरेच वेळा काही कळत नसे. आपण डावरे आहोत म्हणजे डावे आहोत कि काय ? मला स्वतःची भीतीच वाटायची त्या कोवळ्या वयात .म्हणजे आपल्याला आता सभा मोर्चे काढायला लागणार आणि जे घडेल त्याला विरोध करत बसावा लागणार बहुतेक. आणि आनंदी होताच येणार नाही . कारण केव्हढे ते सामाजिक प्रश्न पुण्यात? आणि ते असताना आपण आनंदी राहायचे ? हे डाव्या लोकांना पटत नाही असे मी ऐकून होतो . पुण्यातले डावे लोक सगळ्याला विरोध करतात असेही मी ऐकून होतो. हे लोक सभेला बोलावतायत म्हणजे काहीतरी गंभीर गुप्त संघटना असणार .आपल्याला त्यात सामील करून घेतायत बहुदा. माझा सगळा आठवडा अतिशय गोंधळात आणि भीतीमध्ये गेला. आपल्याला काय काय करायला लावतील ,कोणती पुस्तके वाचायला लावतील ? रशियात वगरे जायला लावतील बहुदा काहीतरी गुप्त कागदपत्रे घेऊन. कारण डाव्या लोकांना रशियाचे फार असते असे मला कळले होते. आमच्यासारख्यांच्या घरात इंग्लंड अमेरिकेला जाण्याने जे पुण्य मिळते ते डाव्या लोकांना लेनिनग्राड , स्तालीनगराड ,मोस्को ह्या क्षेत्री जाऊन मिळते असेही काही पुस्तके वाचून तोपर्यंत कळले होते.

त्या आठवड्यात मी प्रयत्न करून उजव्या हाताने जेवून बघ, उजव्या हाताने लिहून पहा असे सगळे प्राणायाम करून पहिले. पण कसचे काय? उजवा हात मेला अगदी नेभळट निघाला. उजव्या हाताने कसे जाज्वल्य कणखर आणि देशप्रेमी असायला हवे.शिवाय ब्रम्हचार्याचे तेज उजव्या हातावर नुसते सळसळयला हवे, तसे काहीच त्या माझ्या उजव्या हाताचे होत नव्हते. माझा डावा हात सगळी आवश्यक कामे करी आणि उजवा हात सगळी नको ती कामे करी . त्या दोघांसोबात माझे खरं म्हणजे बरे चालले होते. आता ह्या संघटनेत जाऊन ‘एकच हात आपला’ असे निवडायला लागणार बहुदा. मी जीव मुठीत धरून रविवारची वाट पाहायला लागलो.

लाल रंग पहिला कि त्या आठवड्यात माझ्या अंगावर शहारे येत. देवासामोरचे कुंकू .फोडणीच्या डब्यातील तिखट .बाप रे बाप. आणि दाढी वाढवायला लागेल कि काय ? मला खरं तर तेव्हा नुकती कोवळी कोवळी दाढी येऊ लागली होती आणि मला Tv वरच्या जाहिरातीत दाखवतात तशी गालाला भरपूर फेस लावून दाढी करायची होती. सुगंधी आफ्टरशेव लावायचे होते .मला स्वच्छता आणि टापटीप ह्याची भारी आवड. दाढी वाढवायला लावली तर मात्र आपण डावे व्हायला सरळ नकार देऊ हे मी स्वतःला बजावत राहिलो.

एका प्रकारे मी सुप्तपणे उत्साहात होतोच कारण एकदा का डावे बनलो कि आपल्या आजूबाजूचा देवधर्म , देवळात जा , आरत्या म्हणा , श्लोक पाठ करा, जानव्हे घाला हे सगळे अत्याचार टळतील . मला ते सगळे धार्मिक वातावरण काही म्हणजे काही केल्या आवडत नसे . डाव्यांना देव चालत नाही . हि एक उजवी बाजू त्यांच्यात मला दिसली . मला खरे म्हणजे आजूबाजूच्या सदाशिवपेठी वातावरणातून पळूनच जायचेच होते . सगळे बदलूनच टाकायचेच होते. एखादा music band काढावा आणि गिटार वाजवत जगभर फिरावे हे माझे स्वप्न होतेच . पण जे काही करू ते मस्त आनंदात . आणि भरपूर पैसे कमावून . उगाच उपाशी राहून मोर्चे काढत विरोध बिरोध करण्याचा आणि बॉम्बफेक करण्याचा माझा पिंडच नव्हता. बघू रविवारी काय वाढून ठेवलय आपल्या पुढ्यात !

मी मनावरचे दडपण कमी करावे म्हणून एका खूप हुशार मित्रापाशी मन मोकळे केले . तो म्हणाला “डावरे म्हणजेच डावे”. तू जन्मतःच डावा आहेस. झाले.माझी खात्रीच पटली. पण तो पुढे म्हणाला कि तू डावा होण्यापेक्षा समाजवादी हो . म्हणजे काय ? तो म्हणाला ते मला माहित नाही . पण माझी एक आत्या समाजवादी आहे आणि शिवाय ती फेमिनिस्ट पण आहे . ती खूप मजेत असते, तीच्या वाट्याला कुणी जात नाही. ती देवधर्म करत नाही .पुस्तके वाचते. तीच नवरा दाढी करतो. शिवाय ते वेल टू डू आहेत. ते मस्त युरोपला जातात आणि ते आनंदी पण असतात .तू समाजवादीच हो. मी म्हणालो रविवारनंतर ठरवू .

रविवारी मी चेहऱ्यावर शक्य तितका आत्मविश्वास ठेवून त्या सभागृहात प्रवेश केला. तिथे मला सगळे आमच्या आजूबाजूला राहतात तसेच घारेगोरे लोक दिसले. म्हटले , बरेच लोक स्वतःमध्ये बदल घडवायला आलेत वाटते इथे . शिवाय चहा , वेफर्स आणि साबुदाणा खिचडी होती .मग मला ओळखत होते ते गृहस्थ तिथे आले आणि ते आम्हाला जगभरात कोण कोण डावरे आहेत ह्याची माहिती द्यायला लागले. खूपच मोठमोठी नावे होती. लेखक , शास्त्रज्ञ , क्रिकेटपटू , राजकीय नेते, कवी . मला अगदी स्फुरण चढले . म्हणजे आपण ह्यांच्यापैकी एक आहोत तर .मग त्यांनी डावरे असण्यामागची शास्त्रशुद्ध कारणे समजावली , मेंदूचे दोन भाग. उजवा भाग शरीराच्या डाव्या भागावर नियंत्रण ठेवतो .तो प्रबळ असला कि डाव्या हाताने लिहिले जाते.बहुतांशी लोकांचा डावा भाग प्रबळ असतो त्यामुळे ते सगळी कामे उजव्या हाताने करतात.आपण वेगळे आहोत .

हि संघटना अंतरराष्ट्रीय होती तरी राजकारणाचा काही विषयच येईना .शिवाय अतिशय शांतपणे सगळे चालले होते .मग काही जण उठून बोलू लागले, त्यांना त्यांच्या घरात डावरे असण्याबद्दल कसे वागवले जात होते , मुद्दाम शिक्षा करून उजव्या हाताने लिही , जेव असे सांगितले जात असे. अनेक वेगवेगळी यंत्रे जी फक्त उजव्या हाताने काम करणाऱ्या माणसांचा विचार करून बनवली जातात त्यामुळे आपलं कामाचा वेग कसा कमी होतो . मला ते सगळे ऐकून फार बरे वाटले . माझ्या घरी मी डावरा होतो ह्याचा कधीच कुणी बाऊ केलेला नाही , मला जसे हवे तसे घरचे सगळे करू देतात असे माझी पाळी आल्यावर मी म्हणालो . मग सगळ्यांचे नाव पत्ते अश्या नोंदी करून घेतल्या . पुढच्या सभेची तारीख ठरली आणि मग एकमेकांशी गप्पा मारा असे आम्हाला सांगितले . सभा जवळजवळ संपली . राजकारणाचे , कार्ल मार्क्स, रशियाचे नावच नाही .

अरे बापरे.असे असते का डावे,किंवा डावरे असणे ? मग चांगले आहे कि. मला आमच्या पुण्यातले डावे लोक फारच आवडले. डावे असणे म्हणजे एरवी जे जगात सरधोपटपणे चालू आहे त्याला पर्यायी विचार करणे असे असावे बहुदा . किंवा इतरांपेक्षा काही वेगळी माणसे असतात त्यांना समजून घेणे म्हणजे डावे असणे असे असावे बहुदा. जरा वेगळ्या नजरेने चालू असलेया गोष्टींकडे बघायची सवय लावून घेणे.

म्हणजे ठोस कुंपणे नाहीयेत आणि थोडेसे इथून तिथे तिथून इथे उड्या मारत मजेत जगायची सोय असू शकते तर ! मी जवळजवळ तरंगतच झुलता पूल ओलांडून आमच्या घरी येऊन दाखल झालो आणि उद्यापासून मी देवळात आलो नाही तर चाललेलं का असे आईला विचारले .ती शांतपणे हो म्हणाली .जानव्हे घातले नाही तर चालेल का असे विचारले. ते सारखे शर्टातून दिसते .बाबा त्यालाही हो म्हणाले आणि मी डाव्या हांताने मस्त वरणभात तूप असे जेवलो.

 

IMG_1696

 

अपेयपान ७

आपल्याला पुढे आयुष्यात काय काम करायचे आहे ह्याचा निर्णय आपण लहानपणी नक्की कसा आणि कधी घेतो हे सांगणे फार अवघड असते . भारतात हा निर्णय बहुतांशी वेळा मुलांचे आईवडील घेतात असे दिसते . उदाहरणार्थ , ते डॉक्टर असतात , त्यांनी स्वतःच्या हव्यासापायी भलीमोठी इस्पितळे उभारून ठेवलेली असतात , मग हे सगळे चालवणार कोण ? असे म्हणून आपोआपच मुलाला डॉक्टर केले जाते . ती डॉक्टर मुले मेडिकल कॉलेज सोडून बाहेर कुठे प्रेमात वगरे पडायला जात नाहीत मग सूनही डॉक्टरच येते . असे गाडाभरून घरात डॉक्टर गोळा होतात . तसेच काही ठिकाणी इंजीनियर्स , काही ठिकाणी बँकर्स असे सगळे आपोआप विचार न करता चालूच राहते. बहुतेक वेळा आपण जे काम निवडणार आहोत त्याचा आपल्या आयुष्यावर किती दूरगामी आणि खोलवर परिणाम होणार आहे ह्याची जाणीव बहुतेक सुशिक्षित कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा नसते. आणि मुलींच्या बाबतीत अजूनही न बोललेलेच बरे . भारतातील शहरातल्या बहुतांशी मुली अजूनही सोयीने आणि स्वार्थाने आपल्याला नक्की किती स्वतंत्र व्हायचे आहे हे चाणाक्षपणे ठरवतात . स्वातंत्र्य त्यांना दिले तरी नको असते कारण स्वतंत्र होणे वगरे त्यांना झेपणारे नसते . परावलाम्बित्वाचे सुख अजूनही त्यांना आवडते आणि कुटुंबव्यवस्थेमुळे परवडते सुद्धा. फक्त शहरी समाजात स्त्रिया आणि मुलींच्या कोणत्याही निर्णयाविषयी बोलण्याची सोय आपल्या अर्धवट आणि अर्ध्याकच्च्या स्त्रीवादाने ठेवलेली नाही . काहीही बोलले तरी मुली एक तर रडून ओरडून कांगावा करतात किंवा हक्क्क मागत आरडा ओरडा करतात . खऱ्या अर्थाने बुद्द्धीमान , स्वतंत्र आणि स्वतःची जबाबदारी घेणाऱ्या स्त्रिया भारतीय शहरी पांढरपेशा समाजातही पन्नासात एक एवढ्याच असतात .

पैसे कमवण्यापलीकडे आपल्या काम करण्याच्या निर्णयाचा अतिशय मोठा आणि सखोल परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत राहणार असतो . आणि दुर्दैवाने आपल्या शिक्षणपद्दतीत निवड कशी करावी हे कधीच शिकवत नाहीत . आपल्या आयुष्याची आपण नीट निवड करणे आणि अतिशय जबाबदारीने आपले निर्णय आपण स्वतः घेणे . हे आपल्याला घरांमध्ये , शाळांमध्ये कधीही शीकवले जात नाही . ह्याचे मुख्य कारण वयाने ज्येष्ठ व्यक्तींना आपल्यापेक्षा जास्त कळते आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतील असा आपला भाबडा विश्वास . भारतातील नव्वद टक्के लोक आपल्या करियरचे निर्णय स्वतः अजूनही घेत नाहीत ते ह्यामुळे. कारण घेतलेल्या निर्णयाची किंमत चुकवायची तालीम भारतीय मूल्यव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्था आपल्याला कधीच देत नाही .

सुदैवाने १९९९ सालापासून अर्थकारण आणि तंत्रज्ञान ह्यात मूलगामी बदल भारतात घडायला लागले आणि अर्थव्यवस्था खुली झाली तेव्हापासून ज्येष्ठ वगरे ज्या व्यक्ती कुटुंबात असतात त्यांना काही केल्या आजूबाजूला हे सगळे काय घडते आहे हे कळेनासे झाले. आणि आपल्या पुढच्या पिढीला कोणताही सल्ला द्यायला ती हुशार आई वडिलांची पिढी अपात्र ठरली ह्याने आमच्यासारख्या मध्यम्वर्गीय शहरी लोकांचा खूपच फायदा झाला. त्या बाबतीत आमची पिढी नशीबवान म्हणायला हवी कारण मुक्त अर्थव्यवस्था आल्यावर आमच्या घरादारातील जेष्ठ वगरे मंडळींना कशाचे काही कळेनासे झाले आणि तेच खूप घाबरून भांबावून बसले. डॉक्टर , इंजिनीर , सरकारी नोकरी , बँक किंवा किराणा मालाचे दुकान एवढेच माहिती असलेल्या पालकांचे धाबे ह्या काळात दणाणले . आणि वयाचा आणि शहाणपणाचा कोणताही संबंध नसतो हि मोठी जाणीव सुस्त आणि राजस्वी कुटुंबव्यवस्थेत लोळत पडलेल्या शहरी कुटुंबांना झाली . ह्याचे कारण उघडलेली अर्थव्यवस्थेची दारे , वेगाने बदलते तंत्रज्ञान हे होय .कामाच्या आणि आपलेआयुष्य हवे त्या पद्धतीने घालवण्याच्या अनेक संधी या काळाने आम्हाला उपलब्ध करून दिल्या.

मला हे अजून लक्खपणे आठवते आहे कि सरकारी नोकर्यांमध्ये जातीनुसार राजकारण आले तेव्हा आमच्या आजूबाजूचे सर्व पुणे अतिशय घाबरले होते. आपण आता पटापट अमेरीकेला जाऊन नोकर्या मिळवू कारण आपल्या देशात आपल्या लोकांच्या बुद्धीला आणि कर्तृत्वाला अजिबात किंमत उरणार नाही अशी मोठी भीती सगळ्या ब्राह्मण कुटुंबांमध्ये त्या वेळी पसरली होती. आणि आज पाहताना हे दिसते कि कुटुंबियांच्या त्या भीतीने खरोखर आमच्या आजूबाजूची जवळजवळ सर्व मुले आज युरोप आणि अमेरिकेत राहतात. ती अतिशय सुखात आहेत , कर्तृत्ववान आहेत . अनेक जण खूप चांगली कामे करतात पण हे झाले ते कुटुंबाच्या आणि त्या काळातील जातीय संक्रमणाच्या भीतीने . स्वतःच्या निर्णयाने नाही . कारण त्या वेळी सरकार तुमच्या आयुष्यातील बरेच काही ठरवत असे . आज ती परीस्थिती नाही . कारण त्यानंतर काळाने वेगळीच पावले टाकली आणि सुदैवाने भारतात खाजगी क्षेत्र बळकट झाले आणि बुद्धी आणि कष्टाला भरपूर किंमत मिळाली. सरकारी नोकर्यांना हुशार कर्तृत्ववान तरुण मुले विचारेनाशी झाली.

आपली शहरे आणि गावे सोडून अनेक तरुण मुलांनी ह्या काळात स्थलांतर केले आणि सुरक्षितता सोडण्याची सवय त्यांना लागली . अनेकांनी वेगळे कल्पक व्यवसाय सुरु केले . एकाच ठिकाणी वीस वीस वर्षे काम करून घरी परत येणाऱ्या आमच्या पालकांच्या पिढीला ती सवय कधी नव्हती . त्यांना तेव्हाही आणि आजही हे बदल पचवता आले नाहीत. मराठी कुटुंबामध्ये कधीही पूर्वी न ऐकलेले व्यवसाय आणि कामे तरुण पिढी जोमाने करू लागली आहे .

आमच्या पुण्यात एका डॉक्टरांनी स्वतःचे मोठे देखणे आणि उत्तम salon सुरु केले, तेव्हा त्यांना लोकांनी अनेक टोमणे मारले. शेवटी लोकांचे केसच कापायचे होते तर मग डॉक्टर कशाला झालास ? असे आमचे क्रूर आणि संकुचित वृत्तीचे शहर .अश्या टोमणे देणाऱ्या लोकांची बदलत्या काळाने मोठी गोची केली .आणि माणसे स्वतः ला हवे ते काम आणि व्यवसाय करायला मोकळी झाली .

स्पर्धात्मक आणि थोड्या वेगवान शहरी जगात जगणाऱ्या आजच्या तरुण पिढीला सुदैवाने स्वत: च्या निर्णयांची काळजी आणि किंमत आहे . मी अनेक वेळा मुलामुलींशी गप्प्पा मारतो तेव्हा मला लक्षात येते कि आधीच्या मध्यमवर्गीय पिढ्यांमध्ये असणारा भाबडेपणा आणि संकोच ह्या पिढीत कमी होत जातो आहे . माझ्या आजूबाजूच्या अनेक तरुणांनी आई वडिलांचे सल्ले संपूर्ण फाट्यावर मारून अनेक असुरक्षित पण आवडती रंगीत कामे निवडली आहेत. ह्या मुलांना आज पैसे कमावण्यात , प्रवास करण्यात , तात्पुरती चार कामे करण्यात आणि ज्याला इंग्रजीमध्ये ‘फिगर आउट करणे’ म्हणतात ते करण्यात काहीही वावगे वाटत नाही .आईवडिलांच्या सूचना ऐकून हल्ली कुणीही आपल्या करियरचे निर्णय पट्कन घेऊन टाकत नाही हि एक फारच आश्वासक गोष्ट आजच्या काळाने साधली आहे. आपण काय काम करायचे आहे हे मुले फार सावकाश ठरवतात .किंवा एकदा ठरवलेले मोडून तिशी पस्तिशीत संपूर्ण नवी कामे करायला घेतात आणि त्यात यशस्वी होतात, किंवा आपटतात , तरी पुढे जातात .

यशस्वी होणे म्हणजे काय? ह्याची व्याख्या आता ह्यापुढील काळात बदललेली आपल्याला दिसेल . आणि ती व्याख्या आधीच्या पिढीच्या व्याख्येपेक्षा फार वेगळी असेल. सुरक्षितता शोधणे म्हणजे यशस्वी होणे हि व्याख्या आता मोडून पडत आहे .तरुण मुलांमध्ये अनावश्यक प्रमाणात पैसे साठवून ठेवण्याचा कल कमी होतो आहे . कमावलेले पैसे तरुण मुले वेगवेगळ्या प्रवासांवर , नवी यंत्रे घेण्यात खर्च करतात . तरुण मुले लग्न उशिरा करतात आणि उगाच मुलेबाळे जन्माला घालायचे ताण स्वतःवर घेत नाहीत . त्यामुळे मोकळेपणाने हवी ती कामे करत , स्वतःचे आयुष्य अजमावत जगण्याची संधी ह्या आजच्या काळात मोठ्या प्रमाणत उपलब्ध झाली आहे .

आपल्या आईवडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष्य करून आपल्याला हवे तेच करण्याची सवय मुलामुलींना लागली तर त्यांचे पुढील काळात फार भले होईल अशी आजची परिस्थिती आहे .

 

IMG_0068

अपेयपान ८

 

माणसाने घातलेले पोशाख बोलके असतात . माणसे गप्प बसून असली तरी त्यांचे पोशाख बोलतात . जगातल्या हुशार माणसांनी हे नीट ओळखले आहे आणि त्यामुळे जाणती माणसे नेहमीच आपल्या वेशभूशेबाबत जागरूक असलेली आपण पाहत असतो . महात्मा गांधींपासून बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यापर्यंत अनेक दशकांमधील लोकजीवनांतील अनेक जाणत्या व्यक्तींनी स्वतःच्या वेशभूषेचा नीट आखीव विचार केला आहे असे आपल्याला दिसेल. अनेक राजकीय नेते , धर्मगुरू , गायक , वादक , नट, अध्यात्म पंडित , योग गुरु अश्या अनेकांना जगभर स्वतःची ताकद ठसवण्यासाठी एक विशिष्ठ वेशभूषा लागते . नवीन काळामधील branding चे शास्त्र विकसित होण्याच्या फार पूर्वीपासून माणसाने आपल्या विशिष्ट वेशभूषेचा वापर करून घेतलेला आहे .

धर्म हा भारतातीलच नाही तर जगातीलच सगळ्यात मोठा व्यवसाय आणि उलाढाल असल्याने धार्मिक वेशभूषा करणाऱ्या लोकांना आपसूकच एक उगीचच जास्त पवित्र आणि उदात्त असण्याचे बळ सामान्य माणूस अतिशय आपसूकपणे बहाल करतो . आजच्या नव्या काळात जिथे जगातील सर्व माणसांची वेशभूषा एकसारखी होत जात असताना अनेक माणसे अतिशय आग्रहाने धर्मात किंवा धर्मग्रंथात लिहून ठेवलेली वेशभूषा आग्रहाने करत राहातात . किंवा धार्मिक रंगाचे कपडे आग्रहाने वापरतात . धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देशांमध्ये वावरताना अतिशय दुराग्रहाने स्वतःचे वेगळेपण आपल्या धार्मिक वेशभूषेने जपत राहतात . आणि मोठ्या प्रमाणत स्वतः च्या धर्माचे अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शन करत बसतात . मला स्वतःला असल्या माणसांची अतिशय भीती वाटते .

बाबरी मशीद पडल्यानंतर भारतात ज्या जातीय दंगली झाल्या त्यामुळे माझ्या पिढीच्या मुलांना धर्म आणि जातीयवाद कळायला आणि वाईट त्याचे परिणाम जाणवायला जास्त मदत झाली . ज्या गोष्टीबद्दल आम्ही सगळे अतीशय निवांत , निष्काळजी आणि अज्ञानी होतो ती गोष्ट म्हणजे धर्म आणि जात . बाबरी मशीद पडल्यावर आमच्या आजूबाजूच्या काळात धर्माविषयी अतिशय दक्षता असण्याचे वातावरण तयार झाले . ह्या काळातील माझी सगळ्यात मोठी आठवण म्हणजे कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने जर धार्मिक पेहराव केला असेल तर त्या व्यक्तीची अतिशय दहशत बसणे . त्या व्यक्तीची भयंकर भीती वाटणे आणि त्या व्यक्तीबद्दल मनात घृणा तयार होणे.

काळे बुरखे घातलेल्या बायका , भगवे भडक कपडे लपेटलेल्या साध्वी , मुल्ला मौलवी , घरी पूजेला येणारे गुरुजी , रस्त्यात फिरणारे किंवा कुंभमेळा गाजवणारे साधू , परदेशी शहरांमध्ये फिरताना दिसणारे ज्यू धर्मगुरुंचे समूह , चर्च मधले पाद्री ह्या सगळ्या माणसांची भीती आणि दहशत बसण्याचे कारण हे कि आम्ही तोपर्यंत धर्माचा संबंध दहशतवादाशी , दंगलींशी आणि विध्वंसाशी असतो हे न शिकलो होतो न असे काही भयंकर आम्ही कुणीही अनुभवले होते. अतिशय उग्रपणे अनेक धर्माची माणसे आपापल्या धर्माने सांगितलेले पेहराव घालून tv वर भाषणे देताना , सभांमध्ये आरडओरडा करत बोलताना आम्ही त्या काळात पहिली . त्याचा हा परिणाम असावा . मला आज शहरांमध्ये दैनंदिन आयुष्य जगताना , रस्त्यावर , बसमध्ये ट्रेनमध्ये , स्टेशनवर कोणत्याही धर्माचा ठराविक वेशभूषा केलेला स्त्री किंवा पुरुष पहिला कि बॉम्ब किंवा दंगल आठवते . आणि मला अश्या माणसांची अतिशय किळस येते . त्यांची भीती वाटते . मला अश्या पारंपारिक भडक माणसांच्या संगतीत अजिबातच सुरक्षित वाटत नाही . मग त्या माणसाची जात आणि धर्म कोणताही असो .

वेशभूषेचा निर्णय हा व्यक्तिगत असला तरी अनेकवेळा तो नुसताच व्यक्तिगत नसतो . कारण सर्व सामान्य माणसाना स्वतःचा निर्णय आणि स्वतःचा वेगळा विचार करायचा नसतो . कुणीतरी आखून दिलेल्या मार्गाला धर्म आणि परंपरा असे म्हणून ती मुकाटपणे आयुष्य घालवत असतात . धार्मिक वेशभूषा हि आपल्याला “ मी अमुक एक धर्माचे पालन करणारा किंवा करणारी आहे असे सांगते” तात्विकदृष्ट्या त्यात गैर असे काहीच नाही . पण जग तत्वाने कधीच चालत नाही . आजच्या काळात जेव्हा शहरी दैनंदिन जीवनात बहुतांशी माणसे एका प्रकारचे सोपे , समान आणि धर्मनिरपेक्ष पोशाख घालतात त्यांच्यात मध्येच धार्मिक ग्रंथाबरहुकूम पोशाख केलेली माणसे आली कि ती माणसे त्या जागी वेगळी उर्जा तयार करतात . ती उर्जा उग्रवादी , आणि राजकीय असू शकते . अश्या माणसांमुळे त्या जागेचा माहोल लगेच बदलतो . त्यांचा पोशाख आता नुसते “ मी विशिष्ट धर्माचे पालन करणारी व्यक्ती आहे” असे सांगत नाही तर “ माझा धर्म मोठा आहे , तुम्ही इतर आहात आणि मी तुम्ह्च्यापेक्षा विशिष्ठ आहे” असे सांगतो .

आपण आता बारा बलुतेदारांच्या खेड्यात राहत नाही . आपल्या जाती आपले व्यवसाय आणि आपले पारंपारिक पोशाख ह्याचा काहीही संबंध आजच्या काळात उरलेला नाही . उदाहरणार्थ आजच्या काळातले मुंबईतले मासेमारी करणारे लोक “ वाल्ल्हाव रे नाखवा” ह्या गाण्यात घालतात तसले पोशाख घालून समुद्रावर जात नाहीत . ते टी शर्ट आणि pant घालतात . आमच्या आजूबाजूला राहणारी माणसे असे कोणतेही कपडे घालत नाहीत ज्यामुळे त्यांची जात किंवा धर्म आपल्याला कळेल. असे असणे मला आवडते .

आपण सगळे पोशाख , दिसणे ह्या सगळ्याने सारखे असणारया माणसांनी भरलेल्या शहरात राहतो. आणि त्यामुळेच असे असताना माणसे धार्मिक पोशाख करणे निवडतात तेव्हा त्याच्यामागे त्यांचे नक्कीच मोठे आणि विशिष्ट सामाजिक आणि राजकीय डावपेच असतात . त्या माणसांचे नसले तरी त्या माणसाना असे पोशाख आजच्या जगात घाला असे सांगणाऱ्या त्यांच्या नेत्यांचे , धर्मगुरुंचे , राजकीय सल्लागारांचे नक्कीच असतात. अशी माणसे साधी आणि विचार न करता असे पोशाख घालत असतील असे मला कधीही वाटत नाही. माणूस स्वतःला इतरांपेक्षा वेगळा असं मुद्दाम काढू पाहतो तेव्हा तो कधीही साधा भाबडा असू शकत नाही .

भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला धर्माचार , विचार, पोशाख ह्यांचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. पण दुर्दैवाने आजच्या काळात धर्माचा संबंध शांतता आणि पावित्र्याशी उरलेला नसल्यामुळे आणि धर्म आणि दहशतवाद , किंवा धर्म आणि राजकारण हि समीकरणे पक्की असलेल्या काळात आम्ही जन्माला आलेलो असल्याने धार्मिक माणसांची भीती वाटणे आमच्या बाबतीत साहजिकही आहेच .

तीच गोष्ट गणवेशाची . एकसारखे गणवेश हे शक्तीप्रदर्शन आणि भीती तयार करण्यासाठी निर्माण केले जातात आणि अशी माणसे आजच्या काळात सक्काळी रस्त्याने चालत गेली कि त्यांची भीती वाटते . हि माणसे एकत्र आल्यावर काय करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलेले असते . अशी भीती वाटावी हेच त्या गणवेश तयार करणाऱ्या विचारवंताला हवे असते . आणि त्यात तो यशस्वी होतो. समाजात गणवेश घालून फिरणाऱ्या माणसांविषयी दहशत तयार होते . मग ते पोलीस असोत किंवा शाखेत जाणारे स्वयंसेवक असोत . पोशाख हा माणसाला सत्ता उभी करून इतरांना ताब्यात ठेवायला नेहमीच मदत करत असतो . आणि गणवेश हा त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे .

फ्रांस सारख्या काही पाश्चात्य राष्ट्रांमध्ये धार्मिक वेशभूषा करून समाजात वावरून अस्वस्थ वातावरण तयार करण्याला विरोध होतो आहे आणि त्यामुळे तिथे बुरखा बंदी सारखे कायदे तयार होवून नवी राजकारणाची समीकरणे उमटत आहेत. भारतात अजूनही सामाजिक आचार विचार आणि वैयक्तिक आयुष्य ह्यांची गल्लत आणि फारकत असल्याने कोणत्याही प्रकारची समानता आणि सारखेपणा रोजच्या जीवनांत येणे शक्यच नाही . आपल्या बहुरंगी आणि बहुपदरी भारतीय समाज जीवनाच्या दृष्टीने हे योग्य जरी असले तरी नागरिकाने निवडलेला विशिष्ट पोशाख आणि त्याचे विचार ह्याची सांगड जर घातली तर धर्माधिष्ठित कोणत्याही गोष्टीची दहशत आणि भीती वाटण्याचे आजचे दिवस आहेत . आणि ह्याचा प्रत्यय रोज घडणाऱ्या घटनांमधून दिवसेंदिवस प्रखरपणे येतो

IMG_0222

 

अपेयपान . ‘लोकमत’ मधील लेखमाला . भाग १ ते ४ .

 

अपेयपान भाग  १

आयुष्यामध्ये निघून गेलेल्या वेळाइतके रोमांचकारी आणि पोकळ काहीही नाही . आठवणींचे चाळे करणे हा शुद्ध बौद्धिक दिवाळखोरपणा आहे ह्या विचारात माझी अनेक वर्षे गेली . मी भूतकाळाकडे साशंकतेने पाहणारा माणूस आहे . कारण भूतकाळात वेळ साचून राहिलेला , अप्रवाही आणि दुर्गंधी येणाऱ्या चिकट पदार्थासारखा असतो . मानवी मनाला भूतकाळाकडे बघण्याची चिकित्सक वृत्ती जोपासायची सवय नसते . भूतकाळ हि त्याच्यासाठी  एकप्रकारे सुटका असते . पटकन बाहेर जाऊन गुपचूप ओढून आलेली एक सिगरेट.  स्मृती ( memory ) आणि स्मरणरंजन ( nostalgia ) ह्यातला फरक ना आपल्याला घरी शिकवला जात ना दारी . आणि त्यामुळे  आपण आठवणी काढतो आणि भूतकाळात रमतो त्यातून नवे मिळवत काहीच नाही , तर स्मरणरंजनाच्या चिखलात काही काळ लोळत पडून  बाहेर येतो . महाराष्ट्रात  आपल्याला  नुकते आवडलेले  चार सिनेमे , दोन नाटके , तीन पुस्तके ह्यांचे विषय पहा . ते आपल्याला असेच काही काळ त्या चिखलात लोळून यायला मदत करतात . आणि म्हणूनच आपल्या साजऱ्या, गब्दुल  मराठी मनाला ते आवडतात . कारण आपण  स्वतः फार काही करायला नको . भूतकाळ आपला भरजरी होता हे एकदा स्वतः ला समजावून आपला वेळ रविवारच्या  पुरवण्या वाचत संपवला कि आपण सोमवारी पाट्या टाकायला मोकळे .

महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाची स्मृती एकवेळ सोपी, नटवी आणि चावट असते . पण महाराष्ट्र सोडून परदेशात स्थायिक झालेल्या वयस्कर माणसाची स्मृती हि विनोदी वेड्या म्हातारीसारखी भेसूर  असते . त्यांना जो महाराष्ट्र आज आहे असे वाटत असते , तो महाराष्ट्र स्मृतीपूर्व काळातला असतो .  एकोणीसशे साठ सत्तर वगरे सालातला .  महाराष्ट्राचा सुवर्णकाळ वगरे जो काही होता असे म्हणतात त्यातला .  अश्या माणसांची पोटची मुलेच त्यांना ताळ्यावर आणायला सक्षम असतात हे एक बरे . त्या मुलाना काहीच माहिती नसते . कारण ती  त्यांचा स्वत चा  काळ विणत योग्य दिशेने वर्तमानात जगात असतात . विस्मृती आणि अज्ञान हा जुन्या सत्तेच्या आणि जुनाट काळाच्या विरोधातला  एक रामबाण उपायच नसतो का ?

भारतीय लेखिका दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे , लेखक महेश एलकुंचवार आणि  अमिताव घोष , तुर्की लेखक ओरहान पामुक तसेच फ्रेंच लेखक मिशेल हुलबेक  ह्यांच्या साहित्यामुळे मी फार सतर्कतेने  भूतकाळाकडे बघायला आयुष्यात सावकाशपणे  शिकलो. उशीराच शिकलो कारण मी काही कुठे आकाशातून पडलो नव्हतो . पुण्यातल्या सदाशिव पेठेत , महाराष्ट्राच्या  आठवणींच्या कारखान्यातला जन्म माझा . उशीर लागणारच . पण उशिरा का होईना , आठवणींचा गुलाम होण्याऐवजी त्या आठवणींमधून काळाची तार्किक सुसंगती लावायचा प्रयत्न करायला लागलो  . कारण मी फार साधा आणि चुका करत शिकणारा माणूस आहे . मला माझा वर्तमान फार आकर्षक वाटतो , कारण काळाच्या ज्या तुकड्यात मी माणूस म्हणून वाढलो , शिकलो मोठा झालो तो काळाचा तुकडा अतिशय नाट्यमय , प्रवाही आणि गजबजलेला आहे . मी १९७६ साली पुण्यात जन्मलो ते शहर आज काळाने गिळून टाकले आहे आणि त्याची त्वचा सुकवण्यासाठी खिडकीबाहेर वाळत टाकली आहे . मी ऐकलेली गाणी , मी वाचलेली पुस्तके , मी फार महत्वाचे मानलेले महान लोक ह्यापैकी काही म्हणून मला आज जगायला पुरे पडत नाहीये . ह्याचे कारण मी ज्या काळात मोठा  झालो तो नव्वोदोत्तरीचा काळ हे आहे  . १९९२ पासून आजपर्यंतचा . वेगवान , क्रूर , हसरा आणि मायावी काळ . आपल्या सर्व भारतीय समाजाची स्मृती ढवळून काढणारा आणि आपल्याला झटके देवून जागे करणारया ह्या काळाचे कधीतरी पुनरावलोकन करायला हवे .

आपल्याला कळायला लागते , भान येते ते नक्की कधी ? माझ्या समजुतीप्रमाणे आठवण यायचे वय तयार झाले कि आपल्याला जगाचे भान यायला सुरुवात होते . त्याचा संबंध शारीरिक परीपक्वतेशी असतो . आपण वयात येत जातो तसे पहिल्यांदा आपले जगाशी काहीतरी देणेघेणे सुरू होते . आपले स्वतः चे . कुटुंब , पालक ह्यांच्या पलीकडचे . भारतीय समाजात ह्या वयात मुले माध्यमिक शिक्षण पूर्ण करायच्या बेतात आलेली असतात . माझेही तसेच होते. मी शरीरीकतेने सतर्क आणि उत्सुक झालो तेव्हा नुकताच ‘कयामत से कयामत तक’ हा तरुण जाणीवेचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा आठवणीने पिढीची वर्गवारी करणे भारतात सोपे जाते म्हणून  हा उल्लेख .

माझी पुण्यातली मराठी माध्यमाची फक्त मुलांची शाळा  भावेस्कूल हे माझे सुरक्षित , आनंदी अभयारण्य होते . शाळा संपली १९९२ साली आणि मी जगामध्ये असुरीक्षतेत लोटला गेलो असे म्हणता येईल . ह्याचे कारण माझ्या  आईवडिलांना तोपर्यंतच माझ्यासाठी निर्णय घेता येत होते. त्यापुढच्या वाटचालीचे निर्णय माझे मलाच घेणे भाग होते कारण ते दोघे महाविद्यालयात शिकलेच नव्हते . मी जे म्हणीन त्याला संपूर्ण पाठींबा द्यायचा असे त्यांनी ठरवले होते पण  निर्णय घ्यायची जबाबदारी माझी होती . शाळा संपली नेमकी त्याच वर्षी बाबरी मशीद पडली आणि पहिली अनामिक  सामाजिक भीती माझ्या पोटात उगम पावली . विध्वंस आणि दंगलीमधून तयार झालेली भीती .  तोपर्यंत आम्हा मुलांना  कुणालाच आडनावावरून जात  ओळखता येत नव्हती . बाबरी माशिदिनंतर आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणी  नंतर आम्ही अड्नावांकडे लक्ष्य द्यायला शिकलो. ह्या सगळ्याच्या  आगेमागेच बर्लिनची भिंत पडली , सोविएत साम्राज्य संपले , राजीव गांधीची हत्या झाली . आम्ही शाळेतल्या शिक्षकांच्या आग्रहाने रोजचे पेपर वाचात होतो त्यातले अंधुकसे काही कळायला लागले आणि हे जाणवायला लागले कि आपला ह्या सगळ्याशी फार थेट संबंध येणार आहे . तोपर्यंत आमच्या आयुष्यात आणि पुणे शहरात काही म्हणजे काहीही वाकडे घडलेच न्हवते . पानशेतचा पूर आणि जोशी अभ्यंकर खून खटला हि आमच्या शहराच्या वेदनांची  जुनी ग्रामदैवते होती . पण  त्यानंतर सगळे फार झपाट्याने बदलू लागले . शाळा संपताच आजूबाजूचे सर्वजण computer च्या क्लास ला जाऊ लागले. आणि चादरीच्या आकाराच्या floppy घेऊन फिरू लागले.

ह्या काळापासून आजपर्यंत स्वतःचे निर्णय घेत पुढे जात राहणे  आणि काम करत राहणे हा माझ्यासाठी आयुष्याचा मोठा भाग राहिलेला आहे. ज्या काळात हे घडले त्या काळापासून पुढची पंचवीस वर्षे अर्थकारण , विज्ञान , तंत्रज्ञान आणि समाजकारण ह्याची घडी विस्कळीत होवून मोठी उलथापालथ होणार आहे ह्याची आम्हाला त्या काळात कल्पना नव्हती . माणसाचे जगणे आणि माणसाच्या आठवणी ह्यावर पुढील काळात होणार्या आर्थिक आणि तांत्रिक घडामोडींचा सखोल परिणाम होणार होता आणि पाच पाच वर्षांच्या काळात नवनव्या  गोष्टी निर्माण होवून नाहीश्या होणार होत्या. आज  चांगले वाटेल ते उद्याच अनावश्यक  वाटू लागणार होते  आणि  आमचे सगळे पुढचे महिने आणि वर्षे आपल्या जुन्या मूल्यांकडे जमेल तसे लक्ष्य देत , नवी मूल्ये वेगाने आत्मसात करण्यात जाणार होती . वेगवान आणि भन्नाट . ह्या सगळ्यात जर कशावर अंतस्थ परिणाम  होणार होता तर तो आमच्या मेंदूतल्या आठवणी तयार करण्याच्या  कारखान्यावर .

मी या लेखमालेत यापुढे ह्या विचित्र वेगवान झगमगीत आणि वाह्यात आठवणीनंविषयी  लिहिणार आहे . ह्या सदरामध्ये . इथे सुरुवातीला मी  काय लिहिले होते ते मी पूर्ण विसरून जाईस्तोवर .

 

10489623_10152207016792267_8148827493166830975_n

सचिन कुंडलकर .

 

अपेयपान भाग २

गेल्या अनेक वर्षात माझ्यासोबत जर काही सातत्याने  राहिले असेल तर विविध जागा आणि व्यक्ती ह्यांच्यासंदर्भात मला वाटत असलेला न्यूनगंड.Inferiority complex . आपल्यात इतरांपेक्षा काहीतरी कमी आहे ,आपण  ह्या नव्या वातावरणात रुळून जायला कमअस्सल किंवा अपात्र आहोत   ही भावना . ही न्यूनगंडाची भावना मला मी मोठा होत असताना सतत बदलत राहणाऱ्या माझ्या आजूबाजूच्या वातावरणाने दिली . जग फार वेगाने बदलतेय असं आपल्याला जो अनुभव येत राहिला, अनेक वस्तू,गोष्टी, शहरे नव्या स्वरुपात आली तो हा काळ. आर्थिक उदारीकरणाच्या परिणामांचा आणि digital technology ने आपले आयुष्य व्यापण्याचा. ह्या काळाने मला दिलेली मोलाची भेट म्हणजे सततचा न्यूनगंड .माझ्या मध्यमवर्गीय जडणघडणीमुळे तो वृद्धिंगत झाला आणि मला ह्या भावनेमुळे सतत सतर्क,जागे राहावे लागले .माझी परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागत राहिले.

माझी ही कहाणी इतर चार चौघांपेक्षा वेगळी नाही. तुम्हा सर्वांसार्खीच आहे. आपण सगळ्यांनी,ज्यांनी ज्यांनी सुरक्षितता सोडून बाहेर पडून काही करण्याचा ह्या काळात प्रयत्न केला आहे त्या सगळ्यांना ह्या न्यूनगंडाने साथ दिली आहे . गाव सोडून शहरात येणार्यांना . छोटी शहरे सोडून मोठ्या शहरात जाणार्यांना.आपल्या कुटुंबापेक्षा वेगळे काही कामाचे मार्ग शोधणार्यांना .

आपण साध्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही हि माझी  पहिली मोठी घाबरवणारी  भावना . आपले कपडे कॉलेजमधील इतर मुलांइतके चांगले नसतात हि  दुसरी एक भावना.आपण मुंबईत गेलो कि ह्या मोठ्या शहराच्या वेगवान आणि अतर्क्य चालीरीती आपल्याला कधी कळत नाहीत हि एक पूर्वीची जुनी भावना . आपल्यावर कुणी प्रेम करत नाही कारण आपण जगाला हवे तसे सुंदर दिसत नसू, आपल्यात दुसर्यावर छाप पाडण्याची कोणतीही कला नाही ही भावना . आता आठवले तर मौज वाटेल अश्या ह्या असंख्य भावनांच्या जंजाळात मी खूप वर्षे राहिलो आणि त्यांच्याशी झगडण्याची उर्जा इथून तिथून झगडत मिळवत राहिलो . इथून तिथून म्हणजे खूप सारी पुस्तके वाचून आणि सिनेमा पाहून.मला हिंदी सिनेमाने मोठे होताना अपरिमित उर्जा आणि आत्मविश्वास पुरवला. नौव्वदीच्या दशकातला साधा मनोरंजक सिनेमा. श्रीदेवी विरुद्ध माधुरी ह्या काळातला .सगळी खानबाळे मिसरूडात होती त्या वेळी आणि सनीच्या  “धायी किलोका हाथ” ला टाळ्या मिळत तो सिनेमा . हिंदी सिनेमाने मला प्रेम करायला, रागवायला, जमलेच तर मनातल्या मनात बदलाबिदला घ्यायला, प्रेमभंग झाला तर कसे रडायचे ह्याला, तात्पुरते का होईना तयार केले. तो नसता तर मी कुठून माझ्या सैरभैर मनाला बळ पुरवले असते ते मला माहित नाही .माझ्या मनात कुटुंब ,शाळा आणि शहर सोडून जाताना जी भीती आणि असुरक्षितता होती, ती दूर केली फक्त हिंदी सिनेमाने आणि असंख्य पुस्तकांनी ,पर्यायाने ती लिहिणाऱ्या लेखकांनी .मराठी लेखक आणि त्यानंतर अपरिमित कष्ट करून इंग्लिश वाचता यायला लागल्यावर वाचलेले जगभरातले सर्व जुने, नवे लेखक.

वीस वर्षापूर्वी मला इंग्लिशमध्ये दोन वाक्ये सरळ बोलता येत नसत. चमचे वापरून नीट खाता येत नसे आणि साधी इंग्लिश पुस्तके वाचताना मोठी डिक्शनरी सोबत घेऊन सतत त्यात बघावे लागे. एकेक पुस्तक वाचायला महिना महिना लागत असे . फ्लोबेर ह्या लेखकाची ‘मादाम बोवारी’ ही कादंबरी मी बारावीत धाडस करून वाचायला घेतली तेव्हा मी डिक्शनरी बघून बघून रडकुंडीला आलो होतो.ह्या सगळ्यातून तयार होणारया न्यूनगंडाने मला ढकलत सावकाशपणे पुढे नेले.पुढे मी न घाबरता जगभर अनोळखी ठिकाणी प्रवास केले, फ्रेंच भाषा शिकलो ,स्वयपाक करायला शिकलो  सिनेमा शिकलो, तो बनवायलाही शिकलो, चांगल्या संगीताचा, चांगल्या दृष्यकलेचा आस्वाद घ्यायला शिकलो,परक्या लोकांना न घाबरता आपलेसे करायला शिकलो हे सगळे करताना मला प्रत्येक टप्प्यावर सातत्याने दुय्यम आणि कमअस्सल वाटतच रहीले कारण माझ्यासमोर सतत त्या त्या क्षेत्रातली मोठी हुशार आणि ताकदवान माणसे ,समाजात फोफावणारी आणि प्रदर्शित केली जाणारी श्रीमंती, वेगाने बदलणारे तंत्रज्ञान ,न हाताळता येणारी यंत्रे येतच राहिली. काही शिकले तर नवीन काहीतरी  पुढे उभे येऊन थांबे .कधी काही स्थिर म्हणून राहिले नाही. आता आपण कुठेतरी पोचलो आहोत जिथे सर्वात सक्षम आणि ताकदवान आपणच आहोत असे कधीही झाले नाही .आपल्याला ज्ञान मिळाले आहे आणि आता त्या ज्ञानाने आपल्याला आत्मविश्वासाचे स्थैर्य लाभेल हि भावनाच ह्या काळाने येऊ दिली नाही.

मला संपूर्ण आत्मविश्वास कि काय म्हणतात तो कधीहि नव्हता आणि आजही तो माझ्यापाशी बरेचवेळा नसतो हे माझे फार चांगले नशीब आहे .

मला आज असे लक्षात आले आहे कि मला सतत सोबतीला असणारा हा न्यूनगंड माझ्यासाठी आजपर्यंत फार मोठे वरदान ठरला . त्यामुळे मी शिकत  राहिलो, धडपडत राहिलो आणि काळाशी जुळवून घेत राहिलो .जुन्या अडचणी पार केल्यावर नव्या तयार होत गेल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याने मला सतर्क राहता आले. मुख्य म्हणजे जमेल तसे काम करत राहण्यावर माझा विश्वास कायम राहिला आणि सर्व बाबतीत perfect  होण्याच्या शापातून मला मुक्तता मिळाली . Perfectionism is the death of many simple pleasures of life .

मी आज त्या न्यूनगंडाचे आभार मानतो . शिवाय त्या सर्व माणसांचे ज्यांनी आयुष्यात विवीध टप्प्यांवर माझी ती दुय्यम असण्याची भावना प्रबळ केली . त्यात ओळखीचे अनेक मोठे फिल्मस्टार्स आले, मोठे यशस्वी श्रीमंत लोक आले , मोठमोठे लेखक , मोठे fashion designers आले आणि जगातली मोठी चकचकीत वेगवान शहरे आली. Paris सारखे वाह्यात आणि हुशार शहर माझ्या वाट्याला फार तरुणपणी आले. आणि मला त्या शहराने गुदगुल्या करकरून त्या वेळी बेजार केले.  मराठी शाळा सोडून BMCC कॉलेज मध्ये गेल्यावर फटाफटा इंग्लिश बोलणारी मुले आली, कॉलेजमध्ये कार आणि ड्रायव्हर घेऊन येणारी आणि सोळाव्या वर्षीच अप्रतिम fashion sense असणारी नमिता मेहता नावाची हुशार मुलगी आली. मला अजुनी हॉटेलात नीट खेकडा खाता येत नाही म्हणून माझ्यावर हसणारे अनेक मित्र आले. पृथ्वी थेटर ला पहिल्यांदा गेल्यावर हिंदी इंग्लिश रंगभूमीवर काम करणारे smart रंगकर्मीज आले ,आणि मी सारखी माझ्या मोठ्या कमरेची pant वर ओढत फिरतो तेव्हा हळूच मला हसणारे लोक आले .सगळेच आले. सतत बदलायची आणि आहोत त्यापेक्षा नवनवे काहीतरी शिकायची एक शीस्त ह्या वातावरणाने मला आपोआप लागली.

मला काही गोष्टी अजुनी जमत नाहीत . नीट गोल पोळी नेहमीच लाटता येत नाही .Labyrinth ह्या  शब्दाचा अर्थ नुकताच कळलाय पण तो नीट म्हणता येत नाही. फ्रेंच अस्खलित बोलता येते पण नीट लिहीत येत नाही. अजूनही टीप नक्की किती द्यायची ते कळतच नाही. इंग्लिश सिनेमात अनेक वेळा काय बोलतात ते कळत नाही, जरा धडधडीत मोठ्याने बोला हो असे वाटते आणि कुणाला किती वाजता फोन करावा आणि करू नये ह्याची शहरी सभ्यतेची गणिते कळत नाहीत (जगातील प्रत्येक शहरात ह्याची वेगळी आखणी आहे) आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते game of thrones ही जी काय महान आणि must कलाकृती आहे ती मी अजुनी पाहिलेली नाही. म्हणजे तर मी पुण्यामुंबईत जगायला लायकच नाही . कारण लहान पोरेसोरे उठून हल्ली फक्त त्यावरच बोलत बसतात. आणि तेव्हा तुम्ही कितीही पुस्तके वाचून टिकोजीराव झाले असाल तरी त्यांच्यापुढे तुम्ही अगदी कापूसबोळा ठरता.

ह्या सगळ्यामुळे मी सारखं ओशाळून बसतो आणि आता जरा नीट काही चार गोष्टी शिकून घेऊया  असे मनाला बाजावत राहतो .

सचिन कुंडलकर .

 

IMG_1709

 

अपेयपान   भाग ३

गेल्या आठवड्यात मुंबईतील सुप्रसिद्ध रिदम हाउस हे जुने आणि महत्वाचे संगीताचे केंद्र बंद होणार अश्या बातम्या प्रसिद्ध झाल्या तेव्हापासून प्रत्येक संगीतप्रेमी माणूस हळहळत आहे.प्रत्येकाला वाटते आहे कि इतके जुने आणि चांगले दुकान बंद व्हायला नको .रिदम हाउस हे नुसते कॅसेट्स आणि सी. डी ज विकत घेण्याचे दुकान नव्हते, तर त्या दुकानामुळे तीन चार पिढ्यांना जगभरातले उत्तम संगीत ऐकण्याची आणि संगीताचा संग्रह करण्याची सवय लागली. माझ्या अनेक मोलाच्या आठवणी काळाघोडा भागातील ह्या दुकानाशी जोडल्या गेल्या आहेत .मी एकदा शेवटची भेट म्हणून तिथे पुढील आठवड्यात जायचे ठरवले आहे. एवढे मोठे आणि महत्वाचे दुकान बंद करण्यामागचे कारण मालकांना एका पत्रकाराने विचारले असता, मालक त्याला व्यवहारी मनाने म्हणाले कि तुम्हाला वाईट वाटणे हे  साहजिक आहे पण वाईट वाटण्याने हे दुकान चालणार नाही . लोक आता पूर्वीसारखे इथे येत नाहीत . संगीत विकत घेत नाहीत .ते इंटरनेटवरून मोफत डाउनलोड करतात . आम्ही वेगवेगळ्या प्रकारे तग धरायचा प्रयत्न गेली चार वर्षे करत आलो पण आता आंम्हाला ह्या नव्या काळात टिकून राहणे आता शक्य नाही.

गेल्या काही वर्षातला आपल्या देशातला  हा एक ठळक अनुभव. चांगली पुस्तकांची दुकाने आणि चांगली म्युझिक स्टोअर्स बंद होणे .आपण लहानपणी जिथून पुस्तके,संगीत ,कॉमिक्स आपल्या पहिल्या रंगपेट्या घेतल्या त्या सर्व जागा एकामागून एक नाहीश्या होत जाणे. प्रत्येक वेळी एक पुस्तकाचे ओळखीचे दुकान बंद झाले , एक music store नाहीसे झाले कि मला खूप वाईट वाटत राही. मी त्याच्या आठवणी काढत राही , फेसबुकवर त्याचे जुने फोटो टाकत बसे. आपले आवडते जुने इराणी restaurant गेल्या वेळी होते , आज अचानक पहातो तर नाही, तिथे कहीतरि वेगळेच उभे राहिलेय . ते चीनी आजी आजोबा प्रेमाने चीनी जेवणाचे हॉटेल चालवत होते , ते सगळे आवरून कुठे गेले ? मी लहानपणी असंख्य कॉमिक्स , आणि चांदोबाचे अंक ज्यांच्याकडून घ्यायचो ते दाते काकांचे अलका टोकिजसमोरचे दुकान आता उदास होवून बंदच का असते ? आपल्याला ताजे पाव आणि नानकटाई बनवून देणारी ती जुनी बेकरी बंद झालेली आपल्याला कळलेच नाही. घराजवळची पिठाची गिरणी जाऊन तिथे हे काय आले आहे ?

हळूहळू मला सवय लागली . आपल्या मनातले आणि आपल्या आठवणीतले शहर नष्ट होत जाण्याकडे बघायची सवय . मी पुस्तकांबाबत फार हळवा आहे . त्यामुळे पुस्तकांची दुकाने गेल्याचे आणि तीथे मोबाइलची दुकाने आल्याचे  काळे डाग माझ्यावर खूप वेळ राहत. नंतर काही चांगले पहिले , कुणी काही चांगली जागा नव्याने तयार केली कि असे वाटे कि हे सगळे टिकून राहो . कारण सध्या सगळे फार वेगाने वितळून जाते . पण काळ हि गोष्ट आतल्या गाठीची आणि काळाची पावले ओळखण्याची कला आपल्या रोमांटिक मराठी मनाला अजिबातच नाही. मला अनेक वेळा काही कळेना होई . हे सगळे होते आहे त्यासाठी माणूस म्हणून मी काय केले पाहिजे ? ह्या चांगल्या जागा , उत्तम जुनी दुकाने , महत्वाच्या संस्था बंद पडू नयेत , विकल्या जाऊ नयेत म्हणून मी काय करावे ?

रिदम हाउस च्या मालकाची मुलाखत वाचली आणि मला शांत साक्षात्कार झाला.आपण ज्या जागा बंद पडल्या त्या जागा पहायला, तिथून पुस्तके आणायला,त्या लोकांना भेटायला गेल्या काही वर्षात किती वेळा गेलो ? खूपच कमी. बंद पडल्याची बातमी आली नसती तर अजून वर्षभर तरी मी तिथे पावूल टाकले नसते. मी पण सध्या बिनधास्त इंटरनेट वरून पुस्तके ऑर्डर करतो ,संगीत डाऊनलोड करतो. एका जागी मिळते म्हणून सुपर मार्केटमधून सामान आणतो .मग मला बरे वाटावे आणि माझ्या बालपणीच्या आठवणी जशाच्या तश्या टिकून राहाव्यात म्हणून भुकेकंगाल राहून माझ्या छोट्या जुन्या जगातील सारी माणसे,  पुस्तकविक्रेते , जुनी हॉटेले चालवणारे मालक,  जुने शेंगदाणे विक्रेते , जुनी भाजीवाली बाई ,जुन्या इमारतींचे पेठांमधील वाड्यांचे मालक रोज संध्याकाळी रंगसफेती करून , दिवाबत्ती करून , साजशृंगार करून माझी वाट पाहत बसणार आहेत कि काय?  कि कधीतरी हा बाजीराव उगवेल तेव्हा त्याला सगळे जसेच्या तसे सगळे मिळावे . कारण मी इतका हळवा मराठी जीव . मला जरा काही बदललेले चालत नाही .ह्या सगळ्यात माझी साधी जबाबदारी हि होती कि मी नेहमी जाऊन त्या दुकानांमधून पुस्तके , संगीत,चित्रे विकत घ्यायला हवी होती . मी माझ्या शाळेतल्या  शिक्षकांना अधेमध्ये जाऊन भेटायला हवे होते , मी आणि माझ्या कुटुंबाने जुन्या चांगल्या ठिकाणांचा , वस्तूंचा वापर करणे , त्यांचा आस्वाद घेणे थांबवायला नको होते. मी माझा भूतकाळ नीट जपून ठेवायला हवा होता . जुन्या इमारतींच्या रुपात , जुन्या संगीताच्या, चांगल्या साहित्याच्या , जुन्या कलाकृतीच्या रुपात . सणवार आणि गणेशोत्सवाचा गोंगाट हे सोडून मराठी माणूस काहीहि जतन करू शकलेला नाही .चांगले काही जपून पुढच्या पिढ्यांना दाखवण्यासाठी जिवंत ठेवावे हि गरजच मला कधी वाटली नाही .मग मला वाटणारी हळहळ किती फालतू आणि बिनकामाची आहे? माझ्यासारख्या माणसाला त्याची मातृभाषा कमी बोलली जाते म्हणूनही वाईट वाटण्याचा अजिबात हक्क नाही . कारण मी त्या भाषेसाठी काही केलेलं नाही . मी माझ्या भाषेत लिहित नाही,माझी मुले त्या भाषेत शिकत नाहीत . मग उगाच फेसबुकवर चकाट्या पिटायला वेळ आहे म्हनून भाषेचा अभिमान बाळगला तर ह्याने  भाषा टिकणार नाही  आपण ह्यापुढे ज्या पद्धतीने पैसे खर्च करू , त्या पद्धतीने आपली शहरे आकार घेत राहाणार. पैश्यापलीकडच्या गोष्टी स्पर्शाने आणि काळजीने जतन होत राहणार . बाकी सगळे निघून जाणार. मग काय टिकवायचे आणि काय जाऊ द्यायचे हि माझी जबाबदारी आहे

 

झेपेनसे झाले कि माणसे गाशा गुंडाळतात . ज्या वेगाने लोकसंख्या वाढली शहरे वाढली ,माणसांच्या आवडीनिवडी बदलल्या ,जगण्याचा वेग वाढला ,इंटरनेट आले त्या वेगाने जुने सारे काही नष्ट होण्याचा वेग वाढणे हे अपरिहार्य होते . कारण आपण काळापुढे मान तुकवलेले जीव आहोत . आपले चांगले झाले तर देवाने केलेले असते आणि वाईट घडले कि आपले सरकार जबाबदार असते ह्या ब्रिटीशकालीन गुलामी भावनेचे आपण भारतीय लोक. आपण एक व्यक्ती आणि नागरिक म्हणून  अतिशय घाबरट आणि पुचाट असतो . साहित्य संमेलने , मोर्चे , मिरवणुका , लग्न, सणवार असल्या झुंडीच्या ठिकाणी फक्त आपण चेकाळतो .आपल्याला आपल्या जगण्याची वैयक्तिक जबादारी नसते आणि कुणी दिली तरी ती घ्यायची नसते . त्यामुळे काळाचा वरवंटा फिरून आपले जुने जग नष्ट होणे हीच आपली बहुतांशी वेळा लायकी असते . आणि तसेच आपल्या देशात गेल्या वीस पंचवीस वर्षात वेगाने घडले आणि आपण आपली जुनी शहरे कणाकणाने नष्ट होताना आपण पाहत आलो.

ह्याच सगळ्याची दुसरी बाजू हि सुद्धा.अगदी ताजी.संजय दत्त आणि सलमान खानला रोज सकाळी पेपर वाचून शिव्या देताना आपण हे विसरलो आहोत कि त्या नटांना आपणच गरजेपेक्षा जास्त मोठे करून ठेवले आहे. आपण  त्यांच्यावर पैसे उधळले आहेत.आपण जबाबदार आहोत. जे चालू आहे त्या सगळ्याला. सरकार नाही आणि नशीब तर त्याहून नाही .आपण थेट जबाबदार आहोत. आपले निर्णय ,आपले पैसे खर्च करण्याचे मार्ग आणि आपल्या कृतींनी काळ आकार घेत राहतो आहे.

सचिन कुंडलकर .

अपेयपान  भाग  ४

 

वेश्या, गुंड आणि ठेवलेल्या बायका ह्या तीन शब्दांबद्दल मला वाढत्या वयात एक न संपणारी आसक्ती होती . कारण मी ज्या वातावरणात वाढलो तिथे ह्या तीनही शब्दांचे अर्थ माहित असूनहि, त्याचे प्रत्यक्ष क्रियेत रुपांतर करणाऱ्या व्यक्ती मी कधी पहिल्या नव्हत्या. हिजडा हा अजून एक शब्द होता पण मी रस्त्यावर पुरेसे हिजडे पहिले होते . रिक्षाने इथेतिथे जाताना सिग्नलला ते येऊन गाणी म्हणत आणि माझे गाल कुस्करून आईकडून दोन पाच रुपये नेत. तेही शुद्ध मराठीत बोलून .आमच्या इथला एक हिजडा तर चक्क “हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे” हे  गाणे म्हणत असे . आमच्या शाळेत आम्ही ‘हिजडा असणे’ म्हणजे नक्की काय यावर तासन तास चर्चा करुन स्वतःच्या गोंधळात भर पाडली होती . पण वेश्या, गुंड आणि ठेवलेली बाई ह्यांची काही केल्या भेट घडत नव्हती .

हिंदी सिनेमामध्ये वरील कामे करणाऱ्या तीनही व्यक्ती सतत भेटत. पण आपल्या आजूबाजूला असे कुणी का नाही? किती प्रश्न विचारायचे होते मला. का करता ? कसे करता ? कसे वाटते ?  मी तेव्हा अनिल अवचट ह्यांची पुस्तके वाचून फार भारावून गेलो होतो आणि  फार प्रश्न विचारणारा मुलगा बनू लागलो होतो . कारण तेव्हा आमच्याकडे माहिती मिळवायला गूगल नव्हते. माझ्या एका आजीला मी एकदा भर चैत्रगौरीच्या हळदीकुंकवात ,” आजी , आईला कावळा  शिवलाय म्हणजे काय झाले आहे? असे मोठ्यांदा विचारून तिच्या तोंडाला फेस आणला होता. कारण त्या दिवशी आई बाजूला बसून होती आणि कशालाही शिवत नव्हती.

आमच्या समोरचे ज्ञानेश्वरकाका गुंड आहेत असे घरात बोललेले मला कानावर पडे . पण ते माझ्याशी फार प्रेमाने वागत स,तत टापटीप कपड्यात असत आणि त्यांच्या पानाच्या टपरीसमोरून गेले कि ते मला नेहमी लवंग वेलदोडे खायला देत. ते गुंड असतील ह्यावर माझा विश्वास बसत नसे. पण ते खरच होते म्हणे. त्यांनी दोन खून पचवले होते. आणि असा माणूस आपल्याला लवंग वेलदोडे देतो ह्याचे मला फार भारी वाटे. पण तरीही माझ्यासाठी  ते गुंड नव्हते . खरा गुंड म्हणजे तेजाब मधल्या अनिल कपूर सारखा .ज्ञानेश्वर काकांच्या हाताखाली काम करत असणार असे अनिल कपूर सारखे लोक . त्यांच्यात माझी उठबस,जमल्यास थोडे लवंग वेलदोडे – चहा गप्पा असे काही होतच नव्हते. फार रटाळ सपक बालपण चालूच होते.

वेश्या मला पहिल्यांदा  दिसल्या त्या लक्ष्मी रस्त्यावर आईसोबत कापडखरेदीला गेलो तेव्हा . सिटीपोस्टाचा चौक लागला कि आमच्या शहराच्या हवेतले रंग आणि वास बदलू लागत . पाच मिनिटावर असणार्या आमच्या सदाशिवपेठेपेक्षा पूर्ण वेगळे. गजरेवाले , भेळवाले , अत्तरे विकणारी दुकाने , त्या तसल्या फिल्म दाखवणारे श्रीकृष्ण टाकीज , उकडलेली अंडी विकणारे फेरीवाले.तो भाग जवळ येऊ लागला कि आई माझा हात घट्ट धरून ठेवी आणि त्या भागातून झपझप चालत असे .तिथे त्या उभ्या असत . रस्त्याच्या दुतर्फा .तोंड भडक रंगवलेल्या.आत बुधवार पेठेत त्यांची मोठी वस्ती होती . मी आई पुढे खेचून नेत असताना मागे वळून त्यांच्याकडे पाहत राही .मला फार भेसूर आणि भयंकर काहीतरी वाटत असे.

मी विचारलेल्या कोण्याही प्रश्नाला उत्तर देणे माझी आई टाळत नसे. मला कसलाही संकोच वाटू नये ह्याची ती काळजी घेत असे. त्या बायका आहेत म्हणून आज शहरातील आमच्यासारख्या बायांची आयुष्य सुखरूप आहेत. त्या नसत्या तर विचार कर , पुरुषांच्या भुका त्यांनी आमच्यासारख्या बायकांवर भागवायला सुरुवात केली असती . तिने मला सगळे शांतपणे आणि स्पष्ट सांगितले. त्या बायका फार दुर्दैवी असतात .त्या खऱ्या देवासारख्या आहेत. आई शांतपणे म्हणाली . मीरा नायरचा ‘सलाम बॉम्बे’ हा सिनेमा मी आणि आईने TV वर एकत्र पहिला. त्यानंतर काही वर्षांनी सुमित्रा भावे ‘जिंदगी जिंदाबाद’ हा एड्स वरील चित्रपट करत असताना मी सहाय्यक होतो आणि एक संपूर्ण दिवस बुधवार पेठेत वेश्यांनी बुजबुजलेल्या एका इमारतीत आम्ही शूटींग करत होतो . त्या दिवशी मला जे दिसले त्यामुळे माझ्यातला पेठेतला पुणेकर मरून जायला मला मदत झाली. माझे सर्व प्रश्न उत्तरीत झाले. आणि मी आपण सोवळे, जग ओवळे ह्या मानसिकतेतून कायमचा बाहेर आलो. मी त्या दिवशी नरक म्हणजे काय ह्याचा अनुभव घेतला. अश्या जागी जावून कुणाला शारीरिक  तृप्ती कशी मिळत असेल ? मला तिथल्या लहान लहान मुली पाहून गोठून गेल्यासारखे झाले. आई कस्टमर सोबत आत गेल्यावर बाहेर खेळत बसणाऱ्या.

ठेवलेल्या बायका मला दिसायला आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क यायला जरा वेळ लागला . पण मी ज्या ज्या ठेवलेल्या बायकांना भेटलो त्या सगळ्या मजेत गुबगुबीत असलेल्या बायका होत्या. हिंदी सिनेमात अश्या बायकांना ‘रखेल’ म्हणतात आणि त्या संसार उध्वस्त करतात अशी त्यांची ठरलेली प्रतिमा माझ्या मनात होती . पण मी अश्या ज्या बायकांना भेटलो त्या बायका फारच स्वावलंबी , हुशार आणि कर्तृत्ववान होत्या . आमच्या कुटुंबातल्या काही पुरुषांनी , काही मित्रांनी , ठेवलेल्या बायकांना मला भेटायचा योग आला. पण मला वाटत होते तितक्या ह्या काही दुक्खी बायका नव्हत्या . त्या कितीतरी श्रीमंत होत्या . केवळ सोबत आणि प्रेम असावे म्हणून त्यांनी दुय्यम जागेचे हे नाते स्वीकारून आयुष्याशी तडजोड केली होती . एक दोन ठिकाणी तर मला हे दिसले कि त्या पुरुषाच्या कुटुंबाने त्यांना काळासोबत मूकपणे स्वीकारलेदेखील आहे. त्यांना अदृश्य ठेवले जाते , त्यांचे उल्लेख टाळले जातात पण त्या बायकांना कुटुंबाच्या वेशीवर का होइना , एक जागा दिली गेलेली असते.

मी एकदा Paris मध्ये माझा क्लास संपवून मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो होतो . एका छोट्या कॅफेमध्ये त्याचे दहा बारा मित्र जमलेले. एका मुलीने संत्र्याची साल घातलेला त्याचा आवडता केक बनवून आणलेला. जेवताना गप्पा मारत होतो तेव्हा ती मला शांतपणे म्हणाली मी वेश्या आहे . मी पोटापाण्यासाठी ते काम करते. माझा चमचाच खाली पडला. ती म्हणाली त्यात काय आहे लाजण्यासारखे ? ते माझे काम आहे . मी काहीतरी नवीन शिकून , कायमचा नवा जॉब मिळेपर्यंत हे काम करतीये . मग सोडून देयीन.  मी माझ्या मित्राकडे पाहून तिला विचारले , त्याला हे माहिती आहे ? ती म्हणाली हो . तो माझा जवळचा मित्र आहे. ऑफ कोर्स त्याला हे माहिती आहे .तिने तो विषय तिथे सहज सुरु झालेला तिथेच शांतपणे संपवला कारण तीच्यादृष्टीने त्यात अजून काही बोलण्यासारखे नव्हते . ती फोटोग्राफीचा अभ्यास करत होती . ती भारतात येऊन गेली होती . तिला गाणे शिकायचे होते. आणि निदान सहा मुलांना मी जन्म देणार आहे असे ती म्हणाली. तिला आई व्हायचे होते.

नाशिकला एकदा माझ्या भावासोबत एका ठिकाणी मिसळ खायला गेलो असता त्याच्या एका मित्राने बेसिनपाशी जाऊन हात धुताना खिशातले रीवोल्वर बाहेर काढून पुन्हा  आत नीट खोचून ठेवले . मी गप्पगार . आम्ही गेला अर्धा तास केवढ्या गप्पा मारलेल्या आणि हसलेलो . तो आत्ताही हसत होता आणि मी वेगळ्याच तंद्रीत . गुंड आहे हा !  भेटलाच शेवटी आपल्याला !  वाह . मला फार म्हणजे फारच बरे वाटले. आपण वाट पाहणे सोडले तेव्हा जगातली हि रंगीत माणसे आपोआप येऊन भेटली कि आपल्याला.

सचिन कुंडलकर .