अपेयपान. लोकमत मधील लेखमाला भाग ३१ ते ३३

अपेयपान ३१

 

सध्या सरळ पद्धतीने आपले आयुष्य नाकासमोर जगणारी भारतीय माणसे जर कश्याला घाबरत असतील तर ते म्हणजे अमूर्ततेला . ज्याला इंग्रजीमध्ये abstract म्हणतात अश्या गोष्टीला.

आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानपणीपासून अमूर्ततेला घाबरायला आणि हसायला शिकवलेलं असतं. अमूर्तता म्हणजे अशी अवस्था जी संपूर्ण सोपी आणि  पटकन पाहता कळणारी नाही. जी समजून घेण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात . मनाला संवेदनशील पद्धतीने जागृत ठेवून अनुभव अजमावा लागतो अशी अवस्था. ती आपल्याला नको असते. आपल्याला साधे सोपे आणि चार चौघांसारखे अनुभव हवे असतात. कोणतीही अमूर्तता आली कि ती कलेत असो , जेवणात असो किंवा अगदी आपल्या नात्यात असो ,आपण त्यापासून घाबरून पळून जातो. आपल्याला ती झेपत नाही . अनोळखी असे काहीही आपल्याला चालत नाही. परदेशात सुद्धा काही हुशार माणसे प्रवालासा जाऊन नायगारा धबधब्यात उभे राहून तिथे  उकडीचे मोदक खात बसतात. ( मी फेसबुकवर हे फोटो पाहिले आहेत )

असे करताना आपण सगळे मर्द मनाचे मिश्या पिरगाळू भारतीय असल्याने आपण स्वतः ला कळात नाही , आपल्याला नवे अनोळखी काही आवडत नाही  ह्याची भीती आणि राग त्या कलेवर किंवा त्या अनोळखी वस्तूवर , जेवणावर किंवा अगदी रोजच्या अनुभवावरून सांगायचे तर त्या नात्यावर काढतो.

लग्न आणि मुले किंवा आईवडील किंवा भाऊ बहिण ह्या पलीकडची अमूर्त शांत नाती आपल्याला कळत नाहीत. ह्याचे कारण वेगळ्या गोष्टी वस्तू समजून घ्यायला आपल्याला आपल्या आईवडिलांनी शिकवले नाही .त्यांना त्यांच्या आईवडिलांनी शिकवले नाही आणि त्यांच्या आई वडिलांना ब्रिटिशांनी शिकवले नाही . ब्रिटिशांना ह्या भूमीतील मानसिक समृद्धी पुसून टाकून कारकुनांची कार्यशाळा होणारा देश घडवायचा होता. तसा त्यांनी बनवला आणि आपण होवू दिला . ते निघून गेल्यावर आपले पणजी पणजोबा हे इतके कारकुनी दुबळे बनले होते कि पोट भरणे आणि प्रजोत्पादन ह्यापलीकडे त्यांनी आपल्या आणि आपल्या पुढील पिढीच्या मनाला कोणतीही मानसिक समृद्धी किंवा सौदर्य दृष्टी मिळेल ह्याकडे लक्ष्य दिले नाही आणि असल्या लोकांनी घडवलेल्या भारताचे हे आजचे उग्र आणि बेसूर स्वरूप आपण अनुभवत आहोत. आपली शहरे ,आपली घरे आणि आपली मने हि ब्रिटीश कारकुनी संस्कारांची ठोस बिनडोक आणि सोपी बनली आहेत. त्यामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आनंदांकडे आणि प्रश्नाकडे आपण एका सुंदर अमूर्तता  पाहू शकत नाही , तसे करायला आपल्या लहान  मुलांना शिकवू शकत नाही त्यामुळे आपली मने उदासीनतेला नैराश्याला आणि भलत्याच स्पर्धेतून तयार झालेल्या ताणाला बळी पडतात.

आपल्याला आपल्या शिक्षकांनी आईवडिलांनी M F हुसेन ह्यांची किलोभर चेष्टा किंवा द्वेश करायला शिकवलेले असते. कुणालाही लहानपणी कलेमधील अमूर्तता समजावून घेण्याचे प्रयत्न करताना दिसत नाही . अमूर्त स्वरूपाच्या सुंदर कथा मराठी रंगभूमीवर कायम वावरत आल्या. पण त्या पहायाला आपण न जाता घाणेरडी व्यावसायिक नाटके पहात बसायची आणि तिथे जाऊन तोंडातून खाताना बाहेर पडणारे बटाटेवाड्याचे कच्च्चे पीठ अनुभायची गोडी आपल्याला लागली. आपण कमल देसाई , विलास सारंग , अरुण कोलटकर ह्यांना समजावून न घेता अश्या लोकांचे साहित्य वाचत बसलो ज्या लेखकांचा परीघ अंबरनाथ कल्याण स्टेशनांच्या पलीकडे कधीच गेला नाही . किंवा शिवाजी पार्कमधून ते मनाने बाहेर पडले नाहीत. आपला आवडता रंग भगवा किंवा लाल .सगळे काही  ठोस सोपे आणि मुख्य म्हणजे बटबटीत करून ठेवण्याची आपण सवय लावली आणि त्यापेक्षा कुणी काही वेगळे करायला गेले कि हुल्लडबाजी आणि चेष्टा करून ते बंद पाडले.

प्रायोगिक हा शब्द ज्या राज्यात उगवतो ते राज्य अतिशय दुर्दैवी असावे. वेगळे काही असले कि ते प्रायोगिक असते. काही ठराविक माणसे ते जाऊन पाहतात. आपला सगळ्याशी काय संबंध ? आम्हाला वेळ नसतो. मुख्य प्रवाहाचे आणि प्रायोगिक अशी विभागणी आपण सहज करून आपल्या राज्याची बौद्धिक मर्यादा किती मस्तपणे जगासमोर दाखवून देतो.

आपल्या आई वडिलांनी आपला सगळ्यात मोठा तोटा हा करून ठेवला आहे कि त्यांनी आपल्यातला sense of abstract कधी वाढू दिला नाही . अमूर्ततेची सवय लावली नाही . आज एकविसाव्या शतकात तंत्रद्यानामुळे मानवी नातेसंबंधात एक अमूर्तता , एक नकळत abstraction येऊ लागले आहे. घरातल्या रोजच्या जगण्यातील वेगामुळे . ते आपल्याला कळत नाहीये कारण आपली त्या अमूर्त तेशी ओळख करून दिली गेली नाहीये. कुणाचीहि त्यातून आता सुटका होणार नाही. मला परवा एक ओळखीच्या आजीबाई म्हणत होत्या कि घटस्फोट फार वाढले आहेत बाई हल्ली. आमच्या घरात एवढ्यात तीन झाले , आमच्या कॉलोनीत दोन झाले. सोपेच झाले आहे घटस्फोट घेणे तुम्हाला.

आपण एकमेकांना सहन करू शकत नाही आहोत कारण आपल्यात नेहमीपेक्षा वेगळे असे काही पाहण्याची पचवण्याची आणि शांतपणे स्वीकारण्याची सवय आपल्या शिक्षणाने आणि आई वडिलांच्या मुंजी सत्य नारायणांच्या संस्कारांनी लावली नाही. ज्याची गरज नाही ते त्यांनी आपल्याला पुष्कळ शिकवले पण नव्या काळात जगण्यासाठी अनेकविध प्रकारच्या मोकळ्या शिक्षणाची गरज होती ते शिक्षण ते आपल्याला देऊ शकले नाहीत.

आपण लहानपणी चांगले गाणे ऐकले नाही . भारतीय शास्त्रीय संगीताइतके abstract , अमूर्त सुंदर असे दुसरे काहीही नाही . ज्यांनी ते मनापासून ऐकले त्यांच्या मनात वैचीत्र्याला अमूर्ततेला किंवा कोणत्याही प्रकारच्या वेगळेपणाला सामावून समजावून घेण्याची प्रवृत्ती तयार होते. महत्वाच्या चित्रकारांनी अमूर्त स्वरुपात काम केले त्यामागे त्यांच्या मनातले मोठे अवकाश जगापुढे मांडण्यासाठी रेषेचा आणि  त्या रेषेतून निघणाऱ्या अर्थाचा परीघ पुरा पडणार नव्हता. अश्या कामाला समजून घेण्याचा प्रयत्न करण्याआधीच modern art किती फालतू आहे , आम्हाला नाही बाबा तसले काही समजत अश्या पद्धतीचा मध्यमवर्गीय धटिंगणपणा करण्यात पुरुषार्थ मानणारी अक्खी पिढी माझ्या आजूबाजूला होती. मैदानी खेळात , स्वयपाकात , गाण्यात अभिनयात , रोजच्या घराच्या साध्या आवरा आवरीत एक अमूर्तता आणता येते. ती आणणे कमीपणाचे का ? आपल्या इमारती , आपली  घरे , आपले रंग , आपले कपडे सगळे एकमेकांसारखे सोपे साधे का असावेत ? मला आग्रहाने  आजच्या काळातही सुंदर साड्या नेसणाऱ्या माझ्या मैत्रिणी आवडतात . त्या त्यांचा जगण्याचा आग्रह टिकवून ठेवतात. माझी ओळखीची एक मुलगी जवळजवळ जानव्हे घातल्यासारखा दिसणारा अरुंद  पदर घेते. तो पदर लपवत काहीच नाही. तिने साडी नेसायचे तिचे एक वैचित्र्य तयार केले आहे. त्याला लगेच लागतात सगळे हसायला.

दुसऱ्याची चेष्टा करणे आणि लगेच नव्या अनुभवला नाकारणे हे आपल्या मनातील अनोळखी अनुभवाच्या भीतीतून तयार होत असते.

नात्यांचे तेच आहे. आपले कुणाशी पटत नसते आणि आपण विचार  न करता ते पटकन मोडून टाकायला जातो तेव्हा आपल्याला त्या नात्यातली अमूर्तता , वैचित्र्य कळलेले नसते. काहीतरी वेगळे घडते आहे सध्या कुटुंबांमध्ये , लग्नामध्ये , लहान मुलेसुद्धा हल्ली वेगळ्याच मानसिकतेची जन्मू लागली आहेत. हि नवी रचना आपल्या वैयक्तिक आयुष्याभोवती आकार घेताना ती समजून घ्यायची असेल तर आपल्याला आपल्यामधील sense of absrtaction नीट जोपासायला हवा

. आपल्या कारकुनी मनाच्या आईवडिलांप्रमाणे आपण आपला संसार करायला गेलो किंवा आपली मुले वाढवायला गेलो तर मोठी पंचायीत होण्याचा काळ येऊ घातला आहे. जगण्याचा वेग , तंत्रज्ञानाची रोजच्या जीवनातील पकड आणि त्यामुळे अस्थिर झालेली मानवी मने पहिली कि कोणत्याही संवेदनशील माणसला हलून जायला होयील. आपण सगळे एका मोठ्या कालसंक्रमणातून जात आहोत. आणि त्या नव्या काळाला सामोरे जायला आपल्याला स्वतः ला आणि आपल्या पुढच्या पिढीला तयार कारायचे असेल तर त्यांच्या मनात तयार होणारा व्हिडीओ गेम्स मधून पोचणारा सेन्स ऑफ abstract ( अमूर्ततेची जाण ) काढून वेगवेगळ्या कलांमधून पाझरणाऱ्या अमूर्ततेला समजावून घेण्याची सवय आपण सगळ्यांनी लावून घ्यायला हवी.

कळणे आणि न कळणे ह्याच्या मध्येच सगळा सोपा अर्थ उभा असतो. तिथे आपण पोचणार कसे ?

 

image

 

अपेयपान ३२

 

प्रत्येक राजकारणी माणसाची सामान्य माणसाच्या मनामध्ये एक प्रतिमा असते. तशी राजीव गांधींची माझ्या मनात चांगली प्रतिमा होती. शाळेत असताना. मी दहावीच्या वर्गात गेलो तेव्हा त्यांची हत्या झाली. मला पहिल्यांदा आणि शेवटचे वाईट वाटलेले मला आठवते. राजीव गांधीनंतर भारतात अजून मोठा राजकारणी माणूस मेलेला नाही .त्यामुळे आता काय वाटेल हे माहित नाही पण वाईट नक्कीच वाटणार नाही. राजीव गांधी आवडण्यामागे आमच्या शालेय वयामध्ये काही कारणे होती. ते सुशिक्षित होते. ते पायलट होते .ते तरुण होते आणि दिसत. आणि त्यांच्यात एक शहरी sophistication होते. ज्याला योग्य असा मराठी शब्द काय असावा हे मला माहित नाही. बाकीचे कोणतेही राजकारणी लोक जसे आपल्या जीवावर आणि आपल्या पैशांवर टपून असतात असे वाटते तसे राजीवविषयी वाटत नसे. मी त्यांना पुण्यात आले असताना प्रत्यक्ष पहिले होते. ते अतिशय handsome हसरे आणि आपले वाटणारे पंतप्रधान होते.

ते शालेय वयामध्ये आवडण्यामागचे एक अजून महत्वाचे कारण होते , ते म्हणजे त्यांनी कॉम्प्युटर भारतात आणला होता.

आज जी गोष्ट माणसाइतकीच किंवा माणसापेक्षा महत्वाची होवून बसली आहे ती पंचवीसएक वर्षांपूर्वी भारतात अजिबातच नव्हती. घरात तर अजिबातच नाही. कॉम्प्युटर शिवायचे घर ह्याचा विचारही आज शहरी माणसाला करता येणार नाही . पण लहानपणी तो आमच्याभोवती नव्हता.

कॉम्प्युटर भारतामध्ये आला हे ठीक आहे पण तो नक्की करतो काय हे मला शाळेत कधी कळले नाही. माझे माझ्या walk man वर जीवापाड प्रेम होते आणि तो सोडून इतर कोणत्याही यंत्राशी माझे फारसे बरे नव्हते. मला सहावीत जाईपर्यंत साधा tv लावता येत नसे. फोन तर आमच्या घरी खूपच उशिरा आला. त्यामुळे कॉम्प्युटर हि अमेरिकन गोष्ट फार भारी वाटायची पण त्याचे नक्की आपण काय लोणचे घालायचे आहे हे कधी आम्हाला कळले नाही न कुणी आम्हाला सागितले. आमचे शिक्षक आम्हाला उठाबशा काढणे , पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या सेमी प्रेमाच्या कविता पाठ करणे , संस्कृतची घोकंपट्टी करणे आणि शिवरायांच्या सनावळ्या शिकवण्यात गर्क होते.

उपयोग झाल्याशिवाय कोणताही माणूस नवे शिक्षण घेत नाही. कॉम्प्युटर भारतात आला होता आणि तो खूप हुशार असून मोठी मोठी आकडेमोड सहजपणे करीत होता तेव्हा मला तो मोठ्या आकाराचा calculator असावा असे वाटले होते.

तिथपासून कुठपर्यंत आलो मी ? आता मला अन्न वस्त्र निवारा आणि वायफाय ह्या माझ्या मुलभूत गरजा वाटतात. सेक्स पासून पिझ्झा पर्यंत सगळे पाच मिनिटात घरपोच देणारी apps आपल्या फोनवर असतात. कॉम्युटर छोटा होत होत आता दिसेनासा झाला आहे. आणि काही वेळा मला मूर्खासारखी वायफळ बडबड करणारी माणसे आजूबाजूला असण्यापेक्षा हाय स्पीड broadband चे कनेक्शन आणि उत्तम laptop सोबत असावा असे वाटते. आयुष्य फार वेगाने आणि अनेक प्रकारे बदलून गेले आहे. मी  इंटरनेट ला जोडला गेलेला नसलो किंवा माझ्यासोबत माझा फोन नसेल तर मला एक प्रकारचा नर्वसनेस यायला लागतो.

माझी कॉम्युटरशीओळख शाळेनंतर सुरु झाली. माझ्या एक मामाने कॉम्प्युटर ट्रेनिंग देणारी छोटी institute सुरु केली होती तिथे मी दहावीनंतरच्या सुट्टीत मोठीच्या मोठी floppy घेऊन शिकायला जायला लागलो.आजच्या कॉम्प्युटरपेक्षा तो फार सोपा आणि साधा होता. आणि मला काही ते तंत्र अजिबात कळले नाही. तेव्हा मोठ्या लांबलचक commands type कराव्या लागत. मला त्या सगळ्याचा उपयोगच कळत नसे. तुम्ही विचार करा कि त्या काळात इंटरनेट नव्हते. त्यामुळे कॉम्प्युटरचा सामान्य माणसला काय उपयोग असणार? हे कुणी कुणाला सांगत नव्हते. पण सगळे उत्साहाने शिकू लागले होते आणि उगाच मोठ्या floppy घेऊन माणसे शहरभर उंडारत होती.

शेवटी एक दिवशी तो घरी आलाच. आला म्हणजे मीच मागवून घेतला कारण तोपर्यंत तो सगळ्यांकडेच पोचला होता आणि त्याच्या प्राथमिक अवस्थांमधून पार पडून त्याच्या आधुनिक वेगवान आवृत्त्या निघू लागल्या होत्या. मला अजूनही जे एकमेव सोफ्टवेअर येतं. word , ते तोपर्यंत मी शिकलो होतो आणि मला इंग्रजीमध्ये type करता येऊ लागले होते. माझ्यापेक्षा घरात कॉम्युटर असावा ह्याचा माझ्या आई वडिलांना जास्त उत्साह होता. मुलाला घरात तो घेऊन देणे हे त्यावेळी एक प्रेमाचे कर्तव्य होते. तो घरी आल्यावर आपण काय काय करू शकतो हे मी रात्री बसून एकदा आईबाबांना समजावून सांगितले होते. ते सगळे ऐकीव होते. मला एकच आकर्षण होते ते म्हणजे त्याच्यासोबत एक प्रिंटर येणार होता आणि मी स्वतः लिहिलेला शब्द मी माझ्या स्वतःच्या घरात बसून एक बटन दाबून प्रिंट करणार होतो. ती फार मोठी गोष्ट होती. कारण तोपर्यंत कुणालाही आपापल्या इच्छेने काहीही छापायची शक्यता नव्हती. छापणे आणि आपण लिहिलेले छापले जाणे ह्याला प्रमाणाबाहेर ग्लोरी होती. आता माझ्या इच्चेनुसार मी घरात बसून मी लिहिलेले छापणार होतो.

मी पहिल्या रात्री sons and lovers ह्या प्रसिद्ध कादंबर्रीमधून एक पान निवडले आणि ते स्वतः type करून सेव्ह केले आणि प्रिंट ची कमांड दिली. सरसर आवाज करत कागद प्रिंटर मध्ये सरकू लागला आणि मी लिहिलेले छापून माझ्या हातात आले. मला वाटले कि असेच कधीतरी मराठी लिखाण कॉम्प्युटर वर करणे शक्य होयील आणि आपण स्वतः लिहिलेले काहीतरी आपण स्वतःच्या घरात छापून काढू शकू.

 

 

हळू हळू त्या यंत्राने सगळ्या मनाचा आणि जगण्याचा ताबा घेतलाच. मला कधीही असे वाटले नव्हते कि आपण यंत्राच्या आणि तंत्राद्यानाच्या इतके आहारी जाऊ . कारण जुन्या मराठी वळणानुसार कोणत्याही नव्या गोष्टीला इतके आनंदाने स्वीकारणे हे मला चुकीचे वाटत असे. काही झाले कि विरोध करून आपण पहिले लांब राहायचे आणि आपलाच जुना शिरस्ता चालू ठेवायचा हा बाणा माझ्या अंगात पुरेपूर होता. त्यामुळे मी पहिले काही दिवस कॉम्प्युटरच्या आहारी गेलो नव्हतो.

floppy जाऊन CD आल्या आणि multi media drives घरात जोडले गेले तेव्हा माझा ओढा कॉम्प्युटर कडे वाढला. इंटरनेट च्या येण्याआधी इंटरनेट चे जे मूळ तत्व आहे ते आम्ही मित्र नकळत पाळायला लागलो. ते म्हणजे शेअर करणे . आपल्याकडे असलेली  गाणी , पुस्तके सिनेमे ह्यांनचे  मोकळेपणाने वाटप करणे आणि त्यातून नवी माणसे नवे मित्र जोडणे.

आम्ही एकमेकांकडे असलेले संगीत , चित्रपट आणि फोटो CD मार्फत आपापल्या घरच्या कॉम्प्युटरवर द्यायला घ्यायला लागलो. त्यामुळे आपल्या आई वडलांच्या पिढीपेक्षा वेगळा आणि गुप्त असा आमचा व्यवहार सुरु झाला आणि आम्ही सगळे त्या साध्या देवाणघेवाणीतून जोडले गेलो. आपल्याकडे काही असलेले वेगळे आणि सुंदर ह्यापूर्वी आपल्या नव्या मित्राला किंवा मैत्रिणीला देता येत नसे. एक तर ते analog फॉर्म मध्ये असे. म्हणजे दुसर्याला दिले कि आपले संपले. आणि दुसरे म्हणजे आपल्या आईवडिलांचा आपल्या जगण्यावर सतत नको तितका डोळा असे. ह्या दोन्ही मोठ्या भारतीय गैरसोयी CD drive नि संपल्या तेव्हा मला घरातला कॉम्युटर खऱ्या अर्थाने आवडू लागला. आकाराने तो खूप मोठा होता , जड होता .माझ्यासारखाच. तो माझा मित्र झाला. स्पीकर आले. आणि रात्री आईवडील झोपले कि बघण्याचे जे सिनेमे असतात त्यासाठी हेडफोन आले. मी स्वयंभू झालो.

फोनलायीन मधून घरात हळू हळू वेगाने इंटरनेट पोचण्याआधी शहरात इंटरनेट कॅफे निघाली. आणि आयुष्यात खरी बहार सुरु झाली.  मला इंटरनेट कॅफे ह्या विषयावर आणि अनुभवांवर मधुर भांडारकर सारखा सिनेमा काढता येईल. त्या काळात याहू च्या chat सायीट उघडल्या आणि मी सरळ अनोळखी लोकांशी डेटिंग सुरु केले. इंटरनेट वेळेत आले नसते तर आज माझे लग्न बिग्न होवून बसले असते आणि मला रडकी मट्ठ मुले असती असे मला वाटते . पण ते वेळेत आले आणि त्यामुळे माणसाच्या खाजगी आयुष्याची फार तरुणपणीच खोल खोल भुयारे खणली गेलो आणि आमची साजूक तुपासारखी  मने कुटुंब, सणवार आणि नातेवाईक ह्यांच्यापासून मुक्त झाली. आणि आम्हाला घरचे आणि दारचे असे दोन चेहेरे आले. आयुष्याची मोठी पार्टी सुरु झाली.

क्रमश :

image

 

अपेयपान ३३

 

जोपर्यंत मला इंटरनेट मिळाले नाही तोपर्यंत मी माझ्या कॉम्प्युटरचा पुरेसा वापर करत नव्हतो. इंटरनेट मोकळेपणाने आणि भरपूर वेगाने घरात मिळायला खूप वर्षे जावी लागली. हातातल्या मोबाइल फोनवर ते कधी येईल असे वाटले नव्हते. मोबाईल फोन असेल हेच कधी वाटले नव्हते पण नव्या सहस्रकात प्रवेश करताना भारताने इंटरनेट प्रणाली आणि संपर्काचे तंत्रज्ञान ह्या दोन्ही क्षेत्रात परदेशी कंपन्यांना व्यापार करायला परवानगी दिली आणि आयुष्याचे दोन भाग करता येतील अश्या गोष्टी घडू लागल्या. इंटरनेट पूर्वीचे आयुष्य आणि त्यानंतरचे आयुष्य.

मी माझे पहिले e मेल account २००० साली उघडले. फिल्म institute च्या पहिल्या वर्षात असताना आम्हाला digital technology नावाचा वर्ग होता आणि त्याच्या पहिल्या दिवशीच आपापले खाजगी मेल account उघडण्याचे ट्रेनिंग आम्हाला दिले गेले. हे सगळे फक्त सोळा वर्षांपूर्वी घडले आहे ह्यवर माझा विश्वास बसत नाही.

कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाला नाकारण्याची खूप मोठी आणि महत्वाची सवय आमच्या शहराला होती. कारण शहरात प्रोफेसरकी करणारे आणि डाव्या लोकांच्या पैशांवर सेमिनारला जगभर फिरणारे लोक पुष्कळ होते. काही नवीन आले कि विरोध करणे हे अश्या लोकांचे मूळ काम असते कारण समाज सुखी आणि सबळ झाला तर मग अश्या लोकांचे करियर कसे होणार ? त्यामुळे सतत नव्या गोष्टींविषयी साशंकता पसरवणे हि अश्या अति बुद्द्धीमान लोकांची सवय असते. त्यासाठी ते आमच्या शहरात सूर्याच्या चुलीवर शिजवलेले अन्न खाऊन , विद्यापीठात चालत किंवा सायकलवर जाऊन , फक्त हस्ताक्षराने लिहून, रसायने न फवारलेल्या भाज्या खाऊन, संध्याकाळी सात नंतर विजेचा वापर टाळून , पाठकोर्या कागदाच्या शिवलेल्या वह्या लोकांसमोर वापरून, खादीचे भरड कपडे घालून जगतात. महात्मा गांधी हे अश्या लोकांसाठी जगासमोर वापरायचे हुकमी चलन असते. त्यांच्या नावावर बिल फाडले कि भारतातले लोक काहीही ऐकतात. शहरात जन्मलेल्या किंवा मोठ्या प्रमाणात शहरात बाहेरगावहून , ग्रामीण भागातून शिकायला आलेल्या मुलांना अश्या रशियन कम साबरमती ब्रांड वागण्याची मोठी ग्लोरी तयार व्हायची. अश्या सगळ्या तरुण विद्यार्थाय्ना कार्यकर्ते म्हणून वापरता यायचे.अश्या सगळ्या पर्यायी आयुष्य जगण्यात करियर करणाऱ्या लोकांनी माहिती नवे  तंत्रज्ञान आणि कॉम्युटर्स विषयी वातावरणात एक साशंकता पसरवलेली असे.

ज्या गावात मोठी प्रसिद्ध विद्यापीठे असतात तिथे आयुष्याचा वेग संथ असतो. तो  खरंतर चांगला प्रवाही आणि बदलता असायला हवा पण तसा राहिला तर आखीव प्रोफेसरकी करून पोट भरणाऱ्या विद्वानांचे घर कसे चालेल ? आमच्या शहरातल्या बुद्धिमान लोकांना कोणतीही राजकीय किंवा सामाजिक बांधिलकी नव्हती.त्यांना फोर्ड फौंडेशन पासून ते रशियन देशांमधील देण्ग्यानपर्यंत कोणताही पैसा चालत असे. देणग्या आणि ग्रांट वर चालणारे ते श्रीमंत अर्थकारण होते. समाजवादाचे ते खास पुणेरी मॉडेल होते. जे जगात इतर कुठेही नसेल. २००० साल उजाडले तरी आमच्या शहरात १९६८ ची फ्रेंच क्रांती नुकतीच झाली आहे असे हे लोक वागत असत.त्या सगळ्या लोकांच्या बाष्कळ बडबडीला आणि चळवळीना इंटरनेट आणि मोबायील फोन्स ने मारून टाकले. अतिहुशार विचारवंत आणि भाबडे कार्यकर्ते ह्यांचे नाते संपले. अनेक लोकांना सामाजिक चळवळी संपल्या आहेत असे वाटते पण त्या संपल्या नसून त्या ज्या भोंगळ पद्द्द्तीने आजपर्यंत चालवल्या जात ती पद्धत मोडीत निघाली. भारतात उरलेसुरले शिल्लक असलेले सोविएत साम्राज्य खऱ्या अर्थाने इंटरनेट ने संपवले.

इंटरनेट ने जर काही मुख्य केले तर साधारण १९४७ च्या आसपास जन्मलेल्या पिढीचे तोंड बंद केले . ती पिढी तुम्हाला हे कळतच नाही ,तुम्हाला हे समजतच  नाही , तुम्हाला ह्याची पर्वाच नाही , तुम्हाला कसलीही जबादारीच नाही असे सतत बडबडत बसायची त्या पिढीकडून ज्ञान संधी आणि माहिती हातातून हिसकावून घेतली गेली आणि हवी आहे त्यांना मोफत वाटली गेली. तोपर्यंत ज्ञान माहिती आणि पर्यायाने पैसा ह्या गोष्टी ठराविक पद्धतीच्या, जातीच्या आणि मुख्य म्हणजे ठराविक वयाच्या लोकांकडे साठवून ठेवल्या असत. त्याची व्यवस्था बदलली. इंटरनेट हे आमच्या पिढीसाठी मोठे स्वातंत्र्य घेऊन आले. त्याचबरोबर अनेक धोके आणि जबाबदार्या.

इंटरनेट आले तेव्हा त्याचा वापर आपल्याला रुचेल तसा करायला शिकण्यात काही वर्षे जावी लागली. नुसते फेसबुकवर चहाटळपणा करण्याच्या पलीकडे आणि फोनवर एकमेकांना जोक्स पाठवण्याच्या पलीकडे इंटरनेट ची एक भूमिका आणि एक उद्धेश आहे हे समजायला काही वेळ जावा लागला.

ह्या काळात माझ्या आजूबाजूच्या अनेक मुलामुलींनी करियरचे योग्य आणि स्वतःला पटतील असे पर्याय निवडले. निर्णय घेऊन मग तो घरी सांगणे अशी सवय तरुण पिढीला लागली कारण मोठ्या वयाच्या घरातील लोकांना नव्याने जोडलेल्या जगातील अनेक गोष्टी समजेनाश्या झाल्या. माहिती  विचारणे आणि ती मिळवण्याची वाट पाहत बसणे ह्याचा काळ संपला.

 

 

 

 

 

 

पूर्वी मराठी घरातील वयस्कर बायका फक्त मुलींची बाळंतपणे करण्यासाठी कालीफोर्निया  ला जात आणि उरलेला वेळ देवळात, बागेत फिरण्यात घालवत त्या आता टोप्या goggle  घालून आपल्या वयाच्या इतर बायकांसोबत इजिप्त च्या पिरामिड समोर सेल्फ्या काढू लागल्या ,यू ट्यूब वर आपल्याला येणाऱ्या नागपुरी वडाभाताचे video अपलोड करू लागल्या. स्कायीप वर गप्पा मारू लागल्या. अतिशय तरुण आणि अतिशय ज्येष्ठ पिढीने ह्या काळात धमाल सुरु केली आणि साधारण पन्नाशीला आलेली मधली पिढी रागावून, घाबरून, कटकट करत, नोकर्या करत, हफ्ते फेडत ,जुनी होत घरी मालिका पाहत बसून राहिली. त्यांची मुले आणि त्यांचे आईवडील जग फिरू लागले. १९५० ते १९६० ह्या स्वातंत्र्या नंतरच्या दहा पंधरा वर्षात  जन्मलेली सगळी भारतीय पिढी किती बिचारी आणि असुरक्षित आहे हा अभ्यासाचा विषय करावा इतके बदल २००० साली डोळ्यांना दिसू लागले.

इंटरनेट वर मुबलक प्रमाणात हजारो लोकांनी साठवून ठेवलेले अनुभव वाचता पाहता ऐकता येऊ लागले त्यामुळे जगामध्ये लोक किती विविध आणि मजेशीर पद्धतीने जगतात हे समजून घेता आले. कितीतरी वेगळी पुस्तके , सिनेमे आणि संगीत ह्याची देवाणघेवाण तरुण पिढीने सुरु केली. Pen drive आणि हार्ड disk च्या काळात कुटुंबात राहूनही माणसाला आपले खाजगी आयुष्य जपता येऊ लागले. आपण कुणाला काय देतो ,कुणाकडून काय घेतो , काय पाहतो , काय ऐकतो ह्यावरचे कुटुंबाचे नियंत्रण संपले. मोठ्या वयाच्या लोकांनी ह्याविषयी आरडा ओरड सुरु केली तरी त्याचा प्रवाह थांबला नाही.

प्रत्येक तरुण माणसाला आपापले आयुष्य हवे तसे रचून पाहण्याची आणि नाही जमले तर पुन्हा नव्याने रचण्याचे शहाणपण मिळाले. अनोळखी माणसांशी संपर्क सोपा झाला . न पटणारी लग्ने तोडली मोडली नव्याने रचली गेली , नवी नाती उदयाला आली. प्रवास केले गेले , नव्या भाषा कानावर पडल्या हे सगळे घडले कारण इंटरनेट वरती जगातील लाखो करोडो लोकांनी आपापले अनुभव नोंदवून ठेवले होते आणि आपल्याकडील सगळी चांगली वाईट सामुग्री लोकांना मोकळेपणाने वापरायला , पाहायला वाचायला उपलब्ध करून दिली. ह्यामुळे एक महत्वाची भूमिका तयार होवू लागली ज्याची आपल्यालाही जाण असायला हवी.

मी इंटरनेट वरून इतके सगळे घेतो तर मी इंटरनेट ला काय परत देत आहे ?

इंटरनेट हे देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे. आपण जेव्हा इतकी माहिती आणि अनुभव सोप्या पद्धतीने घेतो आणि वापरतो त्यावेळी आपण आपल्याकडचे काही ज्ञान , आपले अनुभव आपण धडपड करून शिकलेल्या चार गोष्टी इंटरनेट वर नोद्वून ठेवायला हव्यात. आपले विचार असतील , आपल्याला येणाऱ्या काही गोष्टींचे video असतील , आपण करत असलेल्या प्रवासातले अनुभव असतील. ह्या गोष्टी इतरांना कळायला हव्यात. दृश्याला भाषा लागत नाही . आपल्या प्रत्येकाच्या खिशात कॅमेरा आहे. फोनला माईक आहे. आपण नुसते बसून chatting करण्यापेक्षा काही गोष्टी रेकॉर्ड करून आपल्या फेसबुक insta किंवा twitter वर अपलोड का करत नाही ? आपले स्वतःचे अनुभव मांडण्याचे chanel का सुरु करत नाही ? मी गेल्या वर्षी माझा ब्लॉग ह्या विचाराने सुरु केला आणि  त्याचा मला फार चांगला अनुभव येऊ लागला .

आपण प्रत्येकाने हा विचार करून काहीतरी नवे सुरु करूया . इंटरनेट ला मी माझे असलेले काय परत देत आहे ?

kundalkar@ gmail.com