प्राईम टाईम स्टार

एकटा राहणारा माणूस जेव्हा अचानक मरतो तेव्हा काही नाट्यपूर्ण गोष्टी घडण्याची शक्यता तयार होते. रोजच घडणाऱ्या साध्या गोष्टी अभूतपूर्व होवून जातात. त्या एकट्या माणसाने घरामध्ये ओट्यावर काही शिजवून ठेवलं होतं, ते सावकाश नासायला लागतं. कपडे? ते वॉशिंग मशीन मध्ये धुवून पडलेले असतात ते वाळत घालायचे राहून जातात. कुजायला लागतात. टेबलावर दोन तीन पत्र येउन पडलेली असतात . उघडायची राहिलेली, उघडायचा कंटाळा केलेली . त्यातल्या एखाद्यातरी पत्रात चांगली बातमी असू शकते. नव्या प्रवासाविषयी. आपल्या नाटकाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाविषयी . फोन दिवसभर वाजत राहील . पण एकटा राहणारा माणूस नेहमीच फोन उचलायचा कंटाळा करतो. त्यामुळे फोन करणारे सवयीने दर तासाला प्रयत्न करत राहतील. जवळच एका हॉटेलमध्ये एकट्या राहणाऱ्या माणसाने कुणालातरी भेटायला बोलावलं होतं . एकटा राहणारा माणूस आलाच नाही म्हणून ती व्यक्ती चरफडत वाट पाहून निघून जाईल.दाराला आतून कडी लावलेली असेल. पेपरवाला पेपरही टाकून जाईल. मग साडेदहा अकरा नंतर सगळा संपूर्ण शांत. आणि रात्री उघड्या राहिलेल्या नळाला दुपारी अचानक पाणी आलं कि फिस्कारत दोधाण धबधबा वाहू लागेल. मोठ्ठा आवाज. जेव्हा दोन तीन तासांनी सोसायटीच्या टाकीतलं सगळं पाणी संपून जाईल तेव्हा कुणीतरी दारावर पहिली थाप मारेल. मग धडका. तुमच्या मरणामुळे जगाचं प्रत्यक्ष रोकठोक नुकसान हणार असेल तरच जग एकट्या राहणाऱ्या माणसाच्या जगण्याची किंवा मृत्यूची फिकीर करण्याची शक्यता आहे.

हा एकटा राहणारा माणूस जर एकाकी माणूस असेल तर अजूनही काही गोष्टी घडतात. एकाकी माणूस मारतो तेव्हा त्याच्या स्वतः च्या वेदना शमतात पण आजूबाजूच्या लोकांच्या जखमा उघड्या पडायला लागतात. चिघळतात . एकाकी माणूस मारताना मागे अनेक तऱ्हेचे गंड आणि एक न संपणारी भीती मागे ठेवून जातो. तो त्याच्या मरणाची जबाबदारी आपल्यावर टाकून जातो. पण आता वेळ गेलेली असल्याने आपण काहीच करू शकत नाही. तुझ्यासाठी मी काय करू शकतो? आपण पुन्हा एकदा बोलूया का?आपलं काही चुकलं असेल तर नाटकाच्या तालमीसारखं परत एकदा करून पाहूया का? तू माझ्याबरोबर दोनचार दिवस राहायला येतोस का? तुला कुठे शांत जागी जावसं वाटतंय का? काहीही शक्य नसतं . एकाकी माणूस मेलेला असतो आणि तो जाताना सर्व शक्यतांचे दोर तोडून जातो. मागे उरलेली माणसे मग आपापली नखं खावून संपवतात. पुढचे काही दिवस एकमेकांच्या डोळ्यात बघायचाही टाळतात. मध्येमध्ये खाली बघून रडल्यासारख करतात आणि मग पहिल्या स्मृतीदिनाच कारण काढून साळसूदपणे एकत्र जमतात .

चेतनने असं अवेळी जायला नको होतं असं आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटतं . आपल्या प्रत्येकाशी स्वतंत्रपणे वागत , काहींना उजेडात तर काहींना अंधारात ठेवत तो आपल्याशी खेळ खेळला . त्याने सर्व सत्ता शेवटपर्यंत आपल्या हातात ठेवली आणि दार उघडून तो ताडकन निघून गेला. माझ्याप्रमाणेच अनेकांना त्याने त्याच्या गंभीर आजाराबद्दल कोणताही सुगावा लागू दिला नव्हता. कसलीही कल्पना नसताना गेल्या वर्षी एका सकाळी ‘ चेतन गेला ” अस सांगणारा फोन मला आला त्या क्षणापासून मी धुमसत राहिलो .त्या रागामुळेच कि काय , त्याला शेवटचं एकदा पाहून घेण्याचीही मला इच्छा झाली नाही.

चेतन दातारला आपण कधीही भेटलेलो नसू तरी आपल्याला तो माहितीच असायचा . कारण नाटकाशी कश्याही प्रकारे संबंध असलेले महाराष्ट्रातले सगळेचजण त्याच्याविषयी सतत बोलायचे. तो फार बोलायचा नाही किंवा पेपरमध्ये त्याचे फोटोही यायचे नाहीत. तो जर आपल्या शहरात आला तर त्याने आपल नाटक पाहून बोलावं असं वाटायचं . आपण जर कधी मुंबईला गेलो तर चेतनची नक्की भेट घेऊ अस वाटायचं. कारण तो फार आश्वासक हसायचा . रंगीबेरंगी कपडे घालायचा . तसले कपडे तो कुठून आणायचा हे त्याच त्यालाच माहीत.शिवाय सतत वेगवेगळ्या हेयरस्टाइल्स . आज असा बघावा तर चार महिन्यांनी तसा . नाटकाचा प्रयोग बघताना नीट रोखून बघणार आणि प्रयोग संपल्यावर काहीतरी मोघम बोलून सटकणार . मग सगळ्या जगाचं आटपल्यावर ह्याचा तीन दिवसांनी फोन येणार . ‘येडझवा’ हा त्याचा आवडता शब्द असायचा . माणसं येडझवी पाहिजेत , नाटकं येडझवी पाहिजेत येड्झवं नसेल तर त्याला आवडायच नाही. त्याच्या असण्याचं जिथे तिथे एक स्टेटमेंट तयार व्हायचं. जिथे ते होणार नाही तिथे तो जायचा नाही . तो कशावरही बोलत बसला कि सुरुवातीला ते साफ खोटं वाटायचं आणि थोड्या वेळाने खर वाटायला लागायच. त्याचं बांद्रयाच अंधारं गूढ घर . त्या घरातली भिंतभर पुस्तकं.आणि त्याची जगभरातल्या गोष्टींविषयीची कडक मतं. त्याचे गावोगावचे मित्रमैत्रिणी. त्याचं मोठ्यांदा हसणं आणि त्याची भलतीसलती मस्त नाटकं. माहीमच्या शाळेत स्टेजमागच्या छोट्या खोलीत तो हळदीच्या घावूक व्यापाऱ्याच्या टेचात एक पाय खुर्चीवर ठेवून बसणार, समोरचा फोन ओढून घेणार आणि म्हणणार , ” ए चायवाला , मी नाटकवाला बोलतोय . दो चाय भेज दे.” जगातले नीम्मे लोक चेतनच वागणं चालवून घ्यायचे आणि उरलेले त्याच्यावर रागावलेले. अधेमधे काही लोक त्याच्या वागण्यामुळे दगड लागलेल्या कुत्र्यासारखे विव्हळत फिरत असायचे, ते मुंबईत इथे तिथे सापडायचे.बराच वेळ फोन वाजून देवून मग शांतपणे तो उचलण्यात त्याला परमानंद वाटायचा. आजच्या काळातला तो शेवटचाच माणूस जो नागपूरला एलकुंचवारांशी , मुंबईत तेंडुलकरांशी आणि पुण्यात आळेकरांशी एकाच वेळी उत्तम संवाद ठेवून असायचा . गिरीश कर्नाडांविषयी मला जे वाटतं तेच त्यालाही वाटतं हे कळल्यामुळे मला तो जवळचा वाटायचा. चेतन दातार हे रसायन पचवायला लोकांना जर वेळ लागायचा. आपण सगळ्यांनी तर त्याच्यापुढे हात टेकलेलेच होते . पण तो आपल्यालाला सतत आजूबाजूला हवा होता . वर्ष दोन वर्ष भेटलाच नसता , कुठेतरी गायब झाला असता तरी हरकत नव्हती पण त्याने अस मरून जायला नको होतं .

एकट्या राहणाऱ्या आणि मरून गेलेल्या माणसांच्या घरचे लोक त्यांच्या अफाट पुस्तकसंग्रहाचं नंतर काय करतात हा मला एक नेहमी पडलेला प्रश्न आहे . कारण प्रतिभावंत माणसाच्या घरच्या लोकांना आपणही तसेच प्रतिभावंत आहोत अस लहानपणीपासून वाटत जरी असल तरी ते खर नसतं. अशी माणसं गेली कि मी नेहमी त्या पुस्तकांचा विचार करत राहतो.

चेतनच्या नसण्यामुळे नक्की काय बिनसलं आहे हे आत्ता लगेचच उमजेलच असं नाही. पण आपल्या इमारतीच्या पायाजवळच्या काही विटा काढल्यासारखं झालं आहे . आता आपल्याला फार जपून राहायला हव आहे . याचं कारण आपल्यापैकी प्रत्येकाला चेतनविषयी जी उमज होती त्यापेक्षा तो जास्त विस्तृत आणि महत्वाचा होता. आजच्या मराठी रंगभूमीला भारतातील इतर प्रांतातील रंगभूमीशी जोडणारा तो एक भक्कम आणि महत्वाचा दुवा होता. आणि तसा असणारा तो एकमेव होता . कारण आपला नाटक घेवून अनेक मराठी नाट्यकर्मी भारतात फिरतात पण चेतनने त्याच्या व्यक्तीमत्वातून नाटक करणाऱ्या माणसांची एक आपसूक जोडणी केली होती . तो त्या माणसांची एकमेकांना गाठ घालून देत असे. गेल्या वर्षी संपून जाईपर्यंत तो नाटक बसवत होता, नाटक लिहित होता . नाटकांची भाषांतरे करत होता. तो कोणत्याही संस्थेचा पदाधिकारी होवून बसला नव्हता , सरकारी कमीट्यांवर नव्हता, सिनेमात तर अजिबातच लुडबुडत नव्हता . आपली सर्व ताकद आणि आपला सर्व वेळ त्याने नाटक करण्यासाठी नीट वापरला होता. चेतनला कधीही यशस्वी नाटक करायचं नव्हतं . त्याला फक्त नाटकच करत रहायचं होतं. चेतनने त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि विचारांमध्ये जो एक विलक्षण ताजेपणा ठेवला होता त्याचा मला फार हेवा वाटतो . आजूबाजूचा एकही नाट्यदिग्दर्शक जे करताना मला दिसत नव्हता ते चेतन सातत्याने करत होता. तो स्वतः ला एकटं पाडून , नव्या विषयाला नव्या माणसाना सामोरा जावून , चौफेर वाचन आणि भरपूर प्रवास करून , स्वतः ची मतं आणि विश्लेषक बुद्धी तल्लख ठेवून तो नाटकांची निर्मिती करत होता . तो अपयशाला घाबरला नाही , लोकांच्या मतांना घाबरला नाही , एकटं पडलं जाण्याला घाबरला नाही . कारण तो जाणीवपूर्वक एकटाच होता . मराठी रंगभूमीवरील आपणच निर्माण करून ठेवलेल्या संस्थांच्या दलदलीत पाय रुतून बसलेल्या नाट्यदिग्दर्शकांच्या नामावालीपासून एकदमच वेगळा असा चेतन दातार हा एक प्राईम टाईम स्टार होता.

अनेक वर्ष रात्री तो सुरमा लावत असे आणि  का ? असे विचारले कि डोळ्याला थंड वाटते असे काहीही उत्तर देत असे . त्याला पाच सहा मुखवटे होते . त्यातले एक दोन त्याने मला दाखवले होते .

नाटक बसवण्याची प्रक्रियाच अशी कि नाटक बसवणाऱ्या प्रत्येकाला ते कमकुवत करत जातं. कारण त्यात एक सामूहिक देवाणघेवाण अपेक्षित असते . नाटक बसवायला आलेल्या सगळ्यांमधील थोडी थोडी उर्जा काढून घेवून ते नाटक उभा राहतं . कारण तो सगळा जिवंत खेळ असतो . आभास नसतो . केल्यासारखा वाटतो प ण नसतो. हे होत असताना एकत्र जमून नाटकाचा शोध घेण्याच्या नादात त्या माणसाना एकमेकांची चटक लागते आणि त्यातून संस्था नावाचं प्रकरण उभा राहातं . ते कामासाठी आवश्यक  वाटल तरी भारतीय प्रवृत्तीनुसार जिथे तीथे कुटुंबे उभी करायच्या आपल्या गलथान सवयीमुळे एकदा संस्था स्थापन झाली कि मग नाटक सोडून सगळ काही त्या माणसांच्या हातून होतं . त्यांचे दौरे होतात , त्यांची बस होते , त्यांना ग्रांट मिळतात , पुरस्कार मिळतात. बऱ्याच जणांची या काळात एकमेकांशी लग्न होतात . पण एक गोष्ट करायची राहून जाते ती म्हणजे  भारंभार नाटक करत राहूनही चिकित्सकपणे नाटकाचा आणि स्वतःचा शोध . त्यामुळे पूवी कम्युनिस्टांचे देश चालत तश्या महाराष्ट्रात अजूनही नाटकाच्या संस्था चालतात. ह्या सगळ्या सामूहिक कोलाहलात आणि दलदलीत दिग्दर्शक नावाच्या माणसाची पूर्ण वाट लागते. चेतन ने हे ओळखले होते आणि स्वतः ला संस्थांच्या आणि माणसांच्या किचाटापासून मोकळे ठेवले होते . नाटक बसवायची वेळ आली कि सौम्य हसरा चेहरा करून नाटकासाठी आवश्यक ती मंडळी तो हुशारीने जमवायचा पण त्याचा फोकस अतिशय तीव्रपणे त्याच्या नाटकावर असायचा. आपण समूहाचा भाग नसून एकटे आहोत आणि ह्या एकटेपणातूनच मला माझ्या नाटकाचा शोध घ्यावा लागणार आहे ह्याची जाणीव त्याला होती. या बाबतीत त्याला त्याच्या गुरूंच, सत्यदेव दुब्यांच बर वाईट सगळाच नशीब लाभल होतं . चेतनच्या बाबतीत पिढ्यांचे उल्लेख करण्याची गरज भासू नये , पण त्याने ज्या माणसांबरोबर कामाला सुरुवात केली ती सर्व माणसं सुजली , कंटाळली, डोकं चालेनाशी झाली ,प्राध्यापक झाली , नोकऱ्याना लागली , समीक्षक झाली पण चेतन मात्र फार काळ सर्वाना पुरून उरला.

चेतनने दिग्दर्शन करण्यासाठी जी नाटके निवडली त्या नाटकांमुळे त्याच्या मनाच्या ताजेपणाची आणि व्याप्तीची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चुका करायला न घाबरण्याच्या त्याच्या वृत्तीची कल्पना येवू शकते . कारण अनेक माणसे चुका करायला घाबरून सामान्य काम दळत राहतात जे चेतनने कधी केले नाही. भारतीय कथा, कविता, कादंबरी, पत्रव्यवहार आणि प्रवासवर्णने याचा बेमालूम मेळ तो त्याच्या हातातील नाट्यसंहीतेशी घालत होता. मराठी नाटककार आणि मराठी साहित्यिक यांच्या कुंपणापलीकडे जावून त्याने नाटकासाठी नवं matter शोधण्याचा सातत्याने प्रयतना केला.नृत्यभाषेबद्दल त्याला अतीव आकर्षण होतं . पारंपारिक भारतीय नृत्यांचा ताल आणि मेळ तो त्याच्या कामात सातत्याने आणू पाहत असे . तो राहत असलेल्या मुंबई शहरात चालणारा अनेकभाषीय जगण्याचा आणि नाटकाचा व्यवहार त्याला उत्तेजित करत असे. त्यातून चेतनने खर्या अर्थाची कॉस्मोपोलिटन जाणीव आणि पोत स्वतःच्या कामाला आणला होता. नटाचं शरीर आणि नटाचा आवाज ह्या दोन ताकदींचा अधाशासारखा वापरतो आपल्या नाटकांमध्ये करत असे आणि रंगमंचावरचा नट हे फक्त साधन आहे ह्याची ओरडून ओरडून आपल्याला खात्री करून देत असे. त्याच्या कामामध्ये  सत्यदेव दुब्यांच्या दृष्टीच ठोस प्रतिबिंब होतं. त्याच्या नाटकाचा सूर चढा आणि त्यातील दृश्यात्मकता फार ढोबळ असे. त्याचे मतभेद आणि आवडीनिवडी ठाम होत्या पण गेल्या पाच सात वर्षात नव्याने निर्माण होत असलेल्या नाटकांकडे तो फार खोलवर पाहू शकत होता. त्याच्या स्वतःह्च्या कामाच एक निश्चित स्वरूप तयार व्हायला लाग्यापासून ते शेवटपर्यंत तो भारतीय कलाकार असण्याच्या शक्यता पुरेपूरपणे अजमावत रहिल. त्याने कधीही भारावून जावून किंवा इतिहासाला बळी पडून पाश्चात्य रंगभूमीची अनावश्यक भलावण केली नाही . Modern होत बसण्याचे त्याच्या पिढीवर असलेले खुळे प्रेशर त्याने स्वतः वर घेतले नाही . कारण त्याच्या अवतीभोवती असलेल्या त्याच्या पिढीत दोन टोकाची माणसे होती . जबाबदार आदर्शवाद आणि डाव्या विचारांनी भारावलेली किंवा मनाने लंडनच्या रंगभूमीवर राहणारी . चेतन ने ह्या दोन्ही प्रकांपासून स्वतःला साळसूदपणे वाचवले . रात्री प्रयोग झाले कि दिग्दर्शकाचे कपडे फेकून देवून तो मुंबईच्या अंधारात लुप्त होवून जायचा. आपलं काम तपासून बघणे आणि नव्या शक्यता अजमावणे यासाठी तो आजूबाजूचे चित्रकार लेखक, संगीततज्ञ ,गायक ,नर्तक यांच्याशी चांगली मैत्री जोपासून होता .त्याच्या ह्या ओढीमुळे त्याचं काम सतत नव्या आणि आश्वासक अनुभवांनी बहरलेलं राहिलं . चेतन आता पुढे काय करतो आहे ही उत्सुकता त्याने प्रत्येकाच्या मनात कायम ठेवली. चित्रपट माध्यमाविषयी त्याने आपली जाणीव एव्हढी पारंपारिक आणि बंद का ठेवली होती ह्याचा उलगडा मला होत नसे. एक तर जुन्या नाटकातील लोकांप्रमाणे तो तो चित्रपटांकडे एक दुय्यम आणि फक्त व्यावसायिक माध्यम म्हणून पाहायचा . चित्रपटांच योग्य रसग्रहण करण्याची त्याने कधी फिकीरही केली नाही आणि कष्टही घेतले नाहीत . त्यामुळे ह्या एका मोठ्या विषयावर आम्ही बोलणं टाळायचो किंवा बोललो तर खूप वेळ भांडत बसायचो। नळावर पाण्याला जमलेल्या बायका मुकाट माना खाली घालून घरी परत जातील एव्हढी gossips तो करायचा आणि त्यातून अपर ताकद मिळवायचा . ” निंदेला बसलो होतो दुपारी ” अस तो फोन करून सांगायचा. माणूस जगताना बाहेर जे जगतो त्याच्या खाली , त्वचेच्या आत वेगळेच अद्भूत व्यवहार चाललेले असतात. चेतनला माणसं अशी सोलून बघायला आवडायची . मानवता, अहिंसा , बंधुभाव , समता असे लोचट मुखवटे घालून माणसांचे कळप एकमेकांना भिडून जो उत्पात करतात ते बघायला तो फार आसुसलेला असायचा . जोतिषविद्या , मंत्रविद्या , गूढविद्या , अध्यात्मिक अनुभूती , स्वप्ने ह्या अनुभांखाली एक हात ठेवून जगायची त्याला सवय होती. त्याला मध्येच फुटलेले हे फाटे मला गोंधळवून टाकत . त्याच्या जगण्याची आणि कामाची अफाट ताकद तो अश्या वेड्यावाकड्या गोष्टींमधून मिळवत असे . “सावल्या” हे त्याचं नाटक वाचलं तर त्याच्या मनाचे हे असे अनेक पापुद्रे हाती लागू शकतील. चार पाच वर्षांपूर्वी नव्याने नाटक लिहू लागलेल्या माझ्यासारख्या नाटककारला त्याने खूप मोठं जग उघडून दाखवलं होतं . आमच्या नाटकांची भाषांतरे व्हावीत आणि त्या नाटकांच्या शक्यता वेगवेगळ्या प्रकारे हाताळल्या जाव्यात ह्याबद्दल तो आग्रही असायचा . इतक सगळं चालू असताना चेतनने जाण्याची काहीच गरज नव्हती . बाकी इतर अनेक जण जाऊ शकले असते. महाराष्ट्रातील रटाळ दिग्गजांचा गोंगाट तरी कमी झाला असता. रम्य जुन्या आठवणींची गावठी दारू पिउन स्मृतींच्या चिखलात लोळणारे, कामाची ताकद संपून परीक्षक वगरे बनलेले , बुद्धी गंजलेले कलाकार मागे राहतात . घरी कंटाळा आला म्हणून किंवा घरी उकडत आहे आणि नाटकाच्या तालमीच्या हाल वर पंखा आहे इतक्या सध्या कारणाने नाटक करणाऱ्या आणि नाटक करताकरता लग्न उरकून घेतलेल्या नट्या आनंदात जगतात . पूर – पाऊस – रोगांच्या साथी – अतिरेक्यांचे हल्ले होवूनही एकही समीक्षक मरत नाही . बाळबोध आणि हिडीस मराठी नाटकांचा धंदा करणारे नाट्यनिर्माते मरत नाहीत सगळे मस्त जगतात आणि आपला चेतन बिचारा मरून जातो ह्यासारख मोठ दुर्दैव नाही.

आपली सामाजिक व्यवहारांची संस्कृती अतिशय संकोचलेली आहे . जवळच्या माणसाने आपल्यासाठी काही केले तर त्याचे आभार मानणे आपल्याला औपचारिक वाटते . कोणत्याही व्यासपीठावरून एखाद्या माणसाविषयी कृतज्ञतापूर्वक बोलले कि ते कृत्रिमच असणार असं आपल्याला वाटतं . प्रेमाचे , कृतज्ञतेचे , ऋण मानंण्याचे व्यवहार करायला आपण संकोच करतो आणि मग अचानक असा कुणाला मृत्यू आला कि त्याला साध Thank You म्हणायचं राहून जातं . आम्ही नाटक लिहिणाऱ्या , नाटक करणाऱ्या सर्वांनी चेतनला एकदा मनापासून Thank You म्हणायला हव आहे . त्याला आत्ता हे सांगायल हव आहे कि तू आमच्यासाठी फार महत्वाचा आहेस . जसं पाणी घडवता येत नाही तशी तुझ्यासारखी माणसे घडवता येत नाहीत . शिबिरं घेवून नाही , पुरस्कार देवून नाही . ज्याला ओळखण्यात आपण सतत कमीच पडलो असं वाटतं , असा तुझ्यासारखा अद्भुत मित्रही परत तयार होणार नाही .

माझ्या कादंबरीच पहिलं हस्तलिखित तयार झाल्यावर चेतन दातार ला मी त्याचं मत विचारण्यासाठी वाचायला दिल होतं . ती आमची पहिली भेट . त्याला आता दहा वर्ष झाली . त्यानंतर काही वर्षांनी नाटकाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना , माझा मित्र मोहित टाकळकर ह्याच्या आग्रहामुळे मी छोट्याश्या सुट्टीत हे नाटक लिहिलं . त्याचे प्रयोग सुरु झाले तेव्हा चेतनने माझ्याकडे नीट नजर वळवली होती . मधल्या काळात त्याने माझी विजय तेंडुलकरांशी गाठ घालून दिली आणि मी सतत तेंडुलकरांशी बोलेन , न संकोचता त्यांच्या आजूबाजूला राहीन ह्याची काळजी त्याने घेतली. अतिशय मोकळेपणाने आणि आग्रहाने मुंबईतील अनेक क्षेत्रातील लोकांना त्याने माझी नाटके आणि माझ्या फिल्म्स दाखवल्या. नाटकाविषयी कोण कसा बोलतं? कुणाला गंभीरपणे घ्यायच आणि कुणाला समोर हसून नंतर सोडून द्यायच ह्याचे आडाखे त्याने मला शिकवले . मराठी समिक्षकांविषयीचा माझा एकसुरी विरोध त्याने पुसला आणि काही जाणत्या , ताज्या मनाच्या समीक्षकांची गाठ घालून दिली. मुंबई शहराच्या पोटातल्या काही जादूमय गुहांमध्ये चेतनने मला फिरवल .चित्रविचित्र जागा , भलीबुरी माणसे आणि भन्नाट गल्ल्यांची आम्ही उन्हापावसात केलेली सफर कशी विसरता येईल ? अनेक महिने वर्ष चालूच होती ती . माझ्या मागे लागून त्याने माझी नाटके पुस्तकरुपात प्रकाशित करायला लावली आणि छोट्याश्या सुट्टीत चे Production Book प्रकाशित होताना त्याने त्याला प्रस्तावना लिहिली . मी त्याच्यासाठी एकही नाटक लिहिल नाही ह्यावरून तो मला फार टोचून बोलायचा . मी त्याला म्हणायचो कि मला तुझ्यासारखे दुब्यांच्या तालमीतले दिग्दर्शक नकोतच. तुम्ही लेखकाचा चोळामोळा करून त्याला कोपर्यात फेकून देता . नाटकाच्या तालमी करताना स्वतःच एव्हढा आरडओरडा करता कि नट तुमच्या वर आवाज काढून नाटकात उगीचच बेंबीच्या देठापासून ओरडत सुटतात . वर वाट्टेल ते सीन , तमाशे आणि नाचगाणी तुम्ही नाटकात घुसडणार . बुवांच्या बाया आणि बायांचे बुवे करणार . कोण शहाणा नाटककार तुमच्यासाठी नाटक लिहील ?

आपापल्या कामाचं चोख Documentation आणि Recordnig करण्याबाबत चेतनची पिढी आळशी आणि संकोचलेली होती. शिवाय आपल्या देशात कलाकाराचा दस्तैवज तयार होण्यासाठी जितकं मरणप्राय म्हातारं व्हाव लगता तितका चेतन झाला नव्हतात्यामुळे चेतनचं सगळं काम त्याच्या चुका , त्याची नाटकं , त्याचा म्हणणं हे सगळा त्याच्याबरोबर वाहून गेलं . तो मागे सोडून गेला काही उदास झालेल्या स्त्रीयांना आणि पुरुषांना , एकदोन पुस्तकांना , काही फोटोंना आणि त्रोटक लिखाणाला . तो गेल्यावर काही दिवसांनी मला समजले कि त्याच्या मृत्युनंतरही अनेक महिने त्याच्या ORKOOT च्या page वर त्याच्यासाठी निरोप येत राहिले , लोक त्याच्याशी तो जिवंत असल्यासारखा गप्पा मारत राहिले , त्याला आपल्या मनातल सगळ सांगत राहिले . त्याच्या e mail वर अजूनही पत्र जातात . Mailing List वरून त्याला कोणीच काढलेले नाही . त्यामुळे सर्व कार्यक्रमांची आमंत्रणे त्याला मिळत राहातात. आज अनेक कपाटांमधून चेतनचे फोटो असतील , काही कागदांवर चेतनचं हस्ताक्षर सापडेल . काही videotapes असतील ज्या लावल्या कि चेतन बोलताना दिसेल . त्याचा आवाज ऐकू येईल. त्याला नीट समजून घेण्यासाठी जरा जवळ जावून बघू तर सगळा एकदम मुंग्यामुंग्यांचं दिसायला लागेल . चेतनला स्पर्श करू पहावा तर बोटाला टीव्ही ची जाडजूड थंडगार काच लागेल . आता फक्त इंटरनेट च्या अंतराळात चेतनची आठवण अधांतरी तरंगत राहील आणि आत्ता आली तशी अलगद जवळ येईल

 Written originally in २००९ . 

सचिन कुंडलकर . kundalkar@gmail .com

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . )

वॉकमन

यंत्राचं आणि तंत्राचं काय करायचं ? याविषयी मोठ्या प्रमाणावर संभ्रम असलेल्या भारतीय समाजात मी राहतो. मी आणि आपण सगळेजण या यंत्रांचे आणि तंत्रज्ञानाचे जागतीक बाजारपेठेतील सगळ्यात मोठे ग्राहक आहोत. आपण प्रत्येकजण दिवसभरात कोणती न कोणतीतरी बटणे दाबूनच जगतो पण आपला मन मात्र या यंत्रांविषयी अतिशय गोंधळलेले आणि भावूक आहे .

मी लहान मुलगा असताना म्हणजे ८० च्या दशकात जे मी सांगतोय ते सगळ घडायला पद्धतशीरपणे सुरुवात झाली. त्या काळात शेतकरी जसा आपल्या जनावरांची कृतज्ञतेने पूजा करतो तशी घरांमध्ये यंत्रांची पूजा होत असे. कारण घरामध्ये यंत्र आणणे ह्याला एक सन्मानाची आणि प्रतिष्ठेची बाब होती. शिवाय संपूर्ण भारत देश माझ्या लहानपणी कृतज्ञतेच्या व्यसनात बुडालेला होता. समाजाविषयी,यंत्रांविषयी , निसर्गाविषयी ,आपल्या  देशाविषयी एकदा का कृतज्ञता व्यक्त केली कि मग सगळे सगळं करायला मोकळे होत असत. भारतीय संस्कृतीत कृतज्ञ होणे हे मष्ट आहे म्हणे, आणि आम्ही लहानपणी सगळेजण फारच भारतीय म्हणजे भारतीय होतो. पूजा केल्यामुळे यंत्राला बरे वाटेल आणि मग ते जास्त कृतज्ञतापूर्वक काम करेल असं त्या वेळच्या लोकांना वाटत असे.

लहानपणी आमच्या घरी काही म्हणजे काहीही नव्हतं . फक्त एक रेडिओ होता. मग एकेक गोष्टी येऊ लागल्या . त्या सर्व गोष्टी सामाईक असत . म्हणजे सर्व कुटुंबाला मिळून एकच गोष्टं घेतली जात असे . एकच फोन , एकच टीव्ही ,आणि घरात फ्रीजसुद्धा एकच असे. फोन तर सगळ्या गल्लीत मिळून एखाद्याच्याच घरात असायचा . व्यक्तिगत यंत्रसामुग्री नसल्याने सर्व कुटुंबाचे मिळून त्या यंत्रावर पुष्कळच प्रेम असे. जणू मोती कुत्रा किंवा चेतक घोडाच असावा घरातला तेव्हढे प्रेम. काय विचारायची सोय नाही . सायकल विकायला लागली तर मुली ढसाढसा रडत आणि अश्या विषयांवर मराठी मासिकांमध्ये कथा वगरे छापून येत असत. इराणी सिनेमांमध्ये सायकली, वह्या, पेनं , पेन्सिली आणि चपला हरवायाच्या कितीतरी आधी आमच्या मराठी कथांमध्ये यंत्र कर्ज काढून घेतली जात होती, ती विकली जात होती , सावकार त्यांच्यावर जप्ती आणत होते. मुली सासरी जाताना शिवणयंत्राला मिठी मारून रडत असत.  सगळ अगदी किती किती गोड चालू होतं महाराष्ट्रात . मराठी साहित्यात आणि मराठी सिनेमात. मला तर लहानपणी भीती वाटायची कि इतक्या गोड आणि सुसंकृत राज्यात राहतो आपण ,  इतक गोड संगीत आणि इतका गोड सिनेमा आपला ! चुकून एकदम सगळ्या महाराष्ट्राला मुंग्याच लागतील अचानक. त्याच्या गोड्व्यामुळे .  सगळ्या भारतालाच मुंग्या लागतील .

नवीन यंत्र मुहूर्त पाहून आणली जात . दसरा दिवाळी पाडवा असल्या दिवशी घरात वाशिंग मशीन किंवा मिक्सर आल्याने काय फरक पडतो हे आता मला कळत नाही पण आपण सदोदित घाबरलेली माणसे असल्याने समाज नावाच्या विनोदी समूहाला काही बोलण्याची सोय भारतात नसते. भारतीय समाज ज्याला त्याला घाबरून असतो आणि त्यामुळे त्याला सतत शुभ नावाचे मुहूर्त लागतात . चटण्या वाटायचे मिक्सर आणि कपडे धुवायची यंत्रे ह्यांना कशाला बोडक्याचे मुहूर्त लागत असत हे मला कधीही कळलेले नाही . नवीन यंत्र आणलं कि ते कुणाच्या नजरेत येऊ नये , कुणाची त्याला द्रिष्ट लागू नये म्हणून काही दिवस ते कापडाखाली झाकून ठेवायचं. कारण लोकांना आपापली कामेधामे नसतात , ते आपल्या वाईटावर टपून बसलेले असतात असा सगळ्या आयाआज्यांचा विश्वास असायचा . आणि शिवाय वयाने मोठ्या माणसांना सगळे काही कळते असे आम्हाला त्या वेळी नक्की वाटायचे .  सुंदर सुंदर क्रोशाची कव्हरे शिवत असत तेव्हा बायका टीव्ही ला आणि मिक्सर ला !  तेव्हा वेळ आणि प्रेम असे दोन्ही खूप असे त्यांच्याकडे. असा काळ होता तो.

घरामध्ये कुणीतरी एकालाच एखादी विशिष्ठ वस्तू वापरता येत असे. म्हणजे बाबांना मिक्सर वापरता येत नसे आणि आईला व्हिडिओ लावता येत नसे. लहान मुलांना तर त्यावेळी फोनही करता येत नसे. मग यंत्र वापरण्यासाठी विशिष्ट व्यक्तीची किंवा त्या व्यक्तीच्या मर्जीची वाट पहावी लागत असे. त्यामुळे आमच्यात कौटुंबिक जिव्हाळा आणि एकमेकांबद्दलची ओढ फार होती . घटस्फोटांचे प्रमाणही आम्ही मुले लहान असताना कमी होते असे म्हणतात ते काही उगाच नव्हे. खरच होतं ते !

आपल्याला एखादी टेप ऐकायची असेल तर बाबांची रफी- मुकेश – तलत ची गाणी आणि त्यांच्या हातातील ग्लास संपायची आम्ही वाट पाहत बसायचो किती तरी वेळ . हातातल्या कॅसेट मध्ये बोट घालून ती फिरवत बसत. ह्यामुळे आमची पिढी संयम शिकली . दसरा गुढीपाडवा ह्या सणांना काय सापडेल ती गोष्ट हातात घेवून त्याची पूजा केली जात असे. टीव्हीची पूजा, बाईकची पूजा, टेपरेकॉर्डरची पूजा ,फ्रीजची पूजा . आमच्या घरी तर गोदरेजच्या कपाटाचीही पूजा होत असे. माझ्या सायकलला किंवा बाईकला हार घातलेला मला अजिबात आवडायचा नाही . घरापासून लांब गेलो कि मी तो हार काढून फेकून द्यायचो.

पूर्वी सगळ्या वस्तू विकणारी जशी दुकानं होती तशीच सगळ्या वस्तू दुरुस्त करून  देणारी दुकानंसुद्धा मजबूत पसरलेली होती . त्यामुळे एकदा वस्तू घेतली कि ती किती वर्षे घरात ठाण मांडून बसेल हे सांगता येत नसे.  त्यामुळे वस्तू वारंवार रिपेयर करून घेतल्या जात. त्या वस्तूंविषयीच्या आठवणी मनामध्ये साचत जात आणि त्या वस्तू काम करेनाश्या झाल्या तरी टाकून देववत नसत. त्या माळ्यावर ठेवून दिल्या जात.

शिवाय आमच्या पुण्यात कुणीही कधीही घर – शहर सोडून जात नसे. घरातली निम्मी माणसे अमेरिकेला किंवा लंडनला गेली तरी निम्मे लोक पुण्यातच राहात .मुलींची लग्ने शक्यतो पुण्यात नाहीतर थेट बे एरियातच करायची पद्धत होती . तिथे जातानासुद्धा महाराष्ट्र  मंडळ सोडून उगाच इतर अमेरिकन माणसांशी आपला संपर्क येऊ देवू नको अस मुलींना बजावून पोळपाट – लाटण- कुकर- चकली चा सोर्या वगरे देवूनच पाठवल जायचं .  फाळणी वगरे आमच्या भागात झाली नव्हती त्यामुळे एका रात्रीत नेसत्या वस्त्रानिशी घर सोडून पळालो वगरे कुणालाही करायला लागले नव्ह्ते. आणि सदाशिव पेठ , नारायण पेठ सोडल्यास पानशेतच्या पुराच्या पाण्याने कुणाचेही वाकडे केले नव्ह्ते. त्यामुळे सगळी माणसे , सगळ्या जुन्या वस्तू आणि यंत्रे संपूर्ण टुणटुणीत . केव्हाही या आणि पाहा .  हात लावल्यास खबरदार .

आणि ह्या सगळ्यात , कधीही काही जुनं न विसरणाऱ्या,  आमच्या भावगीते ,नाट्यगीते , वपु पुल कथाकथने , लताबाई – आशाबाई , अमुक मामा तमुक तात्या यांची भजने यांनी माखलेल्या मराठी घरात , एके दिवशी माझा नाशिकचा आत्येभाऊ त्याचा लाल रंगाचा सोनी चा वॉकमन  विसरून गेला . त्यात एक इंग्लिश गाण्याची कॅसेट होती , कुणाची ते मला आठवत नाही .तुझे काहीतरी इथे विसरले आहे इथे असे त्याला कळवलं असता ,त्याने ते जे काही विसरले होते ते थोडे दिवस मला वापरायला द्यायला सांगितले .त्या वॉकमनने मला बदलून टाकलं . माझ्या आजूबाजूचं कंटाळवाणं घावूक जग बदललं .

माझा पहिला वॉकमन . तो लाल रंगाचा होता . त्याला मऊ काळे स्पंज असलेले दोन हेडफोन होते .त्यातल्या पेन्सिल सेल सतत विकत आणाव्या लागत जो एक फार मोठा टीनएज खर्च होवून बसला . पण तो वॉकमन फक्त माझा होता आणि मला हवी असलेली गाणी तो गुपचूप मलाच ऐकवायचा , अगदी माझ्या पलंगात सुद्धा गुपचूप येउन . एखादं यंत्र तुमच्या आयुष्यात योग्य वेळी येतं आणि ते तुम्हाला एकदम दुरुस्त करून सोडतं . काही जणांसाठी तो कॅमेरा असतो , काही जणांसाठी तो टेलेस्कोप असतो किंवा गिटार असतं . माझ्यासाठी तो माझा पहिला सोनी चा वॉकमन होता . त्याच्यामुळे मी माझ्या आजूबाजूच्या गर्दीच्या आणि सामूहिक भावनांच्या धबडग्यातून वेगळा झालो आणि मला माझं एकट्याचं विश्व मोकळेपणाने उभा करता आलं . मला लिहिता यायला लागलं ते माझ्या वॉकमनमुळेच कारण त्याने माझा अहंभाव फार चांगल्या प्रकारे जोपासला . मला कृतज्ञ आणि नम्र बालक होण्यापासून त्याने वाचवले आणि चालते फिरते केले. बदलाची सवय लावली . एका जागी लोळत संगीत ऐकणे आयुष्यात बंद झाले . उपदेश करणाऱ्या दिग्गज माणसांकडे संपूर्ण दुर्लक्ष करायची महत्वाची अमराठी सवय मला लागली . त्याने माझ्याभोवतीच्या इतर जगाला बंद करून टाकून मला एका गुहेत पाठवले . सतत “आम्ही” , “आम्हाला” असा सामूहिक विचार करण्यापेक्षा ” मी ” , ” मला ” , असा नेमका विचार मी त्या वयात करू लागलो .

गाण्याचा अर्थ , शब्दांचे अर्थ कळण्याची सक्ती त्या वॉकमन ने माझ्यावरून काढून टाकली . मला माझा खाजगीपणा मिळाला . मी काय ऐकतो आहे आणि त्यातून काय मिळवतो आहे यावर इतरांचा लक्ष्य असण्याची शक्यता संपली आणि माझ्या मनावर उशिराने का होईना पण माझा संपूर्ण हक्क तयार झाला . सगळ्या गोष्टीना अर्थ असला पाहिजे , सगळ्या गोष्टी समाजोपयोगी पाहिजेत , कानावर नेहमी चांगले असे काही पडले पाहिजे अश्या सगळ्या विचारांपासून मला त्याने मुक्ती दिली . आदर्शवादाच्या शापापासून वाचवले आणि खाजगीत जावून वेडेवाकडे पहायची ऐकायची चटक योग्य त्या वेळी लागलीआणि पहिल्यांदा मी ज्या जगात जगत आलो होतो त्या आयुष्याविषयी मला कंटाळा उत्पन्न झाला . पुढे माझ्या आयुष्यात कॉम्प्युटर येईपर्यंत मला खाजगी वाटेल अशी जागा त्याने तयार केली . आणि मला पुष्कळ ऐकवले , फिरवून आणले .

मी खाजगीपणे ऐकायला लागलेल्या नव्या संगीताने मला तोंडावर पाणी मारून जागे केले केलं . मायकल जॅक्सन आणि मडोना ह्या अतिशय दोन महत्वाच्या व्यक्ती माझ्यासोबत पुण्यात सगळीकडे चालू लागल्या . त्यांनतर अनेक वर्षांनी आता मला त्या दोघांनी मला त्या काळात किती मदत केली हे लक्षात येतं . कारण ते दोघंही सतत खाजगीत मला खूप आवश्यक गोष्टी सांगू लागले आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी मला कुणाच्याही परवानगीची गरज नव्हती . ते बोलतात ती भाषा मला सुरुवातीला काही वर्षं काडीमात्र कळत नव्हती तरीही त्या दोघांचे संगीत मला आवश्यक ती उर्जा देत गेलं . घरातल्या सामूहिक टेपरेकॉर्डर वर मी घरच्यांच्या आवडीचे सगळे ऐकणे बंद केले आणि मी घरापासून वेगळा असा मुलगा तयार व्हायला लागलो .

मी माझ्या वॉकमनला मित्रासारख वागवलं . मी त्याला धुतला पुसला नाही , त्याची पूजा केली नाही आणि तो सोडून जाताना मला त्रास झाला नाही . तो बंद पडल्यावर मी टाकून दिला . माझ्यासाठी मी ऐकत असलेलं संगीत त्याच्यापेक्षा खूप महत्वाचं होतं आणि राहिलं . त्या लाल वॉकमनने मला माझं आजचं आयुष्य मजेत पार पडायला शिकवलं . कुणालाही बाहेरून पाहताना उदास आणि विचित्र वाटेल असं माझ महानगरामधील एकलकोंडं आयुष्य.

कुठेतरी जाण्यासाठी काहीतरी सोडून जावेच लागते . आज मला हे लक्षात येते कि माझा राग माझ्या भाषेतील संगीतावर , लेखकांवर आणि गायकांवर मुळीच नव्हता . मला कंटाळा तयार झाला होता ते तेच तेच वाचणाऱ्या आणि तेच तेच ऐकणार्या आणि कोणत्याही बदलाबद्दल असुरक्षित होणाऱ्या माझ्या आजूबाजूच्या मराठी समाजाबद्दल.माझा वॉकमन आणि त्यानंतर माझी सर्व खाजगी  gadjet, यांनी मला तो राग व्यक्त करायला मदत केली . 

आज मला त्यामुळे माझी  Personal Gadgets फार महत्वाची वाटतात .वस्तू आपल्या स्वतःच्या असण्यावर आणि त्यावरच्या गोष्टींचा खाजगीपणा जपला जाण्यावर माझा विश्वास आहे . समाजमान्यता नसलेले , सवयीचे नसलेले सगळे काही अश्या gadgets  वर बघता ऐकता येते आणि त्यातून आपापली एक नैतिकता योग्य त्या तरुण वयात मुले निर्माण करू शकतात . आपली कुटुंबे , जातीपाति , सामाजिक आणि धार्मिक महापुरुष ह्यांनी सांगितलेल्या नैतिक उपदेशांना आपण योग्य त्या वयात फाट्यावर मारू शकतो . त्यामुळे मला नवनव्या  gadgets वर पैसे खर्च करायला फार म्हणजे फार आवडते.

आपल्या देशात अजूनही तंत्रज्ञानबहाद्दर माणसे वेबसाईट च्या उदघाटनाचा कार्यक्रम करतात . अम्ब्युलन्स आणि वेबसाईट यांच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाइतके विनोदी असे जगात दुसरे काही नसेल. पण भारतातला सामूहिक आणि सामाजिक भाबडेपणा संपता संपत नाही हेच खरे. आपलं यंत्राशी आणि तंत्रज्ञानाशी असलेलं नातं असा गुंतागुंतीचं आणि संकोचाच आहे कारण आपण दशकानुदशके फक्त ग्राहक देश आहोत आणि आज आपण सेवा आणि तंत्रज्ञानक्षेत्रात एक मोठी अर्थव्यवस्था उभी करत असलो तरी आपली मूळ मानसिकता उत्पादक देशाची नाही तर ग्राहक देशाची आहे. शिवाय आपल्याला भारतीय मनाला वर्तमानापेक्षा भूतकाळ नेहमीच अधिक आकर्षक वाटत आला आहे कारण आपण विज्ञानापेक्षा धर्माच्या आधाराने जगणारा समूह आहोत . त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबत आपल्या पारंपारिक समाजजीवनात होणाऱ्या बदलांबाबत आपण सतत असुरक्षित आणि भांबावलेले राहणार आणि आजचे आपण जगात असलेले आयुष्य आपल्यालअ नेहमी कमअस्सल , यांत्रिक आणि तुटक वाटत राहणार .शिवाय आपल्या आजूबाजूला कोणतेही बदल घडायला लागले कि तो कोणत्यातरी देशाच्या किंवा बहुराष्ट्रीय कंपनीच्या कारस्थानाचा भाग आहे हे नरडी फोडून सांगणाऱ्या लोकांची कमी नाही . आपल्याला सगळ काही हवे आहे पण त्या सुबत्तेमुळे येणाऱ्या सुखाकडे सोयींकडे आपण सतत एका संशयाने पाहत राहणार . आपला अख्खा देश सतत या अश्या द्वैतामध्ये जगात असतो

यंत्र मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक , स्वस्त आणि बहुआयामी झाली तेव्हापासून माणसाचं यंत्राशी असलेलं नातं एका अंतरावर येवून स्थिरावलं आहे . त्यामुळे काही नवे सामाजिक प्रश्न तयार झाले आहेत पण तसे प्रश्न तयार होणे चांगलेही आहे आणि समाजाच्या हिताचेही आहे . कारण सतत नवेनवे प्रश्न तयार व्हायलाच हवेत . माहिती साठी आता कोणीही कुणावर अवलंबून राहत नाही , ह्यामुळे आपल्या कुटुंबव्यवस्थेत आणि नात्यात किती मोठे बदल होत आहेत याची आपण कल्पनाही करून शकत नाही . कुणापासूनही माहिती लपवून ठेवून किंवा ती उशिरा देवून आपण त्या माणसावर सत्ता गाजवू शकतो , त्याची शक्यता आता संपली अहे. तुमच्या पुढच्या पिढीला तुमच्याकडून कोणतीही महिती नको आहे . त्यामुळे त्यांना तुमचे सल्लेही नको आहेत . तुमाला कुणीही काहीही विचारत बसणार नाहीये . सर्व प्रकारची माहिती सर्व वर्गाच्या सर्व जातीच्या सर्व वयाच्या सर्व माणसांना आता इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. शिवाय अनुकूल माणसे यंत्रांमुळे एकमेकांशी जोडली गेली आहेत .  आपले कुटुंब आपल्याला यापुढे जगण्यासाठी एक विशिष्ठ मर्यादेपर्यंतच पुरे पडणार आहे.  त्यामुळे पारंपारिक नातेव्यवस्था आणि त्याचे जयघोष करणाऱ्या माणसांची या पुढच्या काळात फार मोठी गोची होणार आहे .  ज्यांना आपल्याला फार काही कळते आणि तरुण पिढीला आपल्या मार्गदर्शनाची फार गरज आहे , असे वाटेल त्या माणसांना ह्यापुढे एका मोठ्या औदासीन्याला सामोरे जावे लागणार आहे कारण तुम्हाला जे काही कळते त्यापेक्षा पुढचे काही येउन पोचलेले असणार . संपत्ती , माहिती आणि सुरक्षितता ह्या गोष्टी पारंपारिक कुटुंबाबाहेरच्या माध्यमांमधून सहजपणे उपलब्ध होणार आहेत , होतही आहेत .आणि भारत देशात ज्या गोष्टीवर आपला गरजेपेक्षा जास्त विश्वास आहे ती म्हणजे वय आणि ज्ञान ह्यांचा संबंध . वय जास्त म्हणजे ज्ञान जास्त हे गणित आता ताबडतोब मोडून पडणार आहे आणि सहजपणे यापुढील जग हे तरुण माणसांचे असणार आहे . असे सगळे होण्यात तंत्रज्ञानाचा फार मोठा हात आहे .

आपापल्या फायद्यांसाठी यंत्र योग्य पद्धतीने भरपूर वापरणे आणि नवे तंत्रज्ञान येताच जुनी यंत्रे टाकून देणे यात मला काहीही वावगे वाटत नाही . शिवाय मी आता ज्या समाजरचनेत राहतो त्यात मला चुकीच्या माणसांवर किंवा ती मिळत नाहीत म्हणून झाडांवर किंवा हिंस्त्र कुत्र्यांवर जीव लावण्यापेक्षा माझा कॉम्पुटर आणि माझा आय पॉड जास्त शांतता आणि समाधान देतात . असा सगळ असण्याने मी अजिबात दुखी किंवा बिचारा वगैरे झालेलो नाही . मला माझ्या कारशिवाय आणि इंटरनेटच्या अमर्याद पुरवठ्याशिवाय आनंदात जगता येत नाही . हा माझ्यात झालेला बदल आहे .मला मी जगतो आहे त्याबद्दल कोणतीही अपराधी भावना नाही . उद्या कदाचित असं सगळं नसेल तेव्हा जसं असेल त्या परिस्थितीनुसार बदलून वागता येईल.

प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीची किंमत मोजत असतो . मी फेसबुकवर चकाट्या पिटत असताना मार्क झुकरबर्ग माझी वैयक्तिक माहिती आणि फोटो विकून श्रीमंत होतो आहे हे मला माहिती आहे . मी प्रत्येक वेळी क्रेडीट कार्ड स्वाईप करताना माझ्या खाण्यापिण्याच्या -कपडेलत्याचा आवडीनिवडी कुणी साठवून ठेवत आहे याची मला कल्पना आहे . कोणत्याही जागी कोणत्यातरी कॅमेर्याचा डोळा माझ्यावर रोखला गेलेला आहे . शहरात एका इमारतीपासून दुसऱ्या इमारतीपर्यंत लोंबकळणाऱ्या वायरीमधून बरीच आवश्यक अनावश्य आणि आपली सर्वांच खाजगी माहिती पुरासारखी लोंढ्याने बेफाम वाहत आहे .

मी या यंत्रांच्या , त्यातून निघणाऱ्या अदृश्य लहरींच्या वायरींच्या , धुराच्या , वेगवेगळ्या व्हायरसेसच्या , विजेच्या तारांच्या जंजाळात जगणारा आनंदी प्राणी आहे . मी आणि माझ्यासोबत तुम्ही सर्वजण .

मला अनेक वर्ष झाली तरी मध्येच माझ्या लाल वॉकमनची खूप आठवण येते. तेव्हा मी त्याच्यावर ऐकायचो ती गाणी आज माझ्यासोबत आहेत पण तो नाही . चुरडून पुन्हा रिसायकल होवून वेगळेच काही तयार झाले असेल त्याचे . तो असताना मला बर वाटत होतं आणि त्याच्यापासून लांबवर येउन पोचल्यावरही मला आज बरच वाटत आहे .

सचिन कुंडलकर

संक्षिप्त लेखाच्या स्वरूपात पूर्वप्रसिद्धी – लोकसत्ता  (श्री. कुमार केतकर व श्री श्रीकांत बोजेवार )  २००९ .

kundalkar@gmail.com

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online ,must be shared in totality . )

शरीर . Shareer .

माझ्याबरोबर आयुष्यभर सतत प्रवास करणारं , वेदना आणि आकर्षण निर्माण करणारं शरीर . माझं आणि माझ्यासोबत येणाऱ्या अनेकांचं . तीळ , लव , जन्मखुणा हजारो लाखो रंध्रं , पोकळ्या . नितळ आणि केसाळ . उंच , सपाट , थुलथुलीत , बलदंड आणि पुष्ट . शरीरावरची वळणं , शरीरावरचे उंचसखल मऊ आणि विस्तीर्ण प्रदेश . गुहा . त्यातून सातत्याने वाहणारे अनेकधर्मी स्त्राव . प्रत्येक शरीराचे आपापले गंध . अगदी स्वतःचे असे. एकाच शरीरातले त्वचेचे असंख्य पोत . कानाच्या पाळीच्या मऊ आरक्त त्वचेपासून टांचावरचे खरबरीत पोत आणि नखं त्वचेला मिळतात तिथले गाडीसारखे फुगीर पोत .

माझ्या शरीराची आणि माझी नीट ओळखही नाही . सूक्ष्मातून मी त्याच्याकडे कधी पाहिलेलं नाही . जगण्याच्या व्यवहारामध्ये तसं काही करत बसलेलं कोण आहे ? त्यातून आपले संपूर्ण शरीर बघण्याची मानवी डोळ्यांपाशी प्रतिभा नाही . आणि दुसऱ्यांच संपूर्ण शरीर काही तीव्र आकर्षणं आणि ठोस वैद्यकीय कारणं याशिवाय बघण्याची मानवी रीत नाही . एरवी मी नीट बघतो ते फक्त चेहऱ्याकडे . माझ्या किंवा इतरांच्या . मग काही दुखलं खुपलं सुजलं तर इतर भागांकडे . पण फारच क्वचित . शरीर नश्वर आहे , शरीरविचार उथळ आहे . शरीर हे फक्त साधन आहे , नग्नता अश्लील आहे हे सगळा माझ्या मनाच्या आत मला न विचारता कुणीतरी लिहून ठेवलं आहे . पण एकदा मी जमिनीखाली खोलवर गेलो असता पाणी, प्रकाश आणि उदंड नग्न शरीरे यांच्या समुच्चायातून मला आलेला हा बेभान अनुभव.

मी विनाकारण दूरच्या प्रवासाला एकटा निघून जातो तेव्हा अनेकदा माझा मन गोठून गेलेला असतं . काहीतरी संपून दुसरे काहीतरी सुरु होण्याच्या मध्ये असलेली ही अवस्था . तेव्हा फार बोलावसं वाटत नाही . मन अकारण शांत , शहाणं बनतं आणि दिवसाचा बराच वेळ आजूबाजूच्या गोष्टींना सौम्य प्रतिसाद देण्यात जातो . अशा वेळी मी कशालाच फारसा प्रतिकार करत नाही . पण अनोळखी प्रदेशात आणि बिनाहककांच्या माणसांमध्ये अशा वेळी राहणं सोपं वाटतं . . मझ्या सुदैवाने मनाच्या अश्या रिकाम्या गोठलेल्या अवस्था आणि असे लांबलांबचे एकट्याने केलेले प्रवास माझ्या छोट्याश्या आयुष्यात पुष्कळ आले आहेत.

अर्धवट झोपेतून जाग येते तेव्हा बस ऑस्ट्रिया आणि हंगेरीमधल्या चेकपोस्ट वर थांबलेली आहे . अंग आखडून गेलं आहे . गेला संपूर्ण दिवस बसमध्ये एकाच सीटवर बसून राहिल्याने आंबल्यासारखं झालं आहे . हे पारोसेपण आणि शिळेपण निवांत सुटीच्या दिवशी घरबसल्या फार हवहवसं वाटतं पण प्रवासात ते अचानक नकोनकोसं होतं . अजून पाऊण तासाने बुडापेश्त . काहीच घडत नाहीये म्हणून इतर चारदोन जणांबरोबर मी खाली उतरतो . बस चा ड्रायव्हर आणि हंगेरियन कस्टम अधिकारी यांची माग्यार या अगम्य भाषेमध्ये लांबलचक चर्चा चालू अहे. मला भयंकर अश्या भित्या म्हणायच्या तर दोनच आहेत . एक म्हणजे सापाची . आणि दुसरी म्हणजे आपण लघवीला गेल्यावर बस किंवा ट्रेन निघून जायील अशी . नेहमीप्रमाणे तसं काहीच न होता मी बस मध्ये येउन बसतो . हे साल आहे २००४ . युरोपमधली बडी राष्ट्रं एक होवून युरोपियन युनियन तयार झाली आहे. आर्थिक फायदा होणार होणार पण तो नक्की कोणाला ते कळलेलं नाही . देशांमधली कुंपणे गळून पडली आहेत आणि लोंढ्याने माणसे या देशांमधून त्या देशात फिरतायत . पण त्यात फ्रांसचे फ्रान्सपण जातंय आणि जर्मनीचं जर्मनत्व. सांस्कृतिक सपाटपणाचे लाटणे नकळत फिरायला लागले अहे. हंगेरी बिचारा या महासत्तेत सामील होण्याची वाट बघत दाराबाहेर उभा आहे . त्याचा अर्ज आत मंजुरीसाठी पाठवला गेला आहे.

बस टर्मिनल वर टेलिफोन बूथपाशी मला दिसतो जिप्सी मुलींचा थवा . रूंद चेहऱ्याच्या , फुलाफुलांचे झगे घातलेल्या आणि डोक्याला रुमाल गुंडाळलेल्या रुमानियन जिप्सी मुली . शांत बस टर्मिनलवर त्यांनी नुसती कलकल माजवली अहे. कानातले मोठे डूल जोरजोरात हलवत आणि टिपेच्या स्वरात खिदळत त्यांचा काय चाललं आहे कोण जाणे ? विल्यम मला न्यायला येतो . त्याच्यामागोमाग मी त्याच्या घरी चालू लागतो . जमिनीखाली आता अनेक शहरे आहेत , सर्वच देशांमध्ये . आम्ही जमिनीखाली शिरून दोन तीन ट्रेन्स बदलून मग जमिनीवर पुन्हा सूर्यप्रकाशात . जमिनीखाली रेल्वे धावतात , दुकाने आहेत आणि अंधाऱ्या कोपर्यांमध्ये करण्याजोगे सर्व काळे व्यवहार. जमिनीखाली गेल्यावर माणूस थोडं कमी बोलतो . इथली हवा दाट असते आणि आकाश नसतं . मला अनेकवेळा जमिनीखालच्या ट्रेन्स ने प्रवास करताना आपल्या डोक्यावर आख्खं शहर धावतंय याची विस्मृतीच होते. आणि मग त्या प्रवासाचा अर्थच कळेनासा होतो , कि आपल्याला कुठे पोचायचं आणि का करतोय आपण हा प्रवास ?

विल्यम एका वाड्यामध्ये राहतो . चक्क पुणेरी वाडा ! तळमजल्यावर खडूस मालक . घराची दारे उघडी टाकून उंबऱ्यात शिवणकाम करत अल्यागेल्यावर नजर ठेवणाऱ्या हंगेरियन आज्या . अरुंद लाकडी जिना आणि तितक्याच अरुंद बोळकांडीतून चालल्यावर विल्यम च्या दोन खोल्या . त्याच्या दारात झगझगीत पिवळ्या फुलांचे झाड . मग तो सगळा दिवस त्या अजब शहरात आम्ही पाय तुटेस्तोवर भटकतो . या पूर्व युरोपियन देशांमध्ये एक प्रकारचा सतत मेटालिक कोल्ड्नेस जाणवतो . भव्य इमारती , भव्य रस्ते , पण त्या वास्तुरचनेत एक अलिप्त कोरडेपणा . बहुदा धाकच . Frankfurt किंवा New York सारखं हे शहर धावणारं नाही . घड्याळाच्या काट्याला बांधलेलं नाही . विल्यम दिवसभर एखाद्या आज्ञाधारक गाईड सारखा मला सर्व शहराची माहिती देतो . काही वेळाने आम्ही दमून एका टेकडीच्या हिरवळीवर पडून आकाशाकडे पाहत राहतो .

एका विस्तीर्ण पटांगणात समोर पडदा टांगला आहे . समोर पन्नास शंभर बाकडी टाकली आहेत . जुन्या मूकपटांचा शो चालू आहे . फारशी गर्दी नाही . मी आणि विल्यम पहिल्या ओळीत बसलो आहोत . अगदी पडद्यापाशी . मी समोरची भराभर हालचाल करणारी पात्रं आणि त्यांचे मोट्ठे मूक चेहरे बघतोय . मोट्ठे डोळे करून सतत बडबडणारे . काही वेळाने माझ्या डोळ्यांसमोर वेगळीच दृश्ये दिसायला लागतात . एकामागून एक मूकपट चालूच रहातात . संगीत नाही कि काही नाही . टाचणी पडावी एव्हढी शांतता .

मग मी विल्यम शी बोलायचं ठरवतो . मग आम्ही बोलतो. बोल बोल बोलतो . एव्हढं कि सकाळच होते. आणि सकाळी पुन्हा पारोसेपाणाचा पापुद्र चढलेलं माझं शरीर . मी बाथरूम च्या दिशेने जाताना विल्यम मला थांबवतो .

डगडग चालणाऱ्या ट्राम मध्ये बसून आम्ही पुन्हा जुन्या बूडा शहराकडे कडे चाललोय . दान्यूब नदीचं विस्तीर्ण पात्र ओलांडून एका गल्लीवजा भागातल्या stop वर आम्ही उतरतो . घंटा वाजवून ट्राम पुढे निघून जाते . गल्लीच्या टोकाशी एका जुन्या गढीसारखी एक इमारत आहे . तिच्या दिशेने मी विल्यम च्या मागोन चालायला लागतो .

त्या इमारतीच्या अंगणात एक मोठा काचेचा घुमट दिसतो . जमिनीवर बांधलेला . घुमटाच्या चारही बाजूंना दगडी खांब . एका खांबाला वळसा घालून मागे जावं तर एक काचेचं दार . ते दर उघडून विल्यम आत जातो आणि जमिनीच्या पोटात नेणाऱ्या एका वळसेदार जिन्याची एक एक पायरी मी त्याच्यामागोन उतरायला लागतो . जमिनीवरच प्रकाश कमी कमी होत जातो आणि सोनेरी दिव्यांनी उजळलेल्या जमिनीच्या पोटातील एका वाड्यात आम्ही पोचतो. ते एक सार्वजनिक स्नानगृह आहे . बाथहाउस .

जमिनीखालील एका अतीउष्ण पाण्याच्या जिवंत स्त्रोताला वेगवेगळ्या पद्धतीने बंध घालून हौद तयार केले आहेत. त्या हौदामाधल्या पाण्याचं तापमान त्यात आवश्यकतेप्रमाणे गार पाणी मिसळून नियंत्रित केल आहे . आज मंगळवार आहे. फक्त पुरुषांचा दिवस. ताल्घातल्या कपाटांमध्ये कपडे ठेवून आत जायचं आहे . संपूर्ण विवस्त्र.

खोलीत पोचल्यावर मी एका कोपऱ्यात घुटमळत उभा राहतो . विल्यम अंगावरचा एक एक कपडा काढायला लागतो . माझं शरीर इतक्या मोकळेपणाने घेऊन वावरायची मला सवय नाही . मी कुणासमोर पटकन कपडेसुद्धा बदलू शकत नाही . मी शहरातल्या सुरक्षित आणि कप्प्यांच्या वातावरणात वाढलो अहे. कारण नसताना काही पुरुष कपडे काढून दंड दाखवत गावभर फिरतात तशीही काही कमाई मी आयुष्यात केलेली नाही . संपूर्ण विवस्त्र होण्याची माझ्या मनाची तयारी नाही . विल्यम अंगावरचे सर्व कपडे काढून नग्नावस्थेत चालत जातो . माझा संकोच बघण्यातही तिथे कुणाला रस नाही . मी खोलीत एकता उरलो आहे हे बघून मी अंगावरच एक एक कपडा उतरवायला लागतो . अतिशय धैर्याने शेवटचा कपडा उतरवून मी कपाट बंद करतो आणि खोलीबाहेर चालत जातो . चेहऱ्यावर ठेवता येईल तितका शांतपणा .

स्नानगृहाचं दार उघडल्यावर दाट धूसर वाफेच्या पडद्यापलीकडे अनेक शरीरं दिसतात . संपूर्ण नग्न . उष्ण पाण्याच्या तीन चार हौदांमध्ये काही जण पडून आहेत . काहीजण काठावर ठेवलेल्या बाकांवर बसून आहेत . सगळीकडे एक ओलसर स्वछता आहे आणि अवकाशयानात असावी तशी शांतता . नागड्या शरीराने आत गेल्यावर आता सगळेजण आपल्याकडेच बघणार हे मला नक्की माहिती आहे . त्यामुळे माझी नजर खाली . पण कुणीच कशाची दखल घेताना दिसत नाही .

पेटीसारख्या बाथरूममध्ये घरी केलेली बादलीतल्या पाण्याची आंघोळ , हॉटेलमधल्या माफक टबात अंग बुचकळून केलेली आंघोळ , नद्यांमधलं पोहणं , समुद्रात केलेली मस्ती आणि एकदा कोकणातला शूटिंग आटपून परत येताना घाटामध्ये प्रचंड धबधब्याखाली संपूर्ण शरीर बधीर होणे . आंघोळ करतानाचे रंगीत शाम्पू , साबण आणि क्रीम्स . शरीर स्वछ करायला आणि मनावर पाणी टाकून त्याला जागं करायला .

एका कोपऱ्यात उभा राहून इकडेतिकडे बघत मी विल्यमला शोधतोय .

स्नानगृहाच्या मध्यभागी सर्वात गरम पाण्याचा हिरवट निळा विस्तीर्ण तलाव आहे . वाफा तिथून येतायत . त्या तलावाच्या बरोब्बर वरती मगाशी जमिनीवर पाहिलेला काचेचा घुमट . त्या दमट अंतराळामध्ये मी आता उरलेलं जग हळूहळू विसरून जायला लागतो आणि माझी पावले मला त्या गरम प्रकाशमान तळ्याकडे न्यायला लागतात .

पुरुषाचं शरीर . उंच, सपाट , रेखीव . वर्तुळांनी नाही तर रेघारेघांनी अधोरेखित होणारं . अनवट जागी बलस्थळ . रुक्ष कोरड्या त्वचेवर भुरभुरत उगवणारे केसांचे समूह . काही शरीरभाग बालपणीइतकेच नाजूक . काही पुष्ट बेफ़िकिर. अस्वस्थ हालचाल करत राहणारे गळ्यावरचे उंचवटे . मनाची उलाघाल ऐकताच मन वर करणारे लिंग . दाढीने झाकून लपले नसतील तर हिरवट सोललेले गाल . किंचित निष्काळजी नखं आणि लाखो रंध्रान्मधून घामामागून वाहणारा लिंबाच्या सालीचा पुरुषगंध . कधी भाजलेल्या मडक्याचा , कधी कडीकुलपातल्या बंद भुयाराचा .

काही क्षण वेळ माझ्यासाठी थांबून राहतो . अंगठ्यापासून छातीपर्यंत ते उष्ण गंधकमिश्रित पाणी मला हळूहळू वेढून टाकतं .

त्या सर्व नग्न शरीरांच्या गर्दीत मी माझ्या शरीराचा संकोच आपोआप विसरून जातो आणि हळूहळू एकेका शरीराकडे बघयला लागतो . वाफेच्या उष्म्यामुळे एक जड निश्चलता माझ्या शरीरावर सरपटायला लागते आणि एका अर्धवट ग्लानीमध्ये माझा मन तरंगायला लागतं . ह्या सगळ्या वातावरणाला , ह्या सगळ्या अद्भूत दृश्यांना माझ्या आजपर्यंतच्या अनुभवांशी जुळवून बघताच येत नाही . माझ्या आजूबाजूला एक वेगळाच ग्रह उगवला आहे असं वाटतं . फक्त शरीर घेऊन वावरताना एक मस्त मोकळेपणा जाणवतो आणि मी त्या परग्रहावरच्या अनिर्बंध व्यवहारात स्वतः ला झोकून देतो . आपण सुंदर आहोत याची जाणीव काही माणसांना असते . त्या बिचार्यांवर मग फार जबाबदाऱ्या पडतात . पण ज्यांना ती जाणीवच नाही अश्या सुंदर माणसांना बघण्याइतकं मोहक काहीही नाही . पाणी आणि बाष्पामुळे ओलसर निथळती प्रकाशमान शरीरं थोडी तीव्र दिसतात .

पायऱ्यांवरील एका कोपऱ्यात अंग दुमडून बसलेला एक म्हातारा . शून्यात टक लावून बसलेला दणकट काळसर त्वचेचा एक भाबडा चेहरा . स्वतःच्याच दंडांकडे पुन्हा पुन्हा रोखून बघणारा एक कोवळा तरुण . सगळे आपापल्यात . ध्यानासाधनेला आल्यासारखे मग्न . ह्या सगळ्यांना मी न्याहाळत असता माझ्याही शरीराला कोणी न्याहाळत असेल ही जाणीव मनातून संपूर्णपणे गेलेली . मी माझे पाय उचलून त्या तळ्यामध्ये हळूहळू पोहायला लागतो आणि समोरच्या काठावर जावून पाण्याच्या आवरणातून बाहेर पडून मोकळेपणानी पायरीवर पडून राहतो .

एवढी नागडी शरीरं मी ह्याआधी फक्त ब्लू फिल्म्समध्ये पाहिलेली आहेत. पण ती सगळी व्यायामी मापात बसणारी शरीरं . शिवाय वखवखलेली . ब्लू फिल्म्समधल्या जगाला असणारा वेग आणि वखवख इथे अजिबात नाही . गंधकाच्या सौम्य वासाने आणि वाफेच्या आवरणाने इथल्या हालचाली संथ , दबलेल्या आणि आवाजही फिक्कट . ह्या सगळ्याला साजेसं संगीत वाजवायचं झालं तर ते कोणतं असेल ?

रेखीव दणकट शरीराने फार तर फार लढाई करता येईल किंवा नट होता येईल . चांगली कविता लिहायची झाली तर डोळ्याखाली सोसून कमावलेली काळी वर्तुळं हवीत आणि पोटाला एक दोन प्रेमळ वळ्या .

पुरुषापुरुषांना एकत्र ठेवलं आणि बायाबायन्ना वेगळं तर शारीरिक व्यभिचार टळतील हा बालीश विचार जगात सगळीकडे चालू असतो . अशी ही योग्य उपाययोजना करून जमिनीवरचं जग आपापल्या व्यवहारात दंग आहे . कामाची पळापळ , वेग , वाहनं हाका , जेवा – धुवा- धावा ,ह्या सगळ्यात . पण इथे जमिनीच्या पोटात चालू आहे मंगळवार . नियमाप्रमाणे फक्त पुरुषांचा वार .

उंच पायऱ्यांवर वरच्या कोपऱ्यात दोन शरीरं एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत . एकमेकांची चव घेत. त्यांच्या सगळ्या हालचालीत सवय आणि साधेपणा दिसतोय . काहीवेळाने हलोच ते दोघं तलावात शिरतात आणि तालावाच्या समोरासमोरच्या काठांवर रेलून एकमेकांकडे एकटक पाहत राहतात . मी त्यांच्या नात्याची एक कथा माझ्या डोक्यात जुळवायला लागतो .

वरच्या जगात कपडे घालून ते कोण असतील ? त्यांची नावं काय असतील ? ते एकमेकेंना पहिल्यांदा कसे भेटले ? आज सकाळी त्यांनी इथे यायचा कसा ठरवलं असेल ?

माझ्या मागे एक थुलथुलीत म्हातारा माणूस एका कोवळ्या तरुण मुलाकडून स्वतः ला गोंजारून घेतो आहे . सारखा त्याच्या मिठीत शिरून हळू आवाजात त्याच्याशी बोलतोय. त्या तरून मुलाची नजर तिसरीकडेच अहे. नजरेत निर्विकार भाव . त्यांच्या एकत्र असण्यातूनच त्यांचा रोख व्यवहार लक्ख्खपणे दिसतो आहे . मग दिसतात त्या दोघांची एकत्र आलेली शरीरं आणि उसनं सुख मागून संधान मागणाऱ्या म्हाताऱ्या माणसाचा चेहरा . हे दोन माणसं आपापल्या जगात असतील , तेव्हा काय आणि कशी असतील ? शरीरासाठी पैसा आणि पैश्यासाठी शरीर ह्याच्या पलीकडे त्यांचे म्हणून प्रेमाचे लोक असतील . ती त्यांची माणसे आत्ता जमिनीवर काय करत असतील ?

ह्या दोन्ही जोड्यांकडे खास बघण्यासारखं काहीही नाही ह्या भावनेने बाकी सगळे आपापल्या एकेका कोषात . मी मन वर करून घुमटापलीकडे दिसणाऱ्या आकाशाकडे बघत पाण्यात तरंग उमटवत राहतो . मी पुन्हा जमिनीवर जाईन तेव्हा बरीच वर्ष उलटून गेली असतील .

सवय आणि पूर्वकल्पना नसताना आपल्यासमोर काही बदादा काही ओतला गेलं कि काही वेळाने उत्सुकता आणि ताण ओसरतात . एका शांत अंतराने मी सगळ्या शरीरांकडे बघायला लागतो . हि विराक्तावस्था नाही . झाडांकडे एकटक बघत बसावं तशीच शरीरं दिसायला लागतात . इथे येण्यापूर्वी माझ्या शरीरावर मीच तयार केलेल्या एका ओरखाड्याकडे मी बराच वेळ बघत राहतो . आता शरीराला एक हलकं शैथिल्य वेढून टाकतं . नखांचे कोपरेनकोपरे स्वच्छ होवून ती पांढरीफटक होतात . माझ्या मानेवर उन्हाचा एक दाट झोत गरम वर्तुळ तयार करतो . मी इकडेतिकडे बघतो . विल्यम कुठेही दिसत नाही . मी तलावातून बाहेर पडून पुन्हा कपडे बदलायच्या खोलीकडे चालायला लागतो .

वरती आख्खं शहर धावतंय . अंगभर कपड्यात . असंच चालत चालत वर जाता येणार नाही . आता मी जे अनुभवलं ते सांगता येणं कठीण आहे . नीट लिहून काढायला पाहिजे . मराठीत लिहू? शरीरव्यवहार प्रेम आणि हिंसा ह्याविषयी माझ्या मातृभाषेत बोलायची सवय मी घालवून बसलो आहे. कपड्यांच्या आत लपवलेल्या अवयवांची नावं मी मराठीत घेत नाही आणि शारीरिक प्रेमाचं दीर्घ वर्णन इंग्रजीचा आधार घेतल्याशिवाय मला करता येत नाही . माझ्या आज्यांच्या तोंडच्या म्हणी आणि शिव्यांमध्ये असलेले कुल्ले वगरे शब्द मी नागरी मराठी मध्ये बोलताना संकोचतो . शिव्या तर बिचाऱ्या आयुष्यातून इंग्रजीमुळे आणि सिनेमातून सेन्सोर बोर्डमुळे परागंदा झाल्या आहेत. जुने शब्द टाकून देवून नव्या शब्दांची भाषेत भर न घालणारी माझी पिढी . मराठीतलं शारीरिक लिखाण मला संस्कृताळलेलं वाटतं आणि वृषण योनी वीर्य असे शब्द जीवशात्रीय . त्यांचे बोलीभाषेतले समानार्थ परीटघडीच्या शहरात शिवराळ मानले जातात . मग आता वर जावून या उदंड नागडेपणाविषयी मी कसं लिहू ?

मी अंग पुसून एकामागून एक कपडे चढवतो . अत्यावश्यक , मग आवश्यक आणि मग अनावश्यक . पाय बुटात अडकवून त्याच्या नाड्या करकचतो . मनगटाला घड्याळ आवळतो आणि कमरेला पट्टा . आणि सगळं नीट लपवून साळसूदपणे वरच्या जगाच्या पायऱ्या चढायला लागतो .

पूर्वप्रसिद्धी – मिळून साऱ्याजणी . दिवाळी . २००७.

kundalkar@gmail.com

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online ,must be shared in totality . )

MONOLOGUE . मोनोलॉग

आज सकाळी तुमचं Death Certificate आणण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात गेलो होतो . हातातली कागदपत्रं छोट्या खिडकीतून आत सारल्यावर आतला कारकून मला म्हणाला , “कुठे जाळणार ? ” मी भांबावून जावून गप्पच राहिलो तसा तो म्हणाला , ” Body कुठे नेणारे जाळायला ? वैकुंठातच ना ?”

मग त्याने कागदपत्रांवरचे तुमचे नाव वाचले आणि तो शरमला . कागदावर शिक्के उमटवत , एका उसन्या आस्थेने तो तुमची चौकशी करू लागला . “तुम्ही आजारी होतात का ? तुम्ही कोणत्या हॉस्पिटल मध्ये होतात ? शिक्के उमटवून त्याने सहीसाठी कागद बाहेर केला . मी दचकलो . तुमच्या Death Certificate वर तुमचं पूर्ण नांव आहे , काही ओळी सोडून त्याखाली माझं . मी त्या कागदावर सही केली आहे .

मी तुम्हाला बाबा म्हणत असे . तसे आपल्या बोलण्यातून ठरले नव्हते . तुम्ही mobile वर सातत्याने SMS पाठवत असा , त्यातल्या मजकुराखाली तुम्ही BABA असे लिहित असा . आपण दोघे समोरासमोर असता , औपचारिकतेची बंधने तुम्हीच काढून होतीत . तर सांगायचं ते हे , कि मी तुम्हाला बाबा म्हणत असूनही , मला तुम्ही कधीही वडिलांसारखे वाटला नाहीत . तुमची माझ्या मनातली प्रतिमा हि ‘ बाबा ‘ ची नसून ‘आजोबा ‘ ची होती . माझ्या आयुष्यात मी कधीही प्रत्यक्षपणे न अनुभवलेले प्रेमळ आजोबा तुम्ही बनून राहिला होतात . तुमच्या अपरोक्ष मात्र मी तुमचा उल्लेख ‘ तेंडुलकर ‘ असाच करतो . पण फक्त आपल्या दोघांचं म्हणून जे एक विश्व होतं त्या विश्वात , किंवा त्या नाटकात म्हणूया हवं तर , मी तुम्हाला बाबा म्हणत असे .आज ते नाटक संपलं आहे .

आज तुमच्या शांत आणि निश्चल कलेवराकडे पाहताना , मला आपली पहिली भेट आठवली . मग येउन शांत बसलो असता , अजून एक भेट आठवली . ती त्या पहिल्या भेटी आधीची भेट . मी ती विसरूनच गेलो होतो .
नेहरू तारांगणाच्या तळघरात एक छोटं चित्रपटगृह आहे . २००० सालची गोष्ट असावी . ‘ वास्तुपुरुष ‘ या चित्रपटाचा मुंबईतल्या आमंत्रितांसाठी आयोजित केलेल्या चित्रपटाचा खेळ चालू होता . चित्रपट संपून दिवे आले , तसे तुम्ही सावकाश माझ्याकडे चालत आलात आणि म्हणालात , ” फारच सुरेख अनुभव होता . तुम्हीच सुनील सुकथनकर ना ?” मी अतिशय दबून गेलो आणि म्हणालो कि मी सुनील नाही , पण मी त्याला शोधून आणतो . मग मी प्रेक्षकांच्या गराड्यात अडकलेल्या सुनील ला ओढून तुमच्याकडे पाठवलं . ह्या सगळ्यात मी तुम्हाला माझी ओळख करून देण्याचं धाडस करण्याचा प्रश्नच नव्हता . विजय तेंडुलकर आपल्याशी प्रत्यक्ष बोलले एव्हढयानेच मी आनंदून गेलो होतो . त्यावेळी मी फार असे .

आणि त्यानंतरची आपली भेट वर्षभरातच झाली . एकमेकांशी गप्पा मारलेली ती निवांत पहिली भेट . एके दिवशी सकाळी चेतन दातारचा मला फोन आला कि मी माझ्या कादंबरीचे हस्तलिखित घेऊन संध्याकाळी तुमच्याकडे जावं . मला वाटला कि तो माझी फिरकी घेत आहे . पण ते खरच होतं . तुम्ही चेतनच्या आग्रहावरून खरोखर ऐकायला तयार झाला होतात . त्या दुपारभर माझ्या मुंबईतल्या घरात बसून मी कादंबरी मोठ्याने वाचायची तालीम केलेली मला अजूनी आठवते . आपल्या पहिल्या भेटीतच मी तुम्हाला सांगीतलं कि मला नाटकं वाचायला आवडत नाहीत , त्यामुळे मी तुमचं काहीएक वाचलेलं नाही . तुम्हाला ते एकदम मान्य होतं . त्या संध्याकाळी मी कादंबरीचा पहिला भाग वाचला आणि थांबलो . रात्र बरीच झाली होती आणि तुम्ही थकला होतात . दुसऱ्या दिवशी दुपारी माझ्या घरातला फोने खणाणला . तुम्ही होतात . संपूर्ण रात्र , मी वाचलेलं तुमच्या मनात रेंगाळत राहिल्याचं तुम्ही मला सांगीतलत. ती कादंबरी श्री . पु प्रकाशित करत असता , मी कोणत्या दृष्टीकोनातून मौजेच्या संपादकीय परीष्कर्णाकडे पहावे ह्याबद्दल तुम्ही मोजकं बोललात आणि मला म्हणालात ,” तुम्ही लिहित राहायला हवं . सातत्याने लिहित चला ”

गेलेल्या माणसांचे आवाज माझ्या मनात राहतात . प्रत्येक माणसाबरोबर तो माणूस सतत म्हणत असलेल्या वाक्यांची स्मृती असते . गेल्या वर्षी श्रीपु भागवत गेले आणि पाठोपाठ आज तुम्ही . मला जास्तच एकटं वाटत आहे .

” लिहिणे म्हणजे लिहिता येणे नव्हे ” असा म्हणणारा श्रीपुंचा आवाज माझ्या मनात आहे . तुमच्या स्मृतींशी निगडीत मात्र खूप वाक्यं आहेत . तुम्ही मंत्राप्रमाणे अचूक उच्चारलेली वाक्यं . डोळ्यात तीक्ष्ण नजर रोखून मउ आणि कोरड्या आवाजात तुम्ही बोलायचात . मोजके आणि आवश्यक तेव्हडेच शब्द वापरत लिहायचात . ” लेखक सदासर्वदा लिहीतच असतो . लिहायला बसला म्हणजे उतरवत असतो . लिहिण्यातून आता तुझी सुटका नाही ” हे तुम्ही वारंवार म्हटलेलं वाक्य , मनाशी नीट बाळगून मी पुढचं जगणार आहे .

आपल्या आयुष्यातून माणूस निघून गेल्यावर , त्याच्याविषयी सगळं नीट लिहून काढलं कि मग त्याच्या जाण्याचा खरा अर्थ आपल्याला समजतो यावर माझा विश्वास आहे .

– – – – —
तुम्हाला जाऊन आता काही महिने झाले आहेत . दोन किंवा तीन . या मधल्या काळात तुमच्याविषयी सतत कुठे कुठे छापून येत होतं . श्रद्धांजली च्या सभा झाल्या . तुमच्या नाटकांचे प्रयोग झाले . आपल्याला माहिती असलेला विजय तेंडुलकर नावाचा हा लेखक कसा होता ? हे ढोबळमानाने या काळात मला समजत गेले. म्हणजे निदान तसा वाटतं .

तुम्ही तुमच्या मनस्वी आणि रोखठोक लिखाणाने समाजाचा रोष ओढवून घेतला होता . तुम्ही त्या लिखाणापायी बरेच सहन केले होते . समाजातल्या सर्व स्तरांमधल्या लेखक, चित्रकार , अभिनेते, कार्यकर्ते,राजकीय नेते यांच्याशी तुम्ही सातत्याने संवाद ठेवून होतात . तुमचं मित्रवर्तुळ आणि शत्रुवर्तुळ फार मोठं होतं . असं बरंच काही या मधल्या काळात वाचनात आलं . शिवाय काही अश्रुप्रपाती आणि स्मरण रंजक लेखही होते . तुमच्याविषयीच्या गूढकथा दंतकथा आणि रहस्यकथा होत्या . ह्या सगळ्यात जर काही मांडलं गेलं नाही तर तो तुमचा लेखनविचार . तुमचा स्वतःचा लेखनविचार ह्या सगळ्यात कुठेही नव्ह्ता .

गेले काही महिने पुण्यात प्रयाग हॉस्पिटल मध्ये तुम्ही राहायला होतात . रात्रींमागून रात्री तुम्ही जागत असयचात . मध्येच तासभर झोपयचात . अश्या ठिकाणी मनाला बरं वाटेल , प्रसन्न वाटेल असा काहीतरी वाचावं , बघावं . तिथेही तुम्ही Diary of a bad year , तेहेलका , माळेगाव जळीताचे रिपोर्ट , असलं काहीतरी वाचत असयचात . Laptop वर नव्या फिल्म्स मागवून घेवून बघायचात . तिथल्या नर्सेस रात्री चहा घेताना मला म्हणायच्या कि तुमच्यासारखा पेशंट त्यांनी कधीही पाहिलेला नाही .
तुम्ही गेल्यामुळे एक अख्खं शतक जाणतेपणे पाहिलेली व्यक्ती आमच्यामधून गेली आहे . त्यामुळे तुम्ही सोबत बरंच काही घेऊन गेला आहात . भाभा फ़ेलॊशिप साठी तुम्ही माझा काळ या विषयावर विस्तृत लिखाण करायला घेतला होतं . तुम्ही विसावं शतक जगताना जाणत्या वयापासून जे जे अनुभवलं , पाहिलं ते एका चिकित्सक नजरेतून तुम्ही लिहित होतात . थरथरत्या बोटांनी . Laptop वर. मी ते लिखाण वाचण्याची , निदान त्यातला काही भाग नजरेसमोरून घालता येईल अशी वाट बघत होतो .

रात्री तुम्हाला झोप लागली नाही कि तुम्ही गप्पा मारायला सुरुवात करायचात . तुमच्या घश्यामध्ये नळ्या घातलेल्या असल्यामुळे या गप्पा लिहूनच चालायच्या . एक वही होतॆ. त्यात तुम्ही लिहायचात . मग ते वाचून त्याखाली मी लिहायचो . मला बोलता येत होतं . पण लिहिणंच जास्त प्रस्तुत होतं . शिवाय ICU मधली शांतता आपल्याला भंग करायची नव्हती .
शब्द सुचतात . शब्द मनात रेंगाळतात . मग ते कागदावर उतरतात . शब्द आपल्या सभोवताली इकडून तिकडे वाहात असतात . घरातल्या कपाटांमधल्या पुस्तकांमध्ये ते साचून , गोठून असतात . जगात प्रत्येक वस्तूला असलेलं एक नाव . त्या नावाचा एक शब्द . आपण जगातच आहोत ते या शब्दांनी भरलेल्या बोगद्यात . काही मोजक्या ठिकाणचे मोजके शब्द महत्वाचे आहेत . बाकी पावसाच्या पाण्याप्रमाणे गटारात वाहून जाणारे आहेत . स्मृतिभ्रंश झालेल्या मनोरुग्णाच्या तोंडून गळावेत तसे TV मधून शब्द जागोजागी अव्याहत वाहत आहेत . त्यांना जायला जागा नाही . त्यांचा निचरा नाही . अश्या असंबद्ध , मतीमंद शब्दांची दलदल सगळ्यांच्या मनामध्ये माजली आहे . काही नाजूक असे मोलाचे शब्द आहेत जे अस्तंगत होत चालले अहेत. त्या शब्दांना जपायला हवे आहे . शब्दांनी जन्म घेतला कि ते कलकल करायला लागतात . त्यातल्या योग्य त्या शब्दांना बोलतं करत , उरलेल्यांना शांत करत लिहावा लागतं . जगात लिहिणारी आणि न लिहिणारी अशी दोन प्रकारची माणसे आहेत . पण शब्दांपासून सुटका कोणाचीच नाही . सध्या अनावश्यक लिहिले जात आहे . भारंभार छापले जात आहे . शब्दांना वठणीवर आणणारी , , त्यांना योग्य वागायला लावणारी माणसे संपत चालली आहेत. शब्दांची जबाबदारी स्वीकारणारे लोक नाहीत.
. राजकीय नेते आणि नटनट्या उसने शब्द बोलतात . , संपादक दुसऱ्याच्या शब्दांची विल्हेवाट लावतात , आणि झेरॉक्स मशीन वाले एकसारखा दुसरा शब्द बरहुकूम उमटवतात . शब्दांची जबाबदारी फक्त लेखकांची आहे . आपल्याला ती घ्यावी लागणार आहे आणि त्याला पर्याय नाही . कारण आपल्याला शब्द सुचतो , ह्या ताकदीची ती मोजावी लागणारी किंमत आहे .

तुम्ही एकदा गप्पा मारतांना झोपलात तेव्हा तुमच्या उशाशी , ORHAN PAMUK ह्या तुर्की लेखकाचं , OTHER COLOURS हे पुस्तक मिळालं .ORHAN PAMUK हा आपल्या दोघांचाही आवडता लेखक. दर वेळी भेटल्यावर आपण त्याच्या कोणत्यातरी कादंबरीवर हटकून बोलत असू .

त्याचा देश आणि त्याचं जगणं आपल्या देशाच्या सद्य मानसिकततेशी साम्य दाखवणारं आहे . आपलं अस्तित्व , आपली परंपरा , भाषा आणि जगणं ह्या सगळ्यांमधला पश्चिमी विचारांचा मिलाफ आणि संपूर्ण जगण्याचे तयार झालेले द्वैत , ह्याचा नेमका व नाजूक वेध प्रत्येक कादंबरीत तो घेत असतो . OTHER COLOURS ह्या पुस्तकात त्याचा संपूर्ण लेखनविचार आहे . त्याने नोबेल पुरस्कार स्विकारताना केलेल्या भाषणाच्या पानांमध्ये तुम्ही बुकमार्क घालून ठेवला होता . मी तुमचे पान न हरवता ते पुस्तक घेवून वाचायला लागलो आणि त्यापुढील कित्येक रात्री तुमचा डोळा लागला कि तेच करत राहिलो .

लेखकाला आणि लिखाणाला महत्व न देणाऱ्या समाजामध्ये आपण जगत अहोत. कारण अनेलॉग मनस्थितीतून डिजिटल मनस्थितीत नव्याने आलेला आपला समाज आता चित्र आणि फोटो बघणारा समाज झाला आहे. आपण आता वाचणारा समाज उरलेलो नाही . इतके , कि वाचणे हा आता कौतुकाचा विषय झाला आहे . बघणे हि रोजची सवय झाली आहे. तात्कालिक आणि चकचकीत शब्द रोज छापले आणि बोलले जात आहेत . संपूनही जात आहेत . साक्षर असलेले नट आणि नट्या लेखक झाले आहेत . मोजकं आणि महत्वाचं , शिवाय एका आंतरिक हतबलतेतून तयार होणारं झळझळीत साहित्य दुर्मिळ होत जात आहे. आज समाज एका वेगळ्याच वेगवान काळात जगात आहे आणि आपण लेखक चाचपडत आहोत . कसा जगायचं ? कोणती भाषा – कोणते शब्द निवडायचे , कशावर विश्वास ठेवायचा आणि काय लिहायचं ? कोणत्या काळामध्ये आपण जगायच आहे हे आता पुन्हा ठरवून घ्यावे लागणार आहे .

विसावं शतक संपताना काळाच्या अस्तित्वाची शकलं होवून त्याचे भीतीदायक विभाजन झाले आहे . पंधरा सतरा वर्षांपूर्वीचे रंग- चव – वास शब्द अनोळखी होत आहेत . मराठी माणसाच्या बौद्धिक दुटप्पीपणाला आणि सिझोफ्रेनिक रसिक मनस्थितीला दुहेरी धार चढलेली आहे. जुन्या लोकप्रिय लेखकांची भुते जागोजागी किंचाळत ठाण मांडून बसली आहेत . नव्या काळात कसं जगायचं , यंत्र कशी वापरायची आणि रस्ते कसे ओलांडायचे याची सुतराम माहिती नसणारी माझ्या आई वडिलांची पिढी या भुतांच्या पोथ्या घेवून त्यातच आपल्या आयुष्याचा अर्थ शोधत बसली आहे . लिखाण आटलेले थेरडे लेखक साहित्यसंमेलनं , त्याच्या विनोदी पाचकळ निवडणुका ह्याची राजकारणे आणि माकड चाळे करत बसले आहेत . एखादा सच्चा लेखक म्हातारा होवून संपूर्ण मरायला टेकला कि मग काही दिवस त्याच्या पालख्या नाचवणारा आपला मराठी समाज आहे .

ह्या विस्कळीत काळातच नव्याने जन्मलेल लिखाण आता हळूहळू तयार व्हायला हवं आहे . तुमचा काळ जसा एकसंध काळ होता तसा माझा नाही . हा तुमच्या आणि
माझ्या लिखाणातला फरक असणार आहे . तुम्ही माझ्यापेक्षा थोड्या बऱ्या काळामध्ये जगलात . विरोध का होईना पण तो तरी सजगपणे करायची शुद्ध समाजामध्ये होती .

ह्या अगडबंब आणि गोंगाटाने भरलेल्या समाजामध्ये बिळांमध्ये राहून लेखक लिहित आहेत । ते थोडे आहेत आणि विखुरलेले आहेत . त्यांच्यातले बरेच जण संपत चालले आहेत आणि नवे लेखक तयार होण्याचं वातावरण आजूबाजूला नाही . कारण तडाखेबंद खपाचे लेखक सोडल्यास इतर कुणी लिहिलेला वाचायची सवय आपण एकमेकांना लावलेली नाही . कुणी वाचावं म्हणून लिहिला जात नाही हे खरा आहे , पण अतीशय योग्य वेळ साधून मोठ्या दैवी हुशारीने तुम्ही काढता पाय घेतला आहे .

लेखकाच्या मनात काय चालतं ? लिखाणाची प्रक्रिया काय ? लिहिण्यामागचं आणि न लिहिण्यामागचं कारण काय ? ह्या विषयांवर तुम्ही सतत बोलत असायचात . शेवटच्या काही दिवसात थोडं जास्तच .

एकदा मध्यरात्री मला फोन करून तुम्ही म्हणाला होतात कि तुमच्या मनात झरझर काही सुचत जात आहे . डोकं चालू आहे पण शरीर अजिबात साथ देत नाही . लिहायला घेतला तर बोटं थरथरतात . कॉम्पुटर च्या स्क्रीन कडे अजिबात बघवत नाही . त्यावेळी सुद्धा तुम्ही सांगून मी तुमच्या मनातलं उतरून घेणं तुम्हाला मान्य नव्हतं . लेखन ही अत्यंत खाजगी आणि शारीरिक स्तरावरची गोष्ट आहे . टेप्रेकॉर्डरवर एकांतात बोलून ते कुणाला उतरून घ्याला देण्याचीही तुमची तयारी नव्हती . तुमच्यासाठी तसा करणं म्हणजे लेखनच नव्हतं . शेवटच्या पंधरा दिवसात तुम्ही लिखाण थांबवले होते . पण तुम्ही अव्याहत लिहित होता . मनात . माझी माणसांची मैत्री होणार असली तर फार चटकन होते. तुमच्याशीही झाली . तुमचा दबदबा होता . तुमच्या तीख्ना आणि धारधार बुद्धीचं आकर्षण होतं . कुणाशी तयार होणारं नवं नातं आधी आकर्षण , मग बाहेरून होणारा विरोध , संकोच , माफक संशय असे टप्पे पार पाडत पाडत मग शांततेकडे जातं . तुम्ही आपलं नातं आपसूकच शांत टप्प्यावर वळवलं होतत . कारण तुम्हाला वय नव्हतं . कोणतीही असुरक्षितता न बाळगता ,’ माझ्या वयामुळे मला सन्मान द्या ” असे बालिश आग्रह तुम्ही धरत नसा . तुमच्याशी भांडता येत असे .

माझ्यासारखी बरीच तरुण  मुलं तुमच्या सतत आजूबाजूला होती . प्रत्येकाशी तुमचा स्वतंत्र असा बौद्धिक व्यवहार होता . ज्यांच्याभोवती असे काही नव्हते त्या माणसांनी अनेकदा तुमच्याविरुद्ध आमच्यापैकी प्रत्येकाला सावध केले होते. आमच्याबरोबर तुम्ही फिल्म फ़ेस्टिवल्स न चित्रपट पाहत असा , आम्ही लिहिलेला शब्द आणि शब्द मन लावून वाचत असा . तुमच्या वाचनात आलेली अद्ययावत पुस्तके आणि लेखक ह्यांची आमच्याशी ओळख करून देत असा . आता ह्या सगळ्याचं आम्ही काय करणार आहोत ?

आमच्याच पिढीचं असलेल तुमचं कुटुंब तुम्ही गमावून न बसला होतात . पण त्याविषयीची कोणतीही कणव तुमच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात शेवटपर्यंत नव्हती . तुमच्या स्वभावाप्रमाणेच तुमच्या आठवणीही भावुकपणे येत नाहीत . त्या तटस्थ असतात . बरेच वेळा मला तुमचा चेहरा न दिसत आवाज ऐकू येत राहतो . माझ्याकडे तुमचा हस्ताक्षर नाही .

तुमचं आयुष्य लिहिण्यात संपलं . लिहीणं आवडायला लागल्यापासून तुम्ही आयुष्यभर लिहित होतात . मिळेल तसे , मिळेल तेव्हा . घरात कुटुंबाचा कोलाहल वाढला कि सार्वजनिक बागेतल्या बाकावर बसून लिहयचात . रात्री अपरात्री स्वयंपाकघराचे दार ओढून ,दिवा जाळत लिहित राहायचात . आजारपणातही लिहित होतात . असा म्हटलं जातं कि तुम्ही लोकप्रिय लेखक होतात . तुम्ही कोणत्या समाजाला प्रिय होतात ? तुम्हालाही हे माहिती आहे कि समाजातल्या बऱ्याच जणांना तुम्ही प्रिय नव्हतात . तुमच्या मनस्वी लिखाणाची किंमत तुम्हाला मोजायला लागली . ह्या समाजानेच ती तुम्हाला मोजायला लावली . तुमच्यावर चपला फेकून , तुमच्यावर खटले भरून तुम्हाला सतत अस्वस्थ ठेवून आणि तुमच्याबद्दल सतत असुरक्षित राहून .

आपण ज्याला साधा भोळा मध्यमवर्गीय समाज म्हणतो , तो समाज त्याचे नियम ओलांडलेत तर एक तर तुम्हाला अनुल्लेखाने ठार मारतो , किंवा तुम्हाला झुंडीने एकत्र येउन आरडा ओरडा करून शरीराशिवाय मारतो .

मागे वळून कढ काढत बसण्याचा तुमचा स्वभाव नव्हता . पण फार मोजक्या वेळी तुम्ही एखादे नाटक – एखादे पात्र कसे सुचले ह्यावर बोलायचात . ‘ अशी पाखरे येती ‘ मधी सरू सध्या तुम्हाला राहून राहून आठवत होती . सरू विषयी बोलताना तुम्ही मायेने हसायचात , आणि तुमच्या डोळ्यात ते हसू रेंगाळायचे . तुमच्या बहुतेक सर्व पात्रांना तुम्ही भेटला होतात . ह्या पात्रांनी तुम्हाला अंधारात दिवा दाखवला होता का ?

तुम्ही लिहित होतात . मी लिहितो . मला अजूनही मी का लिहितो ह्याचे कारण पूर्णपणे उमगलेले नाही . पण मी निर्माण केलेल्या मोजक्या पात्रांनी मला अंधारात दिवा दाखवत ठेवलेला आहे . मी जर कधी दुसरे टोक नसलेल्या बोगद्यात शिरलो तर इतर कुणाहीपेक्षा मला माझी पात्रं आठवतात . एरवी मी त्यांना विसरून गेलो असलो तरी मध्येच अश्या वेळा येतात कि त्यांच भान येतं . अनेकप्रसंगी ती पात्र साकारणाऱ्या नटांचे चेहरे आठवतात कि ती पात्र आठवतात ? मला अनेक वेळा काही कळेनासं होतं .

आज तुमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये रात्रींमागून रात्री गप्पा मारल्यावर मला हळूहळू हे लक्षात आलं आहे कि मला लिहायला आवडतं . मला दुसरा काहीही करता येणार नाही . लिहिण्याइतकं तापदायक आणि आनंददायी दुसरं काहीही नाही . आपण अजिबात न बोलता त्या वहीमध्ये तासन तास गप्पा मारायचो . तुमच्या शरीराला जोडलेल्या यंत्रांचा बारीक आवाज चालू असे रात्रभर . एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला संभ्रम असला किंवा बोलायचे नसले तर तुम्ही एक प्रश्न चिन्ह काढून माझ्यासमोर धरत असा . अतीशय तल्लख , बुद्धिमान, लोकप्रिय आणि सामाजिक दबदबा असणार्या लेखकाची नियती त्या प्रश्नचिन्हात होती . तुमच्या शरीराचे हाल हाल होत होते 

. पाहते कधीतरी मला जवळ बोलावून तुम्ही म्हणायचात कि मला इन्जेक्षन देवून मारून टाक . अतिशय चेतनामय मन आणि दुबळं शरीर यामुळे तुमची चिरफाड होत होती .

अश्या वेळी मी घाबरून ICU च्या कोपऱ्यात लपून बसायचो आणि माझा मला कशाचाच अर्थ कळेनासा व्हायचा . काहीतरी करून मला तुम्हाला समर्पक उत्तर द्यावे असा वाटायचं , पण काही कळत नसे. अश्या अवस्थेत न जगता , हे सगळं थांबवून मोकळं व्हावं , ही तुमची इच्छा मला खरा तर पूर्णपणे पटत होती . रात्री राउंड ला आलेल्या डॉक्टरांना तुम्ही विचारायचात , ” मी यातून कधी बरा होणार ? मी पूर्वीसारखा काम करू शकणार का ? लिहू शकणार का ? असा असेल तरच मला जगवा .

तुम्ही ORHAN PAMUK च्या पुस्तकाच्या ज्या पानामध्ये बुकमार्क घालून झोपला होतात त्यात नोबेल पुरस्कार स्वीकारताना त्याने केलेला भाषण होतं . ते भाषण तुमचही आहे आणि माझंही आहे .

I write becasue i can not do normal work like other people. I write because i want to read books like the ones i write. I write because i am angry at all of you , angry at everyone. I write because i love sitting in a room all day writing. I write because i only partake in real life by changing it. I write becase i want others , all of us , the whole world , to know what sort of livfe we lived and continue to live in Istanbul, in Turkey. I write because i love the smell of pen paprer and Ink. i write because i believe in literature , in the art of the novel more than i believe in anything else. I write because it is a habit , a passion. I write becasue i am afraid of being forgotten . i write becasue i like the glory and interest that writing brings. I write to be alone. Perhaps i write because i hope to understand why i am so very very angry at all of you , so very very angry at everyone. i write because i like to be read. i write because once i have begun an essay or a page or a novel i want to finish it. I write becasue everyone expects me to write . i write because i have childish belief in the immortality of libraries and in the way my books sit on the shelves. i write becasue it is exciting to turn all of life s beauties and riches into words . i write not to tell a stroy but to compose a stroy. i write becasue i wish to escape from a foreboding that there is a place i must go but just as in a dream , i can not quite get there . I write becasue i have never managed to be happy. I write to be happy.

तुम्ही गेलात नि काहीच दिवसात तुमच्याशी माझी गाठ घालून देणारा आपला मित्र चेतन दातारही गेला . चेतन गेला तेव्हा तुमच्या माझ्यातला काहीतरी दुवा निसटला असं माझा मन मला सांगत राहिलं . मी गेले काही दिवस कामामध्ये स्वतः ला बुडवून घेतलेलं आहे . पण खरं सांगायचं तर माझं मन अतिशय अस्वस्थ आहे . तुमच्याशी चालू असलेला माझा संवाद तुमची जाण्यानंतरही अखंडपणे माझ्या मनात चालूच राहिला . आपल्यातला कोणताही दुवा निसटून जाऊ नये म्हणून मी आज हे सगळं तुम्हाला लिहित आहे . फार न बोलता कागदावर उतरवण्यावर आपल्या दोघांचाही विश्वास आहे म्हणून .

तुम्ही जाताना ओरहानशी माझी ओळख करून दिलीत . त्याच्या कादंबरीत मला सापडलेलं हे वाक्य .

Every man’s death begins with the death of his father.
सचिन कुंडलकर

पूर्वप्रसिद्धी : आशय दिवाळी अंक  2008( संपादक : नितीन वैद्य )
लोकसत्ता  2009( कुमार केतकर आणि श्रीकांत बोजेवार )

kundalkar@gmail.com

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online ,must be shared in totality . )

FICTION फिक्शन

काही केल्या घरामध्ये ब्लेड सापडत नव्हतं. मी आधी बेसिनच्या वरचं कपाट उघडलं. मग कपड्यांचे कप्पे शोधले, स्वयंपाकघर शोधलं. घरामध्ये ब्लेड नव्हतंच. पण माझा चडफडाट झाला नाही. घरामध्ये ब्लेड नसणं स्वाभाविकच होतं, कारण धारदार पात्याचं चकाकणारं ब्लेड आपण हल्ली कशाला वापरतो? दाढी करताना सेफ्टी रेझर्स वापरतात, ज्यामुळे त्वचेला इजा पोहोचत नाही. हरकत नाही. मी चपला चढवल्या आणि लिफ्टमधून एकेक मजला पार होताना बघत खाली जायला लागलो. मी त्या दिवशी निळी शॉर्ट आणि काळा टी-शर्ट घातला होता हे मला उगीचच लक्षात आहे.

मी घरामध्ये एकटा नव्हतो. आस्ताद बाहेरच्या खोलीमध्ये झोपला होता. मुंबईत बारीक बारीक पाऊस पडत होता. घरासमोरच्या पार्ले बिस्किट फॅक्टरीमधून ग्लुकोज बिस्किटं भाजल्याचा वास रोज सकाळी वार्‍यासरशी घरात येत असे. तो वास नुकताच येऊन गेला होता. आदल्या दिवशी सुमित्रामावशी आणि सुनील माझ्याबरोबर मुंबईला आले होते. त्यांच्या कामाची वेळ गाठण्यासाठी ते नुकतेच घरामधून निघाले होते. सकाळी आम्ही एकत्र चहा प्यायला होता आणि गरम टोस्ट खाल्ले होते. ते मुंबईत माझ्यासोबत राहत असतील, तर सकाळची ही वेळ आम्ही रिच्युअलसारखी एकत्र घालवत असू. त्यांना माझी काळजी वाटत असे. त्या काळात मी गरजेपेक्षा जास्त संवेदनशील मुलगा होतो, हे आत्ता मला जे कळतं आहे, ते त्यांना तेव्हाच कळलं असावं.

ते दोघं बाहेर पडताच माझ्या मनानं ब्लेड शोधायचा निर्णय घेतला असावा. माझं डोकं शांत होतं. मी कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी केली नव्हती. उदास वाटत होतं हे खरं आहे, पण ते गेले काही महिने वाटतच होतं. गेले बरेच दिवस तर एखाद्या अंधार्‍या भुयारात शिरल्यासारखं वाटत होतं. ती वयाची आणि मनाची अशी काही अवस्था होती, ज्यात आकर्षणांच्या आकर्षणात मी जगासमोर फार गुंता करून घेतला होता. मी प्रेमात पडलो होतो आणि सध्या मी प्रेमात पडेन त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं मी एका व्यक्तीच्या प्रेमात पडलो होतो. चांगलं किंवा वाईट असं काहीच नाही. आता मी फक्त त्याला वेगळी पद्धत म्हणेन.

लिफ्टमधून उतरून पावसातून तसाच चालतचालत मी समोरच्या वाण्याच्या दुकानात आलो आणि तीन ब्लेड्‌स्‌ घेतली. जणू काही एक ब्लेड पुरणारच नव्हतं. ती घेऊन मी घराकडे जायला वळलो, तेव्हा माझ्या डोळ्यांत खळ्‌कन पाणी आलं. पण मी घराकडे चालतच राहिलो. लॅच उघडून घरात आलो. आस्ताद अजूनही हॉलमध्ये झोपला होता. मी बेडरूममध्ये गेलो आणि आतून कडी लावून घेतली. मग पलंगावर बसून छोट्या नाजूक कागदी पाकिटामधून मी धारदार नवंकोरं ब्लेड बाहेर काढलं.

डाव्या हाताचं मनगट मी डोळ्यांसमोर धरलं आणि उजव्या हातात ब्लेड धरून मी मनगटावरच्या नसेच्या जागी एक बारीक काप दिला. शरीरात गरम काहीतरी घुसल्यासारखं तिथे दुखलं, पण रक्त आलं नाही. मला खूप रक्त येणं अपेक्षित होतं. तसं काहीच न झाल्यामुळे बहुधा मला ढसाढसा रडायला यायला लागलं. मी स्वत:ला खूप, बिचारा आणि कमनशिबी वाटत होतो. माझ्या प्रेमाला प्रतिसाद मिळत नव्हता. ‘सर्व जगानं आपल्याविरुद्ध कट केला आहे, आपणच काय ते चांगले आणि बिचारे, जग दुष्ट, जिच्यावर आपण प्रेम करतो ती व्यक्ती अहंकारी आणि असंवेदनशील’, असं सगळं काही मला एकत्र वाटायला लागलं. आईची आणि बाबांची छातीत कळ यावी तशी आठवण आली. परत काही क्षण थांबून मी मन घट्ट केलं. मग मी अजिबातच थांबलो नाही. एकामागून एक सपासप असे मी डाव्या मनगटावर वार करत राहिलो. रक्त वाहायला लागलं आहे, हे मला रक्ताच्या उष्ण प्रवाहाच्या स्पर्शावरून लक्षात आलं. मी हाताकडे न बघता खिडकीबाहेर बघत मनगटावर ब्लेड मारत बसलो होतो. दात ओठांमध्ये घट्ट रुतवून ठेवले होते. माझा श्‍वास जोरजोरात चालू होता. सगळं शरीर थरथरायला लागलं होतं. रक्ताइतकाच अंगामधून घाम बाहेर पडत होता. मरणापेक्षाही जास्त भीती आता मला मनगटाकडे बघण्याची वाटत होती. मी पाहिलं, तर रक्त पद्धतशीरपणे फरशीवर वाहत होतं. पण मला जे व्हायला हवं होतं, ते होत नव्हतो. मी मरतच नव्हतो.

मी मनगटाकडे पाहिलं. जखमेचा आकार फार नव्हता, पण ती एक आडवी खोलवर जखम होती. त्वचा फाटून गेली होती. ती जखम पाहिली आणि मला तिथे आगडोंब होणार्‍या वेदनेची जाणीव झाली. मनगटातून रक्त झिरपत होतं. वाहत होतं. मग मी उजव्या हातातलं ब्लेड फेकून दिलं आणि डाव्या हाताचं मनगट त्या हातानं गच्च दाबून धरलं. रक्तस्रावाचा वेग वाढावा आणि वेळ वाचावा म्हणून. आपण डाव्या हातानं लिहितो, आपण डावरे आहोत, ही जाणीव माझ्या कमकुवत चिकट दुबळ्या मनाला तेव्हाही झाली. मनगट दाबून धरल्यावर आता जरा जास्त दाबानं रक्त झिरपू लागलं. जमिनीवर पसरू लागलं. काही वेळानं माझं रडणं अचानक थांबलं, जेव्हा जखमेची वेदना माझ्या डोक्यात वेगानं घुसली. काही क्षणानंतर मी कोरडा बीभत्स आरडाओरडा करायला लागलो. अचानक बाहेरून दरवाजा वाजवल्याचा आवाज यायला लागला. मी परत रडायला लागलो. दरवाजा जोरात वाजायला लागला, तेव्हा मला एकदम भीती वाटायला लागली. मला रक्ताची एक मोठी चिळकांडी उडून, सगळं रक्त वाहून जाऊन मी मरून जावं असं वाटत असतानाच मी मनगटाकडे पाहिलं. रक्त झिरपणं कमी होत होतं. जमिनीवर मात्र सगळीकडे काळसर चिकट रक्त पसरलं होतं. आपण आता काही मरत नाही, अशी मनाला जाणीव झाली असावी. दारावरच्या धडकाही वेगानं वाढत होत्या. आपण आता मरणारच नसू तर निदान जगाकडून दया गोळा करत फिरूया, ह्या घाणेरड्या भावनेनंच मी रक्तामधून चालत जाऊन दरवाजा उघडला. दारात उस्ताद उभा होता. तो माझ्या हाताकडे आणि खोलीतल्या रक्ताकडे पाहून जोरात ओरडला. माझं खोलीतलं ओरडणं ऐकूनच त्यानं सुमित्रामावशी आणि सुनील यांना फोन केला असावा. मी पुन्हा कोरडा रडत पलंगावर बसलेलो असताना पावसात भिजलेले ते दोघंजण धावतधावत घरात आले. मला सुमित्रामावशींनी घट्ट पोटाशी धरून ठेवलं.

मला पहिली जाणीव झाली, ती हलकेपणाची. माझं मन अतिशय मऊ आणि हलकं झालं होतं. गेले काही महिने मनावर साचलेला गंज निघून जाऊन मला लखलखीत वाटायला लागलं. ते दोघंजण मला समजावत होते. डॉक्टरांना फोन करत होते. सुनील बाथरूममधून एक बादली आणि फडकं आणून ओणवा होऊन फरशीभराचं रक्त पुसून काढत होता. मला गोळ्या दिल्या गेल्या. फार हलक्या हातानं सुनीलनं काळजीपूर्वक माझा हात बँडेज केला.

मला फार मोकळा श्‍वास घेता येऊ लागला होता. इतका हलकेपणा आणि दीर्घ आतला श्‍वास मी गेले काही महिने विसरूनच गेलो होतो. मी एकदम मऊ, आज्ञाधारक आणि समजंस झालो. त्यांनी मला दिलेलं दूध मी प्यायलो आणि माझी बॅग भरून मी त्यांनी बोलावलेल्या टॅक्सीत जाऊन बसलो. मला रडायला येत नव्हतं, की हसायला येत नव्हतं. मला माझा वेग परत मिळाला होता. श्‍वास आत घ्यायचा आणि श्‍वास बाहेर सोडायचा माझा नैसर्गिक वेग. माझ्या हातापायांना बारीक मुंग्या येत होत्या आणि मध्येच अंग गरम झाल्यासारखं वाटत होतं. माझ्या डाव्या हाताला पांढरंशुभ्र बँडेज बांधलं गेलं होतं, ज्यातून त्यात भरलेल्या मलमाचा एक विचित्र आंबट दर्प येत होता.

हळूच पांढर्‍या बँडेजवर एक लाल डाग उमटला, पण तो प्रसरण पावला नाही. गेले काही महिने माझं अख्खं मन हे एक पिकलेला फोड झालं होतं. ते मन मी फोडून पिळून टाकलं होतं. मी नुसताच थरथरणार्‍या हातापायांनी काचेबाहेरचा पाऊस पाहत पुण्याच्या दिशेनं प्रवास करत होतो. मी मध्येच वळून सुनीलच्या चेहर्‍याकडे पाहिलं, तेव्हा मला लक्षात आलं की, आपल्याला आत शांत निवांत वाटत असलं, तरी आपल्या जवळच्या माणसांना वेगळंच काही वाटू लागलं आहे. मी काही न बोलता काचेवर डोकं टेकवून डोळे मिटून बसलो. मग एकदम डोळे उघडले. आपल्या मनाचं एकवेळ ठीक आहे, पण आपल्या प्रेमाचं काय? प्रवासात मध्येच एका ठिकाणी आम्ही थांबलो असताना मी त्या व्यक्तीला फोन करून सांगितलं, ’आय ट्राइड टू कट माय रिस्ट’. त्यावर मला उत्तर मिळालं, ’ओह गॉड, यू टेक केअर मॅन!’ फोन बंद झाला. पण त्याचं मला काहीच वाटलं नाही. पुढची दोन वर्षं मी त्या व्यक्तीला भेटणार नव्हतो, पण त्या वेळी मला कशाचं काहीच वाटलं नाही. मी फोन खिशात ठेवून परत गाडीत येऊन बसलो.

विमान ज्याप्रमाणे रडाराच्या स्क्रीनवर हळूहळू पुढे सरकतं, एका बिंदूकडे जाताना दिसतं, तसं मला मी स्वत: एका बिंदूकडे सरकत जात असल्याचा अनुभव येत होता. तो बिंदू होता – पुणे शहर. आता पुढचे किती महिने आपल्याला सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकत पुण्यामध्ये घरात मुकाट बसून राहावं लागेल, ह्याची तेव्हा मला कल्पना होतीही आणि नव्हतीही. पुण्यातून मी बाहेर पडून तीन वर्षं झाली होती आणि ज्या उन्मादात मी जगत होतो, त्यात मला पुणं सोडून सगळं काही हवं होतं. पण आता कसं ते शक्यच असणार नाही. कसं होणार आपलं, असला रोमँटिक विचार करत करतच मी पुण्याला येऊन पोहोचलो. पुण्याच्या दारातच काळे सर उभे होते. सोबत फणसळकर होता. आणि अर्थातच भूषण होता. प्रेम, वैद्यक आणि विज्ञान यांची मोट बांधून त्यांनी मला धोक्यातून बाहेर काढलं. रात्री माझ्या आईवडलांसमोर मला उभं करण्यात आलं. माझे आईवडील किती आधुनिक आणि समंजस आहेत, याची त्यांनी मला आयुष्यात पदोपदी जाणीव करून देऊन खजिल केलेलं आहे. माझी आई समोर आली. तिनं मला जवळ घेतलं आणि म्हणाली, ‘‘तू शांत हो. थोडे दिवस आता मुंबईच्या कामांमधून सुट्टी घे आणि इथेच या घरी राहा. चला, सगळे जेवायला बसूया. मग उद्या सकाळी गप्पा मारू.’’

या घटनेनंतर गेल्या अनेक वर्षांमध्ये मी माझ्या मनाला, त्वचेला आणि शरीराला चारचौघांप्रमाणे अनेक वेळा जपलं. जे शरीर कापून मी मरायला निघालो होतो, त्या शरीराच्या बोटाला जरा चटका लागला तरी माझ्या डोळ्यांमध्ये पाणी येतं. मी बोट तोंडात घालून चोखत बसतो. कितीतरी वेळा त्यानंतर दाराच्या फटीमध्ये बोटं सापडली, वाकून वर उभं राहताना वरच्या कपाटाचं दार लागून जवळपास कपाळमोक्ष झाला. पायातले बूट चावून बोटांना फोड आले. उष्णतेनं नाकातून रक्त वाहायला लागलं. या सगळ्या वेळी मी शरीराला जप जप जप जपलं. आपण काही वर्षांपूर्वी शांतपणे ब्लेड घेऊन फाडलेली त्वचा याच शरीराची होती, की वेगळ्या कोणत्या शरीराची, हे लक्षात येऊ नये इतका मी त्या घटनेपासून लांब झालो.

एक गोष्ट मात्र मी कुणालाही सांगू शकत नव्हतो, कारण सांगितली असती तरी कोणीही त्यावर विश्‍वास ठेवला नसता. ती म्हणजे, ज्या क्षणी माझ्या अंगातून रक्त झिरपायला लागलं, त्या क्षणी मला एकदम मोकळं वाटू लागलं. रक्त झिरपायचं थांबताच मी ब्लेड चालवायचा थांबलो होतो. मी का थांबलो होतो? मरून जाण्याचं धाडस माझ्या दुबळ्या मनामध्ये नसणार हे तर उघडच आहे. शिवाय मी ज्या व्यक्तीवर प्रेम करीत होतो, त्या व्यक्तीला मला अपराधी वाटवायचं होतं. पण सगळ्यांत महत्त्वाचं हे की, मी माझी त्वचा फाडताच असं काहीतरी घडलं होतं, ज्यानं मला मस्त, मोकळं, शांत, वाहतं, चकचकीत वाटायला लागलं. मी थांबलो असणार यामुळे – अचानक अर्ध्या जखमेवर मला मनामध्ये एक संतुलन सापडलं. मी कोरडा रडत होतो ते डोक्यावरचं ओझं हलकं झाल्याच्या आनंदात.

मी अतिशय तंद्रीत बॅग भरून परत आलो असलो, तरी बॅगेत सर्वच्या सर्व गोष्टी होत्या. कपडे, पुस्तकं आणि कामाच्या वह्या. सदाशिव पेठेतल्या घरी मी तीन वर्षांनी राहायला परत आलो होतो. तिथे जशी झोप लागते, तशी जगात दुसरीकडे कुठेच लागत नाही. आईबाबांच्या वागण्यात नेहमीच एक शांत सोफिस्टिकेशन असतं. ते त्यांनी कुठून कमावलं आहे, ते मला आजपर्यंत कळलेलं नाही. अतिशय अटीतटीच्या प्रसंगांमध्ये ते प्रथमत: आपलं संपूर्ण बोलणं ऐकून घेतात. घटनेला स्वीकारतात, पण खर्‍याच गोष्टीची बाजू घेतात. त्यांच्या स्वत:च्या मनाला होणारा त्रास आणि भीती लपवून त्यांनी मला घरामध्ये अलगद उतरवून घेतलं.
पण दोनच दिवसांत जाळीबाहेरचा पाऊस बघत घरातली मी विसरून गेलो होतो ती गौरी देशपांड्यांची जुनी ओलसर पुस्तकं वाचत बसून राहायचा मला कंटाळा आला आणि मी सकाळी आईला चहा पिताना म्हटलं, ‘‘चला, जातो मी आता परत मुंबईला. माझं बरंच काम खोळंबलं आहे.’’ आईनं तिसरा डोळा उघडला आणि तो असा काही उघडला, की मी गुपचूप परत पलंगावर जाऊन गौरीबाईंच्या मांडीवर बसून परपुरुषांविषयी सतत वाटणार्‍या प्रेमभावनेत विलीन होऊन गेलो. मला जे काही सुटं सुटं वाटत होतं, ते कळेल आणि समजेल असं कुणीही माझ्या आजूबाजूला नव्हतं. म्हणजे आजूबाजूला होतं, पण त्याचा प्रकाश माझ्यावर अजूनी पडायचा होता.

बँडेज होतंच. ते आता तितकंसं पांढरंशुभ्र राहिलं नव्हतं. दर चार दिवसांनी ड्रेसिंग करणं आवश्यक होतं. शिवाय सर्व लोकांनी माझ्याप्रमाणे खूपच हिंदी चित्रपट पाहिलेले असतात. त्यामुळे मनगटावर बँडेज म्हणजे काय, याचं उत्तर ते देऊ शकतात. म्हणून मी पूर्वी कधीही न घातलेले फुलशर्ट घालायला लागले. मी ज्या काही माणसांना गृहीत धरून चाललो होतो, त्या माणसांशी या काही दिवसांत मी नव्यानं जोडला गेलो. मिलिंद आणि उमेश हे माझे दीर्घ जुने मित्र. माझ्या मनावर माझ्या सोबतीनं बारकाईनं काम करणारा भूषण, मुंबईत ज्यांनी मला दत्तक घेतलं आहे आणि जे अजूनी मोठ्या मनानं माझ्या मोठ्या शरीराचं लालनपालन करतात, ते अमृता आणि संदेश. हे सर्वजण आणि त्याहीपेक्षा अधिक असे सर्वजण गुपचूप मीटिंगा करत होते. कुणी – कसे – कुठे – केव्हा याचे चोख आराखडे आखत होते. माझ्या पायात साखळ्या नसल्या, तरी माझ्यावर बारीक नजर होती.

माझ्या मनावर एक साय आली होती आणि मी काही न बोलता सगळं काही होऊ देत होतो आणि बघत होतो. दिवाळी संपेपर्यंत मी स्वत:ला असंच तरंगू दिलं. मी एक शॉर्ट-फिल्म बनवायला घेतली होती, ज्याचं शूटिंग पूर्ण झालं होतं, पण त्याचं संपूर्ण प्रॉडक्शन करून ती पूर्ण करणं आवश्यक होतं. शिवाय मी मुंबईत जिथे नोकरी करत होतो, तिथे मी बनवत असलेल्या डॉक्युमेंट्रीजची टेलीकास्ट डेट जवळ आली होती. मी गेली तीन-चार वर्षं धडपड करून मुंबईत बसवत आणलेली माझ्या अतिस्वतंत्र आयुष्याची घडी मला मोडायची नव्हती. त्या वेळी ‘कोबाल्ट ब्लू’ लिहून झाली होती आणि मौजेच्या शीतकपाटात पडून होती. मुंबईला माझी बाईक पावसात गंजत होती. मी तिला कव्हर न घालताच इथे आलो होतो.

शिवाय मला एकटं असणं आवश्यक वाटत होतं, जे मला वारंवार आवश्यक वाटतं. संपूर्ण एकटं. पावसाळा संपला, गौरीगणपती झाले, दिवाळी संपली आणि माझे हातपाय परत शिवशिवायला लागले. एव्हाना माझ्या डाव्या हातावरचा व्रण माझ्या शरीराचा एक भाग झाला होता. प्रेमाविषयी माझ्या सगळ्या भावना वाहून गेल्या होत्या. मी पुन्हा एकदा सगळ्याला तयार झालो होतो. मला स्वच्छ वाटत होतं.

या काळातल्या अस्वस्थतेमुळे मला लिहायची सवय लागली. मला भारंभार काही सुचायला लागलं, ज्याची कशाचीच कशाला संगती नव्हती. जे सुचत होतं, ते आतलं होतं आणि बाहेरचंही होतं. बर्‍याच गोष्टींना कथास्वरूपच नव्हतं. काही नुसत्याच चमकदार कल्पना होत्या, ज्या रात्री सुचत पण सकाळी त्यांच्यात काही दम नाही हे लक्षात येत असे. मला त्या वेळी एक पूर्ण लांबीचा चित्रपट दिग्दर्शित करण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती. माझं मन त्यासाठी एक कथा शोधत होतं. त्यामुळे मनात येईल त्या कल्पनेला मी चित्रपटाकडे ढकलत बसलेला असे. लिहिण्याची माझ्या मनाला सवयही नव्हती आणि शिस्तही नव्हती.

पुण्यातल्या या वास्तव्यात मी बाईक चालवत नव्हतो. माझे दोन मित्र मिलिंद आणि मोहित आलटूनपालटून मला त्यांच्या बाईकवर चक्कर मारायला नेत. मला औषधं आणायची असत, पोस्टात पत्रं टाकायची असत, पुस्तकांच्या दुकानातही वारंवार जायचं असे. त्या दोघांच्या मागे बसून मी गावभर हिंडायचो. ते दोघंही मला काळजीतून तयार होणारे अनावश्यक प्रश्‍न विचारायचे नाहीत. मला माझं काय ते मागच्या सिटावर वाटू द्यायचे. मिलिंद मला दिवसा शहरात फिरवून सर्वत्र माझी सोबत करायचा. संध्याकाळी स्टुडिओची वेळ संपली, की मोहित यायचा आणि मला युनिव्हर्सिटी रोडला हिरव्यागार वातावरणात चक्कर मारायला न्यायचा.

तीन-चार महिन्यांपूर्वी मी जे काही केलं, त्यामुळे माझ्या मनात स्वत:विषयी अत्यंत राग आणि त्रयस्थपणा तयार झाला. मला तो माणूस स्वत:पेक्षा वेगळा वाटू लागला होता आणि त्या माणसाच्या घाबरटपणाची, लेच्यापेच्या मनाची तिडीक वाटू लागली होती. त्या माणसाच्या चारही बाजूंना फिरून मी त्याला भरपूर दगड मारले आणि चेचून टाकला. माझं मनगट कापणार्‍या त्या माणसानं कोणत्यातरी रंगीत कचकड्या भावनांच्या आहारी जाऊन माझ्या शरीराची आणि मनाची वाट लावायला घेतली होती. त्या भावनेचा प्रेम नावाच्या अनुभवाशी कोणताही संबंध नव्हता. या सर्व काळामध्ये मनात चालणार्‍या विचारांच्या गुंत्यामध्ये मागच्या सिटावर बसून वारा कापत पुढे जाताना मला, ’याला ती व्यक्ती आवडते – तिला तो आवडतो, त्यांना ती आवडते, त्याला ते सगळे आवडतात’ या माणसं एकमेकांना आवडण्याच्या उद्योगाविषयी मनामध्ये अत्यंत कंटाळा उद्भवला. मला मी स्वत: पुन्हा महत्त्वाचा वाटायला लागलो. माझं शरीर मला आवश्यक वाटू लागलं. माझ्या मनाची सोबत मला आनंद देऊ लागली.

आपण एकटे आहोत, आपल्याला कुणी सोबती नाही, कुणी असणार नाही, या टीनएजर दु:खात मी फार वर्षं पोहून बोअर झालो होतो. गेली अनेक वर्षं मी एक उदास-एकलकोंडा आणि अतिभावनाप्रधान मुलगा असणार – ज्याची निर्णयशक्ती कोणत्या पातळीची होती, हे मी नुकतंच अनुभवलेलं होतं. मला पळून जावंसं वाटायला लागलं. त्या मुलापासून आणि त्या मुलाला ओळखतात त्या सर्वांपासून.

कॅम्पमध्ये एका दुकानात मला एक विचित्र आकाराचं भलंमोठं घड्याळ मिळालं. मनगटावर घालण्याच्या घड्याळापेक्षा त्याचा आकार जरा जास्तच मोठा होता. शिवाय त्याला चार इंच रुंद काळा पट्टा होता. मी ताबडतोब ते घड्याळ विकत घेऊन डाव्या मनगटावर चढवलं आणि व्रण झाकून टाकला. मग मी इतर उद्योगांना लागलो. मुंबईला फोन सुरू केले आणि ऑफिसमधली माझी कामं मार्गी लावायला सुरुवात केली. मग फारच सावकाशपणे आजूबाजूच्या माणसांचा विश्‍वास संपादन करून दोन दिवसांत परत येण्याच्या बोलीवर मी मुंबईला जाऊन आलो. मुंबईच्या छोट्यामोठ्या अनेक मुक्कामांमध्ये मी माझी अर्धवट राहिलेली शॉर्टफिल्म करण्याच्या नेटानं मागे लागलो. ‘शुभ्र काही’ ही माझी फिल्म पूर्ण झाली.

कोणत्याही अविचारानं केलेल्या कृत्याची किंमत या ना त्या प्रकारे चुकवावी लागतेच. मी केलेल्या चुकीच्या कृत्यामुळे मी माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींचा विश्‍वास गमावला होता. माझ्या आणि त्यांच्या निर्णयप्रक्रियेचा परिणाम हा झाला की, मला हातातली सर्व कामं पूर्ण करताच मुंबईचं घर सोडून पुण्याला परत यावं लागलं. मला मुंबईत एकट्याला राहू द्यायला कुणाच्याच मनाची तयारी होत नव्हती. मी आणि माझा भाऊ आता पुण्यात पटवर्धन बागेमध्ये आमच्या नव्या फ्लॅटमध्ये राहायला जाणार होतो. पुण्याला परत येणं म्हणजे परत पुन्हा पूर्वीच्या जगण्याकडे परत येणं असेल, तर ते मला नको होतं. मी तीन दिवसांच्या वर या आत्ममग्न आणि तृप्त गावात त्या काळात राहू शकत नसे. पण आता पर्याय नाही, हे माझ्या लक्षात आलं होतं आणि मी माझं पार्ल्याचं फार महत्त्वाचं घर सोडून, एका सुमो गाडीत गच्च सामान कोंबून, सगळं काही घेऊन पुण्याला राहायला परत आलो.

मला आता नाटक-सिनेमांतही आत्महत्या करणारी पात्रं आवडत नाहीत. चित्रपटात नेहमी मनगटं कापून घेण्याचे सीन असतात. युरोपिअन सिनेमात तर फार छान असतात. असा कोणता सीन आला तर मी पडद्यावरून नजर वळवून थिएटरच्या अंधारात कुठेतरी वेगळीकडेच बघत बसतो. मनगट कापणं किंवा झोपेच्या गोळ्या खाणं हे माझ्यासारख्या उथळ आणि थिल्लर मनाच्या माणसांचे आत्महत्येचे प्रयत्न आहेत. त्यानं आपण मरत नाही. मुंबईत हल्ली अनेक बायका वेगवेगळ्या उंच टॉवर्सवरून उड्या मारून जीव देतात. त्या बायका दु:खाच्या आणि सहनशीलतेच्या कोणत्या पातळीला पोहोचल्या असतील याची मला कल्पना करता येते. पण मला कुणीही कधीही स्वत:ला संपवून टाकू नये, असं नक्की वाटतं. फारच आतून. प्रेमामुळे तर अजिबातच असं करू नये. असली चिकट, लोंबत पडलेली प्रेमं करण्यापेक्षा व्यभिचार करत मोकळेपणानं गावभर फिरावं.

मुंबईचं घर आवरताना मी त्या खोलीत फार शांतपणे वावरलो. त्या पलंगावर दोन रात्री झोपलो. फरशी पूर्वीसारखीच स्वच्छ होती. बाथरूममध्ये खिडकीजवळच्या कट्ट्यावर उरलेली दोन ब्लेड्‌स्‌ होती. पुण्यात परत आल्यानंतर जवळच्या माणसांच्या नजरेमध्ये मी हे तपासून पाहत असे, की आपल्याप्रमाणे यांचीही त्या प्रसंगाविषयीची स्मृती पुसली जाते आहे का? ही माणसं सहा महिन्यांनी आपल्याकडे कोणत्या नजरेनं पाहत आहेत? हळूहळू गोष्टी पूर्ववत होत आल्या. गेले सहा महिने मी म्हणेन ते ऐकणारे माझे मित्र मला हळूहळू फाट्यावर मारायला लागले. माझे फाजील लाड करणं घरच्यांनी बंद केलं. बाईक पुण्यात परत आली आणि मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार की काय जे असतो ते बनलो. नवं घर होतं आणि ते घर अतिशय प्रशस्त आणि प्रकाशमान होतं. निलगिरी आणि कडुलिंबाच्या झाडांनी ते वेढलेलं होतं. घराला विस्तीर्ण गच्ची होती आणि त्या गच्चीवर माझी खोली होती. घर नीट लावून, रंगवून बरेच दिवस मी नुसता बसलो होतो, तेव्हा खिशातला फोन एकदम वाजला. प्रसारभारतीला आकाशवाणी केंद्रातर्फे प्रकाश नारायण संतांच्या साहित्यावर ऑडिओ बुकाच्या धर्तीची मालिका तयार करायची होती. मी पुन्हा नव्या कामाच्या प्रक्रियेत ओढला गेलो. मी जिवंत आहे याची मला फार मजा यायला लागली.

मी कधी काही लिहीन, असं मला अजिबातच वाटलं नव्हतं. मला चित्रपटदिग्दर्शक व्हायचं होतं आणि लिहिण्याच्या प्रक्रियेपासूनचा तो फारच लांबचा प्रांत आहे. मी माझी उमेदवारी त्याच क्षेत्रात केली होती. मी एक उदास टीनएनजर असताना, मुंबईत एकटा राहत असताना पहिल्यांदा स्वत:चं म्हणून काहीतरी लिहायला घेतलं. ती लघुकथा असेल, कथा की दीर्घकथा असेल याच्याशी मला काहीही देणंघेणं नव्हतं. मुंबईत माझ्या करियरचा फार धडपडीचा काळ सुरू होता. मला कामं मिळत नव्हती आणि चाचपडत होतो. दिवसच्या दिवस रिकामे जात. मुंबई शहरात आपल्याकडे करायला काहीही नाही, ही भावना फार भीतिदायक असते. त्या रिकामेपणातून मी लिहायला लागलो. हळूहळू त्या लिखाणाची लांबी मोठ्या सहजतेनं वाढत राहिली आणि मी त्यामध्ये ओढला जात राहिलो. ‘कोबाल्ट ब्लू’ ही माझी लघुकादंबरी अशा दिवसांमध्ये मी सलग लिहून काढली. त्याचं हस्तलिखित सुमित्रामावशींनी वाचलं आणि श्री. पु. भागवतांकडे पाठवायला मला सांगितलं. मी ते अतिशय संकोचानं मौजेकडे पाठवून दिलं आणि त्याबद्दल सगळं काही विसरून गेलो.

एके दिवशी अचानक लांब दाणेदार अक्षरांतलं श्री. पु. भागवतांचं पोस्टकार्ड आलं आणि मी गरगरूनच गेलो. आपण लिहिलेलं कोणी वाचून काढलं आहे याची मला कल्पना होती. त्या पोस्टकार्डामुळे मी लिहिण्याच्या प्रक्रियेत पुन्हा ओवला गेलो. नाहीतर मी ते सगळं सोडूनच देणार होतो. कारण तोपर्यंत माझा लिहिण्याचा अनुभव हा कंटाळ्याच्या आणि रिकामेपणाच्या भावनेशी जोडला गेला होता. मला तोपर्यंत दोन लेखक प्रत्यक्ष जवळून माहिती होते. महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर. या दोघांशी माझा स्नेह होता, त्यांच्याशी संवाद होता, पण त्यांनी लिहिलेलं मी काहीही वाचलं नव्हतं. ते दोघंही नाटककार होते आणि मला नाटकं पाहण्याचा आणि वाचण्याचा अतिशय कंटाळा होता. मला कादंबर्‍या-नाटकांपेक्षा एका चांगल्या चित्रपटाच्या पटकथेची गरज होती. पण निर्माता अधिक पाठबळ देईल असं स्क्रिप्ट मी लिहू शकत नव्हतो आणि अडकून पडलो होतो.

मुंबईहून पुण्याला आल्यानंतरच्या त्या काळात मी कुणाच्याही प्रेमात न पडता जगू शकतो ही सुवर्णजाणीव आयुष्यात पहिल्यांदा मला झाली. प्रेमात न पडण्याची तोपर्यंत मला सवयच नव्हती.

मी काय आहे, हे काहीच नीट माहीत नसण्याच्या अशा हलक्या पण तरंगत्या परिस्थितीत एके दिवशी मोहित मला म्हणाला की, मी नाटक लिहून बघावं. त्यानं ‘कोबाल्ट ब्लू’चं हस्तलिखित वाचलं होतं. तो स्वत: एका मोठ्या नाट्यसंस्थेपासून जाणीवपूर्वक वेगळा होऊन त्याला वाटत असणारं वेगळं आजचं आणि त्याचं नाटक करू बघत होता. त्याची फार त्वेषानं धडपड चालू होती. नाटक लिहिण्याचा विषय त्यानं एकदा नाही तर दोनदा काढला. माझा मोहितवर नुसताच मित्र म्हणून नाही, तर एक ताकदवान ऑडिओ-व्हिज्युअल डिझायनर म्हणून विश्‍वास आहे. केवळ तो म्हणाला म्हणून मी त्याचं म्हणणं गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली.

आपण लेखक आहोत हे आपल्याला कुणी सांगावं लागतं का? इतरांच्या बाबतीत माहीत नाही, पण माझ्या बाबतीत अनेक वेळा अनेक लोकांनी मला हे सांगितलेलं आहे. त्या माणसांमुळेच मी लिहायला लागलो आहे. लेखक असणं ही माझी स्वप्रतिमा नव्हती आणि आता ती असली तरी एखाद्या सदोष आरशामध्ये उमटावी तशी ती लयदार विचित्र प्रतिमा आहे.

प्रकाश संतांच्या ‘शारदा संगीत’च्या रेकॉर्डिंगचं काम वेगात सुरू असताना मला पुन्हा एकदा पॅरिसला जाऊन यावं, असं वाटायला लागलं. मी युरोपच्या बॅकपॅकिंग टूरचे प्लॅन बनवायला लागलो. मला पॅरिस शहराची आणि त्या शहरातल्या माणसांची अशा दोन्ही आठवणी यायला लागल्या. मला युरोलाइन्स बसचा महिन्याभराचा पास काढून युरोपमध्ये भटकायचं होतं. रात्रीचा प्रवास करून दिवसा शहरं पाहायची. फ्रँकफर्टमध्ये अमितच्या घरी जाऊन राहायचं होतं. बुडापेश्त शहर पाहायचं होतं. मी बसचे स्वस्त प्लॅन्स, तारखा आणि शहरांची यादी करून प्रवासाची आखणी करायला जगाचा एक भलामोठा नकाशा आणून माझ्या गच्चीवर पसरला आणि त्यावर चार कोपर्‍यांवर दगड ठेवले. मला ज्या शहरांमध्ये जायचं होतं, त्या शहरांची अंतरं आणि दिशा पाहताना मला पुन्हा भारताच्या पश्‍चिम किनार्‍यावरचं मुंबई शहर दिसायला लागलं. जणू तिथे एखादा दिव्य ग्लो होत होता.

मी मोहितला म्हणालो की, मला काहीतरी ढोबळ कथा सुचते आहे, पण त्यातून मी नाटक तयार करू शकेन का, हे मला माहीत नाही. बहुधा नाहीच. मोहित मला शांतपणे आणि आश्‍वासकतेनं म्हणाला, “तू मोकळेपणानं, शांतपणे तुला हवं ते लिही. तू चांगलं लिहितोस. तू जे लिहिशील त्याचं मी नाटक बसवेन. आता तू थांबू मात्र नकोस. लिहायला लाग.”

मी दोन-तीन दिवस काहीच केलं नाही. महेशच्या स्टुडिओत आम्ही दिवसभर ‘शारदा संगीत’च्या गाण्यांचं आणि संगीताचं रेकॉर्डिंग करत असू. रोज ते संपल्यावर मी इकडेतिकडे न उंडारता घरी येऊन बसायला लागलो. मला नाटक लिहायची भीती वाटत होती. म्हणजे लिहायची भीती वाटत नव्हती, पण ते नाटक आहे याची मला भीती वाटत होती. लिहायला बसलो, तर एकदम संवादच लिहिण्याची वेळ आली कारण त्याशिवाय दुसरं काही नसतंच नाटकात. मग मी कंटाळून कागद ठेवून दिले आणि या डब्यातला चिवडा, त्या डब्यातल्या चकल्या खात घरभर फिरत राहिलो.

आमचं रेकॉर्डिंग संपलं, की मोहित संध्याकाळी स्टुडिओत येऊन साऊंड एडिट करत बसे. पुढच्या दोन्ही संध्याकाळी त्यानं माझ्याकडे लिखाणाचा काहीही विषय काढला नाही. मला वाटलं, हा विसरला असावा. मरो ते नाटक!

आम्ही पाषाणच्या रस्त्यावरून बाईकनं चाललो होतो. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीनंतर रस्ता वळला, की तिथे एक जुना वापरात नसलेला बसस्टॉप आहे. तिथे आम्ही उगाचच बसून राहिलो. मी मनगटावरचा पट्टा काढला आणि हातावरचा व्रण पाहत बसलो होतो. त्यावेळी मोहित म्हणाला, “मजा येतीये ना?’’ मी एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि मला लक्षात आलं की, या माणसाला ते सगळं समजलंय. म्हणजे मनगटावर ब्लेडनं काप दिल्यावर नक्की मला काय वाटलं, ते फक्त या माणसाला समजलंय. त्या एका वाक्यानं माझा मोहितशी एक थेट धागा बांधला गेला.

मी घरी येताच झपझप वर जाऊन माझ्या गच्चीवरच्या खोलीत गेलो आणि दार लावून घेतलं. टेबलापाशी गेलो तर एकाही पेनामध्ये शाई नव्हती. पेनं लागतायत कशाला? बरेच दिवसांत काही लिहिलंच नव्हतं. मी कपाटं उघडली, बॅगा तपासल्या. कुठेही एक पेन सापडलं नाही. टोकं झिजलेल्या दोन पेन्सिली सापडल्या पण त्यांना टोकं करायला घरात ब्लेड नव्हतं.

खालच्या मजल्यावर घराच्या हॉलमध्ये फोनजवळ पाच-सहा पेनं मरून पडली होती. एक लाल रंगाचं पेन जिवंत होतं. ते पेन स्वत: रंगानं लाल होतं आणि त्यातून उमटणारी शाईसुद्धा लाल होती. ते पेन मी गच्च पकडलं आणि जिन्याची एकेक पायरी गाळत धावत गच्चीवर गेलो आणि माझ्या खोलीचं दार आतून गच्च लावून घेतलं.

SACHIN KUNDALKAR

PUBLISHED IN MAHER DIWALI 2011

kundalkar.gmail.com

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online ,must be shared in totality . )

PRAKARAN . प्रकरण .

 • Scan 10माहेर दिवाळी 2013प्रकरणसचिन कुंडलकर

  आपल्याला वाटत असतं की, आपण रोजचं जगणं अगदी आरामात जगतोय. खातोय. पितोय. हिंडतोय. काम करतोय. एकटे किंवा कुणासोबत. आणि वरती आकाशामध्ये तो ढग येऊन थांबलेला कळतही नाही आपल्याला.

  असंच वाटत असतं, की आकाश तर अगदी निरभ्र आहे वरती. कारण खरं म्हणजे गेले अनेक दिवस आपण वर पाहिलेलंच नसतं. पण एकदा कधीतरी नजर नर जाते आणि सगळा मामला लक्षात येतो. असंच झालंच तर. आपण प्रेमात पडलो आहोत. पहिल्यांदाच किंवा पुन्हा एकदा.

  आता तो ढग दिसल्यानं आपल्याला बरं वाटतं. आपण जाऊ तिथे तो आपल्यासोबत येतोच. सगळी छतं पारदर्शी होतात. रात्री गच्चीवर जावं, गावाबाहेर हायवेवर जावं, कामामध्ये अगदी स्वतःला बुडवून घ्यावं तरी आता नजर सतत वर जायची थांबवता येत नाही. आपल्याला हलकं वाटू लागलं, आपली सवयच बदलते आणि आपण नकळत एकटे असताना हसत बसलेलो असतो. ते आता आपल्या हातात उरलेलं नसतंच. आता प्यायला घेतलेल्या प्रत्येक पाण्यात तो ढग दिसू लागतो. तो असा मोठा मोठा का होत चाललाय? याबद्दल धास्ती वाटू लागते.

  आयुष्यात हे वारंवार होण्याचा मोहक, तापदायक आणि लोभस अनुभव मी घेत आलो आहे. काही वेळा आधी गोंडस छोट्या शुभ्र असणाऱया निरभ्र आकाशाची स्वप्नं पाहिली आहेत. ती खरी झाली आहेत. पण अगदी सगळ्यात पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो त्याआधी आकाशाचा जो निळा रंग होता तसाच चमकदार निळा रंग आजही प्रत्येक ढगाच्या आगमनापूर्वी कसा काय तयार होतो याचं आश्चर्य मला वाटायचं थांबलेलं नाही.

  सध्या माझ्या डोक्यावरच्या विस्तीर्ण स्वच्छ निळ्या आभाळात एक हसरा छोटा ढग येऊन थांबलेला आहेच. पण तो बेटा आपलं आकारमान आळोखेपिळोखे देऊन विस्तृत करणार याबद्दल मला तीळमात्र शंका नाही.

  प्रेम करणं ही माणसाच्या मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं अशी इच्छा होणं ही याच प्रवृत्तीची दुसरी सहज अशी बाजू. आपण प्रेमात पडण्याचं थांबवू शकत नाही. आपलं वय काहीही असो. आपण एकटे असू वा दुकटे. प्रेमाला शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आयाम असतात. काही व्यक्ती हे दोन्ही हात पसरून आपल्याला जवळ घेतात तर काही एका हातानंच आपल्याला कुरवाळत राहतात.

  शारीरिक प्रेम करण्याची इच्छा प्रबळ होणं पण ते करू शकण्याची परिस्थिती नसणं या नितांतसुंदर अवस्थेत त्या प्रेमात पडलेल्या व्यक्ती एकमेकांना काही वेगळ्या जाणिवांची तेजस्वी करत असतात. ही प्रेमाची अवस्था सगळ्या आसमंतात नवी अस्वस्थता तयार करणारी आणि मनाला नवी उर्जा देणारी असते. मी ह्या अवस्थेमध्ये पूर्वी तडफडत असे. तो आता या अवस्थेत रेंगाळायला उत्सुक आणि सक्षम झाला आहे.

  सुरुवातीला आपल्या मनाच्या मागण्याच फार कमी असतात. आपोआप काही वेळा झालेल्या भेटी, डोऴे, आपलं समोरच्या व्यक्तीनं केलेलं कौतुक, एकमेकांसोबत चालताना कमी जास्त करावा लागणारा वेग, जुळलेल्या आवडीनिवडी. आणि मग जर व्हायचंच असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. त्या व्यक्तीचं नाव जरी उच्चारलं गेलं तरी श्वास वेगळे पदन्यास करू लागतो. सोपेपणा आणि सहजतेवर कसलातरी आश्वासक दाब पडायला लागतो. लाल सिग्नलला उभं असताना, लिफ्टमधून वरखाली प्रवास करत असताना, पोहण्याच्या तलावात तरंगताना किंवा बिअरचा दुसरा ग्लास रिचवताना मन फार जड व्हायला लागतं आणि आठवण नावाची गोष्ट आपलं पाऊल मनात रोवते. आणि अचानक त्या व्यक्तीच्या आठवणीसोबत एक उष्मा मनात तयार होतो. पुढील काही दिवसांत त्याचं एक उष्णतेत रुपांतर होणार असतं. त्या उष्णतेचा निचरा करताना मनाची घालमेल उडते आणि आपण वाचत असलेली पुस्तकं, ऐकत असलेलं संगीत पाहत असलेला पाऊस, वावरत असतो ते रस्ते त्या सगळ्याचा ताबा नकळत ती व्यक्ती घेऊन टाकते. माझ्या बाबतीत तर ती व्यक्ती ज्या शहरामध्ये राहत असते, त्या संपूर्ण शहरावरतीच तो ढग पसरलेला असतो. शहराच्या आधी येणारा डोंगर चढताना मला तो खालूनच हल्ली दिसू लागतोय. माझ्याआधीच पहाटे निघून तिथे जाऊन पोचलेला.

  हे सगळं प्रत्येकाच्याच आयुष्यात वारंवार होत असतं. टाळता येत नाही. ज्या व्यक्तींच्या आईवडलांचं लग्न झालेलं असतं आणि ज्यांना स्वतः ते करायचं असतं, शिवाय आपल्या मुलांचं आणि त्यांच्या मुलांचंही लावून द्यायचं असतं. त्या व्यक्तींना मात्र आयुष्यात हे सगळं एकदाच व्हावं असं वाटत असतं. नव्हे ते एकदाच होतं असं ते मानूनही चालत असतात. त्यामुळे लग्नाच्या प्रेमाला ते प्रेम म्हणतात आणि त्याव्यतिरिक्त इतर प्रेमांना ते `अफेअर्स’ म्हणतात. जुन्या बोली भाषेत त्याला `प्रकरण’ असं म्हणतात.

  प्रेमात एकदाच पडावं किंवा पडता येतं हे म्हणणं बाळबोध आहे. त्याचप्रमाणे लग्न नावाच्या दोन फुटी कुंपणात एकदा उभं राहिलं की आभाळातल्या त्या ढगांपासून आपली सुटका होईल असं म्हणणं हे बालीशपणाचं आहे. लग्नानंतर जी माणसं पुन्हा कुणाच्या प्रेमात पडत नाहीत ती किती ओंगळ, कोरडी आणि कंटाळवाणी असावीत याची कल्पनाच न केलेली बरी.

  त्यांच्यावर फक्त एक आणि एकच व्यक्ती प्रेमाचे थर लावीत बसलेली असते आणि तेसुद्धी त्याच डब्यात ब्रश बुचकळून समोरच्या व्यक्तीवर तसेच ओघळ आणत बसलेले असतात. आधी खूप वेळा, मग वर्षातून एक-दोन वेळा वाढदिवसाला वगैरे. बाकी वेळ सुकलेले रंग घेऊन इकडेतिकडे बघत बसून राहायचं. असे ओघळ आणून एकमेकांना चिणून टाकण्यातच त्यांचं आयुष्य संपून जातं.

  मी वाढलोच मुळी प्रकरणांच्या शेतात. माझ्या नशिबानं माझ्या आजूबाजूला, कुटुंबात आणि शेजारात लग्नांइतकीच प्रकरणं घडत होती आणि फार लहान वयापासून मला त्या शब्दाबद्दल अतीव उत्सुकता होती. तशीच दुसरी उत्सुकता मला ‘ठेवलेली बाई’ या या शब्दाबद्दल होती. मला कितीतरी दिवस त्या ठेवलेल्या बाया कशा दिसतात ते पाहायचं होतं. आमच्या कुटुंबातील काही व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे आणि माझ्या आईच्या मनाच्या मोकळेपणामुळे माझी फार लहान वयात अनेक प्रकरणांशी आणि ठेवलेल्या बायांशी गाठ पडली. त्यानंतरच्या आयुष्यात कुटुंबाच्या परिघाबाहेर पडून माझा मी प्रवास करायला लागलो तेव्हा मला अनेक मोकळ्या मनाचे, आनंदी ठेवलेले पुरुषही भेटले. यामुळे माझ्या सगळ्या उत्सुकता अगदी आळस दिल्यावर हाडम मोकळी होतात तशा मोकळ्या होत विरल्या.

  प्रकरणं करणारी माणसं, ठेवलेल्या बाया आणि ठेवलेले पुरुष हे नेहमीच आनंदी असतात. त्यांच्या आजूबाजूची माणसं मात्र सतत चिंतेत आणि खंगलेली असतात, असं मला दिसलं. शिवाय सतत आपण दुसऱयाला ठेवू शकत नाही. आपल्या नकळत दुसऱया कुणीतरी आपल्याला ठेवलेलं असतं आणि आपल्याला ते लक्षातच आलेलं नसतं. त्यात फारच मजा येते. एकदा आमच्या नात्यातल्या एक बाई दुःखी होऊन अल्कोहोलच्या आहारी गेल्या तेव्हा मी आईला त्याचं कारण विचारलं असता ती म्हणाली, की त्यांच्या नवऱयाचं दुसऱयापण एका बाईवर प्रेम आहे म्हणून त्यांचं असं झालं. अनेकांवर प्रेम करत राहता येतं. पण दुर्दैवानं आपलं आधी लग्न झालं असेल आणि घरी पोरंटोरं असतील तर घरच्या बाया पुरुषांना अशावेळी फार त्रास देतात. आईला त्या ठेवलेल्या बाईबद्दल जास्त सहानुभूती होती असं मला दिसलं. (मी लवकरच त्या बाईंना भेटलो, त्या फार गोड आणि सुंदर होत्या. त्या माझ्या कुणीच नव्हत्या. त्यांनी मला पिस्ते खायला दिले होते आणि पुढे काय करणार असं विचारलं होतं. तेव्हा मला माझ्या आजोबांप्रमाणे एस. टी. चा कंडक्टर व्हायचं होतं ते मी त्यांना सांगितलं होतं.)

  मी स्वतः पहिल्यांदा प्रेमात पडलो तेव्हा मला हे उमगलं की प्रेमासोबत माणसावर एक प्रकारचा हक्क सांगण्याची उर्मी उत्पन्न होते. ती व्यक्ती संपूर्णपणे आपली असावी असं वाटू लागतं, मनानं आणि शरीरानंसुद्धा. एवढंच नाही तर त्या व्यक्तीचा दिवसभराचा आणि त्यानंतरचा वेळ, तिच्या आवडीनिवडी ह्या सगळ्यांच्या बरोब्बर केंद्रस्थानी आपण असलो तरच त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे अशी अट आपण नकळत घालतो. प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक शाखा प्रशाखा असतात आणि आपण त्या वृक्षासारख्या व्यक्तीमत्त्वाशी जोडला गेलेला एक भाग असतो हे मला कधीही लक्षातच येत नसे. माझा जो कॅमेरामन आहे अमलिंदू, त्यानं मला एकदा सेटवर फार पूर्वी sting ह्या गायकाची गाणी ऐकवली. त्यात If you love someone. set them free नावाचं त्याचं एक गाणं आहे. ते गाणं ऐकायला आवडत असूनही मला वर्षानुवर्षं खरं म्हणजे कळलेलंच नव्हतं. माणूस आवडत असला तरी वर्षानुवर्षं कळलेलाच नसतो तसंच गाण्याचं होतं.

  हे घेण्याचं कारण, स्त्री-पुरुषांची प्रेम जमताच ताबडतोब होणारी लग्नं, भावाबहिणींची भाऊबीजछाप प्रेमं, शोलेतल्या जय वीरू छापाची मैत्रीची गाणी एवढ्या तीनच कप्प्यांत माझ्या समाजानं मानवी नाती बसवली होती. सगळ्यांनी त्या तीन कुंपणातच राहायचं. त्या कुंपणाबाहेर सगळं दुःख, बेजबाबदारपणा, अविचार आणि अश्लीलता आहे असं सगळं मानून निमूट जगायचं.

  थोडे दिवसांनी हे लक्षात आलं, की आकर्षण ही गोष्ट अपरीमीत आहे. ती थांबत नाही. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपणे आहे. कारण सोळा सतराव्या वर्षी सुरू झालेली ही प्रेमात पडण्याची आणि आकर्षित होण्याची प्रक्रिया अजूनही मला तरी थांबवता आलेली नाही. एक मन, एक शरीर, एक भावनिक ओलावा माणसाला पुरा पडणं शक्यच नाही. निसर्गाचं असं काही म्हणणंच नाही. मग त्या सगळ्या उर्मींच्या विरुद्ध माणसाला कसं जाता येईल?

  आयुष्याचा काही दीर्घ वा छोटा काळ एखादी व्यक्ती व्यापून टाकते. तो संपूर्ण काळ हा त्या व्यक्तीच्या नावाचा आणि रंगाचा असतो. तो काळ काही दिवसांचा वा अनेक दशकांचा असू शकतो. पण मग माणूस बदलतो. त्याला नवे अनुभव खुणावतात. त्याच्या बुद्धीची, शरीराची भूक विस्तारते. त्याच्या आवडीनिवडी बदलतात आणि तो माणूस नव्या आयुष्यासाठी उर्जा शोधायला लागतो. काही वेळा सोबती असूनही तो एकटा पडतो ज्याची कारणं स्पष्ट करता येत नाहीत. हे सगळं होण्यात आधीच्या व्यक्तीशी प्रतारणा अपेक्षित नसते पण अनेक वेळा नात्यातली surpriges संपलेली असतात. अशावेळी ज्याला आपण प्रकरण म्हणतो ती गोष्ट तयार होत असावी.

  बहुतांश माणसांची प्रवृत्ती ही नातं जगासमोर मिरवण्याची असते. बहुतेक लग्नं ही त्याचसाठी केली जातात. जगाच्या साक्षीची गरज त्या माणसांचं नातं तयार होताना का लागत असावी? लग्न करण्याचा आणि दोन माणसांचं एकमेकांवर प्रेम असण्याचा अर्थाअर्थी संबंध आजच्या काळात राहिलेला नाही. पूर्वीही नसावा. सिनेमांचे ज्याप्रमाणे प्रिमिअर्स होतात त्याप्रमाणे माणसांची आयुष्यात लग्नं होतात. कुटुंबाच्या संपत्तीचं, गोतावळ्याचं, लागेबांध्यांचं आणि समाजातल्या त्या कुटुंबाच्या स्थानाचं ते आपापल्या परीनं केलेलं प्रदर्शन आहे. प्रेमाचा लग्नाशी संबंध नसतो. ते आपोआप तयार होतं आणि ते होणारच नसेल तर ते कितीही वेळा एकमेकांशीच लग्नं करत बसलं तरी होणार नसतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातले ते एकदाच घडणारे सोहळे असतात. अनेकजणांच्या आयुष्यात लग्न सोडल्यास पुढे काहीही भव्यदिव्य घडणारच नसतं म्हणून ती माणसं फार हौसेनं सर्वांसमोर एका दिवसाच्या केंद्रस्थानी उभं राहून लग्न करून घेतात. फार तर फार बारशी आणू मुलांच्या मुंजी होतात. त्यानंतर थेट आपल्या मुलांची लग्नं. म्हणजे पुन्हा दुसऱया प्रिमिअर शोची संधी. आणि मग ते (कर्कश्श आणि? खर्चिक) चक्र अव्याहत पुढे चालू राहतं.

  प्रेमाची खरी मजा ते होताना कुणालाही न कळण्यामध्ये असते. आपल्यालाही ते होताना कळत नसेल तर त्या अनुभवासारखा दुसरा विलक्षण अनुभव नसतो. जी माणसं चारचौघांत मोकळं वावरत, आपापलं आयुष्य जगत कुणालाही न कळवता एकमेकांवर प्रेम करत राहतात त्या माणसांनी फार दुर्मिळ असा आनंद आपल्या आणि दुसऱया व्यक्तीच्या मनाला आणि शरीराला दिलेला असतो. त्यासाठी सतत सर्वांसमोर एकत्र राहण्याची, एकमेकांना भेटवस्तू द्यायची, एवढंच काय तर माझं तुझ्यावर प्रेम आहे हे एकमेकांना म्हणायचीही गरज नसते. असं प्रेम फार कमी वेळा आयुष्यात नशिबी येतं. ते ज्यांना ओळखता येतं, ओळखून रुजवता येतं, आणि रुजवून मान्य करता येतं ती माणसं फार ग्रेट असतात. आपल्या दोघांचं नातं काय आहे याची ह्या गर्दीत कुणालाच कल्पना नाही. याच्याइतका सुंदर रोमॅन्स जगात दुसरा कोणताही नाही. मग त्या प्रेमात वय, राहणाऱया शहरातलं अंतर, लग्न झालं की नाही, आपण यापुढे कधी भेटणार आहोत की नाही असे प्रश्न हळूहळू शांत होत जातात. ते व्हायला फार वेदना होतात, कष्ट करावे लागतात. पण होणार असेल तर ते सगळं आपोआप होतं. थोडं सहन करावं लागतं. ह्यासाठी नशिबवान असावं लागतं आणि मोकळ्या मनाची स्वतंत्र ताकद घेऊनच जन्माला यावं लागतं. त्यात सुरक्षितता आणि हक्काचे एकमेकांवरचे हिशोब असून चालत नाही. ती तसली कामं नवराबायकोंची असतात. काही भेटी वेळ ठरवून अलेल्या मिनिटासेकंदाच्या असतात तर काही भेटी संपूर्ण रात्री व्यापून उरतात. एकमेकांच्या शरीराचे गंध आठवण आली की मनाभोवती रुंजी घालू लागतात. अतिशय दुःखाच्या आणि वेदनेच्या क्षणांना त्या व्यक्तीचा नुसता चेहरा आठवला तरी मनावर फुंकर येते. आपल्याकडे त्या व्यक्तीनं दिलेली कोणतीही भेटवस्तू नसते ना आपण दिलेली तिच्याकडे असते. एक खूण असते कसलीतरी. एखादा संकेत असतो. हस्ताक्षर असतं. इतर कुणालाही माहीत नसेल असं हाक मारायचं नाव असतं. ते पुरेसं असतं. त्या पलीकडे सतत आश्वासनं देण्याची गरज नसते. मुख्य म्हणजे भिती नसते. असुरक्षितता नसते. महिन्या महिन्यांची शांतता मान्य असते. कुणाला काही सांगायचं नसतं. नावं जोडून घ्यायची नसतात. प्रत्येक भेट शेवटची असू शकते. कारण हक्क नसतो. पुढची भेट झाली तर मन फार मऊ आणि आनंदी होऊन जातं. जिकडेतिकडे सगळं बरं वाटू लागतं आणि ऊर भरून येतो.

  असं सगळं होण्याला इंग्रजीमध्ये ‘अफेअर’ का म्हणतात? हे जर फेअर नसेल तर मग दुसरं काय फेअर असू शकतं?

  प्रेमामधून तयार झालेल्या शारीरिक ताण्याबाण्यांना समजून घेण्याची उमज आजही आपल्या परिसरात तयार झालेली नाही. शारीरिकता हा बहुतांशी प्रेमाच्या संबंधाचा पाया असतो. ती एकतर्फीही असू शकते. असली तरी ती ओळखून एका अंतरावरून झेलायला शिकायला हवं. पावसाळा आनंदात जाणार असेल तर त्याला ती भेट देण्याचा मोठेपणा मनात हवा. शारीरिक संबंध आले नाहीत, होऊ शकले नाहीत या कारणानं अनेक नाती अतिशय गूढ आणि दाट होत जाण्याची शक्यता असताना आपण फार पटकन शारीरिकतेचा ठोस आग्रह धरत नात्यांची मजा संपवून टाकतो. याचं कारण त्याविषयी आपल्या मनात सतत असलेलं दडपण.

  शारीरिक संबंध ही प्रेमाची पावती असू शकत नाही. तो प्रेम करण्याचा एक मोठा उद्देश असतो. काही वेळा तो उद्देश आपोआप आणि शांतपणे सफल होतो तर काही वेळा त्याच्या कोमटपणावर, उष्णतेवर आणि धगीवर अबोलपणे वर्षानुवर्षं दोन माणसांमधलं नातं फार मस्त आकार घेतं. याची मजा घेण्याची प्रवृत्ती जोपासायलाच हवी. शरीर सापडत जायला हवं. ते स्वप्नांमध्ये रंगवता यायला हवं. त्यासाठी ते न ठरवता अचानक कधी इकडून कधी तिकडून दिसायला हवं. त्यासाठी पाऊस असतो, मोठ्या गळ्यांचे सुंदर कपडे असतात, दरवाज्यांच्या फटी असतात. पहिल्या काही तीव्र शारीरिक संबंधांनंतर, शरीराची surprises जर संपली तर त्या दोन व्यक्तींना नात्याचा बाज टिकवून ठेवायला पुन्हा नव्यानं एकमेकांना काहीतरी सादर करावं लागतं. त्यापेक्षा ते होईल तेव्हा होऊ द्यावं. आपोआप.

  प्रेमाप्रमाणेच शारीरिकता ही काही एका व्यक्तीशी बांधली गेलेली नसतेच. आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्याला अनेक शरीरं आवडतात. काही जुन्या शरीरांमधला रस उडतो आणि नवी खुणावतात. ते सगळं होणं फार सुंदर आहे. शिवाय ते अपेक्षितही आहे. त्यामुळेच तर आपल्याला जाणिवांची वृद्धी होते. हे जर मान्य केलं नाही आणि आपल्याच दोघांच्या एकमेकांच्या शरीराची अट कुणी कुणावर घातली तर कालांतरानं कोणीतरी एक न सांगता त्याच्या सहजप्रवृत्तीनं जे करायचं ते करतोच. आपल्या आयुष्याचं अत्यंत पारंपरिक स्वरुप जगाला दाखवत बसणारे लोकही ते टाळू शकत नाहीत. मग त्यातून लपवणूक आणि त्रास होतो. भावनिक हिंसा तयार होत जाते आणि आपल्यापाशी असलेला सगळा आत्मसन्मान माणसं या कारणी घालवून फार बिचारी होऊ शकतात. त्यापेक्षा रात्री दोघांपैकी कुणी घरी आलं नाही तर दार लोटून घेऊन शांत झोपावं. काही दिवस आजमवावं, गप्पा मारून मोकळेपणा ठेवावा. माणसं नेहमी सगळीकडे फिरून परत घरी येतातच. ती आपलीच असतात.

  शारीरिक संबंध आले म्हणजे आपण दुसऱया व्यक्तीला आपले सर्वस्व दिले असं वाटणं म्हणजे एक सिनेमा कादंबऱयांमधून आलेला बावळटपणा आहे. आपला ‘स्व’ हा इतका स्वस्त असतो का की तो ह्या अनुभवानं लगेच गमावल्या जाऊ शकतो? हे सर्वस्व देण्याच्या भावनेचं खूळ इतकं प्रगाढ आहे की शारीरिक संबंध एकदा आला की लगेगच त्यापुढे प्रेम करण्याची सक्ती केली जाते. अनेक वेळा ते अव्यवहार्य असतं कारण पुन्हा लग्नाप्रमाणे शारीरिकतेचा प्रेमाशी संबंध असेलच असं नाही. आजच्या काळात जेव्हा मोकळेपणानं शारीरिक संबंध पहिल्या काही भेटींमध्ये होतात तेव्हा त्याचं स्वरुप आकर्षणाची धग शांत करण्याचं असतं. एकमेकांचा स्पर्श ओळखण्याचं आणि संवाद साधण्याचं असतं.आणि कोणत्याही स्वरुपात ते सर्वस्व देण्याचं कधीही असू शकत नाही. अगदी लग्नाच्या नात्यातही नाही. नशिबानं आपण आता अशा काळात आहोत जिथे शारीरिकतेचा पुनरुत्पादनाशी कोणताही अपघाती संबंध नाही. असं असताना एकमेकांना दिल्या घेतलेल्या आनंदाची पुनरावृत्ती करण्याची सक्ती कुणीही कुणाला का करावी? तसं झालं तर वारंवार होणाऱया किंवा न होऊ शकणाऱया शारीरिकतेतून किती चांगलं प्रेम फुलत जाऊ शकतं! ते करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळायला हवं. ही निसर्गाची प्रेरणा आहे.

  जर कुणावर कसलाही हक्कच सांगायचा नसेल तर मग प्रेम करणं ह्या गोष्टीला काय अर्थ उरला? अशी बऱयाच जणांची समजूत असते. पण वर्षानुवर्षं टक्केटोमणे खाऊन, मनाला खोट्या समजुतीत पाडून, हक्काचं वजन तयार करून आपण प्रेमात असल्याचा देखावा जगापुढे साजरा करण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ नये. आपल्या मनातलं एखाद्या व्यक्तीवरचं प्रेम संपलं आहे हे ओळखायला आपण घाबरतो. ओळखलं तरी ते कबूल करणं आणि पुन्हा प्रेमात पडायला मनाला सक्षम करणं हे धाडसच आपण करत नाही.

  आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रेमात पडून ते निभावणाऱया व्यक्ती धाडशी असतात. खऱया असतात. पण आपल्या मनातले न्यूनगंड, परस्परांची झापडं आणि आपल्यातल्या भावनिक समृद्धीच्या अनुभवामुळे आपण लगेचच त्या व्यक्तींची ‘व्यभिचारी’ म्हणून हेटाळणी करून टाकतो. पण मनातल्या मनात प्रत्येकजण आपण तसं करू शकत नाही म्हणून कुढत असतो.

  अनेक प्रेमं पचवून आणि रिचवून त्याचा गोतावळा सांभाळणारे स्त्री पुरुष किती तेजःपुंज असतात. त्यांच्या मनाला आणि शरीराला सतत एक झळाळी असते. मला अशी अनेक माणसं माहिती असण्याचं आणि त्यांच्याशी दोस्ती असण्याचं सुदैव लाभलेलं आहे. त्या व्यक्ती सतत कात टाकत असतात. होत्याच्या नव्हत्या होतात. स्वरुपं पालटतात. ताण सहन करतात आणि बंद झालेल्या गुहांचे दगड फोडून वारंवार मोकळ्या प्रदेशात जात राहतात. त्या व्यक्तींना मनं आणि शरीरं हाताळण्याची सुंदर लकब गवसलेली असते. मध्ये येणाऱया अंधाऱया खोल्यांची, थरकाप उडवणाऱया एकटेपणाची त्यांची भीती गेलेली असते. ते सगळं प्रेमासोबत येणार हे ते उमजून असतात. आपण बसलेलं विमान आपल्याला हवं तिथे कधीच उतरणार नसतं.

  गरजेपेक्षा जास्त वर्षं फक्त एकमेकांसोबतच राहिलेल्या दोन माणसांना शेजारी शेजारी उभं करून त्यांचा फोटो काढून पाहिला तर त्यांचे चेहरे बघून त्यांच्या नात्याविषयी सर्व कल्पना येते. बहुतेक वेळा खिन्न हसते चेहरे असतात ते. त्यांच्या दारंखिडक्या नसलेल्या घराची गोष्ट सांगत असतात. आम्ही चाळीस वर्षं एकत्र काढली. पण कशी? एकटं पडण्याच्या भीतीनं एकमेकांना गच्च आवळून? की मोकळेपणानं-समजुतीनं अंतर कमीजास्त ठेवून? त्याउलट कोणत्यातरी प्रवासात महिनाभर भेटलेल्या आणि परत कधीच न सापडलेल्या मित्रांचे आणि मैत्रिणींचे फोटो पाहिले तर त्यांच्या चेहऱयावरचे भाव, ओसंडून सांडणारा आनंद पाहून मला तरी ते आयुष्य नक्की जगावंसं वाटेल.

  माणसं आयुष्यात येणं जितकं साहजिक असतं तितकंच ती सोडून जाणंसुद्धा साहजिक असतं आणि त्या दोन्ही गोष्टी सोप्या नसतात. पण माणूस सोडून जाताना मनावर आणि अंगावर काही हलकी खूण सोडून गेला तर मात्र त्या ताटातुटीसारखा दुसरा एकमेवाद्वितीय अनुभव नाही.

  आपण जागं व्हावं तेव्हा ती व्यक्ती शेजारी नसावी. बाहेर पाऊस पडत असावा. चिठ्ठी बिठ्ठी काही नसावी. पण आपण रात्री उतरवून ठेवलेलं काहीतरी ती व्यक्ती गुपचूप घेऊन गेली असावी. आपल्याला आनंदी थकव्यानं पुन्हा ग्लानी यावी हा आनंद सकाळी त्या व्यक्तीला दात घासताना बघण्याच्या आनंदापेक्षा किती चांगला आहे. तो प्रत्येकाला मिळो.

  नात्यात नेहमी येऊन जाता आलं पाहिजे. येता यायला हवं आणि जाताही यायला हवं. केव्हा जायचं आहे हे जेव्हा एकमेकांना कळतं त्या माणसांची प्रकरणं सतत ताजी आणि मोहक राहतात. पण ते सगळं सापडायला थोडा वेळ लागतो. मधली वाट बघण्याची वेळ पण आवडायला लागते. परत घरी कुटुंबकबिल्यात जाऊन दात घासणाऱया व्यक्तींकडे पाहून एक साळसूद हसू बाळगणं शिकून घ्यायला लागतं. असं सगळं चालू असलं की हातून फार चांगलं लिहून होतं, गाणी होतात, चित्रं उमटतात आणि साधा चहा बनवला तरी त्याला फार अस्मानी चव येते.

  सतत कुणाचीतरी सोबत असण्याचा अलिखित नियम हे भारतीय समाजाचं फार मोठं दुर्दैव आहे. त्यातली सोबत महत्त्वाची न राहता ‘सतत’ हा शब्द फार मोठा करून ठेवला आहे आपण. टोळ्यांनी आणि जोडीनं सतत जागायला आपण आता रानावनातली किंवा कृषीसंस्कृतीतली माणसं उरलेलो नाही. आपल्यापैकी अनेकांना सोबत असण्याच्या पलीकडे, फक्त एकट्यानं शोधण्याचे, अनुभवण्याचे आयाम सापडते आहेत. पण तसं जगणं समृद्ध होऊ शकेल अशा आयुष्याच्या नव्या रचना, नवी-मोकळी नाती लेबल न लावता तयार करायला आपल्याला दुर्दैवानं घरात शिकवलं जात नाहीत. फोनच्या डिरेक्टऱयांप्रमाणे आपली नात्यांची लेबलांची डिरेक्टरी फार आऊटडेटेड झाली आहे. त्यात अनेक नवी माणसं नाहीत. अड करायची सोय नाही.

  अनुभव घेणं ही नेहमीच एकट्यानं करायची गोष्ट असते. ती जोडीनं करत बसता येत नाही. तुम्ही कितीही आकंठ प्रेमात बुडाले असताल तरीही. अनुभव जेव्हा मनात मावत नाही तेव्हा तो सांगितला जातो आणि यावेळी तो नक्की समजणाऱया माणसासोबत गाढ होत जाते. त्याला समजुतीचं आणि ओळखीचं अंगण आणि कुंपण येतं. मग दिवाणखाना येतो आणि समजुतीचंच शय्यागृह येतं. त्यात इतरांना प्रवेश नसतो.

  सगळ्यांना सगळं कधीच समजत नसतं हे यामागचं कारण आहे. एकाच माणसाला आपण म्हणत असलेलं सगळं समजावं असं वाटणं ही तर जवळजवळ हिंसा आहे. यातच आपल्या आयुष्यात एकापेक्षा जास्त जोड्या तयार होण्याचं सोपं आणि साधं कारण आहे.

  -सचिन कुंडलकर

 • kundalkar@gmail.com
 • ( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online ,must be shared in totality . )