अपेयपान .लोकमत मधील लेखमाला . भाग २७ ते ३०

अपेयपान २७
स्वतःच्या घरातून उठून आपल्याच शहरामध्ये एखाद्या सुंदर हॉटेल मध्ये जाऊन राहायचा प्लान डोक्यात आकार घेऊ लागला आहे. अंधारून आले आहे . पाऊस पडतोय आणि जे घर आवडीने आवरून सजवून जागते ठेवतो , त्या घरामध्ये मनाच्या येरझाऱ्या घालायला जागा पुरत नाहीये.
शिस्त आड येते आहे. व्यवस्थित वागण्याची , टापटीप ठेवण्याची सवय आड येते आहे . स्वयपाक करता येतो हि गोष्ट सोय नसून गैरसोय होवू लागली आहे.
उशिरा उठायचे ठरवले तरी उशिरा उठू शकत नाही मी. साडेसात वाजता कचऱ्याची पिशवी न्यायला बाई येते. साडेआठ वाजता स्वयपाकाची बाई आणि मग नाश्ता करून नऊ वाजता लिहायला बसावेच लागते. साडेबारानंतर सगळ्या जगाला कामाचे फोन्स . एक नंतर बाहेरच्या भेटी गाठी . गाडीत बसून मनात चालू असलेले विचार . कामाचे , सिनेमाचे, आठवणीतल्या माणसांचे . आणि रात्री घरी परतल्यावर एखाद्या अतीशय लहान मुलासारखे गुपचूप वाट पाहणारे घर. दुपारी एक बाई येऊन ते आवरून पुसून जातात त्यामुळे अंघोळ घालून भांग पाडून नवा शर्ट घालून ठेवलेल्या लहान मुलासारखे दिसणारे माझे घर. रात्री घरी येऊन दार लावले कि धावत आपल्यापाशी येणारे. ह्या शहरात इतकी माणसे आहेत कि एकांत मिळण्यासारखे दुसरे सुख नाही .
त्या आपल्याच घराचा पावसाळ्यात कंटाळा येऊ लागतो. मी समुद्रापासून अर्धा पाऊण तास लांब राहतो. समुद्राची आठवण येत राहते. एरवी ह्या शहरातल्या वेगाच्या आयुष्यात हे लक्षातसुद्धा येत नाही कि आपण समुद्राच्या इतक्या जवळ असूनही त्याला भेटलेलो नाही , पाहिलेले नाही .
असे वाटते कि लहानपणी मावशीकडे राहायला जायचो आणि ती लाड करायची तसे कुणी आपल्याला उरलेले नाही . मावशी गेल्यापासून ती एक प्रेमळ जागा संपून जाते आणि परत तसे कुणीही उरत नाही. इतर नातेवाईकांकडे गेलो कि त्यांच्या लहान बेशिस्त कर्कश मुलांचा आरडओरडा सहन करावा लागतो. कुणाशीही कधीही शांत गप्पा मारता येत नाहीत कारण जाऊ तिथे सगळ्यांना असली आगाऊ मुलेमुली असतातच. ज्यांना मुले नसतात त्यांच्या बहुतेकांच्या बायका नवऱ्याला एक मिनिट मोकळा सोडत नाहीत. कारण तो नवरा हेच त्या बायकांचे एक मूल बनलेले असते. त्यामुळे आपली म्हणून जी प्रेमाची खाजगी माणसे असतात ती म्हणत जरी असली कि ये कि आमच्यात जरा गप्पा बिप्पा मारू ! तरी त्यांच्याकडे गेले तरी त्या आपल्या माणसांशी आता शांत गप्पा होणार नाहीत हे गेल्या काही वर्षात लक्षात आलेले असते. त्यांचे लहानपण संपून त्यांच्या मुलांचे सुरु झालेले असते . आपले अजून संपलेले नसते .आपल्यासारखी लहान मुलांच्या मनाची माणसे त्यानाही नको झालेली असतात. कौटुंबिक लोकांच्या जाणीवेचा एक समूह असतो . ती एक वेगळी जगण्याची पद्धत असते आणि जी माझ्यासारखी माणसे कुटुंबाच्या गर्दीशिवाय आयुष्य रचतात त्यांना अश्या ठिकाणी गोंधळून संकोचून जाऊन अतिशय परके वाटत राहते. एकास एक अश्या संवादाची सवय झालेल्या माणसाला फार तर फार दोन माणसांशी व्यवहार करता येतो . तीन नौ किंवा सतरा नाही. त्यामुळे माणसांचा घोळका दिसला कि मी संकोचून आकसून बसतो. सतत कुटुंबात राहिलेल्या माणसांना आपले मन कळू शकत नाही . आपल्याला त्यांचे कळू शकत नाही . आणि अशातून कितीतरी महत्वाच्या नात्यांवर शांततेचे पांढरे मुलायम कापड पसरले जाते.
आपल्या माणसासोबत गप्पा मारणे , फिरायला जाणे , मद्यपान करणे, संगीत ऐकणे, एकत्र स्वयपाक करणे हे शांत आश्वासक सुख. ते काही कारणाने तत्काळ मिळणार नसेल किंवा त्या माणसाच्या कामातून तो मोकळा होण्याची वाट पहावी लागणार असेल तर मात्र एका प्रकारच्या एकांताला चांगला पर्याय हा दुसऱ्या प्रकारचा एकांत ठरतो. अनोळखी माणसांनी गजबजलेले जग नाही.
शिवाय जरी कुणी लग्न केलेले असेल तरी कुणालाही सारखे आपले प्रेमाचेच तेच ते माणूस नको असते. पावसाळ्यात कात टाकावी वाटते. नवे काही हुंगावे वाटते. चुलीवरचे काही लागते. प्रेमाशिवायची सोबतही चालणार असते. सारखे प्रेम प्रेम साडी गाडी हफ्ता मुले फीया प्रेम प्रेम पोळी भाजी नवा flat प्रेम प्रेम दागिने भांडणे माझी आई तुझी आई माझा बाप तुझा बाप सासर माहेर दिवाळी दसरा असे करून कंटाळा आलेला असतो. प्रेमात पडून घरी लग्न करून आणलेल्या माणसांचे सुरुवातीला रोज उत्साहाने उतरवलेले आतले कपडे आता दिवसा दोरीवर वाळताना पाहून सगळे आकर्षण चार दिवसात संपलेले असते. त्यालाच लग्न म्हणतात हे कळलेले असते. अश्या परिस्थितीत कुणी बोलत नाही हे कुटुंबाला घाबरून ,पण पहिल्या पावसात नव्या मनाला भेटणे केव्हाही चांगले. त्यामुळे आपले भले होते . कामाला उत्साह येतो. तात्पुरते आणि नवे माणूस पावसाळ्यात सोबत असण्यासारखे सुख नाही . त्यामुळे एक उपाय सांगतो तो कुणालाही करून पाहता येईल.
गेल्या पावसाळ्यात मी गाडीत माझा i pod , दोन पुस्तके , चालयचे बूट आणि काही कपडे टाकून घरातून निघालो आणि ओल्या झालेल्या दक्षिण मुंबईत मस्तपैकी एका हॉटेलमध्ये जाऊन दोन दिवस राहिलो. आपल्याच शहरात पाहुणा म्हणून आल्यासारखे. मला किती मजा आली हे मी सांगूच शकत नाही आता तर जणू चटक लागल्यासारखी वाटते आहे.
खोलीत सामान पसरून टाकले आणि सरळ पोहायला गेलो. हातात मार्टीनी घेऊन पूल मध्ये डुंबत बसलो . अनोळखी लोकांशी गप्पा मारल्या . मी मुंबईत अनेक वेळा मी इथे राहत नाही पुण्याहून आलोय असे सांगतो तसे सगळ्यांना सांगितले .थोड्यावेळाने माझाही माझ्यावर विश्वास बसू लागला. दम लागेस्तोवर पोहलो आणि बाहेर पडून कॉफी शॉप मध्ये जेवलो. आणि चालायचे बूट घालून सरळ पावसात फिरायला बाहेर पडलो. रविवारी दक्षिण मुंबई रिकामी असते. फार सुंदर दिसते. मोठ्या ब्रिटीशकालीन इमारतींना ग्लानी आलेली असते आणि मोठे रस्ते आपली वाट पाहत असतात. मी नरीमन point पासून गिरगाव चौपाटी पर्यंत समुद्राकाठाने रमत गमत चालत राहिलो. समुद्राच्या प्रचंड लाटा पावसाळ्यात मरीन लायीन्स च्या किनार्यावर येतात. त्या अंगावर घेत .
मग चालायचा कंटाळा आल्यावर taxi ला हात करून हॉटेलवर परत गेलो . गरम shower घेऊन लोळत tv वर सिनेमे पहिले . उठलो आणि स्पा मध्ये जाऊन थाई मसाज घेतला . आपण कुठे आहोत हे शांतपणे हळू विसरून गेलो. मी ओळखीच्या शहरात आहे हे विसरलो. आणि होतो तिथेच पाहुणा बनलो. घरच्या जबाबदारीतून सुट्टी घेतली. कुणाही ओळखीच्या माणसाला भेटणे टाळले . स्पा मधून बाहेर पडून ग्रीन टी पीत एक पुस्तक घेऊन तिथेच लोळत पडलो आणि झोपी गेलो. काही वेळाने स्पा बंद होताना मला कुणीतरी उठवायला आलं.
मी एरवी कधीही करत नाही त्या सगळ्या गोष्टी अश्यावेळी करतो. कारण मी नसतोच न माझ्या जगात. मग मी आखलेले नियम बदलून टाकतो. आपले नियमच आपल्या आड येतात हे अश्या वेळी कळते. उदाहरणार्थ त्या वेळी मी स्पा मधून जागा होवून , खोलीत जाऊन तयार झालो आणि न लाजता माझे ढेरपोटे शरीर घेऊन पब मध्ये गेलो आणि मोकळेपणाने घेरी येईपर्यंत नाचलो.
सुट्टीला बाहेर गेलं कि दिवस एकट्याने घालवावा रात्र नव्हे. आपल्याच शहरात विरघळून गेलं कि हे करणे शक्य होते त्यासाठी कुठेही बाहेर सुट्टीला जावे लागत नाही. उत्तम चांगल्या हॉटेल मध्ये जाऊन गुप्त होवून जायचे.
आपल्याच वातावरणात विरघळून गेले नाही आणि सतत दिसत राहिले तर आपल्याला गुदमरल्यासारखे होते. त्यासाठी मधेमध्ये आपल्या मनाच्या हितासाठी प्रत्येक स्त्री पुरुषाने मिस्टर इंडिया व्हायला लागते. नाहीतर आयुष्य फार रटाळ आणि तेच ते बनते.

सचिन कुंडलकर

अपेयपान २८

मराठीतले सुप्रसिद्ध संपादक , मौज प्रकाशनाचे प्रमुख श्री. पु .भागवत ह्यांच्यासमोर मी माझ्या पहिल्या कादंबरीचे , ‘कोबाल्ट ब्लू’ चे हस्तलिखित घेऊन बसलो होतो. ते त्यांनी एकदा बारकाईने वाचून संपवले होते . मला त्यांचे पत्र आले होते . माझ्याशी इतर आवश्यक चर्चा करून , कादंबरीविषयी बोलून श्री .पु. भागवत असे म्हणाले होते कि तुम्ही चित्रपट क्षेत्रात लेखक म्हणून आणि साहित्य क्षेत्रात चित्रपटदिग्दर्शक म्हणून मिरवत बसाल आणि असे करण्यात तुमचा फार वेळ वाया जाईल तर कृपया तसे होवू देवू नका. शिस्तीने लिहित राहा कारण तुमच्यामध्ये चांगल्या शक्यता आहेत. सिनेमे बनवण्यात आपला फार वेळ जात नाहीना ह्याकडे काळजीपूर्वक लक्ष दया.
मला ते काय म्हणतायत हे तेव्हा नीट कळले नव्हते . पण ते जे बोलत होते ते खरे होते . ज्याचा मला आज रोज आतून साक्षात्कार झाल्यासारखा होत रहातो. त्यावेळी मी दोन्हीही नव्हतो. मी लेखक नव्हतो कारण ‘कोबाल्ट ब्लू’ सोडून मी काही लिहिले नव्हते आणि मी चित्रपट दिग्दर्शक तर अजिबातच नव्हतो. त्या भेटीनंतर चार वर्षांनी मी माझा ‘restaurant’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित करणांर होतो . माझ्या मनात कोणतेही आराखडे किंवा वेळापत्रके नव्हती आयुष्य जास्त अनिश्चित सोपे आणि उघडेवागडे होते. त्याला कोणताही घट्ट आकार दिला गेला नव्हता. मी लिहिलेले काही प्रकाशित होईल हेच मला खरे वाटत नव्हते . मी अपोआप आणि माझ्यासाठी लिहीले होते. पण ते तिथे थांबणार नव्हते. त्या लिखाणाचा , त्या गोष्टीचा स्वतंत्र आपापला प्रवास विधिलिखित होता. श्रीपु त्यादिवशी जे म्हणाले ते मी आयुष्यात खरे करून दाखवले. ते म्हणत होते त्या चुका केल्याच . किती द्रष्टेपणाने आणि सोप्या साधेपणाने सांगत होते ते . पण ते काय सांगत आहेत हे समजून घेण्याची पात्रता तेव्हा माझ्यात नव्हती ह्याची मला खंत वाटते.
महाराष्ट्रात, केरळात आणि बंगाल मध्ये लेखक होणे एकाच वेळी फार सोपे आणि एकाच वेळी महाकठीण.कारण मोठी साहित्य परंपरा हे एक छोटे कारण आणि सांस्कृतिक आणि सर्जनशील उपद्व्याप करण्याची हौस सामान्य माणसांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असणे हे दुसरे कारण. काही घडले कि ओढला कागद पुढे , लिहून काढले आणि दिले मासिकाला पाठवून. झालो लेखक. लिहित्या माणसावर अतिशय मोठ्या लेखकांचे वजन आणि दडपण , त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला जवळजवळ सर्व साक्षर माणसांना कागदावर खरडले कि लिहून झाले असे वाटायचा धोका मोठा.
त्यामुळे एकाच वेळी ह्या तिन्ही राज्यांमध्ये खूप जास्त लेखक असतात आणि त्याचं वेळी खरे कसदार लेखक फार कमी असतात अशी परिस्थिती. जी महाराष्ट्रात अजुनी चालू आहे. इंग्रजी भाषेमध्ये लिखाण आणि साहित्य ह्यातली जी सीमारेषा मानतात ती मराठीमध्ये संपून गेली आहे . प्रकाशित होणे सोपे होवून बसले आहे .आणि सातत्य , संशोधन आणि परिश्रमपूर्वक सावकाश केल्या गेलेल्या लेखनाचा मराठीतला काळ जवळजवळ संपुष्टात आला आहे.

माझ्या संपूर्ण जाणिवेचे पोषण लहानपणी पुस्तकांनी केले . चित्रपटाचा मोठा पगडा मनावर तयार व्हायचा आधी . TV आणि मराठी रंगभूमी हि दोन्ही माध्यमे माझ्या वाट्याला आली नाहीत. कारण माझ्या घरात कुणालाही त्यांची आवड नव्हती. पुस्तकांची आवड असायला हवी हे वातावरण होते आणि जवळजवळ सगळ्यांना सिनेमाचे व्यसन होते. आणि त्यामुळे माझे मन अजूनही वाचणारे मन आहे . पाहणारे मन नाही . माझ्यापेक्षा जी लहान वयाची भारतीय पिढी आहे त्या पिढीचा ज्ञानाचा आणि अनुभवाचा मार्ग ‘पाहणे’ हा आहे .तसा माझा ‘वाचणे’ हा आहे. कारण मी एकोणीसशे नौवद च्या आधीच्या analog काळात जन्मलेला मुलगा आहे. digital क्रांती भारतात घडण्यापूर्वी आणि त्याचे परिणाम मध्यमवर्गाच्या रोजच्या आयुष्यात उमटण्यापूर्वी जन्मलेला. त्यामुळे माझ्या ज्ञानेंद्रियांना वाचणे जास्त सुलभ जाते. बघणे नाही. त्याच्या बरोबर उलट माझ्या कुटुंबातील माझ्याहून लहान भाचरे आहेत माझ्यासोबत काम करणारे लहान वयाचे हुशार तंत्रज्ञ आहेत त्यांना पाहायला आवडते . वाचायला नाही. कोणताही अनुभव , माहिती , भावनेचा अविष्कार त्यांना दृश्य स्वरुपात असला कि कळतो. मला साधे सोपे शब्द लागतात. मला वर्तमानपत्र वाचले तरी चालते. त्यांना छोट्या video च्या स्वरुपात बातम्या पाहायच्या असतात. मी जुना आहे. मला भाषा लागते. भाषेचे व्याकरण लागते. लिखित किंवा बोली शब्दातून उत्तर लागते. त्यांना नाही .मी कोणत्याही अनुभवाचा पटकन फोटो काढून ठेवत नाही . मी तो अनुभव स्मृतीमध्ये ठेवतो आणि जर महत्वाचा वाटला तर त्याविषयी काही दिवसांनी लिहितो.
विकसनशील देशांमध्ये आपण फार पटकन जातीय राजकारण ,अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाला वैयक्तीक पातळीवर बळी पडतो. आयुष्यातले पटकन सगळे घाबरून बदलून टाकतो. आपली आपली खास रचना ठेवत नाही . त्यामुळे आपल्यासारख्या देशातील लहान पिढीवर जाणिवेचे संस्कार करताना तांत्रिक व्यवस्था आणि जातीव्यवस्था फार ताकदवान ठरते. आपल्याला मुले कशी वाढवायची आहेत ह्याच्या निवडीची फारशी संधी आपल्याला मिळत नाही .आपल्याला साधे मातृभाषेत आपल्या मुलांना शिकवायची सोय राहिलेली नाही. मराठी शाळांची जी सध्या शहरांमध्ये भीषण अवस्था आहे त्यात आपल्या मुलांना त्या शाळांमध्ये घालणे हे त्या मुलांच्या आयुष्याचे कायमचे नुकसान करणे आहे. मराठी शाळेतल्या शिक्षकांच्या हाती आपली मुले देण्यापेक्षा ती मुले घरी शिकवलेली बरी असा आजचा काळ आहे.
त्यामुळे भारतीय पालकांनी आधी पुस्तके सोडून tv बघणारी पिढी पटकन तयार केली. ती त्यांना सोयीची होती. त्यानंतर इंटरनेट वापरणारी पिढी तयार केली . जी फारच सोयीची होती . जे सोपे आणि चारचौघांसारखे असते ते आपल्याला करता येते. आपली कुवत तेव्हढीच असते. सोयीपुरती. आपण मुले सुद्धा म्हातारपणाची सोय म्हणून जन्माला नाही का घालत ? शिवाय लोक काय म्हणतील ह्याची सर्वसामान्य भारतीय माणसाला खूप भीती असते . आपण शेजारयासारखे वागणारा भित्रा समाज आहोत. चांगली बेफिकिरी आणि आवश्यक उद्धटपणा आपल्याला घरांमध्ये शिकवला जात नाही. ह्या सगळ्याचा परिणाम पुस्तके , साहित्य , वाचनसंस्कृती , लेखकांना त्या समाजात मिळणारे स्थान , त्या समाजत असणारी किंवा नसणारी पुस्तकांची दुकाने ह्यावर पडत असतो. आपणच आपला देश आणि आयुष्य आपल्या प्रत्येक निर्णयामधून घडवत असतो.
मला वाचनाची गोडी घरातून प्रोत्साहन मिळून लागली त्याचप्रमाणे अतिशय उत्तम शालेय शिक्षकांनी ती अतिशय तळमळीने लावली.
असे म्हणतात कि ‘ये रे घना ये रे घना’ हि कविता आरती प्रभूंनी आपल्या कविता आता प्रकाशित होणार , लोक त्या वाचणार , त्या आपल्या उरणार नाहीत ह्या संकोचाने केली. “फुले माझी अळुमाळू वारा बघे चुरुगळू . नको नको म्हणताना गंध गेला रानावना”
मी लहान असताना मराठी भाषेत प्रकाशन संस्था आणि त्यांचे स्वतःचे हुशार आणि तीक्ष्ण जाणिवेचे संपादक ह्यांच्या दुपेडी जाणीवेतून साहित्य आकार घेत होते. स्वतःचे लिहिलेले इतक्या चटकन प्रकाशित करणे सोपे नव्हते. लेखक आमच्यासाठी महत्वाचा होता. मी मोठा होताना मराठीतील जे महत्वाचे लेखक समजले जातात ते मरून गेले होते किंवा वृद्ध झाले होते. महाराष्ट्र तेव्हाच जुना होवू लागला होता . तरीही महाराष्ट्र नावाची एक जाणीव साहित्यात आणि रंगभूमीवर जिवंत होती. आज ती प्रादेशिक जाणीवच संपली आहे.
सत्तर ते नौव्वाद्च्या दशकामध्ये साहित्याचा दबदबा होता. मराठी पुस्तकांची दुकाने ताजीतवानी असत. आज जे स्मशानात थडगी पाहायला गेल्यासारखे मराठी पुस्तकांच्या द्कानात वाटते तसे तेव्हा वाटत नसे. लिहिते लेखक होते आणि मुख्य म्हणजे वाचता तरुण समाज होता. पुढच्या काळात श्री पु भागवत ह्यांच्या नंतर हळूहळू संपादक हि व्यक्ती नगण्य पगारी आणि कमकुवत होत गेली . नुसतेच खंडीभर प्रकाशक आणि मोठमोठी पुस्तक प्रदर्शने एव्हडेच आपल्या भाषेत साहित्याचे स्वरूप उरले.
आता गेल्या तीन चार वर्षात मग नव्या कवींच्या पिढीने प्रकाशन आणि संपादक ह्या दोन्ही संस्था झुगारून लावल्या आणि आक्रमक होवून इंटरनेट वर कविता जन्माला घालून पसरवली. कुणीही आपल्याला समजून घेण्याची वाट पाहत ते लोक बसले नाहीत. कारण जळमटे लागलेल्या जुन्या प्रकाशन संस्थांना आपली जाणीव कळणार नाही हे त्यांना माहित होते. छापलेल्या शब्दाचा दरारा संपुष्टात येऊ लागला आणि मराठी वृत्तपत्रांच्या संपादकाला दबकून असण्याचे दिवस संपले. शेजारचा किंवा वरच्या मजल्यावरचा माणूसही मराठी वृत्तपत्राचा संपादक बनू लागला.

सचिन कुंडलकर

अपेयपान २९
आपल्या आईवडिलांना असलेले अनेक भयगंड, त्यांच्या लहानपणीच्या अनेक न्यूनतेच्या भावना आणि त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने आपण खूप लहानपणीपासूनच पूर्ण करत असतो. आपण आपल्या आईवडिलांची एका प्रकारे वेबसाईट असतो. जगाला दाखवून देण्यासाठी त्यांना जे जे करायचे असते ते सगळे करण्यासाठी ते आपल्याला घडवत असतात. आपल्या आईवडिलांनी विशिष्ट निर्णय घेऊन आपल्याला त्याप्रमाणे मोठे केलेले असते. आपल्याला हे करता आले नाही किंवा आपल्याला हे मिळाले नाही ते माझा मुलगा किंवा मुलगी करेल . त्यामुळे लहानपणी आपण काय करणार असतो ह्यामध्ये फारसे सरप्राईज उरलेले नसते. आपल्या आई वडिलांनी त्यांच्या समजुतीनुसार आपल्या जगण्याचा मार्ग आणि आपल्या आवडी निवडी फार लहानपणी घडवायला घेतलेल्या असतात. कुटुंबामध्ये प्रत्येक लहान मूल हे आधीच्या पिढीने सोसलेल्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी तयार केलं जात असतं. अगदी पांढरपेशा शहरी सुशिक्षित घरातही हे नेहमी घडते , टाळता येत नाही. ज्या अन्यायाचा बदला घ्यायचा ते अन्याय बदलतात. पण हे चक्र न थांबता चालूच असते. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला लहानपणी नीट इंग्रजी बोलता येत नसेल , त्याची लाज वाटत असेल तर तो हमखास हा न्यूनगंड भरून काढण्यासाठी आपल्या मुलांना ती जन्मण्याआधीच convent मध्ये घालतो तसे आहे हे.
माझ्या आजोबांनी माझ्या आईने लिहिलेले लिखाणाचे कागद विहिरीत फाडून फेकून दिले , पुन्हा लिहिलेस तर याद राख असे तिला बजावले आणि असले काही करून वेळ वाया घालवण्यापेक्षा पोटापाण्याची नोकरी करायला फार लहान वयात घराबाहेर ढकलले म्हणून मी आज लिहितो. माझ्या वडिलांना संगीताची अतिशय आवड असूनही गरीब परिस्थितीमुळे आणि घरी झालेल्या दुर्लक्षामुळे स्वत चे शिक्षण आवडी निवडी मनासारख्या जोपासता आल्या नाहीत म्हणून माझा भाऊ आज शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात इतकी मोठी कामगिरी करतो आहे. उत्तम नाव कमावतो आहे. हे सगळे आमच्या आईवडिलांच्या जगविरुद्ध तयार झालेल्या त्वेषामुळे घडले. त्या त्वेषाला त्यांनी चांगले स्वरूप दिले. एक प्रकारे अनुरागच्या वासेपूर चित्रपटात घेतला जातो तसा मुलांच्याकरवी घेतलेला जगाचा बदलाच आहे हा. पण त्याचे स्वरूप उपयुक्त आणि आनंदी ठरले.
मी भरपूर लिहावाचायला लागलो ते घरातील वातावरणामुळे नाही . आमच्या घरात व पु काळे आणि पु लं देशपांडे सोडून काहीही वाचले जात नसे. पुलं आमच्या घरी आले असते तर रागावून गेले असते. फक्त माझी पुस्तके काय वाचता रे ठोम्ब्यानो ? जरा इतर काही वाचन करा , असे म्हणाले असते. तसे ते सतत आमच्या घरात असल्यासारखेच होते कारण लहानपणी त्यांच्या कथाकथनाच्या कॅसेट घरात सतत लागलेल्या असत. त्यांचा आवाज घरात येतच राहायचा . घरात पुस्तकसंग्रह मर्यादित असला तरी हवी ती पुस्तके हवी तेव्हा आणि हवी तेव्हडी विकत आणायला आईवडिलांची ना नसायची. पुस्तके आणायची आहेत हे म्हटल्यावर ते महिनाअखेर असला तरी पैसे कसेबसे जमवून द्यायचे .पण काय आणायचे आणि काय वाचायचे ह्याचे निर्णय आम्हाला करायला लागत. त्यामुळे बरेवाईट पुष्कळच वाचून वाचनाची स्वतः ची निवड करता आली आणि ती काळ आणि वयाप्रमाणे फार वेगाने बदलत गेली. मी मोठा होताना काळ माझ्यापेक्षा वेगाने बदलत होता. हि ऐंशी आणि नौवदच्या दशकाची कहाणी आहे.
पुण्यात तेव्हा नुसते ‘असून’ पुरायचे नाही. दाखवायला लागायचे. अनिल अवचट हे प्रसिद्ध लेखक हि आमची नव्याने आयुष्याकडे बघायची खिडकी होती . कारण ते सतत सर्व कार्यक्रमाना दिसत. चांगले आणि सोप्या भाषेत थेट लिहित. आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाशी गप्पापण मारत. तेव्हा ते लाकूड कोरण्याचा छंद जोपासत होते. ते जिथे तिथे हातात एक छोटे लाकूड घेऊन कोरत उभे असलेले दिसायचे. नाटकाला आले तरी पहिल्या रांगेत बसून लाकूड कोरत बसायचे. पुण्यात सगळे दाखवावे लागे. आपण जी पुस्तके वाचतो आहोत ती नावे दिसतील अशी हातात घेऊन फिरायची फार आवड पुणेकरांना होती. कुठेही जाताना हातात अशी दोन पुस्तके बाळगली कि मग काय विचारायचं नाही. अश्या गावात राहून वाचायची आवड कुणाला नाही लागणार ? गौरी देशपांडे किंवा तत्सम परपुरुषी धाडशी पुस्तके हातात घेऊन फिरले कि लोक आपल्याला गांभीर्याने घेत. मी ब्रिटीश लायब्ररीची मेंबरशीप घेतली तेव्हा मी लायब्ररीतून डेक्कन वरून चार पाच महत्वाची पुस्तके अशी दाखवत चालत चालत फर्ग्युसन रस्त्यावरून घरी येत असे. आणि वाचत त्यातले एखादेच असे. आमच्या गावात अनेक महिलांना गौरी देशपांडे व्हायचे होते आणि ज्यांची वये वाढूनही लग्न झाली नसत त्यांना पु शी रेग्यांची सावित्री व्हायचे असे. मोर मिळाला नाही तर आपणच मोर व्हायचे . असे कसे होणार ? एक मोर मिळाला नाही तर दुसरा मोर शोधायला नको का ? सगळं आपणच कसे होणार ? पण स्रीवादाची लाट शहरात वेगात पसरत असल्याने असले भयंकर प्रश्न विचारून बायकांचा रोष ओढवून घायची टाप पुण्यात कुणाच्यातही नव्हती. ‘बॉयकटाचे कट’ अशी एखादी मजेशीर कादंबरी माझे लाडके भा. रा. भागवत लिहितील अशी मला अपेक्षा होती . पण त्यांनी ती लिहिली नाही. मलाच ती कधीतरी पुढे लिहावी लागणार हे मला लहानपणीच लक्षात आले.
मी तर बरीच वर्षे चांदोबा , चंपक , फास्टर फेणे आणि इंद्रजाल कॉमिक्स सोडून काही वाचतच नव्हतो. फास्टर फेणे तर मला अचानक लकडी पुलावर भेटेल कि काय असे वाटायचे इतका मी त्याच्या जगात गुंगून जायचो . पाचवी सहावीत गेल्यापासून मला गौतम राजाध्यक्ष ह्यांनी संपादित केलेले ‘चंदेरी’ हे सिनेमाचे मासिक वाचायची सवय लागली. माझ्या बहिणींमुळे मला लागलेले हे व्यसन फार काळ टिकले. मला ते मासिक सोडून दुसरे काही वाचायलाच नको असे. मी आणि माझ्या बहिणी त्यातले मोठे मोठे नटांचे फोटो कापून भिंती भरून चिकटवत असू. डिम्पल कपाडिया तेव्हा कपडे कसे घालावेत? परफ्युम कसे वापरावेत ? ह्या विषयावर एक सदर लिहित असे ते सगळे मी नीट वहीत नोद्वून ठेवत असे. मला मुंजीत ‘श्यामची आई’ हे पुस्तक मिळाले होते. त्यातली लोचट आई मलाच काय पण माझ्या आईलासुद्धा आवडली नाही. सनी देओलचा ‘बेताब’ आला तेव्हा माझी एक बहिण ताबडतोब त्याच्या प्रेमात पडली आणि तीने सनीला पत्र लिहीले. सनीने तिला thank you असे उत्तर पाठवले. त्याचे फोटो उशाखाली घेऊन ती झोपायची. हा माझ्या आयुष्यात घडलेला पहिला ताकदवान पत्र व्यवहार. मराठी साहित्यातील मोठ्या आणि महत्वाच्या गोष्टींची ओळख होण्याआधी माझे आयुष्य असे चालले होते. छचोर आणि सुंदर.
शाळेत मराठीच्या तासाला एकदा आमच्या श्रीवा कुलकर्णी सरांनी सुनीता देशपांडे आणि g a कुलकर्णी ह्यांच्यातील पत्रव्यवहाराचा उल्लेख केला आणि g a कुलकर्णी ह्यांचे काही लिखाण वाचून दाखवले. त्या दिवशी कोणत्यातरी अनामिक आकर्षणाने मी शाळेच्या ग्रंथालयातून जीएंची दोन पुस्तके घेऊन गेलो. माझे वाचन आणि पुस्तक ह्या गोष्टीशी असणारा माझा romance त्या दिवशी सुरु झाला असे मी समजतो. कारण मी घरी येऊन tv न पाहता गुपुचूप ‘कैरी’ हि कथा वाचली आणि खूप अस्वस्थ होवून रडलो. मला आई वडील आहेत आणि मी अनाथ नाही ह्याचे मला त्या दिवशी खूप बरे वाटले. मी ते पुस्तक परत करायला गेलो आणि शाळेत ग्रंथपालांना विचारले आपल्याकडे अजून कोणती चांगली मराठी पुस्तके आहेत ? ते मोकळे हसले आणि म्हणाले हे सगळं तुमच्यासाठीच उभं केलं आहे बाळांनो. आत जा आणि हवी ती दोन पुस्तके निवडून आण. वि दा सावकर , ग दि माडगुळकर , शांता शेळके , आचार्य अत्रे , बालकवी , भा रा तांबे , लक्ष्मीबाई टिळक , दुर्गा भागवत , इंदिरा संत . काळाचा उभा आडवा सुरेख पसारा होता तिथे . माझी वाट पाहत होता. माझ्या बैठ्या आयुष्याची निवांत लोळत सुट्टी घालवण्याची आखणी करत होता. मी काय निवडू आणि कसे निवडू हेच मला कळेना.
खूप जास्त आणि कळले नाही तरी वाचयची सवय मला शाळेमुळे आणि शाळेतल्या शिक्षकांमुळे लागली. आणि सुनिता देशपांडे ह्यांच्या लिखाणामुळे माझ्या वाचनाला आणि लिखाणाला दिशा मिळाली. त्यामुळे इतर कुणाहीपेक्षा सुनिता देशपांडे ह्यांचे माझ्यावर खूप जास्त अप्रत्यक्ष संस्कार आहेत.
सचिन कुंडलकर

अपेयपान ३०
सुनीता देशपांडे आणि G A कुलकर्णी ह्यांच्यातील पत्रव्यवहार माझ्यासाठी मराठी आणि इंग्रजी साहित्याकडे आकर्षित होण्यासाठी पुरेसे प्रबळ असे कारण ठरला. मला सुनीता देशपांडे ह्यांच्याविषयी अतीव आदर आणि त्यांच्या बुद्धीचे आकर्षण निर्माण झाले. त्या दोघांनी एकेमकांना लिहिलेल्या पत्रांमध्ये इतक्या विविध प्रकारच्या लेखकांचा आणि पुस्तकांचा उल्लेख आहे आणि तो इतक्या सहज पणे आनंदात केला आहे कि वाचताना आपल्याला दडपण न येता पुस्तके वाचण्याच्या सवयीविषयी खूप लोभस आकर्षण तयार होते
एकदा वाचायची सवय लागली तेव्हापासून अंतरीच्या एकटेपणावर फुंकर घालण्याचे माध्यम गवसले. कारण मोठा होत होतो तसा जगापासून तुटल्यासारखा होत होतो . आत मनात शरीरात काय चालू आहे हे सांगण्यासारखे , समजून घेणारे कोणी आजूबाजूला नव्हते. खूप काही आतल्याआत घडत होते पण ते मूकपणाने सोसावे किंवा चाखावे लागत होते. आपल्या सुखात आणि दुखात आपल्या सभोवतालीचे कुणीही आता ह्यापुढे कधीच सहभागी होवू शकणार नाही हि जाणीव शारीरिक पौगंडावस्थेत वाढत होती . त्या काळात मला पुस्तकांनी आणि वाचनाच्या सवयीने खूप मोठी सोबत केली. माझे मराठी वाचन वाढू लागले.
मी अश्या सांस्कृतिक वातावरणात होतो जिथे तुम्ही काहीही केलेत तरी तुमच्यापेक्षा खूप जास्त केलेली माणसे सभोवताली असतात आणि ती तुम्हाला सारख्या सूचना देत बसतात किंवा तुच्छ लेखत बसतात. अशी माणसे पुण्याच्या पाण्यात मोप पिकत. त्यामुळे आपण पु शी रेगे वाचून काढले कि ते म्हणत अरे तू अजून दुर्गा भागवतांचे लिखाण वाचत नाहीस ? कि आपण ते वाचायचे. ते वाचून झाले कि ते म्हणत काय हे ? इरावती कर्वे तुला माहित नाहीत ? अरेरे . कि आपण लगेच धावत जाऊन इरावती बाईंची पुस्तके आणायची . सतत तुलनेचे आणि प्रदर्शनाचे वातावरण सभोवताली असल्याने काय मजा विचारता ? आमच्या गावात तुमची सोडमुंज होवूनच तुम्हाला बाहेर काढतात. मराठी साहित्याचा जो आखीव आणि ठराविक परीघ आहे , म्हणजे ज्या लेखकांच्या लिखाणाने मौजेचे राजहंस चे , पोप्युलरचे , majestic चे stall भरलेले असतात ते लेखक वाचण्यातच माझी अक्खी विशी गेली. कारण श्री पुं नी , मोठ्या आणि धाकट्या माजगावकरांनी , मोठे भटकळ ह्यांनी , कोठावळे बंधूंनी कामच इतके मोठे आणि चांगले करून ठेवलेले होते कि सुबक सकस आणि उत्तम साहित्यावर माझे पोषण होतच राहिले. दिवाळी अंकांचे अजब आणि प्रचंड विश्व गवसले. त्यात सापडणारे वेगळे नवे ताजे प्रवाह आकर्षित करू लागले. अरुण जाखडे ह्यांच्यासारखे अनेक नवे संपादक सातत्याने काहीतरी नवीन शोधात असतात ते समजून घेण्याची इच्छा तयार झाली . त्याकाळात मी नुसता वाचत बसलेला होतो. पुण्यात वाचनाची जणू स्पर्धा चालू असल्यासारखा. कधी काही खेळलो नाही , कुठे मारामाऱ्या केल्या नाहीत. काही फार नव्याने शिकलो नाही.
त्या काळात मला जे आवडत नाही ते मोकळेपणाने सांगायचे धाडस माझ्यात नव्हते. मला इतिहासाची आणि महापुरुषांची अजिबात आवड नाही. मला चळवळी करणाऱ्या लोकांचे अनुभव वाचण्यात काडीचाही रस नाही , मला कुसुमाग्रज ह्यांचे लिखाण कधीच आवडले नाही ते माझ्याशी बोलत नाहीत, मला भावगीते ऐकली कि अंगावर शिसारी येते असे काही मी तेव्हा बोलत नसे. कारण मराठी साहित्य हि फार गांभीर्याने आणि सोवळेपणाने घ्यायची गोष्ट आहे असे मला वाटायचे. आणि आपण ह्या सगळ्यांपुढे फक्त एक सामान्य वाचक आहोत. आपली मते चुकीचीच असणार असेही मला वाटायचे. त्या वेळचा नम्रपणा आणि जिभेचा संयम आठवून मला तर हल्ली हसूच येते.
प्रवास करायला लागलो तेव्हा लक्षात आले कि आपल्या भाषेतील साहित्य आता आपली भूक भागवू शकत नाही . कारण आपली भाषा ज्ञानभाषा नाही. आपली भाषा आठवणीप्रधान , सामाजिक किंवा भावनिक साहित्य लिहिण्याची भाषा उरली आहे. आपल्या भाषेला फक्त अभिमान आणि आठवण उरली आहे . इतर भारतीय भाषांमधील इंग्रजीमध्ये आलेले साहित्य आपण वाचायला हवे. नाहीतर आपणही मराठीतील वयोवृद्ध माणसांप्रमाणे साठी सत्तरीचे साहित्य घोळवत बसू.
त्यावेळी सातत्याने लिहिती माणसे मरून गेल्याने आणि जुन्या लेखकांचा धाक संपल्याने साहित्य संमेलने राजकारणी माणसांनी काबीज केली. आणि जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व साक्षर माणसे स्वतःला लेखक म्हणवून घेतील अशी परिस्थिती येऊ लागली आणि मराठी साहित्य हि THE LAND OF EXCESS PRODUCTION बनली. सगळे सोमेगोमे , सगळ्या साळकाया माळकाया उठून लिहू लागल्या आणि कुत्र्याच्या छत्रीसारखी रानावनात प्रकाशन करणारी माणसे उगवली. सामाजिकतेचा गोंगाट खूप वाढला आणि खोटी दिखावू समानता बोकाळली. त्या नव्या लोकांनी दुसरी बायको आली कि जशी पहिली जे करायची ते करते त्या रिवाजाप्रमाणे पुस्तक प्रकाशने , लेखकांच्या मुलाखती , सत्कार , गल्ली बोळातली साहित्य संमेलने ह्यांचा धडाका लावला. त्या सुमारास मी मराठी वाचनाची आवड आटोपती घेतली.
मी जे आजचे शहरी आयुष्य जगतो , माझे म्हणणे , माझी सुक्दुक्खे आता मला मराठी सिनेमात , मराठी नाटकात, मराठी पुस्तकात जाणवणार नाहीत हे माझ्या लक्षात आले. मी शेतकरी नाही, मी दलित नाही , मी बाजीप्रभू किंवा बाजीराव नाही त्यामुळे मराठी पुस्तके किंवा सिनेमे माझे उरलेले नाहीत. मी साधा पांढरपेशा घरातून आलेला , बुद्धिमान आणि संवेदनशील शहरी माणूस आहे. मला ह्या सगळ्या वातावरणाचा कंटाळा येऊ लागला कारण वाचा वाचा असे जे ओरडतात ते सगळे चांगले माझे वाचून झाले होते . लक्ष्या आणि अशोक सराफ ह्यांच्या सिनेमाने मला ओकारी येयील इतके त्या काळात घाण वाटत असे. मला बाबासाहेब पुरंदरे वगैरे माणसांचे कधीच आकर्षण वाटले नाही. मग आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत ? आपल्या पिढीतल्या महाराष्ट्रातील शहरात जन्मलेल्या माणसांना अमेरिकेत जायचे नसेल आणि इथे राहायचे असेल तर आपण काय वाचूया ? काय पाहूया ? जे आपल्याशी बोलेल . आपल्याला जवळचे वाटेल ? कारण आयुष्याप्रमाणे साहित्य सुद्धा प्रवाही हवे. लहानपणी जे महत्वाचे वाटते त्याचा मोठेपणी कंटाळा किंवा राग आला नाही तर आपण मोठे झालोच नाही.
आपण असे सहजपणे जरी बोललो घरीदारी तरी लोक आपल्याला वेड्यात काढतील असे मला वाटायचे.
विजय तेंडुलकरांनी माझी ह्याविषयीची अपराधीपणाची भावना घालवली. आमची ओळख झाली आणि स्नेह तयार झाला तेव्हा कधीतरी एकदा बोलताना त्यांना मी हे म्हणालो कि मला आता तेच ते मराठी लेखक वाचण्याचा कंटाळा येतो. मिलिंद बोकील सोडून इतर कोणाचेही नवीन लिखाण ताजे आणि आकर्षक वाटत नाही . पुस्तकांच्या दुकानात जावेसे वाटत नाही. जुन्या बाजाराच्या बजबजपुरीत गेल्यासारखे मराठी पुस्तकांचे झाले आहे. मला हे वातावरण समजून घेवू शकत नाही. मी जसा आहे तसे काहीही ह्या मराठी साहित्यात आता मला सापडत नाही . तेव्हा ते  हसले आणि म्हणाले कि उत्तमच वाटते आहे कि मग ! वाचन आणि लिखाण महत्वाचे. भाषा सर्वात कमी महत्वाची. भाषा हे माध्यम आहे . साध्य नाही . मराठी भाषा अजिबातच महत्वाची नाही. आपल्या आयुष्याचा परीघ उमटवणारे, आपल्याला आतून ओले करणारे साहित्य ज्या ठिकाणी असेल तिथे ते जाऊन वाच. सोपे आहे.
सचिन कुंडलकर

image

 

अपेयपान ‘लोकमत’ मधील लेखमाला . भाग २३ ते २६

                               अपेयपान २३

चांगला स्वयंपाक करणारी माणसे खूपच मोजकी असतात. इतर काही न सुचून आपण प्रेम व्यक्त करण्यासाठी घरच्या एखाद्या बाईचे स्वयंपाकासाठी कौतुक करतो ते केवळ सोय म्हणून. घरातल्या बायकांचे कौतुक करण्याची दुसरी सोपी पद्धत आपल्याला माहित नसते म्हणून आपण पटकन फार विचार न करता त्यांच्या स्वयपाकाचे कोडकौतुक करून मोकळे होतो. शिवाय आपल्याला एखादी चव सवयीची झाली असते हासुद्धा त्या कौतुकामागचा एक भाग असतो. आपण नवे काहीतरी चाखून पाहिलेलेच नसते मग घरचे आणि सवयीचे जे काही असेल ते आवडत राहते हा सुद्धा अनेक माणसांच्या बाबतीत घडणारा प्रकार असतो. खरं तर बहुतांशी घरातील गृहिणी ह्या अतिशय सामान्य आणि सरधोपट स्वयपाक करतात कारण भारतातील कुटुंबांमध्ये त्यांच्यावर स्वयपाक करण्याची सक्ती तयार होते. त्यात आवडनिवड नसते. ज्याला आपण हाताला चव म्हणतो ती फार कमी माणसांच्याच हाताला असते आणि तसे रुचकर खाणे शोधून त्याचा आस्वाद घ्यायला तुम्हाला खाण्यापिण्याची आवड असावी लागते. हल्ली ती फार कमी लोकांना असते. ह्याचे कारण Diet करण्याचे चुकीचे उगवलेले fad. त्याने पाककलेचे आणि खाद्यसंकृतीचे फार नुकसान केले आहे आणि अतिशय वेगवान जीवनशैली ,ज्यामध्ये रोजचे जेवण कसे असावे ह्याचा आपण आनंदाने आणि चवीने विचार न करता जे काही बनेल किंवा जे काही दिसेल ते उचलून तोंडात कोंबून पोट भरून पळत असतो.

मी अनेक वयाने ज्येष्ठ बायकांशी गप्पा मारताना त्या मला नेहमी म्हणतात कि घरच्यांना माझे , माझ्या बुद्धीचे मोल कधी कळलेच नाही. नुसते स्वयपाकात कौतुक करून घरच्यांनी मला त्या कौतुकात मारून टाकली. पण माझ्या हौशी वेगळ्याच होत्या. केवळ मी आई किंवा बायको आहे म्हणून माझे कौतुक स्वयपाकात करणे ठरून गेले आहे. पण मला तसे नको होते.

माझी आई हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तिला स्वयपाकाचा बाऊ केलेला खपत नाही. तिच्या बुद्धीला आणि हातापायांना खूप इतर कामे तिने लाऊन घेतली आहेत. त्यामुळे नाजूकसाजूक चविष्ट मोजका स्वयपाक करण्यापेक्षा तीचा भर हा पटापट घाऊक स्वयपाक करण्यावर असतो. पन्नास लोकांचा स्वयपाक ती आरामात तासाभरात करून मोकळी होते आणि तिच्या कामांना निघून जाते. त्याविषयी कौतुकाने बोलत बसलेले तीला आवडत नाही .

हि झाली एक बाजू. दुसरी बाजू आहे ती अतिशय बिनडोक आणि सारासारविचारशून्य स्त्रीवादी बायकांची. ह्या बायकांनी अविचाराने भारतीय स्त्रीला गोंधळलेले आत्मभान देऊन हाती जे स्वत्व होते ते गमवून बसवण्याची वेळ आणली आहे. स्वयपाकाचा उद्धार करून घरदार सोडून उंडारण्यात कसे आयुष्याचे समाधान आहे ह्याचा मूर्ख प्रसार करून ह्या अर्धशहाण्या स्त्रियांनी स्वयपाक , घरकाम ह्या सगळ्याबद्दल जो अनादर पूर्वी पसरवला होता तो खूप हास्यास्पद होता. नशिबाने सध्या स्त्रीवादी बायका नामशेष होत आहेत किंवा त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेण्याचा एकोणीसशे ऐंशीच्या दशकाचा काळ आता संपला आहे असे दिसते. परिषदा घेऊन आरडओरडा करत फिरले कि समाज सुखी होत नाहीच आणि सुधारत तर त्याहून नाही. समाज आनंदी होतो ते आवडीचे काम केल्याने आणि करू दिल्याने त्यामुळे तात्पर्य हे कि ज्याला जे आवडेल ते त्याने मोकळे पणाने करावे. आवडत असेल तर स्वयपाक करावा किंवा करू नये. दोन्ही गोष्टीत विशेष काहि नाही .पण खाण्यात मात्र खूप मज्जा आहे. त्यामुळे मस्त चांगलेचुंगले निवडून हौशीने आणि चवीने खात आयुष्य काढावे. मग ते खाणे स्त्रीने केलेले असो कि पुरुषाने. घरचे असो कि शेजारचे.

साधे सोपे रुचकर जेवण करून घर निगुतीने चालवणाऱ्या बाईला आपण आदर द्यायला शिकले पाहिजे आणि चहासुद्धा न करता येणाऱ्या कुणा मुलीला सुद्धा समजून घेतले पाहिजे. ज्याने त्याने आपापल्या आवडीने वागले कि सोपे होते आणि आपण घरात जेवायचे आहे कि बाहेर हे ठरवता येते.

ज्यांना साधी आमटी चांगली बनवता येत नाही अश्या मुलींवर स्वयपाकाची सक्ती करून घरात रटाळ जेवण्यापेक्षा बाहेर जेवलेले बरे. शरीराच्या सगळ्या भुकांच्या बाबतीत खरे तर हाच नियम आहे.आपण उगाच स्वतःची स्वयंपाकघरे फार गांभीर्याने घेतो

माझा मित्र अभिजित देशपांडे अतिशय उत्तम स्वयंपाकी आहे. आता व्यवसायाने तो फिल्म एडिटर झाला असला तरी त्याने आपल्या हाताचे स्वयापाकाचे वळण आणि चव अजिबातच जाऊ दिलेली नाही. आम्ही दोघेजण बसून फिल्म एडीट करताना सगळ्यात आधी फार आवडीने रोजचा ब्रेकफास्ट प्लान करतो. त्यामुळे आमचा कामाचा पुढचा दिवस फार चांगला जातो. एव्हढेच नाही तर महिन्यातून एकदा दोनदा वेळ काढून साग्रसंगीत स्वयंपाक करतो. जवळजवळ दहा बारा वर्षे आमचा हा उपक्रम चालू आहे . आम्हाला हे करताना सिनेमाचे खूप काम आहे म्हणून स्वयंपाकाचे दडपण येत नाही . आम्ही स्वयपाकाच्या तयारीचा बाऊ करीत नाही आणि बनवलेल्या जेवणाचे फोटो फेसबुकवर टाकत नाही. आम्ही दोघे जे असेल ते सगळे खातो. सगळे प्राणी सगळ्या भाज्या ,सगळ्या प्रकारचे ,सर्व राज्यातले सर्व देशातले स्वयंपाक आम्हाला आवडतात. एकदा मला खूप कमी वेळात एका छोट्या नाटकाचा ड्राफ्ट बनवून द्यायचा होता. माझे मुंबईत फक्त एका खोलीचे घर होते . मी टेबलापाशी लिहित बसलो आणि मला काही कळायच्या आत अभिजितने सुंदर मासे बनवायला घेतले. त्या स्वयपाकाच्या वासानेच माझे मस्त लिखाण पूर्ण झाले.

मधला एक मोठा काळ असं होता जेव्हा मला tv च्या शोज वर पाहून स्वयपाक करण्याची चटक लागली होती . पण त्यात मोठा दोष हा कि स्वयपाकाची तयारी आणि नंतरची आवराआवर त्यात कधी दाखवत नाहीत. सगळे कापून चिरून ठेवलेले आणि आपण मेक अप करून उगाच ढवळल्या सारखे करायचे. त्यात मजा येईना. स्वयपाक हा सकाळच्या साखरझोपेत सुरू होतो. आज काय करायचेय ह्याचा विचार करत लोळत पडावे लागते. मग घरात जे नाही ते बाजारहाट करून आणावे लागते. बाजारहाट करण्यासारखे दुसरे सुख नाही. मंडयीत जावून भाज्या विकत घेण्यासारखे दुसरे सुख नसते. स्वयपाक ह्या सगळ्यातून सुरु होतो. शेवटी ओट्यावर तो फक्त आकार घेतो.जेवायला साधी चार पाच माणसे येणार असली तरी सकाळपासून जी मनात खेळगाडी सुरु होते त्याला स्वयपाकाचा आनंद घेणे म्हणतात.

शाकाहार कि मांसाहार असले फालतू विधिनिषेध मी लहानपणी प्रवासाला बाहेर पडलो तेव्हाच गळून पडले. मुकाटपणे समोर येईल ते खायची सवय लागली. तुमच्या घरी तुमचे सतत लाड करणाऱ्या आणि चोवीस तास डोक्यावर पदर घेऊन स्वयपाक घरात राबणाऱ्या बायकांचा ताफा असला कि तुमचे असे फालतू लाड होवू शकतात. माझ्या आजूबाजूला मी इतक्या कामसू आणि घराबाहेर पडून कामे करणाऱ्या स्त्रिया पहिल्या आहेत कि असले पाणचट शाकाहारी लाड मी स्वतःचे केले नाहीत. जिथे जाऊ तिथे लोक जे खातात ते चाखून पाहणे.

लहानपणी मी मुंज करताना आईला बजावले होते कि अंडी बंद करणार नाही. चिकन सुद्धा नाही . हे मान्य असेल तर हवे ते संस्कार मी स्वतः वर करून घेईन .त्या दिवसापुरते. एकट्या राहणाऱ्या माणसाला सतत ह्या न त्या प्रकारे जगाशी जुळवून घ्यावे लागते. आणि खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी त्यातून तयार होत असतात. पूर्वजांनी सांगून ठेवलेले मी कधीच काही ऐकत नाही . मग मी काय खावे आणि प्यावे हे कुणी सांगायचा प्रश्न कधीच उद्भवला नाही.

मला सतत आपण जगात जे जे उत्तम आहे ते करून आणि चाखून बघण्याची इतकी प्रबळ हौस लहानपणीपासून होती कि इतर लोक जे खातात वाचतात कपडे घालतात बघतात ऐकतात ते सगळे आपण करून पाहायला हवे. माझ्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी ह्याच मध्यमवर्गीय मानसिकतेतून आणि सतत दुसऱ्यासारखे जगू पाहण्याच्या न्यूननगंडामधून तयार झाल्या. तुम्ही खूप श्रीमंत किंवा खूप गरीब कुटुंबात जन्मलात कि तुमचे सगळे खूप लहानपणीच ठरायला मदत होते. मध्यमवर्गीय घरात वाढलेली मुले सतत इकडे जाऊ कि तिकडे जाऊ ह्या दोलायमान अवस्थेत असतात. त्या दोलायमान अवस्थेचा फार मोठा फायदा मला आयुष्यात अनेक ठिकाणी झाला. त्यामुळे परदेशी शिकायला गेल्यावर पहिल्या दिवशी समोर शिजवलेला लुसलुशीत ससा आला तो मी शांतपणे खाल्ला.

IMG_1766

अपेयपान २४

मी ह्या शहरामध्ये राहायला आलो तेव्हा ह्या नव्या शहरातील प्रत्येक नवी गोष्ट नि जागा अनुभवयाला आणि प्यायला आसुसलेला होतो. लोकल ट्रेन च्या डब्यातून प्रवास करताना मी हिरीरीने खिडकीची जागा पटकावून बाहेरची दृश्ये पाहत बसायचो . Taxi किंवा कुणाच्या कारमधून प्रवास केलाच कधी तर शेजारी कोण काय बोलतंय ह्याकडे माझे लक्ष्य नसायचे इतका मी ह्या नव्या शहराच्या प्रेमात होतो.

लहानपणी मी पुण्याहून येणार असे ठरले कि माझी काकू तिची फियाट गाडी काढून मला VT स्टेशनवर न्यायला येत असे . ती स्वतः उत्तम ड्रायवर होती. मला काकूचे ते रूप फार म्हणजे फार आवडते आणि काही केल्या VT स्टेशन पहिले कि मला सर्वप्रथम तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती. फक्त मोठ्या काकांकडे होती. पण काकू कधीही गाडीला आमची गाडी म्हणत नसे .ती आपली गाडी असे म्हणायची .त्यामुळे मला काही काळ आपल्याकडेही गाडी आहे असे ह्या शहरात वाटायचे आणि खूप मस्त गुदगुल्या व्हायच्या. काकू तीच्या नीट नेसलेल्या सुंदर पाचवारी साडीचा पदर डोक्यावरून ओढून घ्यायची आणि VT स्टेशनबाहेर सुसाट गाडी हाणायची. मी एखाद्या सुपरवूमन कडे पाहावे तसे तिच्याकडे पाहून घ्यायचो आणि कुलाब्यातील आमच्या घराच्या वाटेवर दिसणारे ब्रिटीशकालीन जुन्या आर्किटेक्चर मध्ये घडलेले हे अद्भूत भव्य आणि ताकदवान शहर पाहत बसायचो. माझे काका तेव्हा आधी कुलाबा पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर आणि मग दक्षिण मुंबईचे सहाय्यक पोलीस कमिशनर होते. त्यामुळे रस्त्यावरचे सगळे ट्राफिक पोलीस काकूची गाडी ओळखून रिगल सिनेमाजवळील आणि त्यापुढील सिग्नलला साल्यूट मारायचे आणि मला काकू अजूनच सुपरवूमन वाटायची.

मी उंच इमारती पाहून घ्यायचो,रस्त्यारून फिरणारी सुंदर कपड्यातली माणसे पाहून घ्यायचो,जुनी ब्रिटीशकालीन रस्त्यांची नावे वाचायचो.माझ्या शहरातला छोटा गोड आटोपशीरपणा जाऊन इथे मला एखाद्या ताकदवान धबधब्यासमोर आपण उभे आहोत असे वाटायचे . हे शहर माझ्याशी बोलायचे . मला ह्या शहराची कधीही भीती वाटली नाही.

लंडन शहराविषयी मी थोडेफार वाचले होते त्याची प्रतिकृती असल्यासारखे होते तेव्हा हे शहर . माझ्या अनुभवातील मुंबई तेव्हा मरीन लायींस च्या पलीकडे जायची नाही.पुढच्या उपनगरांची नावेसुद्धा मला माहित नव्हती. गिरगाव नंतर मुंबई संपते असे मला वाटायचे. ह्याचे कारण काकूची मुंबई हीच माझी मुंबई होती. ती नेयील तितकी. काकू वाहतुकीचे नियम नीट पाळायची आणि गाडी वळण्याआधी हात बाहेर काढून गोल फिरवायची तेव्हा तर मला आश्चर्याने भोवळ यायची बाकी असायची . कसं काय बुवा जमतं हिला असं वाटायचं.

हे शहर मला त्या काळी खूप उर्जा द्यायचे आणि मोठी स्वप्ने रंगवायला मदत करायचे. मला इथले विविध प्रकारचे अनेक मजेशीर आडनावाचे आणि खूप भाषा बोलणारे लोक आवडायचे. आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही ह्याचा एक त्वेष मनात हे शहर उत्पन्न करायचे. मला हे माहित होते कि एक दिवस मी इथे कायमचा राहायला येणार आहे . कुठे राहणार आहे , काय करणार आहे हे कळात नव्हते पण मला इथल्या बहुभाषिक वातावरणाचे जितके आकर्षण तयार झाले होते तितके अजून कुठल्याही गोष्टीचे झाले नव्हते. मला भाषा मोहात पडतात ह्याचा मला लहानपणीपासून अनुभव आहे. एखादा माणूस परकी भाषा सहजपणे बोलला कि त्या व्यक्तीविषयी एक sex अपील तयार होते. त्याचा शरीरीकतेशी संबंध नसतो .

हे माझे म्हणणे त्यांनाच कळेल ज्यांना sex अपील ह्या शब्दाचा अनुभव आणि अर्थ जगून माहित आहे . परक्या भाषेकडे माझे मन आसुसून धाव घेत असे हा माझा लहानपणीपासूनचा अनुभव आहे. कारण परक्या भाषेत दोन माणसे बोलतात आणि आपल्याला ते कळत नाही तेव्हा खूप मोठी गुपिते आपल्या अंगावरून वाहून जात असतात. आणि मला गुपिते निर्माण करायला खूप आवडतात. आपण गुपिते निर्माण करायची आणि इतर लोकांपुढे ओल्या चार्यासारखी फेकून आपण मजा पहात बसायचे हे करायला मला इतके आवडते कि काय सांगू !

माझ्या गोड साध्या एकपदरी ऐतिहासिक शहरातली गुपिते संपत चालली होती.हे नवे शहर इतक्या नवनव्या भाषा बोलणाऱ्या माणसांनी भरलेले होते कि इथे गुपितांना तोटा नसणार हे मला कळून चुकले होते. खऱ्या अर्थाने त्या वेळी मला मुंबई शहर सेक्सी वाटत होते. तिथे स्मगलर होते . सिनेमातले नट होते.पोलीस तर आमच्या घरातच होते .त्यामुळे लहान वयातच सुरु होणारा आणि प्रत्येकाच्या मनात दीर्घकाळ चालणारा चोर पोलिसाचा खेळ मला ह्या शहरात बसून खेळायला फार आवडायचे. माझा स्वभावाच बैठा. मला खायला प्यायला घालून हातात एक पुस्तक देऊन एका ठिकाणी बसवले कि मी विचार करत ,गोष्टी रचत कुणाला त्रास न देता पुन्हा भूक लागेपर्यंत तासनतास बसून असायचो. अशी बैठ्या स्वभावाची माणसे चोरपोलीस फार चांगले खेळतात. लपाछपी सुद्धा. मुंबई शहरात मी सैरावैरा धावत आरडओरडा करत असे खेळ खेळत बसायचो . मग संध्याकाळ व्हायची आणि काकू गाडीतून चक्कर मारायला जाऊया असे म्हणून आम्हाला घराबाहेर काढायची.

मला लहानपणीपासून ,म्हणजे माझा धाकटा भाऊ जन्माला तेव्हापासून ,मी सावत्र मुलगा आहे असे वाटायचे. तेव्हा दुपारच्या TV मालिका अस्तित्वात नव्हत्या तरीही असे विनोदी आणि नाट्यमय विचार माझ्या मनात सतत यायचे .मला वाटायचे कि आता आपल्या आईवडिलांना आपली गरज नाही तर आपण घरातून पळून जाऊ. मी तासनतास घरातून पळून मुंबईला येऊन इथे मोठा स्मगलर किंवा काकांपेक्षा मोठा पोलीस बनायचा विचार करत बसायचो. अमिताभचे सिनेमे फार लहान वयात प्रमाणाबाहेर पहिल्याचा तो परिणाम असावा. पण मला मुंबई माझी वाटू लागली होती.पुणे शहर हे गोड गोड बालोद्यान होते आणि खरे आयुष्य इथे होते.

आज हे सगळे आठवण्यामागचे कारण हे कि गेला एक तास मी गाडीत बसून पुस्तक वाचत होतो आणि एकदाही मी ढुंकूनही बाहेर ह्या शहराकडे पहिले नाही. मला रोजचे तेच ते रस्ते पाहावेसे वाटत नाहीत. मी स्मगलरांच्या आणि पोलिसांच्या ब्रिटीश मुंबईपासून खूप लांब एका उपनगरात राहतो.मी मुंबईत राहतो असे मी म्हणत असलो तरी मुंबईतल्या लोकांना ती मुंबई वाटत नाही.मला पिंपरी चिंचवड तळेगाव विषयी जे वाटते तसे मूळ मुंबईकरांना माझ्या उपनगराविषयी वाटत असावे. मी मध्येच मुंबईत आहे हे विसरूनच जातो. राबत बसतो.

मागे रणजीतने, माझ्या निर्मात्याने गौतम राजाध्याक्षाना आमच्या सिनेमासाठी अंधेरीत यायला फोन केला. ते गिरगावात राहायचे.ते मोठा उसासा टाकून म्हणाले, “आहो,तीथे अंधेरीत कुठे येऊ हो? इथे मुंबईत शो असेल तेव्हा सांगा”. म्हणजे मी मुंबईत राहातच नाही तर !

इतके काम करतो मी आणि सतत धावत असतो तेव्हा मधेच असे वाटते कि हेच करायला तू ह्या शहरात आलास का?मला अचानक भान येते. आपला चोरपोलीसाचा खेळ चालू आहे कि नाही ? तो चालू राहायला हवा . बाकीचे सगळे होत राहील.

खूप दिवस चोरपोलीस खेळले नाही तर मग मुंबईत कशाला राहायचे?साबरमती आश्रमात नसतो गेलो? मी स्वतःला बजावतो. आपल्याला मूळ काम काय करायचे होते? तर मनातला चोरपोलीसाचा खेळ जिवंत ठेवायचा होता. म्हणून तर आपण आपले गाव सोडले. बस आत्ता निवांत आणि सुरु कर तो खेळ . एक- दोन- तीन .

ह्या शहरात चोर –पोलीस- स्मगलर,घर सोडलेला लहान मुलगा, त्याला ट्रेनमध्ये भेटणारी वेश्या, VT स्टेशनवर उतरल्यावर त्याचे कुणी कुणी नसणे ,नळावरचे पाणी पिऊन राहणे, हमाली करणे , बूट पोलिश शिकणे , मग एक दिवस फियाट गाडीतून एक सुंदर देखणी बाई गाडीतून उतरून येते आणि त्या मुलाला इंग्रजीत विचारते , तुम मेरे लिये काम करोगे ? हो मला आत्ता इंग्रजी येत नाही म्हणून हे हिंदीत आहे . पण ती इंग्रजींतच विचारणार आहे . मेरे लिये काम करोगे ? मग तो मुलगा म्हणतो क्यू नही madam? हम तो आयाइच है याहा काम करके नाम कमाने.

मग आपल्या पाचवारी साडीचा पदर डोक्यावरून गच्च ओढून घेऊन ती बाई कुलाब्याच्या दिशेने सुसाट गाडी सोडते. सत्यावारचे पोलीस तिला साल्यूत करतात तेव्हा तो मुलगा म्हणतो, एक दिन ये सारे पोलीस्लोग हमकोभी साल्यूत मारेंगे.

G (109)

अपेयपान २५

लहान असताना पैसा आजूबाजूला दिसत नसे. मुलांना तो हाताळायला मिळत नसे आणि सतत सगळे पैश्यांविषयी आणि वस्तू विकत घेण्याविषयी बोलत नसत. नोकरी करून ज्यांचे घर चालते अश्या सध्या मराठी मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये पैसा हा एकाच वेळी अतिशय जपून, अतिशय उदात्तपणे आणि फारसा न दाखवता बाळगायची किंवा खर्च करायची सवय असे.

आई वडिलांनी आम्हाला कधीही कशाचे कमी केले नाही . आपल्याला एखादी गोष्ट परवडते का , आपली ती करण्याची ऐपत आहे का ह्याची काळजी आपल्या मुलांपर्यंत आईवडील अतिशय नाजूकपणे पोचू देत नसत. एखाद्या खर्चाला मुलांना नाही म्हणण्याची विशिष्ठ पद्धत प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये समजुतीने तयार झालेली असे.

मी पैसा अनेक वर्षे हाताळलाच नव्हता. खूप एकत्र पाहिलासुद्धा नव्हता. आमच्या भागातले सगळे दुकानदार हे लहानपणीचे माझ्या वडिलांचे खेळगडी होते.काही लागले तर आईची परवानगी घेऊन त्या दुकानात जायचे आणि लागणारी वही , पेन , पेन्सिल घेऊन यायचे. संध्याकाळी किंवा दिसर्या दिवशी बाबा जाऊन बिल चुकते करून यायचे.

माझे घराजवळच्या बँकेत मायनर अकौंट उघडले होते ते अकरा रुपये भरून. माझ्या हातात माझे स्वतःचे पासबुक देण्यात आले होते तेव्हा मला काहीतरी वेगळेच वाटून गेले होते. तरीही पैसा मी पहिलाच नव्हता. हातात फक्त पासबुक होते. त्यावर अकरा रुपये खात्यात असण्याची नोंद होती. म्हणजे ह्या जगात ते अकरा रुपये फक्त माझे आणि माझे होते. मला ते हवे तेव्हा मिळणार होते का ? तर नाही . कारण बचत करण्याची सवय लागावी म्हणून ते खाते उघडले गेले आहे असे मला सांगण्यात आले होते. मला बचत म्हणजे काय ते कळत नव्हते. वेळ आली कि ते पैसे कामी येतात . पण मी लहान असल्याने वेळ येणे वगरे उच्च मराठीतील विचार मला कळत नव्हते. मला असे वाटले कि एक वेळ झाली घड्याळात कि सगळेजण आपापले पैसे काढून घेणार आहेत.

त्या पासबुकासोबत मला एक नाणी साठवायला मातीचे मडके देण्यात आले . ते मडके सर्व बाजूंनी बंद होते पण एक नाणे आत जाऊ शकेल अशी खाच त्याला वरच्या बाजूला होती. त्यात एक रुपयाची शंभर नाणी मावतात असे मला सांगण्यात आले. ते मडके भरले कि बँकेत नेऊन द्यायचे मग बँकेतले काका त्यातले पैसे तुझ्या अकौन्टला जमा करतील. अकौंट म्हणजे काय ? माझ्या मनात दुसरा प्रश्न. मी गौरी गणपती आले कि आईसोबत बँकेच्या लॉकररूम मध्ये जाऊन चांदीचे दोन पेले , एक ताट आणि नथ असे घेऊन येत असे. मला लॉकर हीच अकौंट आहे अशी समजूत होती . म्हणजे आपले अकरा रुपये अश्याच एका लॉकरमध्ये ठेवले आहेत आणि हे मातीचे मडके भरले कि ते त्या लॉकरमध्ये जाणार आहे. नाही तसे नसते. एक दिवस मला बसून बँक , व्याज , खाते अश्या अनेक गोष्टी वडिलांनी समजावल्या. मला हा बँकिंग चा उपद्व्यापच काळाला नाही . मान्यच झाला नाही . आपले पैसे आपण त्यांना का द्यायचे ? त्यांनी चोरले तर ? अशी मी वडिलांशी हुज्जत घालत बसलो. मला त्यात सगळ्यात नाट्यमय घटना हि कळली कि मडके भरले कि ते फोडायचे आहे आणि त्यातली नाणी प्लास्टिकच्या पिशवीत भरून बँकेतल्या काकांकडे नेऊन द्यायची आहेत. मला फारच आनंद झाला. मला काचा फुटणे , मातीची भांडी फुटणे , कपबश्या फुटणे ह्या गोष्टी इतक्या म्हणजे इतक्या आवडत कि सांगता सोय नसे. माझे मनच फार फिल्मी होते. कधी एकदा ते मडके पूर्ण भरते आहे आणि मी ते जोरात फोडतो आहे असे मला झाले होते. शंभर नाणी बाहेर पडणार होती . ती मोजून प्लास्टिकच्या पिशवीत भरून , पिशवीला रबर लावून बँकेतल्या काकांकडे नि ऐटीत चाललो आहे असे दृश्य मला दिसले. आणि मी नाणी गोळा करायला सुरुवात केली. बचतीची आवड लागावी म्हणून मला ते मडके दिले होते. मला बचतीचे जवळजवळ वेड लागल्यासारखा मी वागत होतो. मिळेल तशी एक रुपयाची नाणी जमवायचा मी सपाटा लावला. खाऊचे पैसे मडक्यात जाऊ लागले. लहानपणी कुणाला नमस्कार केला कि प्रेमळ माणसे अकरा रुपये हातावर ठेवीत. मी सारखे न चुकता घरी आलेल्या ज्येष्ठ लोकांना नमस्कार करू लागलो. पेप्सीकोला खाण्याऐवजी तो एक रुपया मडक्यात ठेवू लागलो. त्या मडक्याचे वजन माझ्याइतकेच वाढू लागले आणि मला मडके फुटून नाणीच नाणी बाहेर पडतायत अशी स्वप्न पडू लागली. शंभर नाणी. म्हणजे अलीबाबाबाच्या गोष्टीत असतात तश्या मोहरा. त्याच्या गुहेत मोहरांनी भरलेले रांजण होते. माझ्याकडे नाण्यांनी भरलेले मडके होते. मी मध्येच रात्री उठून ते मडके खळ खळ वाजवून पाहायचो आणि परत झोपी जायचो.

एकदा मी बाबांसोबत बँकेत गेलो असताना बाबांनी मला पासबुक भरून आण असे सांगून एका बायींकडे पिटाळले. त्यांनी मला सोळाशे प्रश्न विचारून माझे पासबुक घेऊन त्यात काहीतरी खरडून ते माझ्या हातात दिले आणि मला भोवळ यायची बाकी राहिली होती. माझ्या पासबुकावर एकोणीस रुपये झाले होते. अकराचे एकोणीस ? कुणी केले ? मला त्या बाई खूप आवडल्या. ह्यांनी पासबुकात लिहिले कि ती रक्कम वाढते. वाह . माझा बँक ह्या गोष्टीवर विश्वास बसला.

एकदा रात्री मी आईवडिलांना कसल्यातरी चिंतेत बोलताना ऐकले. असे कधी घडत नसे. कारण आईवडील आमच्यासमोर कधीही कसलीही रडगाणी गात नसत. मी झोपलो आहे असे समजून ते दोघे बोलत होते . त्यांना घरखर्चाचे केव्हडेतरी ताण आले होते. दिवाळी येत होती .अनेक आधीची बिले थकली होती . आणि सुट्टीत सगळ्या पाहुण्यांचा तळ आमच्याघरी असणार होता. कुजबुजत ते दोघे कसा मार्ग काढायचा ह्याचा विचार करत होते . तेव्हा मी घाबरलो आणि मला एकदम रडायलाच आले. कारण आईबाबांना सगळे सोपे असते आणि त्यांच्याकडे पैसे असतात अशी माझी सोपी समजूत होती. बाबांना पगार मिळतो हे मला माहिती होते. पण पगार म्हणजे काय , कधी मिळतो , किती मिळतो , मला काही कल्पना नव्हती. पैसे कमी पडू शकतात हा अनुभवच नव्हता. पैसे असतात . आई आपल्याला एखादी गोष्ट घेऊन देत नाही तेव्हा ती नाही म्हणत नाही . आपण ती पुढच्या महिन्यात घेऊ असे म्हणते. त्या रात्री मला आईवडिलांचे हे बोलणे ऐकून एकदम असहाय वाटले. आपल्यामुळे तर अशी वेळ नाही न आली ? आपण वह्या जास्त आणतो. सारखे आईस्क्रीम खातो. मावशीकडे जाताना बस ने न जाता रिक्षाने जाण्याचा हट्ट करतो. त्यामुळे तर असे झाले नसेल न ? मला कशाचे काही कळेनासे झाले. वेळ आली कि असे जे आई सारखे म्हणते ती अशीच काहीतरी असावी. आपले एकोणीस रुपये आणि सत्तर ऐंशी नाणी आपण त्यांना देवून टाकूया का ?

पैशाची भीती वय वाढले तशी वाढतच गेली . तो कमवायला लागलो तेव्हापासून तो कमावण्याच्या आनंदापेक्षा ते भीती नेहमी मोठी होत राहिली. असे का झाले ? कुठून आली हि भीती ? मला कळेनासे झाले आहे.

पैसा दिसू लागला आहे , त्याची किंमत कमी होत गेली आहे पण त्याची भीती नाही. एक विशिष्ट प्रकारची भीती घेऊन येतो पैसा . तो असला तरी आणि नसला तरी. भुंग्यासारखा मनात गुणगुणत राहतो. बँकेत पडून राहिला तरी आठवत राहतो. आनंदाचा एखादा मोठा खर्च करताना मनाला अपराधी वाटवत राहतो. मोकळे असे सोपे त्याच्याबद्दल वाटत नाही. अजूनही. स्वतः कमवायला लागलो तरी. आताहि मडक्याचा आकार तितकाच आहे .

DSC_0651
{KAUSTUBHA BAPAT}

अपेयपान २६

मी माझ्या शहराचा इतका राग करतो मध्येमध्ये ह्याचे कारण माझे त्या शहरावर प्रेम आहे. प्रेम आहे म्हणूनच राग येतो. आणि त्यामुळे मी सोडून इतर कुणाला ह्या शहरावर मनापासून रागावण्याचा हक्क असणार ? मी ह्या शहरात जन्मलो आहे , वाढलो आहे. मी कंटाळून ह्या शहराला सोडून गेलो आहे आणि ह्याची जाणीव होवून सारखा पुन्हा पुन्हा परत येत राहिलो आहे कि ह्या शहरासारखे पाणी दुसरीकडे कुठेही नाही. इथे मी केलेल्या चुका माहित असलेली माणसे आहेत. शिवाय इथे माझे बालपण जुन्या नासक्या भाजीसारखे गोठून राहिले आहे. देवळात जुना कोरडा नारळ असावा तसे. न फोडलेला. आणि त्यामुळे तीन दिवसांच्यावर इथे राहायला मला कंटाळा येतो.मला इथली सर्व गावात जगप्रसिद्ध असलेली सांस्कृतिक आगावू माणसे हास्यास्पद वाटू लागतात.

प्रेम करायला आणि रागवायला सुद्धा एक व्यक्तिमत्व असावे लागते ते माझ्या शहराला आहे. ज्याच्यावर भरपूर रागवावे असे व्यक्तिमत्व किती शहरांना असते ? महाराष्ट्रात अशी शहरे दोनच. पुणे आणि मुंबई. माझे नशीब बरे कि मी ह्या दोन शहराच्या आसपास वाढलो. राहायचे ह्या दोन शहरांमध्ये आणि वसवस करत आपल्या ओसाड गावच्या परंपरा आठवत बसायच्या हे करायची वेळ देवाने माझ्यावर आणली नाही. पश्चिम महाराष्ट्रात जन्मल्याचे आणि वाढल्याचे फार आपसूक आणि अतोनात सुख आयुष्याने मला दिले आहे . इतर कुठेही जन्म घेण्याची मी कल्पनाच करू शकत नाही.

माझे शहर प्रेम करावे, कंटाळावे आणि रागवावे असे समृद्ध आहे. त्याला अनेक कथा उपकथा आहेत. उगाच कुठलेतरी उजाड ओसाड गाव नाही ते.

आयुष्यात उशिराने ,ह्या शहरात नळाला भरपूर पाणी येते ,आपल्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिकता येते किंवा आपल्या मुलांचे बोली मराठीचे उच्चार शुद्ध होतील म्हणून आपापली सामान्य आणि सौम्य गावे सोडून इथे आलेल्या निमूट लोकांना माझा राग कळणे शक्य नाही. कारण ज्यांना स्वतः च्या जन्मागावावर धाडसाने प्रेम सुद्धा नीट करता येत नाही ती माणसे रागवायला तरी कशी शिकणार? राग हि प्रेमाचीच एक बाजू असते आणि ज्यांना रागवायची अदब आणि ताकद असते तीच माणसे रागावू शकतात. बाकीची माणसे फक्त ‘ट्राफिक फार झाले आहे ’ किंवा ‘भाज्या महाग झाल्या आहेत’ किंवा असली पाणचट धुसफूस करू शकतात. मला ती करता येत नाही.

मला घाईघाईने समता आणि बंधुता विकत आणता येत नाही. शिवाय मी सामाजिक जाणीव असलेल्या लोकांविषयी खूपच जास्त सावध असल्याने मला खोट्या सहिष्णू वागण्यात करियर करायची वेळ आलेली नाही. सामाजिक जाणीव असलेल्या पुणेरी स्त्रीपुरुषांसारखे लबाड कोल्हे जगात इतर कुठेही नाहीत. मी त्यांच्यासोबत पूर्वी शिकारी केल्या आहेत म्हणून अनुभवातून सांगतो आहे. त्यामुळे मी न घाबरता रागावतो, काही वेळा चुकीचे वागतो ,किंवा लिहितो. ते करणे मला जास्त सोपे आणि प्रामाणिक वाटते.

मला सुंदर लालबुंद राग येतो. तो राग मी प्रेम करून कमावलेला असतो. मी माझ्या शहरावर रागावतो तेव्हा मला हे माहित असते कि ते करण्याचा मला पूर्ण हक्क आहे. मी माझ्या माणसावर , माझ्या रस्त्यांवर, माझ्या परिसरावर रागावतोय. मी रागावण्यासाठी उत्तम शब्द शोधू शकतो. मी ते नीट वापरून पुन्हा गार करून , पुसून आत ठेवू शकतो. कारण मला लिहिता येते. आणि लिहिता माणूस रागवतो तेव्हा तो उगीउगी धुसफूस करत नसतो. त्या रागाला अर्थ असतो. तो राग येतो आणि शांतपणे जातो. तीव्र रागाचे आणि शांत प्रेमाचे चक्र चालू राहते. आणि त्या चक्राकार भावनांमधून माझे आणि माझ्या शहराचे नाते संपृक्त होत राहते. माझा माझ्या शहरावरचा राग हि माझी त्या शहराशी असलेली खासगी आणि अतिशय कोमल बाब आहे.

मला प्रवास करून हे लक्षात आले आहे , कि आपले गाव एकच असते. चार पिढ्या दुसरीकडे घालवल्या तरी तिथली माणसे पूर्णपणे तुम्हाला त्यांच्यात घेत नाहीत. आणि आपल्याला डावलले जाते आहे हे आपल्याला कधी कळतहि नाही. आमच्या शहरातली माणसे तर त्यात फार चतुर. झाडावरचा आंबा वेगळ्या माणसाला देतात आणि खाली पडलेला आंबा वेगळ्या माणसाला. सगळ्यांना वाटते मीच महत्वाचा . खरी ताजी भाजी तुमच्या वाट्याला इथे कधीच येत नाही आणि पैसे फेकून विकत घेतले पुढचे सीट तरी सवाई गंधर्व महोत्सवातल्या गाण्यावर प्रेम करता येत नाही. तिथे तुम्ही उपरेच राहता. विजेच्या बिलावर नावपत्ता छापून आला कि तुम्ही त्या शहराचे होत नाही. धुराने गच्च भरलेल्या रस्यांवर स्थलांतरित माणसाकडे शहरातील मूळ रहिवासी फार रागाने पाहत असतात. स्थलांतरित माणसाची पाठ फिरली कि त्याचे उच्चार, त्याची भाषा, त्याचे विचित्र खाणेपिणे ह्याची सर्व शहरांमध्ये खिल्ली उडवली जाते.

मी उत्साहाने बाहेर राहायला गेलो , तेव्हा अनेक वेळा अशी खिल्ली उडवलेली गेली ती मी अनुभवली त्यावरून मी काही आडाखे बांधले. घाइने दुसर्या शहराला पटकन आपलेसे केले तरी ते सारखे व्यक्त करत बसायचे नाही. नव्या शहरात गप्प राहून शांत अनुभव घेत राहायचे. आपले नवखेपण मोकळेपणाने मान्य करायचे , उगाच लगेच तिथल्या माणसांच्या खांद्यांवर हात टाकायचे नाहीत. आणि टेकडीवरच्या ग्रुप मध्ये फिरायला गेलो तरी लगेच घरीबिरी यायला जायला लागायचं नाही. वाट पाहायची. मिसळून घेतली जाण्याची वाट पहावी लागते. पैसे फेकून , श्रीमंतीचे दर्शन घडवून किंवा विद्यापीठात प्रोफेसरकी करूनही नव्या शहरात रुजायला जितका वेळ लागतो तितका लागू द्यावा. जिथे तिथे आपले तोंड उघडून बोलत बसू नये.

शहरातील ज्या गोष्टींच्या प्रेमाने आपण ह्या शहरात आलो त्या गोष्टी तुमच्या वाट्याला पूर्णपणे यायला खूप वर्षे जावी लागतात. जी गोष्ट पुण्याची , तीच मुंबईची , तीच लंडनची , तीच सिडनीची , तीच जगातल्या कुठल्याही शहराची. त्यामुळे स्थलांतरित माणसाने आपापले राग वेगळे शोधायचे असतात. मूळ जन्मलेला माणूस त्या जागेवर का रागावला असे त्याला विचारायचे नसते.

आमच्या इथे पूर्वी एक wachman होते त्यांना सगळे ‘अहो नागपूरकर’ अशी हाक मारायचे . आणि ते हाकेला ओ देवून जायचे. मला नंतर कळले कि त्यांचे आडनाव वेगळेच आहे. आणि ते दहा वर्षे पुण्यात राहत असले तरी इथल्या जगासाठी ते ‘नागपूरकर’ आहेत. त्यांचे खरे आडनावसुद्धा कुणाला माहित नाही . त्याची गरज पडलेली नाही .

राग तयार व्हयाला खूप चांगले नाते तयार व्हावे लागते हे लक्षात घायचे असते. गप्प आणि शांत राहून कष्ट केले तर नवे शहर तुम्हाला ताजे नाते देते. नाहीतर आपल्याला नातीसुद्धा आपल्या मूळ गावाहून आणावी लागतात आणि सुताराला बोलावून एकाचे दोन जोडपलंग करून घ्यावे लागतात. असाच मानवी व्यवहार आहे. सानेगुरुजींची मानवतावादी गाणी गाऊन तो बदलत नाही.

तुम्ही जगाला प्रेम अर्पण करत बसलात तरी तुम्ही गेला आहात त्या शहराला तुमचे प्रेम हवे आहे का ? हे आधी तपासावे लागते. ते आधी तपासून बघा आणि मग आज रविवारचे गजरेबिजरे आपापल्या मागाहून गावाहून आणलेल्या बायकांना घालून , संध्याकाळी मराठी नाटके पाहायला घेऊन जा. चांगली असतात म्हणे हल्ली. आणि त्यात सगळे TV मालिकेतले लोक प्रत्यक्ष दिसतात आणि प्रयोगानंतर आत जाऊन त्यांना हातपण लाऊन बघता येतो. नाटकाच्या तिकीटामध्येच नटांना हात पण लावू देतात. त्यासाठी वेगळे तिकीट काढावे लागत नाही.

Sachin .

अपेयपान लोकमत मधील लेखमाला भाग १८ ते २२

                                 अपेयपान १८

मी Paris मध्ये अडीच महिने शिकत असताना माझ्या मनात तिथून उठून युरोपमधील इतर शहरांमध्ये फिरायला जायचे सारखे येत होते . हि गोष्ट १९९९ सालची आहे . मी फ्रेंच सरकारची चित्रपटाच्या शिक्षणाची एक शिष्यवृत्ती मिळवून paris च्या फिल्म स्कूल मध्ये एका कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी गेलो होतो. माझा पहिला परदेश प्रवास होता तो . पहिला परदेशप्रवास आणि पहिला विमानप्रवास सुद्धा. मे महिन्याच्या शेवटी मी तिथे पोचलो आणि लगेचच paris ने मला मिठीत घेऊन गिळून टाकले. तेव्हा फ्रांस हा देश स्वतःह्चे आर्थिक आणि सांस्कृतिक सार्वभौमत्व टिकवून होता . Paris शहराला स्वतःचा एक ताजा वर्तमानकाळ होता. आज युरोपिअन युनियन आल्यानंतर जे तेथील शहरांचे होवून बसले आहे तसे बिचारेपण paris ला त्या वेळी नव्हते. भारतात फ्रेंच भाषा शिकण्याला एक विशेष सांस्कृतिक महत्व होते आणि paris शहराच्या मिठीत जाणे फार सोपे नव्हते.

एखाद्या जादूच्या गुहेत फिरावे तसा मी ते शहर नुसते पिऊन घेत होतो . संगीत , सिनेमा , शिल्पकला , साहित्य ह्या सर्व क्षेत्रात माणसाने जे जे काही आजपर्यंत उत्तम केले आहे ते सगळे तिथे समोर सहज बघण्यासाठी उपलब्ध होते. रोजचे वर्ग संपले कि सोबतच्या इतर देशांमधील मुलांसोबत हे शहर पाहण्यात , तिथले संगीत ऐकण्यात, म्युझियम्स पालथी घालण्यात आमचा वेळ कसा जात असे ते कळतच नव्हते .

पण काही दिवसांनी माझ्या मनाला अशी एक उगाच रुखरुख लागून राहिली कि आपण एव्हडे तरुणबिरूण वयाचे , युरोपात आलोय आणि आपण हे सगळे काय करत बसलो आहोत ? किती सदाशिवपेठी जगतोय आपण इथेही ? नुसती म्युझियम्स आणि सिनेमे कसले पाहिचे ? जरा वाईल्ड असे काहीतरी केले पाहिजे . हे Paris चे कलात्मक कौतुक खूप झाले . खूप जुनेजुने काही पाहून झाले आता जरा रात्री बाहेर पडून मस्त जगू . Paris च्या रंगेल रात्री असे ज्यांना म्हणतात त्या जरा अनुभवू . झाले ठरले तर मग . एकदा ठरले कि आपले ठरते . आपण लगेच ते अमलात आणतोच .

संध्याकाळी कॉलेज संपले कि मी परत सगळ्यांसोबत हॉटेलवर जाणे टाळू लागलो . माझ्यासोबत शिकायला क्रांगुत्सा ह्या अतिशय अवघड नावाची रुमानियन मुलगी वर्गात होती. तिला मी म्हणालो कि आपण आजपासून परत रूमवर न जाता इथेच कपडे बदलून जरा पब्स मद्ध्ये किंवा नाईट क्लबमध्ये जाऊ . ती तयार झाली आणि एकदा सोमवारी शेवटचा क्लास पाच वाजता संपताच बाहेर पडलो . पण मला लक्षात आले कि paris ला रात्र सुरु होते त्या वेळी मला झोप येते. मला जागताच येत नाही . साडेदहा अकरा वाजताच जांभया आणि झोप यायला लागते. मी आणि क्रांगुत्सा मोन्मार्त्र वरील वेगवेगळ्या जागी बियर प्यायला , डान्स पाहायला , करायला जायला लागलो . रात्रीचे आणि दिवसाचे अशी दोन paris आहेत . पण ते रात्रीचे paris उगवायला रात्रीचे बारा वाजायला लागतात आणि झोप माझ्याचाने आवरत नाही . शिवाय सकाळी ८ वाजता क्लासेस न हजार राहायचे असे . उगाच शहाणपणा करून दोन तीन दिवस आम्ही मोठे हिरोगिरी करत मुलां रूज सारख्या मादक नाईटक्लब पाशी जाऊन आलो पण आम्हाला लक्षात आले कि त्याची तिकिटे आम्हाला परवडण्यासारखी नाहीत आणि तिथे भरत नाट्य मंदिरात जाऊन तिकीट काढून आत जावे तसे जाता येत नाही . तिकिटे आठवडा आठवडा आधी book करावी लागतात . त्यामुळे तो कॅनकॅन नावचा सुप्रसिद्ध फ्रेंच नाच आम्हाला बघता येणार नव्हता. श्या . फार वाईट वाटले मला. काहीतरी रंगेल राडाघालू करणे फार आवश्यक होते . नाहीतर paris ला राहून काय ती एखाद्या सिनेमातल्या नर्स सारखी दिसणारी मोनालिसा बघून आलो फक्त असे पुण्यात येऊन सांगावे लागले असते . ( अत्यंत सुमार टुकार पण तरीही जगप्रसिद्ध असे जर काही जगात असेल तर ती मोनालिसा आहे)

माझ्या वर्गातला चिली हून आलेला बेन्जामिन नावाचा मुलगा रोज रात्री नव्या पोरी पैसे देऊन मिळवे आणि त्यांना स्वतःच्या खोलीवर घेऊन येत असे.तो माझ्या शेजारी राहत होता आणि मी भांग बिंग पाडून सकाळी अतिशय वेळेत ब्रेकफास्ट साठी जायला दर उघडले कि त्याच्या खोलीतून कधी रशियन , कधी अरबी कधी spanish मुली बाहेर पडत . हे पहा , ह्याला म्हणतात मजा करणे असे मी स्वतःला म्हणत असे . पण मला क्रांगुत्सा म्हणे कि सचिन तू जर रोज साडेदहा अकरा वाजताच झोपलास तर तू कशी मजा करणार इथे ? तू मला साधा बाहेर रस्त्यावर हातात हात घेऊ देत नाहीस , तुझ्याचाने काही होणार नाही . तू आधी लवकर झोपायची आणि लवकर उठायची सवय बंद कर . आणि जरा मोकळेपणे नाचायला शिक . जाड असलास म्हणून काय झाले ? ढोली माणसे काय नाचत नाहीत कि काय . त्या ढगळ pant घालून सारख्या त्या वर ओढत रस्त्यावरून फिरू नको . चांगली jackets घाल. चांगली मैत्रीण होती म्हणून ती मला काय वाट्टेल ते बोलत असे. आणि माझ्या मनात राग येऊ लागला होता . सगळ्याचा राग . पुण्याचा राग , शाळेचा राग , मराठी कवितांचा राग , सानेगुरुजींचा राग , नातेवैकांचा राग . LIC जीवनबिमा , बँक ऑफ इंडिया , निरमा पावडर , अमूल , चितळे सगळ्यांचा राग . सगळ्या मराठी पुस्तकांचा आणि सिनेमाचा राग. वपु पुलंचा राग . असं कसा बनलो मी ? हुशार शिस्तप्रिय चांगला मुलगा ? काय घंटा मिळवले मी हे सगळे बनून ? मी का नाही पैसे देऊन मजा करायची ? मला साली झोप काय येते रोज ? शिव्या घालायचो मी स्वतःला.

मी तेवीस वर्षाचा आहे आणि अजुनी भारतात आईवडिलांकडे राहतो , ते माझी शिक्षणाची फी भरतात हे मी तीथे मित्रांना सांगितले तेव्हा प्राणी संग्रहालयातील जनावराकडे पहावे तसे सगळे माझ्याकडे पाहत राहिले. कारण आमच्या वर्गातील बहुतेक मुले अठराव्या वर्षी घराबाहेर पडली होती आणि नोकर्या करून शिकत होती , किंवा परवडत नाही म्हणून अनेकांनी कॉलेज सोडले होते . अनेकांनी देश सोडले होते . क्रांगुत्सा म्हणाली मी फार कष्ट करून हि स्कॉलरशिप मिळवली आहे . मला फिल्म कॅमेरा woman व्हायचे आहे . मी आता परत माझ्या देशात जाणार नाही . कम्युनिझमने आमची वाट लावून टाकली आहे . ( आज ती युरोपात उत्तम कॅमेरा करणाऱ्या स्त्रियांपैकी एक आहे .)

मी ह्यातली एकही गोष्ट अनुभवली नव्हती . मी अतिशय स्थिर साचेबद्ध आणि काही नवे न घडणाऱ्या समाजातून आणि अतिशय लाडावून टोपलीखाली मुले ठेवतात अश्या भारतीय कुटुंबपद्धतीतून तिथे गेलो होतो. त्यामुळे माझ्यात हा दोष होता कि मी सगळ्याला हे चांगले आहे , हे वाईट आहे असे लगेच म्हणून टाकायचो. लोकांना लगेच नैतिक कप्प्प्यात टाकून जोखायचो.

मी पैसे देऊन वेश्यांकडे गेलो नव्हतो , मी गुन्हा केल्यासारखे न वाटता कधी दारू प्याली नव्हती , कधी ड्रग्स केले नव्हते, तेव्हा तर साधा गांजाही प्यायला नव्हता . साधे paris मध्ये लोक सारखे करतात तसे दिवसा ढवळ्या कुणाला रस्त्यात उभे राहून kiss केले नव्हते . मला हे सगळे करून संपून जायचे होते आणि माझे काय होते आहे ते पहायचे होते .

एक दिवस मी रस्त्यावरून जात असताना Amsterdam ची तिकिटे स्वस्त आहेत असे लिहिलेली जाहिरात वाचली आणि का कुणास ठावूक फारसा विचार न करता मी आत त्या travel agency मध्ये शिरलो.

अपेयपान १९

मी पहिल्यांदा संपूर्ण एकट्याने असा केलेला प्रवास हा Paris हून Amsterdam चा . ज्या प्रवासाला कोणतेही असे काहीही कारण नव्हते. ना मला त्या शहराची खूप माहिती होती . Paris ला मी शिकायला आलो होतो आणि ह्या आधी विनाउद्देश एकट्याने अशी कोणतीही भटकंती मी आयुष्यात केली नव्ह्ती. मी पुढे जे एकट्याने अनेक आणि उगीचच प्रवास केले त्यातला हा पहिला. आणि म्हणून त्या दोन दिवसांमधील सगळे अनुभव माझ्या मनावर अजूनही गडद उमटले आहेत.

संपूर्ण रात्रभर बसमधून प्रवास करून मी पहाटे Amsterdam मध्ये पोचलो तेव्हा ते शहर नुकतेच झोपायला गेले होते. एका होस्टेल मध्ये माझी राहायची सोय केली होती तिथे माझ्या बस च्या ड्रायव्हरने मला सोडले आणि तो निघून गेला. होस्टेल वर माझ्याच वयाच्या विशीतल्या जगभरातून आलेल्या मुलामुलींची तुफान गर्दी होती आणि मी खोलीत पाउल ठेवले तेव्हा ते सगळे रात्रभर कुठेतरी नाचून झोपायला आले होते. माझ्याशी बोलण्यात किंवा मी कोण आहे कुठून आलो आहे हे असले काही गप्पांमधून विचारण्याची त्या कुणालाच शुद्ध नव्हती. खोलीत दहा बेड होते आणि बाहेर चार सामायिक बाथरूम्स होती . मी गपचूप तयार झालो आणि सामान साखळीने पलंगाच्या पायाला बांधून ,त्याला कुलुपे घालून , महत्वाच्या गोष्टी अंगावर घेऊन सकाळीच बाहेर निर्मनुष्य शहरात आलो .

एकट्याने केलेल्या प्रवासात पहिल्यांदा अंगावर येऊन आदळतो तो अतिशय एकटेपणा. तो पेलायला भरपूर प्रवास करून शिकावं लागतं .त्या एकटेपणालाच घाबरून बहुतांशी लोक ओळखीच्या घोळक्याने प्रवास करतात. नव्या अनोळखी शहरात कितीही जादूमय गोष्टी असल्या तरी प्रथमदर्शनी तिथे एकट्याने पाउल ठेवताच , विशेषतः पाश्चिमात्य शहरांमध्ये , आपल्याला पोटात खड्डा पडेल अश्या रिकामेपणाला समोर जावे लागते.

त्या सकाळचा माझा सगळा एकटेपणा घालवला Vincent Van Gogh ने . Amsterdam येथे त्याच्या चित्रांचा समग्र आणि मोठा संग्रह आहे. मी अकराला उघडणाऱ्या म्युझियमच्या बाहेर साडेदहापासूनच रेंगाळत होतो आणि ते उघडताच आत धावत जाऊन Potato Eaters ह्या चित्राला भेटणारा मी पहिला होतो. सुर्यफुले , पिवळीधम्मक शिवारे , चांदण्यांनी भरलेले रात्रीचे आभाळ , स्वतः ची खोली. माझी अंगावर काटा उभा राहिला. आजपर्यंत पहात होतो त्या चित्रांच्या प्रिंट मधून Van gogh हा चित्रकार मला उर्जा देत होता पण आज त्याची चित्रे प्रत्यक्ष पाहताना अंगातून वीज जावी तसे काही होते . मी धडपड करत इथे आल्याबद्दल मला खूप बरेच वाटले . potato eaters बघताना माझ्या डोळ्यात पाणी आले. असे सगळे त्या वेळी प्रवास करताना सतत होत असे. आता कधीच इतके भावूक काही वाटत नाही. पण त्या वेळी असे वाटे कि कोण कुठले आपण , आपली परिस्थिती नसताना कुठून इथे येऊन उभे राहिलो आणि हे काय सुंदर दिव्य आपल्यासमोर साकारले जाते आहे . मी संपूर्ण चित्रांचा संग्रह तीनदा फिरून पहिला आणि मनामध्ये साठवून ठेवला. त्या काळी असे वाटत असे कि परत इथे येऊ न येऊ . सध्या वाटतो तसा सहज आत्मविश्वास आणि सोपेपणा माझ्या मनात त्यावेळी जरासुद्धा नव्हता . नुसतेच अप्रूप . सगळे अनुभव एकदाच मिळणार आहेत असे वाटायचे आणि सगळ्याच चांगल्या गोष्टींचा उपभोग घेताना मन आसुसून जायचे. मला आज तो भाबडेपणा फार आठवतो . कारण मी वयाने मोठा झालो तसा तो गमावून बसलो आहे.

ट्युलिपची फुले पाहायला जाण्याइतका पुणेरी मी तेव्हाही नव्हतो त्यामुळे आमच्या बसमधील त्या सहलीला नाही म्हणून मी एकट्याने पायी शहर भटकायचे ठरवले.

दुपार झाली तसे माझ्या मनात असलेल्या धाडसाचे बीज रस्त्याच्या कोपर्यावर उगवू लागले. मी गेल्या रविवारच्या लेखात लिहिल्याप्रमाणे मला स्वतःच्या आखीव शहाण्या मनाचा कंटाळा आला होता. आणि सुप्तपणे amsterdam ला एकट्याने निघून यायचे कारण हे van gogh आणि rembrant चित्रे बघणे हे नसून sex आणि Drugs ह्या दोन बाबतीत सगळे युरोपात जाऊन करतात ती adventures करणे हे होते.

आता दुपार झाली तसे आपण इथे का आलो आहोत ह्याची आठवण मला माझे मन करून द्यायला लागले. शहर आता फुलू लागले होते. कोपर्या कोपर्यावर हव्या त्या प्रकारची शरीरे उपलब्ध होती.मी एकटा होतो. निर्णय माझा होता. आता कोणतीही तक्रार करायला जागा नव्हती . साध्या पब्स मध्ये सुद्धा हवी ती ड्रग्स मिळतात हे माझ्या ड्रायव्हरने मला सांगितले होते.

इंग्लिश चित्रपटात तरुण मुले प्रवासात जगताना दाखवतात ते पाहून आपण वर्षानुवर्षे चेकाळून गेलेलो असतो तसे माझे झाले होते. मला आजही ती amsterdam मधील दुपार आठवते कारण आपण खरे आतून कोण आहोत ह्याची माझी स्वतःची ओळख आणि माझा माझ्याशीच झगडा त्वेषाने आतून चालू होता . मला वाटले होते कि मी त्या दुपारी मनातल्या सुप्त भुका भागवून टाकीन . पण मी तसे काहीही केले नाही . स्वताशी भांडत मी रस्त्यांवरून फिरत राहिलो. निरुद्धेश . जे दिसले ते पाहत. पण जे ते धाडसाचे एक पाउल असते ते उचलून विकत घेतलेले sex किंवा ड्रग्स ह्या दोन्हीच्या जवळपासही मला जाता आले नाही . आपल्याला जर आज ते करणे जमले नाही तर यापुढे कधीही जमणार नाही हे माहित असूनही . मनाला सर्व प्रकारे ढकलूनही मी कोणतीही हिरोगिरी त्या दिवशी करू शकलो नाही आणि सूर्य मावळताना माझाच मला कंटाळा आला. राग आला. मी कोण आहे ,कसा माणूस आहे ह्याची ओळख पटल्याचा तो राग होता. मी साधा वाचणारा , चित्र बघून आनंदी होणारा, माणसांशी गप्पा मारायला आवडणारा मुलगा आहे . मी माझ्या आईवडील नातेवाईक ह्यांच्यापेक्षा फार वेगळा नाही , मी फ्रेंच कादंबर्या आणि सिनेमात जगणाऱ्या पात्रांसारखा नाही , मी रक्तामासाने , मनाने तोच आहे ज्याला त्याच्या घराने आणि जन्मागावाने घडवले आहे. मला मी इतरांपेक्षा खूप वेगळा धाडसी आक्रमक जे हवे ते लगेच मिळवणारा यशस्वी मुलगा आहे हे सत्य हवे होते पण ते खरे नव्हते. समोर सोपेपणाने हवे ते मिळण्याची सोय असताना मला ते उपभोगता येत नव्हते. त्या दुपारी माझ्यातले मोठे द्वैत संपुष्टात आले. आणि मी स्वतःशी भांडून मग शांत झालो तेव्हा मग मला amstermad शहर होते तसे समोर दिसायला लागले. किती सुंदर आहे ते शहर .

पुढचे दोन दिवस मी शहरात खूप भटकलो , उत्तम जेवणाची चव घेतली , फोटो काढले, अनोळखी माणसांकडे पाहून हसलो , होस्टेल वरच्या अमेरिकन मुलांशी गप्पा मारल्या , anne Frank ह्या तेथील कम्पलसरी मुलीचे घर पाहून कम्पल्सरी हळहळलो , कालव्यांमधून बोटींमधून फिरलो. आणि रात्री तिथल्या सुप्रसिद्ध वेश्या वस्तीत जाऊन काचेच्या खिडक्यांमध्ये उभ्या असलेल्या बायका जवळ जाऊन पाहिल्या आणि Rembrand ची चित्रे डोळे भरून पाहिली.

दुसर्या दिवशी मी एकटा बसून होतो तेव्हा मला अचानक रडायला आले. खूप जास्त. कसले आणि का ते कळले नाही . पण मी त्या दिवशी एकटाच रडलो हे मला अजुनी आठवते. बहुदा एकट्याने प्रवास केल्याबद्दलचे रडू असावे. सगळ्यांना सोबत कुणी न कुणी असताना आपण एकट्याने अनोळखी शहरात फिरणे हे फार पोकळी निर्माण करणारे असते.

दुपारी एका पबमधून बियर पिऊन बाहेर पडताना एक माणूस माझ्या मागेमागे चालत यायला लागला , मला ते जाणवू लागले कि तो आपला पाठलाग करतो आहे. मी वेग वाढवला. एका गल्लीच्या कोपर्यावर त्याने मला थांबवले आणि विचारले कि मला tablets हव्या आहेत का. मी नको म्हणालो. तो म्हणाला तुझ्याकडे काही dollars असतील तर मी त्याची चांगली किंमत देयीन. मी नको म्हणून निघून जावू लागतो तेव्हड्यात दोन्ही बाजूंनी कर्कश्य होर्न वाजवत पोलिसांच्या गाड्या आल्या आणि काही कळायच्या आत सहा पोलिसांनी आम्हाला दोघांना घेरले.

पोलिसांनी माझी झडती घेतली , माझा passport पहिला तेव्हा मी थंडीतही घामाने संपूर्ण भिजलो होतो. मला passport परत देऊन तो पोलीस मला thanks आणि sorry म्हणाला. त्या माणसाच्या मागे पोलीस तीन दिवस होते. त्याने ड्रग्स विकायचा प्रयत्न केला का ह्याची जबानी देणारा माणूस त्यांना हवा होता . मी हो म्हणालो. एक सही केली आणि त्या माणसाला गाडीत टाकून , मला तसदी दिल्याबद्दल sorry म्हणून पोलीस निघून गेले.

CixnkjgWsAALnjl.jpg-large

                                   अपेयपान २०

स्वतःच्या आनंदासाठी काम करणारे आणि त्यात परिपूर्ण वाटणारे लहानपणी आमच्या आजूबाजूला कुणीही नसावे हि फार मोठी दुर्दैवी अशी गोष्ट होती. एकाही शहाण्या माणसाला तेव्हा असे वाटले नाही कि आपल्या मुलांना त्यांच्या कोवळ्या वयात हे सांगावे कि आपण जे काम आयुष्यभर करण्यासाठी निवडतो त्यात आपला आनंद असायला हवा. काम करायचे ते पैसे मिळवायला, पोटाची खळगी भारायला, संसाराचा गाडा ओढायला अशीच आणि फक्त अशीच उदाहरणे आमच्या डोळ्यासमोर होती .

आपल्याला अनेक वेळा आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना खूप कळते असे वाटत असते पण आपण थोडे मोठे झाल्यावर आपल्याला लक्षात येते कि आपल्या भोवतालची वयाने ज्येष्ठ माणसांची पिढी हि अतिशय घाबरट ,सरधोपट आणि शून्य दूरदृष्टी असलेली होती. पण आपल्याला हे कळते तेव्हा उशीर झालेला असतो आणि त्या पिढीने आपले खेळण्यातले माकड बनवून झांजा वाजवत नोकरीच्या आणि लग्नाच्या बाजारात विकायला काढलेले असते . आणि त्यांचा वंश आणि फालतू कुळाचार चालवण्याची सोय करून घेतलेली असते.

आईवडीलांना आणि एकूणच वयाने मोठ्या माणसांना काहीही कळत नसते .ती अतिशय साधी भित्रट आणि चारचौघांसारखे वागणारी माणसे असतात. ज्या ज्या मुलांनी प्रमाणाबाहेर जाऊन आपल्या आईवडिलांचे ऐकले आहे त्यांना पुढे आयुष्यात कंटाळा , नैराश्य आणि स्वतः वरचा राग ह्या भावनांना सामोरे जावे लागले आहे. आणि आईवडीलाना फाट्यावर मारायला आपल्याला कधीच कुणीच कुठेच शिकवत नाहीत . ते आपले आपल्याला समजून उमजून वेळेतच करावे लागते.

स्वतःच्या घराविषयी आणि आणि स्वत च्या परीसराविषयी आलेला राग आणि कंटाळा तुम्हाला नवे काहीतरी करायला प्रवृत्त करत असतो. त्यामुळे आईवडिलांनी आपल्या मुलाना योग्य वयामध्ये तो कंटाळा आणि राग येत असेल तर येऊ द्यावा आणि मुलांना चार पैसे देऊन सरळ देशोधडीला लावावे म्हणजे रखडत पडत झडत मराठी कुटुंबातली वरणभात खाऊन पुष्ट झालेली गोरीगोमटी बाळे योग्य वेळेत नव्या चार गोष्टी शिकतील.

असे जर केले नाही तर घराच्या अंगणात वाढवलेली अशी मुले आईच्या मांडीवरून बायकोच्या मांडीवर जातात आणि तिने बनवलेले उपासाचे पदार्थ भरवून घेतात. आणि अश्या मुली इतके दिवस वडिलांचे पैसे खर्च करीत असतात त्या आयुष्यातला उरलेला वेळ नवऱ्याचे पैसे खर्च करतात आणि तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून गावभर उंडारत बसतात. आणि महर्षी कर्वे रोडवरचे ट्राफिक उगाच वाढवतात. आमचे बहुतेक सगळे पुणे हे अश्याच माणसांनी भरलेले आहे.

माझ्या कुटुंबातील लोकांनी माझे आडवयात तयार होणारे राग , संताप आणि एखाद्या सांस्कृतिक डबक्याप्रमाणे वाटणाऱ्या पुणे शहराविषयी येणारा कंटाळा सहन केला आणि मला घर आणि शहर सोडून जायची परवानगी दिली त्यामुळे माझे किती भले झाले हे मी सांगूच शकत नाही.

जन्मागावाचा कंटाळा येणे आणि कुटुंबातील लोक अतिशय नकोसे होणे हि एका ठराविक वयात सहजपणे उद्भवणारी चांगली भावना आहे. ती मुलांच्या मनातून मारून टाकू नये. त्यांना घराबाहेर पडून प्रवास करायला , टक्केटोणपे खायला , चार ठिकाणी डोके आपटून फुटायला , दोन तीन फसवणूका व्हायला मदत करावी . मग मुले त्यांना जे करायचे आहे ते करून , चार अनुभव घेऊन घरी परत येतात. किंवा येत नाहीत. पण निदान एका ठराविक वयात त्यांनी ज्या गोष्टी करायला हव्या त्या ते करतात. प्रमाणाबाहेर चुका करण्याचे एक वय असते . त्या वयात त्या केल्या नाहीत तर आयुष्यभर फार मोठी चुटपूट मनाला लागून राहते. ज्या त्या वयात त्या त्या चुका करायलाच हव्यात. नाहीतर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय शिकवणार ?

काहीतरी मजेशीर घडते आहे सध्या . हल्ली पुन्हा तरुण मुलांमध्ये विशीतच लग्न करायची fashion आलेली दिसतेय. मध्ये निदान तिशी पर्यंत लग्न थांबवायचा विचार रुजू लागला होता. गेल्या महिन्यात आमच्या ओळखीतल्या दोन लहान लहान मुलांनी एकदम दोन लहान मुलींशी लग्नेच करून टाकली. एकदाही बाहेर कुठे affair नाही , चार दोन प्रेमभंग नाहीत . लग्नाआधी दोनचार शरीरे हाताळायला शिकेलेले नाहीत . वाटले- झाले- केले. अशी लहान लहान बाळे हल्ली लग्न करताना मी पाहतोय तेव्हा मला काळजीच वाटते. चुका करायच्याच राहून गेल्या बिचार्यांच्या. आता बसा बोंबलत. बाईला एकच बुवा आणि बुवाला एकच बाई . एकमेकांच्या कमरेचे घेर आयुष्यभर मोजत बसावे लागणार ह्यांना कायमचे .बसा आता एकमेकांची तोंडे पाहत.

नोकरी आणि लग्न ह्या दोन दगडांवर उभे राहून आनंदात आयुष्य घालवण्याचे शिक्षण आम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मराठी मध्यमवर्गीय समाजात राहून मिळाले. शिवाय दोन्ही एकच करायचे हे सांगणे न लगे . हळूहळू काळ बदलला तशी माणसे निदान एकापेक्षा जास्त नोकऱ्यातरी करू लागली. नोकरी मिळवणे , कुणीतरी ती आपल्याला उपकार केल्यासारखी देणे , ती टिकवण्यासाठी लाळघोटेपणा करत राहणे , जर ती गेली तर दुसरी मिळण्यासाठी जीव मुठीत घेऊन खटपट करत राहणे हे करताना आम्ही लहानपणीपासून सगळ्या वयाने मोठ्या माणसांना पाहत आलो. त्यामुळे आपल्याला आवडणारे काम करणे , ते काम करण्यासाठी योग्य शिक्षण घेणे , त्या कामासाठी त्या शिक्षणासाठी प्रवास करणे ह्या महत्वाच्या गोष्टी आमच्या आजूबाजूला आमच्याशी कुणी बोलेचना. मला तर लहानपणी हे खरं वाटत असे कि आपल्याला पण नोकरी करून लग्न करायचे आहे. बापरे. आज आठवले तरी अंगावर काटा येतो. आणि हे सुद्धा खरे वाटत असे कि त्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. किती भयंकर असेल ते. आवड , प्रेम आणि स्वभाव ह्या तिन्ही गोष्टीविषयी तर बोलायचीच सोय आमच्या शहरात नव्हती .

त्यानंतर एक नवीन प्रकार जन्माला आला तो म्हणजे नोकरी करणाऱ्या मुलींची स्थळे. एखाद्या मोठ्या भावाचे लग्न ठरणार असेल तर या विषयावर श्रीखंड खात चाललेली मोठ्या माणसांची चर्चा आम्ही मुले ऐकत असू . कुणाला नोकरी प्लस लग्न हे मुलीचे डबल sandwich चालणार असे किंवा कुणाला ते चालणार नसे. त्या नोकरी करणाऱ्या सगळ्या मुली ह्या “सर आमच्याकडे चैत्रगौर आहे , तर हाफडे सुट्टी मिळेल का?” ह्या प्रकारच्या असत. खरे काम आणि कष्ट करून काही स्वताचे मिळवायचे असेल तर त्या मुली पुणे सोडून मुंबई लंडन किंवा अमेरिकेत वेस्टकोस्टला जात .

पुण्यातल्या मुली ह्या ‘श्रीमंत नवरा मिळाला तर कशाला मरायला हि नोकरी करू’ ह्या मताच्या असत .बराचश्या मुली लग्नानंतर सासरचा होरा जोखून मस्त राजीनामे वगरे देऊन प्रेग्नंट होत. अनेक वर्षांनी मला पुण्यात feminist ह्या प्रकारच्या बायका भेटल्या त्या मला सांगत कि स्त्री ला घराबाहेर पडून काम,स्वाभिमान,स्वतःचे उत्पन्न वगरे अमुक तमुक लागते. पण आमच्या घरीदारी असले काही नव्हते. आमच्या कोण्याही काकवा माम्या वाहिन्यांना कुणालाही काम- स्वाभिमान वगरे काहीही नको होते. घर, बुडाखाली गाडी,पोरे आणि नोकर मिळाले कि कशाला मरायला लागतोय स्वाभिमान ? मुले जन्माला घालून त्यांना वेळच्यावेळी नोकर्यांसाठी अमेरिकेत पाठवणे हि घरच्या सुनेची मोठी जबाबदारी होती.

आम्ही मोठे झालो तेव्हा आमच्या आडनावाच्या लोकांना सरकारी आणि बँकेच्या नोकर्या मिळणे बंद झाले होते.हा देश आपल्या बुद्धीची आणि कुवतीची कदर ह्यापुढे करणार नाही हे सगळ्यांना लक्षात आले होते. जुने आणि मळकट झालेले,गोंगाटाने भरलेले पुणे शहर हे बाहेरच्या खेड्यातल्या आणि इतर छोट्या शहरातल्या लोकांचे घर बनू लागले होते. लोंढ्याने माणसे पुण्यात राहायला येऊ लागली. मूळ पुणेकरांची तरुण पिढी पटापट देश सोडून जाऊ लागली. काहीच वर्षात सानफ्रान्सिस्को जवळ नवे पुणे उभे राहणार होते. त्याची हि सुरुवात होती .

ह्या सगळ्यासोबत आमच्या शहराला एक गोडगोजिरी सांस्कृतिक बाजू पण होती . ती म्हणजे रंगभूमी वर काम करण्याची .ते मात्र सगळ्यांना करावेच लागत असे. पर्यायच नसे . नोकरी असो वा लग्न . रंगभूमी ही हवीच .अनेक लग्ने तर मराठी प्रायोगिक रंगभूमीमुळेच जमत असत. आमच्या पुण्याच्या ह्या सांस्कृतिक भरजरी रंगभूमीमय वातावरणाविषयी पुढील रविवारी .

IMG_1772

                                 अपेयपान २१

आजकाल पुण्यात प्रत्येक घरात एक मराठी चित्रपट दिग्दर्शक असतोच . ‘आपल्याला नाही जमणार तर कुणाला जमणार ?’ असे जे पुण्यातल्या लोकांना अनेक बाबतीत वाटत असते त्यापैकी मराठी सिनेमा बनवणे हि एक फार महत्वाची गोष्ट आहे. सध्या पुण्यात तो प्रत्येकाला बनवता येतोच किंवा बनवायचाच असतो. आमच्या इथे वाडेश्वर आणि रुपाली नावाच्या दोन जागा आहेत . जिथे बसून कॉफी पीत अजिबातच पुणे न सोडता , घरचे गरम जेवण न सोडता, सणवार सांभाळून , अनेक तरुण पुणेरी मुले, पुणेरी डॉक्टर,पुणेरी स्वतंत्र बाण्याच्या मुली हे सगळे रोज शेकडो मराठी सिनेमे जवळजवळ मनामध्ये बनवतातच.

आमचे अतिशय नावाजलेले फिल्म प्रोफेसर ,माझे अगदी जवळचे मित्र आहेत. माझा कान उपटून हातात देऊ शकतील असे समर नखाते . त्यांच्या घरची मोलकरीण आठ दिवस न सांगता गायब झाली. तर सगळे फार चिंतेत पडले होते कि बया आता मराठी चित्रपट बनवूनच परत येते कि काय? कारण अचानक सगळ्या बायकाही कामेधामे सोडून दिग्दर्शिका झाल्या आहेत. इतकी मोठी लागण झाली आहे कि मराठी चित्रपटाच्या वंशवृद्धीची काळजीच मिटली आहे.

पण पूर्वी असे नव्हते. म्हणजे आपल्याला सगळे काही येते असे पुण्यात सगळ्यांना वाटायचेच . पण माणसे चित्रपट बनवत नव्हती . तर मिळेल तशी मिळेल तेव्हा मराठी नाटके बसवत होती . त्याला रंगभूमीची सेवा करणे असे साजरे नाव असे. आणि नाटकात कामे करणाऱ्या कोणत्याही माणसाला ‘रंगकर्मी’ असे भारदस्त नाव असे.

प्रत्येक घरात , एकजण तरी नाटकात असायचाच . त्याला पर्याय नव्हता . शिवाय नाटकाच्या संस्था मोप असत. स्पर्धासुद्धा किलोभर . शिवाय गोऱ्या गुबगुबीत मुली त्यानिमित्ताने गप्पा मारायला, सोडायला- आणायला मिळत . सावळ्या मुलींना स्मिता पाटील चे एव्हडे करियर झाले तर आपलेही भले होईल असे वाटत असे. डॉक्टर मुलांना आपल्या रटाळ आयुष्याची भडास काढायची असे. जब्बार- सतीश ला जमते तर आपल्याला का नाही ? असे त्यांना प्रत्येकाला वाटत असे . नंतर नंतर सिनेमा नाटकात येण्यासाठीच मुले BJ मेडिकल कोलेजला जातात अशी अफवा होती . जरा दाढी वाढली कि आपल्यात तेंडुलकर आले आहेत असे वाटे. बाथरूम मध्ये नाहताना ‘त्या मोडक ला चाली देणे जमते तर मला का जमू नये ? ’ असे वाटे. “ तो चंदू काळे उंचीला इतका कमी पण काय हलवून सोडतो राव स्टेज मी पण दाखवतोच आता आमच्या बँकेच्या नाटकात कमाल!” अशी ईर्ष्या वाटे . त्यामुळे जमेल तशी जमेल तेव्हा नाटके लिहिली बसवली आणि पहिली जात. रात्री शहरभर, अगदी संपूर्ण शहरभर कुठे न कुठे वेगवेगळ्या नाटकांच्या तालमी चालू असत.

TA आणि PDA हे नाटकातले दोन सर्वात मोठे माफिया लोक. सर्वात जुन्या आणि मोठ्या संस्था. शिवाय अतिशय काळाच्या पुढे आणि सतत प्रयोगशील. ह्या नावांचे फुलफॉर्म माहित नसले तरी प्रत्येक नवा रंगकर्मी ह्या संस्थांना घाबरून असे. तरुण असायचे असेल तर TA आणि PDA तल्या लोकांचे अपमान करायचे म्हणजे आपण फार नवे प्रतिभावंत साबित होतो असे कोलेजातल्या मुलांना वाटे . सगळे सगळ्यांना दबून किंवा धरून राहत . पण ह्या दोन संस्थांमधील माणसांनी मराठी प्रायोगिक नाटकाची आणि सिनेमाची कालची आणि आजची अक्खी पिढीच्या पिढी घडवली. प्रत्येकाला तुमचा अपमान करावा वाटतो तेव्हा तुम्ही किती महत्वाचे झालेले असता ह्याचे उदाहरण म्हणजे ह्या दोन मोठ्या संस्था. त्या महाराष्ट्राच्या जणू दंतकथाच बनून राहिल्या होत्या.

अगदी सगळे आणि सगळे पुणेकर नाटक करीत असत. माझे मामा बहिणी माम्या आत्या ह्या सगळ्यांनी एकदा दोनदा तरी मराठी नाटकात कामे केली आहेत. बँकेत नोकरी करायची आणि संध्याकाळी नाटक करायचे हि बहुतांशी माणसांची आयुष्याची घडी होती . नाटकावर आपले पोट भरणार नाही हे ती करणाऱ्या माणसांना अगदी चांगले माहिती होते आणि त्यामुळे आपल्या आयुष्याच्या व्यवहाराची घडी सांभाळून कितीतरी सध्या घरातली माणसे हट्टाने नाटक करीत.

प्रत्येक घरात मोठ्या झालेल्या काही बायका असत ज्यांच्याकडे जुन्या प्रियकरांचे नाटकाच्या तालमीच्या वेळचे फोटो असत. नंतर उसवून जुने झालेले भलतीकडे केलेल्या लग्नाचे आयुष्य जगताना त्या बायकांना हे कोलेजातले तालमीचे फोटो मोठा आधार देत. अश्या कितीतरी बायका आणि मुली माझ्या ओळखीच्या आहेत ज्यांचा आयुष्यातले नाटक संपले . संपले म्हणजे संपूर्ण संपले आणि त्या कुठल्यातरी श्रीमंत घराच्या सुना झाल्या. आपल्या कर्तबगार मैत्रिणी मोठ्या नट्या झालेल्या पाहून त्या रोज tv पाहत हळहळत बसून राहिल्या. मुलांना आपल्या जुन्या नाटकांच्या आठवणी सांगू लागल्या आणि ‘डॉक्टर लागू मला ओळखायचे’ किंवा ‘मी काम केले आहे सोनाली कुलकर्णीबरोबर’ ह्या आठवणीवर धीर वाटून घेऊ लागल्या.

आमच्या घरात नाटकांची पुस्तके लहानपणीपासून वाचायला आजूबाजूला असत . शाळा कॉलेजात नाट्य स्पर्धांचे पीक होते. नाटक शहराच्या रक्तात सळसळत वाहत होते . नाटक करणाऱ्या माणसाला पूर्वी आमचे शहर एक प्रतिष्ठा आणि भरपूर प्रेम देत असे. त्या प्रेमापायी आणि त्या प्रतिष्ठेपायी कसलेही हिशोब न करता माणसे आपले आयुष्य नाटकाला देत असत. नाटक करून , प्रयोग संपून गेले कि त्याच्या आठवणीची उब ते नाटक करणार्यांना अजून अजून पुढचे काम करायची उर्जा देत असे. एकमेकांशी बांधून ठेवत असे.

जे नाटके करत नसत ते प्रेमाने पाहत असत . नाटकाच्या मोठ्या जिवंत प्रवाहाने माझ्यासारख्या त्यातले काही न समजणाऱ्या मुलालासुद्धा सोडले नाही . तीन चार वर्षाचा काळ मोहित ह्या माझ्या अतिशय गुणी आणि बुद्धिमान मित्रासाठी मी सपासप नाटके लिहित होतो ह्यावर माझा आता विश्वास बसत नाही इतकी मोठी ताकद त्या उर्जेत आणि वातावरणात होती . आणि ती नैसर्गिक होती त्यापासून वेगळे राहणे शक्य नसावे असे वातावरण पुण्यात होते.

आमच्या आजूबाजूच्या जवळजवळ सर्व तरुण मुलामुलींची लग्ने नाट्य संस्थांमुळे झाली. ह्या एका वाक्यात सगळे कळावे इतक्या प्रमाणात पुण्यात नाटकाचे वातावरण होते.

सिनेमा पूर्वीही उत्तम पण मोजका बनत असे. प्रेक्षक तो पाहत असत . हिंदी सिनेमेही पुष्कळ पाहत. पण त्या कशानेच नाटकाच्या वातावरणाला नख लागले नव्हते. ते टेलीव्हिजन मुळे लागले. केबल tv आला आणि मराठी नाटकाचे दिवस संपले . करणाऱ्यांचेही संपले आणि बघणाऱ्या प्रेक्षकांचेही संपले.

आज इतक्या मोठ्या शहरात फक्त दोन चार चांगली माणसे उरली आहेत ज्यांना काळाचे भान आहे. मुख्य म्हणजे ती मोजकी माणसे वयाने लहान आणि संपूर्ण आजची आहेत. त्यांना आठवणींचा धाक नाही . विजयाबाई , दुबे वगरे माणसांचे अनावश्यक गुरुपण ओढवून घेतलेले नाही .खूप जुने माहित नसल्याचा चांगला फायदा त्यांना आहे. ती माणसे प्रवास करतात , बाहेर जातात , इतरांमध्ये मिसळतात आणि सातत्याने आणि कष्टाने त्यांचे नाटक करत राहतात. ‘नाटक कंपनी’ आणि ‘आसक्त’ ह्या त्या दोन महत्वाच्या संस्था. मोहित टाकळकर आणि अलोक राजवाडे हि ती दोन उरलेली बहुदा शेवटचीच माणसे. भूतकाळाचे धाक नसले कि जो फायदा होतो तो ह्या संस्थांमधील दमदार मुलामुलींनी पुरेपूर कमावला आहे.

बाकी आता पुण्यात फक्त खूप प्रगल्भ कि काय म्हणतात तशी पन्नाशीची बुद्धिमान पण दमलेली माणसे उरलेली आहेत. तीच दहा पंधरा माणसे सगळीकडे दिसतात , वाद घालतात , आठवणी काढतात आणि पुन्हा दुसर्या दिवशी दुसऱ्या एका कार्यक्रमाला भेटतात. मराठी पुस्तकांच्या दुकानात गेले कि जशी तीच तीच पाच पन्नास जुनी चांगली पुस्तके असतात तशी आता पुण्यात तीच ती दहा पंधरा माणसे आहेत . मला ती माणसे फार आवडतात . ती मूक झाली असली तरी फार महत्वाची माणसे आहेत. आमच्या शहराचे नशीब त्यांच्या समजुतीवर आणि जाणीवेवर उठले आहे. सगळे काही शांत होत चालले आहे.

images

अपेयपान २२

आपले स्वयंपाकघर नक्की कसे असले पाहिजे ह्याची जाण मला आयुष्यात अगदी आत्ताआत्ता आली. गेली सोळा वर्षे मी माझे स्वयंपाकघर माझ्या कुवतीनुसार,आवडीनुसार आणि गरजेनुसार व्यवस्थित चालवत असलो तरी त्या जागेवर आपली छाप पडायला आणि त्याची रचना आणि चाल आपल्याप्रमाणे तयार व्हायला माझी एव्हढी सगळी वर्षे गेली याचे कारण सतत इतर लोकांकडे काही बघून आपणही ते वापरतात त्या गोष्टी वापरून किंवा त्यांच्यासारखे करून पहावे असे वाटण्याची माझी बाळबोध पण उत्साही वृत्ती. मी माझे स्वयापाकघर आजपर्यंत इतरांची नक्कल करत राहण्यात चालवले. आणि आता कुठे काही महिन्यांपूर्वी शांतपणे एकटाच एकट्याचा मोजका स्वयंपाक करत उभा असताना मला लक्षात आले कि आपला सूर आपल्याला सापडला आहे. आपली स्वयंपाकाची जागा आता आपल्याशी बोलूचालू लागली आहे. ती संपूर्णपणे आपली आणि आपल्यासारखी आहे.

मला स्वयंपाक करण्याची कल्पना आवडते . म्हणजे तो रोज करायला आवडतो असे अजिबात नाही तर मनाला वाटेल तेव्हा आणि जवळची माणसे घरी असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी करून खायला घालायला मला मनापासून आवडते. मला व्हायचेच होते शेफ ! एक छानपैकी restaurant उघडायचे होते. पण मी झालो चित्रपट दिग्दर्शक. बारावीची परीक्षा झाल्यावर मी दादरच्या केटरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा कि नाही ह्याचा विचार करण्यात बराच वेळ घालवला होता . पण मी तसा शास्त्रशुद्ध स्वयंपाक शिकायला गेलो नाही.

मी घरातून मुंबईला काम शोधायला जाण्याआधी घरी रोजचा स्वयपाक शिकून घेतला होता. लहानपणीपासून मी घरी आईवडिलांना स्वयपाकघरात एकत्र काम करताना पाहत आलो असल्याने स्वयपाकाची तयारी करणे , टेबल मांडणे , नंतर ताटेवाट्या धुवून ठेवणे हि कामे घरात सगळ्यांनी मिळून करायची असतात ह्याची मला सवय होती . स्वयपाक करायला जसे मी घरातून शिकलो तसं दुसऱ्या एका व्यक्तीकडून शिकलो ती म्हणजे आमचा चित्रपटदिग्दर्शक मित्र सुनील सुकथनकर. मी सुनीलला सहाय्यक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे आणि त्या काळात आम्ही शूटींगच्या निमित्ताने सतत प्रवास आणि एकत्र मुक्काम करत असू. आणि रोज संध्याकाळी काम संपताच सुनील आम्हाला नवीन आणि रुचकर असे काही नेहमी करून खायला घालत असे. सोबत मदतीला घेत असे . माझी खाणे बनवायची आवड त्या काळात रुजू लागली . कुणी आपण बनवलेले नीट आवडीने खाल्ले , पुन्हा मागून घेतले कि किती मोठे समाधान मिळते ! कुणी आपल्या घरी येऊन आपल्या स्वयंपाकघराचे कौतुक केले कि मला तर जणू बक्षीस मिळाल्याप्रमाणेच वाटते.

मी पाहिले आपापले स्वयपाकघर लावले ते माझ्या पार्ल्याच्या घरात. मुंबईतल्या पहिल्या घरात. तेव्हा मला गोष्टींचा अंदाज नव्हता. घरून आलेली अनावश्यक साठवणूक करायची देशस्थी सवय होती. एका माणसाचे स्वयपाकघर चालवणे हि मोठी कठीण गोष्ट असते. खरेदीचे , प्रमाणाचे , साठवणुकीचे अंदाज सारखे चुकतात आणि खूप सारे जेवण उरून बसण्याची सवय घरातल्या फ्रीजला होते. माझी अगदी सारखी चीडचीड होत असे माझ्या ह्या गलथानपणाबद्दल. पण घर चालवण्याची आणि त्यातून स्वयपाकघर चालवण्याची नीट अशी रीत सापडण्यात माझे जवळजवळ वर्ष गेले. मी तेव्हापासून इतकी घरे बदलली आहेत तरी सारखा नवीन काहीतरी शिकतोच आहे.

खूप वर्षे युरोपमध्ये प्रवास करत राहिल्याने आणि सतत तिथले सिनेमे पहिल्याने मला तिथल्या apartments मध्ये असते तसे सुटसुटीत स्वयंपाकघर आखण्याचा आणि चालवण्याचा मोह होत असे पण त्याचा ताळमेळ आपल्या भारतीय पद्धतीच्या स्वयपाकाशी बसत नसे. हे सगळे मी करत होतो तेव्हा चोवीस पंचवीस वर्षांचा होतो. त्या वयात सगळ्यांनाच इंग्लिश सिनेमात जगतात तसे जगायचे असते. मी पण कुठेही कमी नव्हतो.

पण भारतीय स्वयंपाक हि गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. ती तुम्हाला इंग्लिश सिनेमात दाखवतात तसे जगायला मोकळे सोडत नाही. गोष्टी भिजवणे, दळून आणणे , वाटणे , फोडण्या देणे , विरजणे, घुसळणे , मोड आणणे , चाळणे ह्या सर्व गोष्टी तुमचे कंबरडे ढिले करतात. तुम्ही tv वर दाखवतात तसा fashion चे कपडे घालून स्वयंपाक करत बसू शकत नाही. शिवाय तो करताना तुम्हाला संयम , शांतता , चतुराई , तत्परपणा ह्या गोष्टी शिकून घ्यावा लागतात . तरच स्वयंपाक बनतो. त्यामुळे तो करायची आवड असावी लागते. खेळाची आवड नसेल तर तो खेळ खेळता येत नाही तसेच स्वयपाकाचे आहे. त्याची आवड नसेल तर तो येत नाही इतके ते साधे सोपे आहे.

कुटुंबामध्ये जन्मापासून अनेक वर्षे राहिल्याने आणि एका पद्धतीचे जेवण जेवायची सवय असल्याने माझे पहिले स्वयपाकघर अगदीच आमच्या पुण्याच्या घराच्या शिस्तीत चालत असे. सामान आणणे , डबे भरणे , कपाटे लावणे , मिसळणाचा मसाल्याचा डबा भरणे ह्यावर आधी कितीतरी दिवस मूळ घरची शिस्त होती. फोडण्या घरच्यासारख्याच असायला लागत. मी जसा प्रवास करायला लागलो तसे झपाट्याने माझ्या आयुष्यात जर काही बदलले असेल तर ते म्हणजे माझे स्वयपाकघर.

इतर लोक कसे राहतात , जगतात हे पहिले कि परत मुंबईत येऊन लगेच त्या गोष्टींची कॉपी करावीशी मला वाटत असे. पण त्यावेळी आज जसे सहजपणे मिळते तशी मुंबईतसुद्धा स्वयपाकाची वेगळी भांडी , तेल , मसाले अशी जगभरची सामुग्री सहज मिळत नसे. परदेशात माझे अनेक मित्र एकटे राहत आणि घरी जेवण बनवत त्यांच्याकडून मी एकट्या माणसाचे स्वयपाकघर कसे चालवायचे ह्याच्या अनेक युक्त्या शिकलो. एकटे राहणाऱ्या माणसला मोठ्या बारकाईने आणि शिस्तीने रविवारी फ्रीज भरून ठेवावा लागतो . त्याची सवय लावून घेतली. भारतीय स्वयपाक मोजका करण्यासाठी काय काळजी घ्यायची हे हळू हळू उमजत गेले.

कमलाबाई ओगले ह्यांचे रुचिरा हे पुस्तक अफलातून आहे. माझ्या फ्रिजवर ते नेहमी ठेवलेले असे आणि मी पटापट ते वाचून उद्याचा स्वयंपाक आखून ठेवायचो . त्यावेळी मला मुंबईत काम शोधायचे होते ,माझ्याकडे घरात कामाला कुणी नव्हते आणि सकाळी घर सोडण्याआधी मला दोन डबे घेऊन बाहेर पडावे लागत असे.

मी हे प्रामाणिकपणे सांगायला हवे कि मला त्या काळात आवड आणि उत्साह असूनही चांगला आणि रुचकर स्वयंपाक करता येत नसे. कारण त्यासाठी मनाला जी शांतता आणि स्थैर्य लागते ते बहुदा माझ्याकडे नव्हते .माझा उमेदवारीचा काळ चालू होता आणि काम मिळवणे हि माझ्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट होती. मी धांदरटपणा करून खूप चुका करत असे .

असे असले तरी मला आजूबाजूला मुंबईमध्ये राहणाऱ्या माझ्याएव्हढ्या मुलांचा अतिशय कंटाळा यायचा . सकाळी उठल्यावर पहिल्या चहापासून खालच्या टपरीवर अवलंबून राहणारी कळकट आळशी मुले पहिली कि आपल्याला चुकीचा का होईना पण आपापला स्वयंपाक करता येतो ह्याचे मला बरे वाटायचे.

स्वयापाकाने त्या काळात मला मोठ्या शहरात नव्याने येणाऱ्या नैराश्यापासूनही लांब ठेवले. मला घरात सतत करायला काही न काही काम असे आणि एखादा दिवस रिकामा असेल तर मी सरळ दक्षिण मुंबईत art galleries मध्ये प्रदर्शने बघायला जात असे किंवा मित्रांना घरी गप्पा मारायला आणि जेवायला बोलावून काहीतरी बनवत असे. रिकामा वेळ माझ्यापाशी उरत नसे.

घर म्हणजे स्वयंपाकघर. बाकी सगळ्या खोल्यांनी घर उभे राहत नाही . ते फक्त स्वयपाकघराने उभे राहते. शहरात भलेबुरे अनुभव घेऊन , गर्दीतून वाट काढून दमूनभागून घरी परत आल्यावर ,ओट्यावर करून ठेवलेला साधा सोपा स्वयपाक मनाला शांत करतो हा माझा अगदी नेहमीचा अनुभव आहे. तो आपणच बनवलेला असायला हवं असं नाही . पण आपण कमावलेले पीठमीठ वापरून बनवलेला तो असावा . आपल्या घरातला असावा. आणि त्याने आपली दिवसाची बाहेरची सगळी तगमग शांत होवून आपल्या असण्याला एक अर्थ यावा. असे सोपे पण मोठे काम घरचे जेवण आपल्यासाठी करते.

IMG_1644

“अपेयपान” लोकमत मधील लेखमाला . भाग १३ ते १७ .

अपेयपान १३

 

पूर्वीच्या जगण्यामध्ये आमच्या आजूबाजूला मद्यपान करणे आणि मांसाहार करणे ह्या गोष्टींबद्दल कितीतरी मजेशीर वातावरण होते. त्या गोष्टी काहीतरी वाईट किंवा भयंकर आहेत अशी काहीतरी भावना . पण सगळेजण दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणत करत असत . अगदी आमच्या सोवळ्या सदाशिव पेठेत सुद्धा .

फरक हा होता कि कोणतीही गोष्ट करताना तारतम्य बाळगून करणे हे भारतात कधी शिकवले जात नाही आणि त्यामुळे संकोच आणि अपराध भावना . ह्यामुळे काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून दारूच्या बाटल्या किंवा चिकन घरी येत असे. मांसाहार करण्याचे अंतिम टोक म्हणजे चिकन खाणे असे . त्यापलीकडे आमच्यातले कोणी गेल्याचे मला आठवत नाही . काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रयोजन मला कधी कळले नाही. सगळेच काळ्या पिशव्यांमधून काय आणतात हे सगळ्यांना माहिती असेल तर मग चोरून आणि लाजून आणि ‘आम्ही नाही त्यातले’ असे म्हणण्याचे प्रयोजन कसे साध्य होणार असा मला प्रश्न पडत असे.

बर धार्मिक भावना वगरे असे काही असेल तर ते सगळे भुक्कड थोतांड होते. आमच्या घरात पार्टी असली कि सगळे एकजात स्टील च्या पेल्यामधून दारू पीत आणि आम्हा लहान मुलांना आम्ही कसे औषधच पीत आहोत असे सांगत . काही वेळाने आपापल्या बरळणाऱ्या आणि आउट झालेल्या नवर्यांना एक एक पतिव्रता आत नेवून झोपवत असे आणि आम्ही मुले घाबरून आपापली जेवणाची पाने साफ करत हा प्रकार पाहत असू.

मला आमच्या बिचार्या आईवडिलांचा पिढीची सतत दया येत राहते ती यामुळे कि आमच्या आजूबाजूची सगळी सुशिक्षित पांढरपेशा पिढी संकोचत आणि घाबरण्यात जगली .दारू पिणे आणि मांसाहार करणे ह्यात चांगलेही काही नाही आणि वाईटसुद्धा काही नाही . प्रत्येकाच्या जगण्याचा तो एक वैयक्तिक प्रश्न असावा . पण दिवसा सगळ्यांसमोर आम्ही कसे सोवळ्यातले शाकाहारी असे मिरवायचे आणि रविवारी दारे खिडक्या बंद करून आत तंगड्या तोडत ग्लासवर ग्लास दारू रीचवायची. असे करताना जो एक ओशाळ आनंद मिळेल तेव्हडा घ्यायचा कारण सतत आपल्याला कोण काय म्हणेल ह्याची भीती . सगळा समाज ह्या भीतीत राहत असे . मला नव्या जगात जगताना आजच्या काळातील सुट्ट्या कुटुंबव्यवस्थेत आणि मोठ्या शहरांमध्ये आश्वासक हे वाटते कि कुणीही कुणाला काहीही बोलू शकत नाही . निदान आमच्या आई वडिलांपेक्षा कमी संकोचाने आम्ही जगण्यातले रंगीत आणि अमान्य आनंद घेत राहतो. आम्हाला वर तोंड करून काही बोलायची सोय कुणाला आम्ही ठेवलेली नाही .

स्वतः कष्ट करून कमावलेल्या पैशाने उपभोग घ्यायचा नाही आणि उपभोग घेतलाच तर कुणालाळी कळू न देता गपचूप आपल्याआपल्यात दारे बंद करून तो घ्यायचा असे करणयात आमच्या पिढीच्या बहुतांशी लोकांची बालपणे गेली . ह्याचे कारण रिती आणि धर्म ह्याचा समाजावर असलेला अनावश्ह्यक पगडा . दुसर्या बाजूला आनंद कसा घ्यायचा आणि किती प्रमाणात घ्यायचा ह्याचे कधीही भारतीय कुटुंबात मुलांना न दिले गेलेले शिक्षण . अजिबात एखादी गोष्ट करायची नाही , एखादी गोष्ट आपल्यात चालत नाही एवढेच सतत सांगितले जाते. असे नसेल करायचे तर काय करावे , आनंद कसा घ्यावा , बेहोष मस्ती कशी करावी ह्याचे न घरी वातावरण असते न दारी. होकारार्थी संस्कारच नसतात. काय करू नये ह्याची अगडबंब यादी . त्यातून एकाबाजूला मनातून घाबरलेली आणि दुसर्याबाजूला सुखांसाठी हपापलेली पिढी तयार होते . आणि ती सर्व पिढी प्लास्टिकच्या काळ्या पिशव्यांमध्ये चिकन आणून बायकोला भरपूर खोबरे वाटून बनवायला सांगते आणि स्वतः भोक पडलेले बनियन घालून स्टील च्या ग्लास मध्ये दारू पीत क्रिकेट पाहत बसते. मराठी पांढरपेशा मध्यमवर्गाइतका घाबरट दुटप्पी आणि दुतोंडी वर्ग मी जगात अनेक ठिकाणी फिरलो तरी कुठेही पहिला नाही . ती आमच्या लहानपणीएक अद्वितीय जमात होती ती नशिबाने काळासोबत अस्तंगत होत जात आहे.

मला खोटी बंधने नुसती दाखवण्यासाठी पाळायला आवडत नाहीत . असे करणाऱ्या लोकांचा मला मनस्वी कंटाळा येतो .

घर, शहर ,जात आणि माझे बालपणीचे वातावरण सोडून बाहेर पडल्यावर मला गेल्या पंचवीस वर्षाच्या आयुष्याने संकोचाशिवायचा आनंद उपभोगायला शिकवला. मला अनेक मनस्वी, रंगीत, मनाने स्वच्छ आणि प्रामाणिक माणसे भेटली .‘नैतिक माज’ जो माझ्या पुणेरी मराठी बालपणात फोफावला होता तो विरघळून गेला. मला अनेक स्त्रीपुरुषांनी कसे—केव्हा– काय –खायचे प्यायचे , काय ओढायचे , कुठे ताणायचे , काय सैल करायचे ह्याचे मस्त शिक्षण देत देत लहानाचे मोठे केले . देशाबाहेर गेल्यावर पहिल्याच दिवशी समोर पानामध्ये ससा आला. गरम गरम लुसलुशीत . मी तेव्हापासून आपण कोणता प्राणी खात आहोत ह्याविषयी घृणा बाळगणे सोडून दिले. चवीवर आवडी निवडी ठरवल्या. त्याचप्रमाणे मैत्री करताना ,प्रेम करताना किंवा नुसते तात्पुरते शारीरिक संबंध मोकळेपणाने ठेवताना भीती संकोच शरम वाटणे कमी झाले. आपण काय करत आहोत ह्याच्या जबादारीचे भान आले. समोरच्या व्यक्तीच्या मनाचा आणि शरीराचा आदर कसा ठेवायचा ह्याचे ज्ञान जगण्यामधून मिळत गेले.भारतीय कुटुंबव्यवस्थेने हे जबाबदारीचे ज्ञान मला कधीही दिले नाही. इतर अनुभवांशी मिसळत , चुका करत , चार ठिकाणी थोबाडीत खात , रडतखडत जे काही मनाला आणि शरीराला सापडले तीच खरी मुंज होती. त्या ज्ञानाने एक अपार बेहोशी ,अपार उन्माद आणि त्यानंतर येणारी थंड शांतता पेलायला हळूहळू शिकवले.

आमचे सगळे घराणेच तसे रंगीत. त्यांचे औपचारिक आभार ह्या सगळ्यात मानायलाच हवेत. मी लहानपणी अनेक वेळा हे पाहत असे कि आजोबांचे हात लुळे असताना त्यांना बिडी प्याची हुकी येई तेव्हा आई बिडी पेटवून त्यांच्या तोंडात धरत असे. ते मजेत झुरके घेत . आमच्या सबंध घराण्यात एकही म्हणजे एकही पुरुषाने एकपत्नीव्रत पाळले नव्हते . अजूनहि आमच्यात ती पद्धत नाही. त्यामुळे आमच्या घरातील बायका फार सोशिक आणि शहाण्या आहेत . महा हुशार आहेत आणि सतत सावध असतात . आमची आई संपूर्ण कडक शाकाहारी पण तिचा नियम हा होता कि जी मौजमजा करायची ती घरात करा . हॉटेलात जाऊ नका . त्यासाठी ती चिकन , मटण मासे सगळे शिकली . दहावीत तिने मला बजावले कि मित्रांसोबत बाहेर जाऊन बियर वगरे पिऊ नकोस , काय करायचे आहे ते घरात मोकळेपणाने कर. व्यसनी बनू नका. माझ्या नजरेसमोर मोकळेपणाने राहा . माझा भाऊ त्याच्या निर्णयाने शुद्द्ध शाकाहारी राहिला , मला व वडिलांना तिने हवे ते करून खाऊ घातले. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ अश्या घरात मी वाढलो . पण ते आमच्या चौघांचे अतिशय खाजगी जग होते. प्लास्टिकच्या काळ्या पिशवीतून पापलेट घरी येत असे. अचानक कोणी आजी आजोबा छाप माणसे आली कि आम्ही लगेच शुभंकरोती वगरे म्हणत असू . मी तर लहानपणी सारखं दिसेल त्याच्या पायापण पडत असे. मला लहानपणी पाढे आरत्या असला सगळा मालमसाला येई ज्याने नातेवायिक मंडळी आणि शेजारपाजारचे गप्प होतात .

उशिरा का होयीना पण मला माझे शहर सुटल्यावर मला जगण्याची तालीम मिळायला सुरुवात झाली . ह्याचा संबध नुसता खाणेपिणे आणि चंगळ करण्याशी नव्हता . ती मी पुष्कळ केली पण त्यापेक्षा महत्वाचे मला असे वाटले कि सतत आपण कुणीतरी विशेष , शुद्ध आणि महत्वाचे आहोत आणि जग सामान्य चुका करणारे आणि खोटे आहे हा जो पुणेरी विश्वात खोटा माज होता तो प्रवास केल्याने आटोक्यात आला. मला नवे चार गुण शिकता आले . प्रमाणात साजरे केले तर किती सुंदरपणे बेहोष होता येते ह्याचे शिक्षण मला मराठी लोकांच्या बाहेर राहून मिळाले. शरीराचे आणि मनाचे सर्व आनंद उपभोगणं ह्याविषयी असणारा संकोच आणि भीती हळूहळू मनातून जायला मदत झाली . काळ्या प्लास्टिकच्या पिशवीची गरज भासेनाशी झाली.

 

IMG_0353

 

 

अपेयपान १४

वयाने मोठे होताना आपल्यामधील अनेक सवयी, जुन्या भावनांची वळणे आणि आपले वागणे असे सगळेच बदलत राहते. काही बाबतीत आपण संपूर्ण होत्याचे नव्हते असल्यासारखे वागतो , तर काही भावना आपल्या मनाला लहानपणीपासून चिकटून बसलेल्या अजिबात सुटता सुटत नाहीत.

मी लहानपणी अतिशय एकलकोंडा आणि हळवा मुलगा होतो. ज्याला घरकोंबडा म्हणता येईल असा. सतत बसून पुस्तके वाचणारा आणि घरी आल्यागेल्या सगळ्यांशी तासनतास गप्पा मारत बसणारा. कधीही खेळायला बाहेर न जाणारा . घरी आलेले कुणी जायला निघाले कि मला वाईट वाटून रडायला येत असे . कितीही कमी वेळामध्ये माझा माणसावर खूप जीव बसत असे . नंतरच्या आयुष्यात अतिशय घातक ठरू शकेल अशी हि सवय . माझा समोर आलेल्या माणसावर अतोनात विश्वास बसत असे आणि त्या व्यक्तीविषयी एक कायमची आपुलकी मनामध्ये काही क्षणात उमटत असे. एखाद्या सोप्या पाळीव कुत्र्याचे मन असावे तसे शेपूटहलवे मन माझ्या लहानपणीच मला लाभले . जागा आणि माणसे सोडून जाताना माझ्या मनावर त्यांचे दाट आणि गाढ रंग उमटत असत .

अश्या वेळी मी रडायचो . आणि मग घरचे मला समजवायचे कि अरे चिंचवडची मावशी थोडीच कायमची सोडून चालली आहे ? ती लगेचच परत येणार आहे . किंवा असे सांगायचे कि मी फक्त ऑफिसला जातो आहे , हा गेलो आणि हा आलो . आणि मग ती माणसं निघून जायची आणि बराच काळ पुन्हा समोर यायची नाहीत.

काही वेळा ती परत कधीही भेटायची नाहीत . माणसांप्रमाणे जागासुद्धा लुप्त व्हायच्या . काहीतरी melodramatic विश्वास होता माझ्या मनात , कि आता परत काही या जागी आपण येणार नाही . हि वेळ शेवटची . आमच्या शहरात विद्यापीठाच्या बाहेर एक सुंदर भव्य कारंजे होते पूर्वी . आम्हाला लहानपणी तिथे फिरायला नेत असत . त्या कारंज्याच्या तुषारांचा गारवा मला त्या बुजवलेल्या जागी धुरकट ट्राफिकजाम मध्ये आजही उभा असताना जाणवतो . मी ते कारंजे अचानक बुजवून नाहीसे झाल्यावर खूप उदास झालो होतो . ते कारंजे म्हणजे माझ्या शहराच्या दाराशी उभा असणारा हसरा दरबान होता. तो गेला. त्याने मला जाताना काही सांगितले नाही .

एखादी व्यक्ती आपल्याला ह्या आयुष्यात आता पुन्हा कधीही भेटणार नाही हा आपला मृत्यूच असतो. त्या व्यक्तीच्या नातेसंबंधात आपण जे काही तयार झालो असतो त्या आपल्या व्यक्तिमत्वाचा मृत्यू.

अनेक वर्षांपूर्वी जेराल्ड हा माझा मित्र Paris च्या एयरपोर्टवर मला आग्रहाने सोडायला आला. त्याच्या स्कूटरवर डबलसीट बसून फिरत मी दीडदोन महिने Paris पहिले होते . माझा तो चांगला मित्र झाला होता. त्या दिवशी सकाळी लवकर उठून गावाबाहेर लांब असणार्या एयरपोर्टवर तो का येतोय हे मला लक्षात येत नव्हते . कारण तसे वागायची उठसूट पद्धत युरोपात नाही . इमिग्रेशन करून आत जाताना मी वळलो आणि त्याला पाहून हसलो आणि टाटा केला . भेटूच लवकर . त्याने मला पुन्हा जवळ बोलावले आणि मला म्हणाला नीट राहा , काळजी घे आणि एकटा पडण्यापासून स्वतः ला जप . तो काय बोलतो आहे हे माझ्या मनात नीट उमटले नाही कारण मी चार महिन्यांनी भारतात घरी परत जाण्याच्या आनंदात होतो . फोन करू कि , e मेल पाठवू कि . आणि मी येइनच ना परत पुढच्या वर्षी . मला असे सगळे वाटत होते . मी त्याला हसून होकार दिला आणि वळलो . ती आमची शेवटची भेट असणार होती . तो जाणीवपूर्वक माझा नीट शांत निरोप घेत होता हे मला लक्षात आले नाही. मी परत आलो आणि काहीच दिवसात जेराल्ड paris मधून काहीतरी गूढ घडल्याप्रमाणे गायब झाला. फोन बंद, घर सोडले आणि स्वतः चे नामोनिशाण पुसून टाकले. विरघळून गेला आणि संपला. अजूनही त्याच्या मृत्यूची कोणतीहि बातमी आलेली नाही . त्याच्या दुक्खांनी त्याला गायब केले आहे . मी त्या दिवशी त्याच्या निरोपाची खूण ओळखली नाही.

मी त्यानंतरच्या काळात माझ्या माणसाना स्टेशनवर आणि एयरपोर्ट वर न्यायला आणि सोडायला जायची सवय स्वतःला लावून घेतली. फोन , e मेल ह्या गोष्टींवरचा माझा सर्व विश्वास उडून गेला आणि समोर दिसणारा माणूस दिसेनासा होताना त्याला नीट भरीवपणे पाहून घ्यायला मी शिकलो.

शिवाय एक दुसरी गोष्ट मी फार सावकाशपणे शिकलो . जी करायला कुणी शिकवत नाही . ती म्हणजे आपण शेवटचा निरोप घेत आहोत हि भावना न संकोचता शांतपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवणे. एका ओळीमध्ये लिहायला आता सोपे जात असले तरी ते वळण घ्यायला मला अनेक संकोचलेल्या क्षणांचा अनुभव घ्यावा लागला.

लिफ्ट चा दरवाजा बंद होताना , स्टेशनवरून ट्रेन हलताना , जिना उतरून गाडीत बसायच्या आधी वर खिडकीकडे पाहताना आपल्याला लक्षात आलेले असते कि हि शेवटची भेट आहे . काही वेळा एका व्यक्तीला किंवा काही वेळा दोघांनाही कळलेले असते . आपण खोटे हसून आणि काहीच कसे घडले नाहीये असे एकमेकांना सांगत ती वेळ मारून नेत असतो . नाते संपत आलेले माहित असते पण चांगला निरोप घेण्यासाठी जी शांत शब्दसंपदा लागते ती आपण माणूस म्हणून कमावलेली नसते . ती कमवायला हवी.

हि समजूत सावकाश येत गेली तसं मी माणसांचा नाही तर जागांचा आणि शहरांचा निरोपही नीट घ्यायला शिकलो. आवडत्या जागा आणि शहरे ह्या आवडत्या व्यक्तीच असतात . कधीही मृत्यू न होणार्या व्यक्ती . आपण त्यांना सोडून जातो . त्या तीथेच असतात . माझ्यात अजूनही एक भाबडा मुसाफिर आहे ज्याला जग अगदी तळहातावर सामावेल एव्हडे सोपे आणि छोटे वाटते आणि कुठूनही निघताना असे त्या शहराला सांगावे वाटते कि हा मी आलोच जाऊन परत. पण कसचे काय ? कामांच्या रगाड्यात आणि जगण्याच्या उग्र प्रवाहात आपण तिथे परत कधीही जाणार नसतो . त्या जागेचा तसा एकमेवाद्वितीय अनुभव आपल्याला परत कधीही येणार नसतो .

गीझेला मन्सूर नावाच्या एका अतिउत्साही आणि प्रेमळ बाईच्या घरी पाहुणा म्हणून जर्मनीतल्या ब्रेमेन शहरात मी काही दिवस राहिलो. तिने माझे अतिशय लाड केले , गाडीत घालून शहर फिरवून आणले. आमच्या पुण्यात ब्रेमेन चौक आहे तसा तिथे पुणे चौक आहे तिथे नेऊन आणले आणि अश्या सर्व प्रसंगांना येतो तसं निघायचा दिवस भरकन येऊन उभा ठाकला. गीझेला मला स्टेशनवर सोडायला आली आणि मी तिला म्हणालो कि गाडी सुटेपर्यंत आपण गप्पा मारू . ती म्हणाली थांब तुझा ब्रेकफास्ट झाला नाहीये मी तुला फळे विकत आणून देते ती गाडीत खा . ती तिथल्या फळांच्या stall कडे पळाली आणि काही मिनिटात गाडी सुटली.

माझे लहानपण संपावे आणि त्या आठवणींच्या जाळ्यातून मुक्त व्हावे म्हणून मी काही महिन्यांपूर्वी माझ्या रिकाम्या शाळेच्या इमारतीला जाऊन हे सांगून आलो कि आपला संबंध आता संपला. मी आपल्या जुन्या आठवणींच्या नात्यामधून आता मोकळा होत आहे.

मला पूर्वी भाबडेपणाने आवडणारे आणि मोठा झाल्यावर अजिबात न पटणारे भैरप्पा ह्या कन्नड लेखकाचे एक पुस्तक मी एकदा विमानांत जाणीवपूर्वक विसरून आलो. जुन्या उग्र अत्तराची एक बाटली शांतपणे बेसिनमध्ये रिकामी केली . एका जुन्या नात्याचे कपाटातले कपडे गुलझारांचे ऐकून बांधून परत पाठवून दिले आणि सोबत टवटवीत फुले.

एकदा पहाटे उठलो तर माझ्या मुंबईतल्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा मेसेज फोनवर वाचला . आपण ह्यापुढे परत काही काळ भेटायला नको. तो निरोप मी शांत श्वास घेऊन पचवला. तिचे आभार मानले . ह्या सुसंकृत कृत्याबद्दल .

आपण गर्दीतून वाट शोधत बाहेर आल्यावर आपल्याला कुणी न्यायला आलेले असणे ह्यासारखे दुसरे सुख नाही आणि आपल्याला कुणी शांतपणे वाहनापाशी सोडायला आलेले असणे ह्यासारखे मनावर गूढ वलय दुसरे नाही . मी नेहमीच सोडायला आलेल्या माणसाशी हल्ली शांत प्रेमाने वागतो आणि गाडी निघताना नक्क्की मागे वळून पाहतो .

 

IMG_0320

 

अपेयपान १५

 

कोणत्याही साधारण तरुण माणसाला हे विचारा कि आकाश समीर आणि सिद हे कोण आहेत ? कुठून आले आहेत ? त्या माणसाने कोणताही विचार न करता’ दिल चाहता है’ असे उत्तर दिले तर तो साधारण किती वयाचा आहे आणि साधारण कोणत्या काळात जन्मला ह्याचा अंदाज घेणे सोपे जाते . जर त्या बिचाऱ्या माणसाला फार काही आठवले नाही , तर त्याला विचारा रान्चो, राजू आणि फरहान कोण आहेत ? जर त्याने ‘थ्री इडीयटस’ असे लागेच उत्तर दिले तर ते बाळ थोडे लहान आहे , आत्ताच मिसरूड फुटलेले आहे असे समजावे .

प्रत्येक पिढीचा एक सिनेमा असतो . जो त्या त्या पिढीला हलवून सोडतो आणि भरपूर उर्जा देतो. आमची ‘दिल चाहता है’ ची पिढी आहे. ह्या सिनेमामुळे आम्ही चांगल्या हेयर styles शिकलो . gogle घालायला शिकलो. आपल्या लहानपणीच्या सिद्धार्थ नावाच्या मित्राला सिद म्हणायला शिकलो आणि अजून काही मित्र गोळा करून कोल्हापूरमार्गे गोव्याला जायला शिकलो. पण असे असले तरी आम्ही आई वडिलांना सांगून जातो . उगाच तसले काही भलतेसलते वागत नाही . आणि लगेच सोमवारी परत पण येतो .

महाराष्ट्रात तुम्ही नुसते तरुण असून ,किंवा नुसते श्रीमंत असून किंवा फक्त हुशार असून भागात नाही . कारण त्या सगळ्या उर्जेचे आणि आपल्या स्मार्टपणाचे काय करायचे ह्याचे उत्तर आपल्या मराठी समाजाकडे , आपल्या संगीताकडे , आपल्या रोजच्या जगण्याकडे कधीच नसते . आपण दिग्गज लोकांचा आणि महापुरुषांचा देश आहोत आणि तरुणांच्या अंगात उधळायला जी रग काठोकाठ साठलेली असते त्याचे काही करायची सोय ह्या बहु असो कि संपन्न , प्रिय अमुच्या देशात नाही . कारण आमच्या राज्यात स्मारके बनवण्याचा जास्त उत्साह आहे. मौजमजा करणे आम्हाला पटणारे नाही . आमच्या राज्यातली तरुण मुले आधी हिंदी सिनेमे बघतात आणि मग त्यातले हिरो जे काही करतील त्याची कॉपी करून स्वतः च्या मोकळेपणाची आणि बेभान होण्याची हौस भागवून घेतात . मराठी सिनेमातले हिरो पाहून आपण फक्त मातृप्रेम ,लग्न( वेळच्यावेळी ), कुलादैवताची आराधना , पूर्वजांच्या वास्तू बिल्डरपासून वाचवणे किंवा शेतीवाडी एव्हडेच करू शकतो. जगण्यासाठी आणि स्वप्न पाहण्यासाठी मराठी हिरो कामी येत नाहीत. कारण त्यांची पोटे आपल्या एव्ह्डीच किंवा आपल्यापेक्षा जास्त सुटलेली असतात आणि त्याच्न्ह्यातल्या अनेकांपेक्षा आपल्या गल्लीतील अनेक पोरेपोरी जास्त बरी दिसत असतात.

‘दिल चाहता है’ मुळे आमच्या सगळ्या साध्या बिचाऱ्या आणि साळसूद घरातून आलेल्या तरुण मुलामुलींना हाफचड्ड्या आणि हिरवे निळे gogle घालून गोव्याला जाऊन फुल्टू मजा करायची सवय लागली. जी गोव्याला जायला लाजली ती उरलेली आदर्शवादी बाळे ‘रंग दे बसंती’ सारखा साधारण देशप्रेमी सिनेमा पाहून प्रेरित होत राहिली आणि आदर्शवादाची अफूची गोळी घेऊन पुण्यात बसून सामाजिक चर्चा करत बसली . जे हुशार होते ते तडक मित्र गोळा करून गोव्याला गेले.

मी फरहान अख्तरला जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी त्याला हे म्हणालो कि गोवा सरकारने तुम्हाला दर महिन्याला पैसे दिले पाहिजेत त्यांचे पर्यटन कैक पटींनी वाढवल्याबद्दल !

महाराष्ट्रातून मुलेमुळे गोव्याला आणि मुलीमुली स्वतंत्रपणे अलिबाग किंवा गुहागरला जातात. असं एकत्र उठून गोव्याला गेलेले आमच्या मराठी संस्कृतीला अजिबात मान्य नाही . आणि शिवाय आपापले गेलेलेच बरे असते असे माझ्या काही तरुण मित्रांनी मला गपचूप गाठून सांगितले . कारण नाहीतर मग रशियन मुलींकडे मोकळेपणाने बघत बसता येणार नाही.

युरोपातल्या राज्यसत्ता भारतातून निघून गेल्यावर त्यांनी आपल्यासाठी जी अनेक सुंदर हिलस्टेशन आणि अप्रतिम जुनी ठिकाणे नीट राखून ठेवली त्यापैकी गोवा हे एक आतिशय महत्वाचे असे एक रत्न आहे. अजूनही भारतीय लोकांच्या मनातील ह्या जागेविषयी असलेले बेफाम आकर्षण आटोपलेले दिसत नाही . आपल्या सुंदर कोकणाला लागून असलेला हा निसर्गरम्य किनार्याचा भाग पोर्तुगीज लोकांनी आणि जगभरातून आलेल्या साठीच्या दशकातील हिप्पी लोकांनी अतिशय गूढ आकर्षक आणि रंगीत बनवला . निसर्गसौदर्यात कोकणची किनारपट्टी गोव्यापेक्षा अजीबातच कमी नाही . कोकणाचा अतिशय नेटका शांत आखीव बाज आहे . पण तिथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गोव्यात देशभरातून आणि जगभरातून इतकी माणसे सतत येत राहतात याचे कारण तिथे मोकळे आणि बेभान व्हायला आपणच आपल्या मनाला परवानगी देतो आणि मनातील भीती संकोच बाजूला सारून हवे तसे वागतो , समुद्रात पोहतो , चार रंगीत व्यसने करतो .

आपल्याला परदेशी लोकांसारखे काही दिवस वागून पहायचे असते आणि गोवा तुम्हाला तसे करण्याची मुभा देतो हे भारतीय तरुण मुले गोव्याला का निघून जातात ह्यामागचे महत्वाचे कारण आहे . आणि दुसरे अतिशय चुकीचे आणि वाईट कारण असे आहे कि तिथे दारू स्वस्त आहे . दारूवर तिथे कर नसल्याने इतर ठिकाणहून रासवटासारखी येऊन माणसे तिथे पीत बसतात .

आपल्या समाजात आपल्याला आनंदाचा उपभोग घ्यायला आपल्या कुटुंबामधून कधीच शिकवले जात नाही .आणि मग जिथे चोरून आनंद घेता येतो तिथे जाऊन आपण हपापल्यासारखे वागून मन शांत करून घेतो आणि परत घरी येऊन वेगळा मुखवटा धारण करून आपले कौटुंबिक आयुष्य जगत राहतो

उत्तरेच्या अश्वेम पासून खाली पणजीजवळच्या कांदोळी पर्यंत गोव्याचे पर्यटकांनी बुजबुजलेले किनारे आपल्या शरीराची आणि मनाची सर्व प्रकारची भूक ताबडतोब भागवायला सज्ज असतात . गोव्यात पोचताच हॉटेलांवर सामान टाकून देशभरातून आलेली तरुण मुले मुली दारू सिगरेटी गोळा करून किनार्यावर धावतात आणि युरोपीयन माणसे त्यांच्या सिनेमात समुद्रकिनार्यावर जशी वागतात त्याची बिचारी नक्कल करताना दिसतात . कारण आनंदाने जगण्याचे आपापले मॉडेल आपण बनवू शकत नाही . आपल्याला सुट्टी घालवण्यासाठीसुद्धा कुणाचीतरी कॉपी करावी लागते . कारण नसताना आपण उघड्या अंगाने किनार्यावर पुस्तके वाचत पोट वर करून गोर्या माणसांप्रमाणे लोळतो . जमत नसतानाहि फेसबुकवर फोटो टाकता यावेत म्हणून बीच volleyball खेळतो , उगाच खोल्यांमध्ये दिवसभर gogle घालून बसतो , मोठ्या hats घालून सुसाट गाड्या चालवतो पण पोहताना मात्र आपण लांब हाफ चड्ड्या आणि पंजाबी ड्रेस घालतो . किनारे घाण कारून टाकतो.

खरा गोवा हा ह्या किनार्यांपासून थोडा आतवर आणि शांत जागी आहे . काही मोजक्या जाणकार पर्यटकांना त्या जागा माहित असतात ज्यांची जाहिरात केलेली आपल्याला कधीच कुठे दिसणार नाही .

ह्या गोव्यात जगभरातून आलेले अनेक लेखक , कवी आणि चित्रकार राहतात . शांत वाहणाऱ्या नद्या आहेत . छोटी सुरेख गावे आहेत , निर्मनुष्य समुद्र किनारे आहेत . आणि जुन्या भव्य पोर्तुगीज वास्तू आहेत जिथल्या खोल्या राहण्यासाठी काही दिवस मिळतात . दारू , पब्स आणि पार्ट्या ह्याच्यापलीकडे गोव्यात आतमध्ये गेलो कि फार मस्त माणसे आणि निवांतपणा आहे . पावसाळ्यात किनार्यावरचे बुजबुजलेले आखीव पर्यटन बंद होते तेव्हा गोवा एक वेगळे सुंदर स्वरूप धारण करतो . शांतता पचवायची ताकद असलेले अनेक जाणते पर्यटक ह्या काळात जगभरातून गोव्यात येतात आणि कुणालाही कळणार नाही अश्या अतिशय सुंदर गावांमध्ये प्रशस्त घरांमध्ये राहतात . लिहितात , गिटार वाजवतात , नवीन गाणी तयार करतात , चित्रे काढतात , पोहतात , पावसात फिरायला जातात. गोव्यातली स्थानिक माणसे अतिशय रंगीत शांत आणि आपुलकी असलेली आहेत. त्यांचे जेवण , त्यांचे सणवार , मराठी आणि हिंदू समाज आणि ख्रिश्चन समाज यांच्यात असणारे छोटे खटके , वाद , त्या सगळ्यासकट चालणारी त्यांची आयुष्य ह्या गोष्टी दिसल्या , भेटल्या कि फार मजा येते.

खूप माणसाना एखादी गोष्ट समजली कि माणसे तिथे जाऊन त्या जागेची वाट लाऊन टाकतात . त्यामुळे हा जगापासून लपून असलेला आतला गोवा तसाच खाजगी राहावा असे मला मनापासून वाटते .

 

IMG_1293

अपेयपान १६

 

जिथे पर्यायी विचार करणाऱ्या लोकांची सतत खिल्ली उडवली जात असे अश्या वातावरणामध्ये मी लहानपणी वाढलो. पर्यायी विचार करणारे लोक म्हणजे ज्यांना पर्यावरणाचे रक्षण करायचे आहे , ज्यांना स्त्रीवादाचा अभ्यास करायचा आहे , ज्यांना जातीपातींवर आधारलेली समाजाची घडी बदलायची आहे , ज्यांना अंधश्रद्धेविरोधी जागृती निर्माण करायची आहे असे आणि अश्या प्रकारचा वेगळा विचार करणारे लोक. परंपरेने चालत आलेल्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने पाहणारे .

माझ्या लहानपणीच्या शहरात पुरोगामी वातावरण आहे असे वरवर भासत असले तरी शहरातील बहुसंख्य समाज हा अश्या लोकांची चेष्टा करणे , त्यांच्याविषयी नाराजी असणे आणि शक्यतो आपली मुलेबाळे अश्या माणसांच्या नदी लागू नयेत ह्याचा काळजीत असायचा . शिक्षण , चांगल्या पगाराची नोकरी , वंशवृद्धी ह्याच्यापलीकडे कुणी कसलाही विचार करायला उत्सुक नसे. सुरक्षित परंपरेत जगणारी माणसे सुखाने तुस्त झाली असली तरी घाबरलेली असत आणि कुणीही आपली जगण्याची सुरक्षित चाकोरी मोडून बाहेर पडू नये असे त्यांना वाटत असे. वेगळा विचार करणारा माणूस किंवा संस्था हि धोकादायक मानली जात असे. त्यामुळे कौतुक करून मारून टाकणे हे जे मराठी माणसांचे ताकदवान अस्त्र आहे त्याचा वापर अश्या माणसांवर समाज करत असे. कुणी काही वेगळे करताना दिसला कि त्याचे सत्कार , कौतुक वारेमाप करून त्याला महाराष्ट्रात संपवून टाकले जाते. त्यामुळे अनेक चांगल्या माणसांचे आमच्याकडे सत्कार , त्यांची व्याख्याने , त्यांच्यावर पेपरात रकाने असे सगळे होत असले तरी समाजजीवनात अश्या माणसांची हेटाळणी केली जात असे.

ह्याच मनोवृत्तीतून ऐंशी नव्वदच्या दशकातील जुन्या पुण्यामध्ये समाजवादी ,पर्यावरणवादी , स्त्रीमुक्तिवादी , गांधीवादी माणसांना आणि संस्थांना थोडे हिणवण्याची प्रवृत्ती होती. पुणे हे वेगवेगळ्या संस्थांनी गजबजलेले शहर असले तरी त्याचा चेहरा हा पारंपरिकच होता . जुना इतिहास खणत बसणे आणि आपण पूर्वी कसे वैभवशाली आणि बलवान होतो ह्या असल्या विषयांवर काम करणाऱ्या माणसे आणि संस्थांचे पुण्यात लाड होत.

अनिल अवचट ह्या लेखकाने सर्वप्रथम मध्यमवर्गीय सामान्य वाचकापर्यंत जगण्याचे दुसरे उपलब्ध पर्याय आपल्या लिखाणातून मांडायला सुरुवात केली आणि चाकोरीबाहेरचे आयुष्य जगणाऱ्या अनेक माणसांची , संस्थांची आणि विचारांची ओळख त्यांच्या प्रांजळ ,खऱ्या आणि रोचक लिखाणाने महाराष्ट्राला झाली . त्या वेळी महाराष्ट्रात छोट्या स्वतंत्र ग्रंथालयांचे ( libraries ) जाळे होते आणि माणसे पुस्तके विकत घेत तसेच मोठ्या प्रमाणात ह्या ग्रंथालयांच्या मेंबरशीप मधून अनेक पुस्तके वाचायला घरी आणत . अनिल अवचटांची पुस्तके ह्या ग्रंथालायांमार्फत महाराष्ट्रात प्रचंड पोचू लागली आणि त्याच्या प्रवासप्रीय वृत्तीमुळे ते लोकांना सहजपणे भेटू लागले . आमच्या पिढीला non fiction लिखाणाची गोडी लावण्याचे मोठे काम त्यांच्या साहित्याने केले. तोपर्यंत कथा कादंबरया आणि मराठी अश्रुप्रपाती नाटके हेच आमच्यासाठी साहित्याचे स्वरूप होते. मला आठवते त्याप्रमाणे आमच्या पिढीचा शालेय आदर्शवाद घडत असताना आम्ही मोठ्या प्रमाणावर अवचटांच्या पुस्तकांनी भारावले गेले होतो.

हा नव्वदीचा काळ अर्थाव्यवस्थेच्या मुक्तीचा आणि प्रामुख्याने digital क्रांतीचा काळ होता . आर्थिक आणि जातीय संक्रमणे मोठ्या प्रमाणावर होत होती . उच्चवर्णीय समाजामध्ये आपापल्या मुलांना लवकरात लवकर शिकवून ह्या देशाबाहेर काढणे हा एकमेव पर्याय होता कारण आरक्षणामुळे सगळ्यांचे धाबे दणाणले होते. त्यांमुळे देश सोडून अमेरिकेला जाणे आणि तीथे आपल्या बुद्धीचे आणि श्रमांचे चीज करून घेणे हा आमच्या पिढीचा अतिशय महत्वाचा कार्यक्रम होता . त्यामुळे वेगळे काही काम करण्याच्या विचाराने एका बाजूला भारावून जाणे आणि दुसर्या बाजूला अमेरिकेला , इंग्लंडला किंवा कॅनडा ला जाण्यासाठी शिक्षणाचे आणि नोकरीचे पर्याय शोधणे अश्या तीव्र संभ्रमात आमची पिढी बराच काळ होती. आपण जे वाचतो , ज्या चांगल्या माणसांना भेटतो आणि आणि त्यांच्या विचारांनी , कामांनी भारावून जातो ती माणसे आणि त्या संस्था आपले जगण्याचे प्रश्न कसे सोडवतील अश्या चर्चा तरुण पिढीच्या निर्णयप्रक्रियेत होत असत. मी स्वतः शालेय शिक्षण संपताना सोबातच्या मित्रांसोबात अनेक वेळा ह्या चर्चा केल्या आहेत.

मेधा पाटकरांचे नर्मदा आंदोलन , आमटे कुटुंबियांचे आनंदवन , अभय आणि राणी बंग ह्यांचे गडचिरोलीत चालणारे काम , पुण्यातील मिळून सार्याजणी ह्या मासिकाच्या सानिध्यात जिवंत असलेली स्त्रीवादी विचारांची चळवळ , अवचट कुटुंबियांचे व्यसनमुक्तीचे काम ह्या आणि अश्या अनेक छोट्या मोठ्या चळवळी , आंदोलने , विचारप्रवाह आमच्यासमोर येत होते आणि आपण काहीतरी करून ह्यापैकी कोणत्यातरी कामामध्ये स्वताहाला जोडून घेऊ , काही नव्या गोष्टी शिकू असे महाराष्ट्रात खूप तरुण मुलामुलींना वाटत असे. प्रश्न होता तो ह्या सगळ्या दिशेला आपल्याला नेयील किंवा मार्गदर्शन करेल असं कोणताही ओळखीचा चेहरा आणि व्यक्ती कुणाच्याच आजूबाजूला नव्हती त्यामुळे अनेक वेळा मुलामुलींचे हे विचार म्हणजे फक्त त्यांची आदर्शवादी स्वप्ने राहत . पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे हे एकमेव जोडपे असे होते कि जे दशकानुदशके सर्वसामान्य माणसाची ह्या संस्थांशी आणि माणसांशी गाठ घालून देत होते . ते दोघे आमच्या वेळी सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातून निवृत्त झाले होते आणि सगळ्या सामाजिक कामांना एका आखीव NGO सारखे स्वरूप यायला लागले होते. सामान्य माणूस आणि सामाजिक कामे ह्यांच्यातला दुवा संपत चालला होता.

महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे स्थान ह्या काळात नगण्य असल्याने सामान्य माणसापर्यंत पोचण्याचा जो एक प्रवाही दृष्टीकोन असतो तो पर्यायी विचार करणाऱ्या माणसांनी आणि संस्थांनी नव्वदीच्या दशकात गमावला होता. ग प्र प्रधान , एस एम जोशी ह्या प्रभावी विचारवंतांच्या निर्वृत्तीनंतरचा हा काळ . आता ह्या विचारला आणि कार्यक्रमाला राजकीय पाठबळ नव्हते आणि सामाजिक कामात नव्या पिढीचे रक्ताभिसरण नव्हते. जी माणसे होती ती मुख्यतः त्यांच्याच कुटुंबातील असत ज्यांना पूर्वीपासून अश्या विचारांची सवय किंवा वैचारिक सक्ती होती . त्यामुळे एकमेकांचे कौतुक करणे आणि एकमेकांना पाठींबा देणे अश्या मर्यादित आणि साचलेल्या स्वरुपात ह्या संस्थांच्या कामाचा प्रसार नव्वदीत आणि त्यानंतरच्या काळात होत असे. ह्या संस्थांनी चालवलेली अनेक उत्तम आणि सकस लिखाणाची मासिके हि फक्त त्याचे विचार आधीच पटलेली माणसेच वाचत असत . नव्या तरुण पिढीशी आवश्यक असणारी प्रवाही देवाणघेवाण ह्या संस्थांकडून होत नव्हती आणि त्यामुळे पुण्यात पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या माणसांची छोटीछोटी बेटं तयार होवू लागली होती.उन्हाळ्याच्या सुट्टीत जाऊन शिबिरे करतात तितपतच नव्या तरुण पिढीचा ह्या संस्थाशी संबंध होता. साठ सत्तर सालातला सामाजिक आदर्शवाद संपत चालल्याची घंटा वाजू लागली होती पण बहुदा ती ऐकून स्वतः मध्ये काही बदल करावेत असे वातावरण दिसत नव्हते . त्यामुळे पर्यायी आणि सामाजिक क्षेत्राविषयी एक मोठ उदासीनता शहरी बुद्धिवादी वर्गात ह्या काळामध्ये पसरली . आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसे हि फक्त सत्कार करण्याच्या वस्तू झाल्या.

समाजाला सत्कार करायला आणि देणग्या द्यायला नेहमी अशी माणसे लागतात . कारण सत्कार करणारा माणूस त्यामुळे जास्त नाव कमवत असतो. आदर मिळत असला तरी त्याचा अर्थ समाजाचा मनातून ह्या गोष्टीना पाठींबा असेल असा होत नाही .हि गोष्ट सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना कळली होती असे दिसले नाही .

महाराष्ट्रातील अनेक संस्थांना आता समाज बदलला आहे , समाजाचे प्रश्न बदलले आहेत ह्याची जाणीव कधीही झाली नाही . आर्थिक वातावरणाचे भान काही केल्या आले नाही. गांधीवादी विचारसरणीतून उत्पन्न झालेला ग्रामसुधारणा आणि ग्रामीण समाजव्यवस्थापनाचा जुना एककलमी कार्यक्रम हि माणसे दोन हजार साल उजाडले तरी राबवत बसली. तीच ती दहा बारा माणसे एकमेकांची पाठराखण करत बसली . स्त्रीवादी विचारांची महाराष्ट्रातल्या स्त्रियांनीच मजेत कत्तल केली असे आज दिसते . बहुतेक संस्थांचे काम हे त्यांच्या सोयीच्या आणि सवयीच्या लांबच्या ग्रामीण भागात सुरु राहले आणि शहरी सामातून ह्या माणसांनी स्वतःची दृष्यात्मकता नाहीशी केली. सामाजिक काम म्हणजे लांब गावात जाऊन काही माणसांना काहीतरी सतत शिकवणे . प्रश्न फक्त ग्रामीण समाजाला असतात . आपल्या रोजच्या जगण्याशी आपल्या प्रश्नाशी ह्या माणसांचा काही संबंध नसतो अशी जाणीव शहरी तरुण वर्गात मोठ्या प्रमाणत पसरली आणि ठराविक सेलेब्रिटी माणसांची आत्मचरित्रे वाचणे ह्यापलीकडे मराठी समाजाने ह्यानंतरच्या काळात सामाजिक क्षेत्राशी संबंध ठेवला नाही.

आजच्या काळात पुरोगामी माणूस हा शब्द पद्धतशीरपणे चेष्टा करण्यासाठी आणि खिल्ली उडवण्यासाठी राजकीय हेतूने वापरला जातो तेव्हा मला वाईट वाटते . आणि असे का झाले असावे ह्याचा महाराष्ट्राने विचार करायला हवा असे वाटते. हि प्रक्रिया पद्धतशीरपणे फार पूर्वी सुरु झाली . त्याचे पक्व फळ आपल्याला निराशाजनक वातावरणात आज दिसते आहे.

 

sachin snap on set .jpeg

 

अपेयपान १७

 

जिवंत आणि कार्यरत लेखक वाचकाला आणि आजूबाजूच्या लेखकांना सातत्याने आत्मभान देत असतात . मी आज टेबलापाशी बसून लिहिताना माझ्यासमोरच्या लाकडी फडताळात महेश एलकुंचवार ह्यांची नाटकांची आणि ललितलेखांची पुस्तके ओळीने समोर उभी दिसताहेत. सध्या दर रविवारी एका वृत्तपत्रात त्यांचे एक सदर चालू आहे. आजही भारतात कुठे न कुठे त्यांनी लिहिलेल्या नाटकांच्या तालमी आणि प्रयोग सतत चालू आहेत .मी ज्या गतीने आणि तालाने वाचन करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त उर्जेने आणि कमालीच्या शिस्तीने गेली अनेक वर्ष महेश एलकुंचवार गांभीर्याने आणि सातत्याने लिखाण आणि वाचन करत आहेत.

माझ्या अतिशय आवडत्या,जिवंत आणि कार्यरत भारतीय लेखकांपैकी महत्वाचे असे हे लेखक.

गेले अनेक दिवस मी प्रयत्नपूर्वक सध्याच्या कार्यरत लेखकांचे जगभरातले साहित्य वाचत आहे. त्यात फ्रेंच लेखक मिशेल विल्बेक , ब्रिटीश लेखक जेफ डायर , नायजेरियन अमेरिकन लेखक टेजू कोल , जपानी लेखक हारूकी मुराकामी , कॅनडीयन लेखिका मार्गारेट अट्वूड , भारतीय लेखक अमिताव घोष आणि महेश एलकुंचवार . महेश एलकुंचवार हे माझ्या मातृभाषेत मराठीमध्ये लिहितात. जिवंत आणि कार्यरत लेखकांचे साहित्य वाचल्याने मला वर्तमानात जगण्याची सवय लागली आहे. हे वाक्य वाचायला वाटते तितके गुळगुळीत आणि सोपे नाही . ह्याचे कारण मानवी मनाला वर्तमानाचे भान शक्यतो टाळायचे असते . आणि त्यामुळे आपण सातत्याने गोंजारणारे आणि गालगुच्चा घेणारे काहीतरी सतत वाचत किंवा पाहत असतो. उत्तम आणि ताजे साहित्य आपल्याला मोठ्या गुंगीमधून जागे करते.

ह्याचा अर्थ असा होत नाही कि हे सगळे च्या सगळे लेखक वर्तमानाविषयीच लिहितात . अमिताव घोष आणि महेश एलकुंचवार तसे करत नाहीत. तरीही ते माझ्या काळात हे दोघे सातत्याने कार्यरत असल्याने मला वाचक आणि लेखक म्हणून हे लेखक आजच्या जगण्याविषयी अतिशय जागे ठेवत आले आहेत.

आपण अनेकवेळा तरुण आणि बंडखोर हे शब्द फार उथळपणे जिथे तिथे थुंकल्यासारखे वापरतो. सोपे करून टाकले आहेत आपण ते शब्द. एलकुंचवार ह्यांचे लिखाण सतर्कपणे वाचले कि तरुण दाहक आणि बंडखोर लिखित साहित्य त्यांच्यानंतर मराठीत तयार झालेले नाही हे आपल्या लक्षात येते. एकवेळचे किंवा दुवेळचे लेखक महाराष्ट्रात किलोभर आहेत. बंडखोर , पुरोगामी वगरे माणसे तर आपल्याकडे रद्दीसारखी आहेत. तरुण तर महाराष्ट्रात सगळेच असतात त्याला काही तोटाच नाही आणि अनेकविध स्त्री लेखिकांनी मराठी साहित्याचे आठवणी पुसायचे पोतेरे करून टाकले आहे. अनेक पुरोगामी वैचारिक साक्षरांना तसेच पत्रकारी पाणचट लिखाण करणार्यांना महाराष्ट्राने लेखक म्हणून उगाच लाडावून ठेवले आहे. त्या लोकांना ह्या चर्चेत नक्कीच बाजूला ठेवायला हवे.

शिस्त आणि सातत्य ह्या दोन्ही गुणांनी बहरलेले , प्रखर सत्याची आस धरलेले आणि आयुष्यातल्या एकटेपणाचा दाहक मुलामा असलेले ललित लेखन महेश एलकुंचवार ह्यांच्यानंतर महाराष्ट्रात कुणालाही साध्य झालेले दिसत नाही. अजूनही .

एलकुंचवार शिस्त ,सातत्य आणि कामावरचे अतोनात प्रेम ह्या बाबतीत अतीशय जुन्या वळणाचे ब्रिटीश आहेत. त्यांच्या मांडणीत, शब्दसंपदेत लेखन प्रवाहात आणि भावनांच्या अविष्कारात ते जागोजागी जाणवते. त्यांच्या लिखाणातल्या दुखऱ्या आणि बोट चेपून काळेनिळे पडलेल्या मनाच्या पात्रांनी मला सातत्याने त्यांच्या लेखनाची वाट पाहायला लावली आहे . मला ते लिखाण कालसुसंगत वाटते आणि ते लिखाण माझे सातत्याने पोषण करीत राहते.

लिहायला बसले कि लक्षात येते कि आठवणींना आणि भूतकाळातील व्यक्तींना लिखाणात आणणे हे किती अवघड आणि जबादारीचे काम आहे. त्याचा घाट घालता येत नाही . तो अवघड असतो . आठवले आणि बसून लगेच लिहून काढले असा मराठी साहित्यिक पद्धतीचा तो मामला नसतो . अनेक वर्षे सातत्याने भारतीय रंगभूमीला एकापेक्षा एक चांगली आणि ताकदवान नाटके देवून झाल्यावर अचानक एका टप्प्यावर एलकुंचवारांनी ललित लिखाणाला आपलेसे केले आणि मला आणि माझ्यासारख्या अनेकविध वाचकांना सकस बुद्धिनिष्ठ ताज्या साहित्याचा नवा झरा मराठी भाषेत आल्यासारखे वाटले. ‘मौनराग’ वाचून मी आतून हलून गेलो आणि लिहिण्याची क्राफ्ट ज्याला म्हणतात त्याचा एक ताजा आणि अतिशय original असा अनुभव त्या लिखाणापासून मला येऊ लागला . असे म्हणतात कि शेतकऱ्याप्रमाणे लेखकानेही वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे पिक घेऊन आपला कस राखून ठेवायचा असतो. आपल्या सवयीचा फॉर्म मोडायचा असतो . तसे काहीतरी एलकुंचवारांनी केले .आणि एकदाच करून ते थांबले नाहीत. गेल्या दशकभरात सातत्याने त्यांनी वैयक्तिक स्मृतींना सुबक आणि तेजस्वी स्वरूप दिलेले ललित लेखन सातत्याने चालू ठेवले आणि ते प्रकाशितही करत राहिले. लिखाण आणि प्रकाशन हे दोन्ही स्वतंत्र निर्णय असतात आणि ते दोन्ही निर्णय लेखकालाच घ्यायचे असतात. प्रकाशनाचा निर्णय हा जबाबदारीचा निर्णय असतो . त्याचा एक खाजगी ताल असतो. महेश एलकुंचवार ज्यांच्या निर्णयामध्ये मला त्यांनी निवडलेला तो ताल ऐकू येतो. तो सातत्याचा ताल आहे. विलंबित शांत चालीने जाणारा.

प्रकाशन करणे , प्रकाशित करणे ही किती सुंदर क्रियापदे आहेत ! प्रकाशित करणे ह्या क्रियापदाला जी दृश्यात्मकता आहे तिला न्याय देणारे शांत उग्र आणि तरीही आतून हळवे असे लिखाण एलकुंचवारांकडून सतत येत आहे. एखादी जखम दुर्लक्षिली जाऊन त्यातून बारीक रक्त वाहतच राहावे तसे हे लिखाण. अतिशय खाजगी असले तरी त्याला साहित्याचे स्वरूप कष्टाने आणि सातत्याने काम करून दिलेले दिसते. ते पुन्हा उघडून वाचले तरी मनातले कसलेसे जुने दाह कमी होतात आणि रडू येऊन मोकळे झाल्यासारखे वाटते. मला एकटेपणाचा आणि अनाथपणाचा एक बोचरा शापासारखा गंड मनात फार पूर्वीपासून आहे . त्यावर काही वेळ फुंकर घालून शांत झाल्यासारखे वाटते.

पुण्यात फिल्म इंन्सस्टीटयूटला शिकत असताना पहिल्या वर्षात पटकथा हा विषय शिकवायला महेश एलकुंचवार आमच्या वर्गावर आले आणि माझे विद्यार्थी म्हणून फार चांगले दिवस त्यांच्यामुळे सुरु झाले . त्यांनी आम्हाला संगीताचे भान दिले आणि लिखाणाचा आणि संगीताच्या श्रवणाच्या मूलभूत संबंध उलगडून दाखवला. शिक्षक म्हणून त्यांनी मला दिलेले हे एक महत्वाचे भान. ते एका वर्षासाठी पुण्यात राहायला आले होते आणि त्यांनी आमच्या लिखाणाच्या वर्गाला एक हसरे मोकळे आणि जिवंत स्वरूप दिले. त्यांच्या प्रकृतीच्या अतिशय विरुद्ध असे वागून त्यांनी आम्हाला त्यांच्या परिसरात यायला जायला मुभा दिली . कितीतरी प्रकारचे संगीत त्यांनी आम्हाला सातत्याने ऐकवले . किती वेगळ्या प्रकारच्या दृष्टीने लिखाणाकडे पाहायला शिकवले . शब्दांना दृश्यात्मकता देण्याचा अवघड प्रयत्न त्यांनी आम्हाला न घाबरता अनेक छोट्या लिखाणाच्या उपक्रमांमधून करायला लावला. आणि मग वर्ष संपताच ने निघून गेले.

मी अनेक वर्षांनी ‘डेड पोएट्स सोसायटी’ हा अप्रतिम इंग्रजी सिनेमा पहिला तेव्हा मला एलकुंचवारांचे पुण्यातील सानिध्य आणि त्यांनी मर्यादित काळासाठी निर्माण केलेली जवळीक आणि मैत्री खूप आठवली . तो चित्रपट साहित्याचे विद्यार्थी आणि त्यांचा एक अफलातून शिक्षक ह्यांच्या नात्याविषयी आहे.

मराठी लेखकाच्या सामान्य स्वरूपाला नाकारून , त्याला एक भारदस्त आणि अप्राप्य असण्याचा जुना ब्रिटीश आयाम एलकुंचवारांनी दिला म्हणून माझे ते माणूस म्हणूनही अतिशय लाडके आहेत. एक शिक्षक ,लेखक आणि माणूस म्हणून माझे त्यांच्यावर प्रेम आहे. मी त्यांना मराठी साहित्यातला शेवटचा प्रिन्स म्हणतो कारण त्यांचे ठाशीव शीस्तबद्द आणि मोहक असे काम .आणि ज्याला इंग्रजीत unbelonging म्हणतात तशी समाजापासून थोडे लांब जाऊन एखाद्या राजपुत्रासारखे राहण्याची सुंदरपणे जोपासलेली प्रवृत्ती. महाराष्ट्रात ती अजुनी नवीन आहे. कारण आपण अजूनही बेशिस्त आणि अघळपघळ समाज आहोत. पण नागपुरात उगाच जाऊन जातायेता एल्कुन्चवारांकडे उठबस करता येत नाही . त्यांचा मोजका सहवास आपल्याला कमवावा लागतो. मला त्यांनी जोपासलेला हा ब्रिटीश शिष्टाचार खूप आवडतो .

त्यांनी मला खाजगीत जर काही माणूस म्हणून बहाल केले असेल तर ते म्हणजे त्यांच्या आणि माझ्यामधील एक अंतर आणि शांतता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अपेयपान ‘लोकमत ‘मधील लेखमाला भाग ९ ते १२

अपेयपान ९

मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो कि तुम्ही चित्रपट दिग्दर्शित करण्याचे कसे आणि केव्हा ठरवलेत . त्याचे प्रामाणिकपणे उत्तर दिले तर मात्र लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. कसे ठरवलेत हे थोड्या विस्ताराने सांगावे लागते पण कधी ठरवलेत ह्याचे उत्तर मात्र शाळेत असताना असे आहे . मी हे उत्तर दिले कि लोक “ काय काहीपण सांगता काय ? शाळेत कुणाला काही माहिती असते काय?” असे म्हणतात. पण त्यांना तसे वाटणे स्वाभाविक असले तरी माझ्या बाबतीत ते खरे घडले.

त्याला काही प्रमाणात घरच्या व्यक्ती जबाबदार आहेत .माझे आजोबा, आईचे वडील घरात सगळ्यांना सांगत कि एक वेळा उपाशी राहा, दोन कपडे जुने नेसा पण शुक्रवारी लागणारा नवा हिंदी सिनेमा चुकवू नका. त्यांना सिनेमाची भारी आवड होती. त्यामुळे ते हिंदी सिनेमाचे वेड आपसूकच त्यांच्याकडून आईकडे आणि मग माझ्याकडे चालत आले. साधे व्यावसायिक हिंदी सिनेमे बघण्याचे व्यसन. १९७२ साली माझी आई माहेरी वसईला राहत असताना तिने डिम्पलचा bobby पाहिला आणि घरात बंड करून short skirt घालणे सुरु केले. अशी माझी आई . माझ्या वडिलांच्या वडिलांना दादा कोंडके भारी आवडत. दादांचा सिनेमा लागला कि ते मस्त झकपक कपडे करून जाऊन पाहून येत .

आणि माझ्या वडिलांना हिंदी सिनेमाचा मनस्वी कंटाळा . ते इंग्लिश सिनेमाचे मोठे Fan . आमच्या घराजवळचे अलका चित्रपटगृह तेव्हा फक्त आणि फक्त इंग्लिश चित्रपटच दाखवे . बाबा मला खूप लहान असल्यापासून ते पाहायला नेत.आणि उत्तम ब्रिटीश आणि hollywood च्या चित्रपटांची विस्मयकारी दुनिया हि माझ्या वडिलांमुळे माझ्या आयुष्याचा भाग बनली.

मराठी सिनेमा आमच्या घरात पहिला जात नसे कारण त्या काळी तो फारच वाईट टुकार दर्जाच्या बनत होता आणि मराठी नाटकांना न माझे आई वडील जात न त्यांनी कधी आम्हाला नेले.त्या दहा बाय दहा फुटाच्या स्टेज वर चार माणसे इकडे तिकडे फिरत मोठ्याने बोलणार .त्यात काय मजा ? त्यापेक्षा ग्रेगरी पेक किंवा ओमार शेरीफचा चांगला सिनेमा पहा असे बाबांचे मत

बाबा मला शनिवारी tv वर लागणारे भालजी पेंढारकर , राजा परांजपे , जब्बार पटेल इत्यादी जुन्या लोकांचे सिनेमे आवर्जून पाहायला सांगत. त्यामुळे बरीच वर्षे मराठी सिनेमा काळा पांढरा असतो आणि हिंदी सिनेमा रंगीत असतो असे मला वाटे.

आपली मुले आपल्याला हवी तशीच नीट वाढवली जावीत असे प्रत्येकच आई वडिलांना वाटते. बर त्यात त्यांचे एकमत असतेच असे नाही .त्यामुळे जवळजवळ दर शुक्रवारी अमिताभ ,विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा ह्यांचे सिनेमे आई आणि मावशीसोबत जाऊन विजय चित्रपटगृहात पहायचे आणि दर रविवारी अलकाला जाऊन वडिलांसोबत इंग्लिश सिनेमे पहायचे ह्यात माझा मस्त वेळ जाई . आई इकडे येत नसे आणि बाबा तिकडे येत नसत पण दोघे माझे खूप लाड करत . लाड म्हणजे हळद तेल लावलेले ते पूर्वीचे popcorn आणि रंगीत आणि थंडगार goldspot .

अमीर खानचा ‘कयामत से कयामत तक’ येईपर्यंत सिनेमाचे सगळे निर्णय आईवडील घेत . त्या चित्रपटापासून आमचे सगळेच बदलले आणि आम्ही सर्वार्थाने वयात येऊन स्वतंत्र झालो .

मला सिनेमा फार म्हणजे फार आवडे . मी जे काही शिकायचो ते जवळजवळ हिंदी सिनेमे पाहून . माझी भावनिक वाढ मी जे सिनेमे पाही त्याप्रमाणे होत होती. प्रेम , सेक्स, हिंसा , लबाडी , त्याग अश्या अनेक खऱ्या आणि आवश्यक भावनांची हिंदी सिनेमामुळे माझी ओळख झाली. नाहीतर मराठी साहित्य वाचून जवळजवळ सखाराम गटणे होण्याची वेळ आमच्यावर आली असती . कारण आमच्या घरात समग्र वपु , समग्र पुल , मृत्युंजय आणि ती रमा माधवांची एक कोणतीतरी प्रसिद्ध कादंबरी . पेशवाई वरची, ज्याचे नाव मी आता विसरलो. खेळ खलास. एव्हडीच पुस्तके होती . हिंदी आणि इंग्रजी सिनेमाने माझे खऱ्या अर्थाने उत्तम पोषण करत ठेवले . सिलसिला , जंजीर , दिवार , मुक्कदर का सिकंदर ( ह्याचा अर्थ मला अजुनी कळत नाही), बेताब , मासूम , मिस्टर इंडिया  वाह वाह वाह !  सिनेमाच्या व्यसनी घरामध्ये अमचे बालपण फार मस्त चालू होते.

मी साहजिकच आणि आपसूकच ठरवले होते कि आपल्याला असे काहीतरी नाट्यमय करून गोष्ट सांगायची आहे .गोष्ट सांगायला आवडायची .गौतम राजाध्यक्ष ह्या व्यक्तीचे माझ्यावर अगणित उपकार आहेत ह्याचे कारण अगदी नेमक्या त्या काळात त्यांनी सुरु केलेले ‘चंदेरी’ हे मासिक . अतिशय नेमकेपणे आणि जाणतेपणे गौतमने तयार केलेलं चंदेरी मी नियमित वाचू लागलो आणि मला सिनेमाच्या जगाविषयी ओढ तयार झाली .

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळी घरी आलेला VCR . त्यामुळे थेटरमध्ये न बघता येणारे सगळे सिनेमे घरी भरपूर बघता येऊ लागले. ‘राम तेरी गंगा मैली’ पाहायला आपल्याला आई वडील का नेत नाहीत ? चला त्याची कॅसेट आणून गुपचूप घरी पाहू . एकदा तर मला ‘सागर’ पाहायला आईने नेले तर दारावरच्या क्रूर माणूस  ‘ह्या लहान मुलाला आत सोडणार नाही’ असे म्हणाला. त्यामुळे डिम्पलचा तो लाल साडीतला सुंदर शॉट घरी video वर पहावा लागला. शिवाय हे पण ठरवता आले कि आयुष्यात आपल्याला काय व्हायचे नाहीये . ‘हम आपके है कोन’ मध्ये जो मोहनीश बहल होता , सतत नम्र, अल्यागेल्यांच्या पाया पडणारा आणि रेणुका शहाणेसोबत सतत हसत बसणारा,  आपल्याला तसे पुचाट तुपकट व्हयाचे नाही हे पण कळले आणि सतत घरच्या लोकांसोबत नाचत बसायचे नाही हे सुद्धा ठरवता आले .

आणि मग दोन मोठ्या गोष्टी घडल्या . १९८९ साली ‘चालबाज’ आला. श्रीदेवीचा डबल रोल असणारा , सीता और गीता ह्या जुन्या चित्रपटाचा रिमेक . मी तो इतक्या प्रेमाने आणि इतक्या वेळा पहिला कि मी आधीचे- पुढचे- मागचे- वरचे- खालचे- शेजारचे- पाजारचे सगळे काही विसरून गेलो . मी तेव्हा सातवीत होतो . आणि मी ठरवले कि बस , जर काही आयुष्यात करायचे तर असे काही करूया. श्रीदेवीने मला उलटे पालटे करून ह्या सिनेमाच्या जगात नेवून विकून टाकले. मी तिचा ऋणी होतो आणि आहे .

आणि अचानक मला एक दिवशी आई म्हणाली कि किशोरीमावशींचा आशुतोष एक हिंदी सिनेमा बनवतोय . रविना टंडन आहे त्यात . मी फुल खल्लास . माझा आ वासलेला बंदच होयीना. त्या सिनेमाचे नाव होते ‘पहेला नशा’. म्हणजे आपण ज्याला अनेक वेळा  भेटलोय आणि ओळखतो तो माणूस डायरेक्ट सिनेमाच बनवतोय. म्हणजे असे करणे शक्य आहे , आपल्याला पण. आजूबाजूचे आणि  ओळखीचे कुणी असे करतय म्हटल्यावर मला फारच धीर आला .मी तर त्यावेळी ठरवलेच कि जर कुणी मला आता विचारले कि “बाळ , मोठेपणी तू काय करणार ?” तर आपण डॉक्टर , सैन्य , समाजसेवा , इंजिनियर असे काही न म्हणता  थेट उत्तर द्यायचे “ काका , मी सिनेमा बनवणार”

पुढचे सगळे प्रवास अतिशय अवघड होते पण शाळा संपताच तीन वर्षाच्या आत मी फिल्म च्या सेट वर clap देत होतो.  मी तेव्हा सतरा वर्षाचा होतो . आणि तेव्हापासून आजपर्यंत मी दुसरे कोणतेही काम केलेलं नाही.

मला अनेक वर्षांनी यश चोप्रा भेटले तेव्हा मी कधीही करत नाही ती एक गोष्ट केली ती म्हणजे त्यांना नीट वाकून नमस्कार केला. खूप मनापासून केला. ते माझ्या सेट वर काही वेळ आले होते आणि  माझ्यासोबत monitor जवळ उभे होते. मी मनात इतका खुश झालो , कि ज्याचे नाव ते. त्यांनी मला फिल्म स्कूल मध्ये जाण्याआधी , खूप लहानपणापासून सिनेमा शिकवला होता.

IMG_1553

 

अपेयपान १०

घरातून कामाच्या आवडीने बाहेर पडल्यावर आणि जगात एकटे फेकले गेल्यावर आपल्याला घराची, सुरक्षिततेची आणि आपल्या माणसांची खरी किंमत कळते , ह्याचा मला फारच गडद असा अनुभव येत राहिला आहे . ह्याची एक दुसरी बाजूसुद्धा आहे . ती सांगतो .

काम करताना मला अनेक तरुण मुले मुली भेटत राहिली ज्यांचे आईवडील आमच्या चित्रपटक्षेत्रात होते. किंवा आमच्या क्षेत्रात नसले तरी अतिशय नावाजलेले ,प्रसिद्ध किंवा ज्याला समाजात स्वयंप्रज्ञ म्हणता येतील असे होते. मी अगदीच माझ्या मर्जीने आणि स्वभानुसार घाईने जगाचा अनुभव घ्यायला बाहेर पडलो होतो. आमच्याकडे न भरमसाठ पैसे होते न समाजात मोठी पत किंवा ओळखीपाळखी होत्या. फक्त आईवडिलांचे प्रॉमिस होते कि तुला केव्हाही काहीही लागले तरी आपले घर उघडे आहे आणि तुझ्या सगळ्या निर्णयांना आमचा पाठींबा आहे . मी सरळ त्या ताकदीवर C A चा कंटाळवाणा अभ्यास सोडून चित्रपटक्षेत्रात उमेदवारी करायला सुरुवात केली होती .

ज्यांचे आईवडील मोठे लेखक ,चित्रपट दिग्दर्शक ,कलाकार ,गायक किंवा समाजात नाव कमावलेले विचारवंत होते त्या मुलांचा मला फार हेवा वाटे .असे वाटत राही कि ह्यांना किती सोपे आहे सगळे करणे .साध्या साध्या कामाच्या पहिल्या संधी ह्यांना किती सहज मिळतात ? ह्यांना काही सल्ला लागला,मार्गदर्शन लागले तर किती सहज  मिळत असेल. ह्याचे कारण ह्यांचे प्रसिद्ध आईवडील. मी मुंबईला राहायला आलो तेव्हा मला मुंबईत जन्मलेल्या माझ्या आजूबाजूच्या मुलामुलींचासुद्धा हेवा वाटत असे. ह्याचे साधे कारण त्यांची मुंबईत राहती घरे होती आणि काही जणांच्या आपसूकच चित्रपटक्षेत्रात ओळखी होत्या.ह्या जन्मतः मिळणाऱ्या सुखसोयी मला त्या काळात फार आकर्षित करत.कारण तुमच्या उमेदवारीच्या काळातला खूप मोठा आर्थिक आणि मानसिक ताण ह्या सगळ्याने कमी होत असतो .

पण आज मला, मी साध्या घरातून आलो आणि माझे आईवडील फार कुणी प्रज्ञावंत, विचारवंत आणि महत्वाचे नव्हते ह्याचे फार म्हणजे फारच बरे वाटते .कारण त्यामुळे माझे फार भले झाले.आणि अतिविचारी अतिप्रसिद्ध आणि ताकदवान आईवडिलांची माझ्या आजूबाजूची मुले फारच दुबळी सामान्य आणि फुकाची निघाली असे मोठ्या प्रमाणात जाणवू लागले. तुमची आडनावे तुमच्या नावापेक्षा मोठी होवून बसली कि तुमचा पराजय होत राहतो आणि सतत तुमच्या आईवडिलांचाच विजय होत असतो.

असे होण्यामागचे कारण आमच्या वेळी भारतात मुले कशी आणि का जन्माला घातली जात ह्यामागे आहे .

मुले होण्याचे कोडकौतुक आणि जन्म दिल्याचे भारावलेले फिलिंग आईवडिलांना होत असले तरी आईवडील होणे हे निसर्गाने दिलेले फुकटचे आणि कर्तृत्वशून्य काम आहे ह्याची जाणीव आजच्या तरुण जोडप्यांना असते तशी माझ्या आईवडिलांच्या पिढीला नव्हती . असुरक्षित संभोग करत बसले कि काही दिवसांनी  मुले होतात ह्यापलीकडे कोणत्याही जोडप्याचे पालक होण्यात कोणतेही कर्तृत्व नसते. आव मात्र असा आणला जाई कि आपण समाजाचे काहीतरी देणे लागत होतो ते फेडले, कुटुंबाला वारस दिला, कुलदैवताचा प्रसाद मिळाला ,वंश चालवला वगरे वगैरे फालतूपणा .मग मुलांना हे आईवडील आयुष्यभर हे ऐकवत बसत “ आम्ही तुमच्यासाठी इतके केले,आता तुम्ही आमचे ऐका”

सुदैवाने आता माझ्या पिढीतली तरुण मुले जर पालक झालीच तर दोन महिन्याच्या आत गुपचूप पोटापाण्याच्या कामाला लागतात.काही मूर्ख मुले फेसबुकवर अजूनही ‘proud parent झालो’ असे फोटो टाकतात . मुले दुसरीपासून शाळेत नापास व्हायला लागली कि लगेच ह्यांचे प्रावुडपण कमी होते आणि ते मुलांना बदडायला लागतात.

त्यात हि भारतीय पालक मंडळी सधन सुशिक्षित आणि सामाजिक विचारवंत घराण्यातील असतील तर मुले झाली रे झाली कि ती त्यांच्यावर आपली स्वप्ने लादायला लागतात .जणू आपली स्वप्ने आणि आपले उद्योगधंदे पुढे चालवायला हा जीव पृथ्वीतलावर देवाने पाठवला असावा असे आईवडिलांना वाटत असे. त्या काळी स्थलांतराचे प्रमाण कमी असल्याने सगळे आईवडील आपापल्या आईवडिलांकडेच राहत . त्यामुळे त्या बिचारया मुलामुलींवर आईवडील , आजीआजोबा , पणजीपणजोबा ह्यांनी दिवसरात पाहिलेली लाखो स्वप्ने पूर्ण करण्याची किंवा त्याचा आदर्शवाद पुढे चालवाण्याची जबाबदारी येई. आणि त्यात अश्या घरात जन्मलेल्या मुलांची पुरती वाट लागत असे . माझा एक मित्र मला म्हणाला कि माझे वडील स्मगलर असते तरी परवडले असते पण ते साले मोठे समाजसुधारक आहेत. सतत आदर्शवादी बडबड करतात आणि स्वतःचे करियर त्यात करतात .पण त्यामुळे आम्हाला साधे कॉलेजच्या कोपर्यावर बिड्या फुकत सुद्धा उभे राहता येत नाही .येता जाता सगळी पुणेरी माणसे मला त्यांचा मुलगा म्हणून ओळखतात.

मी स्वतः पालक आणि मुलांची अतिशय गंभीरपणे हिंसात्मक नाती पाहिलेली आणि अनुभवलेली आहेत आणि ह्या सर्व बाबतीत मला हे दिसले आहे कि आपल्या मुलांच्या आयुष्यात नको तेवढि  ढवळाढवळ करणारे हे सर्व पालक पांढरपेशा आणि बुद्धिवादी घरातील यशस्वी आणि जाणती माणसे होती आणि त्यांच्या मुलांचा आयुष्यातला सर्व वेळ आणि ताकद त्यांच्या आई वडिलांपेक्षा वेगळे होण्यात गेली.त्यात ती मुले दमून थकून जवळजवळ नष्ट झाली.  काही मुलांनी आईवडिलांच्या डोक्यावर यथेच्छ मिऱ्या वाटल्या आणि रागाने त्यांची घराण्याची पूर्ण बेअब्रू केली . उरलेली मुले घाबरून आईवडिलांचे अतिरिक्त गुणगान गात असतात ,त्यांनी चालवलेल्या संस्था चालवत बसतात ,त्यांचेच व्यवसाय पुढे चालवायचा प्रयत्न करत बसतात पण आतून त्यांना स्वतःचा आवाज सापडत नाही किंवा आईवडलांच्या धाकात त्या मुलांना तो सापडण्याची शक्यता नष्ट होते. अशी मुले गंभीरपणे अंतर्गत नैराश्यात जगत राहतात

सोपी उदाहरणे द्यायची तर अनेक मोठ्या फिल्मस्टार्सची किंवा खेळाडूंची मुले पाहता येतील. त्यांच्या आईवडिलांच्या जवानीचा बहर कधीच ओसरत नाही आणि त्यात हि मुलेमुली चाळीस चाळीस वर्षाची झाली तरी आईचा किंवा वडिलांचा हात धरून बसलेली असतात. आपल्याला अभिनय करता येत नाही ते आपल्या आईवडिलांचे काम आहे,  आपले नाही हे त्यांना कुणी सांगायला जात नाही. आणि ह्या पुढच्या पिढीचे बोन्सायवृक्ष होवून बसतात .तसेच गायकांच्या मुलांचे झालेले दिसते .त्यांच्या आईवडिलांचेच कौतुक आणि लाड समाजात इतके चालू असतात कि ह्या मुलांनी वेळच्यावेळी आपला वेगळा मार्ग शोधला नाही तर ती पन्नाशीची होईपर्यंत आईवडिलांचेच तंबोरे लावत बसलेली असतात. किंवा मग आईवडील मेले कि मग त्यांची चरित्रे लिहिणे हे एक बिनडोक काम अशी मुले करतात. हा भारतीय कुटुंबव्यवस्थेचा फार मोठा तोटा आहे. आपल्याकडे पुढील पिढीला आपण आपली कामे आणि स्वप्ने पूर्ण करण्याची factory म्हणून पाहतो.

अश्या अनेक प्रसिद्ध अप्पलपोटी क्रूर आणि ताकदवान आईवडिलांच्या घरात जन्मून आपली स्वप्ने धुळीला मिळालेली किंवा आपल्याला स्वतंत्र विचार करण्याची मुभाच नसलेली अनेक ओळखीची मुलेमुली मी पहिली तेव्हा मला मी साध्या आणि अजिबातच प्रसिद्ध नसलेल्या आईवडिलांचा मुलगा आहे ह्याचे फार बरे वाटले. पण त्याला थोडा काळ जावा लागला . इतरांचा नाश होताना पहिले कि आपल्याला आपले सुदैव कळते तसे झाले.

आम्ही मोठे होताना आमच्या आईवडीलानी फार विचार केला नाही आणि आम्हाला आमचे आमचे टक्केटोणपे खायला जगात सोडून दिले हे त्यांनी आमच्यावर केलेले सगळ्यात मोठे उपकार आहेत. साध्या मराठी शहरी मध्यमवर्गात जन्मल्याचे जे फायदे असतात त्यापैकी हा एक.

माझ्या आईवडीलांना माझ्या आणि माझ्या भावाच्या कार्याक्षेत्रातले काही म्हणजे काहीही कळत नाही. त्यामुळे ते आम्हाला सल्ले देत नाहीत आणि बहुमूल्य मार्गदर्शनपण करत नाहीत. ते आम्हाला एकटे सोडतात आणि आम्हाला आमच्या चुका करू देतात. अनेक वेळा आम्ही संपूर्ण हरलो आहोत तेव्हा त्यांनी घराची दारे आमच्यासाठी उघडी ठेवली आहेत हे मोठे आणि महत्वाचे काम त्यांनी केल्याचे बळ आम्हाला वेळोवेळी मिळाले आहे .

IMG_1655

अपेयपान ११

स्थलांतर केल्याचा नक्की असा एक दिवस नसतो . खूप आधी मनामध्ये आतल्याआत सामान बांधणे चालू झालेले असते .विचारांचे जाळे विणायला सुरुवात झालेली असते.

आपण शहर नक्की कधी सोडतो हे आठवेनासे होते. तो एक दिवस असा काही नसतो ती एक प्रक्रिया असते. आजूबाजूच्या वातावरणातला प्राणवायू पुरेनासा होतो, आणि मनाला पोषणासाठी वेगळ्या जगाची आस लागून राहते. मी पुणे शहर नक्की कधी सोडले ते मला आजपर्यंत आठवत नव्हते. असं काही एक दिवस होतं का? ते कळत नव्हते. पण परवा एका नव्या मित्राशी गप्पा मारता मारता त्या काळातले काही सांगता सांगता मला तो दिवस आठवला. मी शहर सोडल्याचा एक निश्चित असा दिवस होता . मित्राच्या कारमध्ये माझे सगळे समान भरून भल्या पहाटे आम्ही मुंबईत पार्ल्यात जिथे माझी राहायची सोय केली होती त्या घरी जायला निघालो होतो. फार सोपा नव्हता तो दिवस . मी सगळा प्रवास गप्प बसून केला होता . माझे भरपूर समान आणि ढिगावारी पुस्तके वरती पोचवून माझा मित्र मला म्हणाला होता कि चल मी आता निघतो . नीट राहा . काही लागले तर कळव . आणि तो  लिफ्ट पाशी गेला.

त्या घरातला फोन बंद पडला होता . घरात gas नव्हता . जुना एक फ्रीज होता जो गेली पाच सहा वर्षे बंद होता आणि नशिबाने नळाला पाणी होते. माझ्या पोटात जबरदस्त खड्डा पडला होता. आपल्याला फ्रान्समध्ये शिकताना आणि तिथला सिनेमा बघताना एकटी राहणारी माणसे पाहून तसे राहण्याचे फार आकर्षण मनात तयार झाले होते. शिवाय इथे गौरीची पुस्तके वाचून आमचे सदाशिवपेठी मन प्रत्यक्ष जाण्याधीच युरोपला पोचलेले. आता बसा बोंबलत. त्या कर्वे-परांजपे लोकांची पुस्तके वाचून भारावून जा .पहा अजून युरोपातले सिनेमे , त्यांच्या स्टायली मारायला जा . राहा एकटे.

त्या क्षणी मला पहिली उबळ आली ती म्हणजे धावत खाली जावे , मित्राला मिठी मारून म्हणावे कि माझी मोठी चूक झाली . चल सामान गाडीत भरू आणि आत्ताच्या आता मला पुण्याला घेऊन चल . पण काय कोण जाणे मी तसे केले नाही . तो परत जाताना मला वरून दिसला . गाडीत बसण्याआधी त्याने मला हात केला, तो हसला आणि त्याची गाडी कोपऱ्यावर वळून लुप्त झाली . ह्या सगळ्या गोष्टी मोबाईल फोन हातात येण्यापूर्वीच्या काळात घडल्या .

घर प्रशस्त होते. सहाव्या मजल्यावरचे हवेशीर . मजल्यावरची बाकीची दोन्ही घरे बंद . फक्त हेच एक घर राहते असणार होते. डाव्या बाजूच्या घरातले लोक अमेरिकेत राहत होते आणि उजव्या बाजूच्या  घरात नुकतीच कुणीतरी गळफास लावून आत्महत्या केली होती त्यामुळे ते घर बंद करून ते लोक निघून गेले होते. ह्या गोष्टीची भीती मला जाणवेल असे मला वाटले नव्हते पण माझा मित्र निघून जाताच मला ती भीती तीक्ष्णपणे जाणवली आणि मला हमसून हमसून रडू आले.डोळ्यांत पाणी वगरे नाही . चांगले भरपेट रडू . तिथल्या तिथे . उगाच आपण असे धाडस केले. भलत्याच विचारांच्या अधीन झालो .कशाला एकटे जगायचं आहे? चांगले आईवडिलांच्या घरात राहत होतो काय कमी होते? मन स्वतःच्याच निर्णयांना विरोध करायला लागले. मी डोळे पुसले आणि मला तेव्हा अचानक चहाची तल्लफ आली . असे वाटले कि सिनेमात लोक पितात तसं दुख्ख झाले असता गरम चहा पीत नित विचार करावा. नाक फुरफुरत . पण घरात काहीही सामानच नव्हते . मी कुलूप लावून खाली उतरलो , आणि कोपर्यावर जाऊन टपरीवर चहा प्यायला . STD बूथ वर जाऊन  पुण्याला घरी फोन करून सांगितले कि मी नीट पोचलो माझी काळजी करू नका. मी असा कधी एकटा रिकाम्या घरात राहिलो नव्हतो जिथे फक्त रिकामा ओटा आणि रिकामी कपाटे होती. Paris मध्ये मी तीन महिने एकटा रहात होतो पण ती हॉटेल ची खोली होती. आणि त्यात शेजारच्या सर्व खोल्यात आमच्या फिल्म च्या कोर्स ला आलेली मुलेच राहत होती.

घरात आलो आणि मनातला सगळं रिकामेपणा समोर येऊन पुन्हा उभा राहिला . घर उभे करायला  कुठून सुरुवात करावी ?

मग पुढच्या दोन दिवसात मी रिकामे डबे ,स्वयपाकाची भांडी, धान्य , भाज्या , मसाले , इतर किराणा सामान आणले . घर झाडून लख्ख पुसून काढले . तयार पडदे आणून ते खिडक्यांना लावले . नवीन पायपुसणी आणली .बिल्डींगच्या कचरा गोळा करणाऱ्या माणसाना माझ्या घराची वर्दी लावून दिली. gas आणला . इलेक्ट्रिशिअन , प्लंबर ह्यांना शोधून काढले . मला मोलकरणी आणि काम करणाऱ्या मावश्यांची लहानपणीपासून खूप भीती वाटायची. त्यामुळे कुणाला केर फरशी करायला ठेवायचा प्रश्नच नव्हता. मी जमतील तश्या पोळ्या करायला शिकलो . भात पिठले कोशिंबिरी आणि भाज्या यांच्यात आठ दहा दिवसात गती येत गेली. फोडण्या जमू लागल्या. हळूहळू घर माझ्यासाभोवती आकार घेत गेले आणि माझ्या मनाची तगमग शांत होत गेली .

आणि आठ दहा दिवसात ती एक सुंदर संध्याकाळ आली ज्या दिवसाचे स्वप्न पाहत मी घर सोडले होते. माझ्या पुढ्यात मी शिजवलेले गरम गरम जेवण होते .फ्रीजमध्ये गार सरबत ,पाणी आणि बियरच्या बाटल्या होत्या .घर अतिशय स्वच्छ झाले होते . घरातला landline चा फोन चालू झाला होता.  नवे पडदे वार्यावर उडत होते .घरात मडोना गात होती.  समोरच्या पार्ले बिस्कीट factory मधून ताजी गरम बिस्किटे भाजली गेल्याचा सुंदर वास आसमंतात पसरला होता.( पुढे अनेक आठवडे  मी हि बिस्किटे भाजण्याची वेळ लक्षात ठेवून त्या वेळी घरी परत यायचो . एकटेपणा कमी करण्यासाठी . कारण त्या वासाने काहीतरी घरगुती प्रेमळ वातावरण तयार होत असे. मुंबईत सूर्योदय किंवा चंद्र वगरे असे उगाच दिसत नाहीत. घरात झाडे वेली लावता येत नाहीत.आपल्याला आपल्या घरातले छोटे आनंद असे शोधून काढावे लागतात) मी गरम गरम जेवणाचे शांत घास घेत माझ्या नव्या घराकडे कौतुकाने पाहत होतो आणि स्वतः ला सांगत होतो कि आपल्याला शहर सोडून दुसरीकडे जाणे जमले आहे. शेल्फमध्ये नीट रचून ठेवलेल्या माझ्या पुण्यातल्या खोलीतून आलेल्या पुस्तकांची मला त्या वेळी मोठी सोबत वाटली . त्या क्षणापर्यंत पोचायला मात्र मला खूप मेह्नत घ्यावी लागली .

आपल्या एकटेपणाला नीट घाट ,पोत आणि आकार देत त्याचे चांगल्या गोष्टीत रुपांतर करण्याचा खेळ मी त्या दहा दिवसात शिकलो .त्यानंतरचे प्रश्न मी हळूहळू धडपडत सोडवले. ह्या नव्या शहरात आपले मित्र जमवणे.  काम शोधणे . ह्या शहराच्या वागण्याच्या चालीरीती शिकणे . हे सर्व जमत गेले. पण मुंबईतली ती संध्याकाळ मला आजपर्यंत विसरता आलेली नाही.

घरकामाला कमी मानण्याचा तो दुर्दैवी काळ होता .बाहेर जाऊन वसवस करत पैसे मिळवणे जास्त महत्वाचे मानले जाई आणि घरात राहून जाणतेपणाने  आणि नेमकेपणाने ते चालवणाऱ्या व्यक्तींना कमी प्रतिष्ठा मिळत असे . याचे कारण आमच्या पुण्यातले विनोदी आणि अर्धवट feminism. आणि  त्याचा प्रचार करणाऱ्या कर्कश्श बुद्धिमान बायका . मी त्यांचे फार कधीच  ऐकले नाही आणि घरातल्या सगळ्या मुलींना बायकांना पाहत ,त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत वाढलो . त्या सगळ्यांनी मला घरकामाला तयार केले आणि त्याला कमी न लेखण्याचे आपल्या कृतींमधून दाखवत ठेवले.

मला आजही माझे घरकाम स्वयपाक आणि त्याची हजारो व्यवधाने आयुष्यातल्या अनेक ताणानपासून मुक्त ठेवतात .ते माझे sport आहे. क्रिकेट किंवा badminton असावे तसे . आणि जगात बाहेर पडून कर्तुत्व गाजवणार्या अनेक व्यक्तीनइतकाच आदर मला निगुतीने शांतपणे आणि संयमाने उत्तम घरे चालवणाऱ्या आणि नेटका स्वयपाक करणाऱ्या हुश्शार व्यक्तींबद्दल आहे . किंबहुना त्यांच्याविषयी थोडासा जास्तच .

IMG_1643

अपेयपान १२

गेल्या आठवड्यात P.K नायर ह्यांचे निधन झाले तेव्हा मी एक गोष्ट करण्याचा मोह टाळला ती म्हणजे फेसबुकवर जाऊन त्यांचे निधन झाले आहे हे जगाला पुन्हा सांगणे आणि ते किती महत्वाचे होते ह्याची लगेच माहिती देणे.मला त्यांच्या जाण्याने खिन्न व्हायला झाले. आपल्यासाठी अतिशय चांगले महत्वाचे आणि आपल्या आयुष्याला नीट आकार देणारे काम करून ठेवलेली व्यक्ती आता ह्या जगातून कायमची नाहीशी झाली . नायर सरांची प्रकृती चांगली नव्हती आणि वयसुद्धा खूप होते. कामातून ते निवृत्त झाले होते पण अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ते भेटत असत . उत्साहाने नव्या दिग्दर्शकांचे चित्रपट पाहायला येत असत .

माझ्याप्रमाणेच अनेक चित्रपटकलेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी आदर होता . ह्याचे कारण त्यांनी परिश्रमपूर्वक जवळजवळ एकहाती उभी केलेली “राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय” ( National Film Archives Of India )  हि पुण्यातील महत्वाची संस्था . ह्या माणसाने आणि पर्यायाने ह्या संस्थेने आमची चित्रपट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची  आयुष्ये बदलून टाकली . आमचीच काय , देशातल्या हजारो लोकांची , ज्यांना चित्रपट बनवायचे होते , त्याचे रसग्रहण करणे शिकायचे होते , जगातल्या उत्तम चित्रपटांचा अभ्यास करायचा होता आणि आस्वाद घ्यायचा होता.

पाठीला किंवा मांडीला खाज आल्यावर खाजवून आनंद होतो तश्या प्रकारची सोपी आणि तात्पुरती करमणूक करून घेणे हा भारतीय व्यावसायिक चित्रपटसृष्टीचा आजपर्यंतचा विशेष उपयोग मानायला हवा. आपण एक सततचा  दुखी आणि दुर्दैवी  समाज असल्याने वसवसलेली आणि उफाळलेली करमणुकीची भूक अधाश्यासारखी भागवून घेणे असेच आपल्याकडच्या बहुतांशी चित्रपटांचे काम असते.  चित्रपटांचा समाजाला एव्हढाच उपयोग असतो असे आपण मानतो . हे मनोवृत्ती आजही चालू असेल तर नायर सरांनी पूर्वी चित्रपटाच्या मोठ्या संपन्न वारश्याचे जतन आणि संग्रह करणारी संस्था उभारूया अशी कल्पना मांडली असेल तेव्हा किती लोकांनी त्यांना गंभीरपणे घेतले असेल ह्याचा विचारच न केलेला बरा. त्यांनी आपले जवळजवळ सर्व आयुष्य ह्या कामासाठी वापरले . ते केल्याबद्दलचे एक शांत समाधान त्यांच्या चेहऱ्यावर सतत दिसत असे. ते अतिशय संथ आणि सौम्य असे व्यक्तिमत्व होते . एक शास्त्रज्ञ , एक खेळकर संग्राहक आणि एक जाणकार इतिहासकार अशी सगळी रूपे तिथे एकवटलेली .

NFAI हि संस्था  पुण्यात आत्ताच्या फिल्म इन्सटीटयूटच्या प्रांगणात एका छोट्या बंगलीवजा इमारतीत सुरु झाली आणि कालांतराने त्याची मोठी देखणी वास्तू प्रभात रोडवरील जुन्या barister जयकर ह्यांच्या बंगल्यात उभी राहिली . जुन्या भारतीय चित्रपटांच्या प्रिंट्स आणि निगेटिव्ह चे काळजीपूर्वक जतन करणे आणि जगभरातील उत्तमोत्तम जुन्या आणि नव्या चित्रपटांच्या प्रिंट्स चा संग्रह करणे , चित्रपटाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकाना उत्तम ग्रंथालय आणि अभ्यासाची साधने उपलब्ध करून देणे हे ह्या संस्थेच्या स्थापनेमागचे महत्वाचे उद्दिष्ट .

माझी पुण्यातील महाविद्यालयीन काळातील आयुष्याला ह्या संस्थेमुळे फार मोठी कलाटणी मिळाली . ह्या संस्थेचे नायर सरांनी उभारलेले एक देखणे चित्रपटगृह होते जिथे दर शनिवारी भारतातील आणि संपूर्ण जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखवले जात. अजूनही हा शनिवारचा फिल्म क्लब चालू आहे. ह्या चित्रपटगृहाचे एक मोठे अदबशीर वैशिष्ठ्य असे कि तिथे आत जाताना बाहेर चपलाबूट काढून शिरावे लागते. लाल मखमलीच्या खुर्च्या आणि पायाखाली उबदार गालीचा . समोर पांढरा मोठ्ठा पडदा. तिथे आम्ही लहान वयातच अनेक भारतीय , रशियन , जपानी , इटालीयन , फ्रेंच दिग्दर्शकांचे चित्रपट दर शनिवारी जाऊन पाहू शकायचो . आपल्या नाचगाणी आणि दंगेधोपे ह्यांच्या पलीकडे वेगळा चित्रपट आपल्या देशातही आणि बाहेरही बनतो ह्याची जाणीव आम्हाला झाली आणि उत्तम चित्रपट ३५ mm च्या प्रिंट वर बघण्याचे भाग्य आम्हाला घरबसल्या पुण्यात राहून सहजपणे मिळाले. नायर सर तेव्हा सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते पण ते आवर्जून शनिवारच्या ह्या फिल्म क्लबला येत. सगळ्यांसोबत बसून सिनेमा पाहत आणि नंतर अनोळखी लोकांशी मोकळेपणाने गप्पाही मारीत . मी माझी पहिली short फिल्म बनवेपर्यंत कधी त्यांच्याशी जाऊन प्रत्यक्ष बोलण्याचे धाडस केले नव्हते .

आपल्यापैकी कुणी ‘सिनेमा पारादिसो’ हा जुना इतलिअन सिनेमा पहिला आहे का ? त्या सिनेमातला लहान मुलगा म्हणजे आम्ही सगळे शनिवारचे प्रेक्षक  होतो आणि नायर सर हे त्या चित्रपटातले फिल्म प्रोजेक्टर चालवणारे त्या मुलाचे मोठ्या वयाचे मित्र होते.

अशी माणसे गेली कि काय करायचे ? माणूस जाण्याचे दुक्ख होते जेव्हा माणूस काम अर्धवट सोडून जातो किंवा त्याच्या कामाला पूर्णत्व येऊनही न्याय मिळत नाही . नायर सरांच्या कामाला नुसते पूर्णत्व आले असे नाही तर त्यामुळे भारतात दिग्दर्शक , लेखक आणि प्रेक्षकांच्या अनेक पिढ्या घडल्या . अनेक चित्रपटमहोत्सव भरवणे शक्य होवू लागले. भारतीय चित्रपटांचा अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये अभ्यास सुरु झाला . अनेक जुन्या नव्या महत्वाच्या चित्रपटांच्या प्रिंट्स आज पुण्यात NFAI मध्ये काळजीपूर्वक जतन करण्यात आल्या आहेत. पुस्तके आहेत . सिनेमांच्या जुन्या जाहिराती आहेत . रसिकांना आणि अभ्यासकांना मदत करणारी माणसे आहेत . असे असताना नायर सरांच्या शारीरिक मृत्यूचे वाईट मला वाटले नाही . एका संपन्न अवस्थेत त्यांनी आम्हाला कायम ठेवले आणि ते स्वतः शांतपणे प्रसिद्द्धीचा हव्यास न करता केरळमधील आपल्या गावी आणि मध्येमध्ये पुण्यात असे सतर्कपणे जगले . त्यांनी त्यांचे जगण्याचे कारण संपूर्ण केले होते म्हणून त्यांच्याविषयी कोणताही गळेकाढू शोक मला कधीच करता येणार नाही .

एरवी शांत असणार्या नायर सरांचे एक वेगळे रूप मी आयुष्यात एकदाच पाहिले होते. मी त्यांना एकदा आवर्जून माझी एक short फिल्म दाखवली होती . आम्ही नेहमी भेटत असू असेही नाही . २००९ साली  केरळमधील त्रिवेन्द्रम अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माझ्या “गंध “ ह्या चित्रपटाची प्रेस कॉन्फरन्स  होती . ती सुरु झाल्यावर काही वेळाने शांतपणे नायर सर तिथे येऊन पुढच्या रांगेत बसले . मी त्यांना स्टेजवरून नमस्कार केला . प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली होती आणि अचानक काहीतरी वेडेवाकडे वातावरण तयार झाले. केरळमध्ये सर्व कलात्मक रसग्रहण हे राजकीय दृष्टीकोनातून होते. आणि तिथले ‘राजकीय’ म्हणजे मार्क्सिस्ट . शब्दाला शब्द वाढत गेले आणि माझ्या स्वभावानुसार मी भडकलो आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना रागावून उत्तरे देऊ लागलो . नायर सर अचानक उभे राहिले आणि चिडीचूप शातंता झाली . ते मागे वळले आणि त्यांनी प्रेक्षकांना आणि पत्रकारांना फैलावर घेतले. आपल्याकडे वेगळ्या राज्यातून आणि वेगळ्या भाषेत सिनेमा बनवणारा एक दिग्दर्शक आला आहे . त्याचे बोलणे समजून न घेता तो तुमच्या मतांच्या फूटपट्ट्यानमध्ये बसत नाही म्हणून त्याच्याशी सभ्यता सडून बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? ह्यासाठी आपण हे चित्रपटमहोत्सव भारावतोय का ? मग खाली बसून त्यांनी मला बोलायला सागितले आणि पुढची प्रेस अतिशय नीट पार पडली . मी खाली उतरलो आणि सरांना thanks म्हणालो आणि त्यांना माझ्या फिल्म च्या शो ला यायचे आमंत्रण दिले. ते मला हसून म्हणाले अरे मी तुझी फिल्म पहिली नसती तर तुझी बाजू घेऊन भांडलो कशाला असतो ? मला ती फिल्म खूप जास्त आवडली आहे. ती माझी नायर सरांची शेवटची भेट . त्यानंतर ते मला प्रत्यक्षपणे कधीच भेटले नाहीत

नायर सरांसारखी आपले आयुष्य घडवणारी  माणसे एका प्रकारे अप्रत्यक्षपणे सतत राहतील सोबत असतील असे वाटते. पण तसे होत नाही. शरीराचा मृत्यू होतो आणि मग एक खोलवर खिन्नता तयार होते. ती खाजगी असते . काही महत्वाच्या माणसांचे मोल सगळ्या जगाला असतेच असे नाही मग आपण कुणाकडे अशी खिन्नता व्यक्त करणार ?

P K नायर सरांवर The Celluloid Man नावाचा अतीशय सुंदर माहितीपट शिवेंद्र सिंघ डुंगरपुर यांनी २०२१२ साली बनवला आहे . भारतीय चित्रपटावर प्रेम असणार्या प्रत्येकाने पहावा असा. त्या माहितीपटाचा You Tube वर ट्रेलर आहे . मी खाली त्या ट्रेलरची लिंक देत आहे

https://www.youtube.com/watch?v=mTPcHAKk4bo

 

IMG_1650 (1)

 

सचिन kundalkar

kundalkar@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अपेयपान – लोकमत मधील लेखमाला भाग ५ ते ८

अपेयपान ५

 

सर्व गोरी माणसे त्यांना स्वतः ला जरी वाटत असले तरी नट नसतात. ती फक्त गोरी माणसेच असतात . सर्वच साक्षर माणसे त्यांना जरी वाटत असले तरी लेखक नसतात .ते फक्त साक्षरच असतात. आणि सर्व प्रकाशित लेखक हे साहित्यिक नसतात. हि साधीशी गोष्ट जी आपल्या सध्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकार्यांना कळायला हवी, ती आम्हाला लहानपणी शाळेतच शिकवली गेली होती. असे काही महत्वाचे अप्रत्यक्षपणे शिकवणाऱ्या आमच्या मराठीच्या शिक्षकांचे नाव होते श्री. वा. कुलकर्णी. माझ्या गेल्या सर्व वर्षातील माझ्या वाचन लेखन प्रवासात हि व्यक्ती मला सतत सोबत करत राहिली आहे .

आपल्याला प्रत्येकाला असे काही मोलाचे शिक्षक भेटलेले असतात.ते शिक्षक शिकवत असताना फार वेगळे आणि भारावलेले असे काही वाटत नाही . पण नंतर शाळा मागे पडली,आयुष्य जगायला लागतो ,काम करायला लागतो कि त्या व्यक्तीने आपल्याला कितीतरी महत्वाचे दिले आहे हे लक्षात येते   आमच्या भावेस्कूलमध्ये शिकताना आम्हाला अनेक चांगले , कळकळीने शिकवणारे , विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे शिक्षक लाभले . त्यामध्ये अगदी महत्वाचे असे होते ते म्हणजे आमचे श्री.वा. कुलकर्णी . आमच्या शाळेत शिक्षकांचा उल्लेख मराठीतल्या त्यांच्या नावाच्या आद्याक्षरानी करायची जुनी पद्धत तेव्हा अस्तित्वात होती . त्यांमुळे आम्ही त्यांना ‘श्रीवा’ असेच म्हणत असू .

श्रीवांनी माझ्या वाचनाला शिस्त लावली .अगदी शालेय वयात असताना.अशी शिस्त आपल्याला लावली जात आहे हे आपल्याला अजिबातच कळत नसताना. शाळेमध्ये आम्ही त्यांना टरकून असू . ते शिक्षा म्हणून ज्या पद्धतीने हातावर पट्टी मारत त्याची आठवण मला अजूनही आहे. पण मी कोणतेही पुस्तक वाचायला उघडले आणि त्याच्या नोंदी करण्यासाठी टोक केलेली पेन्सिल घेऊन बसलो कि मला नेहमीच त्यांची आठवण येते.

अभ्यासक्रमात असलेल्या लेखकांचे सर्व साहित्य आम्ही आगून मागून वाचावे असा त्यांचा आग्रह असे. त्यासाठी कोणताही धडा शिकवताना ते त्या लेखकाची नीट ओळख करून देण्यात एक संपूर्ण तास कारणी लावत असत . सोबत प्रत्येक लेखकाची, कवीची पुस्तके घेऊन येत. आणि त्या लेखकाच्या कामाचे विस्तृत टीपण त्यांनी तयार केलेले असे .हा त्यांचा अगदी खास आवडता मराठी शब्द. ‘टिपणे काढा’ जे वाचाल त्याबद्दल विस्तृत नोंदी ठेवत जा .न समजणाऱ्या गोष्टी शब्दकोशात पाहत जा . मग पुढे जात जा असे ते ओरडून ओरडून सांगत. आचार्य अत्रे , कुसुमाग्रज, बहिणाबाई , इंदिरा संत, विंदा करंदीकर , पाडगावकर , वसंत बापट , दळवी ,सुनीता देशपांडे , गो नी दांडेकर , बा.सी .मर्ढेकर , बोरकर , आरती प्रभू ,विठ्ठल वाघ ,माधव आचवल असे विविध मिश्र काळातील लेखक कवी त्यांनी आम्हाला शाळेचे नेमून दिलेले धडे शिकवण्याआधी व्यक्ती म्हणून समोर आणले. लेखक कोण होता , कसा घडला, त्याची मते काय होती ,तो कसा लिहिता झाला , समाजाने त्याला लिहिताना कसे वागवले, हे सगळे त्यात आले. दलित साहित्याच्या संदर्भात त्यांनी सोप्या भाषेत ‘दुखः आणि वेदना’ ह्या विषयावर आम्हा शालेय मुलांसाठी एक छोटे टिपण बनवले होते तेव्हा आमचा आयुष्यातील दुक्खाशी सामनाच झाला नव्हता. पुढे होणार होता. मी माझ्या दुख्खाविषयी काही वर्षांनी लिहिणार होतो . ज्यासाठी दलित साहित्याची त्यांनी करून दिलेली ओळख अनेक वर्षांनी मला सह अनुभूतीची ठरली . दया पवार ह्यांच्या ‘बलुतं’ ची त्यांनी करून दिलेली ओळख .

मराठी साहित्य व्यवहारातील अनेक सुसंस्कृत व्यक्तींची माहिती देण्यासाठी ते आम्हाला छोटी व्याख्याने देत ,ज्याची तयारी ते तास सुरु होण्याआधी करून येत असत . श्री. पु. भागवत कोण आहेत? आणि ‘मौज प्रकाशन’ हे मराठी साहित्य विश्वातील किती महत्वाचे आणि मानाचे प्रकरण आहे हे सांगता सांगता एकदा आमचा मराठीचा तास संपून गेला होता. जी. ए . कुलकर्णी हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय . त्यांच्यावर किती बोलू आणि किती नको असे त्यांना होत असे . जीएंची ‘भेट’ हि कथा आम्हाला शाळेत अभ्यासाला होती , त्या धड्याच्या अनुषंगाने जवळजवळ चार दिवस ते विस्तृतपणे जीएंच्या सर्व साहित्यावर बोलत होते. आम्हाला शाळेच्या ग्रंथालयात जाऊन त्यांनी जीएंचे सर्व साहित्य वाचायला प्रोत्साहन दिले . संत ज्ञानेश्वर शिकवायला लागण्याआधी त्यांनी आम्हाला त्या काळातील सामाजिक परिस्थिती कशी होती हे सोप्या भाषेत सांगितले होते. त्यामुळे आम्ही संतसाहित्य भाबड्या श्रद्धेच्या पलीकडे जाऊन समजून घेऊ शकलो. हे सगळं घडताना आम्ही तेरा ते पंधरा ह्या वयातील मुले होतो. आणि माझ्या मते फारच नशीबवान मुले होतो .

गाणे शिकवावे तशी भाषा सातत्याने शिकवावी आणि शिकावी लागते . ती लहान मुलांच्या आजूबाजूला बोलीतून,गाण्यांमधून ,शिव्यांमधून , ओव्यांमधून , लोकगीते , तमाशे ,सिनेमा , नाटकातून प्रवाही असावी लागत.पण तरीही ती शिकवावी लागतेच .तिची गोडी मुलांना लावावी लागते . भाषेची तालीम असणे एका वयात फार आवश्यक ठरते . श्रीवा हे माझ्यासाठी कळकळीने शिकवणाऱ्या एका आख्ख्या मराठी शालेय शिक्षकांच्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात . त्या पिढीचे शिकवण्याच्या कामावर अतोनात प्रेम होते . ती नुसती नोकरी नव्हती. जातीच्या आणि आरक्षणाच्या राजकारणात ती एक पिढी वाहून गेली . मराठी शाळाच नष्ट झाली. आज मी लिहिलेले कुठेही काही वाचले , माझा चित्रपट प्रदर्शित झाला कि आमच्या भावेस्कूल मधील सर्व शिक्षकांचे मला आवर्जून फोन येतात . श्रीवा त्यांच्या खास शैलीत एक एसेमेस आधी पाठवतात आणि मग मागाहून विस्तृतपणे फोन करतात .

माझ्या छोट्या आयुष्यात मला प्रमाणाबाहेर आणि न मागता जे काही चांगले मिळाले ते म्हणजे माझे शालेय शिक्षक आहेत . अजूनही काम करताना वाचन करताना ,काही नवीन शोधताना सतत आपला शब्दसंग्रह अपुरा आहे , आपण कमी वाचन केले अशी मनाला बोच लागून राहते. वाचनाची एक शिस्त असते .जगातले सर्व भाषांमधील मोठे विद्वान लेखक किती परिश्रमपूर्वक वाचन करतात हे मी जेव्हा पाहतो , तेव्हा प्रत्येक वेळी मला श्रीवांचा मराठीचा तास आठवतो. आजच्या काळात तर फार प्रकर्षाने आठवतो कारण आज मराठी भाषेतील साहित्याबद्दल आपल्याकडे अभिमान सोडून काहीही शिल्लक नाही.

शाळा संपल्यावर अनेक वर्षांनी श्री पु भागवताना मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांच्या घरात शिरताना माझे अंग कोमट झाले होते . भीतीने वाचा पूर्ण बंद . सोबत मोनिका गजेंद्रगडकर बसली होती . श्री पु भागवत शांतपणे माझ्या पहिल्या कादंबरीचे हस्तलिखित हाताळत होते आणि मला काही प्रश्न विचारत होते . मी चाचरत उत्तरांची जुळवाजुळव करत होतो. तितक्यात दाराची बेल वाजली आणि सहज म्हणून सकाळचे गप्पा मारायला पाडगावकर तिथे आले. ते येऊन एक नवी कविताच वाचू लागले. मला हे सगळे आजूबाजूला काय चालले आहे तेच कळेना . मला तेव्हा श्रीवांची खूप आठवण आली . मी आनंदाने भांबावून गेलो. मला इतका अद्भुत आनंद सहन करता येत नव्हता आणि मला सोबत ते हवे होते असे वाटले.

उमेश कुलकर्णी हा चित्रपट दिग्दर्शक हा माझा शाळेतील वर्गमित्र. आम्ही दोघेही श्रीवांचे विद्यार्थी . त्याच्या ‘विहीर’ ह्या चित्रपटात श्रीवा आहेत .ते वर्गातील मुलांना ‘भेट’ हा धडा शिकवत आहेत . माझ्या आणि त्याच्या स्वतःच्या आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा अनुभव खूप सुंदर पद्धतीने चित्रपटात गोठवून साजरा केल्याबद्दल मी वेळोवेळी उमेशचे आभार मानत असतो.अश्या काही वेळी आपण चित्रपट बनवण्याचे काम निवडले आहे ह्याचे मला फार म्हणजे फारच बरे वाटते .

 

IMG_1646

 

                                   अपेयपान ६

 

मी डावरा आहे ,डाव्या हाताने लिहितो हे समजल्यावर माझ्या एका ओळखीच्या गृहस्थांनी मला आपुलकीने “येत्या रविवारी संध्याकाळी अमुक अमुक ठिकाणी एक सभा आहे तिथे ये असे सुचवले . डावर्या लोकांची संघटना पुण्यात आहे आम्ही सगळे महिन्यातून दोनदा तिथे भेटतो. मी बर म्हणालो.

ते डाव्या विचारसरणीचे म्हणून जे लोक असतात असे आपण वाचतो ते तर आपण नाही?मला बरेच वेळा काही कळत नसे. आपण डावरे आहोत म्हणजे डावे आहोत कि काय ? मला स्वतःची भीतीच वाटायची त्या कोवळ्या वयात .म्हणजे आपल्याला आता सभा मोर्चे काढायला लागणार आणि जे घडेल त्याला विरोध करत बसावा लागणार बहुतेक. आणि आनंदी होताच येणार नाही . कारण केव्हढे ते सामाजिक प्रश्न पुण्यात? आणि ते असताना आपण आनंदी राहायचे ? हे डाव्या लोकांना पटत नाही असे मी ऐकून होतो . पुण्यातले डावे लोक सगळ्याला विरोध करतात असेही मी ऐकून होतो. हे लोक सभेला बोलावतायत म्हणजे काहीतरी गंभीर गुप्त संघटना असणार .आपल्याला त्यात सामील करून घेतायत बहुदा. माझा सगळा आठवडा अतिशय गोंधळात आणि भीतीमध्ये गेला. आपल्याला काय काय करायला लावतील ,कोणती पुस्तके वाचायला लावतील ? रशियात वगरे जायला लावतील बहुदा काहीतरी गुप्त कागदपत्रे घेऊन. कारण डाव्या लोकांना रशियाचे फार असते असे मला कळले होते. आमच्यासारख्यांच्या घरात इंग्लंड अमेरिकेला जाण्याने जे पुण्य मिळते ते डाव्या लोकांना लेनिनग्राड , स्तालीनगराड ,मोस्को ह्या क्षेत्री जाऊन मिळते असेही काही पुस्तके वाचून तोपर्यंत कळले होते.

त्या आठवड्यात मी प्रयत्न करून उजव्या हाताने जेवून बघ, उजव्या हाताने लिहून पहा असे सगळे प्राणायाम करून पहिले. पण कसचे काय? उजवा हात मेला अगदी नेभळट निघाला. उजव्या हाताने कसे जाज्वल्य कणखर आणि देशप्रेमी असायला हवे.शिवाय ब्रम्हचार्याचे तेज उजव्या हातावर नुसते सळसळयला हवे, तसे काहीच त्या माझ्या उजव्या हाताचे होत नव्हते. माझा डावा हात सगळी आवश्यक कामे करी आणि उजवा हात सगळी नको ती कामे करी . त्या दोघांसोबात माझे खरं म्हणजे बरे चालले होते. आता ह्या संघटनेत जाऊन ‘एकच हात आपला’ असे निवडायला लागणार बहुदा. मी जीव मुठीत धरून रविवारची वाट पाहायला लागलो.

लाल रंग पहिला कि त्या आठवड्यात माझ्या अंगावर शहारे येत. देवासामोरचे कुंकू .फोडणीच्या डब्यातील तिखट .बाप रे बाप. आणि दाढी वाढवायला लागेल कि काय ? मला खरं तर तेव्हा नुकती कोवळी कोवळी दाढी येऊ लागली होती आणि मला Tv वरच्या जाहिरातीत दाखवतात तशी गालाला भरपूर फेस लावून दाढी करायची होती. सुगंधी आफ्टरशेव लावायचे होते .मला स्वच्छता आणि टापटीप ह्याची भारी आवड. दाढी वाढवायला लावली तर मात्र आपण डावे व्हायला सरळ नकार देऊ हे मी स्वतःला बजावत राहिलो.

एका प्रकारे मी सुप्तपणे उत्साहात होतोच कारण एकदा का डावे बनलो कि आपल्या आजूबाजूचा देवधर्म , देवळात जा , आरत्या म्हणा , श्लोक पाठ करा, जानव्हे घाला हे सगळे अत्याचार टळतील . मला ते सगळे धार्मिक वातावरण काही म्हणजे काही केल्या आवडत नसे . डाव्यांना देव चालत नाही . हि एक उजवी बाजू त्यांच्यात मला दिसली . मला खरे म्हणजे आजूबाजूच्या सदाशिवपेठी वातावरणातून पळूनच जायचेच होते . सगळे बदलूनच टाकायचेच होते. एखादा music band काढावा आणि गिटार वाजवत जगभर फिरावे हे माझे स्वप्न होतेच . पण जे काही करू ते मस्त आनंदात . आणि भरपूर पैसे कमावून . उगाच उपाशी राहून मोर्चे काढत विरोध बिरोध करण्याचा आणि बॉम्बफेक करण्याचा माझा पिंडच नव्हता. बघू रविवारी काय वाढून ठेवलय आपल्या पुढ्यात !

मी मनावरचे दडपण कमी करावे म्हणून एका खूप हुशार मित्रापाशी मन मोकळे केले . तो म्हणाला “डावरे म्हणजेच डावे”. तू जन्मतःच डावा आहेस. झाले.माझी खात्रीच पटली. पण तो पुढे म्हणाला कि तू डावा होण्यापेक्षा समाजवादी हो . म्हणजे काय ? तो म्हणाला ते मला माहित नाही . पण माझी एक आत्या समाजवादी आहे आणि शिवाय ती फेमिनिस्ट पण आहे . ती खूप मजेत असते, तीच्या वाट्याला कुणी जात नाही. ती देवधर्म करत नाही .पुस्तके वाचते. तीच नवरा दाढी करतो. शिवाय ते वेल टू डू आहेत. ते मस्त युरोपला जातात आणि ते आनंदी पण असतात .तू समाजवादीच हो. मी म्हणालो रविवारनंतर ठरवू .

रविवारी मी चेहऱ्यावर शक्य तितका आत्मविश्वास ठेवून त्या सभागृहात प्रवेश केला. तिथे मला सगळे आमच्या आजूबाजूला राहतात तसेच घारेगोरे लोक दिसले. म्हटले , बरेच लोक स्वतःमध्ये बदल घडवायला आलेत वाटते इथे . शिवाय चहा , वेफर्स आणि साबुदाणा खिचडी होती .मग मला ओळखत होते ते गृहस्थ तिथे आले आणि ते आम्हाला जगभरात कोण कोण डावरे आहेत ह्याची माहिती द्यायला लागले. खूपच मोठमोठी नावे होती. लेखक , शास्त्रज्ञ , क्रिकेटपटू , राजकीय नेते, कवी . मला अगदी स्फुरण चढले . म्हणजे आपण ह्यांच्यापैकी एक आहोत तर .मग त्यांनी डावरे असण्यामागची शास्त्रशुद्ध कारणे समजावली , मेंदूचे दोन भाग. उजवा भाग शरीराच्या डाव्या भागावर नियंत्रण ठेवतो .तो प्रबळ असला कि डाव्या हाताने लिहिले जाते.बहुतांशी लोकांचा डावा भाग प्रबळ असतो त्यामुळे ते सगळी कामे उजव्या हाताने करतात.आपण वेगळे आहोत .

हि संघटना अंतरराष्ट्रीय होती तरी राजकारणाचा काही विषयच येईना .शिवाय अतिशय शांतपणे सगळे चालले होते .मग काही जण उठून बोलू लागले, त्यांना त्यांच्या घरात डावरे असण्याबद्दल कसे वागवले जात होते , मुद्दाम शिक्षा करून उजव्या हाताने लिही , जेव असे सांगितले जात असे. अनेक वेगवेगळी यंत्रे जी फक्त उजव्या हाताने काम करणाऱ्या माणसांचा विचार करून बनवली जातात त्यामुळे आपलं कामाचा वेग कसा कमी होतो . मला ते सगळे ऐकून फार बरे वाटले . माझ्या घरी मी डावरा होतो ह्याचा कधीच कुणी बाऊ केलेला नाही , मला जसे हवे तसे घरचे सगळे करू देतात असे माझी पाळी आल्यावर मी म्हणालो . मग सगळ्यांचे नाव पत्ते अश्या नोंदी करून घेतल्या . पुढच्या सभेची तारीख ठरली आणि मग एकमेकांशी गप्पा मारा असे आम्हाला सांगितले . सभा जवळजवळ संपली . राजकारणाचे , कार्ल मार्क्स, रशियाचे नावच नाही .

अरे बापरे.असे असते का डावे,किंवा डावरे असणे ? मग चांगले आहे कि. मला आमच्या पुण्यातले डावे लोक फारच आवडले. डावे असणे म्हणजे एरवी जे जगात सरधोपटपणे चालू आहे त्याला पर्यायी विचार करणे असे असावे बहुदा . किंवा इतरांपेक्षा काही वेगळी माणसे असतात त्यांना समजून घेणे म्हणजे डावे असणे असे असावे बहुदा. जरा वेगळ्या नजरेने चालू असलेया गोष्टींकडे बघायची सवय लावून घेणे.

म्हणजे ठोस कुंपणे नाहीयेत आणि थोडेसे इथून तिथे तिथून इथे उड्या मारत मजेत जगायची सोय असू शकते तर ! मी जवळजवळ तरंगतच झुलता पूल ओलांडून आमच्या घरी येऊन दाखल झालो आणि उद्यापासून मी देवळात आलो नाही तर चाललेलं का असे आईला विचारले .ती शांतपणे हो म्हणाली .जानव्हे घातले नाही तर चालेल का असे विचारले. ते सारखे शर्टातून दिसते .बाबा त्यालाही हो म्हणाले आणि मी डाव्या हांताने मस्त वरणभात तूप असे जेवलो.

 

IMG_1696

 

अपेयपान ७

आपल्याला पुढे आयुष्यात काय काम करायचे आहे ह्याचा निर्णय आपण लहानपणी नक्की कसा आणि कधी घेतो हे सांगणे फार अवघड असते . भारतात हा निर्णय बहुतांशी वेळा मुलांचे आईवडील घेतात असे दिसते . उदाहरणार्थ , ते डॉक्टर असतात , त्यांनी स्वतःच्या हव्यासापायी भलीमोठी इस्पितळे उभारून ठेवलेली असतात , मग हे सगळे चालवणार कोण ? असे म्हणून आपोआपच मुलाला डॉक्टर केले जाते . ती डॉक्टर मुले मेडिकल कॉलेज सोडून बाहेर कुठे प्रेमात वगरे पडायला जात नाहीत मग सूनही डॉक्टरच येते . असे गाडाभरून घरात डॉक्टर गोळा होतात . तसेच काही ठिकाणी इंजीनियर्स , काही ठिकाणी बँकर्स असे सगळे आपोआप विचार न करता चालूच राहते. बहुतेक वेळा आपण जे काम निवडणार आहोत त्याचा आपल्या आयुष्यावर किती दूरगामी आणि खोलवर परिणाम होणार आहे ह्याची जाणीव बहुतेक सुशिक्षित कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा नसते. आणि मुलींच्या बाबतीत अजूनही न बोललेलेच बरे . भारतातील शहरातल्या बहुतांशी मुली अजूनही सोयीने आणि स्वार्थाने आपल्याला नक्की किती स्वतंत्र व्हायचे आहे हे चाणाक्षपणे ठरवतात . स्वातंत्र्य त्यांना दिले तरी नको असते कारण स्वतंत्र होणे वगरे त्यांना झेपणारे नसते . परावलाम्बित्वाचे सुख अजूनही त्यांना आवडते आणि कुटुंबव्यवस्थेमुळे परवडते सुद्धा. फक्त शहरी समाजात स्त्रिया आणि मुलींच्या कोणत्याही निर्णयाविषयी बोलण्याची सोय आपल्या अर्धवट आणि अर्ध्याकच्च्या स्त्रीवादाने ठेवलेली नाही . काहीही बोलले तरी मुली एक तर रडून ओरडून कांगावा करतात किंवा हक्क्क मागत आरडा ओरडा करतात . खऱ्या अर्थाने बुद्द्धीमान , स्वतंत्र आणि स्वतःची जबाबदारी घेणाऱ्या स्त्रिया भारतीय शहरी पांढरपेशा समाजातही पन्नासात एक एवढ्याच असतात .

पैसे कमवण्यापलीकडे आपल्या काम करण्याच्या निर्णयाचा अतिशय मोठा आणि सखोल परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत राहणार असतो . आणि दुर्दैवाने आपल्या शिक्षणपद्दतीत निवड कशी करावी हे कधीच शिकवत नाहीत . आपल्या आयुष्याची आपण नीट निवड करणे आणि अतिशय जबाबदारीने आपले निर्णय आपण स्वतः घेणे . हे आपल्याला घरांमध्ये , शाळांमध्ये कधीही शीकवले जात नाही . ह्याचे मुख्य कारण वयाने ज्येष्ठ व्यक्तींना आपल्यापेक्षा जास्त कळते आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतील असा आपला भाबडा विश्वास . भारतातील नव्वद टक्के लोक आपल्या करियरचे निर्णय स्वतः अजूनही घेत नाहीत ते ह्यामुळे. कारण घेतलेल्या निर्णयाची किंमत चुकवायची तालीम भारतीय मूल्यव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्था आपल्याला कधीच देत नाही .

सुदैवाने १९९९ सालापासून अर्थकारण आणि तंत्रज्ञान ह्यात मूलगामी बदल भारतात घडायला लागले आणि अर्थव्यवस्था खुली झाली तेव्हापासून ज्येष्ठ वगरे ज्या व्यक्ती कुटुंबात असतात त्यांना काही केल्या आजूबाजूला हे सगळे काय घडते आहे हे कळेनासे झाले. आणि आपल्या पुढच्या पिढीला कोणताही सल्ला द्यायला ती हुशार आई वडिलांची पिढी अपात्र ठरली ह्याने आमच्यासारख्या मध्यम्वर्गीय शहरी लोकांचा खूपच फायदा झाला. त्या बाबतीत आमची पिढी नशीबवान म्हणायला हवी कारण मुक्त अर्थव्यवस्था आल्यावर आमच्या घरादारातील जेष्ठ वगरे मंडळींना कशाचे काही कळेनासे झाले आणि तेच खूप घाबरून भांबावून बसले. डॉक्टर , इंजिनीर , सरकारी नोकरी , बँक किंवा किराणा मालाचे दुकान एवढेच माहिती असलेल्या पालकांचे धाबे ह्या काळात दणाणले . आणि वयाचा आणि शहाणपणाचा कोणताही संबंध नसतो हि मोठी जाणीव सुस्त आणि राजस्वी कुटुंबव्यवस्थेत लोळत पडलेल्या शहरी कुटुंबांना झाली . ह्याचे कारण उघडलेली अर्थव्यवस्थेची दारे , वेगाने बदलते तंत्रज्ञान हे होय .कामाच्या आणि आपलेआयुष्य हवे त्या पद्धतीने घालवण्याच्या अनेक संधी या काळाने आम्हाला उपलब्ध करून दिल्या.

मला हे अजून लक्खपणे आठवते आहे कि सरकारी नोकर्यांमध्ये जातीनुसार राजकारण आले तेव्हा आमच्या आजूबाजूचे सर्व पुणे अतिशय घाबरले होते. आपण आता पटापट अमेरीकेला जाऊन नोकर्या मिळवू कारण आपल्या देशात आपल्या लोकांच्या बुद्धीला आणि कर्तृत्वाला अजिबात किंमत उरणार नाही अशी मोठी भीती सगळ्या ब्राह्मण कुटुंबांमध्ये त्या वेळी पसरली होती. आणि आज पाहताना हे दिसते कि कुटुंबियांच्या त्या भीतीने खरोखर आमच्या आजूबाजूची जवळजवळ सर्व मुले आज युरोप आणि अमेरिकेत राहतात. ती अतिशय सुखात आहेत , कर्तृत्ववान आहेत . अनेक जण खूप चांगली कामे करतात पण हे झाले ते कुटुंबाच्या आणि त्या काळातील जातीय संक्रमणाच्या भीतीने . स्वतःच्या निर्णयाने नाही . कारण त्या वेळी सरकार तुमच्या आयुष्यातील बरेच काही ठरवत असे . आज ती परीस्थिती नाही . कारण त्यानंतर काळाने वेगळीच पावले टाकली आणि सुदैवाने भारतात खाजगी क्षेत्र बळकट झाले आणि बुद्धी आणि कष्टाला भरपूर किंमत मिळाली. सरकारी नोकर्यांना हुशार कर्तृत्ववान तरुण मुले विचारेनाशी झाली.

आपली शहरे आणि गावे सोडून अनेक तरुण मुलांनी ह्या काळात स्थलांतर केले आणि सुरक्षितता सोडण्याची सवय त्यांना लागली . अनेकांनी वेगळे कल्पक व्यवसाय सुरु केले . एकाच ठिकाणी वीस वीस वर्षे काम करून घरी परत येणाऱ्या आमच्या पालकांच्या पिढीला ती सवय कधी नव्हती . त्यांना तेव्हाही आणि आजही हे बदल पचवता आले नाहीत. मराठी कुटुंबामध्ये कधीही पूर्वी न ऐकलेले व्यवसाय आणि कामे तरुण पिढी जोमाने करू लागली आहे .

आमच्या पुण्यात एका डॉक्टरांनी स्वतःचे मोठे देखणे आणि उत्तम salon सुरु केले, तेव्हा त्यांना लोकांनी अनेक टोमणे मारले. शेवटी लोकांचे केसच कापायचे होते तर मग डॉक्टर कशाला झालास ? असे आमचे क्रूर आणि संकुचित वृत्तीचे शहर .अश्या टोमणे देणाऱ्या लोकांची बदलत्या काळाने मोठी गोची केली .आणि माणसे स्वतः ला हवे ते काम आणि व्यवसाय करायला मोकळी झाली .

स्पर्धात्मक आणि थोड्या वेगवान शहरी जगात जगणाऱ्या आजच्या तरुण पिढीला सुदैवाने स्वत: च्या निर्णयांची काळजी आणि किंमत आहे . मी अनेक वेळा मुलामुलींशी गप्प्पा मारतो तेव्हा मला लक्षात येते कि आधीच्या मध्यमवर्गीय पिढ्यांमध्ये असणारा भाबडेपणा आणि संकोच ह्या पिढीत कमी होत जातो आहे . माझ्या आजूबाजूच्या अनेक तरुणांनी आई वडिलांचे सल्ले संपूर्ण फाट्यावर मारून अनेक असुरक्षित पण आवडती रंगीत कामे निवडली आहेत. ह्या मुलांना आज पैसे कमावण्यात , प्रवास करण्यात , तात्पुरती चार कामे करण्यात आणि ज्याला इंग्रजीमध्ये ‘फिगर आउट करणे’ म्हणतात ते करण्यात काहीही वावगे वाटत नाही .आईवडिलांच्या सूचना ऐकून हल्ली कुणीही आपल्या करियरचे निर्णय पट्कन घेऊन टाकत नाही हि एक फारच आश्वासक गोष्ट आजच्या काळाने साधली आहे. आपण काय काम करायचे आहे हे मुले फार सावकाश ठरवतात .किंवा एकदा ठरवलेले मोडून तिशी पस्तिशीत संपूर्ण नवी कामे करायला घेतात आणि त्यात यशस्वी होतात, किंवा आपटतात , तरी पुढे जातात .

यशस्वी होणे म्हणजे काय? ह्याची व्याख्या आता ह्यापुढील काळात बदललेली आपल्याला दिसेल . आणि ती व्याख्या आधीच्या पिढीच्या व्याख्येपेक्षा फार वेगळी असेल. सुरक्षितता शोधणे म्हणजे यशस्वी होणे हि व्याख्या आता मोडून पडत आहे .तरुण मुलांमध्ये अनावश्यक प्रमाणात पैसे साठवून ठेवण्याचा कल कमी होतो आहे . कमावलेले पैसे तरुण मुले वेगवेगळ्या प्रवासांवर , नवी यंत्रे घेण्यात खर्च करतात . तरुण मुले लग्न उशिरा करतात आणि उगाच मुलेबाळे जन्माला घालायचे ताण स्वतःवर घेत नाहीत . त्यामुळे मोकळेपणाने हवी ती कामे करत , स्वतःचे आयुष्य अजमावत जगण्याची संधी ह्या आजच्या काळात मोठ्या प्रमाणत उपलब्ध झाली आहे .

आपल्या आईवडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष्य करून आपल्याला हवे तेच करण्याची सवय मुलामुलींना लागली तर त्यांचे पुढील काळात फार भले होईल अशी आजची परिस्थिती आहे .

 

IMG_0068

अपेयपान ८

 

माणसाने घातलेले पोशाख बोलके असतात . माणसे गप्प बसून असली तरी त्यांचे पोशाख बोलतात . जगातल्या हुशार माणसांनी हे नीट ओळखले आहे आणि त्यामुळे जाणती माणसे नेहमीच आपल्या वेशभूशेबाबत जागरूक असलेली आपण पाहत असतो . महात्मा गांधींपासून बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यापर्यंत अनेक दशकांमधील लोकजीवनांतील अनेक जाणत्या व्यक्तींनी स्वतःच्या वेशभूषेचा नीट आखीव विचार केला आहे असे आपल्याला दिसेल. अनेक राजकीय नेते , धर्मगुरू , गायक , वादक , नट, अध्यात्म पंडित , योग गुरु अश्या अनेकांना जगभर स्वतःची ताकद ठसवण्यासाठी एक विशिष्ठ वेशभूषा लागते . नवीन काळामधील branding चे शास्त्र विकसित होण्याच्या फार पूर्वीपासून माणसाने आपल्या विशिष्ट वेशभूषेचा वापर करून घेतलेला आहे .

धर्म हा भारतातीलच नाही तर जगातीलच सगळ्यात मोठा व्यवसाय आणि उलाढाल असल्याने धार्मिक वेशभूषा करणाऱ्या लोकांना आपसूकच एक उगीचच जास्त पवित्र आणि उदात्त असण्याचे बळ सामान्य माणूस अतिशय आपसूकपणे बहाल करतो . आजच्या नव्या काळात जिथे जगातील सर्व माणसांची वेशभूषा एकसारखी होत जात असताना अनेक माणसे अतिशय आग्रहाने धर्मात किंवा धर्मग्रंथात लिहून ठेवलेली वेशभूषा आग्रहाने करत राहातात . किंवा धार्मिक रंगाचे कपडे आग्रहाने वापरतात . धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देशांमध्ये वावरताना अतिशय दुराग्रहाने स्वतःचे वेगळेपण आपल्या धार्मिक वेशभूषेने जपत राहतात . आणि मोठ्या प्रमाणत स्वतः च्या धर्माचे अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शन करत बसतात . मला स्वतःला असल्या माणसांची अतिशय भीती वाटते .

बाबरी मशीद पडल्यानंतर भारतात ज्या जातीय दंगली झाल्या त्यामुळे माझ्या पिढीच्या मुलांना धर्म आणि जातीयवाद कळायला आणि वाईट त्याचे परिणाम जाणवायला जास्त मदत झाली . ज्या गोष्टीबद्दल आम्ही सगळे अतीशय निवांत , निष्काळजी आणि अज्ञानी होतो ती गोष्ट म्हणजे धर्म आणि जात . बाबरी मशीद पडल्यावर आमच्या आजूबाजूच्या काळात धर्माविषयी अतिशय दक्षता असण्याचे वातावरण तयार झाले . ह्या काळातील माझी सगळ्यात मोठी आठवण म्हणजे कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने जर धार्मिक पेहराव केला असेल तर त्या व्यक्तीची अतिशय दहशत बसणे . त्या व्यक्तीची भयंकर भीती वाटणे आणि त्या व्यक्तीबद्दल मनात घृणा तयार होणे.

काळे बुरखे घातलेल्या बायका , भगवे भडक कपडे लपेटलेल्या साध्वी , मुल्ला मौलवी , घरी पूजेला येणारे गुरुजी , रस्त्यात फिरणारे किंवा कुंभमेळा गाजवणारे साधू , परदेशी शहरांमध्ये फिरताना दिसणारे ज्यू धर्मगुरुंचे समूह , चर्च मधले पाद्री ह्या सगळ्या माणसांची भीती आणि दहशत बसण्याचे कारण हे कि आम्ही तोपर्यंत धर्माचा संबंध दहशतवादाशी , दंगलींशी आणि विध्वंसाशी असतो हे न शिकलो होतो न असे काही भयंकर आम्ही कुणीही अनुभवले होते. अतिशय उग्रपणे अनेक धर्माची माणसे आपापल्या धर्माने सांगितलेले पेहराव घालून tv वर भाषणे देताना , सभांमध्ये आरडओरडा करत बोलताना आम्ही त्या काळात पहिली . त्याचा हा परिणाम असावा . मला आज शहरांमध्ये दैनंदिन आयुष्य जगताना , रस्त्यावर , बसमध्ये ट्रेनमध्ये , स्टेशनवर कोणत्याही धर्माचा ठराविक वेशभूषा केलेला स्त्री किंवा पुरुष पहिला कि बॉम्ब किंवा दंगल आठवते . आणि मला अश्या माणसांची अतिशय किळस येते . त्यांची भीती वाटते . मला अश्या पारंपारिक भडक माणसांच्या संगतीत अजिबातच सुरक्षित वाटत नाही . मग त्या माणसाची जात आणि धर्म कोणताही असो .

वेशभूषेचा निर्णय हा व्यक्तिगत असला तरी अनेकवेळा तो नुसताच व्यक्तिगत नसतो . कारण सर्व सामान्य माणसाना स्वतःचा निर्णय आणि स्वतःचा वेगळा विचार करायचा नसतो . कुणीतरी आखून दिलेल्या मार्गाला धर्म आणि परंपरा असे म्हणून ती मुकाटपणे आयुष्य घालवत असतात . धार्मिक वेशभूषा हि आपल्याला “ मी अमुक एक धर्माचे पालन करणारा किंवा करणारी आहे असे सांगते” तात्विकदृष्ट्या त्यात गैर असे काहीच नाही . पण जग तत्वाने कधीच चालत नाही . आजच्या काळात जेव्हा शहरी दैनंदिन जीवनात बहुतांशी माणसे एका प्रकारचे सोपे , समान आणि धर्मनिरपेक्ष पोशाख घालतात त्यांच्यात मध्येच धार्मिक ग्रंथाबरहुकूम पोशाख केलेली माणसे आली कि ती माणसे त्या जागी वेगळी उर्जा तयार करतात . ती उर्जा उग्रवादी , आणि राजकीय असू शकते . अश्या माणसांमुळे त्या जागेचा माहोल लगेच बदलतो . त्यांचा पोशाख आता नुसते “ मी विशिष्ट धर्माचे पालन करणारी व्यक्ती आहे” असे सांगत नाही तर “ माझा धर्म मोठा आहे , तुम्ही इतर आहात आणि मी तुम्ह्च्यापेक्षा विशिष्ठ आहे” असे सांगतो .

आपण आता बारा बलुतेदारांच्या खेड्यात राहत नाही . आपल्या जाती आपले व्यवसाय आणि आपले पारंपारिक पोशाख ह्याचा काहीही संबंध आजच्या काळात उरलेला नाही . उदाहरणार्थ आजच्या काळातले मुंबईतले मासेमारी करणारे लोक “ वाल्ल्हाव रे नाखवा” ह्या गाण्यात घालतात तसले पोशाख घालून समुद्रावर जात नाहीत . ते टी शर्ट आणि pant घालतात . आमच्या आजूबाजूला राहणारी माणसे असे कोणतेही कपडे घालत नाहीत ज्यामुळे त्यांची जात किंवा धर्म आपल्याला कळेल. असे असणे मला आवडते .

आपण सगळे पोशाख , दिसणे ह्या सगळ्याने सारखे असणारया माणसांनी भरलेल्या शहरात राहतो. आणि त्यामुळेच असे असताना माणसे धार्मिक पोशाख करणे निवडतात तेव्हा त्याच्यामागे त्यांचे नक्कीच मोठे आणि विशिष्ट सामाजिक आणि राजकीय डावपेच असतात . त्या माणसांचे नसले तरी त्या माणसाना असे पोशाख आजच्या जगात घाला असे सांगणाऱ्या त्यांच्या नेत्यांचे , धर्मगुरुंचे , राजकीय सल्लागारांचे नक्कीच असतात. अशी माणसे साधी आणि विचार न करता असे पोशाख घालत असतील असे मला कधीही वाटत नाही. माणूस स्वतःला इतरांपेक्षा वेगळा असं मुद्दाम काढू पाहतो तेव्हा तो कधीही साधा भाबडा असू शकत नाही .

भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला धर्माचार , विचार, पोशाख ह्यांचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. पण दुर्दैवाने आजच्या काळात धर्माचा संबंध शांतता आणि पावित्र्याशी उरलेला नसल्यामुळे आणि धर्म आणि दहशतवाद , किंवा धर्म आणि राजकारण हि समीकरणे पक्की असलेल्या काळात आम्ही जन्माला आलेलो असल्याने धार्मिक माणसांची भीती वाटणे आमच्या बाबतीत साहजिकही आहेच .

तीच गोष्ट गणवेशाची . एकसारखे गणवेश हे शक्तीप्रदर्शन आणि भीती तयार करण्यासाठी निर्माण केले जातात आणि अशी माणसे आजच्या काळात सक्काळी रस्त्याने चालत गेली कि त्यांची भीती वाटते . हि माणसे एकत्र आल्यावर काय करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलेले असते . अशी भीती वाटावी हेच त्या गणवेश तयार करणाऱ्या विचारवंताला हवे असते . आणि त्यात तो यशस्वी होतो. समाजात गणवेश घालून फिरणाऱ्या माणसांविषयी दहशत तयार होते . मग ते पोलीस असोत किंवा शाखेत जाणारे स्वयंसेवक असोत . पोशाख हा माणसाला सत्ता उभी करून इतरांना ताब्यात ठेवायला नेहमीच मदत करत असतो . आणि गणवेश हा त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे .

फ्रांस सारख्या काही पाश्चात्य राष्ट्रांमध्ये धार्मिक वेशभूषा करून समाजात वावरून अस्वस्थ वातावरण तयार करण्याला विरोध होतो आहे आणि त्यामुळे तिथे बुरखा बंदी सारखे कायदे तयार होवून नवी राजकारणाची समीकरणे उमटत आहेत. भारतात अजूनही सामाजिक आचार विचार आणि वैयक्तिक आयुष्य ह्यांची गल्लत आणि फारकत असल्याने कोणत्याही प्रकारची समानता आणि सारखेपणा रोजच्या जीवनांत येणे शक्यच नाही . आपल्या बहुरंगी आणि बहुपदरी भारतीय समाज जीवनाच्या दृष्टीने हे योग्य जरी असले तरी नागरिकाने निवडलेला विशिष्ट पोशाख आणि त्याचे विचार ह्याची सांगड जर घातली तर धर्माधिष्ठित कोणत्याही गोष्टीची दहशत आणि भीती वाटण्याचे आजचे दिवस आहेत . आणि ह्याचा प्रत्यय रोज घडणाऱ्या घटनांमधून दिवसेंदिवस प्रखरपणे येतो

IMG_0222